डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडले तर महाराष्ट्रातील हजारो खेड्यांतून प्रकाश येईल!

ज्यांना मंदिरे नको असतील त्यांच्यासाठी माझा उपवास नाही. ज्यांना हवी आहेत त्यांच्यासाठी आहे. पंढरपूरला पंधरापंधरा हजार अस्पृश्य वारकरी येतात. ज्यांना दोन दोन हजार अभंग पाठ येतात, ज्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यांची अनेक पारायणे केली, असे हरिजन वारकरी मला भेटले आहेत. त्यांच्यासाठी मी मेलो तरी कृतार्थ होईन. गडहिंग्लज गांवी ग्रामदेवतेचे मंदिर उघडतांना एक वृद्ध हरिजन मला म्हणाला, गुरुजी माझी देवता मला आज माझ्या डोळ्यांना दिसत आहे. डोळे भरून आले होते. अशा एका बंधुसाठी मी कितीतरी कृतार्थ होईन. आणि उद्या कोणी मंदिरात येवोत वा न येवोतः हिंदुधर्म आहे तोवर मंदिरे रहाणार, या मंदिराला मंदिरपण यायला हवे असेल, तेथील मूर्तीला देवपण हवे असेल, तर देवाच्या सर्व लेंकरांना तिथे जाता यायला हवे. 

मला माझ्या उपवासासंबंधी अनेकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रश्न विचारले त्यांतील कांहीना माझ्या समजूतीप्रमाणें मी उत्तरे देत आहे. त्या उत्तरांमुळे सर्वांचे समाधान होईलच असे नाही; परंतु माझ्या मनाचे ते समाधान आहे. 

प्रश्न - तुम्हांला अस्पृश्यता-निवारणाचा आजच एकाएकी पुळका कां आला? आजच एकदम उपवासावर येऊन ठेपलांत? 

- माझ्याविषयी ज्यांना माहिती आहे, ते असे म्हणणार नाहीत. 1928 सालींच अस्पृश्यता निवारणासंबंधी छोटी नाटिका मी लिहिली होती. 1930 साली त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असतांना मळाने कुंडया भरल्या तरी त्यांतच आमचे मित्र शौचास बसत आहेत हे पाहून, मी त्या कुंड्या साफ करून ठेवीत असे. मी लहानपणापासूनच शूद्र वृत्तीचा आहे. मी 1938 मध्ये ‘काँग्रेस’ नांवाचे साप्ताहिक काढले. त्यातून कितीदा तरी अस्पृश्यतेसंबंधी लिहिले. महाराष्ट्रांतील कोणत्याही पत्राने इतके लिहिले नसेल. अंमळनेरला 1931 साली मुले बरोबर घेऊन आम्ही पायखाने साफ केले आहेत. अनेकदा याच विषयावर मी बोललो आहे. अमळनेर तालुक्यांत नांदेड वगैरे गावी हरिजनांनी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरले तेव्हां त्यांचा छळ सुरू झाला. त्या वेळेस त्यांची बाजू घेऊन मी गेलो होतो. लोक दगड मारायला आले तर मी म्हटले, ‘कालपर्यंत हार घातलेत, आतां दगड मारा.’ हरिजनांविषयींचे प्रेम मला आजच वाटू लागले असे नाही. 1940-41 मध्ये धुळे जेलमध्ये देवचंद सोनवणी या हरिजन सत्याग्रही तरुणास मी इंग्रजी शिकवत असे. तो 42 च्या चळवळीतही तुरुंगात होता. पुढे तो देवाघरी गेला. त्याच्या बहिणीसहि मी थोडीफार मदत पाठवीत असतो. त्याचा भाचा खामगांवला शिकत आहे. त्याला मी मदत पाठवित असतो. अनेक हरिजन विद्यार्थ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हरिजन उमेदवार पडूं नयेत म्हणून मीहि जिवाचे रान केले आहे. दुसरे उमेदवार पडले तरी चालतील. परंतु हरिजन पडता कामा नये, असे मी सांगत असे. एका हरिजन उमेदवाराजवळ खर्चावयास कांही नव्हते. मी त्याला दीड हजार रुपये दिले. माझ्या पुस्तकाचे आले ते दिले. हरिजन बंधूस कोठेहि उपेक्षित वाटूं नये असे मला वाटे. मी हे प्रौढी म्हणून सांगत नाही, मी माझे सारें अंत:करण तुम्हांस कसे दाखवू? आणि कोणी कालपर्यंत मरायला उभा राहिला नाही, म्हणून त्याने आज उभे राहूं नये का? कालपर्यंत देशासाठी मेला नाही, म्हणून आज मरू नये का? कालपर्यंत वाईट होतो म्हणून आज चांगले होणे का पाप? कालपर्यंत शिकलो नाही नि आज शिकायला लागलो तर का कोणी म्हणावे, आजच शिकण्याचा का पुळका आला? प्रत्येकाच्या जीवनांत विशिष्ट क्षण येतात. त्या त्या वेळेस सर्वस्व अर्पण करायला तो उभा राहत असतो. भूकंपाचा धक्का एकदम बसला तरी पृथ्वीच्या पोटांत कधीपासून हालचाल सुरू झालेली असते. ती आपणांस माहीत नसते; आपणांस स्फोट तेवढा दिसतो. माझ्या मनांतील अनेक वर्षांच्या तळमळीतूनच हा उपवास बाहेर पडला. हा आकस्मिक पुळका नव्हे. ही क्षणिक वेदना, तात्पुरती लाट नव्हे; परंतु या गोष्टी माझ्या निकटवर्ती मित्रांस तरुणांस, विद्यार्थ्यांस माहीत आहेत. कोणी कुटाळकी केली तरी देवाला सारे माहित आहे. 

प्रश्न - तुम्हांला समाजवादी लोकांनी उपवासास प्रवृत्त केले असे कोणी म्हणतात ते खरे का? 

- क्षुद्र वृत्तीच्या लोकांच्या डोक्यांतील बरबटांतून असले विषारी आक्षेप बाहेर पडत असतात. ज्यांना जात आणि आडनांवे यांच्या पलीकडे पाहण्याची दृष्टि नाही, असे लोक असे बोलत असतात. समाजवादी लोकांविषयी ज्यांना घृणा आहे असे लोक बोलतात. मी नाशिकच्या तुरुंगात उपवास केला होता. तेव्हांही समाजवादी लोकांनी मला उपवासास प्रवृत्त केले, असे याच अनुदार लोकांनी म्हटले. त्यावेळेसही तुरुंगात श्री. तात्यासाहेब शिखरे यांनाच आधी मी विचारले होते. उपवासावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाच मी विचारतो. या वेळेस उपवास सुरू केला त्याच्या आधी कित्येक महिन्यांपासून हे विचार माझ्या मनांत घोळत होते. जवळ जवळ एक वर्षापूर्वी पूज्य विनोबाजींना ‘उपवास करायला मला परवानगी द्या, केवळ व्याख्यानांनी शिवाशिव जाणार नाही, कांहीनी प्राणार्पणे करावी. निदान मला तरी जाऊ दे’, असे लिहिले होते. सेवादलाच्या व इतर शिबिरांतून, खानदेशांतील सभांतून ‘कदाचित उपवास करून मी निघून जाईन’ असे अनेकदा म्हटले होते. समाजवादी लोकांची गुप्त सभा घेऊन हा निर्णय मी घेतला नव्हता. मनांत कधीपासून हे विचार होते. शेवटी आश्विन, कार्तिक महिना आला. नौखालीत हत्याकांड सुरूं झाले. महाराष्ट्रांत कोणी म्हणू लागले, बदला घ्या. मी मनांत म्हणे, नौखालीचा हा धडा नव्हे. द्वेषाची लाट आणण्याऐवजी प्रेमाची लाट आणून हरिजनांस जवळ घेणे, हा या हत्याकांडाचा धडा आहे. बंगालनेहि तोच धडा घेतला. तिकडील सव्वीस शास्त्रपंडितांनी अस्पृश्यता- निवारण करा म्हणून पत्रक काढले. टाइम्सनेहि लिहिले की, बंगालमध्ये आज अस्पृश्यता नाही. हा नौखलीचा धडा आहे. अस्पृश्य वस्तीतील किंकाळी ऐकून स्पृश्य धावले नाहीत. स्पृश्यांची किंकाळी ऐकून अस्पृश्य धांवले नाहीत. दोघे अलग राहिले. दोघे मेले. अलग राहणे म्हणजे मरणे ही गोष्ट पूर्वबंगालमधील हिंदु समजले, आणि त्यांनी अस्पृश्यता आज नष्ट केली. 

नवयुग साप्ताहिकांत नौखालीवर जी लेखमाला आली तिच्या दुसऱ्या लेखांकांत लेखक म्हणतो, ‘साने गुरुजींच्या उपवासाची प्रथम उपेक्षा झाली; आम्ही उपहास केला. परंतु नौखालीत आल्यावर कळले की इकडील हत्याकांडाचा महाराष्ट्रांत कोणाला अर्थ कळला असेल तर तो फक्त साने गुरुजींनाच होय.’ माझ्या उपवासास समाजवादी कारण नसून नौखाली कारण आहे. कार्तिकी एकादशीच्या सुमारास दिल्लीस जोगेंद्र मंडल हे बॅ.जीनांच्या बाजूचे हरिजन मंत्री म्हणाले, ‘कशाला आम्ही या हिंदुधर्मात रहावे? हा धर्म आम्ही सोडावा.’ त्याच सभेत मुस्लीम लीगचे पुढारी म्हणाले, ‘खरेंच तुम्ही हिंदुधर्म सोडून आमच्या धर्मात या.’ हे सारे वाचून मला वाईट वाटे. मनांतील अनेक दिवस घोळणाऱ्या उपवासाच्या विचारास चालना मिळाली. आणि शेवटी एक निमित्त कारण घडले. कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशीच मी बोर्डीस आलो होतो. तेथे आलो तो पंढरपुरचे एक पत्र आले. माझे खानदेशी मित्र श्री. सितारामभाऊ चौधरी मंदिर प्रवेशासाठी तेथे प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी मला लिहिले, तुम्ही या. मला बळ येईल. मी पत्र हातात घेऊन म्हटले, हे देवाचे  बोलावणे आहे. माझ्याजवळ माझे प्राण अर्पण करणे एवढीच शक्ती आहे. बडवे मंडळी जवळ कां वाद करीत बसू? देवाजवळ सर्वांनी जावे की न जावे याचा वाद करणें म्हणजे देवाची व मानवाची विटंबना, असे मला वाटते. मी माझ्या भावास म्हटले, दे पत्र बघू. मी उद्यापासून उपवास करतो. मुंबईस जाऊन पत्रक वर्तमानपत्रांत देतो. माझ्या भोवती कोणी समाजवादी नव्हते. मी, माझा भाऊ आणि देव याशिवाय तेथे कोणी नव्हते. म्हणणारे काही म्हणोत. देवाला शेवटी खरे माहीत. वाटेल ते बोलणाऱ्यांची आपण तोंडे थोडीच धरणार? सत्यअसत्यासी मन केले ग्वाही असे मनांत म्हणून मी दु:खाने शांत राहतो. 

प्रश्न - उपवासांत खोल राजकारण आहे म्हणतात. तसे काही आहे का? 

- वर जो खुलासा केला त्यावरून तुम्हाला तसे वाटते का? मी राजकारणी मनुष्य नाही. अधिकाराची मला लालसा नाही. काँग्रेसमध्ये माझ्या वृत्तीला वाव आहे म्हणून मी आलो. 1930 साली धुळे जेलमध्ये असतांना पश्चिम खानदेशांतील थोर कार्यकर्ते श्री. नानासाहेब ठकार यांनी मला विचारले, साने, तुम्ही शाळा सोडून तुरुंगात आलात. सुटल्यावर काय करणार? मी त्यांना म्हटले, प्रेमधर्माचा प्रचार करीत मी महाराष्ट्रभर भटकत राहीन. अशी माझी वृत्ति आहे. हिंदुमुस्लीम ऐक्याचा मी प्रचार करीत असे. धुळ्याच्या प्रबोधमध्ये सानेमुल्ला म्हणून माझी संभावना करण्यात आली होती. सर्वांना जवळ घ्यावे, सर्वांना प्रेम द्यावे, सर्वांना सुख मिळावे, श्रमणाऱ्यांची मान उंच व्हावी असे सदैव मला वाटते. यांत राजकारण नसून माझी धर्म भावना आहे. खोल राजकारणे माझ्याजवळ नाहीत. माझ्याजवळ कारस्थाने नाहीत. छक्के पंजे नाहीत. भेदातीत दृष्टी घेऊन जगावे हीच एक तहान आहे. माझ्या लिहिण्यांत बोलण्यांत हाच नेहमी सूर असतो. 

प्रश्न - तुमची धर्मावर श्रद्धा आहे? 

- रूढी म्हणजे माझा धर्म नव्हे. सहानुभूति म्हणजे माझा धर्म, मी प्रेमधर्माचा उपासक आहे. खरी धर्मवृत्ति सर्वातच असते. रशियांतहि या महायुद्धांत लाखो लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करीत. मानव प्राणी जों वर आहे तोपर्यंत कोणत्या तरी स्वरूपांत धर्म राहणारच. तो उत्तरोत्तर उदात्त होत जाईल. एका विचारवंताने फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्र्यास विचारले, तुम्ही धर्मास अफू म्हणता; परंतु मनुष्य प्राणी लाखों स्थित्यंतरांतून आला. सृष्टीच्या क्रांतिउत्क्रांतीचे परिणत फळ म्हणजे मनुष्य प्राणी. झाडे-माडे, पशुपक्षी यांतूनच मनुष्य आला. लाखों योनींचे हे ठसे मानवी मनावर आहेत. विशाल सहानुभूतीच्या माणसास या विश्वाविषयी प्रेम वाटते. कारण या सर्वांतून तो आला आहे. एके काळी तो तृणांत होता, फुलांत होता; पांखरांत होता, पशूंत होता, ताऱ्यांत होता. तो विश्वांत उभा राहतो. सर्वत्र त्याला स्वत:चे रूप दिसते. ही सारी माझी, वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे असे त्याला वाटते. हा अनुभव शास्त्रीय आहे. ते अनंत ठसे जागे होतात. आणि हे विश्वप्रेमाचे संगीत सुरू होते. ही भावना भ्रम नव्हे, अफू नव्हे. ही भावना म्हणजे धर्म, फ्राईड लिहितो, या दृष्टीने धर्माचा मी विचारच केला नाही. खरी गोष्ट हीच आहे. धर्माची अनुभूति म्हणजे सर्वत्र एकतेचा थोर अनुभव. या धर्माचा मी पुजारी आहे, आणि हिंदुधर्माची खरी थोरवी यांतच आहे. अद्वैत, भेदांमध्ये अभेद पाहण्याची दृष्टि, सर्वत्र आत्मा बघ, जळीस्थळी परमात्मा आहे, असे घोषणारीं हा हिंदुधर्म आहे. अनेक साधुसंतानी हे अनुभव घेतले. हा प्रेमधर्म त्यांनी शिकवला. हिंदुधर्माचे हे खरे विशुद्ध स्वरूप. हे प्रकट व्हावे असे मला वाटते. हिंदुधर्म म्हणजे का शिवाशिव, रूढीचे गांठोडे? माझ्या या सातसात कोटी भावांनी कंटाळून कंटाळून सोडून जातो हिंदुधर्म म्हणावे आणि आम्हांला त्याचे दुःख वाटूं नये? स्वामी विवेकानंद, रामतीर्थ यांनी हिंदुधर्माची थोरवी जगास पटविली. ती कशाच्या जोरावर? ती का शिवाशिवीच्या जोरावर? हिंदुधर्माची उदारता प्रकट व्हावी म्हणून माझा उपवास. 

प्रश्न - परंतु मंदिरे मोकळी होऊन ती कशी प्रकट होणार? 

- जोपर्यंत हिंदुधर्म आहे तोपर्यंत मंदिर ही वस्तु राहणार. निर्गुणनिराकाराला आम्ही सगुण रूप दिले. मूर्तीसमोर उभे राहून तिच्यांत विश्वंभर बघायचा. आणि मूर्तीत देव बघायला शिकून सर्व मानवी मूर्तीत, सर्व चराचरांत देव बघायला शिकायचे, सर्वांत तुच्छ वस्तु म्हणजे दगड. त्या दगडांतहि आम्ही परमेश्वराचे पावित्र्य नि सौंदर्य बघायला शिकायचे हे यांतील रहस्य. दगडाच्या मूर्तीतहि देव बघणारे अधिक चैतन्यमय माणसांत नाही का बघणार? तुकाराम महाराज म्हणतात,  

जिकडे तिकडे देखे उभा 
अवघा चैतन्याचा गाभा’ 

मूर्तिपूजा करून शेवटी या अनुभवाकडे यावयाचे, तर त्या मूर्तीजवळही आम्ही सर्वांना येऊ देत नाही. अरे, ती विश्वंभराची ना मूर्ति? का तुझ्या अहंकाराची मूर्ति! मूर्तिपूजेतील थोर गोडी आम्ही विसरलो, आणि तेथेहि भेद उभे केले. 

प्रश्न - परंतु अस्पृश्यांना तुमची मंदिरे कोठे हवी आहेत?

- ज्यांना मंदिरे नको असतील त्यांच्यासाठी माझा उपवास नाही. ज्यांना हवी आहेत त्यांच्यासाठी आहे. पंढरपूरला पंधरापंधरा हजार अस्पृश्य वारकरी येतात. ज्यांना दोन दोन हजार अभंग पाठ येतात, ज्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यांची अनेक पारायणे केली, असे हरिजन वारकरी मला भेटले आहेत. त्यांच्यासाठी मी मेलो तरी कृतार्थ होईन. गडहिंग्लज गांवी ग्रामदेवतेचे मंदिर उघडतांना एक वृद्ध हरिजन मला म्हणाला, गुरुजी माझी देवता मला आज माझ्या डोळ्यांना दिसत आहे. डोळे भरून आले होते. अशा एका बंधुसाठी मी कितीतरी कृतार्थ होईन. आणि उद्या कोणी मंदिरात येवोत वा न येवोतः हिंदुधर्म आहे तोवर मंदिरे रहाणार, या मंदिराला मंदिरपण यायला हवे असेल, तेथील मूर्तीला देवपण हवे असेल, तर देवाच्या सर्व लेंकरांना तिथे जाता यायला हवे. देवाचा प्रकाश सर्वांसाठी, त्याची हवा सर्वांसाठी, त्याचा पाऊस सर्वांसाठी, देवाची मूर्ति सर्वांसाठी. जेथे सर्वांना जातां येत नाही, ती देवाची मूर्ति नसून आपल्या अहंकाराची. वर्णाभिमानाची ही मूर्ति आहे. गीतेच्या सोळाव्या अध्यायांत म्हटले आहे की, ‘आढ्योऽभिजनवानस्मि’ म्हणणारा आसुरी वृत्तीचा समजावा. जो कोणी म्हणेल की, ‘‘मी अभिजनवान’’ मोठ्या कुळांतील, तो आसुरी वृत्तीचा. कोणी तुच्छ नाही, उच्च नाही. समाजसेवेची सारी कर्मे करणारेहि पवित्र आहेत. आणि ती कर्मे न करणारेहि पवित्र आहेत. हिंदुधर्माची ही खरी थोरवी. हा मोठेपणा म्हणून समाजाच्या सेवेची अनेक कर्मे करून लोक मुक्त झाले. माझा विठोबा सर्वांना कामे करण्यास मदत करी. तो कधी बाटला नाही. 

प्रश्न - धर्मशास्त्रं तु वै स्तृती: असे म्हणतात. स्मृतीमध्यें तर अस्पृश्यता आहे. 

- मी वाद करणारा पंडित नाही. ‘येथ व्युत्पत्ति अवधी विसरिजे ॥ विद्वत्त्व पऱ्हां सांडिजे ॥' असें श्री ज्ञानेश्वर म्हणतात. महामहोपाध्याय काणे, पाठक शास्त्री, दप्तरी, नारायण शास्त्री, कोकजे शास्त्री इ. अनेक थोर पंडित अस्पृश्यतेला आधार नाही असे सांगत आहेत. आणि त्या त्या काळाला अनुरूप स्मृती लिहिल्या जात. एका ऋषींचे मत दुसऱ्या ऋषींच्या मतास मिळत नाही. कारण त्या त्या स्मृती त्या त्या विशिष्ट काळाच्या. आज कोणते आचार-विचार आपण ठेवले आहेत? आज ब्राह्मण सारे धंदे करीत आहेत, क्षत्रिय सारे धंदे करीत आहेत. दीडहजार वर्षे आम्ही नवीन विचार केला नाही. नवीन स्मृती लिहिली नाही. जुन्या स्मृती पढत बसलो. भाष्यांतर भाष्ये रचीत बसलो. स्वतंत्र बुद्धि जणूं मेली. डॉ.श्री.व्यं. केतकर लिहितात, स्वतंत्र बुद्धि असती तर मुसलमानांसहि आम्ही आमच्यांत घेऊन त्यांचा एक सांप्रदाय मान्य केला असता, परंतु संग्राहक व कालानुसार फरक करणारी बुद्धी गेली. लोकमान्य टिळक म्हणाले होते, मला एक स्मृती लिहायची आहे. त्या महापुरुषाला वेळ मिळाला नाही. त्यांनी लिहिली असती तर का तींत शिवाशिव त्यांनी घातली असती? काळाप्रमाणे बदल करणे यांत धर्मता आहे. ही धर्मताच मेली. म्हणून तुम्हां आम्हांला मरणकळा आली. आणि शेवटी स्मृतीपेक्षा श्रृतीलाच महत्त्व. या श्रुती सुद्धा अग्नि थंड आहे म्हणून म्हणतील, तर मी मानणार नाही. असें आद्य शंकराचार्य म्हणतात. म्हणून शेवटी आत्मा सर्वत्र आहे तो पहा. तुझ्याप्रमाणे सर्वांना सुखदु:ख आहे, मान आहे, स्वाभिमान आहे, कोणाला हिडीसफिडीस करूं नको. सर्वांची प्रतिष्ठा सांभाळ. यांतच धर्मसार येऊन जाते. कारण हा ’प्रत्यक्षावगम धर्म’’ आहे. शेवटी समर्थ म्हणतात: 

आपणांस चिमोटा घेतला । 
तेणें जीव कासावीस झाला । 
आपणावरून दुसऱ्याला ।
ओळखीत जावें ॥

हे ज्याला कळले त्याला धर्म कळला; त्याला तत्त्वज्ञान कळले, स्वराज्याचा अर्थ कळला. 

प्रश्न - गीतेंत तस्मात्‌ शास्त्रं प्रमाणंते’ म्हटलें आहे. शास्त्रात अस्पृश्यता आहे. 

- थोर पंडितांचा निर्वाळा की अस्पृश्यतेस खरा आधार-शास्त्राधारहि नाही. परंतु गीतेंतील शास्त्र प्रामाण्य कोणते? ‘इति गुह्यतमं शास्त्रमिद मुक्त मयावध’ अरे, तुला मी हे शास्त्र सांगत आहे, असे भगवान म्हणतात. भगवंतानी  सांगितलेलें हें शास्त्र शिवाशिवीचे नव्हें सर्वांना मोक्ष देणारे हें शास्त्र. आपापली कामें नीट करा नि मुक्त व्हा, असे सांगणारे हे शास्त्र. आपापल्या गुणाप्रमाणे कर्मे करा. सेवेची सर्व कर्मे पवित्र, इतर सटरफटर सर्व धर्म भगवंतानी त्याज्य मानिले. पहिल्या अध्यायांत अर्जुन ‘‘कुलधर्म, जातिधर्म’’ सतरा धर्म पुढे मांडतो. माझ्या मतें, 

सर्वधर्मात्‌ परित्यज्य मामेकं शरणं व्रज 

या चरणांत या सर्वांना उत्तर आहे. हे सारे क्षुद्र धर्म, बुरसटलेले धर्म, अंहंकारजन्य धर्म फेंकून, मी सांगतो तो धर्म मान असे भगवान सांगत आहे. आणि तो धर्म म्हणजे- 

स्वकर्मणा तमथ्यर्य सिद्धीं विन्दति मानवः 

हा होय. परंतु हा थोर धर्म आम्ही विसरलो. हीं कर्मे अपवित्र असें म्हणत बसलो. परंतु माझा गोपाळ कृष्ण हातांत सुदर्शनहि घेतो. शेणगोळाहि घेतो. जगाला गीता देतो आणि गाईहि चारतो. हिंदुधर्माची ही भव्यता आहे. 

प्रश्न - एक पंढरपुरचे मंदिर मोकळे करून काय होणार? 

- मी शंभरदा सांगितले की, पंढरपूर मंदिर प्रतीक म्हणून मी घेतले आहे. हे मंदिर उघडले तर महाराष्ट्रांतील हजारो खेड्यांतून प्रकाश येईल. गावोगावचे वारकरी, टाळकरी पंढरपूर मोकळे करा. मग आम्ही सर्व मंदिरें मोकळी करूं असें म्हणतात. आणि मंदिरें मोकळी करा मी कां म्हणतो? एकदां देवाजवळ सारे जाऊं लागले म्हणजे उद्यां माझ्या ओटीवर आले, विहिरीवर आले तरी चालेल. असें माणसें मानूं लागतील. सर्व सामाजिक जीवनांत क्रान्ति येईल. उद्या मंदिरें मोकळी होऊन माझ्या घरी मी हरिजनांस येऊ देत नसेन तर त्या मंदिर प्रवेशास तरी काय अर्थ? पंढरपूरचें मंदिर मोकळें करणे, यांत माझा अपार अर्थ आहे. परंतु लोक जाणूनबुजून त्याचा विपर्यास करतात. 

प्रश्न - डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांचे अनुयायी म्हणतात, आम्हांला मंदिरें नकोत. राजकीय हक्क हवेत. मंदीरप्रवेश हाती घेऊन आमची दिशाभूल कां करतां? 

- मी कोणाची दिशाभूल करीत नाही. मी हिंदुधर्म उदार व्हावा म्हणून उभा आहे. स्पृश्यांची दृष्टी मोठी व्हावी, स्पृश्यांचा उद्धार व्हावा, म्हणून हा प्रयत्न आहे. हरिजनांना राजकीय हक्क मिळू नयेत असें म्हणणारा मी नाहीं. एक तर मी राजकीय वृत्तीचा मनुष्य नाही. मी धर्ममय मनुष्य आहे. धर्माच्या बाजूने प्रयत्न करायला मी उभा आहे. हरिजनांना राजकीय हक्क हवे असले तरी अलग राहून कसे मिळणार? मुंबई इलाख्यांतील सारे हरिजन प्रतिनिधि डॉ.आंबेडकरांच्या तर्फेचे असते, म्हणून का राजकीय सत्ता मिळाली असती? बाजूलाच बसला असतां. डॉ.बाबासाहेबांनी जें कांहीं दिवसांपूर्वी पत्रक काढलें, त्यांत म्हटले आहे की, अलग राहून आम्हांला राजकीय सत्ता मिळणार नाही ही गोष्ट खरी, हे आम्ही समजतों. म्हणून तर नवी योजना मांडून हल्ली काँग्रेसजवळ त्यांच्या वाटाघाटी चालल्या आहेत. तेव्हां राजकीय हक्क एखादें निराळें डबकें करून फिरत बसलात. एकाद्या कार्यक्रमावर एकत्र येऊनच ते प्रश्न सुटतील. मागे बृहन्महाराष्ट्र एकीकरण चळवळीस संदेश पाठवतांना बाबासाहेब म्हणाले ‘उद्यां बृहन्महाराष्ट्रांतील प्रश्न समाजवादाने सुटतील.’ ही खरी दृष्टी. परंतु समाजवाद म्हणजेहि आज डबक्यांतील समाजवाद मानला जात आहे. हा म्हणे ब्राह्मणी समाजवाद, हा बहुजनसमाजवाद, तसा का एखादा दलित समाजवाद आहे? समाजवाद जातिव्यक्तीपलीकडे पाहतो. काही कार्यक्रमावर, सिद्धान्तावर तो अधिष्ठित असतो. परंतु आम्ही अजून आडनांवे, जाती/ यांच्यापलीकडे जायला तयारहि नाही. ही मोठी दुःखद घटना आहे. 

प्रश्न - तुम्ही कम्युनिस्ट होतात. आतां समाजवादी आहांत ना? 

- मी कधीहि कम्युनिस्ट पक्षांत नव्हतो. समाजवादी पक्षांतहि नव्हतो. मी माझ्या वृत्तीप्रमाणे जात असतो. स्वतंत्र बुद्धी मला आहे. 

प्रश्न - मंदिर-प्रवेशाऐवजीं पोटापाण्याचे प्रश्न गुरुजी कां हाती घेत नाही? ‘आधी पोटोबा मग विठोबा’ असे कोणी म्हणतात. 

- मी या प्रश्नांना कोठवर उत्तर देणार? उद्यां स्वराज्यांत सर्वांचे आर्थिक प्रश्न सुटतील. सर्वांना जमीन मिळेल किंवा ती सामुदायिक सहकारी पद्धतीने केली जाईल. त्या वेळेस हरिजनांचा आर्थिक प्रश्न सुटेल, कामगारांची आर्थिक स्थिती सुधारेल. परंतु अस्पृश्य शिकून आले, आर्थिक स्थितीने बरे असले, तरीहि स्पृश्य त्यांना दूरच ठेवतात. शिकलेल्या हरिजनांसहि कोणी भाड्याने खोली देत नाही. श्रीमंत हरिजनांसहि दूरच ठेवतात. आमच्या डोक्यांतील  खोट्या धर्मकल्पना नष्ट झाल्याशिवाय ही अस्पृश्यता जाणार नाही. केवळ राजकीय हक्क, आर्थिक सुस्थिती, शिक्षण एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही. दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी सुशिक्षित असोत; आर्थिक दृष्ट्या बरे असोत, तरी तेथील गोरे लोक आम्हाला दूर ठेवतात. याचा आपणांस संताप नाहीं का येत? तुम्ही आफ्रिकेतील हिंदी लोकांना म्हणाल की, तुमची आर्थिक स्थिती बरी आहे, कशाला झगडता? ते म्हणतील, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे, माणुसकीचा आहे. शेवटी मनुष्य केवळ दिडक्यावर जगत नाहीं. त्याला मन आहे. हृदय आहे. आत्मा आहे, स्वाभिमान आहे, प्रतिष्ठा आहे. म्हणून केवळ आर्थिक- स्थिती सुधारूनहि हा प्रश्न सुटणार नाही. आमच्यांतील उच्चनीचपणाच्या भ्रामक कल्पनाच नष्ट व्हायला हव्यात, तरच हा प्रश्न धसास लागेल. निदान मी तरी या निर्णयावर आलों आहे. आणि कोणा कोणाचें शेवटीं समाधान करणार? ज्याने त्याने आपल्या वृत्तिपप्रवृत्तीनुसार झगडावें. माझ्या अंत:करणाला साक्षी ठेवून मी जात आहे. 

प्रश्न - तुम्ही ठाण्याच्या व्याख्यानांत प्रि. सोनोपंत दांडेकरांवर हल्ला चढवलात हें खरें का?

 - प्रि. सोनोपंत दांडेकर यांना एकदा हृदय पिळवटून मी पत्र लिहिलें होते. मी त्यांच्यापासून उदार मानवतेची अपेक्षा नको करून तर कोणापासून? तर मला कळले की, ते ‘‘देवासमोर एक दांडकें बांधून तेथपर्यंतच सर्वांनी जावें’’ असें म्हणत आहेत. मला वाईट वाटले. शेवटी अढी ठेवूनच हें देणें. आजपर्यंतचा स्पृश्य वारकऱ्यांचा, स्पृश्य लोकांचा आनंदही गमवायचा. श्री. दांडेकरांविषयी मला आदर आहे. मी व्याख्यानांत म्हटले, ‘हा का शेवटीं वेदान्त? हा सारा फाल्तु पसारा आहे, चावटपणा आहे.’ मी चावटपणा शब्द वापरला, माझी चूक. परंतु मी मनुष्यच आहे. सोनोपंत दांडेकरांचा अपमान केलात, अशी मला पत्रे आली. परंतु बाबांनो सात कोटी बंधुच्या आत्म्यांचा अपमान मात्र तुम्हांला दिसत नाही. शेवटी केवळ वैराग्य, विद्वत्ताहि निरुपयोगी आहेत. त्याबरोबरच प्रेमळताहि हवी. म्हणून उपनिषदांत म्हटले आहे ते ‘‘तत्र ब्राह्मणा: संमर्शिन:.... अलूक्षाः’’ नुसते जे रुक्ष नाहींत, ज्यांची अंतःकरणें व्यापक सहानुभूतीने भरलेली आहेत -असे लोकच शेवटी मानवतेचे उपासक होतील- खरा धर्म देतील. 

प्रश्न - तुमच्याजवळ का हे सारे गुण आहेत? 

- मी धडपडणारा प्राणी आहे. वासना विकारांचा गोळा आहे. परंतु माझ्या सर्व धडपडींत सर्वांना जवळ घ्यावें ही एक तहान आहे. या एका किरणामुळे मी अंधारांत धडपडत असतो. मी लहान मनुष्य आहे, परंतु कोठल्या तरी सत्कर्मांत हें माझें मडके फुटावें हीच एक मला असोशी आहे. या माझ्या वेड्यावाकड्या धडपडीतून मी उपवास करायला उभा आहे. कोणी वंदो कोणी निंदो, मला माझ्या श्रद्धेप्रमाणे जाऊं दे. महाराष्ट्रांत गेले साडेतीन महिने मी हिंडत आहे. कठोर शब्द तोंडून गेले असतील. सर्वांजवळ मी क्षमा मागतो. 

शेवटची विनवणी 
संतजनी परिसावी 
विसर तो न पडावा 
माझा देवा तुम्हासी 
आतां पार सांगू काय 
अवघें चरणांसी विदित 
तुका म्हणे पडतों पाया 
करा छाया कृपेची । 

अधिक मी काय सांगू? मला चर्चा करता येत नाही. प्रश्नांना तयार उत्तरें देता येत नाहीत. वकिली वृत्ति माझ्याजवळ नाही. मी चर्चा करणारा नसून मानवाची अर्चा करूं पाहणारा आहें. हें देवाचें मानतो. कोठे तरी शेवटी अर्पावें हाच एक मला ध्यास आहे. त्या त्या वेळेस जो प्रश्न मी हाती घेतों तदर्थ सर्वस्व द्यायला मी निघतो. परंतु मित्र रोखतात. आजहि एका गोष्टीसाठी मी प्राण हातीं घेऊन उभा आहे. मित्रांनी सहा महिने रोखले. ती मुदत संपली. आतां मला जाऊं दे. 

धीर माझ्या मना 
नाहीं आतां नारायणा 
हेच चरण माझ्या मनांत घोळत असतात. 

(पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी 1 ते 10 मे 1947 या काळात उपोषण केले होते, त्यावेळी आचार्य अत्रे संपादक असलेल्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने 4 मे 1947 रोजी अंक विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला होता. त्या अंकात प्रसिद्ध झालेली ही मुलाखत आहे. त्या लढ्याला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून ही मुलाखत येथे पुनर्मुद्रित केली आहे.)   

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके