डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लेखक-दिग्दर्शक जेव्हा आपल्याला अभिप्रेत आशयाशी प्रामाणिक राहून  काम करतो, तेव्हाच असे चांगले सिनेमे बनतात. फालतूपणा टाळून  विषयाशी प्रामाणिक राहून सरळ सिनेमा बनवणे ही चांगल्या चित्रपटाची सुरवात असते असे मानले, तर चांगल्या मराठी सिनेमाची ही सुरवात आहे, असे नक्कीच म्हणता येईल. आता याच वाटेवर मराठीत श्रेष्ठ चित्रपट नक्की  बनेल, असे म्हणायला हरकत नाही. अलीकडे बऱ्याच तद्दन वाईट किंवा  जरा बऱ्या सिनेमांबद्दल इतके चांगले आणि सुपरलेटिव्ह बोलले जात होते  की, त्या पार्श्वभूमीवर फॅन्ड्री एक सुखद अपवाद ठरलाय.  

 

गेली काही वर्षे ‘मराठी चित्रपटाला पुन्हा चांगले दिवस आले’, ‘मराठी चित्रपटांचे  सुवर्णयुग आले’, ‘आता मराठी सिनेमा जागतिक झाला’, ‘वैश्विक सिनेमाने मराठी  चित्रपटाची दखल घेतली’  वगैरे विधाने वारंवार ऐकू येत आहेत. ‘श्वास’ ऑस्करला पाठवला  तेव्हापासूनच हे सुरू झाले. पण तरीही ज्यांनी माजिद मजिदी, रोमन पोलन्स्की, स्टॅन्ली कुब्रिक, अलेजांद्रे गोन्जालेज, किम कु डक, स्कॉर्सेसी, सत्यजित रे, मृणाल सेन, कोएन ब्रदर्स, अब्बास कियरोस्तामी, असगर फरहादी वगैरे दिग्दर्शकांचे सिनेमे पाहिले आहेत; त्यांना या विधानांमधला पोकळपणा माहीत होता. याचे कारण चांगल्या सिनेमाचे पहिले लक्षण म्हणजे - पटकथेतला अनावश्यक फालतूपणा, - सवंग आणि बाष्कळ विनोद, - अनाठायी घुसडलेली गाणी; आणि - बेगडी भावुकता. या चार घटकांचा पूर्ण अभाव हे असते.

हे चार घटक म्हणजे चित्रपटाच्या गुणवत्तेचा घात  करणारा सवंग आणि अप्रामाणिक प्रेक्षकानुनय होय. हे टाळल्यानंतरच चांगला सिनेमा सुरू  होतो आणि मग दिग्दर्शकाच्या प्रतिभेनुसार श्रेष्ठतेची वाट चालतो. कबूल करा ना करा; पण  सत्य हेच आहे की, अलीकडचे काही मराठी चित्रपट उल्लेखनीय असले तरी शेवटी ‘देऊळ’मध्ये आयटेम साँग म्हणावे असे गाणे होते, ‘वळू’मधले कित्येक विनोद बाष्कळ होते, ‘श्वास’ किंवा ‘अनुमती’मध्ये बेगडी भावुकता होती. हे सगळे चित्रपट चांगले होते, नक्कीच  उत्तम होते, पण श्रेष्ठ सिनेमाचे पहिले लक्षण म्हणजे त्या चार प्रेक्षकानुनयी घटकांचा पूर्ण अभाव  त्यात नव्हता, हे मान्य करायला हवे. त्यामुळेच त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘श्रेष्ठ’ चित्रपट म्हणून दखल घेतली गेली नाही. पण आपल्याला थोडं काही बरं दिसलं की, त्याचे वैश्विक  सोहळे करायची घाई फार असते. थोडे आत्मपरीक्षण केले की आपले स्थान कुठे आहे ते  कळते. पण तरीही सत्य हेच आहे की, आपण अजूनही थोडाफार चांगला सिनेमा बनवला तरी  कुठे तरी प्रेक्षकानुनय करायला जातो आणि दुय्यम प्रतीचाच सिनेमा बनवतो. ‘फॅन्ड्री’  या नागराज मंजुळेच्या सिनेमाचे महत्त्व असे की, तो त्या चार प्रेक्षकानुनयी  घटकांचा जवळजवळ संपूर्ण त्याग करतो. हे फार फार महत्त्वाचे आहे आणि हे नीट समजून  घ्यायला हवे. अर्थात आत्तादेखील काही उत्साही मंडळी लगेच ‘फॅन्ड्री’ची तुलना ‘पथेर  पांचाली’ किंवा ‘बायसिकल थीफ’शी करायचे बालिश उद्योग करताहेत, पण ते सोडा.

महत्त्वाचे म्हणजे फॅन्ड्रीमध्ये चित्रपटाची मागणी नसल्याने  गाणी नाहीत. (ते अजय-अतुलचे थीम साँग वगैरे मी गृहीतच धरत नाही, हे ध्यानात घ्या.) फॅन्ड्रीमध्ये अगदी एखादा अपवाद सोडला तर सवंग विनोद नाही. अनेक प्रसंगी मोह  व्हायची शक्यता होती, तरीही बेगडी भावुकता नाही. आणि  मुख्य म्हणजे पटकथेत मुख्य थीमची गरज नसलेले फालतू  प्रसंग नाहीत. (उदाहरणच द्यायचे तर शालिनीचा पर्स्पेक्टिव्ह, तिचा प्रतिसाद-प्रतिक्रिया चित्रपटाच्या थीमला अभिप्रेतच  नाही, त्यामुळे नागराज मंजुळेने तो भाग मुळीच आणला नाही.) शिवाय मला वाटते- जाहिराती आणि प्रोमोज काही  का असेनात, नागराज मंजुळेला स्वत:ला पक्के ठाऊक असावे  की, हा चित्रपट प्रेमकथा किंवा तथातथित लव्हस्टोरी नाही; तर प्रेम या भावनेची कथा आहे. (जसे भलताच भडक आणि  बेगडी असला तरी अमिताभचा ‘त्रिशूल’ हा सिनेमा ‘सूड’ या  भावनेची कथा होता.) त्यामुळे प्रेमकथेला आवश्यक  असलेली तथाकथित गाणी, दोघांचे ‘प्रेममय’ संवाद वगैरे  फालतूपणा नागराज मंजुळेने पूर्णपणे टाळले आहेत.

दुर्दैवाने  काही जण ‘फॅन्ड्री’ची तुलना ‘शाळा’ चित्रपटाशी करतात, तेही चुकीचेच आहे. पौगंडावस्थेत प्रेम आणि लैंगिकता या  गोष्टींची ‘चाहूल’ हे ‘शाळा’चे आशयकेंद्र होते, पण ‘फॅन्ड्री’चे  आशयकेंद्रच निराळे आहे. अधिक व्यापक आहे. काय आहे ‘फॅन्ड्री’चे गाभ्याचे प्रतिपादन?  मला जे प्रतीत झाले ते नागराज  मंजुळेला अभिप्रेत असेलच, असा माझा दावा अथवा आग्रह  नाही; पण मला वाटले ते सांगतो. प्रेमासारखी मूलभूत भावनादेखील मानवनिर्मित  जातीपातीच्या भिंतीमध्ये चिणली जाते, तेव्हा मोठ्यांच्या जगात नुकताच प्रवेश करू पाहणाऱ्या मुलाला मोठ्यांच्या जगाचीच  विकृती दिसायला लागते. आणि नेमकं तेच वय बापाविरुद्ध बंड करायचं असल्याने फॅन्ड्रीचा नायक शेवटी फेकतो तो (अतिचर्चित!) दगड. खरे तर बाप ज्या दांभिक जगाचं प्रतिनिधित्व (मुलीच्या लग्नाच्या बाबतीतल्या तडजोडी, लाचारी वगैरे) करतो; त्या दांभिक जगावर तो दगड फेकतो. या  अर्थाने ‘फॅन्ड्री’चा विचार ‘शाळा’पेक्षा ‘कोसला’च्या संदर्भात  करता येईल.

फॅन्ड्री ही अकोळनेर या नगरजवळच्या छोट्या  गावातली कहाणी. जांबुवंत कचरू माने हा दलित मुलगा या कथेच्या केंद्रस्थानी आहे. शालू या उच्चवर्णीय मुलीवर त्याचे  प्रेम आहे. अर्थात या प्रेमाची तिला ना कल्पना आहे, ना तमा. पण हा जांबुवंत ऊर्फ जब्या मनोमन तिच्यावर जीव लावून बसला  आहे. सतत तिचेच विचार आणि तिच्या नजरेत भरण्यासाठी  निरनिराळे उद्योग. पण तो खालच्या जातीचा आहे आणि ती  वरच्या जातीची गोरी मुलगी आहे, या वास्तवाने त्याच्या  स्वप्नांचा चुराडा होतो. हे अन्याय्य वास्तव जब्याला समजून  येण्याची ही तरल पण दाहक कथा. (अन्यायाची कथा आणि  अन्याय्य वास्तव निरागसता आणि तारुण्य यांच्या सीमेवरच्या  मुलाला ‘समजण्याची’ कथा यातला फरक समजून घेतला, तर ‘फॅन्ड्री’ कळायला अधिक मदत होईल.) हे असलं अमंगळ  काही नसलेलं निरागस सुंदर जग म्हणजे जब्या जिच्या मागे  लागलाय ती काळी चिमणी- असाही एक पदर या कथेला आहेच. यामुळेच फॅन्ड्रीमध्ये पददलितांवरचा अन्याय भडक  स्वरूपात न दाखवता तो सूचकतेने पोचतो, हे त्याचे एक यश आहे.

हौदात पडलेलं डुकराचं पिल्लू उचलायला जब्याला  सांगणे, त्याने नुसते शालूकडे बघताच पाटलाच्या पोराने गुरकावणे, मिरवणुकीत नाचत असताना अचानक त्याला  बाहेर काढून डोक्यावर दिव्याची बत्ती देणे... अशा बारीक- सारीक प्रसंगांतून हे अन्याय्य वास्तव जब्याचं विश्व  काळवंडत जाते. आणि त्यातूनच शेवटचा जब्याचा उद्रेक  हळूहळू जब्याच्याच मनात नाही तर आपल्याही मनात बिल्ड  होतो, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्थात त्या अन्यायाची प्रतिक्रिया  म्हणून डॉ.आंबेडकर वगैरे महापुरुषांचे फार मोठे फोटो पुन:पुन्हा कळीच्या प्रसंगात दाखवणे,  हा फॅन्ड्रीला कमकुवत  करणारा बाळबोध भाग आहे. असाच दुसरा भाग म्हणजे  शाळेत राष्ट्रगीत सुरू होताच जब्याने स्तब्ध उभे राहणे  समजण्यासारखे आहे; पण आत्ता डुक्कर पकडणे हाच जीवन- मरणाचा प्रसंग असलेला त्याचा निरक्षर अडाणी बाप आणि  सारे कुटुंबच शिस्तीत उभे राहते, हादेखील ढोबळ  बाळबोधपणा. (फॅन्ड्री चांगला असूनही ‘श्रेष्ठ’तेच्या वाटेला  जात नाही याचे कारण असे काही ढोबळ आणि बाळबोध  भाग. श्रेष्ठ चित्रपटात प्रेक्षकाच्या प्रतिभेवर विश्वास ठेवून असे  भाग अधिक सूचकपणे (सटली) दाखवले जातात. जे  प्रेक्षकाला जाणवते आहे ते असे अधोरेखित करण्याची गरज  नसते.)

पण अशा काही खटकणाऱ्या बाबी सोडल्या तर जब्याचा उद्रेक समजण्यासारखा आहे; नुसताच समर्थनीय नाही तर अटळ आहे, आवश्यकच आहे. अभिनयाच्या बाबतीत सोमनाथ अवघडे या मुलाने  जब्याच्या भूमिकेत आपल्या समर्थ खांद्यावर अवघा चित्रपट  पेलला आहे. त्याचे प्रेमात पडून फिल्मी स्टाइलने नटणे वगैरे  ‘थेट गँग्ज ऑफ वासेपूर (भाग 2)’ मधल्या नवाजुद्दिनची  आठवण करून देणारे आहे. त्याचे काही लुक्स ग्रेट आहेत. त्याचा किंचित खर लागलेला अस्सल पौगंडावस्थेतला  आवाज त्याची भूमिका अधिकच विश्वसनीय करतो. एकूणात, जब्याची ही भूमिका म्हणजे ‘बेस्ट ॲक्टर इन  लीडिंग रोल’  आहे (बालकलाकार नव्हे). किशोर कदमचे  काम चांगले आहे, पण ते अति अति प्रेडिक्टेबली चांगले  आहे. त्यात उत्स्फूर्ततेपेक्षा किशोर ही भूमिका अशीच आणि  चांगलीच करणार, ही प्रेडिक्टेबिलिटी आहे. (निळूभाऊंच्या  बाबतीत पुढे पुढे असे व्हायला लागले होते.) नाना  पाटेकरच्या अभिनयाच्या शैलीत नागराज मंजुळे छाप टाकतो  पण त्याचे कॅरेक्टर फारच कमकुवत लिहिले आहे. चित्रपटाची दोन बलस्थाने- कॅमेरा आणि संगीतध्वनी मुद्रण ही आहेत. छोटे गाव, आजूबाजूची कुरणे, झाडे, डोंगर, पक्षी, आभाच हे सारेच विक्रम अलमाडीच्या कॅमेऱ्याने  उत्तम पकडले आहे. पण शेवटचा डुक्कर पकडण्याचा संपूर्ण  भाग मात्र पुरेसा थरारक किंवा प्रभावी वाटत नाही.

अलेजान्द्रे  गोन्जालेजच्या ‘अमेरो पेरॉस’  या चित्रपटातल्या कुत्र्यांच्या  झुंजी आठवा. तसा थरार यात हवा होता. थरारासाठी थरार  म्हणून नव्हे, तर जब्याचा उद्रेक बिल्ड व्हायला त्याने दृश्य  स्वरूपात मदत झाली असती. अधिकच ताण निर्माण झाला  असता. कदाचित त्या एकट्या सापडलेल्या डुकराची कचरू  आणि त्याच्या कुटुंबाने केलेली कोंडी प्रतीकात्मक झाली  असती. इव्हन फार पूर्वी दाखवलेल्या ‘तमस’  या दूरदर्शनवरच्या मालिकेतले ओम पुरीचे डुक्कर पकडणे ग्रेट  होते. आलोकनाथ दासगुप्ताने केलेले फॅन्ड्रीचे संगीत आणि  निमिष छेडाचे ध्वनिमुद्रण मात्र सुरेख आहे, अगदी पहिल्या  दृश्या-पासूनच. पक्षी, वारा, गावातले बारीक-सारीक  आवाज, डुकराचे डुरकणे इथपासून मिरवणुकीतला ताशा  आणि ढोल ग्रेट. त्या मिरवणुकीच्या प्रसंगातले कर्णकर्कश  संगीत- जेव्हा जब्या डोक्यावर दिवा घेऊन करुणपणे जातो, तो प्रसंग फार प्रभावी करते. तो चित्रपटातला एक महत्त्वाचा  प्रसंग आहे. पटकथा बरीचशी निर्दोष आहे; पण दोन-तीन ठळक पात्रे (जब्या, पिऱ्या आणि कचऱ्या) सोडता व्यक्तिचित्रण (कॅरॅक्टरायझेशन) सशक्त नाही, हे मात्र जाणवत राहते. उदा. नागराज मंजुळेने उभा केलेला चंक्या किंवा दुर्पदीचे व्यक्तिचित्रण  फारच विसविशीत आहे.

पण एरवी मूळ गाभ्याला न्याय देणारी  पटकथा उत्तम लिहिली आहे. एक विचार आला- हा काही  नव्वद मिनिटांचा अगदी छोटासा सिनेमा नाही; मग व्यक्तिचित्रण  का असे अपुरे ? कोणता भाग अनावश्यक आहे ? तसा  फालतूपणादेखील नाही, खरे तर या चित्रपटात. मग वाटले, तो  पेप्सी कोला विकायचा सर्व भाग कदाचित कापता आला असता. त्यात फालतूपणा नसला तरी त्याने फारसे मोठे व्हॅल्यू ॲडिशन नाही होत. अर्थात जब्या ट्रकला टेकून सायकल लावतो  तेव्हाच तो ट्रक सायकलवर येणार, हे आपल्या मनात पक्के झालेले असते, हा भाग वेगळा. आणि एक खटकलेला दोष  म्हणजे, कुणाच्याच बोलण्यात शिव्या नसणे हे जरा विचित्र  वाटते. कचरू दारू पिऊन घरी येतो तेव्हादेखील आणि शेवटी  जब्याचा उद्रेक होतो तेव्हादेखील हे लोक फारच सपकपणे  बोलतात. (जसे चित्रपटात आवश्यक तिथे चुंबनदृश्य नसणे  अश्लील वाटते किंवा आपल्या हिंदी सिनेमातले सीमेवर लढणारे  आणि एकमेकांच्या जीवावर उठलेले सैनिक सभ्यपणे ‘कुत्ते, कमीने’ यांसारख्या ‘वरणभाता’सारख्या शिव्या देतात, तसे आवश्यक तेथे शिवराळ भाषा नसणे हे अश्लीलच म्हणायला  हवे.)

एकूण फॅन्ड्रीचा प्रभाव मात्र चांगला आहे. लेखक- दिग्दर्शक जेव्हा आपल्याला अभिप्रेत आशयाशी प्रामाणिक राहून काम करतो, तेव्हाच असे चांगले सिनेमे बनतात. फालतूपणा टाळून विषयाशी प्रामाणिक राहून सरळ सिनेमा  बनवणे ही चांगल्या चित्रपटाची सुरवात असते असे मानले, तर चांगल्या मराठी सिनेमाची ही सुरवात आहे, असे नक्कीच  म्हणता येईल. आता याच वाटेवर मराठीत श्रेष्ठ चित्रपट नक्की  बनेल, असे म्हणायला हरकत नाही. अलीकडे बऱ्याच तद्दन  वाईट किंवा जरा बऱ्या सिनेमांबद्दल इतके चांगले आणि सुपरलेटिव्ह बोलले जात होते की, त्या पार्श्वभूमीवर फॅन्ड्री एक सुखद अपवाद ठरलाय. आवर्जून बघावा असा श्रेष्ठ  नसलेला पण कमीत कमी फालतूपणा असलेला असा, हा उत्तम चित्रपट आहे.

गमतीने बोलायचे तर आता ‘आहे रे - नाही रे’, ‘समाजवादी-भांडवलशाहीवादी’, ‘काळे-गोरे’ ‘साक्षर- निरक्षर’ वगैरे भेद कालबाह्य ठरले आहेत. आता ‘फॅन्ड्री  बघितलेले’ आणि ‘फॅन्ड्री न बघितलेले, अशा दोन गटांत जग  विभागले आहे. तेव्हा माझा सल्ला असा की, लवकरात लवकर  दुसऱ्या भाग्यवान गटात सामील होण्यासाठी हा चित्रपट आवर्जून बघा.

Tags: श्वास अमेरो पेरॉस अलेजान्द्रे गोन्जालेज बायसिकल थीफ पथेर पांचाली किशोर कदम वळू देऊळ शाळा शालिनी जब्या नागराज मंजुळे फॅन्ड्री Shwaas Alejandro Gonzalez Amores Perros Bicycle Thief Pather Panchali Kishor Kadam Valu Shala Deool Shalini Jabya Nagraj Manjule Fandry weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके