डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मनोविष्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी

स्वप्नतंत्रात आणि कलाकृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का? फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले तर मनापासून पटू लागते की- ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत; म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहे. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.

कोणतीही कलाकृती ही काळाची तरी असते किंवा मानवी संबंधांची तरी असते, हे सूत्र कोणत्याही काळात नाकारले जाऊ शकत नाही. मानवी संबंधांवर कलाकृती लिहायची असेल; तर खोटे मुखवटे घालण्यास नकार देत, पात्रांच्या चित्रीकरणातून खरे मानवी चेहरे वाचवण्याचे कठीण काम लेखकाला करावे लागते. तेथे मनोविश्लेषण-पद्धतीला फार वाव नसतो. पण काळाची कादंबरी असेल, तर काळाचे सत्य तिच्यात उतरण्यासाठी मनोविश्लेषणात्मक पद्धत खूप उपयोगी पडते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांची ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी... कादंबरी पूर्णपणे मनोविश्लेषणात्मक आहे... तशीच ती संज्ञाप्रवाही आहे... या कादंबरीत कथानक संरचनेची पूर्णपणे मोडतोड करून तिचा एक नवा आकृतिबंध उदयाला आणला आहे, तो सामान्य वाचकांच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. सरळपणे कथानक वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना ही कादंबरी वाचताना डोक्याला मुंग्या येतील... नव्हे, त्या कडकडून चावतील.

कारण या कादंबरीत सांगितल्याप्रमाणे मुंग्यांचे मुखवटे घालून खरे मानवी चेहरे वाचण्याचे कठीण काम लेखकाने केले आहे... ही कादंबरी मानवी संबंधांवर आधारित नाही, तर मनोविश्लेषणात्मक पद्धतीने काळावर केलेले भाष्य आहे... हे भाष्य करण्यासाठी लेखकाने मुंगीचे मनोविश्लेषणात्मक मिथक  वापरले आहे. या कादंबरीत पात्रे आहेत त्या चार मुंग्या... निवेदक मुंगी... लाल मुंगी... काळी मुंगी आणि तांबडी मुंगी... वारुळातून बाहेर पडून त्या निघाल्या आहेत मुक्तीच्या शोधात. म्हणून या कादंबरीला नाव दिले आहे ‘पिपिलिका मुक्तिधाम’. पिपिलिका म्हणजे मुंगी... तो  संस्कृत भाषेतील शब्द आहे.

ही कादंबरी एकूण 23 उपशीर्षकांमध्ये विभागलेली आहे. ‘जगण्याच्या तळाशी’ या उपशीर्षकापासून सुरू झालेली मुंग्यांची मोक्ष यात्रा ‘मौन्यमुखी निळा धरियली’ या अखेरच्या उपशीर्षकापर्यंत येऊन थांबली आहे. त्यामुळे या कादंबरीचा कॅनव्हास विस्तृत आणि बहुरंगी झाला आहे.

काळ आणि मानवी संबंध हे कोणत्याही कलाकृती लेखनाचे सूत्र पाहता, ही कादंबरी काळाचा संदर्भ टिपण्याकडे जास्त प्रमाणात झुकली आहे. मागील दोन वर्षांत देशात जे-जे घडून गेले आहे, त्या सगळ्यांवर निवेदक मुंगीने मनोविश्लेषणात्मक पद्धतीने संज्ञाप्रवाही भाषेत भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे, 370 वे कलम आणि जेएनयूमधील चळवळ या  अचेतन महाविस्फोटक घटनांवर केलेले भाष्य नेहमीच्या पठडीत न मांडता चिंतनात्मक पद्धतीतून मुंगीच्या मनोविश्लेषणातून आपल्याला सुचेल त्या फॉर्ममधून लेखकाने मांडले आहे.

या कादंबरीचा परिप्रेक्ष्य सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या विचारातून जाणून घ्यायचा असेल; तर ही कादंबरी आपल्या युगाची उपज आहे, तरी या जगाच्या  सीमा ओलांडून ती अचेतन जगाचे विचार प्रकट करण्याचे सामर्थ्य दाखवते. एकीकडे ती एकविसाव्या शतकावर भाष्य करते, तर दुसरीकडे वैज्ञानिक निश्चयवाद आणि जीवनशक्तिवाद प्रभावीपणे मांडते. अशा प्रकारचे कादंबरी-लेखन इंग्रजीमध्ये जॉर्ज ऑरवेल यांनी आपल्या ‘ॲनिमल फॉर्म’मध्ये डुक्कर या प्राण्याचे व मराठीमध्ये व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या ‘सत्तांतर’ कादंबरीत वानरांचे मिथक वापरून केले आहे. त्यातून मानवी स्वभावाची संगती-विसंगती मनोविश्लेषणपद्धतीने प्रस्थापित केली आहे आणि दोन्ही लेखक त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत.

या कादंबरीत मुंग्यांचे मिथक वापरले आहे... हे जग जणू मुंग्यांनी भरलेले आहे आणि त्यांचे एकमेकींशी चालणारे व्यवहार लेखकाने बारकाईने अभ्यास करून चितारले आहेत. या मुंग्यांच्या जगातले काही नियम आहेत- एकीला अन्न मिळाले की, ते दुसरीला सांगणे. शत्रू दिसला की, सगळ्या जणींनी त्याच्यावर तुटून पडणे.

तरीही ‘आम्ही’ या सर्वनामी मुंग्या... मुंग्यांच्या जगातील कोणतेच नियम स्वतःवर लादून घेत नाहीत (संदर्भ- जगण्याच्या तळाशी, प्रकरण पहिले). जीवनातील आवश्यकतेनुसार या मुंग्यांनी स्वतःला लवचिक बनवले आहे. त्या सतत मुक्तीच्या शोधात वाटेल तिकडे फिरत असतात. कधी क्रिकेट खेळतात, कधी देहूला जातात- कधी आळंदीला जातात. या सगळ्यांवर निवेदक मुंगी मनोविश्लेषणात्मक भाष्य करत असते. हे भाष्य अतिसामान्य अचेतन  विषयावर चेतनेचे नियम लादून करीत असते. हे भाष्य चन्या-मन्या बोरे विकणाऱ्यावर... भंगार गोळा करणाऱ्यावर... बँड पथकावर असते. निवेदक मुंगीला पाण्यातील माशांवर, बेडकावर बोलायचे आहे आणि मनातील खदखद व्यक्त करायची आहे, कारण खदखद म्हणजे पहिला पाऊस....

या खदखदीतून कुणीही सुटत नाही. ही खदखद धर्मावर भाष्य करते. त्यातून जैन तत्त्वज्ञान, मुस्लिम तत्त्वज्ञान... ख्रिश्चन आणि बौद्ध तत्त्वज्ञानही सुटत नाही. हे सगळे विवेचन करताना प्रा.बाळासाहेब लबडे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अभ्यास करून माहितीचे प्रचंड स्रोत गोळा केले आहेत. विविध भाषांचा खुबीने वापर केला आहे. प्रत्येक उपशीर्षकामध्ये साहित्यातले वेगवेगळे फॉर्म वापरले आहेत. ऋचा, स्तोत्र, लोककथा, पोवाडा, भारूड, आख्यान यांचा वापर केला आहे. प्रस्तावनेत शंकर विभुते यांनी म्हटल्याप्रमाणे- मराठी साहित्यात एकाच लेखकाने एकाच कलाकृतीत वापरलेले इतके फॉर्म तुम्हाला अन्यत्र दिसणार नाहीत, म्हणून ही कादंबरी आजच्या युगाची उपज असली तरी साहित्याच्या सीमारेषा ओलांडून मौलिक विचार प्रकट करणारी आहे

बुद्धी आणि तर्कावर आधारित या कादंबरीतील मुंग्या कधी स्वैरपणे, तर कधी परकायाप्रवेश करून जीवन-दर्शनावर मनोविश्लेषणात्मक भाष्य करतात. प्रकरण सतरामध्ये ‘आमचा घंटानाद’ या प्रकरणात- त्या म्हणतात, ‘आम्ही चौघी बायकांचे चार डोळे झालो. मी कौशी झाले. मलाच टीव्ही म्हणायला लागले.’ या मुंग्या केवळ बुद्धीनुसार चालत नाहीत, तर कधी कधी काही शक्ती त्यांना चालवतात, असे दिसते.

फ्रॉईडची मुक्त संपर्कपद्धत पिपीलीका मुक्तीधाम या कादंबरीत विस्ताराने जाणवत राहते. या पद्धतीत मन:तत्त्व व्यक्तीला ज्याप्रमाणे प्रेरित केले जाते. आणि जो विचार किंवा त्याच्याशी संलग्नित शब्द किंवा स्मृतीचे जुने तुकडे अचानक त्याच्या मनातून बाहेर काढून ती व्यक्ती तो  विचार व्यक्त करते, त्या पद्धतीने मुंग्यांच्या निवेदनातून कादंबरीतील प्रासंगिक तुकडे व्यक्त झाले आहेत. मनोविश्लेषणपद्धतीने जणू मुंगीच्या अव्यक्त अंतर्मनाला चावी दिली आहे. या माध्यमातून मुंगीचे मन:तत्त्व खूपशी माहिती सांगून जाते. या कादंबरीतील निवेदक मुंगी आपल्या स्मृतीच्या तुकड्यांतून नवे जग वाचकांच्या डोळ्यांपुढे उभे करते. तिच्या तोंडून कुठेही लेखक व्यक्त होत आहे, असे जाणवत नाही. हे या कादंबरीचे यश आहे.

कादंबरीतील निवेदक मुंगी आत्मपरीक्षणाचा आधार घेते, मग मनात दडलेली काही तथ्ये शोधून काढते व त्यांचे विश्लेषण करते. म्हणजे निरीक्षण... परीक्षण... विश्लेषण... आणि विवेचन- या चतु:सूत्रीतून निवेदन करीत पुढे सरकते. हे विवेचन कधी तिरकस, कधी उपहासात्मक, तर कधी निर्भीडपणे केलेले आहे.

निवेदक मुंगीचे हे मनोविश्लेषण म्हणजे एक दीर्घ बौद्धिक यात्रा आहे, असे वाटत राहते. वेगवेगळ्या अभिव्यक्तींच्या फॉर्ममधून आणि वेगवेगळ्या भाषांतून प्रवास करीत राहते. मनन आणि चिंतन यांचा एक गूढ तात्त्विक दस्तावेज घेऊन वैज्ञानिक अंगाने व्यक्त होण्याचा अवघड प्रयास करते.

या कादंबरीत निवेदक मुंगी एखाद्या घटनेसंदर्भात आपली पूरक किंवा विरोधी मते नोंदवताना दिसते. चेतन आणि अचेतन या दोन्ही अवस्थांत रमणारे तिचे मन अज्ञात, अस्ताव्यस्त आणि अगम्य प्रदेशात भरकटल्यागत दिसते. ते संघटित राहत नाही. ज्या प्रवृत्ती वास्तविक परिस्थितीला अनुरूप असतात, त्याने तिचे मन संतुष्ट होते. ज्या परिस्थितीने संतुष्टी होत नाही, ती परिस्थिती तिच्या मनात दाबली जाते. या दमित इच्छा-आकांक्षा अचेतन अवस्थेत सक्रिय होतात, त्यामुळे निवेदक मुंगीच्या निवेदनाचा स्तर सतत बदलत राहतो किंवा लेखकाने तो सतत बदलत ठेवला आहे. हासुद्धा लेखकाच्या प्रयोगाचा एक भाग आहे.

कादंबरीचे निवेदन ‘आम्ही’ या  समूह निश्चेतणातून सुरू होते. चारही मुंग्या एक होऊन बोलू लागतात, त्यातून त्यांचे एक सामूहिक मन तयार झाले आहे आणि ते बोलू लागले आहे. मधेच हे निवेदन प्रथमपुरुषी होते, तर कधी ते तृतीयपुरुषी होते. कादंबरीतील सगळ्या उपशीर्षकांमध्ये असे निवेदनाचे प्रकार बदलत राहतात. त्यातून अर्थाचे एक वलय तयार होते. एका वयातून दुसरे वलय आणि एका अर्थातून दुसरा अर्थ तयार होतो. त्यातून समूहाचा एक व्यापक अर्थ संपूर्ण कादंबरीत जाणवत राहतो. हे अर्थ-परिवर्तन आणि स्वर-परिवर्तन इतके स्वभाविक आहे की, खूप वेळाने जाणीव होते की- निवेदक मुंगी आत्ता जो प्रसंग सांगत होती, तो प्रसंग गायब झाला आहे आणि दुसऱ्या अर्थाचा दुसरा प्रसंग सुरू झाला आहे. त्यामुळे एकाच प्रसंगातून अनेक अर्थ किंवा अनेक प्रसंगांतून एकच अर्थ निघत जातो. असे प्रयोग फक्त पाश्चिमात्य कादंबऱ्यांत पाहायला मिळतात. मराठी साहित्यात बहुधा ही पहिलीच कादंबरी अशी असावी की, ज्यामध्ये लेखकाने महत्प्रयासाने असा प्रयोग करून दाखविला आहे किंवा लेखकाच्या हाती असा प्रयोगक्षण अचानकपणे आलेला असावा- ज्याला प्रेरित क्षण म्हणतात- ज्यामुळे लेखक अशा प्रकारे कादंबरी लिहायला प्रवृत्त झाला आहे (खरं म्हणजे ज्याला आपण प्रेरित क्षण म्हणतो, ती लेखनप्रक्रिया नेहमी  कठोर परिश्रमाने प्राप्त झालेली असते, जी या कादंबरीत जाणवत राहते).

निवेदक मुंगीच्या बदलत्या भाषिक फ्यूजनमुळे व फॉर्मपरिवर्तनामुळे कादंबरीच्या गतिपरिवर्तनात विशिष्ट प्रकारची रंजकता आणि वाचनीयता आली आहे. हे भाषिक फ्यूजन फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या खूप जवळ जाते. समूहमनाच्या भाषिक नियमांचे उल्लंघन करून लेखकाने एक वेगळी भाषा तयार केली आहे. सामूहिक मनाच्या मानसिकतेची मोडतोड वाक्यांची, अर्थांची मोडतोड... करून प्रत्येक फॉर्ममध्ये निवेदक मुंगी साहित्यिक फॉर्मचीसुद्धा मोडतोड करीत जाते, तरीही कादंबरीवरील वाचकांची पकड सुटत नाही. कारण या कादंबरी-निवेदनात लालित्य आहे, उपहास आहे, विरोध आहे, विसंगती आहे. लेखकाने टिपलेले अनुभव आणि वापरलेली भाषा वाचकांना खिळवून ठेवते. त्यासाठी लेखकाने वेगवेगळ्या भाषांचा बारकाईने अभ्यास करून आपले अनुभव मांडलेले आहेत. हे या कादंबरीचे बलस्थान आहे.

स्वप्नतंत्रात आणि कलाकृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का- अशा फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले, तर मनापासून पटू लागते की- पिपिलिका मुक्तिधाम ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत, म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहेत. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.

आगामी काळात ही मनोविश्लेषणात्मक कादंबरी मराठी साहित्यात नव्या मानदंडाने एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे नक्की.

Tags: बाळासाहेब लवडे पुस्तक परिचय नवे पुस्तक पिपीलिका मुक्तिधाम ग्रंथाली प्रकाशन pustak parichay nave pustak balasaheb lavade manovishleshan pipilika muktidham granthali prakashan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात