डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

साधी पण सूचक पटकथा आणि सफाईदार दिग्दर्शन यामुळे ‘हयात’ मनावर प्रभाव टाकतो. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलावंतांच्या आणि कलानिर्मितीच्या पर्यावरणात छोटेमोठे कलाकारदेखील कसे उत्तम कलाकृती निर्माण करतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अन्यथा किआरोस्तामी, मखमल्बफ, फरहादी, मजिदी, गोबादी वगैरे महान दिग्दर्शकांच्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या गर्दीत ‘हयात’ कडे लक्ष गेलेच नसते. अगदी आवर्जून पाहावा असा हा सुरेख चित्रपट आहे.

पोरगी भलतीच गोड आहे. नाबत तिचं नाव. वय असेल अडीच तीन वर्षाचं. गोबरे गोबरे गाल. सुरेख हसरे डोळे आणि मुख्य म्हणजे मधुनच उमटणारं खट्याळ मधुर हसू. अगदी लाघवी आणि गोड छोकरी आहे. तिच्यावर चिडायचं तरी कसं. पण मनातून वैताग येतोय. चिडायचं नाही म्हटलं तरी राग येतोय. झोप म्हटलं तर झोपत नाहीये. सारखी चळवळ चालू आहे. तासभर कुणा नातेवाईकाकडे सांभाळायला ठेवावं म्हटलं तर कुणी जागेवर नाहीये. कुणी शेतात कामाला तर कुणी घरच्याच कामात. आणि त्या म्हातारीकडे जरा ठेवलं तर तिनंच नाबतची दुधाची बाटली तोंडाला लावली. दुष्टच आहे म्हातारी. आणि तिकडे शाळेत पेपर वाटले पण असतील. घड्याळाचे काटे तर वैऱ्यासारखे पळताहेत. परीक्षा सुरूदेखील होऊन जाईल तिकडे. आणि ही नाबत तर क्षणभर झोपायला तयार नाहीये. अकबरदेखील कसा दुष्टासारखा निघून गेला शाळेत. मुलगा ना तो. माझ्या परीक्षेची कुणाला पडली आहे इथे. नाबत झोप ना प्लीज. मी अगदी लग्गेच परत येईन ना. प्लीज झोप ना नाबत. पण नाबत ऐकत नाहीये. रडायलाच लागलीय. क्षणाक्षणानं उशीर होतोय ना...

गुलाम रझा रमझानी या इराणी दिग्दर्शकाच्या 2005 साली आलेल्या ‘हयात’ या चित्रपटात हा मजेदार पेच आहे. वरवर अगदी साधा वाटणारा, पण 12 वर्षांच्या ‘हयात’ या मुलीच्या दृष्टीने अगदी जीवन-मरणाचा प्रश्न झालेला पेच. संपूर्ण चित्रपट या, (म्हटले तर अगदी साध्या) समस्येभोवती फिरतो.

एकेकाळी हॉलिवुडपटांची आणि खरे तर त्यापेक्षाही जास्त भारतीय चित्रपटांची भ्रष्ट नक्कल करणारा इराणी चित्रपट 1979च्या क्रांतीनंतर आपली स्वत:ची वाट चोखाळायला लागला आणि अब्बास किआरोस्तामी, मोहसीन मखमलबाफ, माजिद मजिदी, असगर फरहादी, बेहमान गोबादी यांसारख्या अनेक प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांनी इराणी सिनेमाला जगभर मान्यता मिळवून दिली. असगर फरहादीच्या ‘सेपरेशन’ या चित्रपटाला 2011 मध्ये ऑस्कर मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. इराणी चित्रपटनिर्मात्यांना कायमच राजकीय आणि धार्मिक सेन्सॉरशिपला तोंड द्यावे लागले आहे, कित्येक वेळा प्रचंड दबाव, धाकदपटदशा, बंदी, अगदी तुरुंगवासदेखील सहन करावा लागला आहे. एकदा तर तथाकथित आक्षेपार्ह दृश्यांमुळे चित्रपटगृहाला लावलेल्या आगीत 400 प्रेक्षक जळून खाक झाले. जिथे कलावंत आणि रसिक अभिव्यक्तिस्वातंत्र्याची अशी मोठी किंमत देतात तिथेच कला वेगळ्या उंचीवर पोचते की काय कुणास ठाउक. पण आज 100 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या इराणी चित्रपटाने जगात मानाचे स्थान मिळवले आहे हे मात्र नक्की. 1984 नंतरच्या या ‘न्यू वेव्ह’ सिनेमामुळे अनेक नवनव्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळाले आणि आशयप्रधान इराणी चित्रपट समृद्ध होत गेला. अशापैकी एक म्हणजे गुलामरझा रमझानी हा दिग्दर्शक. ‘हयात’ हा त्याचा तिसराच चित्रपट.

चित्रपटाची कथा अगदी साधी आहे. त्याचे होते असे, की आज हयातच्या परीक्षेचा दिवस. उत्साहाने शाळा शिकणारी हयात ही बारा वर्षांची हुशार मुलगी. पहाटे पहाटे आई तिला उठवते, ऊठ हयात, आज परीक्षा आहे ना, ऊठ लवकर. डोळे चोळत हयात लग्गेच उठते आणि नको ते घडते. अचानक तिला आणि तिच्या आईला दिसते की हयातचे वडील बेशुद्ध होऊन पडले आहेत. झोपेतच. दोघींचा आक्रोश. हयातचा धाकटा भाऊ अकबरदेखील जागा होऊन रडायला लागतो. पण वडील तर जागेच व्हायला तयार नाहीत. आई घाईघाईत हयातला इतरांना बोलवायला पिटाळते. अकबरलाही पिटाळते. इवल्याशा गरीब घरात आक्रोश आणि आक्रंदन. नातेवाईक, शेजारी येतात आणि हयातच्या वडिलांना हॉस्पिटलात न्यायचे ठरवतात. एका खटारा गाडीतून. आई अर्थातच रडत आक्रंदत  त्यांच्याबरोबर जाते. जाताजाता घाईघाईत आई हयातला बजावते, जरा घराकडे बघ आणि नाबतला सांभाळ मी येईपर्यंत. नाबत ही हयातची अडीच-तीन वर्षांची चिमुरडी बहीण. अभ्यास तर तयारच आहे हयातचा, पण आधी सकाळची कामं आणि मग नाबतला सांभाळायचे आहे. आणि आज तर वार्षिक परीक्षा. आजच्या परीक्षेत पास झाले तर पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश मिळणार. शिक्षण चालू राहणार. आज शाळेत जायलाच हवं. काय वाट्टेल ते झालं तरी आज शाळेत जायलाच हवं.

जेमतेम सव्वा तासाच्या या सिनेमातली पहिली दहा-बारा मिनिटे सोडली तर संपूर्ण चित्रपट हयातची शाळेत जाण्यासाठी झालेली उलघाल आणि त्यासाठी तिने केलेला आटापिटा आहे. साहजिकच ही कहाणी एका हयातची उरतच नाही. खरे तर फक्त शाळेत जायची किंवा परीक्षा द्यायची पण उरत नाही. अगदी आपोआप या कहाणीला अनेक महत्त्वाचे वैश्विक पदर प्राप्त होतात. मुलींच्या शिक्षणाबाबत शेकडो लंबेचौडे लेख लिहून जे साधले जाणार नाही ते या छोट्याशा, साध्यासोप्या चित्रपटाने साधले जाते. मुळातच अलीकडचे हे इराणी चित्रपट युरोपीय किंवा अमेरिकन चित्रपटासारखे दृश्यात्मकदृष्ट्या प्रयोगशील आणि तंत्रशुद्ध किंवा तटस्थ कोरडे नसतात तर आशयाच्या मौलिकतेला अधिक महत्त्व देतात. हॉलिवुड किंवा बॉलीवूडमध्ये बनवले जाणारे अर्थहीन, दिखाऊ सिनेमे वगळले तर असे दिसेल, की भारतीय किंवा चिनी चित्रपट अधिक परंपरावादी, देशी, भावूक आणि काही वेळा अंमळ मेलोड्रॅमॅटिक असतात तर युरोप, अमेरिकेचे चित्रपट अधिक तटस्थ, कोरडे आणि प्रयोगशील असतात. मला नेहमी वाटते, की इराणी सिनेमा या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी बसतो. त्यात आशयाला अनन्यसाधारण महत्त्व असते, पण अंगावर येणारी भाऊकता नसते. दु:खाचे तटस्थ दर्शन घडवत जगण्याची व्याकुळता आणि तरीही जगण्याचा उत्सव करण्याची अपार उत्कटता एकूणच इराणी चित्रपटात दिसते. तीच आशयप्रधानता रमझानीच्या या ‘हयात’ चित्रपटात दिसते.

‘हयात’चा अर्थ आयुष्य, जगणे, जीवन. चित्रपटात हयात या मुलीचे भावविश्व इतके सुंदर दाखवले आहे, की लेखक- दिग्दर्शकाला दाद द्यावी. आणि अर्थातच इराणी खेड्यातले गल्ली-बोळ आणि गावाबाहेरचा निसर्ग याचबरोबर हयातच्या बोलक्या भावमुद्रा आणि चिमुरड्या नाबतचे अप्रतिम लोभस विभ्रम हे सारे विलक्षण कलात्मकतेने सादर करणाऱ्या सिनेमॅटोग्राफर सईद निक्झतने तर कमालच केली आहे. निक्झतचा कॅमेरा अशा काही नजाकतीने हे सारे टिपतो, की बघत राहावे. बेहमान गोबादी या प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या ‘अ टाइम फॉर ड्रंकन हॉर्सेस’ या गाजलेल्या चित्रपटात याच सईद निक्झतने बर्फाळ प्रदेश, त्या निसरड्या वाटा आणि त्यावरून चालणारे दारू पाजलेले घोडे यांचे अप्रतिम छायाचित्रण केले होते.

‘हयात’मध्ये (बऱ्याच इराणी चित्रपटांप्रमाणे) लहान मुलांचे भावविश्व आहे, त्यामुळे छायाचित्रण एक वेगळेच आव्हान आहे. विशेषत: चिमुकल्या ‘नाबत’चा वावर संपूर्ण चित्रपटभर आहे, आणि दिग्दर्शक रमझानी आणि निक्झतचे कौशल्य असे की हा वावर अतिशय सहज तर आहेच पण दृष्टीसुखद देखील आहे.

दारिद्य्र आणि त्याबरोबर येणारी धर्मांध, रूढिप्रधान, कर्मठ आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्था याविरुद्धचा एक अस्फुट पण मौलिक आणि ठाम हुंकार म्हणजे ‘हयात’ हा चित्रपट असे म्हणता येईल. लेखक (मोज्तबा खुश्कदमान आणि गुलाम रजा रमझानी) आणि दिग्दर्शक (रमझानी) यांनी अगदी छोट्या आणि साध्या प्रसंगातून कधी सूचकपणे तर कधी अंगावर येईल अशा गडद रंगात हा हुंकार व्यक्त केला आहे. आई अशी अचानक वडिलांना घेऊन जवळच्या मोठ्या गावात गेल्यावर घराची जबाबदारी बारा वर्षांच्या हयातवर पडते, हा खरे तर अशा खेडेगावातला साधा प्रसंग. पण नेमका हाच दिवस  हयातच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा. कारण या परीक्षेवर तिचे पुढचे शिक्षण अवलंबून आहे. तास-दोन तासांसाठी नाबतला सांभाळायला नेमके कुणीच मिळत नाही. त्यामुळे हयात शेवटी कसेतरी नाबतला घरातच झोपवून घराला कुलूप लावून शाळेत जायला निघते तेव्हाची तिची उलघाल काय, नाबतला काखोटीला मारून केलेली गावभरची धावपळ काय किंवा आधी गायीची धार काढणे, पाणी भरणे, घर साफ करणे या कामातली तिची अस्वस्थ लगबग काय, हयातच्या भूमिकेत गझलेह परसफर या अभिनेत्रीने अक्षरश: कमाल केली आहे.

इंग्रजीत एखाद्या व्यक्तीने एखाद्या शब्दाला ‘पर्सोनिफाइड’ केले असे म्हणतात, तसं ‘डिटरमिनेशन’ या शब्दाला पर्सोनिफाइड करणारा तिचा अप्रतिम अभिनय आहे. आणि तिचा भाऊ अकबर याच्या भूमिकेत मेहेरदाद हसानी या बालकलाकाराने तिला दिलेली साथ जबरदस्त आहे. या अकबरवर चित्रीत केलेले अनेक गमतीदार प्रसंग आहेत. हा अकबर बहिणीची परीक्षा असूनही स्वत: मात्र तिला धाकट्या नाबतबरोबर सोडून शाळेत जातो. पण हयातच्या मैत्रिणीसमोर मात्र आपली बहीणच कशी सर्वात हुशार आहे याच्या अभिमानी बढाया मारतो. अकबरला शाळेत जाताच मात्र पश्चाताप व्हायला लागतो. बहिणीला मदत करायला वर्गातून बाहेर कसे पडावे याचे त्याचे प्रयत्न अफलातून आहेत. काही केल्या बाई वर्गाबाहेर सोडत नाहीत तेव्हा चक्क आपल्या पँटला थुंकी लावून हा पँटीत ‘सूसू’ केल्याचे जाहीर करतो तेव्हा हसू आवरत नाही. एकूणच चित्रपटात असे नर्मविनोदाचे अनेक सुरेख प्रसंग आहेत. चिमुकल्या नाबतला हयात नात्यातल्या एका म्हातारीकडे सोडते तर ती लबाड म्हातारी नाबतच्या दुधाच्या बाटलीतले दूधच पिऊन टाकते हा असाच एक मजेदार प्रसंग. या सगळ्या धावपळीत हयातला परीक्षा द्यायला मिळेल की नाही आणि मुख्य म्हणजे पुढे तिचे शिक्षण चालू राहणार की नाही या पेचात आपली मात्र चांगलीच उलघाल होते. अर्थात चित्रपटाचा अफलातून शेवट मात्र प्रत्यक्षात बघावा असाच आहे.

लेखक-दिग्दर्शकाने समाजव्यवस्थेवर केलेले सूचक भाष्य हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. हे भाष्य कधी शब्दातून येते तर कधी वेशभूषेतूनदेखील येते. अकबरचे शाळेत जायचे (कोटबीट!) कपडे हे त्याचे एक उदाहरण झाले. तो पुरुष ना! रस्त्याच्या कडेला पारावर काही म्हातारे निवांत सिगारेटी फुंकत बसलेले असतात. काखोटीला नाबतला घेऊन लगबगीने चाललेली हयात खरे तर इतक्या घाईत देखील म्हाताऱ्याला ‘सलाम’ करते, पण ते न ऐकलेला म्हातारा, हल्लीच्या पिढीला काही रीतभातच नाही, ‘बुजुर्गांना’ सलामदेखील करत नाहीत यावर भांडत बसतो ते अतिशय मार्मिक आहे. कर्मठ जुन्या पिढीचे चमत्कारिक पूर्वग्रह त्यात दिसतात. किंवा हयातच्या घरी दूध द्यायला आलेली म्हातारी ‘मुलीच्या जातीला काय करायचं शिकून, शिवण टिपण आले की झाले’ असा जो ‘मौलिक’ सल्ला देते त्याने तर या कर्मठ पुरुषसत्ताक मानसिकतेची वैश्विकताच अधोरेखित होते. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हयातची दुर्दम्य आकांक्षा अधिकाधिक ठळक होते.

घरातली कामे करतानादेखील मनातल्या मनात अभ्यासाची उजळणी करत राहणे, नाबतला घरात ठेवून बाहेर पडताच ती रडायला लागते म्हणून परत वळून कुलूप उघडायच्या आधीच नेमकी किल्ली विहिरीत पडते तर दोरीला लोहचुंबक बांधून ती शोधायचा प्रयत्न करणे, मैत्रीण सांगते तरी तिच्या आईशी खोटे न बोलणे या सगळ्यातून हयातचे एक विलक्षण सुंदर चित्र निर्माण होते. केवळ चूल आणि शिवण-टिपण यापलीकडे जाऊ पाहणाऱ्या मुलीचे हे विलक्षण सुरेख चित्र आहे. त्यात वरवरच्या क्रांतीचा आव नाही किंवा स्त्रीमुक्तीचे नगारे नाहीत. आहे ती निखळ, प्रामाणिक अशी शिकण्याची आकांक्षा. बरे हे सगळेच लहान मुलांच्या परिप्रेक्ष्यातून आले असल्याने त्यात शब्दबंबाळ प्रचारकी थाट मुळीच नाही. आहे तो निरागस, मिस्किल आणि अतिशय साध्यासोप्या प्रसंगातून मांडलेला मौलिक आशय.

उपकथानकांची गुंतागुंत नसलेला हा सिनेमा तसं पाहिलं तर फॉर्म्युलाबाज आणि सहज लोकप्रिय व्हावा असाच आहे, पण मुख्य बालकलाकारांचा सहज अभिनय, साधी पण सूचक पटकथा आणि सफाईदार दिग्दर्शन यामुळे ‘हयात’ मनावर प्रभाव टाकतो. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलावंतांच्या आणि कलानिर्मितीच्या पर्यावरणात छोटेमोठे कलाकारदेखील कसे उत्तम कलाकृती निर्माण करतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अन्यथा किआरोस्तामी, मखमल्बफ, फरहादी, मजिदी, गोबादी वगैरे महान दिग्दर्शकांच्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या गर्दीत ‘हयात’ कडे लक्ष गेलेच नसते. अगदी आवर्जून पाहावा असा हा सुरेख चित्रपट आहे.

Tags: Iranian Cinema Sanjay Bhaskar Joshi इराणी सिनेमा Hyatt संजय भास्कर जोशी हयात weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात