डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुठे पुण्याच्या सदाशिव, शनिवार पेठा, कुठे अहमदाबादची सोसायटी, कुठे हेमलकसा आणि कुठे स्वाती भावे नावाची महाराष्ट्रापासून मनाने नाही, तरी शरीराने दूर होत गेलेली एक गृहिणी! या सर्वांना जोडणारा दुवा कोणता? तर सत्कार्याची जाणीव व त्याचं कृतिशील कौतुक. आईला हॉस्पिटलमध्ये कोरोना डिटेक्ट झाला, त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिच्याजवळ आम्ही कोणीच राहू शकलो नाही. तरीही तिचा शेवटचा दिन गोड झाला असावा, अशी आम्ही मनाची समजूत काढतो ती या देणगीमुळे! 

‘माझ्या पश्चात माझे सर्व दागिने विकून त्यातून जे पैसे येतील ते हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पास देणगी म्हणून द्यावेत’- असं गेली पन्नास वर्षे अहमदाबादमध्ये राहिलेल्या, पण पुण्याच्या सदाशिवपेठेत माहेर व शनिवारात सासर असणाऱ्या आईने तिच्या मृत्युपत्रात 21 जानेवारी 2013 रोजी लिहून ठेवले होते. 

माझ्या आईचे 27 एप्रिल 2020 रोजी देहावसान झाले. तिचे नाव स्वाती श्रीपाद भावे. ती 80 वर्षांची होती. ती गेली कित्येक महिने अंथरुणाला खिळलेली होती. पण मृत्यूचे निमित्त मात्र करोना झाला. 

आईची देणगीची इच्छा आम्ही तिघा भावंडांनी पूर्ण केली. आईच्या दागिन्यांची किंमत 9 लाख 33 हजार रुपये भरली. ती रक्कम आम्ही भावंडांनी लोकबिरादरी प्रकल्पाला देणगी म्हणून दिली, पण दागिने विकले नाहीत. ते दागिने वडिलांनी अहमदाबादच्या ‘इस्रो’त तीस वर्षे सायंटिस्ट म्हणून इनामेइतबारे केलेल्या नोकरीतून आणि आईने काटकसरीने संसार करून वाचवलेल्या पै-पैशातून घेतलेले होते. त्यात आमची भावनिक गुंतवणूक आहे. म्हणून ते विकणं आम्हा भावडांना अजिबात मान्य नव्हतं. तेव्हा आम्ही भावा-भावजयांनी ते आपापसांत वाटून घेतले व देणगीची रक्कम पण समभागाने भरली. 

स्वत:च्या दागिन्यांची रक्कम देणगी देण्याच्या माझ्या आईच्या या कृतीत मला काही बाबी निदर्शनास आणाव्या असे वाटते. 

सहसा स्त्रिया दागिन्यांच्या बाबतीत शेवटपर्यंत अलिप्त नसतात. त्या स्वत:चे दागिने मुली, सुना किंवा घरातील स्त्रीवर्गातील आवडत्या व्यक्तीला द्यायचे पसंत करतात. अनेक वेळा असा काही निर्णय घ्यायच्या आधीच स्त्रियांचे जीवन संपते. पण माझ्या आईने देणगीचा निर्णय वडिलांच्या मृत्यूच्या सहा वर्षांनंतर व तिच्या मृत्यूच्या सव्वा सहा वर्षे आधी, अगदी जाणीवपूर्वक घेतला होता; एवढेच नाही तर तो कागदोपत्री लिहूनही ठेवला होता. 

एरव्ही संसार नेटका करूनसुद्धा तिने आयुष्यात विशेष काही व्यवहार केले नव्हते. घरचे, बाहेरचे सर्व व्यवहार व बाजारहाट माझे वडीलच बघायचे. बँकेत तर ती एकटी कधीच गेली नव्हती. तिचे व्यवहार म्हणजे रद्दीवाल्याला रद्दी, बोहऱ्याला कपडे व घरगड्यांना पगार देणे. तिचे अक्षर चांगले होते, पण तिचे लिहिणे म्हणजे घरगड्यांनी घेतलेल्या अतिरिक्त सुट्ट्यांची कॅलेंडरवर नोंद आणि काही लहान-मोठ्या डब्यांवर तिने लिहून चिकटवलेल्या चिठ्ठ्या- ‘बाजरीचे पीठ’, ‘वेखंड’, ‘पुण्याचा गोडा मसाला’, ‘तुळशीचं बी’. हेमलकसाच्या सेवाकार्यात सहभाग म्हणून 

स्वत:च्या दागिन्यांवर तुळशीपत्र ठेवायचा व्यवहार मात्र आईने चोख वठवला. स्वत:च्या दागिन्यांची देणगी म्हणून वासलात लावणं ही आईच्या स्वभावतील वस्तुपराङ्‌मुख वृत्तीची पराकाष्ठा होती. मी तिच्यात कधी कोठल्याही प्रकारचा लोभ पाहिला नाही. संसारात पण तिनं कधी ‘हे हवं, ते हवं’ असं केलं नाही. खरं तर, मी तिला कधी काही मोठं मागताना किंवा महागाची खरेदी करताना पाहिलंच नाही. वडिलांमध्येही कुठल्या प्रकारची हाव तर सोडा, महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यामुळे आमचं घर साधं व राहणीमान डामडौल नसलेलं राहिलं. आम्ही भावंडं चंगळवादापासून दूर राहिलो. 

आईनं पूजा, जप, स्तोत्रं म्हणणं, बुधवारचा उपास करणं व सण-वार साजरे करणं एवढं तिच्याने झाले तितकी वर्षं मनापासून केलं, पण आमच्यावर कधी त्याची सक्ती केली नाही. दानधर्माचं ती कधी बोलायचीच नाही. देवाधर्माच्या नावाने तिने किंवा माझ्या वडिलांनी कधी दानदक्षिणा दिली नाही. पण दारी आलेल्याला पै-पैसा द्यायची. जेवायच्या वेळी दारी आलेल्याला चटणी किंवा लोणचं आणि पोळी द्यायची. वडील नातेवाईकांना वेळोवेळी पैश्याची मदत करायचे. घराजवळच्या एका चॅरिटेबल हॉस्पिटलला त्यांनी एकदा बऱ्यापैकी देणगी दिली होती. ती गोष्ट पण आम्हाला काही वर्षांनंतर समजली. वडील मी पाहिलेल्या अत्यंत बुद्धिमान व सदैव विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. पण दातृत्व त्यांचा पिंड नव्हता, कारण त्यांची घडणच भारतीय समाजाच्या काटकसरीच्या कालखंडात झालेली होती. 

आमट्यांच्या कार्याचा आणि माझ्या आईचा संबंध आला- त्याचं कारण असं की मी डॉ.प्रकाश आमट्यांच्या ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाचा गुजराती अनुवाद केला व तो सप्टेंबर 2014 मध्ये प्रसिद्ध झाला. त्या वेळी माझे वडील हयात नव्हते. पण आईला गुजरातीतील माझ्या इतर लेखनाचेही कौतुक होते. तिने मूळ पुस्तक व अनुवाद दोन्ही नीट वाचले होते. 

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अहमदबादच्या गुजरात विद्यापीठाच्या एका सभागृहात डॉ.प्रकाश व डॉ.मंदा आमटे यांच्या उपस्थितीत पार पडला. तेव्हा प्रकाशकांनी आमटे दांपत्याच्या राहण्याची उत्तम हॉटेलात व्यवस्था करायची तयारी दाखविली होती, पण त्या दोघांनी मनाच्या प्रेमळपणाने आमच्या घरी राहावयाचे पसंत केले. तेव्हा आम्हा सर्वांना ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी, दसरा’ असे वाटले होते. त्या वेळी प्रकाशराव व मंदाताईंशी छान सहवास घडला. आमटे दांपत्य आमच्या घरून परत जायला निघाले, तेव्हा त्या वेळी माझ्या 74 वर्षांच्या आईने, 66 वर्षांच्या प्रकाशरावांना खाली वाकून नमस्कार केला, ते ओशाळले, त्यांनीही नमस्कार केला. मध्यंतरी बाबा आमट्यांच्या शताब्दीवर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने डिसेंबर 2014 मध्ये मी माझ्या बायको व मुली हेमलकसाला जाऊन आलो; पण आई येऊ शकली नाही, प्रवास तिला झेपणं शक्य नव्हतं. ऑक्टोबर 2018 मध्ये आमटे दांपत्य गांधीजींनी स्थापन केलेल्या ‘गुजराथ विद्यापीठा’च्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुन्हा एकदा अहमदाबादला आले होते. समारंभाच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी विद्यापीठाच्या प्रथेप्रमाणे निमंत्रितांसाठी प्रमुख पाहुण्यांबरोबर अनौपचारिक बैठक, त्यांचे भाषण व जेवणाचा कार्यक्रम होता. त्यात मलाही सहकटुंब निमंत्रण होते. आई त्या वेळी बरीच परस्वाधीन झाली होती. तरीही तिने कार्यक्रमाला यायची इच्छा व्यक्त केली व आम्ही मोटार, वॉकर, खुर्ची व मदतनीसाच्या साह्याने तिला घेऊन गेलो. ती जास्त चालू शकत नसल्याने अगदी शेवटच्या रांगेत बसली होती. कार्यक्रम संपल्यावर आमटे दांपत्य तिला भेटायलाही आले. या वेळी तिने खुर्चीतच बसून पण अगदी श्रद्धेने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. 

माझे वडील गेल्यानंतर आई दर वर्षी हेमलकसाच्या ‘लोक बिरादरी’ प्रकल्पाला अकरा हजार रुपये देणगी म्हणून पाठवायची. प्रकाश आमट्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त ती साधायची. त्याच तारखेला चेक पाठवायला मला जमायचंच असंही नाही. माझ्या स्वभावानुसार मी चालढकलही करायचो. मधे दोन वर्षे चेक पाठवायचं पूर्ण राहूनही गेलं. पण शेवटी ती आई ती आईच. तिनं ते मनावर घेतलं नाही. तिच्या पश्चात देणगीत खंड पडायची भानगड नको म्हणून तिने मृत्युपत्रातच कायमची तरतूद करून ठेवली. शिवाय मृत्युपत्राचा एकमेव व्यवस्थापक म्हणून माझीच नेमणूक लिहून ठेवली! 

कुठे पुण्याच्या सदाशिव, शनिवार पेठा, कुठे अहमदाबादची सोसायटी, कुठे हेमलकसा आणि कुठे स्वाती भावे नावाची महाराष्ट्रापासून मनाने नाही, तरी शरीराने दूर होत गेलेली एक गृहिणी! या सर्वांना जोडणारा दुवा कोणता? तर सत्कार्याची जाणीव व त्याचं कृतिशील कौतुक. आईला हॉस्पिटलमध्ये कोरोना डिटेक्ट झाला, त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिच्याजवळ आम्ही कोणीच राहू शकलो नाही. तरीही तिचा शेवटचा दिन गोड झाला असावा, अशी आम्ही मनाची समजूत काढतो ती या देणगीमुळे! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके