डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्म आणि देव यांच्या संबंधीची आपली मते आणि विचार एकांगी होऊ नयेत, म्हणून गांधींनी विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ वाचले. त्यांनी भाषांतरित कुराण वाचले. त्यांनी एडवर्ड मेटलंड यांचे ॲना किंग्जफोर्डबरोबर लिहिलेले सद्य ख्रिश्चन श्रद्धांचे खंडित करणारे ‘द परफेक्ट वे’ व ‘द न्यू इंटरप्रिटेशन्स ऑफ द बायबल’ या ग्रंथांचा कसून अभ्यास केला. लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ या ग्रंथाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. तसेच त्यांनी नर्मदाशंकर यांचे ‘धर्मविचार’, मॅक्स मुलर यांचे ‘इंडिया - व्हॉट कॅन इट टीच अस?’ वॉशिंग्टन आयर्व्हिंग यांचे ‘लाइफ ऑफ महोमेट ॲन्ड इज सक्सेसर्स’, ‘द सेर्इंग्ज ऑफ झरतुष्ट्र’ इत्यादी ग्रंथही अगदी गांभीर्यतेने अभ्यासले. जवळजवळ सर्व प्रमुख धर्मांचा तौलनिक अभ्यास केल्याने प्रत्येक धर्माचे मर्म आणि वर्म त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे विविध धर्मांतील भाकडकथा व चमत्कारांनी ते भुरळून किंवा हुरळून गेले नाहीत.

म.गांधींची बालपणीच देवावर श्रद्धा बसली व ती त्यांच्या आयुष्यभर अगदी मृत्यूपर्यंत अविचल राहिली. रामनामाचा महिमा त्यांना सतत जाणवत राहिला व ‘हे राम’ या उद्‌गारांनी त्यांनी आपला प्राण सोडला. आणीबाणीच्या, कसोटीच्या प्रसंगातून सुटका झाल्यानंतर ते नेहमी म्हणत असत की, देवाने मला वाचवले आहे. त्यांच्या वडिलांकडे विविध जातिधर्मांची माणसे येत असत. त्यांच्यात इतर अनेक विषयांबरोबर धर्मावरही चर्चा होत असत. इथेच गांधींच्या मनात ‘सर्वधर्मसमभावा’ची पेरणी झाली. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांचा जनसंपर्क हळूहळू वाढत गेला व विचारकक्षा रुंदावत गेल्या. तेथे त्यांनी गीता, सर एडविन अर्नोल्ड यांचे ‘द लाइट ऑफ एशिया’, ‘द बायबल’ हे ग्रंथ चिकित्सक वृत्तीने वाचले. ‘द ओल्ड टेस्टामेंट’ त्यांना फारसे आकर्षित करू शकले नाही, पण ‘द न्यू टेस्टामेंट’चा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. विशेषत: ‘पर्वतावरील प्रवचन’ त्यांना फार आवडत असे. वरील ग्रंथांतील तत्त्वज्ञानाचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींचे देवशोध, सत्यशोध व आत्मशोध खऱ्या अर्थाने सुरू झाले. तेथे त्यांना आपली धार्मिक श्रद्धा निश्चित करणे आवश्यक ठरले. कारण विविध धर्मांचे लोक त्यांना आपल्या धर्माकडे ओढू  पाहत होते. प्रिटोरिया येथे गांधींचे एक परिचित मि.बेकर त्यांना ‘वेलिंग्टन कन्व्हेन्शन’ला घेऊन गेले. तेथील ख्रिश्चन वातावरणाचा प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांच्या धार्मिक श्रद्धांचा प्रभाव पडून गांधी ख्रिश्चन होण्याचा विचार करतील असे मि.बेकरना वाटले होते, पण तसे काही घडले नाही. आपल्या आत्मचरित्रात गांधी स्पष्टपणे म्हणतात, ‘‘माझी श्रद्धा, माझा धर्म बदलण्यासाठी मला कुठेलच कारण सापडले नाही. केवळ ख्रिश्चन बनूनच मी स्वर्गप्राप्ती करू शकतो किंवा मोक्ष मिळू शकतो असे समजणे मला जवळजवळ अशक्य होते. जेव्हा मी अगदी प्रांजळपणे माझ्या काही चांगल्या ख्रिश्चन मित्रांना तसे सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला; पण त्याला माझा इलाज नव्हता.’’

फक्त येशूच देवपुत्र व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यालाच चिरंतन जीवन मिळते यावर विश्वास ठेवणे गांधींना अवघड पडत असे. जर देवाला पुत्र असतील तर सर्व जण त्याचे पुत्र आहेत. जर येशू देव किंवा देवासमान असेल तर सर्व माणसे देव किंवा देवासमान आहेत असे वाटत असे. ख्रिश्चन धर्म पूर्ण धर्म आहे किंवा सर्वांत महान धर्म आहे असे त्यांना वाटत नसे. हिंदू धर्माबाबतही त्यांचे असेच मत झाले होते. कारण हिंदू धर्मातील दोष त्यांना जाणवले होते. वेद हे ईश्वरप्रणीत किंवा ईश्वरप्रेरित आहेत असे समजले तर बायबल व कुराणाबद्दलही तसे का म्हणू नये, असा गांधींना प्रश्न पडत असे.

धर्म आणि देव यांच्या संबंधीची आपली मते आणि विचार एकांगी होऊ नयेत, म्हणून गांधींनी विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ वाचले. त्यांनी भाषांतरित कुराण वाचले. त्यांनी एडवर्ड मेटलंड यांचे ॲना किंग्जफोर्डबरोबर लिहिलेले सद्य ख्रिश्चन श्रद्धांचे खंडित करणारे ‘द परफेक्ट वे’ व ‘द न्यू इंटरप्रिटेशन्स ऑफ द बायबल’ या ग्रंथांचा कसून अभ्यास केला. लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ या ग्रंथाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. तसेच त्यांनी नर्मदाशंकर यांचे ‘धर्मविचार’, मॅक्स मुलर यांचे ‘इंडिया - व्हॉट कॅन इट टीच अस?’ वॉशिंग्टन आयर्व्हिंग यांचे ‘लाइफ ऑफ महोमेट ॲन्ड हिज सक्सेसर्स’, ‘द सेर्इंग्ज ऑफ झरतुष्ट्र’ इत्यादी ग्रंथही अगदी गांभीर्यतेने अभ्यासले. जवळजवळ सर्व प्रमुख धर्मांचा तौलनिक अभ्यास केल्याने प्रत्येक धर्माचे मर्म आणि वर्म त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे विविध धर्मांतील भाकडकथा व चमत्कारांनी ते भुरळून किंवा हुरळून गेले नाहीत. गं्रथातला धर्म व व्यवहारातला, प्रत्यक्षातला धर्म यांच्यातील फरकही त्यांच्या लक्षात आला. पुजारी, पुरोहित व धर्मोपदेशक सामान्य माणसाला शिकवत असत एक मात्र बरोबर यांच्या उलटे वर्तन करत असत. सत्य सर्वच धर्मांनी सांगितले, पण कोणत्याच धर्माने त्याचे काटेकोर पालन केले नाही. सर्वच धर्मांनी माणुसकीचा, मानवतावादाचा संदेश दिला, पण नेमका तोच आचरणात आणण्यात बऱ्याच माणसांना अपयश आले आहे. सर्वच धर्मांनी अहिंसेचा उपदेश केला, पण धर्माच्या नावाखालीच जगात जास्त हिंसाचार आणि पाप झाले आहे आणि आजही होत आहे. प्रत्येक नवजात बालकात ईश्वरी आवाज ऐकायचा, ईश्वरी अवतार बघायचा आणि त्याच वेळी प्रत्येक माणूस जन्मत: आणि मूलत: पापी आहे असे म्हणायचे किंवा मानायचे यात वैचारिक किंवा भावनिक विसंगती नाही का? सर्व देव आणि देवळे इथे खाली असूनही देवाचा संदर्भ येतो तेव्हा आपली मान वर वळते, नजर वर जाते याचे कारण काय असावे, याचा अंदाज कधीतरी घ्यायला नको का? ‘वरच्याला ठाऊक’ असे आपण म्हणतो तेव्हा ‘खालच्यां’चा अनादर तर होत नाही ना, याचाही विचार व्हायला हवा.

अगदी सर्वोत्तम असा कोणताच धर्म नाही आणि दोष नाहीत असाही धर्म नाही अशी खात्री झाल्यामुळे गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना खऱ्या धर्माच्या आणि देवाच्या शोधात होते. धर्मातील भ्रष्टाचार, चमत्कार, गूढवाद, कर्मकांड गांधींना मान्य नव्हते. धर्म साधा असला पाहिजे, देव सर्वांना सहज उपलब्ध होईल असा असला पाहिजे असे त्यांचे मत होते. प्रत्येकाचा देव वेगळा, त्याचं नाव वेगळं, यामुळे खोटा धार्मिक अभिमान वाढीस लागतो, माणसं एकमेकांपासून दुरावतात. म्हणून सर्वांना आपला वाटेल व मानवतेला उपयुक्त ठरेल अशा धर्माची संकल्पना व देवाची संकल्पना त्यांच्या मनात घोळत असावी, धर्म आणि देवाबद्दल ते नक्कीच अंतर्मुख झाले असावेत.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधी समाजसेवेकडे वळले. आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्याचे सेवा हे त्यांच्या दृष्टीने प्रमुख व प्रभावी माध्यम होते. त्यांनी सेवा हा आपला धर्म बनवला. कारण केवळ सेवेतूनच ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकेल, अशी त्यांची खात्री झाली होती. आणि सेवा याचा अर्थ मातृभूमीची सेवा- असे त्यांचे समीकरण होते, कारण ती त्यांना सहज उपलब्ध होती. ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात की, I had made the religion of service my own, as I felt that God could be realized only through service. -  गांधींचा सेवाधर्म जीवापासून सुरू होतो आणि देवापर्यंत जाऊन पोहोचतो. या प्रवासात जात, धर्म, देश हे भेद राहत नाहीत.

माणसांची सेवा करण्यात ते सदा तत्पर असत. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे त्यांचे ठाम मत झाले होते. एकदा दक्षिण आफ्रिकेत एक महारोगी त्यांच्या दारी आला. त्यांनी त्याला आश्रय दिला, त्याच्या जखमा साफ केल्या, त्याची आपल्या घरातील एका खोलीत व्यवस्था केली व काही दिवसांनी गिरमिट्यांसाठी असलेल्या सरकारी दवाखान्यात त्याला दाखल केले. गांधींच्या सेवावृत्तीचे हे बोलके उदाहरण आहे.

मानवसेवा ही फार व्यापक गोष्ट आहे. जशी चांगुलपणाला अंतिम सीमा नसते, तशीच सेवेलाही अंतिम सीमा नसते. माणसाला त्याच्या शारीरिक पीडांपासून मुक्त करणे, त्याचे जीवन उन्नत करून त्याला सुख, समाधान, आनंद देणे, त्याला सर्व प्रकारच्या अज्ञानातून, गैरसमजातून बाहेर काढणे, त्याला योग्य ते मानसिक व बौद्धिक शिक्षण देणे, त्याच्याशी प्रेमाने, आदराने, सहकार्याने वागणे, त्याला बंधुतेने, समानतेने वागवणे, त्याच्यावर कधीही अन्याय न करणे, होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्याला मदत करणे, स्वातंत्र्याची त्याला हमी देणे, ज्याची सेवा केली त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा न करणे, या सर्व आणि इतर कित्येक गोष्टी गांधींच्या सेवाधर्मात अंतर्भूत आहेत. त्यागवृत्ती हा त्यांच्या सेवाधर्माचा आत्मा आहे, नव्हे त्याग हाच सर्वोत्तम धर्मप्रकार आहे असे त्यांचे ठाम मत झाले होते.

सेवेसारखा धर्म नाही, सेवेसारखे कर्म नाही, सेवेसारखे पुण्य नाही- अशी गांधींची खोल श्रद्धा होती. सेवा म्हणजे आत्म्याचा आत्म्याशी संवाद, आत्म्याचा उद्धार... अशा सेवाधर्माची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी गांधींनी जॉन रस्किनच्या विचारांवर आधारित दक्षिण आफ्रिकेत ‘फिनिक्स सेटलमेंट’, ‘टॉलस्टॉय फार्म’ व भारतात आश्रम, सत्याग्रहाश्रम, सेवासंस्था इत्यादी स्थापन केले.

माध्यमिक शाळेत शिकत असतानाच त्यांना हरिश्चंद्राच्या आख्यानात गोडी निर्माण झाली होती. ‘सर्वांनीच हरिश्चंद्रासारखे सत्यवादी का होऊ नये?’ असा एक प्रगल्भ प्रश्न त्यांच्या बालमनाला पडला होता. पुढे आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात त्यांनी सतत सत्याचा, सत्य वर्तनाचा आग्रह धरला, सत्याग्रही चळवळी केल्या आणि सत्याचार हाच नित्याचार झाला पाहिजे असा विचार लोकांवर बिंबवला.

जगातील तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, धार्मिक अधिकारी, महान साहित्यिक इत्यादी थोर विभूतींनी सत्यशोधन हेच आपले ध्येय मानले आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी वाणी आणि लेखणी झिजवली. तरीही सत्य हे प्रत्येक काळाला एक आव्हान वाटत आले आहे. म. फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ लोकांसमोर ठेवला, म. गांधींनी सत्याचे प्रयोग केले आणि My life is my message  असे ते म्हणाले. एका असत्याने कित्येक अनर्थ केले आहेत, असे वाटल्याने दोघांनीही सत्य आपल्या जीवनाच्या मध्यवर्ती ठेवले. इतक्या लोकांनी इतकी वर्षे सत्याचा आग्रह धरून सत्य वर्तन करणाऱ्यांची संख्या या जगात म्हणावी तितकी वाढलेली दिसत नाही. शेक्सपियरचा हॅम्लेट म्हणतो, ’ to be honest, as this world goes, is to be pick'd out of ten thousand'  आज तर लाखातही एक प्रामाणिक माणूस सापडणे अवघड झाले आहे. म्हणून तर पुन्हा एकदा शेक्सपियरच्या ‘टाइमन ऑफ अथेन्स’मधील एक संदर्भ द्यावासा वाटतो. या नाटकातील एक लॉर्ड ॲपमेन्टस या तापट तत्त्वज्ञाला विचारतो, 'What time of day is't? तेव्हा तो तापट तत्त्वज्ञ उत्तर देतो 'Time to be honest.’ त्यांच्या या उत्तरात विनोद आहे, उपरोध आहे आणि तात्त्विकताही आहे. प्रत्येक वेळ ही प्रामाणिकपणाची वेळ असते असेच त्याला सुचवायचे आहे. याचाच अर्थ असा की, प्रामाणिकपणा व सत्य वर्तन ही सवडीने किंवा आवडीने नव्हे तर नैतिकतेने आणि सातत्याने वापरण्याची मूल्ये आहेत, हे भान सर्वांनी सर्व काळी ठेवले पाहिजे.

स्थूलमानाने 1930 पर्यंत God is Truth असे गांधी समजत असत. तो देव त्यांना अजून नेमकेपणाने सापडला नव्हता, पण शोध चालू होता. 1931 मध्ये त्यांनी आपली Truth is God ही नवी भूमिका जाहीर केली. या नव्या भूमिकेतून गांधींना हेच सुचवायचे होते की, सत्य हे सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापक, सर्वसमावेशक आहे, ते सार्वभौम आहे आणि म्हणून ते ईश्वर आहे. सर्वांना मान्य होईल असा हा गांधींचा सत्यदेव आहे. ‘माझा देवावर विश्वास नाही’ असं म्हणणारी खूप माणसं या जगात आढळतात, पण ‘माझा सत्यावर विश्वास नाही’ असं म्हणणारी माणसं कुठेच आढळणार नाहीत हा त्यांचा युक्तिवाद सहज पटणाराच नव्हे- तर सतत टिकणाराही आहे. गांधींचा हा सत्यदेव ना आहे देवळात, ना आहे दगडात- तो आहे माणसाच्या देहात. त्याचे सहज दर्शन होत नाही, त्याचे प्रदर्शन करता येत नाही, कारण तो माणसाच्या आत्म्याच्या अनुभूतीशी, त्याच्या विवेकाशी, त्याच्या नित्य अनुभवांशी संबंधित असतो. तो सूक्ष्म आहे म्हणून तो चटकन कळत नाही, पण जेव्हा तो कळतो तेव्हा स्थूल तेजोमय रूपात प्रकट होतो. तो भ्रष्ट असत नाही, त्याला भ्रष्ट करता येत नाही. केवळ सत्याग्रही, सत्यवचनी, सत्यवादी, सत्यपालकच त्याचे भक्त होऊ शकतात. म. फुल्यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तका’तील तेहतीस प्रकारचे स्त्री-पुरुष या सत्यदेवाचे उत्तम भक्त होऊ शकतात.

गांधींच्या या सत्यदेवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही मध्यस्थ, दलाल, पुजारी, पुरोहित लागत नाही. त्याला लागत नाही कसलेच कर्मकांड. त्याला लागते फक्त खऱ्या कर्माची व खऱ्या धर्माची जाणीव. त्याला लागतो ना धूप, ना तूप, ना जप, ना तप; ना बत्ती ना अगरबत्ती. त्याला हवी असते माणसाची उच्च दर्जाची नीती आणि मनापासूनची भक्ती. या सत्यदेवाच्या भेटीसाठी प्रत्येकाला स्वत:च्या आत डोकावावे लागते, आत्मावलोकन, आत्मपरीक्षा, आत्मसमीक्षा करून आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करून घ्यावा लागतो.

गांधींचा हा सत्यदेव एकमेव आहे, एकटा आहे. एकटा असूनही तो खूपच समर्थ आहे. प्रत्येकाच्या हृदयात अंधारात असल्यासारखा तो वाटतो, पण प्रत्यक्षात त्याचे तेज सूर्याच्या तेजापेक्षा दशलक्ष पटींनी जास्त आहे असे ते आत्मचरित्रात म्हणतात. त्याच्या प्रखर तेजात माणसाची आध्यात्मिक व नैतिक उंची वाढत असते. हाच सत्यदेव माणसाला मुक्त करतो, मोक्ष देतो. गांधींचा हा सत्यदेव लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’चे आपल्याला सतत भान देत असतो.

या सत्यदेवाच्या दर्शनासाठी प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या लहानथोर प्राणिमात्रांवर जिवापाड प्रेम केले पाहिजे, आपल्या पायाखालच्या धुळीइतके विनयशील व सहनशील बनले पाहिजे अशी गांधींची प्रामाणिक धारणा होती, श्रद्धा होती. या सत्यदेवाप्रत जाण्यासाठी प्रत्येक सत्यशोधक मनन, चिंतन, प्रार्थना, मौन, उपवास (शारीरिक-मानसिक प्रतिकार), सत्याग्रह, अहिंसात्मक प्रतिकार इत्यादी साधने वापरू शकतो. महात्मा गांधींच्या या सत्यदेवामुळे जगातील कित्येक कटकटी, हानिकारक गोष्टी कमी होतील आणि चांगल्या व विधायक गोष्टींची वाढ होईल. या जगाला कित्येकांनी आपापले देव दिले, कित्येकांनी देव नाकारले, कित्येक जण स्वत:च देव बनले. पण सत्याला देव माणणारा सत्यदास मोहनदास करमचंद गांधी केवळ विरळाच!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके