सकल संस्कृतींचा पाया प्रेम हा आहे. हा महामंत्र घेऊनच कार्यप्रवृत्त व्हायला हवे, हृदयशून्यता म्हणजे मानव जातीविषयी बेफिकीरी. हृदयशून्यता म्हणजे निर्दयता. जगात दुःख-दैन्य आहे कारण हृदयशून्यता आहे. हे सारे माझे असे मानीन तर मी दुसऱ्याला छळणार नाही, पिळणार नाही. सर्वांना सुखी करण्यासाठी धडपडेन. ‘अवघाचि संसार, सुखाचा करीन’ ही भारतीय संस्कृती, ही मानव संस्कृती.
संस्कृती
जीवनाला जे जे उजाळा देते, समृद्ध करते, पुढे नेते, ते संस्कृती होय. संस्कृती म्हणजे संयम. मानवाला सुसंस्कृत व्हायचे असेल तर मानवाने संयम राखला पाहिजे. मी मोठा, माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, माझा प्रान्त मोठा, माझे तेवढे चांगले, बाकीचे त्याज्य, असे म्हणणाऱ्याला संस्कृती आहे असे मला वाटत नाही. ती जगातील जे जे चांगले ते घ्यायला तयार राहील. संस्कृती सहकार करील, संस्कृती संगम करील, असे न करणारी संस्कृती, संस्कृती नसुन विकृती होय.
मनुष्याबद्दल प्रेम असल्याशिवाय कोठली संस्कृती ? सामर्थ्य हे संस्कृतीचे माप नव्हे. मानवाच्या संस्थांनी नि कायद्यांनी प्रेमवृत्तीचा किती विकास केला यावरून ती मापली जाते. जेव्हा मानव निर्दय होतात तेव्हा संस्कृती धुळीस मिळतात. स्वातंत्र्यप्रीती, समता, न्याय यांचे खुन करणे म्हणजे संस्कृती नष्ट करणे. आसुरीपणा कराल तर संस्कृती जगणार नाही. संस्कृतीचा आणि अहिंसक समाजवादाचा हा प्राणमय अर्थ सर्वांनी हृदयाशी अरला पाहिजे. तदनुरूप वागले पाहिजे. या संस्कृतीत समाज आपोआपच येतो. धर्म म्हणजे भस्मे, गंधे नव्हे; बाहेरची सोंगे-ढोंगे म्हणजे धर्म नव्हे. सर्वांचे कल्याण म्हणजे समाजवाद.
सकल संस्कृतींचा पाया प्रेम हा आहे. हा महामंत्र घेऊनच कार्यप्रवृत्त व्हायला हवे, हृदयशून्यता म्हणजे मानव जातीविषयी बेफिकीरी. हृदयशून्यता म्हणजे निर्दयता. जगात दुःख-दैन्य आहे कारण हृदयशून्यता आहे. हे सारे माझे असे मानीन तर मी दुसऱ्याला छळणार नाही, पिळणार नाही. सर्वांना सुखी करण्यासाठी धडपडेन. ‘अवघाचि संसार, सुखाचा करीन’ ही भारतीय संस्कृती, ही मानव संस्कृती.
भांडवलशाही समाजात सर्वत्र आत्मा मारला जातो. क्षमता असूनही तिचा वापर करण्याची सोय नसल्याने लाचारी पत्करावी लागते. भूक आणि दारिद्र्य यांच्या परिसरात सद्गुण गोठून जातात, स्वार्थ बोकाळतो. मातृप्रेम, बंधुप्रेम, पतिपत्निप्रेम ही सारी गोड प्रेमे पिकायला परिस्थिती बरी लागते. दारिद्र्य दुर्गुणांची जननी हेच खरे. कौटुंबिक जीवनातील सहज सुगंधाची दुर्गंधी बनविण्याची किमया दारिद्र्यात आहे. संस्कृतीच्या आणि सांस्कृतिक संबंधांच्या गप्पा मारल्या जातात, पण मानवी जीवन मोलाचे आहे, ही जाणीव सर्वत्र निर्माण करणे म्हणजे खरी संस्कृती, ह्याचे भान कोठे दिसत नाही. स्वातंत्र्याच्या साधनाने फुलवता येते म्हणून खातंत्र्याचे मोल.
क्रांती
क्रांती म्हणजे केवळ बदल नव्हे. क्रांती म्हणजे मूल्यपरिवर्तन. आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहे. वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही. मुख्य महत्त्व माणुसकीला आहे. परंतु आज समाजात गाणुसकीला मूल्य नाही. आपण आज बांडगुळांची पूजा करीत आहोत. ज्याच्या श्रमावर सारी दुनिया जगते आहे तो आज मरत आहे. त्याला आज ना मान, स्थान. घरात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रीला मान नाही. कोठल्याही सभेत दिवाणखान्यात शेणगोळे तक्क्याशी बसतात, आणि श्रमाने धनधान्य निर्माण करणारे दूर बसतात. हे बदलले पाहिजे. श्रम न करणाऱ्याला तुच्छ मानले पाहिजे. अन्यायाला सिंहासनावरून ओढून तेथे न्यायाची प्रतिष्ठा करणे म्हणजे क्रांती.
प्रतिष्ठा पैशाची नाही. पोपटपंचीची नाही. योग्याची नाही प्रतिष्ठा कुळाची नको. बाह्य बळाची नको. मी म्हणे चंद्रवंशातला, सूर्यवंशातला. मी म्हणे आर्य. मी म्हणे कपिलंगोत्रोत्पन्न. बाकीचे का मातीतून जन्मले आणि तू सोन्याचा जन्मलास ? तुझी स्वतःची काय किंमत ते सांग. तू कोणाचा कोण ते नको सांगू. तुझी किंमत तुझ्या कृतीवरून ठरू दे, –याला म्हणतात क्रांती.
माझ्याजवळ धन असेल तर मला मान. लाठी असेल तर मला मान. अभिजात रक्त असेल तर मान. हे सारे मान वास्तविक माझ्या माणुसकीचे नाहीत. माझी माणुसकी, माझा विशाल आत्मा यांना स्वयंभू तेज आहे की नाही ? माझ्या आत्म्याची निष्पाप शक्ती जगाच्या या बाह्य शक्तीसमोर उभी करणे म्हणजे क्रांती. मरायचे तर आहेच, परंतु माणुसकीच्या ध्येयासाठी मरणे, हे खरे मरणे.
आर्थिक स्वातंत्र्य सोळा आणे सत्ता हाती आल्यावर आपण निर्मू शकू. परंतु सामाजिक स्वातंत्र्य या घटकेला आपण सर्वांना देऊ शकतो. पण ते आपणच अडवून ठेवले आहे. मनाचा मोठेपणा असता तर एका क्षणात आपण ते दिले असते. आपल्याच भावांनी आपल्याच भावांवर लादलेली गुलामगिरी दूर करण्यासाठी का मरू नये ! एकेक दृष्ट रूढी नष्ट व्हावी म्हणून काहींनी मरावे. जुने गंजलेले कुलूप उघडत नसेल तर आत तेल घालतात, त्याप्रमाणे आपली गंजलेली हृदये उघडावीत म्हणून काहींनी प्राणाचे तेल ओतले पाहिजे.
‘संस्कृती आणि क्रांती’
यासंबंधीच्या साने गुरुजींच्या विवेचनातून
Tags: साने गुरुजी साप्ताहिक साधना साधना Sane Guruji Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या