डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

कलावंताच्या मूलभूत अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेव्हा गंडांतर येते तेव्हा समाजाचा श्र्वासच हरपतो हे चिरंतन मूल्य मांडणारा हा चित्रपट आहे. आपल्याकडे आणिबाणीच्या काळात अनेकांना असा अनुभव आला असेल या निमित्ताने एक मात्र जाणवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नुसतेच वाचाळ ढोलताशे वाजवणाऱ्या समाजात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे मोल द्यायची वेळ आली की मात्र पळापळ सुरू होते. केवळ शिवराळ भाषा आणि सवंग लैंगिकता यांच्या निरर्गल व निर्लज्ज प्रदर्शनासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गरज नसते तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खरी गरज मूलभूत मानवी मूल्यांची पाठराखण करण्यासाठी असते.

 

पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार आणि गुणवत्ता हे सारे एकत्र आढळण्याची उदाहरणे काही पैशाला पासरी नाही सापडत. असे योग अवचित समोर येतात तेव्हा मात्र आपण त्याला दाद देण्यात कसर ठेवू नये. 2006 सालचा ‘लाइव्हज ऑफ अदर्स’ हा जर्मन चित्रपट याचे अगदी ठळक उदाहरण आहे. त्या वर्षीचे यच्चयावत सगळे मानाचे पुरस्कार तर या चित्रपटाला मिळालेच पण वीस लाख डॉलर खर्चून केलेल्या या चित्रपटाने जगभर साडेसात कोटी डॉलरचा धंदा देखील केला आणि जगभरातल्या रसिकांची आणि जाणकारांची तोंडभरून वाहवा सुद्धा मिळवली.

कॅनडातर्फे का होईना, पण ‘वॉटर’ हा हिंदी सिनेमा ऑस्करच्या (बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म) शर्यतीत होता त्याच वर्षी त्या पुरस्काराची माळ घेउन गेलेला हा जर्मन चित्रपट. अजुन तरी कधी भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळाले नाही, पण 1957 साली मदर इंडिया, 1988 साली सलाम बाँबे आणि 2001 साली लगान अशी तीन वेळा फक्त भारतीय चित्रपटांना निदान नॉमिनेशन मिळाली. ऑस्कर हा काही गुणवत्तेचा एकमेव निकष नाही, पण तरीही जागतिक स्पर्धेत आपला चित्रपट कुठे आहे ते यावरुन दिसते. (लगानला ज्यावेळी नॉमिनेशन मिळाले तेव्हा ऑस्कर मिळवणारा ‘नो मॅन्स लँड’ हा बोस्नियन चित्रपट एकदा आवर्जून पाहा अशी अगदी आग्रहाची शिफारस मी करेन.) असो. तूर्तास ‘लाइव्हज ऑफ अदर्स’ची ओळख करुन घेउया.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य ही फार वेळा वापरली जाणारी, सर्वत्र सवंगपणे चर्चेत येणारी पण चिमटीत न सापडणारी संकल्पना या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आहे. एखादा कलावंत अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी काय करु शकतो आणि स्वातंत्र्याचे मोल समजलेला सरकारी अधिकारी देखील त्याला कसा प्रतिसाद देतो याची ही कहाणी आहे. समृद्ध आशय, शैलीदार मांडणी, उत्कट अभिनय, प्रतिभावंत दिग्दर्शन आणि या साऱ्याला साजेशी तांत्रिक अंगे या सगळ्याच्या बळावर ही कहाणी दोन तासात आपल्यासमोर उलगडत जाते. प्रभावी संगीत, उत्कृष्ट छायाछित्रण आणि अतिशय समर्पक रंगसंगतीने हा अनुभव आपल्या मनावर अमिट ठसा उमटवतो.

चित्रपटाची सुरवात होते तीच मुळी अतिशय भेदक डोळे असलेल्या सारकारी सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या एका देशद्रोह्याच्या उलटतपासणीने. अत्यंत प्रभावी आणि कल्पक पद्धत वापरून गुन्हेगाराला बोलतं केलं जातंय. हळूहळू आपल्याला उमजते की याचा वापर एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून केला जातोय आणि विद्यार्थ्यांना प्रभावी उलटतपासणीचे तंत्र शिकवले जात आहे.

आणि हे प्रशिक्षण देणारा देखणा, भेदक डोळ्याचा अधिकारी आहे हॉटमन वेस्लर नावाचा जर्मन अधिकारी. सतत दिवसरात्र त्याच त्याच प्रश्र्नांची सरबत्ती करुन, निरनिराळी तंत्रे वापरून सत्य कसे काढून घ्यायचे यातला हा सम्राटच. कथा आहे पूर्व जर्मनीची. 1984 सालातली. बर्लिनची भिंत पडण्याच्या आधी असलेल्या राजकीय आणि सामाजिक दहशतीची. समाजातल्या प्रत्येक घटकाला संशयाच्या चष्म्यातून बघणाऱ्या सरकारी सुरक्षायंत्रणेने (स्टेट सिक्युरिटी म्हणजेच - ‘स्टेसी’ने) लोकांच्या खाजगी जीवनात केलेली लुडबूड आणि त्याहीपलीकडे जाऊन केलेली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी दाखवणारा हा चित्रपट आहे. खरे तर या गळचेपीविरूद्ध सच्चे कलावंत कसा ‘ब्र’ काढतात त्याची ही कहाणी आहे. म्हटले तर भाऊक म्हटले तर थरारक.

स्टेसीमध्ये अधिकारी असलेला एच.जी.वेस्लर या कथेच्या केंद्रस्थानी आहे. देखणं व्यक्तिमत्व आणि समोरच्याला आरपार पाहू शकणारे अतिशय भेदक डोळे लाभलेल्या युलरिख म्यूह (Ulrick mUhe) या जबरदस्त अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे. (याचा विलक्षण अभिनय बघताना ‘अनग्लोरियस बास्टर्डस’ या अप्रतिम चित्रपटातली ख्रिस्तोफ वॉल्ट्‌झ या डबल ऑस्कर विजेत्या अभिनेत्याची भूमिका आठवत राहते बघा. त्या चित्रपटाविषयी पुन्हा केव्हा तरी बोलू.)

तर पूर्व जर्मनीतल्या सामाजिक, विशेषत: कला-नाट्य क्षेत्रावर ‘स्टेसी’ची बारकाईने नजर आहे. कुठे बारिक जरी सरकारविरोधी सूर उमटलेला दिसला तरी लगेच त्या कलावंतावर बंदी घातली जाते. अशात वेस्लरचा वरिष्ठ ‘जॉर्ज ड्रेन’ या नाटककारावर ‘लक्ष’ ठेवायची जबाबदारी वेस्लरवर टाकतो. ड्रेन हा प्रतिभावंत नाटककार नव्या विचारांचा, पण सरकारी गळचेपीपुढे काहीसे नमते घेऊन जमेल तशी आपली कला मांडणारा. वेस्लरवर ही जबाबदरी टाकताच वेस्लर आणि त्याचे साथीदार अधिकारी ड्रेनच्या घरात जागोजागी अशी उपकरणे बसवतात की दिवसाचे चोवीस तास ड्रेन काय बोलतो त्याची बित्तंबातमी स्टेसीला मिळत राहते. आणि दिवसाचे बारा-बारा तास कानाला हेडफोन लाऊन ड्रेनच्या घरातले बारीकसारिक अवाज ऐकत बसलेल्या वेस्लरला असे काही रहस्य उमगते की स्टेसीचा निष्ठावान अधिकारी असलेल्या वेस्लरचे विचार पार उलटेपालटे होतात आणि सुरू होते एक अदुभुत नाट्य.

ड्रेनवरच्या या हेरगिरीमागे सत्य असे आहे, की राष्ट्रीय सुरक्षायंत्रणेचा, म्हणजेच ‘स्टेसी’चा प्रमुख, वेस्लरचा वरिष्ठ ग्रुबिट्‌झ याला या निमित्ताने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत मुसंडी मारायची आहे तर सुरक्षा मंत्री ब्रूनो हेंफ याला खरा रस आहे तो ड्रेनच्या ख्रिस्टा मरिया सिएलंड नावाच्या मैत्रिणीत. बंदी घातलेल्या काही उत्तेजक औषधाचे व्यसन असलेली ख्रिस्टा मारिया ही अभिनेत्री एकीकडे ड्रेनवरचे प्रेम तर दुसरीकडे व्यसनापायी मंत्रीमहोदय ब्रूनो हेंफसमोर असलेली अगतिकता याच्या पेचात आहे. तिला वश करण्यासाठी हे मंत्रीमहोदय तिला त्या औषधासाठी ब्लॅकमेल करतात आणि या प्रचंड ताणात ख्रिस्टा अधिकाधिक विमनस्क होत जाते. वेस्लरला हे उमजते तेव्हा कर्तव्य आणि मूलभूत मानवी मूल्य यांच्या पेचात सापडलेला वेस्लर हळूहळू कसा आतून बदलत जातो आणि स्वातंत्र्य या सर्वोच्च मानवी मूल्याची कशी पाठराखण करतो याची ही कथा आहे. मनस्वी कलावंत जॉर्ज ड्रेनच्या भूमिकेत सॅबेस्टियन कोख आणि ख्रिस्टा मारियाच्या भूमिकेत मार्टिना जेडेख युर्लिख म्यूहला सुरेख साथ देतात.

या सर्वच कलावंतांचा उत्कट पण संयत अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. फ्लोरियन व्हेन्केल व्हॉन डोनेस्मार्क यानेच चित्रपटाची पटकथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केले आहे. ऑस्करसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा जॉनी डेप आणि अँजेलिना जोली या प्रसिद्ध स्टार्सचा ‘द टूरिस्ट’ हा चित्रपट तुम्हाला माहित असेल. ‘लाइव्हज ऑफ अदर्स’मध्ये डोनेस्मार्कने अतिशय घट्ट विणीची पटकथा लिहून एक जबरदस्त अनुभूती दिली आहे. या चित्रपटाला करड्या आणि दाट हिरव्या रंगांचा वापर विलक्षण दहशतवादी पार्श्वभूमी निर्माण करतो (छायाचित्रण : हेगन बोगडन्स्की) आणि स्टीफन मोउचा - गॅब्रियल यरेड यांचे परिणामकारक संगीत ही अनुभूती अधिकच गडद करते.

एकदा का वेस्लरला ग्रुबिट्‌झ आणि ब्रूनो हेंफचे खरे इरादे कळतात तेव्हा वेस्लर आपले चातुर्य आणि कौशल्य वापरून ड्रेनलाच सहाय्य करायला लागतो. सतत ड्रेनच्या घरातले संभाषण ऐकून त्याचे अहवाल देताना तो अतिशय कल्पकतेने त्यात बदल करून ड्रेनच्या चळवळीला मदतच करतो. या सगळ्याला सुरूवात होते ड्रेनचा मित्र असलेला ज्येष्ठ कलावंत अल्बर्ट जेर्स्का आत्महत्या करतो त्यापासून. राष्ट्रविरोधी कारवायांच्या संशयाने सरकारने ब्लॅकलिस्ट केलेला हा कलावंत. बंदीमुळे निराश होऊन आत्महत्या करतो. आणि त्या निमित्ताने पूर्व जर्मनीतील आत्महत्या या विषयावर ड्रेन एक दीर्घ लेख लिहून तो गुप्तपणे पश्चिम जर्मनीतल्या एका वृत्तपत्रात छापायला पाठवतो. पूर्व जर्मनीतल्या राजकीय दहशतवादाचे स्फोटक चित्रण असलेला हा लेख प्रसिद्ध होताच साहजिकच खळबळ उडते. या लेखाच्या लेखकाला पकडायला ‘स्टेसी’ आकाशपाताळ एक करते. पूर्व जर्मनीत वापरले जाणारे सर्व टाइपरायटर सरकार दरबरी नोंदवले असल्याने ड्रेन आणि त्याचा मित्र या लेखाच्या टायपिंगसाठी परदेशी बनावटीचा एक चिमुकला टाईपरायटर चोरून आणतात आणि त्यावर हा लेख लिहून तो टाइपरायटर ड्रेनच्या घरात शिताफीने लपवून ठेवतात.

दरम्यान आपली मैत्रीण ख्रिस्टा मारिया आणि  मंत्रीमहोदयांचे विचित्र संबंध समजल्याने अस्वस्थ झालेला ड्रेन तिला मंत्र्याला धुडकावून देण्याचे सांगतो पण पेचात सापडलेली ही अभिनेत्री तेही करू शकत नाही आणि ब्रूनो हेंफला भेटायला निघते. त्याचवेळी योगायोगाने एका बारमध्ये तिला वेस्लर भेटतो आणि तो तिला ती एक विलक्षण प्रतिभेची अभिनेत्री असल्याचे सांगतो. एका रसिकाने आपल्या प्रतिभेबाबत दाखवलेल्या या विश्वासाने आत्मविश्वास आणि अस्मिता सापडलेली ख्रिस्टा मारिया ड्रेनकडे परतते पण एव्हाना मंत्रीमहोदय आणि स्टेसीची राक्षसी यंत्रणा ड्रेनभोवती फास आवळत असतात. या सगळ्यातून वेस्लर ड्रेनला कसा सोडवतो ते पडद्यावरच पाहायला हवे.

एकीकडे थरारक रहस्यकथा असलेला हा चित्रपट रहस्यपट मात्र होत नाही, कारण लेखक दिग्दर्शक डेनोस्मार्कचा हेतूच मुळात वेगळा आहे. मरण्यापूर्वी अल्बर्ट जेर्स्का हा ज्येष्ठ कलावंत ड्रेनच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याला ‘सोनाटा फॉर अ गुड मॅन’ या नावाने एक भेट देतो. चांगल्या माणसासाठी ही एक संगीताची धून. वेस्लर हा अधिकारी प्रत्यक्ष आयुष्यात नेमका असाच तर असतो. ‘अ गुड मॅन’. पुढे अर्थातच वेस्लरच्या कारवाया उघडकीस येतात आणि त्याची कारकीर्द संपुष्टात येते. त्याची बदली केवळ एका टेबलावर बसून लोकांची पत्रे चोरून उघडण्याच्या निर्बुद्ध कामावर होते. यथावकाश क्रांती होते आणि बर्लिनची भिंत पाडली जाते. पण वेस्लर बापडा पोस्टमन म्हणून घरोघरी पत्रे वाटत राहतो. मुक्त झालेला ड्रेन ‘सोनाटा फॉर अ गुड मॅन’ याच नावाने पुस्तक लिहितो आणि त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका असते- ‘To HGW XX/7, with gratitude’ कारण आपल्याबाबतच्या सरकारी कार्यालयातल्या फाईल्स बघताना ड्रेनला कळले असते की आपल्याला मदत करणारा अधिकारी आहे हॉटमन जेर्ड वेस्लर आणि त्याचा कोड आहे HGW XX/7 !

या चित्रपटातला युलिख म्यूहचा अभिनय पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. अतिशय थंड डोक्याने आणि भेदक नजरेने उलटतपासणी करणारा अधिकारी, आपले वरिष्ठ आणि मंत्री किती हीन हेतूने काम करताहेत हे उमजल्यावर हताश होणारा माणूस आणि शेवटी ड्रेनने आपल्यालाच पुस्तक अर्पण करून आपल्या कामाला कुठेतरी दाद दिली आहे हे जाणवलेला वेस्लर अशी विविध रूपे या अभिनेत्याने जिवंत केली आहेत. अत्यंत संयत शैलीतला म्यूहचा अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ठ्य आहे.

कलावंताच्या मूलभूत अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेव्हा गंडांतर येते तेव्हा समाजाचा श्र्वासच हरपतो हे चिरंतन मूल्य मांडणारा हा चित्रपट आहे. आपल्याकडे आणिबाणीच्या काळात अनेकांना असा अनुभव आला असेल या निमित्ताने एक मात्र जाणवले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नुसतेच वाचाळ ढोलताशे वाजवणाऱ्या समाजात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे मोल द्यायची वेळ आली की मात्र पळापळ सुरू होते. केवळ शिवराळ भाषा आणि सवंग लैंगिकता यांच्या निरर्गल व निर्लज्ज प्रदर्शनासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गरज नसते तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खरी गरज मूलभूत मानवी मूल्यांची पाठराखण करण्यासाठी असते. इराणी चित्रपटाचा इतिहास बघितला तरी हेच जाणवते. करमणुकीच्या नावाखाली सवंग कामुकता प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या फुटकळ कारागिरांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भाषा करणे बरे नव्हे. अशा उद्योगातून श्रेष्ठ कलाकृती निर्माण होत नसतात. आपल्याकडचे बहुतांश चित्रपट दुर्दैवाने अशा सवंग मानसिकतेतून निर्माण होतात हे वास्तव आहे. म्हणूनच निदान कलेच्या क्षेत्रात तरी आपण मनावरची कुंपणे आणि भिंती मोडून वसुधैव कुटुंबकम या मनोवृत्तीने अशा उत्तमोत्तम वैश्विक कलाकृतींचा आस्वाद घ्यायला हवा.

नुकताच हा ‘लाइव्हज ऑफ अदर्स’ एका वाहिनीवर पाहिल्याचे स्मरते. आपल्याकडे सुदैवाने वर्ल्ड मूव्हीज, वॉर्नर ब्रदर्स यासारखे अनेक चॅनेल्स श्रेष्ठ चित्रपट दाखवत असतात ते आपण आवर्जून बघायला हवे. बरे अलीकडे हे बहुतेक सर्व चित्रपट उत्तम सबटायटल्ससह दाखवतात. मी एक अनाहूत सल्ला असा देईन, की आपण या चॅनेल्सवर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे नोंदवून घेउन लगेच इंटरनेटवर IMDB Wickipedia वगैरे साईट्‌सवर जाऊन लगेच त्याबद्दल वाचायला हवे. आणि ते बघायला हवे. नुसता चित्रपट पाहून न थांबता या माध्यमातून त्या चित्रपटाविषयी अधिकधिक माहिती मिळवायला हवी. एखादा चित्रपट आवडला पण नीट कळला नाही तर इतरांची मते वाचायला हवी. गुगलवर त्या चित्रपटाविषयी कुठे काय छापून आले आहे त्याचा शोध घ्यायला हवा. छंदाला अभ्यासाची जोड दिली की आयुष्य अधिक सुंदर तर होतेच पण त्यात अर्थपूर्णता आणि मौलिकताही येते.

भाषा : जर्मन (सबटायटल्स उपलब्ध) लेखक : फ्लोरियन व्हेन्केल व्हॉन डोनेस्मार्क दिग्दर्शक : फ्लोरियन व्हेन्केल व्हॉन डोनेस्मार्क कलाकार : एच जी वेस्लर : युरिख म्यूह जॉर्ज ड्रेन : सॅबेस्टियन कोख ख्रिस्टा मारिया : मार्टिना गेडेख ग्रुबिट्‌झ; युलिख टुकुर ब्रूनो हेंफ : थॉस थेअम

Tags: साधना सदर पडद्यावरचे विश्वभान संजय भास्कर जोशी लाइव्हज ऑफ अदर्स sadar sadhana series padadyavarche vishvabhan cinema sanjay bhaskar joshi lives of others weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


Comments

  1. Jitesh C- 17 Aug 2020

    Nice Article..!

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात