डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

पूज्य साने गुरुजी : एक चिंतन

स्वातंत्र्य प्राप्त होऊन आता 42 वर्षे होऊन गेली. नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. अनेक पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या. विज्ञानाच्या नवलाईने जग अत्यंत लहान झाले. चंद्र हातात आला. मानव महामानव झाला. अशावेळी माझा भारत कोठे आहे? आज आम्ही अधिक संपन्न, अधिक एकसंध, अधिक ध्येयनिष्ठ, मनाने, शरीराने अधिक निरोगी बनलो का ? माणुसकीस लायक ठरलो का ?याचे उत्तर निराशाजनकच मिळते.अशा परिस्थितीत साने गुरुजी आज हयात असते तर हरक्षणी ते मृत्यूच्या यातना उपभोगीत राहिले असते.

 

येत्या 24 डिसेंबरला पूज्य साने गुरुजींची 90 वी जयंती आहे. ते आपल्यातून कायमचे निघून गेले त्यालाही आता 39 वर्षे होऊन गेलीत. त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नसून त्यांनी आपले जीवन संपविले याचीही सर्वांना कल्पना आहेच, त्या घटकेपासून तो आजतागायत मी सारखा विचार करीत आहे, माझे सारखे चिंतन चालू आहे की, ' साने गुरुजींनी आपले जीवन अशा तऱ्हेने का समर्पित केले असावे ? त्यांच्या मनात काय विचार चालू असावेत ? कोणते शल्य त्यांना बोचत डाचत होते ? त्यांना का शारीरिक आधी-व्याधी होत्या का मानसिक अस्वस्थता होती का घरगुती चिंता होती ? असे प्रत्यक्ष काय घडले त्या क्षणी वा त्या सुमारास की अगदी कुणालाही अस्पष्टशीसुद्धा कल्पना शिवू न देता अगदी सहजगत्या ते निघून गेले !’

त्यांच्या या अवचित जाण्याचा अनेकांनी आपापल्या स्वभावधर्मानुसार व संस्कारानुसार निरनिराळा अर्थ लावला. त्यांच्या वैचारिक विरोधकांनी ‘भ्याड, पलायनवादी’ असा शेरा मारला. महर्षी सेनापती बापट यांनी ‘साने गुरुजींनी ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे समाधी घेतली' असा निर्वाळा दिला. पूज्य विनोबाजींनी ‘अमृतस्य पुत्रः' असे प्रतिपादिले तर असंख्य सुहृदांनी ‘गुरुजींच्या भावविव्हळ मनाला गोरगरिबांचे दुःख पाहवले नाही व आपण त्यांना काहीच साहाय्यभूत होत नाही या कारुण्यमयी भावनेने त्यांनी आत्मार्पण केले’ असा निष्कर्ष काढला. त्यांच्या निधनाने कुणाचे सर्वस्व हरपले, कुणाचे कृपाछत्र लोप पावले, कुणाचा मायबाप गेला तर महाराष्ट्रातील असंख्य बालकांच्या पाठीवर फिरणारा मातृवत् प्रेमाचा हात कायमचा अंतरला. तरीही माझ्या मनात प्रश्न कायम राहिला, असे का ? मी गुरुजींचा चिरपरिचित म्हणून गेली 40 वर्षे लोक विचारतात ‘असे का व्हावे ?’

मला साने गुरुजींचा स्वभाव माहित होता. ते अत्यंत भावनाप्रधान होते. गरीब, दीन-दुःखितांबद्दल त्यांना अंतरीचा कळवळा वाटे. त्यांच्या भल्याची ते चिंता करीत.

जया न कोणी प्रभू मी तयाचा

तदर्थ हे हात तदर्थ वाचा ।

तदर्थ हे प्रेमळ नेत्र दीप

सदैव जागा मम तत्समीप ।।

-अशी त्यांची जीवनधारणा होती. भारतीय जनतेचे केविलवाणे जिणे पाहून ते आक्रंदत, विव्हळत व याला कारण परकीय सत्ता आहे, आमची गुलामगिरी आहे, याची त्यांना चीड येई. रोगांवर रामबाण असा एकच इलाज ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आमच्यातील अज्ञानाला, दुःखाला, दारिद्रयाला, विषमतेला, जातीय व धार्मिक विद्वेषाला ही परकीय सत्ताच कारणीभूत आहे असा हिंदी जनतेचा समज होता. तेव्हा ती घालवून दिल्याशिवाय आमची उन्नती होणार नाही, विषमता नष्ट होणार नाही, जगात आम्हाला मानाचे स्थान प्राप्त होणार नाही असा सार्वत्रिक दृढ समज होता. साने गुरुजींनाही तसेच वाटे आणि म्हणूनच शिक्षकी पेशा सोडून त्यांनी आपणास देशकार्यार्थ कायमचे झोकून दिले. त्याप्रीत्यर्थ त्यांनी कारावास भोगला, वाणी आणि लेखणी झिजवली. असंख्यांना देशप्रेमाची प्रेरणा दिली. बलिदानास सिद्ध केले. त्यांची वाणी जे बोले, त्यांची लेखणी जे लिही, त्यांचे मन जे विचार करी तसेच त्यांचे वागणे असल्याने सर्वांच्या आदराचे व श्रद्धेचे स्थान ते बनले व त्यांच्या शब्दांना असंख्यांच्या प्रत्यक्ष कृतीचे सामर्थ्य लाभले. महाराष्ट्राची एक पिढीच्या पिढी त्यांनी देशसेवेने भारावून टाकली आणि भारताच्या स्वातंत्र्याचा तो परमभाग्याचा दिवस पाहिल्यावर ते आनंदाने बेहोष झाले. व ‘भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला जय बोला हो । आनंदाच्या गुढया उभारा स्वच्छंदाने डोला हो ।।‘ अशा जयनादात त्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले. आता माझ्या देशाचे दैन्य नाहीसे होणार, दुःख हरणार, अज्ञान संपणार, भेदभाव गाडले जाणार, बेकारीचे उच्चाटन होणार, सर्वांना विकासाची समान संधी प्राप्त होणार व माझा भारतवर्ष बलसागर होणार असे त्यांच्या मनश्चक्षूंना दिसू लागले. येथे नाही प्रांतभेद, नाहीत येथे जातिभेद, आनंदाने सारे नांदू, भारताची कीर्ती वाढवू, येथे मांगल्याचे, वात्सल्याचे वृक्ष फुलतील, द्वेष मत्सराचे फत्तर फोडून प्रेमाचे झरे वाहू लागतील असे त्यांच्या निर्मळ मनाला वाटू लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकांच्या आकांक्षाही वाढल्या.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. हा स्वर्गीय आनंद लुटावा असे मनोमन वाटत असतानाच भारताची दोन शकले झालेली व रक्ताचे पाट वाहात असल्याचे जंगली दृश्य व आम्हाला डोळे उघडे ठेवून व मन घट्ट करून अनुभवावे लागले. हा पहिला आघात राष्ट्रनेत्यांवर व साने गुरुजींवर झाला व त्यातूनच धार्मिक द्वेषाचा आगडोंब सर्वत्र उफाळून आला. यातून सावरण्याचा प्रयत्न होत नाही तोच राष्ट्रपिता म. गांधींची निर्घृण हत्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली व संबंध जगाला हादरा बसला. म. गांधी हे साने गुरुजींचे सर्वस्व होते. त्यांच्या मृत्यूचा साने गुरुजींच्या मनावर जबरदस्त आघात झाला. हे कृत्य एका महाराष्ट्रीय माणसाने केले हे समजताच सने गुरुजींनी प्रायश्चित्त म्हणून 21 दिवसांचे उपोषण केले. या उपोषणातच आपला जीवनपसारा आटोपावा असे त्यांना वाटत होते. एवढी घोर निराशा त्यांच्या ठायी आली होती. त्यातून ते सावरले परंतु त्या दिवसापासून जीवनात व जगण्यात त्यांना स्वारस्य वाटेना. म. गांधी यांचे निधन शुक्रवारी झाले असल्याने त्यानंतरच्या प्रत्येक शुक्रवारी गुरुजी कडकडीत उपवास करीत होते व आपणास मरणही त्याच दिवशी यावे या हेतूने त्याच दिवशी (शुक्रवारी) गुरुजींनी झोपेच्या गोळ्यांच्या मोठा डोस घेतला होता. यातच बापूजींच्या निर्घृण हत्येचा गुरुजींच्या मनावर केवढा आघात झाला होता हे स्पष्ट होते.

त्यानंतर भारताच्या ऐक्याचे, मांगल्याचे बलसागर भारताचे जे विशाल स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते तेही भंग पावण्याची लक्षणे दिसत होती. लोकशाही मूल्याचे जतन होण्यासाठी भाषावार प्रांतरचना अत्यावश्यक असूनही त्यामुळे भारतभर भाषा व प्रांतभेदाचे जे विद्वेषी वातावरण निर्माण झाले आणि त्यात कोट्यवधी रुपयांची आपल्या देशाची मालमत्ता अक्षरश: भस्मसात करण्यात आली. त्यामुळे भारताच्या एकात्मकतेला जबरदस्त तडा गेला व त्याही बाबतीत सानेगुरुजींच्या भव्य-दिव्य-मंगल अशा स्वप्नाचा चक्काचूर झाला. यासाठी त्यांनी आंतरभारतीचा ध्यास घेतला व हा ऐक्याचा,मंगल प्रेमाचा आसुसलेला यात्री सर्वत्र एकाकी वणवण भटकून प्रेमधर्माचा प्रचार करीत राहिला.

या सार्वत्रिक महान कार्याबरोबरच वाढती बेकारी, अज्ञान, दवापाण्याशिवाय तडफडणारे शेकडो जीव, बोकाळत चाललेला स्वार्थ, ध्येयवादाची पेटलेली होळी, पक्षीय राजकारण्यांतील बेदिली, विषमतेची वाढत चाललेली दरी व सामाजिक अन्यायाची परिसीमा पाहून साने गुरुजींचे आंतरिक मन करपून निघत होते. वरवर ते कार्यरत होते परंतु अंतरी अत्यंत विषण्ण होते व आपल्या एकाकीपणाचा त्यांना अनुभव येत होता.

‘बघून रोगार्त करीन घाई | बनेन त्याची निरपेक्ष आई।।“

ही त्यांची मातेची भावना होती. परंतु सर्वत्र आकाश फाटले असताना ठिगळ कोठे, कसे आणि किती लावायचे अशा संभ्रमात ते होते व अखेरीस आपण त्यांचे आसू पुसू शकत नाही, त्यांच्या दुःखाचे निराकरण करू शकत नाही, त्यांना साहाय्यभूत होऊ शकत नाही अशा निरुपयोगी जगण्यात काय अर्थ आहे ? ज्या जीवनाचा लोकांच्या असहाय्य परिस्थितीत काहीच उपयोग नाही ते जीवन असार आहे, असह्य आहे व म्हणून हे जीवनाचे मडके फोडून टाकावे व कदाचित आपल्या या जगण्यातून जे साध्य होऊ शकले नाही ते कदाचित आपल्या मृत्यूतून साध्य होईल अशी त्यांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधली असावी. त्यांना जीवनाच्या जगण्याच्या) आकर्षणापेक्षाही पहिल्यापासूनच मृत्यूला कवटाळण्याची तीव्र उत्कंठा असल्याने अत्यंत लीलया, शांतपणे, सात्त्विक वृत्तीने, कुणालाही चाहूल लागू न देता त्यांनी आपल्या या जिवलगाला 11 जून 1950 रोजी कवटाळले.

प्रश्न निर्माण होतो की त्यांच्यासारख्या विचारवंताने 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 2/3 वर्षांपूर्वीच देश स्वतंत्र झाला आहे, अनंत प्रश्न आ वासून उभे आहेत, चुटकीसरशी सुटण्यासारखे ते नाहीत, अशा वेळी अशी घाई, असा त्रागा का करावा? त्याउलट त्यांच्यासारख्या जनमानसावर अत्यंत पकड असलेल्या महात्म्याने लोकांना धीर देऊन, कार्यप्रवृत्त व संघटित करून दुर्जनांचे निर्दालन व सुजनांचे संवर्धन करण्याचा मार्ग का चोखाळू नये ? त्यामुळे त्यांच्या जीवनाला अधिक अर्थ प्राप्त झाला असता व भारताच्या अमर पुरुषांत त्यांची गणना झाली असती.

हा आपला विचार आहे, परंतु त्यांच्यासारख्या सहृदयी मनाची, हळुवार अंतःकरणाची मनःस्थिती आपण काय जाणावी ? त्यातूनच दुसरा विचार निर्माण होतो व चिंतन वाढते की, ठीक, साने गुरुजींनी चूक केली, घाई केली, पुरेसा अवधी द्यावयास हवा होता. आज काय परिस्थिती आहे?

स्वातंत्र्य प्राप्त होऊन आता 42 वर्षे होऊन गेली. नऊ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. अनेक पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या. विज्ञानाच्या नवलाईने जग अत्यंत लहान झाले. चंद्र हातात आला. मानव महामानव झाला. अशावेळी माझा भारत कोठे आहे? आज आम्ही अधिक संपन्न, अधिक एकसंध, अधिक ध्येयनिष्ठ, मनाने, शरीराने अधिक निरोगी बनलो का ? माणुसकीस लायक ठरलो का ?

याचे उत्तर निराशाजनकच मिळते. सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंदावत आहे, उच्चनीचतेचे स्तोम वाढत आहे, हरिजन, गिरिजन, आदिवासी व भटक्या जातीजमाती आणि स्त्रिया यांच्यावरील अन्याय वाढत असून असंतोषाचा वणवा धगधगतो आहे. स्वार्थाचा बुजबुजाट आहे. देशाचा विचार गौण ठरून जो तो आपला व आपल्या गटाचा स्वार्थ साधण्याच्या मागे लागला आहे. अजूनही निम्म्यापेक्षा जास्त बालके शाळेच्या बाहेर आहेत, दारिद्र्याच्या खाईत 60 टक्के लोक गटांगळ्या खात आहेत. धनवान अधिक श्रीमंत व गरीब अधिक दरिद्री बनत आहेत. देश एका महाभयंकर अशा संकट काळात सापडला आहे. ज्यांच्याकडे आशेने पाहावे, ज्यांच्याकडून जीवन प्रेरणा घ्यावी अशांकडूनच भयंकर निराशेची परिस्थिती अनुभवण्यात येत आहे. कधी नव्हती इतकी लाचलुचपत, भ्रष्टाचार, स्वार्थ, काळी कृत्ये यांची अंगावर शहारे आणणारी धक्कादायक उदाहरणे दररोज उघडकीस येत आहेत. अशा परिस्थितीत साने गुरुजी आज हयात असते तर हरक्षणी ते मृत्यूच्या यातना उपभोगीत राहिले असते.

मग यातून मार्ग काय? हे सर्व निःस्तब्धपणे व हतबल होऊन आपण पाहात राहायचे का? नाही. त्रिवार नाही. मोठ्यांकडून, जुन्या पिढीकडून फारशी अपेक्षा धरू नये. ज्या तरुण पिढीवर पुढची जबाबदारी पडणार आहे त्यांनीच आता जागृत व्हावयास पाहिजे. क्षणभंगुर ऐहिक सुखाच्या पाठी लागून कायमच्या दुःखात आपणास आपल्या देशास झोकून न देता अत्यंत जाणीवपूर्वक भल्याबुल्याचा विचार करूनच बुराईचा त्याग करून भल्याशी त्यांनी संगत केली पाहिजे. त्याचीच कास धरली पाहिजे. त्यासाठी संघटित होऊन दुष्ट प्रवृत्तीचा विनाश व सुष्ट प्रवृत्तीचा विकास हे ब्रीद मानून त्यासाठी जाणीवपूर्वक कटिबद्ध झाले पाहिजे.

अशक्य काय आहे ? वरवर आलेली नैराश्याची राख फुंकून ध्येयनिष्ठेचा अंतरीचा प्रज्वलित निखारा एकदा गवसला की आजची ही तरुण पिढी अधिक जिज्ञासू व्यवहारी, ध्येयनिष्ठ बनून याही अंधःकारातून प्रकाशाकडे वाटचाल करील व

सर्वेत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामयाः ।।

सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित दुःखमाप्नुयात् ।।

अशी एक नवीन मंगलमयी, निरामयी, भारतभूची प्रतिमा सर्वत्र उज्वल करतील असा विश्वास मनात बाळगूया व या चिंतनात व धडपडीत मनाला सतत गुंतवू या.

Tags: पंचवार्षिक योजना निवडणुका आंतरभारती  म. गांधी विनोबा भावे ज्ञानेश्वर महाराज सेनापती बापट Panchvarshik Yojana Elections Aantarbharati Mahatma Gandhi Vinoba Bhave Dnyaneshwar Maharaj Senapati Bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके