डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परिस्थितीला शरण न जाणाऱ्या आयानची कहाणी!!

आयानने डच लोकसभा निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. तिला तीन गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक म्हणजे- डच लोकांमध्ये हॉलंडमधील मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना सरकारी संरक्षण मिळवून देणे आणि अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करणे. दुसरी गोष्ट- म्हणजे इस्लाममध्ये सुधारणा घडवण्याच्या दृष्टीने चर्चा, वादविवाद सुरू करणे. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- मुस्लिम स्त्रीला तिच्या कोशातून बाहेर काढून, आपल्या अधिकारांसाठी लढा द्यायला प्रवृत्त करणे, प्रतिकार करण्यास शिकविणे. पण हे काम सोपे नव्हते, कारण मुस्लिम स्त्री अत्याचारासंबंधीची आकडेवारीच उपलब्ध नव्हती. खूप मेहनतीने हा मुद्दा तिने सभागृहात मांडला. पुष्कळ चर्चा आणि वादविवादानंतर मुस्लिम स्त्री अत्याचारासंबंधीची नोंद पोलिसांनी करावी, असा ठराव लोकसभेने मंजूर केला.

हे पुस्तक वाचून खाली ठेवलं, त्याला आज दोन दिवस उलटले; पण अजूनही ‘आयान’ने मनाला घातलेला वेढा काही सुटत नाही.

इतर धर्मांतील स्त्रियांपेक्षा मुस्लिम स्त्रीचं आयुष्य खूपच बंदिस्त असतं, हे माहीत होतं. पण ‘आयान’सोबत तिचं आयुष्य वाचताना मन विदीर्ण होतं. हे वादळी आयुष्य घोंघावत आपल्यावर आदळतं.

जातीय, धार्मिक परंपरांच्या ताणतणावांनी भरलेले लहानपण, धार्मिक रूढींच्या अधीन गेलेले तरुणपण यांमधून स्वतःशीच झगडत, धर्माची चिकित्सा करत, स्वतःलाच प्रश्न विचारत प्राप्त केलेल्या आत्मिक बळानं तिला बंड करण्याचं साहस मिळवून दिलं.

आयान लहानाची मोठी झाली ती इस्लामच्या रूढी-परंपरांच्या सावटाखाली. पण सुस्पष्ट विचारांना अमलात आणण्याचे धाडस तिच्या अंगी आले ते हॉलंडमध्ये भेटलेल्या जोहाना, ॲलन, मार्को व इतर डच स्वावलंबी, मुक्त व स्वतंत्र आचार-विचार असलेल्या लोकांमुळे. तसेच इंग्रजी पुस्तकांच्या माध्यमांतून प्रकर्षाने जाणवलेल्या ‘सभ्यता आणि व्यक्तिस्वातंत्र्य’ या दोन मूल्यांमुळे.

आयानचा जन्म आफ्रिकेतील अत्यंत गरीब, मागास अशा सोमालिया देशातला. तिचे अबेह (वडील) सोमालियाचा तेव्हाचा हुकूमशहा ‘सय्यद बारी’ याच्या विरोधातील बंडाचे ‘सोमाली मुक्ती संघटने’चे एक अग्रणी! म्हणून कायम दूरच राहिलेले. कधी तुरुंगात, तर कधी भूमिगत, तर कधी देशाबाहेर. त्यामुळे आयानचे कुटुंब सौदी अरेबिया, इथिओपिया आणि केनिया असं फिरस्तीवर राहिलं. तीन मुले व आजी या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेने आयानची आई कायम ग्रासलेली. आई व आजी दोघी धार्मिक, रूढी-परंपरेच्या जाळ्यात अडकलेल्या. त्यामुळे आयानचं बालपण करपलेलं. त्यात भर म्हणून आजीने दोघी बहिणींची (आयान व छोटी हवेया) केलेली सुंता (FGM - female genital mutilation). त्याचं वर्णन मनाचा थरकाप उडवणारं, सुन्न करणारं. इस्लाममध्ये हा पावित्र्याचा संस्कार मानला जातो. या वेळी आयान व हवेया होत्या अनुक्रमे अवघ्या पाच व चार वर्षांच्या.

आयानचा संघर्ष सोपा नव्हता. तिचा झगडा जसा इतरांशी होता, तसाच तो स्वतःशी पण होता. नैरोबीमधील मुस्लिम गर्ल्स स्कूलमध्ये ‘धर्मशिक्षण’ हा अनिवार्य विषय होता. हा विषय शिकविणाऱ्या सिस्टर अजीजांमुळे शाळेतील मुलींमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनाची एकच लाट उसळली होती. याच्या प्रभावाखाली आयान ‘सच्ची’ मुस्लिम बनली. ती पायघोळ काळा बुरखा वापरू लागली, रोज प्रार्थना म्हणू लागली, कुराणाचे पठण करू लागली, इतर धर्मीय मुलींना नरक-यातनांपासून वाचविण्यासाठी त्यांना मुस्लिम बनविण्याचा- सच्च्या धर्माचा संदेश देण्याचा प्रयत्न करू लागली. ‘स्वर्गप्राप्ती व नरकद्वार’ या संकल्पनांनी तिला कब्जात घेतलं होतं. अल्लाहला शरण जाण्याचा हा जणू राजमार्ग तिला सापडला होता.

अशातच आयानला समजलं की, तिच्या वडिलांनी दुसऱ्या बाईशी लग्न केलंय. आयान हादरली. कारण प्रत्येक वेळी लग्न केल्यावर वडिलांनी आधीच्या बायको-मुलांना वाऱ्यावर सोडलं होतं. आयानची आई ही तिच्या वडिलांची दुसरी बायको होती. आता त्यांनी तिसरी बायको केली होती. पण तिला उद्विग्न करणारी गोष्ट ही होती की- तिच्या वडिलांना कोणीही दोष देणार नव्हतं, त्यांना अनेक लग्नं करण्याची मुभा होती. आयाननं ठरवलं, काहीही झालं तरी आपल्या बाबतीत असं काही आपण घडू द्यायचं नाही. धर्मातील ज्या ‘आज्ञापालन व शरणागती’ या संकल्पनांनी आयानला भुरळ घातली होती, त्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. पवित्र कुराणातील नियम आणि रोज नजरेला पडणारं वास्तव यात जमीन-आस्मानाचा फरक आहे, हे आयानला दिसू लागलं होतं. कुराणानुसार कुठल्याही मुस्लिम स्त्रीला प्रेमाचा अधिकार नव्हता, तिला कशाचाही ताबा मिळत नव्हता, तिला निर्णयप्रक्रियेत स्थान नव्हते, तिच्या शब्दाला पुरुषाच्या शब्दाच्या अर्धीच किंमत होती. ती पुरुषाची गुलाम होती. तिच्यासाठी कुराणाशिवाय इतर पुस्तके (कथा, कादंबऱ्या) वाचणे हा धर्मद्रोह होता. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला काहीच स्थान नव्हते, ती केवळ मुलांना जन्म देणारी उपभोग्य वस्तू होती. हदिसच्या म्हणण्यानुसार, अगदी उंटावर स्वार असतानादेखील स्त्रीने नवऱ्याला शरीरसुख दिलं पाहिजे. यात कुठेही प्रेमाची देवाण-घेवाण दिसत नव्हती. ही सगळी वास्तविकता स्त्री-पुरुष समान नाहीत, हेच दर्शवीत होती. या जाणिवांनी आयान भडकून उठली, संतापली. आणि आपल्या धार्मिक श्रद्धांना तर्कांचा आधार आहे का, इस्लामला सत्याचा आधार आहे का- याचा शोध सुरू झाला.

केनियातील सोमाली व पाकिस्तानी तरुणांच्या ‘मुस्लिम बंधुभाव चळवळी’शी आयाननं स्वतःला जोडून घेतलं, जे धर्माचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत होते. पण तिथेही तिच्या पदरी निराशाच आली. तिथल्या चर्चाकेंद्रात दैनंदिन जीवनात कसे वागावे- तेही फक्त स्त्रीने, याचे नियम सविस्तरपणे सांगितले जात असत. उदा. समाजातील अनाचार टाळायचा असेल, तर स्त्रीने स्वतःला संपूर्ण झाकून घेतले पाहिजे. तिचे केस, ओठ, डोळे, हनुवटी, नाक, बोटे- इतकेच नाही, तर तिच्या उंच टाचांच्या चप्पल-बुटांच्या आवाजाने, तिने वापरलेल्या साबण/शॅम्पूच्या सुगंधानेसुद्धा पुरुषांची मनं विचलित होऊ शकतात. म्हणून स्त्रीने नेहमी घरातच बसावे. पुरुषांच्या मनात पापभावना निर्माण झाली, तर त्याला सर्वस्वी स्त्रीच जबाबदार असते. आणखी एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती.

या चळवळीतील सर्वांची खात्री पटली होती की, इस्लामला नष्ट करण्यासाठी जगभरातल्या दुष्ट शक्तींनी (ज्यू व पश्चिमी देश) युद्ध पुकारलं असून, इस्लामचं रक्षण करायचं असेल तर जिहादमध्ये सामील झालंच पाहिजे. ‘संपूर्ण जगात इस्लामचं राज्य निर्माण करायचं’ या ध्येयाने सारे प्रेरित झाले होते. तिला जाणवले की, धर्माच्या चिकित्सेपेक्षा-तर्कशुद्धतेपेक्षा सोईस्करपणाला अधिक महत्त्व दिलं जातंय. म्हणून तिनं या चर्चासत्रांना जाणं सोडून दिलं.

प्रेमविवाह म्हणजे मूर्खपणा, शरीरसंबंध वाईट, प्रेमभावना जागृत होणे म्हणजे पाप- या किशोरवयीन आयानच्या धारणा पक्क्या होत्या. पण त्याच वेळी ती वाचत असलेल्या इंग्रजी कादंबऱ्यांमधील नायिका प्रेमात पडायच्या, प्रेमाखातर त्या घरच्यांशी लढायच्या. आर्थिक व सामाजिक भेद त्यांच्या गावीही नव्हते आणि महत्त्वाचे म्हणजे, त्या आपल्या पसंतीच्या पुरुषाबरोबर लग्न करायच्या. आयान म्हणते- या पुस्तकांमधील नैतिक पेच रोचक तर होतेच, पण त्यांची उत्तरेही तर्कसंगत होती. हदिस वाचण्यापेक्षा ही पुस्तके वाचणे तिला आवडत होते.

तारुण्यसुलभ प्रेमभावना आयानलाही खुणावत होतीच. तिच्या धार्मिक धारणा आणि तिचे विचार यात द्वंद्व सुरू झाले. ती म्हणते- माझं मनोविश्व जणू दुभंगल्यासारखं झालं होतं. तिला आई-वडिलांनी निवडलेल्या अनोळखी पुरुषाबरोबर लग्न करायचं नव्हतं. तिलाही प्रेमात पडायचं होतं- जो तिला समजून घेईल, जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल, ती वाचत असलेल्या पुस्तकातील नायकाप्रमाणे प्रियाराधन करेल, अशा नायकाची तिला ओढ होती. आस होती. तिच्या लक्षात आलं, आपली सुंता जरी झाली असली तरी शरीरसुखाविषयीची आपली इच्छा कमी वा नष्ट झालेली नाही. महमूदबद्दल तिला वाटणारी ओढ म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण होते आणि तेवढ्यासाठीच तिने महमूदशी चोरून लग्न केले. महमूदने प्रणयाराधन केले नाही. तिने असे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महमूदने ‘तुला याचा पूर्वानुभव आहे का?’ असे विचारले. आपण ‘पाक’ नाही असा महमूदने गैरसमज करून घेऊ नये, म्हणून तिने माघार घेतली. सगळा एकतर्फी मामला झाला होता. तिची घोर निराशा झाली होती. तिची सुंता झालेली असल्याने तिला मरणप्राय वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. तिला या संबंधातून काही आनंद वा सुख अजिबात मिळाले नव्हते. दुसऱ्या दिवशी महमूद नोकरीकरता रशियाला निघून गेला तो कायमचाच.

अंतर्गत यादवी युद्धाने सोमालिया धुमसत असताना, तिथून स्वतःची सुटका करून घेऊन केनियाच्या सरहद्दीवर आलेल्या निर्वासितांना केनियात प्रवेश करण्यास मदत करणारी आयान... एकट्या-दुकट्या निर्वासित स्त्रीवर केनियन सैनिकांकडून होणाऱ्या अत्याचाराने पिळवटून निघणारी आयान... मरणासन्न बाळाला वाचविण्यासाठी झटणारी आयान... आईचा विरोध डावलून आपल्या अनौरस मुलाला एकटीने  सांभाळणाऱ्या फौजियाला जिला सर्व सोमालींनी बहिष्कृत केले होते, तिला निग्रहाने घरी आश्रय देणारी आयान खूपच भावते.

धर्मानुसार स्त्री ही चंचल वृत्तीची असते, तिला तर्कनिष्ठ राहता येत नाही. तिच्या मनावर अदृश्य शक्तींचा ताबा असतो म्हणून ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणूनच मुलीचे लग्न ठरविण्याचा अधिकार फक्त तिच्या वडिलांना किंवा घरातील इतर पुरुषांनाच होता, हे आयान जाणून होती. परंतु आपल्या वडिलांनी केवळ दोन तासांपूर्वी मशिदीत भेटलेल्या कॅनडाच्या ओसमान मुस्साशी आपलं लग्न ठरवलंय, हे ऐकून ती भयंकर घाबरली. तरीही तिने ‘हे लग्न मला करायचं नाही, मी निकाहला येणार नाही’ असं आपल्या वडिलांना ठासून सांगितलं. वडील शांतपणे म्हणाले, ‘तुझी गरज नाही.’ आणि इस्लामी कायद्यानुसार आयानच्या अनुपस्थितीत तिचा निकाह पार पडला.

लग्नानंतर ओसमान मुस्सा कॅनडाला निघून गेला. आयानकडे कॅनडियन व्हिसा नव्हता. तो मिळायलाही फार वेळ लागणार होता. म्हणून तिने जर्मनीमार्गे कॅनडाला जावे, असे ठरले. जर्मनीत आपल्या चुलत्यांकडे आल्यावर तिने पाहिलं- तिथं कसल्याच प्रकारचं सामाजिक बंधन नव्हतं. स्त्री-पुरुषांच्या वागण्या-बोलण्यात खुलेपणा होता. स्त्रियांनी तोकडे कपडे घातले म्हणून त्यांना कोणी वेश्या म्हणत नव्हतं, की कोणी पुरुष लंपटपणा करत नव्हता, की अनाचारही माजला नव्हता आणि मुख्य म्हणजे, तरीही तिला तिथं सुरक्षित वाटत होतं. इथंच तिला नको असलेल्या लग्नातून सुटका करून घेण्याचा मार्ग सापडला. तो म्हणजे, हॉलंडला जाण्याचा मार्ग.

हॉलंडच्या निर्वासितांच्या छावणीत असताना धर्ममार्तंडांना शांत पण निर्भीडपणे तोंड देत तिच्या अनुपस्थितीत तिच्या मनाविरुद्ध झालेला निकाह नाकारत, धर्माच्या बेड्या तोडत तिनं घेतलेला ‘स्व’चा शोध आणि केवळ स्त्री म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळविण्यासाठी दिलेला लढा असामान्य तर आहेच, पण तितकाच प्रेरणादायीही आहे. अवघ्या बाविसाव्या वर्षी आयाननं आपल्या नव्या आयुष्याकडे झेप घेतली. जर्मनीतून थेट हॉलंड गाठलं. हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत प्रवेश मिळविला. डच भाषा शिकून घेतली. दुभाष्याचं काम करता-करता विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली, इतिहासाचा अभ्यास केला.

आयानवर हॉलंडमधील सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा खूप मोठा प्रभाव आहे. ती म्हणते, ‘‘हॉलंड म्हणजे ‘मुक्त विचारांचे माहेरघर’ होते, प्रत्येक व्यक्तीला समान सामाजिक दर्जा आणि विचारस्वातंत्र्य बहाल करणाऱ्या या देशात ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान देण्याची वा धर्माची तर्कशुद्ध चिकित्सा करण्याची मुभा होती.’’ इथल्या शांत, सुखी आयुष्याने आयानला भुरळ तर घातलीच; पण धर्माने लादलेल्या वेदना, छळ, दुःख, अत्याचार आणि अज्ञानाचे होणारे भयंकर परिणाम यांची तीव्र जाणीवही करून दिली. हॉलंडमधील स्त्रिया शिकत होत्या, नोकरी करीत होत्या, स्वतःच्या मनाप्रमाणे खर्चही करित होत्या, प्रवास करीत होत्या, मालमत्ता खरेदी करीत होत्या आणि आवडीच्या पुरुषाशी लग्नही करीत होत्या. पण हॉलंडमध्ये राहणारी मुस्लिम स्त्री यापैकी काहीही करू शकत नव्हती, याचे तिला दुःख होते. त्यासाठी तिची तगमग होत होती.

अशा स्थित्यंतराच्या काळात तिला एका कौटुंबिक दुःखाला सामोरे जावे लागले- हवेया या तिच्या लहान बहिणीचा मृत्यू. हुशार, प्रामाणिक, लढाऊ बाण्याची, कणखर, बुरख्याला हिडीस समजणारी. आईच्या इच्छेपुढे मान न तुकवणाऱ्या हवेयाच्या अकाली जाण्याने आयानचा पूर्वायुष्याचा उरलासुरला धागाही तुटला होता. हवेयाच्या मानसिक आजाराचं कारण लहानपणी भोगलेल्या यातना, दुःख यामध्येच असावं, असं आयानला वाटतं.

कुराणाच्या अभ्यासांती अखेर आयानने ‘ईश्वर आणि त्याची सत्ता’ या संकल्पनेलाच छेद दिला. ती इस्लाम व कुराणावर चिकित्सक लेख लिहू लागली. धार्मिक मूलतत्त्ववाद, इस्लाम व स्त्रियांचे अधिकार यावर स्फोटक भाषणे देऊ लागली. तिला टीव्ही व वृत्तपत्रांतून प्रसिद्धी मिळू लागली. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवायचे असेल, तर कुराणावर आधारित शाळा बंद करून त्यांची सरकारी मदत बंद करण्याचे आवाहन करू लागली. फक्त मुस्लिम शाळा बंद करणे हे भेदाभेद केल्यासारखे होईल, म्हणून सर्वच धर्माधारित शाळांची सरकारी मदत बंद करण्याबाबत व घटनेचं संबंधित कलमच रद्द करण्यात आलं पाहिजे, अशी भूमिका तिने मांडली.

आयानने डच लोकसभा निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. तिला तीन गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक म्हणजे- डच लोकांमध्ये हॉलंडमधील मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना सरकारी संरक्षण मिळवून देणे आणि अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करणे. दुसरी गोष्ट- म्हणजे इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने चर्चा, वादविवाद सुरू करणे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- मुस्लिम स्त्रीला तिच्या कोशातून बाहेर काढून, तिला आपल्या अधिकारांसाठी लढा द्यायला प्रवृत्त करणे, प्रतिकार करण्यास शिकविणे. पण हे काम सोपे नव्हते, कारण मुस्लिम स्त्री अत्याचारासंबंधीची आकडेवारीच उपलब्ध नव्हती. खूप मेहनतीने आपला मुद्दा तिने सभागृहात मांडला. पुष्कळ चर्चा आणि वादविवादानंतर मुस्लिम स्त्री अत्याचारासंबंधीची नोंद पोलिसांनी करावी, असा ठराव लोकसभेनं मंजूर केला; पण प्रायोगिक तत्त्वावर फक्त दोनच पोलीस विभागांत तो लागू झाला. (हॉलंडमध्ये एकूण पंचवीस विभाग आहेत). आकडेवारी प्रसिद्ध होताच आयानला देशभरातून पाठिंबा मिळाला. (अर्थात त्यातील बहुसंख्य डच होते).

आता आयानने आपली मोहीम आणखी धारदार बनविली. आपले प्रत्येक म्हणणे तिने कुराणातील दाखले देऊन सिद्ध केले होते. ‘प्रेषित मुहम्मद कोण होते?’ या तिच्या लेखाने मुस्लिम जगात खळबळ माजली. तिला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. तिचे चारित्र्यहनन केले जाऊ लागले. धर्माने स्त्रियांवर लादलेली गुलामी, दडपशाही, जुलूमशाही याचे पुरावे मांडून ती धर्माची कठोर चिकित्सा करू लागली. अशा वातावरणात तिने याच विषयावर थिओ व्हॅन गॉग या डच निर्माता-दिग्दर्शक मित्राच्या मदतीने एक लघुपट तयार केला शरणागती (Submission) याची किंमत थिओला आपल्या मृत्यूने चुकवावी लागली. मुस्लिम जिहादींनी त्याची क्रूर हत्या केली. डच सरकारने आयानला दिलेल्या कडक सुरक्षा-व्यवस्थेमुळेच ती सुरक्षित राहिली होती.

इस्लामिक मूलतत्त्ववादाला तिनं दिलेलं खुलं आव्हान व त्यामुळे ‘थिओ व्हॅन गॉग’ या मित्राची अतिरेक्यांनी केलेली हत्या, आपल्या राजकीय अस्तित्वाला निर्माण झालेला धोका आणि नागरिकत्व रद्द होण्याची समोर उभी ठाकलेली भीती- या सगळ्याला तिनं धीराने तोंड तर दिलंच; पण पाशवी रूढी, परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या स्वातंत्र्यावर, तिच्या तन-मनावर ठोकलेल्या बेड्या तोडण्यासाठीचा आपला लढा आयाननं निर्धाराने पुढे चालूच ठेवला.

आयानची लेखनशैली प्रवाही आहे. तिचा सुन्न करणारा जीवनप्रवास थेट काळजाला भिडतो. कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. आयान आपल्या चुकाही प्रांजळपणे कबूल करते. आपल्या परिघाबाहेर जाऊन आपल्या वैचारिक कक्षा रुंदावण्यास हे आत्मचरित्र मोलाची मदत करते.

इन्फिडेल : माझी जन्मकहाणी
लेखिका : आयान हिरसी अली । अनु. नीला चांदोरकर
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
पृष्ठे 466, किंमत रु. 410/-

Tags: Infidel: My Life weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके