डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गंगासागर तलवार नावाचा तरुण भारताची फाळणी झाल्यावर वायव्य सरहद्द प्रांतातून मुंबईत आला, पुढे ‘सागर सरहद्दी’ या नावाने लेखन करू लागला. कभी कभी, सिलसिला, चांदनी व अन्य चित्रपटांच्या पटकथा वा संवाद त्यांच्या नावावर आहेत. बाजार या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. मागील आठवड्यात वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने, त्यांच्या एका कथेचा अनुवाद येथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

रामाची रथयात्रा निघाली, तेव्हादेखील ती दर्शन घेण्याकरता लोकांबरोबर रस्त्यावर आली. रामाचा रथ पूर्णपणे परंपरेनुसार सजवला गेला होता. घोड्याच्या गळ्यात नकली चांदीचे हार होते. राम-लक्ष्मण आणि सीता हे पुष्पहार गळ्यात घालून अयोध्येला परतत होते. रामाच्या चेहऱ्यावर तेज होते... मोठ-मोठे मायाळू डोळे, जणू शांत सागर... कमलनयन, ओठांवर हास्याची लकेर, चाफेकळी नाक, केस मागे बांधलेले... आपल्या प्रजेला दर्शन देत ते रथातून पुढे-पुढे जात होते. दर वर्षीप्रमाणे ही वस्ती अयोध्यानगरी बनली होती. तेथील रहिवासी आपल्या प्रिय रामाचे दर्शन घेण्यासाठी कामधाम सोडून दोन्ही बाजूने रांगेत उभे होते. बराचशा महिला आपली आस्था प्रकट करीत रामाच्या पायाला हात लावून नमस्कार करीत होत्या. एक म्हातारी स्त्री तर सद्‌गदित होऊन त्यांच्या पायावर झुकली. तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. जणू ती प्रत्यक्ष रामाचे दर्शन करून ह्या मृत्युलोकातून मुक्त झाली होती. एकंदर असे वातावरण होते. विश्वासाची गंगा वाहत होती. आकाश घोषणांनी दुमदुमले होते. ‘सिया राम की जयऽऽ’ लोक मुग्ध होते... त्या वातावरणात हरवून जाऊन पुष्पादेखील पुढे झाली आणि तिने रामाच्या पावलांना स्पर्श केला. एक क्षणभर ती विसरली की- जो माणूस रामाची भूमिका करतो आहे, तो तिचा पती आहे. या  अशक्य घटनेकडे तिच्या पतीनेदेखील चमकून पाहिले होते. दोघांची नजरानजर झाली. जे घडले होते, त्यामुळे दोघेही घाबरले. या घटनेच्या मागे- या छोट्याशा घटनेमागे- किती तरी घटना आहेत... खरे तर ही घटना पुष्पाच्या नकळत घडलेली होती... पण दोघांनाही जाणवले की, कुठे तरी काही तरी तुटलेय... कुठे तरी फास बसलाय.

पुष्पाला मिळवण्यासाठी जगदीशने राजा जनकाच्या दरबारात शिवधनुष्य तोडले नव्हते. पण जीवनाच्या रणामध्ये त्याला जो संघर्ष करावा लागला, लढाई करावी लागली- ते सगळं स्वतः रामाने पाहिले असते, तर तो स्वयंवरासाठी तयार झाला नसता. ह्या आयुष्यात जगण्यासाठी किती मारावे लागते, किती दु:खं झेलावी लागतात... आज कोणत्याही देवाला त्याचा अंदाज बांधता येणार नाही. हे माणसाचे नशीब आहे की, त्याला हे सगळे सोसावेच लागते. फाळणीनंतरचे दिवस होते. जगदीश आपली आई आणि दोन बहिणी ह्यांच्याबरोबर रिफ्युजी कॅम्पमध्ये एका बराकीत राहत होता. वडील देवाघरी गेले होते आणि घरात तो एकच पुरुष होता. आईवर त्याचे खूप प्रेम होते. त्याच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आईच होती. जगदीशचे शरीर धष्टपुष्ट होते. सहा फूट उंच... आई त्याला आपल्या समोरच बसवून जेवण भरवत होती, जशी ती आपल्या पतीला देत असे. आपल्या मुलींपासून वाचवून, आपण न पिता, बहुतेक वेळा स्वतः उपाशी राहून ती त्याला एक पेला दूध देत असे. अर्ध्या ग्लास दुधाचे दही बनवत असे. जगदीश जितका आईवर प्रेम करीत असे, तितकाच तिला घाबरतदेखील असे. त्या वेळी त्याचे सहा फुटी शरीर त्याला साथ देत नसे. धष्टपुष्ट शरीर दबकून लहान होत असे. एकदा तो कुठून तरी दारू पिऊन बराकीत आला होता, तेव्हा आईने त्याला काठीने मारून-मारून त्याचे शरीर रक्तबंबाळ केले होते. त्याची दारू उतरवली होती. सगळ्या गल्लीने पाहिले होते की, तो रडतो आहे, क्षमायाचना करतो आहे, मार खातो आहे. आईने त्याला इतके मारले होते की- ती त्याच्या जखमांना हळद गरम करून आपल्या हाताने दहा दिवस लावत होती. जखमा शेकत होती. जगदीशने त्यानंतर दारूला स्पर्श केला नव्हता.

जगदीश एखाद्या घोड्यासारखा राबत होता. कॉलेजमधून परतल्यावर तो दहा-दहा, पंधरा-पंधरा रुपयांच्या ट्युशन घेऊन कुटुंबासाठी धान्य खरेदी करे. आपल्या दोन बहिणींच्या शाळेचा खर्च भागवत असे. काहीच दिवसांनंतर तो आपल्या कुणा दूरच्या भावाच्या शिफारशीवरून एका बँकेत नोकरीला लागला. मग तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊ लागला. दिवसा नोकरी करे, रात्री शिकायला जाई. मग कॉलेजची परीक्षा डोक्यावर आली की, त्याची तयारी करे.

एके दिवशी त्याची आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात बसवून त्याला जेवण वाढत होती. एक बहीण त्याला वारा घालत होती. आई त्याच्याकडे पाहता-पाहता अचानक  रडू लागली. जगदीशने जेवण थांबवले आणि तिला रडण्याचे कारण विचारू लागला. त्याने विचारल्यावर तर आई धाय मोकलून रडू लागली. जगदीश विचारत राहिला आणि ती रडत राहिली. जगदीशने जेवणाच्या प्लेट्‌स तोडल्या, मातीचा घडा फोडला, आपले डोके तो भिंतीवर आपटू लागला. गर्दी जमा झाली, तेव्हा आई हुंदके देत म्हणाली, ‘‘माझ्या मुलाच्या सोन्यासारख्या शरीराची माती झाली. हाय... मी त्याला इतक्या कष्टाने वाढवले, राजकुमार बनवले होते... जगाने त्याचे रूपच बिघडवले आहे!’’

त्या दिवशी जगदीश स्वतःविषयी विचार करू लागला. त्या क्षणानंतर त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. आई रडल्यानंतर तो ही खूप रडला. आईच्या त्या वाक्यावर त्याने लक्ष केंद्रित केले. त्याच्या रक्तात, रक्ताच्या एकेका थेंबात ते वाक्य सळसळत राहिले. त्या एका वाक्याने त्याचे आयुष्य बदलले. या एका वाक्यासाठी त्याने आईशी असलेले त्याचे नाते तोडले. आता तो लाडाने आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवत नसे. आता तो हसून आईच्या गळ्यात पडत नसे. आता तो आईशी चेष्टा-मस्करी करीत नसे.

त्याने आपला चेहरा आरशात पाहिला. तो त्या चेहऱ्याशी आपली ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. हा अनोळखी चेहरा त्याच्या खांद्यावर ठेवला गेला होता. तो त्याचे बदलते हावभाव पाहत राहिला. कानशिलापाशी आलेले पांढरे केस मोजत राहिला. डोळ्यांच्या खाली आलेल्या सुरकुत्या मोजत राहिला. त्याला स्वतःविषयीच द्वेष वाटू लागला. आपल्या कामाविषयी घृणा वाटू लागली. सूर्याविषयी घृणा वाटू लागली... जो दररोज त्याच्या उशाला येऊन त्याला उठवतो. रात्रीविषयी राग येऊ लागला- ज्या रात्रीने त्याला एकटेपणा बहाल केला होता, त्याची झोप गायब केली होती. त्याला दिवसाची घृणा वाटू लागली, जो नवीन तगादे घेऊन येतो, त्याला नव्या तडजोडी करायला भाग पाडतो... त्याच वेळी त्याच्या आयुष्यात पुष्पा दाखल झाली.

पुष्पा खात्या-पित्या घरात वाढली होती. रिफ्युजी तर तीदेखील होती. पण तिच्या आई-वडिलांनी पळून येताना बरोबर पैसे आणि दागिने आणले होते. त्या काळात नवरा मिळणे अवघड होते. कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. दहशतीचे वातावरण होते. पण पुष्पा सुंदर होती. हसतमुख होती. कामकाजात हुशार होती. मैत्रिणींमध्ये ती राजहंसासारखी वावरत असे. गल्लीमध्ये हरिणीसारखी धावत असे. तिच्या घरच्यांनी हुंडा वगैरे देऊन, एक फ्लॅट देऊन तिचे लग्न लावून दिले होते. पुष्पाला पाहून, तिच्याशी लग्न करून जगदीशला आयुष्य जगण्यासाठी एक कारण मिळाले होते. कदाचित याच्या आधारानेच तो आपले निरर्थक आयुष्य जगू शकणार होता. तो पुष्पावर मोहित झाला होता. तिला खूश ठेवण्याचे त्याने ठरवले.

आता तो बँकेच्या परीक्षा देण्यात गुंतला. एकानंतर एक पायऱ्या चढत गेला. दिवसा बँकेतील काम, रात्री परीक्षेसाठी दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करू लागला. आता त्याच्या कानांजवळचे केस पांढरे झाले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे झाली होती.

जीवनात हळूहळू धुके पसरू लागलेय याचा त्याला अंदाजच आला नाही. त्याला माणूस ओळखू येईना. कशातच त्याला अर्थ वाटेनासा झाला. गोष्टी विस्कटून जाऊ लागल्या. संबंध तुटत चालले. मनात काही रेशमी धागे आहेत, पण ते तुटत आहेत... त्यांचा तुटण्याचा आवाज असा येतोय की, जणू बॉम्ब फुटताहेत! हे काय होतेय की, तो ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीशी त्याचा काही संबंध नाहीये. आरशात तो त्याच्या चेहरा पाहतोय, पण तो चेहरा त्याचा नाहीये. मग दिवसरात्र मेहनत त्याने कशासाठी केली? आपल्या एका बहिणीचे लग्न, मग दुसरीचे... आणि मग अशा प्रकारे नट बनून मदाऱ्यासारखे दोरीवरून चालणे... तो चक्रावला. पुष्पाला खूश ठेवण्याऐवजी तिच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक दरी उत्पन्न झाली... आणि तो ज्या दिवशी डिपार्टमेंटचा इनचार्ज झाला, तेव्हा त्याला कामाबद्दल विरक्ती निर्माण झाली. तो आयुष्यापासून पळू लागला.

मग त्याने रामाची भूमिका केली. कानापाशी असलेले पांढरे केस काळे केले. डोळ्यांत काजळ घालून डोळे मोठे केले. ओठांवर हलकेसे हास्य... आणि जेव्हा तो धनुष्य घेऊन रथावर बसला, तेव्हा वस्तीतील लोकांना वाटले की, साक्षात राम प्रकट झाले आहेत! डोळ्यांत वैराग्य सुरुवातीपासूनच होते, आयुष्याची विरक्तीही होती. अर्धचंद्रासारखे हास्य स्वत:च एका पक्ष्याप्रमाणे त्याच्या ओठांवर येऊन बसले होते. आता रामाच्या चित्रात रंग भरला गेला होता. जगदीशने बाहेरील जगाशी संबंध तोडून अंतर्गत जगाशी संबंध जोडले होते. वास्तविक, जीवनाला वैतागून बनावटी जीवन त्याने आपलेसे केले होते. नाटकातील जादूमय जग त्याला आपलेसे वाटू लागले होते.

प्रत्येक वर्षी रामाचा रथ निघतो. प्रत्येक वर्षी गर्दी त्याच्या पाया पडते. प्रत्येक वर्षी आकाश दुमदुमते. आता जगदीश रस्त्यावरून जाताना त्याची नजर लोकांच्या चेहऱ्यांमधून आरपार जाते. कधी कधी लोक नमस्कार करण्यासाठी उठत. म्हाताऱ्या बायका तर सद्‌गदित होऊन त्याला भेटत आणि आशीर्वाद देत. जगदीशने आपल्या चेहऱ्याभोवती एक संरक्षण कवच तयार केले होते. ते आता कुणीही तोडू शकत नव्हते.

जेव्हा तो मेकअप उतरवून, केस पुसून, तोंड धुऊन, आपले कपडे घालून घरी पोहोचला; तेव्हा हैराण झाला. कारण घराचा दरवाजा उघडाच होता. आणि त्याची आई कौसल्येप्रमाणे जमिनीवर पडून रडत होती, ओरडत होती.  ‘‘रामाऽऽ तुझ्या सीतेचे हरण झालेऽ कुणी रावण तिला उचलून घेऊन गेलाऽऽ!’’

लोकांच्या डोळ्यांत अश्रू होते. गल्ली सुनसान होती. आयाबाया घराच्या बाहेर आल्या होत्या. म्हाताऱ्या बायका त्याच्याकडे पाहत होत्या. जणू त्यांचा राम वनवासाला निघालाय आणि तो तर कधीचाच वस्तीमध्ये राहून वनवास भोगत होता.

तो राम नव्हता... त्याची बायको सीता नव्हती... तो माणूस रावण नव्हता...

आणि त्याच्या समोर कोणतीही लंका नव्हती, जी ज्याला जिंकायची होती. होते फक्त निरर्थक आयुष्य. त्या आयुष्याचा कोणताही शेवट नव्हता.

मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ, मुंबई 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सागर सरहदी

हिंदी कथा लेखक, नाट्यलेखक, पटकथालेखक, चित्रपट दिग्दर्शक-निर्माते 
जन्म : 11 मे 1933
मृत्यू : 22 मार्च 2021


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके