डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

आचार्य अत्रे यांनी 'साने गुरुजी म्हणजे बालविकासी कमळ होय!' असे म्हटले आहे. पू.साने गुरुजींनी मुलामुलींसाठी उदंड लिहिले आहे. पुष्कळ पुष्कळ सांगितले आहे. त्यांच्या रसाळ व उद्बोधक दृष्टींनी महाराष्ट्रातील हजारो मुलांची जीवने संस्कारित झाली. गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या वर्षातील त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्याच साहित्यामधून निवडलेल्या या सात गोष्टी म्हणजे कथासप्तमीच! सत्यनिष्ठा, आत्मत्याग, भक्ती, श्रद्धा, प्रेम आदी सद्गुणांचे दर्शन या कथासप्तमीतून सहजच घडेल आणि मनोरंजनाबरोबरच बालमित्रांचे उद्बोधनही होईल.

राजा मंगळवेढेकर
 

1. व्याधाची गोष्ट

एका पारध्याच्या जाळ्यात एक मृग सापडला. तो पारधी त्याला मारणार इतक्यात तो मृग त्याला म्हणाला, "मी माझ्या मुलाबाळांना व पत्नीला भेटून येतो. मग मला मार." पारधी हसून म्हणाला, "माझ्या हातून सुटल्यावर परत कशाला येशील?" मृग म्हणाला, "मी सत्यनिष्ठ आहे. माझी परीक्षा पहा." व्याध बरे म्हणाला आणि तो मृग घरी गेला. पाडसे वाट पाहत होती. मृगी वाट पाहत होती. त्याने विलंबाचे कारण सांगितले नि मग तो

म्हणाला, "आता मी जातो. तुम्हीही सत्याने रहा!" 

मृगी म्हणाली, "तुमच्या पाठीमागे मी कशाला राहू? मीही येते !" 

मुले म्हणाली, "आम्हीही येतो.’’ 

ती सारी मृगमंडळी व्याधाकडे आली. "मला मार." मृग म्हणाला. 

‘‘मला मार.’’ मृगी म्हणाली. 

"आईबापांना वाचव. आम्हांला मार.’’ मृगशावके म्हणाली. 

व्याध विरघळला. ती सत्यनिष्ठा नि ते कौटुंबिक प्रेम पाहून व्याधाच्या जीवनात क्रांती झाली. त्याने मृगास सोडून दिले. सत्यनिष्ठेसाठी ती हरणे आकाशात तारारूप झाली. व्याधही तेजोरूपाने तेथे शोभत आहे.

--

2. प्रेमाचे सामर्थ्य

मुसलमानी धर्मात खरे बळ कोणते याबद्दल एक संवाद आहे. देवदूत व प्रभू यांचा तो संवाद आहे.

देवदूत : प्रभो! लोखंडाहून बलवान काय आहे?

प्रभू : अग्नी. कारण अग्नी लोखंडाचा रस करून टाकितो.

देवदूत : अग्नीहून प्रबळ काय? 

प्रभू : पाणी. ते त्याला विझविते. 

देवदूत : पाण्याहून बलवान काय?

प्रभू : वारा. कारण वारा पाण्याला नाचवतो, हलवतो, त्याच्यावर तरंग उत्पन्न करतो.

देवदूत : वाऱ्याहून प्रबळ काय?

प्रभू: पर्वत. पर्वत वाऱ्यांना अडवितात. 

देवदूत : पर्वताहून प्रबळ काय? 

प्रभू : प्राणिमात्रांवर प्रेम करणारे थोर हृदय.

पर्वतालाही पाझर फोडणारे जे हे दिव्य प्रेम. तेच खरे सामर्थ्य होय. तेच खरे बळ होय. त्याला भीती नसते. कारण तेथे स्वार्थ नसतो.

--

3. चंद्रावरचा ससा 

एकदा परमेश्वराने अतिथीचा वेश घेतला, तो पृथ्वीवर आला नि निरनिराळ्या प्राण्यांची सत्त्वपरीक्षा घेऊ लागला. त्याला एक कोल्हा भेटला. "मला भूक लागली आहे, काय देतोस?" असे त्या अतिथीने कोल्ह्याला विचारले. कोल्हा म्हणाला, “मी तुला काय देऊ? नुकतीच काही कोंबडी मी मारली आहेत. तुला देऊ?" 

देव म्हणाला, "नको. मी जातो." पुढे बगळा भेटला. "बगळोबा, काय देतोस मला खायला? तू तर ध्यानस्थ मुनी. कोणाची हिंसा करीत नसशील. मला योग्य आहार तू दे." बगळा म्हणाला, "माझ्याजवळ भरपूर मासे आहेत. ते चालतील?" देव म्हणाला, "नको नको. मी जातो.’’ वाटेत भेटला वानर. "वानरा, वानरा, मला काही खायला देतोस?" असे देवाने विचारले. 

वानर म्हणाला, “काय देऊ? आंबे, पेरू देऊ? कोणती फळे देऊ?" 

देव म्हणाला, "फळेही नकोत. मी जातो. 

पुढे ससा भेटला. ‘‘सशा, सशा, खायला देतोस?" देवाने विचारले. 

ससा म्हणाला, “काय देऊ? माझे असे जगात काय आहे ? माझे हे शरीर घेतोस? नाजूक साजूक आहे. आगीत घाल आणि मग खा.’’ 

देव म्हणाला, "बरे तर, टाक या आगीत.’’ 

सशाने आगीत उडी टाकली. परंतु तो जळेना, भाजेना. अमृतात असल्याप्रमाणे त्याला वाटले. देव म्हणाला, "सशा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. सर्व जगाला तू दिसशील अशा रीतीने तुझे मी चित्र काढतो. चंद्रावर तुझे चित्र काढतो. आणि देवाने पर्वताचे एक टोक पिळून त्याची न पुसणारी शाई तयार केली. आणि दुसरे एक पर्वताचे टोक घेऊन त्याची लेखणी केली. मग त्या लेखणीने आणि त्या शाईने चंद्राच्या फलकावर सशाचे चित्र देवाने रेखाटले.

--

4. सुधन्वा

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला. अर्जुन अश्वमेधाचा घोडा घेऊन दिग्विजयाला निघाला. हंसध्वज राजाच्या राज्यात तो आला. हंसध्वजाने तो घोडा धरला. युद्ध सुरू झाले, जे जे तरुण आहेत त्या सर्वांनी उद्या सूर्योदयाबरोबर युद्धासाठी बाहेर पडावे अशी दवंडी देण्यात आली. हंसध्वजाचे दोन मुलगे. सुरथ नि सुधन्वा अशी त्यांची नावे. सुधन्वा युद्धासाठी जायला निघतो, परंतु त्याची प्रिय पत्नी म्हणते, ‘‘आजचा दिवस थांबा, उद्या जा." शेवटी तो घरी राहतो.

दुसऱ्या दिवशी तो जातो. राजाचे शंख आणि लिखित या नावाचे दोन पुरोहित असतात. ते राजाला म्हणतात. “जो दवंडीप्रमाणे येणार नाही, त्याला तापलेल्या तेलात टाकण्यात येईल असे आपण घोषविले होते. तुझा मुलगा काल आला नाही. एक दिवस घरी राहिला. न्याय निष्पक्षपाती हवा. तुझ्या मुलाला ही शिक्षा व्हायला हवी." हंसध्वज राजाचे डोळे भरून आले. परंतु प्रजेने नावे ठेवू नयेत व सर्वांना समान न्याय असावा म्हणून आपल्या मुलाला तो शिक्षा देतो.

कढईत तेल सळसळत असते. सुधन्वा त्यात टाकला जातो. पण तो देवाचा परम भक्त. त्याला ते तप्त तेल थंडगार वाटते. सरोवरात कमल हसावे त्याप्रमाणे त्याचे मुखकमल हसत असते. तेल नीट तापले नसावे असे शंख व लिखित यांना वाटते. ते चुल्यात मोठी घाकडे घालतात. तेल तापले की नाही बघायला एक जण त्यात नारळ टाकतो. तो त्या नारळाचे ताडकन दोन तुकडे होऊन एक शंखाच्या कपाळात व दुसरा लिखिताच्या कपाळात बसतो. तेल तर तापलेले आहे. हा देवाचा परम भक्त आहे असे सर्वांच्या ध्यानात येते. त्याला बाहेर काढतात. सुधन्वा मग अर्जुनाशी लढतो. 'जैमिनी अश्वमेध' म्हणून मराठीत ओवीबद्ध आहे. अश्वमेधाच्या या युद्धाच्या कथा त्यात आहेत.

--

5. श्रद्धा

एका गावात रोज कीर्तन असे. एक मनुष्य रोज जाई. परंतु कीर्तनास बसला असता त्याच्या मनात 'घरी चोर तर नाही येणार? उद्या भाव काय असेल?’ वगैरे विचार यायचे. दुसरा एक मनुष्य होता, तो जाऊ शकत नसे कथेला. परंतु त्याच्या मनात सारखे - आता कीर्तन रंगात आले असेल... आता भजन चालले असेल, देवाची मूर्ती किती सुंदर असेल... वगैरे यायचे. पुढे दोघे कर्मधर्मसंयोगाने एकदम मेले.

एकाला विष्णूचे विमान न्यायता आले, एकाला यमाचे आले. तेव्हा कीर्तनाला रोज जाणारा म्हणाला, ‘‘देवाघरी न्याय नाही. मी रोज कीर्तनाला जात असे, परंतु मला यमाचे दूत नेणार. आणि तो मनुष्य कधी कीर्तनास गेला नाही, परंतु त्याला वैकुंठास नेणार!" विष्णूचे दूत म्हणाले, "तू कीर्तनास जात असस, परंतु लक्ष घराकडे, बाजारभावाकडे असे. हा घरी असे, परंतु लक्ष असे कीर्तनाकडे, देवाकडे." शेवटी बाह्य क्रियेला महत्त्व नाही. तुमच्या अंतःकरणातील वृत्तीला महत्त्व आहे. मनातील जिव्हाळ्यामुळे कार्यात प्राण येतो.

--

6. देणगी

भगवान बुद्ध नगराबाहेर वनराजीत उतरले होते. त्यांचा शिष्य नगरात "भगवान बुद्धांना द्यायला योग्य अशी देणगी द्या." असे म्हणत जात होता. ते पहा मोठमोठे शेठसावकार घनाने भरलेली ताटे आणीत आहेत. परंतु तो शिष्य म्हणतो, "नको. मला निराळी देणगी हवी. ही योग्य नाही." त्या शिष्याला कोणत्या प्रकारची देणगी हवी होती? त्याला त्या मोठ्या नगरात गुरूला द्यायला योग्य अशी देणगी मिळाली नाही. तो रिक्त हस्ताने जात असतो. त्याची पावले वनाकडे वळतात. इतक्यांत एका वृक्षाआडून पुढील शब्द कानांवर येतात, "ही माझी देणगी घ्या. मजजवळ माझ्या नेसूंच्या वस्त्राशिवाय दुसरे काही नाही. ते वस्त्र मी देत आहे. ते घ्या."

त्या व्यक्तीने वस्त्राची घडी त्या शिष्याकडे फेकली. तो शिष्य म्हणाला, "मी कृतार्थ झालो. गुरुला द्यायला ही योग्य अशी देणगी आहे." ती चिंधी धनवंतांनी देऊ केलेल्या माणीकमोत्यांच्या राशीहून का अधिक मोलाची होती? होय. त्या चिंधीची किंमत कोण करील? धनवंतांनी ताटे भरून धन आणिले. त्यांच्या संपत्तीतीत तो कचरा होता. परंतु त्या अभागिनीने शेवटची जवळची चिंधीही दिली होती! खरे प्रेम सर्वस्व द्यायला तहानलेले असते व शेवटी प्राणही समर्पित.

--

7. भाकर

भगवान बुद्ध एकदा एका मोठ्या शेतकऱ्याच्या अंगणात हातात भिक्षापात्र घेऊन उभे होते. धान्याची मळणी चालली होती. सोन्यासारखे धान्य तेथे पडलेले होते. तो शेतकरी बुद्धांना म्हणाला, "अशी भीक मागू नये. अशी शेती करावी म्हणजे सोन्यासारखे धान्य मिळते." बुद्धदेव म्हणाले, "मीही गड्‌या शेतकरीच आहे." तो शेतकरी हसून म्हणाला, "मग भीक का मागतोस? कोठे आहे तुझे शेत, कोठे आहेत बैल, कोठे आहे तुझे पीक?" भगवान बुद्ध म्हणाले. "माझे जीवन म्हणजे माझे शेत, या शेतातील क्षुद्र वासनाविकारांचे विषारी गवत मी उपटून टाकले आहे. विवेकाने ही भूमी नांगरली, संयमाचे कुंपण घातले, प्रेम, सत्य, अहिंसा, परोपकार, सेवा यांचे पीक मी काढीत असतो व ते सर्वांना वाटीत असतो!" बुद्धदेवांनी दिलेली भाकर अजूनही जगाला पुरत आहे व पुढेही पुरेल.

--

एक सुंदर पत्र 

साने गुरुजींनी अगणित पत्रे लिहिली. त्यांच्या साहित्यातील बराच मोठा भाग पत्रांनी व्यापलेला आहे. त्यांची 'श्यामची पत्रे' आणि ‘सुंदर पत्रे’ प्रसिद्धच आहेत. गोष्टीच्या कार्यक्रमानंतर बालमित्र त्यांच्याभोवती गराडा घालून ज्या वेळी त्यांना स्वाक्षरी मागत असत, त्या वेळी गुरुजी त्यांना म्हणत असत, "तुम्ही मला पत्र लिहा म्हणजे मी तुम्हांला उत्तर लिहीन. त्यात माझी खाती सही असेल." आणि खरोखरीच गुरुजींनी अशा आपल्या बालमित्रांना शेकडोंनी पत्रे लिहिली. स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनाही कितीतरी पत्र लिहिली.

पत्रलेखन हा एक अनौपचारिक लेखनप्रकार आहे. मोकळा ढाकळा आहे. गुरुजींच्या स्वभावाला मानवणारा होता, असेच एक पत्र येथे दिले आहे.

जयहिंद!
शारदाश्रम, बोर्डी

--

चि. प्रिय शशीस,
सप्रेम आशीर्वाद.

तुझे पत्र नि सुंदर चित्र दोन्हींमुळे आनंद झाला, मी मुंबईस आलो नि लगेच इकडे आलो. माझी वैनी बोर्डीस एकाकी फार आजारी पडली. भावाचे ताबडतोब येण्याविषयी पत्र होते. वैनी बरी झाली तो भावास ताप येऊ लागला. पाचसहा दिवस ताप आला. आता त्याचा ताप थांबला आहे. मी दोन तारखेच्या सुमारास मुंबईस येणार आहे. तुम्ही तेव्हा मुंबईसच असाल का? मुंबईस म्हणजे खारला. का कोठे पुण्याला वा कोकणात जाणार आहांत, ते कळव. मी गोष्टींचे पुस्तक घेऊन येईन, आणखी काय आणू ? मी मध्यंतरी पुण्यास होतो. तेथे नखांनी चित्रे काढणाऱ्या एका थोर माणसाची चित्रे पहायला गेलो. किती सुंदर होती ती चित्रे. मी त्यांचा निरोप घेऊन परत निघालो तेव्हा त्यांनी पाच मिनिटांत मला एक नखांनी काढलेले चित्र दिले. त्यांनी त्यावर इंग्रजीत माझे नाव पी.एस.एस.असे घातले. ते चित्र आणि झेंडा तुला पाठवीत आहे. येथे आता थंडी पडते. दिवसा मात्र ऊन. रात्री कोल्हे जवळ येऊन ओरडतात.

मला लहानपणची कोकणातील आठवण येते. कोकणात आमच्या अंगणातसुद्धा कोल्हे यायचे. शशी, तुला पाहून अडीच वर्षे झाली. तू आता मोठी झाली असशील, पुण्यास शशी फडणीस म्हणून असाच एक लहान मुलगा आहे. पाच वर्षांचा. त्यालाही माझा असाच लळा लागला आहे. तो जवाहरलालजींचा वेडा आहे. त्याने चित्रांचा संग्रह केला आहे. 14 नोव्हेंबरला वाढदिवस. त्या दिवशी हा पुण्याचा शशी घरात किल्ला मांडणार आहे. किल्ल्याला ‘लाल किल्ला’ नाव देणार आहे. वर तिरंगा झेंडा लावणार आहे. मी पुण्याहून येण्याच्या आदल्या दिवशी त्याच्याकडे जेवायला गेलो होतो. परवा दसऱ्याला त्याला पत्र लिहिले. त्यात त्याच्यावर दोन श्लोक करून त्याला पाठविले होते. तुझ्यावर कविता करू?

‘‘शशी मुलगी आहे छान 

गोष्ट म्हणजे तिचा प्राण 

तिला गोष्ट सांगेन छान 

शशी ऐकेल देऊन कान 

गोष्ट माझी संपेल नि शशी बाळ झोपेल’’ 

तुला अशा कविता आवडतात का? मी मुलांसाठी कविता करणार आहे. कशा त्या सांगू? ऐक.. 

‘‘एक होता बाळ, 

बाळ त्याचे रुंद कपाळ, कपाळ 

कपाळावर नीट, तीट 

आई लावी नीट, नीट 

पडू नये दृष्ट दृष्ट 

पुसून टाकी तीट, तीट. 

म्हणून आई लावी तीट 

बाळ होता धीट धीट.’’ 

पुरे आता. तू हसशील. मला दुसरे काम आहे. कागदही संपत आला. माझ्या खोलीतून समुद्र दिसत आहे. आज मोठी भरती येत आहे. तुला लाटा आवडतात का? माझ्या बहिणीच्या मुली लहानपणी लाटांना भीत. मी त्यांना धरून समुद्रात न्यायचा. तू भित्री नको होऊ. अंधारातूनसुद्धा एकटी जायला शीक. स्वतंत्र हिंदुस्थानात कोणी भित्रे नको. खरे ना? तुझ्या वडिलांना, आईला सप्रेम प्रणाम, तू वडिलांना काय म्हणतेस? सर्वांनाच प्रणाम व आशीर्वाद.

तुझे, 
साने गुरुजी

----------

साने गुरुजी यांना कविचे हृदय लाभले होते. त्यांनी बरीच भावमधुर आणि चैतन्यदायी अशी कविता-गीते लिहिली. 'पत्री' या नावाने ती एका काव्यसंग्रहात संग्रहित केली आहेत. गुरुजींनी काही बालगीतेही लिहिली होती. त्यांपैकीच त्यांचे एक मजेशीर बालगीत येथे दिले आहे.

पाण्याचा बंब

अगडबंब! दोंदिलपोट्या हा बंब।

गरम घालतो आतून बंडी बाहेरिल ना लागे थंडी

थंड जळाला उकळी फोडी, न विलंब।

दोंदिलपोट्या हा बंब॥

खाई निखारे हा रसरशीत

घटघट वरूनी पाणी पीत 

कढत अशी मग धार सोडित, हा शुंभ।। 

दोंदिलपोट्या हा बंब।।

सारे काही याला पचते

तक्रार कधी याची नसते

राखी थोड्‌या राखेते, जणु शिवसांब।। 

दोंदिलपोट्या हा बंब॥

जरि तापट हा कधी न रागवे

गरम तयाचे पाणी प्यावे

थंड तयाला आपण द्यावे, शिर-लंब।

दोंदिलपोट्या हा बंब।।

Tags: बालगीत सुंदर पत्रे कथासप्तमी साने गुरुजी स्मृतिदिन साहित्य विशेष baalgeet sundar patre seven stories sane guruji memorial day literature special weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

साने गुरुजी ( 118 लेख )

(जन्म : 24 डिसेंबर 1899 - 11 जून 1950)

एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके