डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींनी नास्तिक लोकांकरिता लिहिलेली प्रार्थना

रोजच्या रामरगाड्यातसुद्धा गांधीजी आणि साने गुरुजी, तुकाराम आणि ज्ञानेश्वर, फ्रॉईड आणि आइन्स्टाईन मनात वरखाली होत असतातच. आणि असे खूप जण आणि खूप विषय जे आपण दिशा सापडवायला, पायाला आधार मिळवायला वापरतो. असे करत करत आपण अटळपणी आस्तिकता आणि नास्तिकता यांपाशी येऊन पोचतो. फ्रॉइड आणि डार्विन नास्तिक, आइन्स्टाईन आस्तिक, संतांबद्दल म्हणायचे तर बव्हंशी आस्तिक. पण नीट पाहू जाता लक्षात येतं की, ही आस्तिक-नास्तिक रेषा मुळीच स्पष्ट नाही. ते पुढे येईलच. पण साने गुरुजी आस्तिक होते की नाही, याचे उत्तर कठीण नाही. ते फार स्पष्टपणे आस्तिक होते. ज्या यशस्वी कृतीबद्दल मी लिहीत आहे ती या क्षेत्रातील आहे. या आस्तिक साने गुरुजींनी लिहिलेल्या एका कवितेबद्दल मी बोलत आहे. सांगायची गोष्ट अशी की, त्यात देवाचा उल्लेख नाही.

साने गुरुजींचं आणि माझं पटत नाही. बरेचदा लिखाणाबद्दल. इतर ठिकाणी फार मतभेद नाही. मतभेद करायला मला काही अधिकारही नाही. त्या क्षेत्रामध्ये मी काही केलेलेच नाही. लेखनाबद्दल बोलायचा तरी अधिकार काय- तर तो एवढाच की, लेखक आपणहून पुढे येतो, त्याचे म्हणणे मांडतो आणि मग मलाही मतभेद मांडायला मुभा मिळते. तसा माझा मुद्दा आणि अधिकार.

मला त्यांचे लेखन पटत नाही. म्हणजे मुळात ते सहज वाचवतच नाही. ते दु:ख आणि अतिरेकी वाटणाऱ्या भावनादर्शक शब्दांनी जडावलेले वाटते. त्यामुळे ते वाचन एकूणच मला झेपत नाही. सुदैवाने मी तसे मोठ्यांदा कधी म्हणालो नाही आणि म्हणून आनुषंगिक मार मी खाल्ला नाही.

तसे राष्ट्र सेवादल आमच्या घरातलेच. साने गुरुजींचे निकटवर्ती ‘धू, ठू, जा, भ, ळू’ पैकी ‘ठू’ म्हणजे विठू म्हणजे विठ्ठल पटवर्धन यांचा मी मुलगा आणि नाशिकच्या कुसुम पटवर्धन म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम गोळे या माझ्या मातोश्री. दोघेही पक्के सेवा दलवाले. त्यांची थोरवी फार. म्हणजे कशी, एवढे सेवा दलवाले असूनही मला लहानपणी भलत्याच वयात त्यांनी कधीही ‘श्यामची आई’ हे पुस्तक ‘वाचायला लावले’ नाही. ‘हवे ते वाच’ म्हणाले. मी तेच केले.

लहान मुलांना त्यांचे अंत:करण धुण्याच्या पिळ्यासारखं पिरगळायला का म्हणून लावायचे, हे मला कधीच कळले नाही. इतर खूप काही छान साहित्य वाचायला उपलब्ध असताना, शिक्षण आणि संस्कार या नावाखाली लोकांना- मुलांना छळायलाच आवडते असे माझे मत झाले आहे. शिबिरांमधील ‘बौद्धिकां’मधूनही मी असाच पळालेलो आहे. ‘श्यामची आई’ हे पुस्तक लहान मुलांच्या माथी मारले जाई (आणि जाते!) याचे कारण एकच की, लहान मुलांवर जबरदस्ती केली जाऊ शकते. नंतर पुन्हा ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणीच वाचत नाही. खरे बोलायला हरकत नाही.

साने गुरुजींनी ते पुस्तक कोणासाठी लिहिले ठाऊक नाही. पण मला हे नक्की ठाऊक आहे की, ‘गलीव्हर्स ट्रॅव्हल्स’ किवा ‘ॲलीस इन वंडरलँड’ ही पुस्तके लहान मुलांकरिता नाहीत आणि मुळातच नव्हती. आज ते ‘बालसाहित्य’ मानले जाते. इथे खरे तर, बालकांसाठीचे साहित्य म्हणायला हवे. पण लक्षात घेतो कोण? आमच्या गावात एक ‘बालविद्या प्रसारक मंडळ’सुद्धा आहे. कोणती विद्या शिकवतात तिथे कोणास ठाउक! (जिथे ‘भव्य स्त्रियांच्या कबड्डी स्पर्धा’ होतात तिथे काहीही शक्य आहे.)

सामाजिक जीवनात एखादा (साने गुरुजींसारखा) माणूस त्याची छबी एका विशिष्ट प्रकारेच दाखवतो, म्हणून आपण ती मान्य करायलाच हवी असं नसतं. हिटलरसारखे छद्मी भंपक लोक आपले असले-नसलेले मोठेपण स्टेजवरून किंवा इतर मार्गांनी दाखवतात, ते आपण मान्य करीत नसतो. आपण हिटलरचा मिलिटरी ड्रेस, पदके आणि पट्टे आणि त्याचा सैन्याचा व इतर थाटमाट यांच्या मागे जातो. ते भपक्याचे टरफल एकदा निघाले की, त्यामागची गुन्हेगारी, अरेरावी, आपमतलबीपणा, खोटेपणा सगळेच पुढे येते आणि अमानुषता व अन्याय दिसू लागतो.

साने गुरुजी हा माणूस आज काय वाटतो? आपल्याला दिसते ती एक पोक काढून, अति नम्रपणे, आपली कुणाला अडचण व्हायला नको म्हणून आक्रसून बसलेली व्यक्ती. यांना जोखावे कसे?

सामान्य लोकसुद्धा आपण जे काय आहोत त्यापेक्षा अधिक काही आहोत असे दाखवायच्या सतत मागे असतात. साने गुरुजी (आणि काही तशी मंडळी) यांचे त्याच्या उलट टोक. त्यांच्या रूपावरून काहीच कळत नाही, कारण आपल्याकडे जे आहे ते जणू भीड पडल्यामुळे  लपवून ठेवतात. भंपकपणाच्या आरपार पाहण्याचा प्रयत्न करण्याची आपल्याला सवय असते. पण जे लोक वामनासारखे आपले छोटेच रूप दाखवतात तिथे आपण सहजच फसतो. आपण भलतेच काही तरी पाहत बसतो. तसं काही तरी साने गुरुजींचे झाले आहे किंवा असावे असे मला वाटते. साने गुरुजींनी लिहिले खूप आणि त्यांच्या चाहत्यांनी ते म्हणे वाचलेही. पण मला त्याबद्दल शंका आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या चाहत्यांनी त्यावर टीकाटिप्पणी केली नाही. कुणाची थोरवी मान्य करून टाकली की, पुढे त्या लेखनाचं, विचारांचं, काहीच करावं लागत नाही. थोडक्यात ‘हो, हो, मी वाचलंय नं ते. छान आहे!’ असे म्हटले की, विषय संपतो.

खरे तर असेही आहे की, साने गुरुजींच्या लेखनाच्या साहित्यिक दर्जाबद्दल त्याही काळात बरीच चर्चा आणि टीका झाली. पण ती त्यांच्या चाहत्यांच्या बाहेरच्या जगात. त्यांनी लिहिले ते सरसकटसुद्धा चांगले आहे असे तर राहोच, पण त्याहीपेक्षा बरेच वाईट आणि थट्टे-कुचेष्टेनी त्याबद्दल बोलले गेले.

मुद्दा काय तर साने गुरुजींना त्यावरून जोखता येईल का? लिखित साहित्याचा एक गुण असा की, तेच मागे उरते. बाकी सर्व विरून जाते आणि साने गुरुजींचे तेच झाले. लिखित मागे उरले आणि त्यावरून साने गुरुजींची किंमत तशीच केली गेली. चुकीची.

साने गुरुजींमध्ये खरे तर आग होती, प्रचंड धग होती. ती जयप्रकाशजींना म्हणे जाणवली. विनोबांना जाणवली. इतर अनेक दृष्टीवंत समकालीनांना जाणवली. साने गुरुजींबद्दल कोणाकोणा मोठ्या लोकांनी लिहून ठेवले आहे. वेगळेच काही तरी. पण ते वाचणार कोण? फार तर म्हणणार ‘खरा तो एकचि धर्म... इ.’ पण म्हणजे काय? ते काव्य आता फक्त कर्मकांड झाले आहे. साने गुरुजींच्या पद्याची पार्श्वभूमी फारशी कुणाला ठाऊक नाही. त्याला अर्थ आहे हेसुद्धा प्रार्थना रोज म्हटल्याने पोरांच्या काय, मोठ्यांच्याही लक्षात येत नाही. आणि पोरं सोडून इतर म्हणतातच कोण ही गाणी? त्यात डोकावून पाहते कोण? ते बालसाहित्य ना!

साने गुरुजींच्या अनेक कवितांचे आणि बहुतेक लेखनाचे तसे आहे. त्यातले दुःख आणि तळमळ व भावनेचा उमाळा (खरा असल्याने) वाचकाला (मला!) सहनच होत नाही. बरं, ‘आहे ते खरे आहे’ असे जाणवल्याने सोडूनही देता येत नाही. मग काय करायचे? त्याला बालसाहित्य म्हणणे सोयीचे आहे, दुसरे काय!

लेखन सोडून साने गुरुजींनी अनेक गोष्टी केल्या. खरे तर अनेक पराक्रम केले. पण ते सारे पराक्रम म्हणून पुढे येत नाही. सारखे अश्रू वाहण्याचे आणि ऊर भरून आल्याचे उल्लेख येतात. ते आंतरिक आनंदाने कधी नाचतही असत हे सांगितले जात नाही. जणू दुःखाने रडले तर चालेल, पण आनंदाने नाचले कुणी तर ते सांगायचे नाही किंवा नसते.

साने गुरुजींचे ‘अपील’ नेहमी अंतःकरणाला असायचे. भावनेला असायचे. बुद्धीला क्वचितच. त्यामुळे असे वाटू शकते की, त्यांच्या भोवती नेहमी रडारड चालू असेल. सहसा माणसाच्या तार्किक मेंदूतच वावरणारी तेव्हाची माणसंसुद्धा त्यांच्यापासून अंतर ठेवून असायची. सर्वांना एवढी एक खात्री असे की, गुरुजी करतील ते विधायक असेल, आणि ते स्वतःला छळण्यातून निघालेले असल्याने शुद्ध आणि सात्त्विक असेल. पण म्हणून ते आपल्याला सहन होईल, अशी कोणाचीच खात्री असणे शक्य नव्हते. गुरुजींचा काळ स्वातंत्र्यलढ्याचा. त्यात त्यांनी तन-मन-धनाने भाग घेतला. पण तो त्यांच्या पद्धतीने. त्यांची बुद्धी स्वतंत्र. ते कोणाच्याच मागे जायचे नाहीत असे दिसते. ‘मी कशाला गांधीजींना भेटायला जाऊ?’ असेसुद्धा त्यांनी विचारले आहे. आणि त्यातून हा माणूस अनबॅलन्स्ड. या प्रकारच्या व्यक्तीला सायकॉलॉजीमध्ये ‘बायपोलर’ म्हणतात. ही माणसे एकदा अतिउत्तेजित आणि आनंदात असतात तर कधी अतिदु:खात. हे ‘मूड’ आतून येणारे असतात. बाह्य परिस्थितीवर ते अवलंबून नसतात. त्यातही गुरुजी अतिदेवभोळे असावेत असे वाटते. ‘देवाजवळ बसून रडणे हा माझा स्वधर्म आहे...’ असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. संतमंडळीत म्हणजे खऱ्या संतमंडळीमध्ये ही बायपोलर वृत्तीची अवस्था असणे अपरिचित नाही. ‘अणू रेणू परी थोकडा, तुका आकाशाएवढा’ असे तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात. त्याला असाही काही अर्थ असावा.

आता मला वाटतं, मी ठिकाणावर आलो. एवढा वेळ मी काय लिहितो आहे ते मलाच स्पष्ट कळत नव्हते. खरे तर, साने गुरुजींचा (आणखी) एक पराक्रम मला नोंदवायचा आहे. म्हणजे एक अचिव्हमेंट नोंदवायची आहे. एक महद्‌कृत्य नोंदवायचे आहे. पराक्रम हा शब्द, जो पर+आक्रम असा तयार होतो तो साने गुरुजींच्या बाबतीत वापरणे बरे वाटत नाही. इथं मी सांगत आहे, त्यांची एक यशस्वी कामगिरी ती साहित्यातील आहे आणि तिची नोंद घेतली गेली आहे असे मला वाटत नाही.

रोजच्या रामरगाड्यातसुद्धा गांधीजी आणि साने गुरुजी, तुकाराम आणि ज्ञानेश्वर, फ्रॉईड आणि आइन्स्टाईन मनात वरखाली होत असतातच. आणि असे खूप जण आणि खूप विषय जे आपण दिशा सापडवायला, पायाला आधार मिळवायला वापरतो. असे करत करत आपण अटळपणी आस्तिकता आणि नास्तिकता यांपाशी येऊन पोचतो. फ्रॉइड आणि डार्विन नास्तिक, आइन्स्टाईन आस्तिक, संतांबद्दल म्हणायचे तर बव्हंशी आस्तिक. पण नीट पाहू जाता लक्षात येतं की, ही आस्तिक-नास्तिक रेषा मुळीच स्पष्ट नाही. ते पुढे येईलच. पण साने गुरुजी आस्तिक होते की नाही, याचे उत्तर कठीण नाही. ते फार स्पष्टपणे आस्तिक होते. ज्या यशस्वी कृतीबद्दल मी लिहीत आहे ती या क्षेत्रातील आहे. या आस्तिक साने गुरुजींनी लिहिलेल्या एका कवितेबद्दल मी बोलत आहे. सांगायची गोष्ट अशी की, त्यात देवाचा उल्लेख नाही.

मला वाटतं मी नास्तिकांमध्ये मोडतो. निदान तसे होऊ पाहणारा मी एक आहे. याचं कारण मला असे वाटते की, नास्तिकत्वात तर्क वापरता येतो. आणि ती एक जाणीवपूर्वक होणारी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात सोपी.

पण ते जमतंच असं नाही. कधी वेगळेच काही घडतं. बेसावध असताना कसलं तरी उधाण येतं आणि ते आपल्याला गिळून टाकतं. नास्तिकांची खरी भीती हीच असते. भावना प्रबळ होण्याची आणि स्वतःवरचा ताबा सुटण्याची. रडायला येण्याची, नाचायला लागण्याची, उगीच हसण्याची, फिकीर सुटून जाण्याची. या सगळ्यांशी लढावं लागतं. सगळं कसं तर्कशुद्ध आहे, याची सारखी खात्री करून घ्यावी लागते. त्याकरता मग फिजिक्स लागतं, गणित लागतं, मानसशास्त्र लागतं, उत्क्रांतिवाद लागतो. जग खरं म्हणजे कोरडं आहे याची जाणीव लागते. आणि तरीपण कधी हळूच तर कधी जोराने, उधाण येतेच. मोगरा फुलला... म्हणून कौतुक वाटतंच! अचानकपणे भरून येतंच.

याला मानसशास्त्रात कोणी ‘ओशियानिक फिलिंग’ (Oceanic Feeling) म्हटले आहे. हे प्रत्येकाकडे असते कमी-जास्त प्रमाणात, पण असतेच. नास्तिकांकडे किंवा स्वतःला नास्तिक समजणाऱ्यांकडेही ते असते. त्यांची पंचाईत अशी की, ही आणि असल्या भावना ठेवायला त्यांच्या मनात कोनाडाच नसतो. त्यांनी तो केव्हाच प्रयत्नपूर्वक खालसा करून टाकलेला असतो. बिचारे!

हा कोनाडा नसणे ही भानगड फार त्रासदायक ठरू शकते. कुमार गंधर्वांच्या गाण्याच्या प्रेमात असलेले स्वतःला नास्तिक म्हणविणारे एक सद्‌गृहस्थ मला एकदा म्हणाले, ‘मन्या, त्यांचं गाणं आठवतं. अचानक आणि भलत्याच ठिकाणी; आणि ती तान अशी गळ्यापर्यंत येते बघ आणि बाहेरच पडत नाही! छेः! काय करावं रे? आता गळाच नाही तर गाणार कसं?’ नास्तिकत्वाचं असं काही तरी झालं आहे.

कवी विंदा करंदीकर नास्तिक समजले जातात. पण त्यांची ‘नाही रे झेपत’ ही कविता पाहा-

ते म्हणतात,

नाही रे झेपत प्रकाश प्रपात
साध्या आत्म्याला,
वाटतं, विरेल माझ्या जीवनाचं
ठिसूळ मडकं
चैतन्याच्या धारेत
आणि होईल
पाणीच गढूळ...

(पान 39, ‘मृद्‌गंध’ काव्यसंग्रह)

तर, असंच कारण नसताना आठवत होतं की, साने गुरुजींची म्हणून, कथामालेच्या कार्यक्रमात आधी एक कविता आपण म्हणत असू. हात जोडून, एकमेकांमागे रांगेत उभे राहून, ती म्हणायचो आपण. काही तरी, ‘कठोर त्या हिऱ्यापरी...’ आणि असे काही तरी, पण पुढे काय? प्रथम हे पुसट होते. ते कशाला हवे होते तेही काही इतके स्पष्ट नव्हते. पण काही तरी महत्त्वाचे होते खास.

मग चौकशी करू लागलो, तसे सेवादलवाले ओळखीचे खूप. सगळे जण म्हणाले, ‘काही तरी होती खरी, पण काही धड आठवत नाही बुवा.’ कोणी म्हणाले, ‘हो, आम्ही शाळेत असताना म्हणायचो खरे!’

अशीच होती ती आपली एक पोरांच्या माथी मारलेली, कविता. पण त्यात आहे काय? आठवेचना आणि सहज काही ती मिळेना!

पण जरा शोधल्यावर मिळाली. खूप बरं वाटलं. कविता कोणती, तर ‘पवित्र तारकां परी ही!’ मग ती गुणगुणू लागलो, सारखीच. इतरांना त्रास होईल इतकी सारखी म्हणू लागलो.

ती कविता आहे तशी, साधी-सरळ आणि भाबडी भासणारी, गुरुजींसारखीच!

पवित्र तारकां परी । गभीर अंबुधी परी॥
विशाल अंबरा सम । सदैव हो मती मम॥ 1 ॥
फुला समान कोमल । दवा परि सुनिर्मल॥
विनम्र त्या तृणासम । सदैव हो मती मम॥ 2 ॥
उदार पादपा परी । कठोर त्या हिऱ्यापरी॥
प्रसन्न पंकजा सम । सदैव हो मती मम॥ 3 ॥
उषेपरी समुत्सुक । फुलापरी हसन्मुख॥
समुद्यमी सरीत्सम । सदैव हो मती मम॥ 4 ॥
सुधीर पर्वतापरी । समान मृत्युचे परी॥
क्षमी वसुंधरे सम । सदैव हो मती मम॥ 5 ॥

कविता आहे जर ‘साधीभोळी’ तर मग मला काय वाटले एवढे त्यात ते सांगायला हवे. वर दिलेल्या कवितेच्या खालून दुसऱ्या ओळीत ‘समान मृत्यूचे परी’ असा उल्लेख आहे. तो दचकवणारा आहे. कमळ आणि फुलं यांच्या कवितेत आढळण्याला आपण सरावलो आहोत. पण हा मृत्यूचा उल्लेख अडखळवणारा आहे. मृत्यू सर्व सपाट करणारा आहे आणि तो सर्वांसाठीच आहे, हे आपण जाणतो. पण या मृत्यूला काही सम्यक दृष्टी आहे, असे गुरुजी इथे सुचवीत आहेत. आणि ती दृष्टी मला मिळो, अशी ते प्रार्थना करीत आहेत. या उपमेमुळे ही कविता एकदम गंभीर होते आणि वरच्या कडव्यामध्ये वापरलेल्या उपमांचे काय मूल्य आहे याची जाणीव आपल्याला होते. नाही तर फुलं, कमळं मनावर न घेण्याचे आपले प्रशिक्षण केव्हाच होऊन गेलेले आहे. ‘उषेपरी समुत्सुक’ किंवा ‘समुद्यमी सरीत्सम’ हे जरी अनोळखी असले तरी ते तसे बोचत नाही.

मुद्दा असा आहे की, ‘माणसाचे मन’ आणि ‘माणसाचा मेंदू’ हा विश्वातला सर्वांत मोठा चमत्कार आहे. फक्त माणसाचे मन आणि मेंदूच या कवितेत म्हटलेला स्वतःपलीकडे विचार करू शकतो. अशा दिव्य कल्पनेने माणूस व्यापला जाऊ शकतो. स्वतःपलीकडे जाऊ शकतो, म्हणण्यापेक्षा स्वतः हे विश्वच होऊन बसतो.

या कवितेतील उपमा अत्यंत चपखल आहेत. त्या साध्या आहेत. पण थोडा विचार करता जाणवते की, मुळात त्या सुचू शकतात यातच खूप काही आहे. त्या साध्या असणे हा गुण आहे, दोष नव्हे. त्या साने गुरुजींनाच सुचू शकतात.

या कवितेमध्ये खूप काही आहे. कल्पनेची अचाट पण सुसंगत अशी भरारी आहे. एक विशिष्ट तर्कशास्त्र आहे. मानवी जीवनाला काही हेतू असतो, त्यातून काही तरी गाठायचे असते असे स्पष्ट तत्त्वज्ञान यात आहे.

इथे मला प्रश्न पडला तो असा की, ही कविता कथामालेत कशी शिरली? तिची काय किंमत केली गेली? ती कोणी केली? साने गुरुजींना मृत्यूबद्दल काही तरी भुरळयुक्त आकर्षण होते ही सर्वज्ञात बाब आहे. त्याची छाया या कवितेच्या शेवटी स्पष्ट दिसते. त्यामुळे असे वाटते की, गुरुजींनी ही कविता लहान मुलांकरता लिहिलेली नाही. किंबहुना standard  लहान मुलांकरता, मोठ्यांच्या लेखी लहान मुले जशी असतात त्यांच्याकरता ही कविता नाही. गुरुजी स्वत:सकट त्यांच्यासारख्यांना ‘धडपडणारी मुले’ म्हणत असत. त्यांच्याकरता असावी का ही कविता? तर तसा काही विचार करता येईल. त्या वेळच्या प्रौढ लोकांनी ही कविता कशी वाचली असेल, कशी जोखली असेल हे कळणे आज कठीण आहे. किंबहुना, ती ज्या प्रकारे मुलांकडे ढकलण्यात आली त्यावरून मिळणारे उत्तर निराशाजनक आहे. जे गुण मला मिळावेत असे गुरुजींनी म्हटले आहे, ते कोणाही व्यवहारी माणसाला अत्यंत दुष्प्राप्य असे वाटणारे आहेत हे खरे. इतके

की, त्या वाटेने न गेलेलेच बरे असेही वाटणे समजायला कठीण नाही. पण मुद्दा तोच आहे. गुरुजी व्यवहारी नव्हतेच, अगदी त्याचे विरुद्ध टोक होते. पण म्हणून सुपरमॅन होण्याच्या लालसेची हेटाळणी करणे योग्य नाही.

ही कविता एखाद्या साधकाचे तत्त्वज्ञान असू शकेल अशी आहे. किंबहुना ते गुरुजींचे तत्त्वज्ञान आहे हे उघड आहे. ते इथे लिखित आणि स्पष्ट स्वरूपात आहे.

गुरुजींच्या या कवितेत आनंद आणि तृप्तता आहे. दिव्यत्वाची अनुभूती आहे. ते कधी कोणी नीट पाहिले आहे असे मला ठाऊक नाही. सेवा दलवाले कितीही ‘लिबरल’ असले तरी मला आठवते त्याप्रमाणे (या कवितेतील मृत्यूचा उल्लेख मुलांकरता योग्य नाही म्हणून!) यातील शेवटचे कडवे ‘एडिट’ किंवा ‘डिलीट’ केलेले असे. इतरही काही काटछाट किंवा ‘सुधारणा’ केली होती किंवा कसे आता समजणे कठीण आहे. पण मृत्यूचा उल्लेख या कवितेतून काढला तर चालणार नाही हे उघड आहे. ही कविता ज्यात पाचही कडवी आहेत (मृत्यूच्या उल्लेखासह) तीच योग्य वाटते. हिची मूळ रचना किंवा सांगाडा सुलभ असल्याने त्यात आणखी काही असणे शक्य आहे. किंबहुना या कवितेचे एक जरा वेगळे रूप मला सापडलेही. ते मुद्दाम खाली वेगळे देत आहे. पण आहे ते ठीक. इथून पुढे जायला हरकत नाही.

नास्तिकांची एक अडचण असते ती अशी की, त्यांच्याकडे प्रार्थनाच नाही. प्रार्थना म्हटलं की, त्यात मागणं येतं, देव येतो. ‘देव’ म्हटले की, यांची खटकी अडकते. जे किंवा जो अस्तित्वात नाही त्याच्याकडे काही मागून उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याला तर्कसंगत उत्तर सापडत नाही. हा झाला एक भाग. दुसरं असं की, ‘प्रार्थना म्हणणे’ ही क्रियाच नास्तिकांना जणू बाद होते. ती मानसिक स्थिती त्यांच्या नास्तिकतेमध्ये येऊच शकत नाही असे दिसते.

एकंदरीने असे दिसते की, पश्चिमात्य लोक आपल्यापेक्षा जास्त ‘कार्यशील आणि जिज्ञासू’ आहेत (आणि गंमत म्हणजे) अधिक प्रमाणात आस्तिक आहेत. मनात शंका आली की, तिचा खरेपणा पडताळून पाहायला ते लगेच सुरुवात करतात. पृथ्वीवर असा समाज नाही जो देवास्तित्व मानत नाही. मग देवास्तित्व मानणे हा मानवी मेंदूचा काही उपजत गुण आहे का? असे संशोधन तिकडे सुरू झाले आणि आता मानवी मेंदूमधील अशी एक जागा न्यूरॉलॉजीला ज्ञात झाली आहे जी इलेक्ट्रोड्‌स वगैरे लावून उत्तेजित केली तर त्यानंतर त्या माणसाची अशी खात्री होते की, त्याने देव पहिला आहे, त्याचा अनुभव घेतला आहे.

याचा अर्थ अर्थातच असा नव्हे की, देव आहे. याचा अर्थ एवढाच की, त्या व्यक्तीची तशी खात्री होते. आणि ते मत अतिशय ठाम असते. तार्किक वादाने त्या मतात फरक पडू शकत नाही आणि तसे मत बदलण्याकडे त्या व्यक्तीचा मुळीच कल नसतो. ती दिव्य, सुखद भावना सोडण्यास तो राजी नसतो. ही माहिती ‘मॅपिंग द माइंड’ या रिटा कार्टर या बाईंच्या पुस्तकात दिलेली आहे. आणि आता मेंदूतील हे स्थळ अज्ञात राहिलेले नाही. इतरत्रही तशी माहिती मिळू शकते.

इथं मुद्दा असा की, या तथाकथित नास्तिकांकडेही ‘ओशियानिक फिलिंग’ असतेच. विंदा करंदीकर या कवीच्या काव्याचे उदाहरण मी याकरताच वर दिले आहे. खरे तर, अधिक योग्य विधान असे होईल की, मानवी मनाची ती एक ऊर्मी निश्चितच आहे. अध्यात्मामध्ये अनेक प्रकारे हे येते. ‘अहं ब्रह्मोस्मि’ ही भावना काही आस्तिकांकरता राखीव नाही. पण नास्तिकांची अडचण अशी की, ती भावना ठेवायला ते मनात जागाच ठेवत नाहीत. त्यामुळे अशा भावना दडपून टाकल्या जातात. दुर्लक्षित केल्या जातात.

मला वाटतं, साने गुरुजींनी ‘पवित्र ताराकां परी’ या कवितेत ते साधले आहे. यात देवाचा उल्लेख नाही. पण मानवी मनाचा अमर्यादपणा आणि सूक्ष्मता यांचा नेमका वेध ही कविता घेते. ही कविता म्हणजे साने गुरुजींनी जणू नास्तिक लोकांकरता लिहिलेली प्रार्थना आहे. या रचनेबद्दल मी काही अधिक लिहिण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ती इतकी साध्या शब्दांत आहे. फक्त त्याकडे गांभीर्याने पाहावे एवढेच माझे म्हणणे आहे. तसे केले असता त्यात एकाखाली एक अर्थाचे थर सापडत जातात. माणसाच्या मनाची झेप आणि ताकद समजते. हेही लक्षात घ्यायला हवे की, हा चमत्कार असा विश्वव्यापीपणा फक्त मानवी मनच करू शकते. ते करण्याची जबाबदारी आपण घ्यायची का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आपलं मन असं असावं, माणसाचं मन असं असावं, याबद्दल कोणाचा मतभेद असेल असे मला वाटत नाही. प्रश्न उरतो व्यक्तिशः ते झेपण्याचा आणि तसं झालंच तर मग आपण सर्वच जण म्हणू शकतो, ज्ञानेश्वरांसारखं...

अनंगपण फिटले
माया छंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप
हो माये...
अधिक देखणे तरी...              

साने गुरुजींनी या त्यांच्या कवितेला ‘मागणे’ असे नाव दिले होते. पण ते भिडस्तपणामुळेच. मला वाटते, कवितेत त्यांनी जे मांडले आहे ते त्यांना साधले होते आणि जमले होते म्हणून त्याच्याकडून ते तसे शब्दरूपात उतरले. एरवी अशी पद्यरचना होणेच शक्य नाही. म्हणूनच की काय, त्यांची देहबोली, वागण्याबोलण्याची ढब, बसण्याची पद्धत तशी होती. सूक्ष्मात गेल्याशिवाय भव्यता, विराटता अनुभवता येत नाही असे काहीतरी दिसते. जे आपण नाही ते दाखविण्याच्या हव्यासाच्या ही उलट स्थिती आहे हे इथे सहजच लक्षात येते. हुकूमशाहीचा व्यत्यास असा काही असू शकतो?

सदैव हो मती मम ....

साने गुरुजी, अमळनेर, सन 1931.

(याच कवितेचे एक रूप? हेपण मला मिळाले.)

पवित्र तारकां परी । गभीर अंबुधी परी॥
विशाल अंबरा सम । सदैव हो मती मम॥ 1 ॥
फुला समान कोमल । दवा परी सुनिर्मल॥
विनम्र त्या तृणासम । सदैव हो मती मम॥ 2 ॥
उदार पादपा परी । कठोर त्या हिऱ्यापरी॥
प्रसन्न पंकजा सम । सदैव हो मती मम॥ 3 ॥
सुधीर पर्वतापरी । समान मृत्युचे परी॥
क्षमी वसुंधरे सम । सदैव हो मती मम॥ 4 ॥
उषेपरी समुत्सुक । फुलापरी हसन्मुख॥
समुद्यमी सरीत्सम । सदैव हो मती मम॥ 5 ॥
पिशापरी करीत मी । हसे रडे पडेन मी॥
मिळोत हे मला गुण । जगी कृतार्थ होईन॥ 6 ॥


साध्या-सरळ कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ-

गभीर : गूढ
अंबुधी : समुद्र
अंबर : आकाश
तृण : गवत
पादप : वृक्ष
पंकज : कमळ
सरीत्सम : नदीप्रमाणे
सुधीर : खंबीर
वसुंधरा : पृथ्वी
उषा : पहाट

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके