आपण अखंड भारत म्हणून म्हणत आलो; परंतु या भारताचे आपणास ज्ञान नाही. हे सारे प्रांत माझे, या सर्व भाषा माझ्या, हे सारे माझे भाऊ, सर्वांना भेटेन, सारे अभ्यासीन, असे आपणास कोठे वाटते? महात्माजी देशातील निरनिराळ्या भाषा वेळात वेळ काढून अभ्यासीत. पूज्य विनोबाजी तेच करीत आले. आपणापैकी कित्येकांना ही तहान आहे? मुंबईत रशियन, जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकवायची सोय आहे. परंतु अशी संस्था नाही, जेथे सकल भारतीय भाषा शिकता येतील.

एखाद्या वेळेस माझे काही मित्र मला माझे ध्येय विचारीत असतात. मानवतेचे सर्वस्व दर्शन व्हावे, सर्वत्र समता असावी, असे तर मला वाटतेच. ना कोणी उच्च, ना कोणी हीन. माझ्या जीवनात तरी हे भेदाभेद नकोत असे मला वाटते. मी काँग्रेसच्या चळवळीत सामील झालो. स्वातंत्र्यार्थ हातून काही व्हावे, ही ओढ तर होतीच; परंतु काँग्रेस म्हणजे मानवतेचे प्रतीक मला वाटे. माझी जातिधर्मनिरपेक्ष वृत्ती. काँग्रेस सर्वांची म्हणून मला तिचे प्रेम वाटे. 1930 मध्ये धुळे तुरुंगात असताना थोर विधायक कार्यकर्ते श्री.शंकरराव ठकार यांनी मला विचारले, ‘‘तुम्ही पुढे काय करणार?’’ मी म्हटले, ‘‘मी खऱ्या धर्माचा लोकांत प्रचार करीन. मानव धर्माचा मी प्रचार करीन.’’
हिटलरने आत्मचरित्रात म्हटले आहे, ‘‘पक्ष्याचे जसे पंख, तसे मला राजकारण.’’ पंख म्हणजे पक्ष्याचा प्राण. जटायू रावणाला म्हणाला, ‘‘माझे प्राण माझ्या पंखांत आहेत.’’ हिटलरला राजकारण प्राणमय वाटत होते. राजकारणाशिवाय तो जगता ना. मला राजकारण माझा प्राण असे वाटत नाही. राजकारण खेळायला जी वृत्ती लागते, ती माझ्याजवळ नाही. सद्भावनेने थोर मार्गाने राजकारण करायचे असेल, तरी तेथे एक अभिनिवेश लागतो. शिवाय संघटना करावी लागते. मला संघटना जमत नाही. एखाद्या ध्येयासाठी मी प्रचार करीन, प्राणार्पण करीन, परंतु ठायी ठायी तणावे बांधणे मला जमत नाही.
आज मी काँग्रेसमध्ये नाही; ध्येयभूत काँग्रेस माझ्या हृदयात आहे. गरिबांना जवळ घेणारी, मोठमोठे कारखाने राष्ट्राचे करणारी, कामगारांसाठी चाळी बांधून देणारी, कोठे आहे ती काँग्रेस? ती माझ्या स्वप्नात आहे. ती माझी ध्येयभूत काँग्रेस मला समाजवादी पक्षाजवळ दिसते म्हणून त्यांच्याविषयी मला प्रेम वाटते, आस्था वाटते. समाजवादी पक्ष आज निर्मळ मार्गाने जाऊ इच्छितो. लवकर समाजवाद यावा, म्हणून त्याची धडपड. संयमाने धीरोदात्तपणे तो पक्ष जात आहे. परंतु त्या पक्षाबद्दल श्रद्धा नि निष्ठा मला असली, तरी मला त्यांचे संघटनात्मक काम जमत नाही. मी कामगारांची संघटना करू शकत नाही. त्यांच्या कायद्यांचा अभ्यास, त्यांच्या दैनंदिन तक्रारी सोडविणे, मिटविणे, लेबर ऑफिसरकडे जाणे, औद्योगिक कोर्टात जाणे, सरकारी मंत्र्यांस भेटणे, मला हे जमत नाही. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचीही मी संघटना करू शकत नाही. त्यांचे प्रश्न सोडविणे, कुळकायदा अभ्यासून त्यांना न्याय मिळवून देणे, सहकारी संस्था चालविणे, मला हे जमणार नाही. एक प्रकारे मी अशा कामाला अक्षम आहे. मग माझे काम काय, ध्येय काय? समाजवादाचा मोघम प्रचार मी लेखनाने, बोलण्याने करीत असतो. उदार विचारांचा प्रचार व्हावा म्हणूनही मी धडपडतो. जातिधर्मातीत दृष्टी भारतीयांना यावी, असे मला किती वाटते! समाजवाद यायला हवा असेल तर जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद आपण विसरणे अवश्य आहे. मानवतेचे वातावरण सर्वत्र आले, तर समाजवाद येथे वाढणे सोपे होईल. म्हणून सेवादलाकडे माझा ओढा. सेवादलाची मुले भंगी, मुसलमान, हरिजन सर्वांना घरी जेवायला बोलावतात. आपण त्यांच्याकडे जातात, हे ऐकून मी उचंबळतो. सेवादल नवराष्ट्र निर्माण करीत आहे, असे मला वाटते. ज्या लहानशा खोलीत भारताची सारी लेकरे एकत्र जेवत आहेत, प्रेमाने बोलत आहेत, तेथे भारतमाता आहे; तेथे परमात्मा आहे. समाजवाद, सेवादल यांच्यासाठी म्हणून माझा जीव तळमळतो. मुंबईच्या परवाच्या निवडणुकीच्या वेळेस मी झोपताना देवाला म्हणे, ‘‘देवा, गरिबांच्या या पक्षाला यश दे. या मित्रांना ना वृत्तपत्र, ना पैसा, ना सरकारी पाठिंबा. एकीकडे जातीय लोक, एकीकडे सत्ताधारी श्रीमंत लोक. यांच्या मध्ये समाजवादी पक्ष उभा आहे. महाराष्ट्रीय बहुसंख्य मतदार. तरी एक गुजराती मित्र उभा. समाजवादी उमेदवार यशस्वी होणे म्हणजे भारतीय वृत्ती यशस्वी होणे. हा गुजराती, हा महाराष्ट्रीय... आम्ही जाणत नाही. कोणत्या तत्त्वांसाठी, सिद्धांतासाठी व्यक्ती उभी आहे, हे आम्ही बघतो.’’ पुरुषोत्तम (त्रिकमदास) यशस्वी झाले ही फार मोठी गोष्ट आहे. समाजवादी वृत्ती देशात वाढणे ही अति मौल्यवान वस्तू होय.
एक काळ असा होता की ज्या वेळेस सारे सोडून कोठे हिमालयात जावे असे मला वाटे. देव भेटावा वाटे. परंतु विकारांनी बरबटलेल्यास ना देव, ना धर्म. देव हिमालयात भेटतो आणि येथे नाही का? प्रभूचा साक्षात्कार म्हणजे सर्वत्र मंगलाचे दर्शन. आपापल्या ध्येयासाठी झगडत असताही दुसऱ्यांविषयी मनात सहानुभूती ठेवणे. आज मला देव भेटायची तहान नाही. मी माझ्या जीवनात धडपडत असतो. आपल्या क्षुद्रतेला जिंकू पहात असतो. विकारांना, स्वार्थाला अहंकाराला जिंकू पहात असतो. प्रभूचे स्मरण होताच जेथे असेन, तेथे मी डोके ठेवतो नि मला समाधान लाभते. मला ऐक्याची तहान आहे. भारताला मी जगाचे प्रतीक मानतो. भारताच्या सेवेत मानवजातीची सेवा येऊनच जाते. येथे सारे धर्म, सर्व संस्कृती. रामकृष्ण परमहंसांनी सर्व धर्मांचा साक्षात्कार करून घेतला. महात्माजींनी सर्व धर्म जीवनात आणले. दिवसेंदिवस आपण सर्वांनी ही एकता, विश्वात्मकता अनुभवायची आहे.
1930 मध्ये आम्हांला त्रिचनापल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. अमळनेरच्या हायस्कुलातील नोकरी सोडून मी सत्याग्रहात सामील झालो होतो. आमच्या शाळेत एक बंगाली मित्र होते. त्रिचनापल्लीच्या तुरुंगातील एक मित्र श्री.व्यंकटचलम् सुटणार होते. ते बी.एससी. होते. त्यांना तमिळ, तेलगु, मल्याळम् भाषा येत होत्या. मी अमळनेरच्या मित्रांना लिहिले, ‘‘यांना आपल्या शाळेत घ्या. बंगाली मित्र आहेत. हे दक्षिणेकडील एक मित्र होतील. आपली शाळा भारतीय ऐक्याचे प्रतीक होवो. भारतातील सर्व प्रांतांतील तेथे शिक्षक असोत. त्या त्या प्रांताची भाषा कानी येईल. त्या त्या प्रांताची संस्कृती, वाङ्मय, सारे कळेल.’’ मी असे पत्र लिहिले होते. तेव्हापासून माझ्या मनात स्वप्न होते की केव्हा तरी अशी संस्था काढायची, जी भारताचे ऐक्य शिकवील, अनुभवील.
आपण अखंड भारत म्हणून म्हणत आलो; परंतु या भारताचे आपणास ज्ञान नाही. हे सारे प्रांत माझे, या सर्व भाषा माझ्या, हे सारे माझे भाऊ, सर्वांना भेटेन, सारे अभ्यासीन, असे आपणास कोठे वाटते? महात्माजी देशातील निरनिराळ्या भाषा वेळात वेळ काढून अभ्यासीत. पूज्य विनोबाजी तेच करीत आले. आपणापैकी कित्येकांना ही तहान आहे? मुंबईत रशियन, जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकवायची सोय आहे. परंतु अशी संस्था नाही, जेथे सकल भारतीय भाषा शिकता येतील.
म्हणून प्रांतभारती संस्था स्थापण्याचे माझे कधीपासूनचे स्वप्न. सुंदरशी जागा असावी. सरकारजवळ मागावी किंवा कोणा भल्या सज्जनाने दिली तर कृतज्ञतेने घ्यावी. तेथे त्या त्या प्रांतीय भाषेतील कोणी तज्ज्ञ असतील. त्या सर्वांना हिंदी येत असावी. त्या त्या भाषेतील वाङ्मय तेथे राहील. संस्थेला जोडून विद्यालय असावे. शेती, हस्तोद्योग असावेत. भारतीय भाषा शिकवण्याची तेथे सोय होईल. विद्यार्थ्यांच्या कानांवर सर्व भाषा पडतील. त्या त्या साहित्याचे मराठीला परिचय करून देण्यात यावेत. इतर भाषांतूनही मासिके काढून त्या त्या प्रांतीयांना सकल भारताची ओळख करून द्यावी, असे माझे स्वप्न. गुरुदेव रवींद्रनाथ विश्वकवी. त्यांनी विश्वभारती स्थापिली. जगाचा नि भारताचा संबंध असू दे. पूर्व ती पूर्व, पश्चिम ती पश्चिम असे नाही. पूर्वेकडून निघाला तो पश्चिमेला भेटतो. पश्चिमेकडून निघाला तो पूर्वेला भेटेल. पृथ्वी वाटोळी आहे, पूर्ण आहे. भारत विश्वाच्या ऐक्याचा अनुभव घेण्यासाठी आहे; परंतु विश्वाचा अनुभव घेण्यासाठी स्वत:चा अनुभव घ्या. भारतातील प्रांतांची तरी एकमेकांस ओळख कोठे आहे? त्या त्या प्रांतांचे सांस्कृतिक कार्य, नवसर्जन आपणास कोठे आहे माहीत? प्रांतभारती भारतीयांना एकमेकांची भक्तिप्रेमाने ओळख करून देईल. त्या त्या प्रांतातील सर्व क्षेत्रांतील थोरामोठ्यांच्या तेथे तसबिरी राहतील, हे सारे नवभारतनिर्माते असे नवपिढीला सांगण्यात येईल.
साहित्याबरोबर, तेथे चित्रकला, नृत्यकला, यांचाही अभ्यास असावा. सहकारी शिक्षण दिले जावे, नवभारताच्या निर्मितीचे ते एक तीर्थक्षेत्र असावे. माझ्या डोळ्यांसमोर सुंदर स्वप्न आहे. प्रांतभारतीतील मुले सुटीत खेडोपाडी जातील. मेळे, संवाद करतील. स्वच्छता करतील. प्रांतभारतीतून सहकारी चळवळ फैलावायला ध्येयवादी तरुण बाहेर पडतील. ग्रामीण कला येथे फुलतील, कोकणातील काटखेळ, नाना नाच येथे अभ्यासिले जातील. मौज आनंद! सेवा, संस्कृती, उदारता, ज्ञान, विज्ञान, कला‐ एक गंभीर अशी प्रवृत्ती प्रांतभारती निर्मू पाहील.
परंतु हे स्वप्न कृतीत कसे आणायचे? महाराष्ट्रभर भिक्षामंडळे तालुक्यातालुक्याला स्थापावी. आठवड्यातून एक दिवस या संस्थेसाठी भिक्षा मागणारे तरुण असावेत. शंभर तालुके धरले, तर महिन्यातून चार वेळ म्हणजे 400 वेळा भिक्षा मागितली जाईल. पाच रुपये प्रत्येक भिक्षेत मिळाले तरी दोन हजार रुपये मिळतील. संस्थेचा खर्च त्यातून भागवावा. कोणी देणगी देईल. सरकारही आपले आहे, ते नाही का वार्षिक मदत देणार? सारे सुंदर होईल असे मनात तर येते. परंतु आरंभ केल्याशिवाय सरकारजवळ काय सांगू?
महाराष्ट्रभर गीतेवर प्रवचने देत हिंडावे; बृहन्महाराष्ट्रभर हिंडावे. प्रवचनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या या प्रांतभारतीच्या स्वप्नासाठी मदत मागावी असे मनात येत आहे. महाराष्ट्रभर मजविषयी प्रेमस्नेह बाळगणारे अनेक मित्र आहेत. त्यांना माझ्या या ध्येयपूर्तीसाठी मला नाही का मदत देता येणार? मी साऱ्या महाराष्ट्रासमोर माझे चिमुकले हात पसरीत आहे. हे स्वप्न पूर्ण करायला द्याल का मदत? महाराष्ट्राला भूषणभूत ही संस्था होवो. भारतीय ऐक्याचे थोर ध्येय शिकविणारी प्रांतभारती प्रियतम महाराष्ट्रात उभी राहो.
पुण्याला मराठी साहित्य संमेलन आहे. प्रांतभारतीच्या माझ्या स्वप्नाला पाठिंबा द्या अशी कदाचित् मी तेथे जाऊन सर्वांना प्रार्थना करीन. परंतु माझी संकोची वृत्ती. तेथे जाऊन बोलण्याचे मला धैर्य होईल की नाही, प्रभू जाणे. तुकारामांनी म्हटले आहे.
‘‘मेली लाज धीट केलो देवा’’
माझी भीती, खोटी लाजलज्जा जाऊन या स्वप्नाच्या पूर्तीसाठी नम्रपणे परंतु निर्भयपणे साहित्य संमेलनातील सज्जनांसमोर येऊन मी सहानुभूतीची भिक्षा मागितली, तर मला हसू नका; उपहासू नका. भारतीय ऐक्याच्या साक्षात्कारासाठी तहानलेले महाराष्ट्राचे मी एक धडपडणारे लेकरू आहे. या लेकराची आळी थोरामोठ्यांनी पुरवावी.
‘‘केली पुरवी आळी
नव्हे निष्ठुर कोवळी’’
महाराष्ट्रीय जनता निष्ठुर न होता, कोवळ्या वृत्तीने एका मुलाचा हा ध्येयार्थी हट्ट, हे स्वप्न, ही असोशी पुरवील अशी मला आशा आहे. प्रांतभारतीच्या मूर्त स्वरूपासाठी धडपडण्याचे अंत:पर मी ठरवीत आहे. हा संकल्प पार पाडायला प्रभू मला शक्ती देवो. सत्य संकल्पाचा तोच एक दाता!
(11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 7 मे 1949 च्या साधना अंकात त्यांनी हा लेख लिहिला होता. त्यांच्या 72 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने तो इथे पुनर्मुद्रित करीत आहोत- संपादक)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या