डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

डायनाने घटस्फोट घेऊन आपल्या जीवनाचा डाव पुन्हा एकदा नव्याने मनासारखा मांडायचे ठरवले. आपल्या व्यक्तिगत उदासीला आणि दुःखाला आवर घालण्यासाठी तिने देशोदेशी प्रवास केला. जगभरातल्या दुःखितांच्या रुग्णांच्या आणि गरिबांच्या दुःखावर फुंकर घालताना आपल्यातील वात्सल्य, मातृभाव यांचा वर्षाव तिने त्यांच्यावर केला.

एखाद्या गुलाबकळीसारखी ती अतिशय मोहक होती. उत्फुल्ल चंद्रिकेसारखे तिचे व्यक्तिमत्त्व शांतशीतल होते. तिच्या बुद्धिमत्तेचे तेज तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होते. अशी एका उमराव घराण्यातली कन्या डायना स्पेन्सर प्रिन्स चार्ल्सबरोबर विवाह करून ब्रिटनवी युवराज्ञी बनली. राजप्रासादात येताना आपल्या संसाराच्या सुखाची स्वप्ने रंगवणाऱ्या डायनाला तिने अपेक्षिलेले सुख मात्र मिळाले नाही. वरकरणी सारे काही आलबेल होते पण पतीच्या प्रतारणेमुळे दुखावलेले डायनाचे मन अंतऱ्या मी अधिकच दुःखी होत गेले. तिने राजघराण्याला वारस दिले. मात्र खऱ्या सुखाच्या शोधात तिनेही मित्रमंडळी जमवली, कदाचित नवऱ्याच्या प्रेमप्रकरणांना प्रत्युत्तर म्हणून! हळूहळू तिच्या लक्षात येत गेले- राजप्रासादातल्या चार भिंतीत आपले आयुष्य वाया चालले आहे. राजघराण्याचे खोटे नीतिनियम, दांभिकता आणि पोकळ इभ्रत यांची बंधने जेव्हा मऱ्या देबाहेर काचू लागली तेव्हा तिने धाडसी निर्णय घेतला. आपली मुले, आपला पती, राजपरिवार, एवढेच नव्हे तर आपला देश हे सारे सोडून देऊन तिने प्रिन्स चार्ल्सपासून घटस्फोट घेतला. 

ब्रिटनची युवराज्ञी म्हणून सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या डायनाचा आता पत्रकार आणि छायाचित्रकार यांनी पाठलाग सुरू केला. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, काय खाते, पिते-साऱ्यांचा हिशेब  तिच्यापेक्षा पत्रकारांपाशी अधिक राहू लागला. तिचे वेगवेगळ्या मित्रांबरोबरची छायाचित्रे, तिच्या जीवनाच्या सुरस कहाण्या खोट्या नाट्या स्वरूपात छापून त्यातून अमाप पैसे कमावण्याची जणू त्यांच्यात स्पर्धा लागली. डायनाचे व्यक्तिगत जीवन खासगी उरले नाही. नको तिथे नको तेव्हा नाक खुपसणाऱ्या पत्रकारांनी तिला अगदी जेरीस आणले. डायनाने घटस्फोट घेऊन आपल्या जीवनाचा डाव पुन्हा एकदा नव्याने मनासारखा मांडायचे ठरवले. आपल्या व्यक्तिगत उदासीला आणि दुःखाला आवर घालण्यासाठी तिने देशोदेशी प्रवास केला. जगभरातल्या दुःखितांच्या रुग्णांच्या आणि गरिबांच्या दुःखावर फुंकर घालताना आपल्यातील वात्सल्य, मातृभाव यांचा वर्षाव तिने त्यांच्यावर केला. 

परक्याची पीडा जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपणही दुःख सोसावे लागते हे तिला या काळात पूर्णपणे उमजले. डायनाच्या याही सगळ्या प्रयत्नांना अफाट प्रसिद्धी मिळाली. लक्षावधी लोकांच्या कौतुकाचा विषय तर ती होतीच, दुःखितांबद्दलचा तिचा कळवळा जेव्हा सर्वांना जाणवला तेव्हा तर तिला जनमानसात अधिकच आदराचे स्थान प्राप्त झाले. देखण्या व्यक्तिमत्त्वाची केवळ सौंदर्यवतीच नव्हे तर बुद्धिमतीही असलेली डायना आज या पृथ्वीतलावर नाही. आपल्या मित्राच्या संगतीत सुखाचे चार क्षण निवांतपणे चालवणेही तिच्या नशिबी नव्हते. तिचे व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर आणणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांतील गिधाडे त्या निर्वात आयुष्यावरही तुटून पडली. पण आता तिला त्याचे काही सुखदुःख नाही. त्यांच्याबद्दल तिची काहीही तक्रार नाही. 

आता तक्रार आहे ती आपली. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणाऱ्या चाहत्यांची. सर्वसामान्य नागरिकांची. विशेष महत्त्वाच्या व्यक्ती, चित्रपट तारे-तारका, राजघराण्यातली मंडळी यांच्यामागे प्रसिद्रिमाध्यमांनी किती लागावे? त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे धिंडवडे काढून आपली तुंबडी भरण्याचा यांना काय अधिकार? त्यांचे एकेक कृत्य पाहिले म्हणजे असे वाटते, ही प्रसिद्धिमाध्यमे, पत्रकार, छायाचित्रकार म्हणजे एक प्रकारची माफियांची टोळीच आहे. माणसांना स्वतःचे आयुष्य सुखाने जगू न देणारी. गिधाडांसारखी त्यांच्यावर सदैव टोच्या मारून त्यातच विकृत आनंद मिळवणारी.

सर्वसामान्यांसारख्याच अतिविशिष्ट व्यक्तींनाही आयुष्याच्या लहानसहान सुखापासून वंचित करणारी. यांची ही अरेरावी किती काळ चालू द्यायची हा खरा प्रश्नच आहे. फ्रान्समध्ये परिसजवळच्या एका ठिकाणी सुटीसाठी गेलेली डायना आणि तिचा मित्र अलू फायेद हे दोघेही मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर पडले होते. लोकांच्या नजरेपासून दूर राहण्याचा डायनाचा हा प्रयत्न फसला. पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी त्या दोघांची गाडी बाहेर निघालेली पाहिली आणि तशा अवेळीही मोटरसायकल्सवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना चुकवताना डायनाची मर्सिडीज गाडी एका भुयारी मार्गाच्या भिंतीवर वेगात आदळली आणि चार-पाच पलट्या खाऊन तिचा चक्काचूर झाला. एका न संपणाऱ्या पाठलागाची अखेर डायनाच्या मृत्यूमध्ये झाली. या दुर्घटनेनंतर आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

डायनाचा मित्र मुस्लिम असल्याने ब्रिटिश राजघराण्याचा आणि जनतेचा या संबंधांना छुपा विरोध होता. डायनाच्या गाडीच्या चालकाने प्रमाणाबाहेर अल्कोहोल घेतले होते. या दोघांच्या मृत्यूमागे काही प्रमाणात वांशिक भेदभाव असण्याचीही शक्यता होती... अनेक गोष्टी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यांचा मथितार्थ काहीही असो. आज वाटते ते एवढेच की डायनाचा मृत्यू ही केवळ दुर्घटना नाही. तिच्या खासगी आयुष्यात नको इतके डोकावून प्रसिद्धिमाध्यमांनी ही नाजूक गुलाबकळी निर्दयपणे चिरडून टाकली आहे.

Tags: घटस्फोट  ब्रिटीश प्रिन्स चार्ल्स डायना स्पेन्सर संगीता बापट Divorce British Prince Charls Dayna Spensar Sangita Bapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके