डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सुझन जॉर्ज यांचे 'हाऊ द अदर हाफ डाइज'

अर्थात माझ्या निर्णयांमुळे स्व-बाहेरची परिस्थिती यत्किंचितही बदलली नाही याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या परत येण्याची ना या देशाला गरज होती, ना कोणा व्यक्तीला! तरीही एका मायावी प्रलोभनाला नाकारून मुक्त होण्याचं गडगंज समाधान आयुष्यभर भरून पावलं. सुझनचं पुस्तक वाचलं नसतं तरी हे सगळं झालं असतं का? कदाचित असतंही! कदाचित कावळा बसायला आणि पारंबी तुटायला एक वेळ आली असेल. काहीही असो; एक मात्र मी नक्की म्हणू शकते- I Know how the other half survives!

साधनाच्या संपादकांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘हा लेख आत्मचरित्रात्मक असावा. म्हणजे प्रभावित करून गेलेल्या त्या पुस्तकाचा गाभा व आवाका थोडक्यात सांगून, त्या पुस्तकाने त्या वेळी कसे प्रभावित केले व नंतरही तो प्रभाव कसा राहिला, अशा प्रकारचा लेख अपेक्षित आहे.’ तर मग एम. सी. इशरच्या Hand with Reflecting Sphere सारखं तळहातामध्ये स्व-भुताला निरखणं अनिवार्यच आहे!

मागे वळून बघताना आता असं वाटतं की, एकूणच वाचनाच्या उफराट्या व अतिरेकी सवयीमुळे आयुष्यभर बरंच गंडलं! स्व-सहानुभूतीसाठी विश्लेषणाच्या पातळीवर तीन-चार चुका हाती लागतात. एक म्हणजे, लहानपणापासून चुकीच्या वयात चुकीची पुस्तकं वाचत गेले. त्यामुळे वयानुरूप वा तारुण्यसुलभ अशा गोष्टी त्या- त्या वेळी करायच्या राहून गेल्या. म्हणजे साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी’ आवडण्याच्या वयात चिं.त्र्यं.खानोलकरांचं ‘कोंडुरा’ आवडलं. प्रेमपत्रं, लाल बदामांऐवजी transactional analysis, अस्तित्ववादी समीक्षा, ‘फाऊस्ट’चा विंदांनी केलेला अप्रतिम अनुवाद इत्यादी विषयांनी भरून वाहिली. राजेश खन्नामुळे कानशिलं तापू लागण्यामध्ये वैषम्य वाटू लागलं. अरेरे! तेथपासूनच हा phase lag सुरू झाला होता तर!

दुसरी चूक म्हणजे, वाचन हे करमणूक वा विरंगुळ्यासाठी न करता अभ्यासू वृत्तीने केलं गेलं. वरवर वाचणं वा ‘browsing through’ कधीच करता आलं नाही. त्यामुळे फालतू पुस्तकंही नीट वाचली गेली. वेळेच्या  गणितात प्रत्यक्षात वाचली त्यापेक्षा किती तरी जास्त पुस्तकं वाचायची राहून गेली. शिवाय नवं पुस्तक हाती घेतल्यावर ‘सुरुवात आणि शेवट’ आधी वाचून मग मधली पानं वाचणाऱ्या माझ्या आईला, मी कायमच खलनायिकेच्या भूमिकेत बसवलं. त्यावर उतारा म्हणूनच की काय, पण तिने मला ‘सारखं पुस्तकात डोकं खुपसून बसू नकोस’ असं कधीही म्हटलं नाही. ग्रहण केलेल्याचा कीस पाडणं हे वाचलेल्या पुस्तकाचं अलिखित extension असल्याच्या वृत्तीपायी आणखी एक वाईट सवय जोपासली गेली, ज्यामुळे इतरांकडून ‘पिळू नकोस गं’ असं कायमच ऐकावं लागलं.

थोडक्यात, वाचनानं फक्त आलबेलच होतं असं नाही, तर विशिष्ट पद्धतीने आयुष्य हाकण्याचं व्यसन लागू शकतं! या आयुष्यात तरी प्लॅस्टिकची झाडं, उघडं अन्नं ठासून भरलेल्या नासक्या वासाचा फ्रीज, टीशर्ट-पॅन्टवर मंगळसूत्र, आयफेल टॉवरखाली पुरणपोळी खाणं वा पिवळट डागांनी भरलेल्या वासमाऱ्या उशीवर मान ठेवणं... जमेगा नहीं. का; तर ग्रंथप्रेमाने एकूणच आयुष्याचा बदललेला पोत आणि ढळलेला अक्ष!

वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत चांदोबा, किशोर, कुमार, किलबिल इत्यादी मासिकं वाचण्यापर्यंत सगळं ठीक चाललं होतं. त्या सुमारास पु.ल. आणि अत्र्यांचं लेखन समोर आलं. दिवाळी अंक हातात पडले आणि त्यातल्या मोठ्या लोकांच्या गोष्टी मला आवडू लागल्या. आठवीच्या सुट्टीत मी खानोलकरांच्या कादंबऱ्या वाचल्याचं लख्ख आठवतंय. तसंच घरात सुंदर बांधणीची एक ज्ञानेश्वरी होती, ती हाती घेतली. त्यात ओव्यांचा अर्थही होता. पाठ्यपुस्तकाबाहेरही ‘कविता’ हा स्वतंत्र वाङ्‌मय प्रकार असतो याची जाणीव गीतरामायणापासून झाली. सत्यकथा, अनुष्टुभ, अस्मितादर्श यांची चाहूल लागली होतीच. या सर्वांतून समीक्षा, नवकथा, सौंदर्यमीमांसा, वैचारिक लेख हावरटासारखे समजून घेण्याची ओढ लागली. पानवलकर, चिरमुले, दि.बा., पाध्ये, अरविंद गोखले, गाडगीळ यांच्या कथांनी सुरुवात होऊन दहावीच्या सुट्टीत जी. ए. कुलकर्णी वाचायला घेतले. इथवरचा वाचनप्रवास हा मराठीपुरताच मर्यादित होता.

कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजी भाषेतलं भांडार खुलं झालं. तसंच साहित्याव्यतिरिक्त तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेकविध विषयांचा मोह पडू लागला. मार्क्स-लेनिनचा अभ्यास सुरू झाला. तेव्हाच दलित साहित्य आणि विद्रोही विचारवंत यांची ओढ निर्माण झाली. एकूणच पाश्चात्त्य विचारसरणीमुळे झपाटून जायला झालं. (लेखक आणि पुस्तकांची नावं देण्याचं मी टाळलं आहे, so as to avoid the dose of name dropping!)

वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत एकही पुस्तक विकत न घेता मी एवढं संचित जमा करू शकले होते, ते केवळ वेगवेगळ्या ग्रंथालयांच्या आणि लायब्रऱ्यांच्या वर्षानुवर्षं चालू ठेवलेल्या तुटपुंज्या सभासदत्वामुळे!

अमेरिकेत कायद्याचा अभ्यास करायला गेले तेव्हा स्त्रीवादी चळवळ, घटनात्मक आणि मानवतावादी हक्कांसाठीचे लढे अशी एकूणच आजूबाजूच्या वास्तवाची जाणीव झाली. वरवर दिसणारा सामाजिक एकोपा आणि आर्थिक संपन्नतेखालची विदारक विषमता ठळक होत गेली. तेव्हा, साधारण चोविसाव्या वर्षी हातात आला सुझन जॉर्ज हिचा HOW THE OTHER HALF DIES : The Real Reason behind World Hunger हा शोधनिबंध. ‘माझं हे पुस्तक तुम्ही वाचून पूर्ण करेपर्यंत जगात आणखी साधारण 2500 माणसं भूकबळी ठरली असतील’, या तिच्या पहिल्याच वाक्याने हादरले होते. अन्नधान्य हे माणसांची भूक पुरवण्यासाठी नाही, तर नफ्याच्या समुच्चयासाठी पिकवलं जातं. हयात असलेल्या सर्व जिवंत व्यक्तींना पुरेल एवढी नैसर्गिक साधनसंपत्ती जगात आहे आणि असेल. स्थानिक लोकांनी स्थानिक गरजांचे मूल्यमापन करून काय, किती व कसे पिकवायचे- हा सामूहिक निर्णय घेण्याचा रिवाज पद्धतशीरपणे मोडून काढला गेला आणि सगळा समतोल ढळला. अमेरिकेसारख्या संपन्न देशातील मूठभर धनदांडग्यांना वर्ल्ड बँकेसारख्या वित्तसंस्थांनी कर्ज पुरवून loan repaid with interest and also the GNP increased' ह्या पथदर्शी सूत्राची चटक लावली. त्यानुसार कुठल्या देशात ‘काय, केव्हा, किती पिकेल’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवणं सुरू झालं. उदा. फिलिपिन्समधल्या जमिनीतून जहाजं भरतील एवढे अननस पिकवून पाश्चात्त्य देशांची गरज पुरवण्याचे धोरण आखले गेले. अननस निर्यात करून फिलिपिन्सला परकीय चलन मिळेल, या नव्याने रुजवलेल्या आर्थिक समीकरणात तिथल्या भात पिकवणाऱ्या जमिनी मोजक्या झाल्या. भात हेच मुख्य अन्न असणाऱ्या फिलिपिन्सवासीयांना तोच मिळेनासा झाला. तिथे न पिकणारा भाताचा प्रकार आणि धान्याचे इतर प्रकार त्यांच्यावर लादले गेले- तेही महागडी रक्कम मोजून! साठत गेलेला नफा स्थानिक शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाहीच! Corporate control over agricultural produce - planned/artificial scarcity - A redefining needs and lifestyles ह्याच दृष्टचक्रातून साऊथ अमेरिकन देशांमधून केळी, श्रीलंकेतला चहा, मध्य अमेरिकेतून मका असे जिन्नस ओरबाडले जाऊ लागले. सत्तरच्या दशकातील अशा अनेक उलथापालथींची उदाहरणे आकडेमोडींसकट सुझनने दिली होती.

‘अमाप लोकसंख्येने पदरी आलेलं दारिद्र्य आणि कुपोषण’ हे वाक्य तोवर इतक्या वेळा ऐकलं होतं की, सुझनबार्इंनी त्याला लावलेल्या सैद्धांतिक आणि विश्लेषणात्मक सुरूंगांनी मी हादरून गेले होते. हे पुस्तक वाचल्यावर पहिल्यांदा आठवण झाली ती मंचर कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या वेणूताई दाभोळकरांची! तोपर्यंत त्यांचं वागणं मला विक्षिप्त/अनाठायी वाटायचं, कारण घरातल्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर उरलेलं खरकटं स्वतःच्या ताटात वाढून मग त्या जेवायच्या. ती त्यांची जीवनपद्धती होती. स्वत:च्या convictionने जगण्यासाठी लागणाऱ्या अपार ताकदीची जाणीव होऊन मला त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या दोन विशेषणांमुळे स्वतःचीच लाज वाटली. डोस्क्यात भरलेल्या माल्थुसिअन सिद्धांतांमधली अंतर्व्यस्तता, मेक्सिकोतून सुरू होऊन जगभर पसरलेल्या हरितक्रांतीचे दुष्परिणाम, अमेरिकेच्या भांडवली साम्राज्यवादाचे छोटे-छोटे पदर इ. परस्परसंबंधी घडामोडींचे आकलन होऊ लागले. आणि मग सर थॉमस मोर यांच्या 'sheep were eating men' किंवा गांधीजींच्या 'The world has enough for everyone's need but not for everyone's greed.' अशा वाक्यांचा अर्थ उमजू लागला. जोपर्यंत स्थानिक साडेतीन कोटी पाळीव कुत्री आणि तीन कोटी पाळीव मांजरं यांवर अमेरिकन डॉलर्सची उलाढाल अखंड व उत्तम चालू राहील, तोवर दोन अब्ज भुकेल्या माणसांचा विसर पडत राहील, अशी वाक्यं अस्वस्थ ठेवत गेली. हे सगळं फार-फार खोलवर रुतलं.

चहूकडे दिसणारे, तीन-चार भारतीय माणसांचं जेवण एका वेळी जेवणारे अमेरिकन पुरुष, एक कुटुंब भरपेट खाऊ शकेल एवढं खाणं टेबलावर टाकून देणारी कुटुंबं, दोषविरहित भाज्या/फळांची रेलचेल, केलॉग, मोठ्या कंपन्यांची आकर्षक आवरणांमधली सिरियल्स/फळांचे रस मला खटकू लागले. छोट्याशा गोडाऊनमध्ये हजारो शिवणयंत्रांमागे खाली मुंडी घालून शिवत बसलेले अवैध स्थलांतरित, शहरांमधले रस्ते वा टोलेजंग इमारतींमधली बाथरूम्स साफ करणारे कृष्णवर्णीय वा हिस्पॅनिक स्वच्छता कामगार, नफ्याच्या लालचेतून मेक्सिकोत स्वतःचे कारखाने वळवून डेट्रॉईटमधल्या कामगारांना नेस्तनाबूत करणारा अमेरिकन साम्राज्यवाद, आफ्रिकी आणि इतर मागास देशांमध्ये भविष्यात अमेरिकाधार्जिणी आर्थिक- राजकीय व्यवस्था यावी यासाठी हार्वर्डसारख्या खतध ङशरर्सीश विद्यापीठांनी स्वतःकडे हेतुपुरस्सर ओढून आणलेले त्या-त्या देशांचे राजकुमार/सत्ता-वारसदार, आखाती-मध्यपूर्वेतील सत्ता वर्चस्वासाठी पणाला लावलेले छोटे देश... हे सगळं थ्री-डी चष्मा लावल्यासारखं अंगावर येऊ लागलं. चोम्स्की, राल्फ नाडरसारखी मंडळी सुखभरल्या पेल्यामध्ये मिठाचा खडा टाकतच राहिली.

त्या देशात रुजायचं नाही, हे ठाम ठरलं. शक्य तितक्या लवकर भारतात परत जायची ओढ लागली. तरी दशकभर अस्वस्थता लपवत टिकून राहण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या क्षेत्रातही महिला-वंचित-शोषितांची बाजू निवडली. अमेरिकेत धो-धो पैसे, शिक्षित वर्गातील ऐहिक सुखं इतकी सहजी व लहान वयात हाती येतात की, ‘आपण केवढे यशस्वी झालोत’ असं खरंच वाटायला लागतं. बहुतांश भारतीय मंडळी (अर्थात इतर देशांतील यशस्वी स्थलांतरितसुद्धा) तोवर आपापल्यापरीने सिस्टीमवर स्वार होऊन, जास्तीत जास्त मलिदा स्वतःच्या पदरी पाडून घेण्यात मग्न होती. (मात्र शंभर रुपये खर्च करून भारतातून आणलेल्या कॅसेटच्या प्रती बनवून एकमेकांमध्ये फुकट पसरवणं थांबत नाहीच!) स्वमग्न माणसांच्या त्या जथ्यात मीही एक दिवस मिसळून जाईन का, याची भीती वाटत राहायची. त्यापोटी पाण्यात राहूनही जेवढे पाय सुके ठेवता येतील तेवढे प्रयत्न करत राह्यले. वार्षिक आमदनीतील ठरावीक हिस्सा सातत्याने न चुकता समाजाप्रति देण्याची सवय तेव्हापासूनच लावून घेतली. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी अ-भारतीय मंडळींकडून भरपूर देणगी गोळा केली. बाळंतपणासाठी रजा घेऊन आठ महिन्यांचं पोट सावरत साताऱ्यात मुलीला जन्म देण्याचा हट्ट पुरा केला. मूलभूत भौतिकशास्त्रातील सखोल पेच सोडवू पाहणाऱ्या शास्त्रज्ञ नवऱ्याला माझ्या उथळ पेचांमधून मुक्त केलं. विभक्त होऊन मायदेशी पोचले आणि वैयक्तिक वैचारिक संघर्षांना पूर्णविराम दिला. अर्थात, हा काही महान राष्ट्रभक्तीच्या भावनेतून घेतलेला थोर निर्णय नव्हता. तरीही ‘दर्या में खसखस’ या पातळीवर का होईना, पण भारताच्या मातीत पाय रोवून योगदान देत राहिले आहे, हे समाधान नक्कीच गाठीशी आहे.

ज्या वणव्यातून मी गेले, त्याची ठिणगी सुझन जॉर्जच्या पुस्तकामुळे पडली; माझ्या आयुष्यात विलक्षण बदल घडले. मूळची मी बदलले नाही, स्व-ओळख मात्र नव्याने झाली. अर्थात माझ्या निर्णयांमुळे स्व-बाहेरची परिस्थिती यत्किंचितही बदलली नाही याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्या परत येण्याची ना या देशाला गरज होती, ना कोणा व्यक्तीला! तरीही एका मायावी प्रलोभनाला नाकारून मुक्त होण्याचं गडगंज समाधान आयुष्यभर भरून पावलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना वेणूताई आणि सुझनताई अशी ऊर्जास्थानंच तर श्वास घ्यायला मदत करतात.

सुझनचं पुस्तक वाचलं नसतं तरी हे सगळं झालं असतं का? कदाचित असतंही! कदाचित कावळा बसायला आणि पारंबी तुटायला एक वेळ आली असेल. काहीही असो; एक मात्र मी नक्की म्हणू शकते- I Know how the other half survives!

Tags: पुस्तकदिन समाज साहित्य वाचन अर्थशास्त्र मानसशास्त्र भाषाशास्त्र तत्त्वज्ञान सुझन जॉर्ज संध्या गोखले how the other half dies weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संध्या गोखले,  पुणे
sandhyagokhale@gmail.com

व्यवसायाने वकील असलेल्या संध्या गोखले यांची ठळक ओळख आहे ती मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लेखन यासाठी. त्यांचे धूसर, थांग, पहेली, अनाहत इत्यादी चित्रपट विशेष उल्लेखनीय आहेत.


Comments

  1. Suresh Rajaram Patil- 24 Apr 2021

    This article made me turn inside me. Salute to the moral strength of the author that owes something to sensitive reader. The concern towards poverty of mankind is disturbing. Thanks.

    save

  1. Vivek Date- 10 May 2021

    Brilliant

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके