डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हरिभाऊंनी केलेली साक्षर-निरक्षरांची खानेसुमारी

पारतंत्र्य सर्व-गुण-भक्षक आहे. मौज ही की, ते गुण पुन्हा बऱ्याचशा जनतेने अंगी आणल्याशिवाय पारतंत्र्य नष्टही होत नाही. पारतंत्र्य गुणांना मारते. त्याच पारतंत्र्यात ते जावे म्हणून सद्गुणांची जोपासनाही फार करावी लागते. साधे शेजाऱ्याचे नाव सांगा आम्ही म्हटले तर, ‘‘आम्हाला नाही माहीत. आम्हाला नकोत दुसऱ्याच्या उठाठेवी! दुसऱ्याला कोणाला विचारा की.’’ अशी उत्तरे मिळत.

महाराष्ट्रातील थोर कादंबरीकार हरि नारायण आपटे यांचे नाव कोणास माहीत नाही? ते केवळ कादंबरीकार नव्हते, समाजाच्या इतर कार्यांतही ते पडत, कोणी मागे एकदा लिहिले की, ‘हरिभाऊ इतर कामात, इतर व्यापात न पडते तर त्यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या अर्धवट राहिल्या तशा न राहत्या.’ परंतु केवळ कादंबरीलेखनाला वाहून घेणे म्हणजे काय? त्याने वाङ्‌मयाला वाहून घेतले आहे, असे म्हणतात. परंतु याचा अर्थ काय? जीवनात नाना प्रकारचे अनुभव यावे लागतात. ही अनुभवाची पुंजी जवळ नसेल, तर साहित्य कसे निर्माण होणार? केवळ खोलीत बसून वाङ्‌मय निर्माण करता येत नसते. महान साहित्यिक हा शेवटी महान सेवकही असतो. महान्‌ साहित्यिक प्रत्यक्ष आजूबाजूच्या अनंत संसारात पडलेला असतो. हजारोंना तो बघतो, हजारोंशी त्याचे संबंध येतात आणि या सामग्रीतून तो अमर साहित्य निर्माण करतो. साहित्यिकाला संसारापासून अलग राहणे अशक्य आहे. ज्या मानाने तो या संसारात बुडी मारील, जितक्या खोल व व्यापक जीवनसमुद्रात बुडी मारील; त्या मानाने त्याच्या हाती माणिक-मोती लागतील. खोल बुडी मारल्याशिवाय मोती नाही. वरवर खेळणाराला शेवाळ मिळेल.

हरिभाऊ सहृदय होते. ते आजूबाजूची दुनिया बघत होते. ते पुणे म्युनिसिपालिटीचे जवळजवळ वीस वर्षे अध्यक्ष होते. किती तरी अनुभव त्यांना आले असतील. एकदा त्यांनी पुण्यामध्ये साक्षर व निरक्षर लोकांची खानेसुमारी करण्याचे ठरविले. पुण्यात किती लोक निरक्षर आहेत, ते पाहावयाचे होते. मोठे होते काम. ह्यासाठी शेकडो स्वयंसेवक घरोघर जाऊन माहिती गोळा करण्यासाठी पाहिजे होते. स्वयंसेवकांसाठी मागणी आली. शाळांतून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी स्वयंसेवक पाहिजे होते. राम व मी- आम्ही दोघांनी स्वयंसेवक म्हणून नावे दिली. मला वाटते, शंभर-शंभर घरे दोघा-दोघा स्वयंसेवकांकडे दिली होती.

आम्ही सकाळी व सायंकाळी जात असू. मंडईच्या पाठीमागच्या बाजूला आमच्या वाटणीची घरे होती. ज्या घरात कोणी भेटत नसे तिथे पुन्हा जावे लागत असे. त्या वेळेस फार विचित्र असे अनुभव आम्हाला आले. वीस-बावीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट, परंतु ते अनुभव अद्याप ताजे आहेत! लोकांना आम्ही नावे विचारू लागलो म्हणजे भीती वाटे. घरात किती माणसे आहेत, तेही सांगायला काही काही लोक तयार नसत. त्यांना वाटे की, नवीन कर बसवणार बहुधा! महायुद्ध मला वाटते संपले नव्हते. फार जोरात होते. शेवटचा सामना चालला असावा. लढाईच्या खर्चासाठी सरकार डोईपट्टी बसवणा, असे काहींना वाटे. इंग्रजी राज्यात लोकांना एक भय बसले आहे. सरकार नवीन कर बसवणार, अशी दहशत त्यांना बसून गेली आहे. परंतु आम्ही समजावून देत असू. सर्व लोकांना साक्षर करायचे आहे. निरक्षर लोक किती ते कळले म्हणजे कामाची कल्पना येईल, खर्चाचा अंदाज येईल... वगैरे गोष्टी आम्ही सांगत असू. काही काही घरांतून अजिबात कोणीच शिकलेले नाही, असेही आढळले. भिकाऱ्याला चार दाणे गरीबही घालतो. परंतु, ज्ञानदानाचे महत्त्व आपण समजलो नव्हतो. आजच्या काळात हे अज्ञान चालणार नाही. जगाच्या पाठीवर आपल्यासारखा अज्ञानी देश नाही. साक्षरता म्हणजेच ज्ञान नसले तरी साक्षरता हे एक महत्त्वाचे साधन आहे. ते साधन अर्वाचीन काळात सर्वांना प्राप्त झाले पाहिजे. हिंदुस्थानात शेकडा 90 लोक निरक्षर- हे कोष्टक आपण किती दिवस ऐकणार? सर्व लोकांना साक्षर करावयास पैसा तरी कोठून आणावा? आज शेकडा 10 लोकच साक्षर आहेत, तर 10 कोट रुपये खर्च होत आहेत. उद्या शंभर टक्के साक्षर करावयाचे म्हणू, तर शंभर कोट रुपये लागतील- म्हणजे सर्व हिंदुस्थानच्या सरकारी उत्पन्नातील निम्मे भाग! केवळ पैशाने हा प्रश्न सुटणार नाही. उद्या स्वराज्य आले, तरीही हा कठीण प्रश्न आहे. एक तर शाळा स्वावलंबी झाल्या पाहिजेत.सर्वत्र  किंवा जनतेला साक्षर करणारे हजारो व्रती निघाले पाहिजेत. आमच्या राष्ट्राचा कलंक नाही आम्हाला सहन होत, हा कलंक आम्ही पुसून टाकू- असे प्रखरतेने म्हणून तदनुरूप काम करणारे तरुण पाहिजेत.

पाश्चिमात्य देशांतून शिक्षण संपल्यावर सक्तीचे लष्करी शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण संपल्यावर कोठे कोठे तीन वर्षे, कोठे कोठे अधिकही वर्षे हे लष्करी शिक्षण घेणे आवश्यक असते. एखाद्या तरुणावरच सारे कुटुंब अवलंबून असेल, तर त्याला मुभा मिळते, परंतु बाकीच्यांना बराकीतून जावे लागते. हे लष्करी शिक्षण घेतल्यावर मग त्याने वाटेल त्या क्षेत्रात जावे. राष्ट्रावर कधी आपत्ती आली, परचक्र आले, तर प्रत्येक तरुण लष्करी शिक्षण घेतलेला असल्यामुळे एकदम शिपाई म्हणून येऊन उभा राहतो.

आपल्याकडे असे सक्तीचे लष्करी शिक्षण नाही. परंतु, आपणच आपणावर दुसरी एक सक्ती का करून घेऊ नये? अभ्यासक्रम संपल्यावर तीन वर्षे दूर राहिली; एक वर्ष तरी मी जनता साक्षर करण्यासाठी देईन, मग इतर कामांत जाईन- असा निश्चय प्रत्येकाने का करू नये? फायनल होणाऱ्या, मॅट्रिक होणाऱ्या कोणालाही असे एक वर्ष त्याने दवडल्याशिवाय उत्तीर्णपत्र देण्यात येऊ नये, असा कायदा केला पाहिजे. परंतु देशप्रीती आपण का कायद्याने शिकणार? बंधुप्रेमही का कायद्याने शिकायचे?

महाराष्ट्रात प्रो. विजापूरकर या साक्षरतेसाठी तळमळत. समर्थ विद्यालय स्थापन करणारे प्रो. विष्णू गोविंद विजापूरकर म्हणजे महाराष्ट्राची अनंत ध्येयनिष्ठा. कराडच्या स्वदेशी आगपेटीच्या पेट्या त्यांनी मरेपर्यंत पुरविल्या. अत्यंत काटकसरीने त्या पेट्या ते वापरीत. दुसऱ्याला त्यातील काडी देत नसत.

‘‘तुम्हाला इतरही चालतात, मला चालणार नाहीत. मला मरेपर्यंत याच पुरवायला हव्यात.’’ असे ते म्हणायचे. त्यांनी छत्री कधी वापरली नाही. घोंगडी घ्यावयाचे. तळेगाव येथे समर्थ विद्यालयात असता ते कधी बाहेर गेले- फिरायला गेले, झऱ्याकाठी गेले आणि तिथे गुराखी दिसले तर त्यांना ते म्हणत, ‘‘या, तुम्हाला अक्षरे शिकवतो. तुमचे नाव लिहायला शिकवितो.’’ वाळूमध्ये काठीने ते अक्षरे काढीत व त्या गुराख्यांना शिकवीत!

आम्ही आमच्या वाट्याच्या घरी जात होतो. नावे मिळावायला पंचाईत. पुष्कळसे पती आपल्या बायकांची नावे स्वत: सांगायला लाजत. ‘‘तू सांग तुझे नाव.’’ ते म्हणत. आपणात नवरा-बायकोनी एकमेकांची नावे होता होईतो घेऊ नयेत अशी रूढी आहे. त्या रूढीत एक प्रकारची गोडी आहे. पतीचे नाव म्हणजे पत्नीची मोठी ठेव. पत्नीचे नाव म्हणजे पतीची धनदौलत. जे आपणास अत्यंत प्रिय असते, त्याची वाच्यता आपण फारशी करीत नाही. जे अतिमोलाचे असते ते आपण फार खोल ठेवून देतो. घरातील पैठणी, पीतांबर एखादे वेळेस उन्हात घालून लगेच ते बासनात बांधून ठेवायचे. एखादे वेळी ते नेसायचे. त्याप्रमाणे पत्नीने पतीचे नाव किंवा पतीने पत्नीचे नाव क्वचित अत्यंत आनंदाचे वेळी घ्यावयाचे.

परंतु अशी ह्या रूढीत गोडी असली, तरी वेळ आली म्हणजे नाव सांगितले पाहिजे. कोठे नवरा घरात नसला, म्हणजे तर आमची फारच त्रेधा! पत्नी नाव सांगायची नाही. घरात मुले असली म्हणजे त्यांना ती नाव सांगायला सांगे. पुष्कळ वेळा मुले लहान असत.

‘‘सांग रे त्यांना नाव-’’ आई मुलाला म्हणे.

‘‘सांग बाळ, तुझ्या वडिलांचे नाव?’’ आम्ही त्याला म्हणू.

‘‘बाळ.’’ असे तो बाळ सांगे.

कधी मुलगा स्वत:चे नाव सांगे, त्यावरून पित्याचे नाव कळे. परंतु पित्याच्या पित्याचे नाव काय? मग कधी शेजाऱ्यांना विचारावे. त्यांची लहर लागली, तर ते सांगत. सार्वजनिक कामात मदत करणे, हे आपणास अद्याप शिकावयाचे आहे. पूर्वी आपणास ही सवय असेल, परंतु पारतंत्र्यात सारेच पुन्हा नव्याने शिकावे लागते.

पारतंत्र्य सर्व-गुण-भक्षक आहे. मौज ही की, ते गुण पुन्हा बऱ्याचशा जनतेने अंगी आणल्याशिवाय पारतंत्र्य नष्टही होत नाही. पारतंत्र्य गुणांना मारते. त्याच पारतंत्र्यात ते जावे म्हणून सद्गुणांची जोपासनाही फार करावी लागते. साधे शेजाऱ्याचे नाव सांगा आम्ही म्हटले तर, ‘‘आम्हाला नाही माहीत. आम्हाला नकोत दुसऱ्याच्या उठाठेवी! दुसऱ्याला कोणाला विचारा की.’’ अशी उत्तरे मिळत.

आम्हाला शंभरच घरे तपासावयाची, परंतु घरातून बिऱ्हाडे किती तरी असत. त्यामुळे हे काम पट्‌कन आटोपण्यासारखे नव्हते. एके ठिकाणी एका बाईने विचारले,

‘‘बायकांना शिकविणार का? मोठाल्याही बायकांना?’’

‘‘पुढे शिकवायची काय योजना होणार आहे, ते आम्हाला माहीत नाही.’’ आम्ही सांगितले.

‘‘आम्हालाही शिकवा. दिवसा आम्हाला नाही वेळ, रात्रीचे शिकवा. आम्ही येऊ रात्री. शिकल्याशिवाय फुकट सारे. त्या दिवशी एक घर मला पाहिजे होते. चिठ्ठीवर घरनंबर टिपून घेतला होता, परंतु वाचणारा कोणी भेटला तर ना? कोणी वाचीना व घरनंबर दाखवीना. उन्हातून दोन तास तळमळत हिंडले. शंभरदा मनात आले- मी शिकले असते तर!’’ ती बाई म्हणाली.

केव्हा बरे हा ज्ञानाचा आनंद आपल्या देशातील सर्वांस प्राप्त होईल? विवेकानंद या कल्पनेने रडत. ‘माझ्या देशातील माणसे पशू झाली, ती माणसे केव्हा होतील?’ असा विचार मनात येऊन तो थोर संन्यासी तडफडे.

एकदा रवींद्रनाथ ठाकूर रशियात गेले होते. शेतकऱ्यांच्या म्हाताऱ्या-म्हाताऱ्या बायकाही उत्सुकतेने शिकत होत्या. रवींद्रनाथांचे हृदय उंचबळून आले. आपल्या देशात असा देखावा केव्हा बरे दिसेल? चंद्रमौळी झोपड्यांतून इतर काही नसले तरी चंद्राचा-सूर्याचा प्रकाश जातो, त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र केव्हा जाईल, असे त्यांच्या मनात आले.

‘‘तुमच्या देशातील सर्व बायका सुशिक्षित आहेत का? लिहा-वाचायला येते का त्यांना?’’ एका रशियन शेतकरणीने या कविसम्राटाला विचारले.

‘‘माझ्या देशात घोर अज्ञान आहे. शेकडा नव्वदाहून अधिक बायका अज्ञानात आहेत. ज्या देशात शेकडा 90 पुरुषही निरक्षर आहेत, तेथील बायकांविषयी तर बोलायलाच नको!’’ कविवर म्हणाले.

‘‘आम्ही येऊ तुमच्या देशातील भगिनींना साक्षर करायला?’’ ती वृद्ध नारी म्हणाली.

भारतातील गुरुदेव खाली मान घालून उभे राहिले.

आम्ही ती साक्षर-निरक्षरांची शिरगणती केली. सर्व पेठांतून काम झाले. स्वयंसेवकांना म्युनिसिपालिटीतर्फे अल्पोपाहार देण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य इमारतीत तो गोड समारंभ झाला. हरिभाऊ आपटे आले होते. त्या दिवशी मी त्यांना प्रथम पाहिले. ‘उष:काल’ व ‘पण लक्षात कोण घेतो?’ यांच्या जनकास पाहिले. ती सौम्य मूर्ती मी पाहिली. तोंडावर एक प्रकारची मंदस्मितता होती. त्यांनी लहानसे भाषण केले व शेवटी म्हणाले, ‘‘नुसते शाब्दिक आभार मानून काय उपयोग?

‘बोलाचीच कढी बोलाचाच भात । जेवूनीया तृप्त कोण झाला’

असे श्री तुकाराममहाराजांनी म्हटले आहे. ते लक्षात घेऊन आणि तुम्हा मुलांचा स्वभाव लक्षात घेऊन, थोडे च्याऊ-म्याऊ ठेवले आहे. त्या खोल्यांतून थोडा चिवडा, केळी वगैरे वस्तू आहेत- त्यावर तुटून पडा. आणि मोठे झालात म्हणजे आपल्या देशातील अपरंपार अज्ञानावर तुटून पडा.’’

असे ते लहानसे भाषण झाले. निदान शेवटचा हा गोड भाग मला आठवत आहे. तो त्यांनी म्हटलेला अभंगाचा चरण आणि त्यांचे त्या वेळचे हास्य डोळ्यांसमोर आहे. आम्ही त्या खाद्य वस्तूंचा फन्ना पाडला, परंतु आपण अज्ञानाचा फन्ना केव्हा उडवणार? केव्हा ही अनंत स्फूर्ती भारतीय तरुण-तरुणीत उत्पन्न होणार? ध्येयार्थी लोक ज्या देशात अधिक निपजतात, ते देश वैभवावर चढतात; त्यांना मोठेपणा मिळतो, त्यांना गौरव प्राप्त होतो. त्यागानेच अमृतत्व मिळते, हा सनातन नियम आहे!

(8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने, साने गुरुजींच्या ‘श्यामचा जीवनविकास’ या आत्मकथनात्मक पुस्तकातील स्यवंसेवक हे प्रकरण अंशत: संपादित करून येथे घेतले आहे. या पुस्तकातील वर्णन 1918 या वर्षातील आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके