डिजिटल अर्काईव्ह

'झड-झिंबड' मध्ये पाऊस या एकाच निसर्गतत्त्वाशी निगडित सर्व बाजूंचा ऊहापोह केला आहे. पाऊस हा कृषिजन संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण निसर्गाशी फारकत घेत आहोत की निसर्गघटकांशी योग्य ते समायोजन साधत नाही हे द्वंद्व लेखक वाचकाच्या मनात उपस्थित करतो. माणूस कितीही प्रगत झाला तरी तो निसर्गघटकांना आव्हान देऊ शकत नाही, नैसर्गिक घटकांपुढे माणसाची ताकद खुजी पडते, हे सत्य या कादंबरीतून वाचकांपुढे येते. चलच्चित्रासारखी डोळ्यांसमोर उभी राहणारी निसर्गचित्रणे आणि पर्यावरणाविषयी वाटणारी आदिम आस्था हे कृष्णात खोत यांच्या कादंबऱ्यांचे बलस्थान आहे. त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये हा समान धागा आपल्याला सापडू शकतो.

कृष्णात खोत यांनी ग्रामीण कादंबरीलेखनात एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. 'गावठाण', 'रौंदाळा', 'धूळमाती', 'रिंगाण' या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या आहेत. 'नांगरल्याविन भुई' हा त्यांचा वाचनीय व्यक्तिचित्रण संग्रह आहे. याखेरीज अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कथा व ललितबंध प्रकाशित झाले आहेत. 'रिंगाण' या त्यांच्या कादंबरीला 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असल्याने ही कादंबरी चर्चेत आली असली, तरी त्यांचे यापूर्वीचे कादंबरीलेखनही तितकेच सशक्त आहे. बदलते पर्यावरण आणि गावखेड्यांवर त्याचे उठणारे ओरखडे खोत यांनी ठळकपणे त्यांच्या कादंबऱ्यांत चित्रित केले आहेत. या अनुषंगाने पाऊस आणि ग्रामीण जीवन यांची सर्वस्वी वेगळी मांडणी करणारी त्यांची कलाकृती म्हणजे 'झड-झिंबड' (2012) होय. पाटपन्हाळा या कासारी नदीतीरावरील छोट्याशा खेडेगावात हे कथानक घडते. हे गाव डोंगरकपारींत वसले आहे. गावाचे फारसे नागरीकरण झालेले नाही. सर्वसामान्यपणे खेडेगावात असणाऱ्या रीतीभाती, अंधश्रद्धा, आपुलकी, हेवेदावे हे सगळे या कादंबरीत असले, तरी 'पाऊस' या कथासूत्राभोवतीच दोनशेअकरा पानांची सबंध कादंबरी फिरत राहते.

'झड-झिंबड 'मधील व्यक्तिरेखा

झड-झिंबड या कादंबरीतील पाटपन्हाळे या गावाला पूर्वी शहराशी जोडणारे एकमेव साधन म्हणजे नाव असते. नाव ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगते त्याप्रमाणेच या गावातील माणसांची आयुष्यंही तरंगती, पण प्रवाही असतात, त्यात साचलेपणा नसतो. गावात काही सुष्ट- दुष्ट लोक असतातच. शामा, हमीद, दशरथ हे जिवलग मित्र या कादंबरीचे नायक आहेत. थोरात हा गावातील निपुत्रिक जमीनदार किंवा परंपरागत खलनायक आहे. त्याने दत्तक घेतलेला मुलगा गावचा सरपंच आहे; पण, तो शहरात राहतो. गावच्या समस्यांशी त्याला काहीही घेणेदेणे नाही. खोटी सरकारी कागदपत्रे बनवून आपला जास्तीतजास्त फायदा कसा होईल याचा विचार करणाऱ्या ऐदी प्रवृत्तीचे तो प्रतिनिधित्व करतो. सत्तेचा आणि श्रीमंतीचा वापर करून सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडविता येतात, या गोष्टीचा या बाप-लेकांना दर्प चढलेला आहे व एकंदरीत त्यामुळे थोरातांची माणुसकीच नामशेष झाली आहे. त्याशिवाय, गवताची हुटी रचणारा आणि लोकांची निसटलेली हाडे बसविणारा आबा कावणे व म्हशी पाळणारे गजाप्पा माने व पांडू शिंदे, थोराताचा हरकाम्या नोकर भिका, एका हातात इंजेक्शनची सुई व दुसऱ्या हातात अंगाऱ्याची पुडी असणारा देवरशी डॉक्टर, नाना पांगे, आंदू गवंडी इत्यादी इतर पात्रे आहेत.

'झड-झिंबड'मधील आशयसूत्रे :

पर्यावरणीय संदर्भात कादंबरीत खालील आशयसूत्रे आढळतात.

1. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप

पूल झाल्यानंतर पारंपरिक दळणवळणाचे साधन असलेली नाव ही सरकारजमा केली जाते आणि पूल हेच केवळ दळणवळणाचे साधन उरते. हा पूलच पाण्यात गेल्यावर, वाटेचीच वाट लागल्यावर गावाची त्या पावसाळी दिवसात कशी दैना उडते, याचे चित्रण ही कादंबरी करते. पुलाच्या बांधकामामुळे नदीला येणारी पाण्याची फुगी व पिके पाण्याखाली जाणे हे पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपाचे (Anthropogenic ac- tivities) चे सूचन करतात. निलगिरी ही महाराष्ट्रातील स्थानिक वृक्षाची प्रजात नव्हे, परंतु व्यापारी तत्त्वाने तिची जागोजागी लागवड केलेली आढळते. पश्चिम महाराष्ट्रात शेताच्या बांधांवर निलगिरीची खूप झाडे आढळतात. या झाडासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे उन्हाळ्यात कधीकधी निलगिरीच्या झाडाखालची पिके लवकर वाळलेली दिसतात. पाण्याचा अति उपसा करत असल्यामुळे निलगिरीची पाने जाड असतात. त्यामुळे वाऱ्या- पावसात ही झाडे पडल्यामुळे विजेच्या तारांचे व शेतीचे मोठे नुकसान होत असते. बऱ्याचदा रस्त्यावर ही झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होते. कादंबरीत निलगिरीच्या झाडामुळे बरेच नुकसान झाल्याचे उल्लेख आहेत. या झाडाच्या लागवडीमुळे स्थानिक प्रजातीच्या वृक्षांच्या लागवडीकडेही दुर्लक्ष होते. शामाला याबाबतचे ज्ञान आहे. हमीदच्या घरावर निलगिरीचे झाड कोसळू शकते ही शक्यता गृहीत धरून शामा त्याला सावध करतो, "तुला मागंच बोललोय. निलगिराची जात लगीच लय वाढतीय आनि लगीच मोडतीया बी!" 

1. जंगलातील वृक्षतोडीमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. याचेही कादंबरीत उल्लेख येतात. हे वन्य प्राणी मग मानवी वस्तीत शिरल्याने माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

2. पावसाची अनियमितता व त्याचे परिणाम

कादंबरीच्या प्रारंभी पाऊस लागावा म्हणून लोक प्रार्थना करताना दिसतात. कादंबरीच्या प्रारंभी यजुर्वेदातील वरुण प्रार्थनेचा श्लोक देऊन लेखकानेही वरुणाच्या रौद्रपणाचे सूचन केले आहे. पाऊस जेव्हा पडत नाही तेव्हा लोक त्याचे महत्त्व जाणतात. 'पावश्या घूऽ पावश्या घूऽ'च्या आरोळ्या देत पावश्या पक्षीही त्याला साद घालतो. रणरणत्या उन्हात पावसाने यावे असे वाटणेही निसर्गाइतकंच स्वाभाविक आहे. काही दिवसांनी हाच आक्रस्ताळा पाऊस रौद्र रूप धारण करतो आणि गावाची वाताहत होते. दशरथच्या गरोदर मुलीला बाळंतकळा चालू होतात. गावात एकच कामचलावू डॉक्टर असतो. त्यामुळे तिला शहरात कोल्हापूरला नेणे गरजेचे असते. पुलावर पाणी आल्याने वाट बंद होते. तरीही शामा व हमीद प्रयत्नांची पराकाष्ठा करून नदी पार करायला पाहतात व पावसातच सुदैवाने ती बाळंत होते. तिचे लहान मूल सारखे किरकिर करते, पण औषध शहरातून आणणे शक्य होत नाही.

गवताची हुटी रचणारा व लोकांची सरकलेली हाडे मूळ जागी बसवण्यात हातखंडा असलेला आबा कावणे नातीच्या पोराच्या जावळासाठी कोल्हापूरला जातो व परत येताना पुलावरून वाहून जाऊन मृत्यू पावतो. नाना पांगेने कर्ज काढून उभा केलेली केळीची बाग वाऱ्यापावसाने उद्ध्वस्त होते. वाट बंद झाल्याने डेअरीला दूध घालणे बंद होते. नंदूचा मामा बैलांसकट वाहून जातो. झाड तारेवर पडल्याने विजेच्या तारा तुटून, शॉक लागून गजाप्पा मरतो. हमीदच्या घरावर निलगिरीची फांदी पडल्याने खापऱ्या फुटतात व त्या मिळवण्यासाठी त्याला गयावया कराव्या लागतात. बाजीराव लगारे या युवकाला नोकरीचा कॉल येतो, पण गावाबाहेर जायला वाटच उरली नसल्याने तो मुलाखतीस उपस्थित राहू शकत नाही. गिरण्या लायटीअभावी बंद पडतात. त्यामुळे दळप-कांडपाची समस्या उद्भवते. रस्ताच बंद झाल्याने किराणा सामान उपलब्ध होऊ शकत नाही.

वाळवंकराची पावसाच्या माऱ्याने भिंत पडते. आंदू भवंडाचे घर पडून त्याची म्हातारी मरते. थंडी- गारठ्याने बुळकांडी लागून हमीद व वाळवंकराच्या शेरड्या मरतात. पांडू शिंदे शेतावरच्या घरात गुराढोरासकट पुरात अडकतो. ढोरांना वाचवण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करतो. पुढे त्याला व शामाच्या रेड्याला पिसाळलेला कुत्रा चावतो, पण रेबीजची लस घेणे वाट झाल्याशिवाय शक्य होत नाही; हे असे सारे वरुणाचे कणुणोपनिषदच कृष्णात खोतांनी मांडले आहे. पावसाच्या अनियमितपणाबद्दल निवेदक लेखक म्हणतो की, मुरव्या जिरव्या पाऊस आता लागत नाही. वर्षाचा एकदम चार-आठ रोज लागतो. पण पावसाची अशी अनियमितता उपयोगाची नाही.

पुराने गावाला वेढल्यानंतर लेखकाने त्याचे केलेले वर्णन अत्यंत प्रत्ययात्मक आहे. "सगळा गाव पावसानं जाळं टाकल्यागत झालता. विचित्र काळजीत अडकला होता. कोण घरामागच्या लागलेल्या पाण्यात, कोण घरामागच्या झाडानं मांडलेल्या गहिवरांत. कोण जनावरांच्या वैरणीत. कोण घरच्या भिंतीना चढत निघालेल्या ओलीत. कोण शिवारातली पिकं गेली त्यात. कोण जोपासलेली झाडं गेल्याच्या दुःखात, कोण घरातलं माणूस आजारी पडलेलं त्यात. कोण आपल्या शेताचा ठावठिकाणा नसल्याच्या चिंतेत. कोण खापरीतनं पाझरणाऱ्या पाण्याच्या काळजीत. कोण शेजारच्या गावात असणाऱ्या पै-पावण्याच्या लेकीबाळीच्या विचारात, तर कोण आणखी कशात आणि कशात."

अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोकाही संभवतो. डोंगरावरील वृक्षराजीचे प्रमाण कमी झाले की हा धोका अजून जास्त होतो. कादंबरीत या भूस्खलनाचेही उल्लेख आले आहेत. डोंगरातून मार्ग काढत आलेल्या नंदू वाळवकराला हा प्रकार दिसतो. व तो सर्वांना ही हकिकत सांगून सचेत करतो. तो म्हणतो, "डोंगरात खाली आलो. एका जाग्याला मोठ्ठ रान खचलंय. तटच तुटून गेलाय. व्हगळीच्या व्हगळी तुंबल्यात लय खोल. सगळा तुटलेला डोंगर खाली आला तर गाव बुजवील आपलं. मला पावसानं डोगराची व्हगळ बघून खरंच गावाची काळजी वाटू लागली. काळूबाईचा डोंगर खचाय लागलाय. वर देऊळ आणि डोंगर सगळा खाली याचाच" (पृ. 87). भू-स्खलनाच्या अशा घटना आता सह्याद्री डोंगररांगात जागोजागी घडताना आढळतात. माळीण गाव दुर्घटना, रायगडमधील इर्शाळवाडी ही याचीच उदाहरणे आहेत.

पावसाच्या अतिरेकाने लोक हैराण होऊन त्याला शिव्या घालू लागतात. कादंबरीच्या प्रारंभी पावसाची आतुरतेने वाट पाहणारे गावकरी कादंबरीच्या शेवटी पावसाला वैरी मानू लागतात. लेखकाची भाषाही मग अजून काव्यात्म होऊन त्याचे वर्णन करते "पाऊस वैरी, गावाचा, शिवाराचा, माणसांचा, ढोरागुरांचा, शेरडाकरडांचा, सगळ्यांच्या जगण्याचा. पाऊस मरणाचा मैतर. पाऊस जगण्याचा वैरी!" या कादंबरीतील पर्यावरण व माणूस यांच्या संबंधावर भाष्य करताना राजन गवस म्हणतात, "गावाचे जगणे निसर्गावर अवलंबून; त्यामुळे निसर्ग ही देवता. तिची सावली घ्यायची, पण तिला ओरबाडायचं नाही. निसर्गातून हवं तेवढंच घ्यायचं. निसर्गाचा विध्वंस करायचा नाही. निसर्गाला दुखापत केली तर तो आपल्यालाही जगू देत नाही. अशा धारणेवर वाढलेल्या गावात अचानक बाहेरच्या शक्ती घुसल्या. त्यांनी निसर्गाच्या विध्वंसाचं टोक गाठलं. तणाव तयार झाला. निसर्ग आणि माणूस यांच्यात ताण निर्माण झाल्यानंतर होणारी माणसाची ससेहोलपट खोत या कादंबरीत चित्रित करतात. माणूस निसर्गाला जेव्हा दुखापत करतो तेव्हा आपोआपच निसर्गाचा कोप ओढवून घेतो. आपल्या जगण्यात वादळ निर्माण करतो. या वादळाचा निर्माताही तोच आणि बळीही तोच ठरतो. याचा प्रत्यय ही कादंबरी देते!"

3. आपत्कालीन समूहभाव

अतिवृष्टीमुळे गावाला पुराचा वेढा पडल्यानंतर गावकरी एक-दुसऱ्यांना मदत करताना आढळतात. राजू रावण कधीही कुणाला शेतात पाय ठेवू न देणारा असला तरी अतिवृष्टीच्या वेळी गजाप्पाला स्वतःहून आपल्या शेतातला पाला काढून ने म्हणून सांगतो. अतिवृष्टीच्या वेळी घरात तांदूळ व पीठ नसल्याचे हमीद दशरथला सांगतो तेव्हा दशरथ त्याला आपल्याकडील तांदूळ व पीठ ने, म्हणून सांगतो. दशरथची बायको तर त्याला तांदूळ व पिठाची गठळीच बांधून देते. आपल्याकडे आहे त्या गोष्टी आपण वाटून खायला हव्यात, असे ती म्हणते.

दशरथच्या बाळंतकळा चालू झालेल्या मुलगीला शामा, हमीद, दिना ही मंडळी आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. शामा कावणे आबाचे प्रेत पुराच्या पाण्यातून पाठीला बांधून आणतो. पावसामुळे घरांची झालेली पडझड सावरण्यासाठी सगळेच गावकरी एकमेकांना मदत करतात. हमीदची बायको दशरथच्या नातीला आपले दूध पाजते. गुरुजी आपल्याकडचे तापाचे औषध शामाच्या मुलाला देतात. गावात कुणाचेही काहीही बरेवाईट झाले तरी सगळे गावकरी हळहळताना दिसतात. यावरून आपत्तीच्या वेळी गावकऱ्यांचे माणूस म्हणून एक असणे अधोरेखित होते.

याविषयी सुशील धसकटे लिहितात... "अशा आणीबाणीच्या स्थितीत कामी येतो, तो गावाचा एकजूट-सामूहिकपणा. आपल्याकडे आहे नाही ते सर्व अडल्या नडल्यांना दिलं घेतलं जातं. अशा वेळी जे आढ्यतेनं वागतात. त्यांना समजावलं जातं. एवढंच नव्हे तर दसूच्या बाळंत झालेल्या मुलीचं अंगावरचं दूध जातं. बाळ रडरड रडत असतं. अशा वेळी दसूची बायको हमीदच्या बायकोला सांगावा धाडते आणि हमीदची बायको स्वतःच्या पित्या मुलीला ठेवून दसूच्या नातवाला दूध पाजायला जाते. इथे दसूचा हिंदू धर्म आडवा येत नाही की, हमीदचा मुस्लिम धर्म." जात-धर्म, गरीब-श्रीमंत असल्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय निःसंकोचपणे माणूसधर्म पाळत गाव निसर्गाच्या या संकटाला सामोरं जातं. माणूस म्हणून माणुसकीची बूज परोपरीने राखली जाते. मानवी सहजीवनाचं भेदाभेदविरहित मनोरम व माणुसकीमय दर्शन घडते.

4. ढिसाळ पर्यावरणीय व्यवस्थापन

कादंबरीत पर्यावरणीय व्यवस्थापनाविषयी अनास्थेच्या अनेक नोंदी येतात. खेड्यातील विजेचे भारनियमन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांविषयी पर्यायाने शेतीच्या जलसिंचनाविषयी प्रशासकीय पातळीवर फारसे गांभीर्य आढळत नाही. नाना पांगे वाचत असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांतून अनेक पर्यावरणीय समस्यांचे सूचन होते. 'यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार... तोवर त्याच पानावर बातमी 'लाइट बोर्डावर मोर्चा', दुसरी बातमी. तिसरी बातमी 'पाण्यासाठी वणवण फिरताहेत जिल्ह्यातली निम्मी गावं'. डोक्यावर घागरी घेतलेल्या करपून गेलेल्या बायकांची चित्रं, तर दुसऱ्या चित्रात खोल गेलेली विहिरीतली घागर आणि तिथं घागर कुडचून भरणारी मुलं. सगळ अंगावर येणारं, खेड्यातलं भारनियमन आणखी चार तासांनी वाढणार." प्रशासकीय धोरणांची आखणी करताना 'कुठे पूर तर कुठे दुष्काळ' असे स्थानिक पर्यावरणाचे पैलू गांभीर्याने लक्षात घेतले जात नाहीत.

नदीवर पूल बांधत असताना तिथल्या उंचीचा विचार करून तो बांधणे अपेक्षित असते. परंतु, स्थानिक राजकारणी लोक त्यात ढवळाढवळ करून आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणीय तथ्यांना बाजूला ठेवून कमी उंचीच्या ठिकाणी तो बांधतात. त्यामुळे तो पावसाळ्यात लवकरच बुडतो व अनेक नव्या समस्या उद्भवतात. पूल झाल्यानंतर त्याच्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलांचा अभ्यास (EIA) होणे अपेक्षित होते. परंतु, पूल झाल्यानंतर लगेचच नाव सरकारजमा केली जाते. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीमध्ये गावाचा संपर्कच तुटतो.

कादंबरीत मुंबईत गटारी तुंबण्याचाही उल्लेख येतो. ढिसाळ पर्यावरणीय व्यवस्थापनाचे ते उदाहरण आहे. "गटरातल्या गहाणीमुळं गटरंच सगळी पॅक झालीत. दुसऱ्या मजल्यावर काही ठिकाणी पाणी गेलयं." 

आपत्तींमध्ये जीव गमावलेल्या माणसांना पर्यावरणीय शासकीय मदत मिळण्याची कोणतीही शाश्वत व विश्वासार्ह योजना नाही. त्यामुळे शासकीय मदतीविषयी लोक साशंक आहेत. त्यासाठी जुळवावयाच्या शासकीय कागदपत्रांविषयी आणि कटकटींविषयी ते मनातून वैतागून गेले आहेत. साशंक झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाविषयी किंवा जीवरक्षक कौशल्यांविषयी (Life Saving Skills) कादंबरीतील पात्रे अनभिज्ञ असताना आढळतात. कादंबरीतील हणमंत लगारे हा युवक छपराच्या आढ्याला वालं बांधून वाऱ्यानं हलणार सपार हाताला तिढा देऊन धरून बसतो आणि त्याच्या हाताला अपंगत्व येते, पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नदी ओलांडणे हेदेखील आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांना धरून नाही.

5. खेड्याची शाश्वतता, स्वावलंबन व पारंपरिक शहाणपण (Traditional Wisdom) नष्ट होणे

या कादंबरीचा आत्मा म्हणजे पाऊस. पाऊस हा काही अंशी खलनायकाचे काम करीत असला, तरी सखल भागात पूल बांधल्याने व पारंपरिक दळवळणाचे साधन नाव न उरल्याने उद्भवलेली परिस्थितीच खल आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात खेड्याची शाश्वतता व स्वावलंबन संपले. पूर्वी स्वतःच्या गरजा स्वतः भागविणाऱ्या खेड्याला अगदी साध्यासाध्या गोष्टींसाठी शहराकडे लाचार होऊन जावे लागते. शहराशी संपर्क तुटला की गाव अगदी अगतिक होऊन जाते. सगळ्या भौतिक सोयीसुविधा शहरातून संक्रमित होत असतात. ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा हव्यास असतो. ते या वस्तूंच्या आहारी जातात. टी.व्ही, टेलिफोन, भ्रमणध्वनी, औषधे, शिक्षण एवढेच नव्हे तर स्वतःच्या शेतात पेरावयाच्या बी-बियाणेविषयीही, गाईम्हशींच्या गर्भरेतनासाठीही तो परावलंबी होत असतो. स्वार्थांध लोकांच्या टोळ्या मग गावकऱ्यांना लाचार बनवून लुटायला धावतात. भौतिकता आणि शाश्वतता यांच्या परिघावर नेऊन ठेवून सुजाण वाचकाला विचारप्रवण करण्याचे काम 'झड-झिंबड' करते. आपल्या दिशाहीन धावण्यातून काही महत्त्वाचे निसटून तर गेले नाही ना? आणि त्या निसटल्याने आपल्या जिवावर तर बेतणार नाही ना? याचे भान 'झड-झिंबड' देते. या निसटलेपणाच्या काही खुणा प्रारंभीच्या पृष्ठांत आढळतात.

कादंबरीतील शामा हा गर्भरेतनासाठीचा रेडा पाळणारा शेतकरी आहे. परंतु, कृत्रिम गर्भरेतनाच्या पद्धती विकसित झाल्यामुळे रेड्यांची मागणी कमी होते. परंतु, या गर्भरेतनासाठीच्या कांड्याही भ्रष्टाचारी लोकांमुळे निकृष्ट दर्जाच्या मिळू लागतात. त्यामुळे गाई-म्हशींच्या अनेक स्थानिक प्रजाती नष्ट होण्याचाही धोका वाढला.

गावातील आबा कावणे हा लोकांची हाडे बसविण्याचे काम करत असे; परंतु आता त्यांच्या मृत्यूनंतर गावात असे काम करणारी कुणी व्यक्तीच उरत नाही. पंड्याची बायको डॉक्टर उपलब्ध नसल्याने पारंपरिकरीत्या देण्यात येणारे औषध हळद-मिठाचा लेप त्याच्या सुजलेल्या शरीरावर लावते. बाळंतपण करण्यासाठी पारंपरिकरीत्या गावोगावी उपलब्ध असलेल्या सुईणी आता मिळत नाहीत. आनुक्कानंतर बाळंतपण करणारी व नवजात अर्भकाची काळजी घेणारी ज्ञानी स्त्री आता गावात कोणी उरलेली आहे असे वाटत नाही. गावाचे हे पारंपरिक शहाणपण (Traditional Wisdom) नष्ट होत असल्याचे लेखक सूचित करू पाहतो. लोककथा आणि लोकगीतेही नष्ट होताहेत, यातून पाऊस व नदी यांच्याविषयी प्रकट होणारा आदरभाव व पारंपरिक शहाणपण नष्ट होताना दिसते.

'झड-झिंबड 'मधील इतर पर्यावरणीय संदर्भ

वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध शेतीचे तुकडीकरण होऊन बांधांची संख्या वाढते. 'झड-झिंबड'मध्ये पावसाने इंदूच्या वावराचा बांध राधाच्या वावरात जातो व त्या दोघींची भांडणे लागतात. राधा आणि इंदू या सख्ख्या जावा असतानादेखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता भांडतात. याविषयी नीला जोशी म्हणतात, "अत्यंत विपरीत आणि भीषण परिस्थितीतही माणूस इतका स्वार्थी आणि संकुचित मनाने कसा बरे वागतो? जागतिकीकरणाचे जे अनेक परिणाम आहेत त्यांतीलच हा एक परिणाम आहे की, नव्या व्यवस्थेत लूट हाच धर्म बनू लागला आहे. लोकांना बाकी कशाचे सोयरसुतक उरलेले नाही. हे या कादंबरीचे आशयसूत्र वाचकाला विचारप्रवृत्त करते, अंतर्मुख करते." शेतात पेरावयाच्या बियाण्यांची उगवणक्षमतेचीही (Germination Capacity) खात्री देता येत नाही. कृषी पर्यावरणाचा शेतकऱ्यांवर व एकंदर ग्रामसंस्कृतीवर बराच परिणाम झालेला आढळतो. हा परिणाम नकारात्मक स्वरूपाचा आहे.

कादंबरीतील आबा कावणेला बरीच गावठी औषधे (Vernacular Medicines) माहीत असतात. हमीद व वाळवकरांच्या शेळ्यांना बुळकांडी लागते तेव्हा ते त्यावर औषध म्हणून कळकीच्या बेटाचा पाला शोधायला जातात. ही बेटेदेखील ग्रामीण भागात आता दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात 'रेबीज' या आजारावर गावठी औषध मिळते, असा उल्लेख आहे. रक्तचंदन नावाच्या झाडाच्या खोडाचा उपयोग कादंबरीतील पात्रे सूज उतरवण्याच्या कामी करतात. गावात वानरांनी उच्छाद मांडून खापऱ्यांची वाट लावली असा उल्लेख येतो. कादंबरीतील हमीद व पंड्या मिसाळ यांना भरपूर मासे सापडतात. यातून जलीय परिसंस्थेतील सजीवांची परिसंस्था निकोप असल्याचे समोर येते. खेकड्यांचे वर्णन वाचताना त्यांची संख्या परिसरात बरीच असावी, हे अधोरेखित होते. कादंबरीत हुलगं नावाच्या पिकाची प्रजात नष्ट झाल्याचा उल्लेख येतो. त्याच्या उपयुक्ततेसंबंधीदेखील चर्चा होते. या सगळ्या संदर्भातून गावात असलेल्या अनेक स्थानिक वनस्पती, प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे लेखक सांगू इच्छितो.

लोकांनी जंगलातील झाडांची तोड केल्यामुळे आता लाकूड पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, हा संदर्भ कादंबरीत येतो.

श्रीमंत लोक करीत असलेल्या अतिरिक्त ऊर्जावापराचा संदर्भ येतो. "रातदिवस पंख्याचा वारा घेत बसल्याल्या पुढाऱ्यांना कुठला अंधार नि कुठला घाम मर्दा... त्यास्नी इथल्या मातीतल्या माणसांची काळजी नाही. नोटावाल्यांची त्यास्नी काळजी." या संदर्भात नंदकुमार मोरे लिहितात, "बदलत्या काळात मानवाचा निसर्गाशी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष सुरू आहे. याला सर्वस्वी या सृष्टीवरचा मानव हाच प्राणी जबाबदार आहे. त्याने आपल्या सुखांसाठी स्वार्थीपणाने निसर्गाची अपरिमित हानी चालवलेली आहे. त्याचे परिणाम जगभर दिसू लागले आहेत. निसर्गाचे संतुलनच बिघडून गेले आहे. त्यामुळे मृग नक्षत्रामध्येच पावसाची 'झड-झिंबड' व्हावी आणि एका गावात हाहाकार माजावा यात नवल ते काय? असे अघटित प्रसंग आता जीवनाचाच भाग बनले आहेत.'

'झड-झिंबड'मध्ये औद्योगिक प्रकल्प नाही, परंतु नदीवर सखल भागात बांधलेला पूल व पारंपरिक वाहतुकीचे साधन नाव उपलब्ध नसणे यामुळे गावकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोईचे चित्र रेखाटले आहे. बऱ्याचदा रस्ते करताना किंवा धरणे बांधताना तिथून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहणार असते. याचा विचार न करता भराव टाकला जातो. त्यामुळे नदीचे पाणी पाठीमागील पाणलोट क्षेत्रात तुंबते व पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाते. पर्यावरणीयदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात 2019 व 2021मध्ये आलेल्या महापुराचे प्रमुख कारण हा भराव असल्याचे समोर आले आहे.

'झड-झिंबड'मध्ये पाऊस या एकाच निसर्गतत्त्वाशी निगडित सर्व बाजूंचा ऊहापोह केला आहे. पाऊस हा कृषिजन संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण निसर्गाशी फारकत घेत आहोत की निसर्गघटकांशी योग्य ते समायोजन साधत नाही हे द्वंद्व लेखक वाचकाच्या मनात उपस्थित करतो. माणूस कितीही प्रगत झाला तरी तो निसर्गघटकांना आव्हान देऊ शकत नाही, नैसर्गिक घटकांपुढे माणसाची ताकद खुजी पडते, हे सत्य या कादंबरीतून वाचकांपुढे येते. चलच्चित्रासारखी डोळ्यांसमोर उभी राहणारी निसर्गचित्रणे आणि पर्यावरणाविषयी वाटणारी आदिम आस्था हे कृष्णात खोत यांच्या कादंबऱ्यांचे बलस्थान आहे. त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये हा समान धागा आपल्याला सापडू शकतो.

संदर्भ :

1. खोत कृष्णात, झड झिंबड, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई,
प्रथमावृत्ती, 2012, पृ. 95.
2. तत्रैव, पृ. 108.
3. गवस राजन : कृष्णात खोत यांचे कादंबरीलेखन, 'ऐवजी'
अंक 12, एप्रिल 2013, पृ. 55.
4. धसकटे सुशील : लोकसत्ता-लोकरंग, रविवार, 6 जानेवारी
2013, पृ. 06.
5. खोत कृष्णात, उनि. पृ. 17.
6. तत्रैव, पृ. 61.
7. जोशी नीला, पानोपानीं जीवन विस्कटणारा पाऊस झड-
झिंबड, मुराळी, मार्च 2013, पृ.3. 
8. खोत कृष्णात, उनि. पृ. 14.
9. मोरे नंदकुमार, झड-झिंबड- एका पावसाची गोष्ट, मुक्त शब्द, ऑगस्ट 2015, वर्ष सहावे, अंक चौथा, पृ. 12.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संदीप भुयेकर,  वाराणसी, उत्तर प्रदेश ( 3 लेख )
andipbhuyekar9@gmail.com

सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, काशी हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी