डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : व्हेअर इज द फ्रेंडस्‌ हाऊस? (पर्शियन, इराणी)

वर्गातून सुरू झालेला सिनेमा वर्गात येऊनच संपतो. मोहम्मद रेझा हा अहमदचा मित्रही सिनेमात सुरुवातीला आणि शेवटी असा दोनच वेळा दिसलेला आहे. सिनेमाभर दिसत राहतो तो निरागस अहमद आणि आपल्या मित्राचं घर शोधण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यानं केलेली धडपड. प्रेक्षक म्हणून आपणही त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्यासोबत आपणही त्याच्या मित्राचं घर शोधण्यात त्याचे सहप्रवासी होत जातो.
 

\शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आपला वर्ग, आपले मित्र, आपल्याला आवडणारे (किंवा न आवडणारे) शिक्षक आणि शाळेचा गृहपाठ! शाळेच्या गृहपाठाची प्रत्येकाची एक तरी आठवण असतेच. कोणी गृहपाठ नेमाने पूर्ण करतो, दुसऱ्या दिवशी शिक्षकांना दाखवतो आणि शाबासकी मिळवतो. पण अनेक मित्रांचा हा गृहपाठ करायचा राहूनच जातो. काही जण विसरतात, काही आळस करतात, तर काही वेळा घराच्या इतर गोष्टींमध्ये गृहपाठ करायचा राहूनच जातो. मग दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना मनात अशी धाकधूक निर्माण होते की, विचारू नका. शिक्षक वर्गात आले आणि गृहपाठाच्या वह्या तपासायला लागले की वाटतं ‘आता आपली काही खैर नाही.’ ‘गृहपाठ केला होता, पण वही घरी राहिली’ किंवा ‘वही मित्राकडे राहिली’ ही मग ठरलेली उत्तरं. शिक्षकांनाही ही कारणं पाठ झालेली असतात. त्यांना ती खरी वाटत नाहीत.

गृहपाठासाठी, शिक्षकांची बोलणी खावी लागण्याची भीती शाळेची पायरी चढणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला कधी ना कधी सतावत असतेच. पण या इतक्या साध्या विषयावर एखादा सुंदर सिनेमा बनू शकतो आणि तो जगातल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक म्हणून गणला जाऊ शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण तसे घडले आहे खरे!

इराण या देशातील कोकेर या छोट्याशा गावच्या शाळेत शिकणारा आठ वर्षांचा अहमद. मित्राची गृहपाठाची वही चुकून त्याच्याकडे राहते. तो मित्र जवळच्या दुसऱ्या गावात राहत असतो. त्याच्या गावी जाऊन ती वही परत करायचं अहमद ठरवतो. पण त्याला या मित्राच्या घराचा पत्ताच माहीत नसतो. आपल्या मित्राचं घर शोधणारा अहमद आणि त्याच्याभोवती फिरणारा हा इराणी सिनेमा. व्हेअर इज द फ्रेंडस्‌ हाऊस?

इराणी सिनेमा ओळखला जातो तो लहान मुलांचे भावविश्व रेखाटण्यासाठी. मुलांची निरागसता, त्यांच्या भावना, त्यांची नाती यांचे सच्चे आणि साधे चित्रण सिनेमांमधून पाहायला मिळते. या सिनेमांच्या कथा साध्या-सोप्या असल्या तरी त्यातून दिलेला संदेश सर्वांनाच विचार करायला भाग पाडतात. सिनेमातली पर्शियन/फारसी भाषा कुठेही अडसर ठरत नाही. जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अब्बास कियारोस्तमी यांचा हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरातल्या लहान-थोरांनी तो डोक्यावर घेतला. लहान मुलांनी आणि त्यांच्यासोबत मोठ्यांनीही पाहायलाच हवेत अशा जगातील पहिल्या 20 सिनेमांमध्ये या सिनेमाचा क्रमांक अगदी वरचा आहे, अशा शब्दांत बीबीसी आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट या नामवंत संस्थांनी या सिनेमाचं कौतुक केलं.

हा सिनेमा घडतो कोकेर आणि पोश्तेह या इराणमधील दोन छोट्या गावांमध्ये. शाळा, अहमदचं घर आणि कोकेरहून पोश्तेहला जाणारी वाट एवढ्यातच हा सिनेमा घडतो. त्यांची ही गावंही आपल्या इथल्या गावांसारखीच. कच्चे रस्ते, सोयी-सुविधांचा अभाव, रस्त्यावर फिरणारी गुरंढोरं, उन्हाला बसलेले आज्जी आजोबा, सगळं आपल्यासारखंच. त्यांची शाळाही आपल्या खेड्यातल्या शाळांसारखी. छोट्याशा अंधारलेल्या खोल्या, रंग गेलेला फळा, वर्गात दाटीवाटीने बसलेली  मुलं, आणि त्यांच्यासमोर उभे असलेले त्यांचे सर.

तर या अशा वर्गात अहमद आपल्या मित्रांबरोबर सरांची वाट बघत बसला आहे. सर वर्गात येतात. मुलांचा गोंधळ थांबतो. ‘मला यायला पाच मिनिटं उशीर झाला तरी लगेच तुम्ही सगळा वर्ग डोक्यावर घेता, चला कालचा गृहपाठ केलाय ना, दाखवा वह्या!’ असं ते म्हणताच सगळी मुलं पटापट गृहपाठाच्या वह्या काढतात. सर त्या तपासतात. त्यातल्या चुकाही सांगू लागतात. दोन बेंचमधील एवढ्याशा जागेतून एकेका मुलापाशी जातात. ते अहमदच्या बेंचजवळ आल्यावर तो आपली वही दाखवतो. शेजारचा मोहम्मद रेझा मात्र वहीऐवजी वहीचं सुट्टं पान दाखवतो. सरांनी विचारल्यावर तो सांगतो, ‘काल चुलतभावाकडे गेलो होतो, माझी वही तिथेच राहिली. त्यामुळे या पानावर गृहपाठ केलाय.’

सर त्याला विचारतात, ‘अशी कशी विसरलास वही? कितव्यांदा तू असा सुट्या पानावर अभ्यास करून आणला आहेस?’ हुंदके देत मोहम्मद रेझा हाताची तीन बोटं दाखवतो. गृहपाठ त्या-त्या विषयाच्या वहीमध्येच का करायचा, याचं महत्त्व सर सांगायला लागतात.

‘मी दिलेला गृहपाठ तुम्ही रोजच्या रोज वहीत केला तर आपण आजवर काय काय शिकलो, हे हवं तेव्हा तपासता येतं. नंतर अभ्यास करताना ते फायदेशीर ठरतं. आपण मागील महिन्यात काय शिकलो हे कळतं. प्रगती किती झाली हे समजतं.’ यानंतर मोहम्मद रेझाकडे पहात ते म्हणतात, ‘मोहम्मद रेझा नेमतझादे, इतकं सांगूनही तू जर उद्याचा गृहपाठ वहीत केला नाहीस तर तुला शाळेतून काढून टाकणार’. मोहम्मद रेझा मान डोलावून ‘हो’ म्हणतो.

शाळा सुटते, सगळी मुलं गडबडीत दप्तर आवरून बाहेर पळतात. वर्गाशेजारच्या पडक्या गोठ्यातून डोकावणाऱ्या खेचरांना अहमद व मोहम्मद रेझा चारा भरवतात. आणि मग घराच्या दिशेने पळू लागतात.

अहमद घराच्या अंगणात येतो, दप्तर टाकतो न टाकतो तोच त्याची आई त्याला गृहपाठाची आठवण करून देते. अभ्यासाला बसण्याआधी तिच्या हातातल्या रडणाऱ्या बाळाला गुंडाळायला गरम कपडा आणून दे, त्याच्यासाठी  गरम पाण्याची बाटली आणून दे अशी छोटी छोटी कामं सांगते. बाळाला थोपटत त्याला शांत करू लागते. लहानगा अहमद दुडूदुडू पळत ही सगळी कामं करतो. ती आटोपून अभ्यासाला बसतो. दप्तरातून वही काढतो, आणि दचकतो. पुन्हा दप्तरात पाहतो तर आत आणखी एक वही असते. दोन वह्या? मग त्याच्या लक्षात येतं, गडबडीत आपण आपल्या मित्राची म्हणजे मोहम्मद रेझाचीही वही घेऊन आलोय. आता काय करायचं? त्याने जर उद्याही गृहपाठ या वहीत न लिहिता कागदावर लिहून आणला तर? आजच सर त्याला ओरडले आहेत. आता त्याची माझ्यामुळे शाळेतून हकालपट्टी होणार!

अहमद बेचैन होतो. अंगणात कपडे धुणाऱ्या आपल्या आईला म्हणतो, ‘आई, मला मोहम्मद रेझाकडे जायचंय, त्याची वही द्यायला. त्याची गृहपाठाची वही चुकून माझ्याकडे आलीये.’

आई रागावते, ‘अभ्यास केल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही. उगाच खेळायला जाण्यासाठी खोटी कारणं देऊ नकोस.’ बिचारा अहमद पुन:पुन्हा आईला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आईचं आपलं एकच, ‘आधी अभ्यास कर, मग खुशाल उंडारत बस.’

तिला जेव्हा तो दोन्ही वह्या दाखवतो तेव्हा ती म्हणते, ‘कुठे राहतो तो?’ क्षणार्धात अहमद उत्तरतो, ‘पोश्तेह.’ हे ऐकून आई किंचाळतेच, ‘इतक्या लांब? खोटं बोलतोस माझ्याशी?’

‘मी खरं बोलतोय गं, त्याला वही द्यायलाच पाहिजे आणि तेही आजच.’ जीवाचा आटापिटा करून तो आईला सांगत असतो. पण आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. उलट त्याला रागवते, म्हणते, ‘खूप झालं. आधी अभ्यासाला बस. नाही तर रात्री बाबा आले की त्यांना मी तुझं नाव सांगेन.’

बिचारा अहमद एवढसं तोंड करून अभ्यास करायला बसतो. आपण तर गृहपाठ करू, पण मोहम्मद रेझा? तो कसा करेल अभ्यास? कुठल्या वहीत करेल? अहमद अस्वस्थ होतो. तोच आई आतून म्हणते, ‘अभ्यास करून झाला असेल तर जा आणि येताना नान (रोटी) घेऊन ये दुकानातून.’

अहमदच्या डोक्यात एक विचार चमकून जातो आणि तो बूट घालतो. हळूच मोहम्मद रेझाची वही स्वेटरच्या आत लपवतो. घराबाहेर येतो आणि धूम ठोकतो पोश्तेहच्या दिशेने. पळत असताना वाटेतल्या दुकानाबाहेर बसलेल्या आपल्या आजोबांना सलाम न करताच पुढे जातो. जीवाच्या आकांताने पळत टेकडीवरची नागमोडी पायवाट पार करतो. पुढे उतारावर त्याचा वेग वाढतो. पळत पळत एकदाचा पोश्तेहला पोहोचतो. वाटेत भेटेल त्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत राहतो, ‘मोहम्मद रेझा नेमतझादे कुठं राहतो?’ ते सगळे अहमदला काही ना काही छोटी कामं लावतात. हाही त्यांची कामं करून देतो, पण त्यातलं कोणीच त्याला पत्ता शोधायला मदत करत नाही.

दरम्यान मोहम्मद रेझाचा चुलतभाऊ आपल्याच गावी, कोकेरला गेलाय हे अहमदला कळतं. तो पुन्हा उलटा कोकेरकडे धूम ठोकतो. गावात पोचताच दुकानाबाहेर बसलेले आजोबा त्याला दिसतात. जाताना गडबडीत आपण त्यांना सलामच न केल्याचे त्याला आठवते. आता तो त्यांना आधी सलाम करतो. पण त्याच वेळी त्यांनी आपल्याला अडवू नये म्हणून पळत सुटतो. तरी आजोबा त्याला आवाज देतातच. ती हाक ऐकून न ऐकल्यासारखं करून तो पळतच राहतो. तेवढ्यात रस्त्यातले लोक त्याला अडवतात. आजोबांकडे जा म्हणतात. मग काय करणार, बिचारा अहमद निमूटपणे आजोबांपाशी जातो.

‘कुठ गेला होतास?’ आजोबा विचारतात.

‘आईनं मला नान आणायला पाठवलंय. मी जाऊ का? उशीर झाला तर दुकान बंद होईल’, घाईघाईने अहमद म्हणतो.

‘कुठे चालला आहेस हे मी नाही विचारलं. कुठून आला आहेस असं विचारलं. पोश्तेहच्या बाजूला कुठं गेला होतास? कशाला गेला होतास तिकडं?’

अहमद उत्तर देत नाही. मग आजोबा म्हणतात, ‘जा मला सिगरेटी आणून दे, पळ.’

अहमदचं काही एक न ऐकता ते त्याला भलत्याच कामासाठी पिटाळतात. आता अहमद सिगारेटी आणायला पळतो.  तो गेल्यावर शेजारी बसलेले दुसरे आजोबा म्हणतात, ‘अरे होती की माझ्याकडे सिगारेट’ त्यावर अहमदचे आजोबा खिशातून सिगारेटचं अख्खं पाकीट काढत म्हणतात, ‘सिगारेटी आहेत रे माझ्याकडं. पण  मुलांना वरचेवर कामं सांगत राहायला पाहिजेत. त्याशिवाय त्यांना शिस्त लागत नाही. मोठ्यांचं ऐकायची सवय लागत नाही. आणि ते बिघडतात. माझे वडील मला दर आठवड्याला एक रुपया द्यायचे आणि चोपसुद्धा द्यायचे. एकवेळ ते रुपया द्यायला विसरतील पण चोप द्यायला कधीही विसरले नाहीत.’

इकडे अहमदची मित्राला वही पोचवण्यासाठीची धडपड चालूच असते. शेजारीच उभ्या असलेल्या एका माणसाचं नाव नेमतझादे असल्याचं आणि तो पोश्तेहलाच रहात असल्याचं तो ऐकतो.  परत त्याच्या मागे मागे धावत-पळत पुन्हा एकदा पोश्तेहला येतो. वाटेत अहमदची आणि त्या माणसाची चुकामूक होते. तोवर अंधारही पडलेला असतो. त्यात पोश्तेहमधले कच्चे रस्ते, तिथले गल्लीबोळ सगळंच अनोळखी... त्यामुळे दिवसभर पळापळ करूनही त्याला मित्राचं घर सापडत नाही.

अहमद आता अगदी हताश होऊन जातो. ती वही पोटाशी गच्च धरून पुन्हा पळत आपल्या गावी कोकेरला येतो. आता रात्र झालेली असते. आई जेवायला वाढते, पण अहमद जेवत नाही. इतकं शोधूनही मोहम्मद रेझाचं घर आपल्याला सापडलं नाही याचं त्याला वाईट वाटत असतं. उद्या आपल्यामुळे मोहम्मद रेझाची शाळेतून हकालपट्टी होणार, या कल्पनेनं तर त्याला आणखीच वाईट वाटायला लागतं. मग तो दप्तर उघडतो. गृहपाठाची वही काढतो. आई पुन्हा जेवणाचं ताट घेऊन येते. अभ्यास झाला की जेवून घे म्हणते. बाहेर जोराचा वारा सुटतो. अहमदच्या वहीची पानं त्या वाऱ्याने फडफडू लागतात. पण तो लिहितच राहतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा भरते. सर वर्गात येतात, मुलांचा दंगा नेहमीप्रमाणे एकदम थांबतो. आल्या आल्या सर गृहपाठ तपासू लागतात. मोहम्मद रेझा घाबरत घाबरत वहीचे पान वर काढतो. अहमद अजून आलेला नसतो. सर मोहम्मद रेझाकडे गृहपाठ बघायला येणार तोच वर्गाचं दार वाजतं, आणि गोष्टीतल्या हिरोसाराखा आपला अहमद वर्गात येत विचारतो, ‘सर, आत येऊ का?’

अहमद वर्गात येऊन आपल्या जागेवर बसतो. शेजारचा मोहम्मद रेझा अजूनही खाली मान घालून बसलेला असतो. भीतीने त्याचा चेहरा मलूल झालेला असतो. आजही आपण गृहपाठाची वही आणलेली नाही. कागदावर अभ्यास करून आणलाय हे कळल्यावर सर आपल्याला हाकलून देणार हे त्याला जाणवलेलं असतं. तितक्यात अहमद दप्तरातून स्वतःची आणि मोहम्मद रेझाचीही वही काढतो. तुझी वही चुकून माझ्याकडे आली होती हे त्याला सांगतो. इतक्यात सर अहमदची वही घेतात. तपासून देतात. मग मोहम्मद रेझाची वही हातात घेतात. सर वहीची पानं पुढे मागे करतात. वहीत गृहपाठ लिहिला म्हणून मोहम्मद रेझाला शाबासकी देतात. मोहम्मद रेझाचा गृहपाठही अहमदने रात्री जागून पूर्ण केलेला असतो, तेही मोहम्मदसारखं अक्षर काढून. काल अहमदने त्या वहीत ठेवलेलं छोटं फुल आपल्याला दिसतं. पण सर त्याकडे दुर्लक्ष करत पान पलटतात आणि सिनेमा संपतो.

वर्गातून सुरू झालेला सिनेमा वर्गात येऊनच संपतो. मोहम्मद रेझा हा अहमदचा मित्रही सिनेमात सुरुवातीला आणि शेवटी असा दोनच वेळा दिसलेला आहे. सिनेमाभर दिसत राहतो तो निरागस अहमद आणि आपल्या मित्राचं घर शोधण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यानं केलेली धडपड. प्रेक्षक म्हणून आपणही त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्यासोबत आपणही त्याच्या मित्राचं घर शोधण्यात त्याचे सहप्रवासी होत जातो. आणि याचमुळे इराणच्या छोटाशा खेडेगावात घडणारा हा सिनेमा जगभरातल्या प्रेक्षकांना आपलासा वाटतो.

या सिनेमात व्यावसायिक कलाकार नाहीत. सगळेजण या दोन गावांत राहणारे खरेखुरे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या वागण्यात सहजता जाणवते आणि तीच प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सिनेमात पात्रंही मोजकीच आहेत. नाच-गाणी वगैरे प्रकारही त्यात नाही. संवादही मोजकेच आहेत. पार्श्वसंगीत अभावानेच येते. तरीही अब्बास कियारोस्तमी यांच्या या साध्या-सोप्या सिनेमाने आपल्यावर मोठा प्रभाव टाकल्याचे अनेक जगप्रसिद्ध दिग्दर्शकही मान्य करतात.

मोठ्यांच्या जगात भावनेला, निरागसतेला जास्त वाव नसतो. तिथे सगळा रोकडा, वास्तववादी व्यवहार. त्यामुळे अहमदची निरागसता घरातल्या-गावातल्या मोठ्यांना खोटी वाटत राहते. प्रत्येक जण आपल्या कामात गुंतलेला. थकून गेलेले वृद्धच त्यातल्या त्यात  अहमदच्या मदतीला येतात, बाकी कोणाकडेही त्याच्यासाठी वेळ नाही. का तर लहान मुलाकडे काय लक्ष द्यायचं? त्याच्या मताला, त्याच्या भावेनाला महत्त्व द्यायला तो कोण लागून गेलाय असा? ‘लहान मुलांनी फक्त मोठ्यांच्या आज्ञा पाळायच्या. लहान मुलांना समजून घेणं म्हणजे त्यांना लाडावून बिघडवंणं,’ असंच काहीसं ते वागणं असतं. या मोठ्यांच्या जगात वावरताना निरागस लहानग्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी किती झगडावं लागतं, हेच हा सिनेमा दाखवून देतो आणि सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. मुलांसह मोठ्यांनीही आवर्जून बघावा असा हा जगप्रसिद्ध सिनेमा... ‘व्हेअर इज द फ्रेंड्‌स हाऊस?’ अर्थात ‘मित्राचं घर कुठे आहे?’

----

चार देशांतील सहा सिनेमा अशी थीम असलेल्या साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'व्हेअर इज् द फ्रेंड्स होम?' या पर्शियन भाषेतील इराणी चित्रपटावर समीर शेख यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके