डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

महाराष्ट्राला शेवटची हाक!

पूज्य विनोबाजींनी विचारलें, हरिजनांसाठी काय केलेत, हिशोब द्या. आम्ही कोणता हिशोब देणार? आणि आमचे ऐकणार तरी कोण? महात्माजींच्या उपवासानेंही आम्हीं उठलों नाही. तेथे आम्हां लुंग्यासुंग्यांचे कोण ऐकणार? आपण उपवास करून मरावें असें मनांत आले. इंग्रजांची गुलामगिरी जावी म्हणून आपण मरतो. मग आपल्याच भावांनी आपल्याच भावांवर लादलेली गुलामगिरी दूर करण्यासाठी कां मरूं नये?

बंधूंनो, स्वराज्यात ज्याप्रमाणे शेतकरी, कामकरी सुखी व्हावेत असे आपण म्हणतो त्याचप्रमाणें अस्पृश्यही सुखी व्हायला हवेत. त्यांना इतरांप्रमाणे जमीन मिळेल. कारखान्यांत स्वाभिमानपूर्वक काम करता येईल. परंतु त्यांना शेतीवाडी मिळाली, काम मिळालें, एवढ्यांनेच सारें होईल असें नाहीं. अस्पृश्य बंधु विचारतात, ‘स्वराज्यांत आमची स्थिति कशी राहील तें सांगा.’ तुम्ही त्यांना काय सांगणार? 1942 मध्यें ‘चले जाव’चा लढा सुरू झाला होता. त्यावेळेस मुंबईस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भाषण झाले होते. त्या भाषणांत ते म्हणाले, कॉँग्रेसचे पुढारी ब्रिटिशांना युद्धहेतु विचारीत असतात. मीहि ‘चले जाव’च्या काँग्रेसच्या लढाईचे युद्धहेतु विचारित आहे. जें स्वराज्य तुम्ही आणणार त्यांत पांचसहा कोटी दलित जनता अशीच माणुसकीस पारखी रहाणार ना? कोणाचे स्वराज्य तुम्ही आणूं पाहतां? असे त्यांनी विचारले होते. ब्रिटिशांनी हिंदुस्थानला युद्धाच्या खाईत ओढले. काँग्रेसने सांगितले, ‘हे युद्ध लोकशाहीसाठी असेल, तर या देशाला लोकशाही कां देत नाही? हें युद्ध स्वातंत्र्यासाठी असेल तर आम्हांला स्वातंत्र्य कां देत नाही?’’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला तोच प्रश्न विचारतात. इंग्रजांकडून स्वराज्य घेऊ तेव्हां घेऊ. संपूर्ण सत्ता हाती आल्यावर सर्वांना जमीन वाटून देऊं तेव्हां देऊं. परंतु जें स्वराज्य आपल्या कोट्यावधि बंधुंना आपण या क्षणी देऊ शकतो, ते आपण कां देत नाहीं? स्वातंत्र्य दोन प्रकारचे आहे. आर्थिक नि सामाजिक. आर्थिक स्वातंत्र्य सोळा आणे सत्ता हाती आल्यावर आपण निर्मू शकू. परंतु सामाजिक स्वातंत्र्य या घटकेला आपण सर्वांना देऊ शकतो. ते देण्याच्या आड कांही ब्रिटिश येत नाहीत. तुमच्या विहिरीवर हरिजनांनी पाणी भरलें तर गोरा कलेक्टर किंवा गोरा गव्हर्नर कां आड येत आहे? हे सामाजिक स्वातंत्र्य आपणच अडवून ठेवले आहे. मनाचा मोठेपणा असता तर एका क्षणांत तें आपण दिले असते. गेल्या शतकांत ही अस्पृश्यता जावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतीबा फुले यांनी प्रथम पुण्याला आपल्या हौदावर हरिजनांना पाणी भरू दिले. त्यांनी त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्यांनी निंदा, अपमान, बहिष्कार सारें सहन केले. 

‘‘तरिच संत व्हावें । जग-बोलणें सोसावें.’’ 

हे मुक्ताबाईचे थोर चरण त्यांना माहित होते. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी छात्रालये काढून खूप खटपट केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनीं अनेक हरिजनांना उच्च शिक्षण दिले, विलायतेत पाठविले. प्रा. माटे यांनी धडपड केली. हिंदुस्थानभर आर्यसमाजाचे प्रयत्नहि चालू होते, चालू आहेत. परंतु अस्पृश्यता जाईना. लाखों खेड्यापाड्यातून ती अजून तशीच आहे. 

महात्माजींचे तें अग्नीदिव्य! 

आणि शेवटी 1932 मध्ये महात्माजींनी उपवास केला. स्पृश्य हिंदु समाजापासून अस्पृश्य समाजास कायमचें पारखें करण्याचा इंग्रजी डाव होता. महात्माजींना वेदना झाल्या. ते म्हणाले, हिंदु धर्मावर हा कायमचा कलंक राहील. हिंदु धर्माने  आपल्या अनुदारपणामुळे आपल्या कोट्यावधी बंधूना एका क्षणांत दूर केलें असें इतिहास सदैव सांगत राहील. आम्ही अस्पृश्यता लौकर घालवू. तुम्ही अस्पृश्यबंधूंना कायमचे दूर करूं नका. नाहीतर मी उपवास करीन. ब्रिटिश ऐकेनात महात्माजींचे अग्नीदिव्य सुरू झाले. शेवटीं पुणे करार झाला, महात्माजींनी करारानंतर पुन्हां एकवीस दिवस उपवास केला. ते म्हणाले, हरिजनांच्या सेवेसाठी लाखों रुपये लोक देतील. परंतु माझ्या उपवासाने मी अध्यात्मिक भांडवल देत आहे. तुमची, आमची सर्वांची हृदयें या कामांत रंगावीं अशी महात्माजींस उत्कट इच्छा होती. दहा वर्षांत ही अस्पृश्यता जाईल अशी त्यांना आशा होती. परंतु दहाची पंधरा वर्षे झाली आपणांस काय दिसत आहे? किती मंदिरे उघडली? किती विहिरी मोकळ्या झाल्या? हॉटेलें, खाणावळी यांतून मोकळेपणाने त्यांना जातां येते का? भाड्याने रहावयास घर मिळतें कां? कोणते उत्तर द्याल? आज बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुणे करार रद्द करा. तुम्हाला राग येतो. त्यांनी चर्चिलला तार केली तर तुम्हांला गुस्सा येतो. परंतु त्याचें प्रेम मिळावें म्हणून तुम्ही काय केले आहे? 1931 मध्ये वर्तुलाकार परिषदेच्या वेळेस महात्माजी म्हणाले, डॉक्टर आंबेडकरना माझ्यावर थुंकण्याचा हक्क आहे. कारण हिंदुंची पापें माझ्याहि शिरावर आहेत. आज पुन्हां त्यांना आपण असंच म्हणायला लावणार कां? डॉ.आंबेडकर गांधीजींना जर म्हणाले. चला लाखों खेड्यापाड्यांतून आणि दाखवा शिवाशिवी गेली कां तें. गांधीजी काय म्हणतील? त्यांना आशा होती की, स्वातंत्र्योन्मुख हिन्दी राष्ट्र अस्पृश्यता झपाट्याने दूर करील. परंतु आपण उदासीन राहिलों. महात्माजी म्हणजे या राष्ट्राचे तात. घटनासमितीच्या वेळेस बोलतांना जवाहरलालजी म्हणाले. आज महात्माजी कोठे आहेत? कोठे आहे तो राष्ट्राचा पिता? दूर नौखालींत. अनवाणी अविश्रांत ते काम करीत आहेत.’’ बंधूनों, जवाहरलालजींनी गांधीजींना तात म्हणून संबोधिलें आणि शून्यांतून विश्व निर्माण करणारे, तुम्ही रक्त द्या मी तुम्हांला स्वातंत्र्य देतो, अशी दिव्य वाणी बोलणारे, चलो दिल्ली, जयहिंद हा नवमंत्र देणारे ते नेताजी सुभाषचंद्र काय म्हणाले माहित आहे? आझाद हिंद सैन्याची निर्मिती करून नेताजी म्हणाले, महात्माजी, तुम्ही राष्ट्राचे तात आहात, आशिर्वाद पाठवा. अशा या राष्ट्रपित्याची मान तुमच्याआमच्या उदासीनतेने खाली व्हावी असें तुम्हांस वाटतें कां? कशाला आपण महात्मा गांधीजी की जय म्हणावें? आपण सारे कामचुकार ठरलो. 

स्नेहलता नाहीं का मेली? 

पूज्य विनोबाजींनी विचारलें, हरिजनांसाठी काय केलेत, हिशोब द्या. आम्ही कोणता हिशोब देणार? आणि आमचे ऐकणार तरी कोण? महात्माजींच्या उपवासानेंही आम्हीं उठलों नाही. तेथे आम्हां लुंग्यासुंग्यांचे कोण ऐकणार? आपण उपवास करून मरावें असें मनांत आले. इंग्रजांची गुलामगिरी जावी म्हणून आपण मरतो. मग आपल्याच भावांनी आपल्याच भावांवर लादलेली गुलामगिरी दूर करण्यासाठी कां मरूं नये? तीस वर्षांपूर्वी हुंड्याची चाल रद्द व्हावी म्हणून स्नेहलता नावाच्या एका बंगाली तरुणीनें अंगावर रॉकेल ओतून बलिदान केले. एकेक दुष्ट रूढी नष्ट व्हावी म्हणून कांहींनी मरावें असं मला वाटते. जुने गंजलेलें कुलुप उघडत नसेल तर आंत तेल घालतात. त्याप्रमाणे आपली गंजलेली हृदये उघडावी म्हणून काहींनी प्रचाराचा पाऊस पाडावा. कांहीनी मरावें. आगाखान राजवाड्यांत बंदींत असतांना 1943च्या फेब्रुवारी महिन्यांत महात्माजींचा उपवास सुरू होता. त्या उपवासांतील त्यांचे शब्द तुम्हाला माहीत आहेत? माझ्या कानावर आले होते. महात्माजी म्हणाले, बाहेर लढा थांबला. लोकांना काही करता येत नसेल तर त्यांनी मरावें-ब्रिटिश सत्तेचा वीट आला असेल तर व्हाइसरॉयच्या बंगल्यासमोर जाऊन डोकी फोडून त्यांनी प्राण द्यावे. पण गुलाम राहू नये. हाराकिरी भ्याडाची नसून शूरांची असते हे जपान्यांनी जगास दाखविले आहे. असे ते तळमळीचे उद्गार होते.

पूज्य विनोबाजींना हे उद्गार लिहून मी कळविले की, अस्पृश्यतेची गुलामगिरी नष्ट करायला मला परवानगी द्या. आठ महिन्यापूर्वी मी त्यांना विचारले. त्यांनी धीर धरायला सांगितले. कोठवर धीर धरायचा? कार्तिकी एकादशी जवळ येत होती. दिल्लीला हरिजन पुढारी जोगेन्द्र मंडळ म्हणाले, आम्ही हिंदुधर्म सोडून जाऊं. लीग पुढारी म्हणाले, सारे आमच्या धर्मात या!’ हिंदु धर्माची ही विटंबना मला सहन होईना. परंतु स्पृश्य हिंदूंच्या अनुदारपणामुळे ही विटंबना होत होती, आपण प्राण फेकावें असें मनांत आले. इतक्यांत खानदेशचे एक थोर कार्यकर्ते श्री.सीतारामभाऊ चौधरी हिमालयाची पायी यात्रा करून पंढरपूरचे मंदिर उघडावे म्हणून तेथे खटपटीस गेले होते. त्यांनी मला लिहिले, तुम्ही आलात तर मला हिंमत चढेल. बळ वाढेल. या! मी मनांत म्हटलें, माझ्याजवळ कोणतें बळ? मी का बडवे मंडळीजवळ शास्त्रार्थ करीत बसू? देवाजवळ सारी लेकरें जाणं ही का चर्चेची वस्तु? आपले प्राण हातांत घेऊन उभे राहावें  एवढेंच आपले बळ. आणि मी उपवास सुरू केला. परंतु महर्षि सेनापति, भाई अच्युतराव, शिरूभाऊ लिमये, एस. एम. जोशी, मधु लिमये या सर्वांनी मला गळ घातली. सहा महिने थांबा असे सेनापति म्हणाले. त्या पुण्यमूर्तीचे नको ऐकूं तर कोणाचे? शेवटी उपवास पुढे ढकलून मी आज हिंडत आहे. सेनापतींच्या कृपाछत्राखाली आम्ही हिंडत आहोत. अस्पृश्यता दूर करा म्हणून सांगत फिरत आहोत. मी हिंडणार नव्हतो. कोठे तरी राम नाम म्हणत बसणार होतो. परंतु शेवटी बाहेर पडलों, ‘परिणाम होवो, न होवो, तूं सांगत जा.’ असें मी मनांत म्हटले. 

पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. पंढरपूरचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे म्हणून मी मरायला उभा राहिलो. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल असे मनांत आले. पंढरपूर म्हणजे दक्षिणची काशी, येथील पांडुरंगाचे मंदिर अतिप्राचीन. जवळ जवळ अडीच हजार वर्षांचे. बडवे मंडळी तेथे येऊनच दोन हजार वर्षे झालीत, बडवे मंडळी कर्नाटकांतून आली, पंढरीचे वारकरी तिकडेहि आहेत. कानात मकरकुंडले घालण्याची दक्षिणेकडचीच पद्धती. आद्य शंकराचार्य पांडुरंगाच्या दर्शनार्थ आले होते. त्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र केलें आहे. देवा, कमरेवर हात ठेऊन माझ्या भक्तांना संसारसागर कमरे इतकाच खोल आहे असे कां तूं दाखवित आहेस. असें त्यांनी त्यात म्हटलें आहे. पंढरपूर, बार्शी म्हणजे प्राचीन धर्मसंस्कृतीचा बसौटा, धर्मसंस्कृतीचे माहेरघर. अंबरीष राजा बार्शीचाच. अंबरीषासाठी भगवान आला. पुंडलिकासाठी पंढरपूरचे परब्रम्ह आले. असे हें प्राचीन पवित्र मंदिरच देवाच्या सर्व लेकरांना मोकळे व्हावे म्हणून मी उपवास केला होता. वारकरी पंथ सुरू होण्यापूर्वी जवळ जवळ हजार वर्षे हे मंदिर प्रसिद्ध होते. पुढे संतांनी आणखी महिमा वाढविला. नामदेव, ज्ञानदेव उत्तरेची यात्रा करून आले. इस्लामी धर्म येत होता. मलबार किनाऱ्यावर तो कधींपासून आलेला होता. इस्लामी धर्मातील समतेचा परिणाम संतांच्या मनावर झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदुधर्म उदार न होईल तर टिकणार नाही, असे त्यांना वाटले असावें. मशीदींत सारे समान, हिंदुमंदिरात असे केव्हां होईल? असे विचार त्यांच्या डोक्यात आले असतील. तेव्हां पंढरपूरच्या वाळवंटांत तरी भेदभाव, शिवाशिव नको असे त्यांनी ठरविलें असावें. साऱ्या महाराष्ट्रांतून विठ्ठलनामाचा गजर करीत येथे या. परस्परांस भेटा, क्षेमालिंगने द्या. आणि नवीन प्रथा सुरू झाली, वाळवंट दणाणलें, गजबजलें. तुकारामांच्या अभंगात वाळवंटाचा अपार महिमा आहे. 

एकमेकी लोटांगणीं येती रे 
कठोर हृदयें मृदु नवनीतें 
पाषाणा पाझर फुटती रे 

असें उचंबळून तुकोबा म्हणतात. संत बंडखोर होते. संस्कृतांतील ज्ञान त्यांनी मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोंपडी झोंपडींत त्यांना ज्ञान न्यायचे होते, खरा धर्म न्यायचा होता, त्याचा छळ झाला. ज्ञानेश्वरादिकांवर बहिष्कार, कुंभाराचें मडकेहि त्यांना मिळू दिलें नाहीं. तुकोबांचे अभंग इंद्रायणींत फेकण्यांत आले. एकनाथी भागवत काशीच्या पंडितांनी गंगेत फेकले. संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो. परंतु ते जिवंत असतांना त्यांचे आपण छळच केले. परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटांत तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला. त्यांच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणहि ‘अवघाचि संसार सुखाचा होई’पर्यंत पुढे गेले पाहिजे. परंतु आपण पुढे गेलो नाही. पंढरपूरच्या वाळवंटात एकमेकाना भेटू, परंतु देवाजवळ अजूनहि हरिजनांना जाता येत नाही. वारी करून घरी आल्यावर गांवांत शिवाशिव ती आहेच. शेवटीं पंढरपूर स्वत:जवळ आणायचे असते. एकनाथ म्हणतात,  काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल।. 

(विशेष नोंद : या अंकाचे संपादकीय ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भात केशवरावांची मुलाखत’ या विषयावर ठरवले होते, तसे या अंकाच्या मुखपृष्ठावर छापले आहे. मात्र कोविड काळातील लॉकडाऊनच्या नियमांमुळे अंकाचा शेवटचा फॉर्म ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर छापायला देणे अपरिहार्य झाले आणि तोपर्यंत संपादकीय लिहून झालेले नव्हते. म्हणून साने गुरुजींच्या या आठवड्यात येणाऱ्या पुस्तकातील एका लेखाचा काही भाग संपादकीय जागेवर टाकला आहे. केशवरावांची मुलाखत यानंतरच्या अंकात प्रसिद्ध होईल. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व! - संपादक)    

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

साने गुरुजी ( 118 लेख )

(जन्म : 24 डिसेंबर 1899 - 11 जून 1950)

एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके