डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘साला मै तो साहब बन गया’, वगैरे नाही झालं. पण... का नाकारा ? त्याच्या बरंचसं जवळपास झालं खरं आयुष्य. हळूहळू चढत-चढत मी साहेबच झालो. कारण ज्या कॉर्पोरेट विश्वात मी शिरलो, त्या विश्वात सरतेशेवटी ‘मालक’ आणि ‘नोकर’ या दोनच जाती असतात. आणि मी नोकर होतो ! पण माझ्या तळहातावरच्या रेषांत लाखात एक असणारे सामर्थ्य होते आणि माझ्या पत्रिकेतले ग्रह उच्चीचे होते. त्यामुळे मी नोकर जमातीतला वरिष्ठ नोकर व्हायचे ठरवले... आणि झालो ! किती आवडतात नै असले स्तर आपल्या मनाला ?

“पहिल्या वाक्यापासून लक्षात यायला लागतं, की हे पाणी जरा वेगळं आहे. साध्या तर्काने कळणारा हा माणूस नाही. कोणत्याही प्रकारच्या ठोकताळ्यात बसणारा तर अजिबात नाही. याची जातकुळी शोधणं हे सोपं काम नाही. त्यासाठी एकरेषीय विचार करून चालणार नाही. यशस्वी कॉर्पोरेट करिअर आणि सकस मराठी लेखन या दोन्हींची मोट बांधण्याचं कसब जमलेली ही लाजवाब व्यक्ती आहे.”

समकालीन प्रकाशन या संस्थेनं नुकतेच मराठी प्रकाशनाला न शोभेलशा अत्युत्तम निर्मितिमूल्यांसहित ‘बिग बॉस’ हे पुस्तक काढलेय. कॉर्पोरेट विश्वात उच्चस्थानावर पोचलेल्या वीस मराठी माणसांबद्दल लिहिलेल्या सविस्तर लेखांचे हे पुस्तक आहे. त्यात एक लेखवजा व्यक्तिचित्र माझ्याबद्दल आहे. त्या लेखातलंच माझ्याबद्दलचं हे वरील वाक्य आहे. त्या पुस्तकाचा लेखक आहे ‘युनिक फीसर्च’चा आनंद अवधानी. त्याने 20 लोकांच्या, सविस्तर मुलाखती घेऊन लिहिलेल्या लेखांचे ‘बिग बॉस’ हे सदर ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या सदराचं दिमाखदार रूप असलेल्या, संपूर्णपणे आर्टपेपरवर छापलेल्या या पुस्तकात, दोन पानं भरून ऐसपैस छापलेला माझा फोटो पाहून माझ्या मराठी मनाला संकोचल्यासारखं झालं. इतके मोठे फोटो आपण फक्त सिनेमा नटांचे पाहतो.

‘महाअनुभव’ मासिकाच्या 2007च्या दिवाळी अंकात छापलेल्या माझ्या ‘आणखी मोठ्या रेषेसाठी’ या लेखाला 200हून अधिक फोन्स, ईमेल्स, पत्रे वगैरेंचा प्रतिसाद मिळाला. कारण त्या लेखाचा विषय होता, माझा वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी नोकरी सोडून पूर्ण निवृत्ती घेण्याचा निर्णय. आश्चर्य वाटावा असाच तो निर्णय होता. कारण वरील वाक्यात आनंदने वर्णन केलेल्या हेवा वाटण्याजोग्या स्थानावर मी होतो.

‘आयडिया सेल्युलर लिमिटेड’ या कंपनीचा असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट. महिन्याला लाखांनी कमावणारा. वर्षाकाठी परदेशी जाणारा, सतत विमानप्रवास करणारा आणि पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करणारा सुखासीन उच्चपदस्थ अधिकारी. आणि ते सारे सोडून, कोणतेही आर्थिक लाभ न घेता, मी अचानक मागच्या वर्षी फक्त वाचन-लेखन करण्याकरिता निवृत्ती घेतली. साहजिकच ज्याने ज्याने तो लेख वाचला, त्याला नवल आणि हेवा आलटूनपालटून वाटले. कित्येकांनी फोन करून तसे कळवले. काहीजणांना ती दीर्घकथाच वाटली. कारण मी ते सारे ऐषारामी जगणे हसत हसत सोडून नुसते पुस्तकांच्या जगात रमायचे ठरवले होते. पुढच्या 17 वर्षांत मिळू शकणाऱ्या कोट्यवधी रुपयांवर ‘इदं न मम’ म्हणून पाणी सोडून. आतापर्यंत मॅजेस्टिक प्रकाशनाने माझ्या तीन कादंबऱ्या छापल्या होत्या. पहिल्याच कादंबरीला (नचिकेताचे उपाख्यान) राज्य पुरस्कारासह इतरही पुरस्कार मिळाले होते. पण कादंबऱ्या लिहिणे वेगळे आणि त्यासाठी अशी नोकरी अचानक सोडणे वेगळे.

पण माझ्या दृष्टीने तो निर्णय केवळ साहजिकच नव्हे तर अपरिहार्य होता. कारण मनाच्या हाका टाळण्याइतका मुर्दाड मी कधीच नव्हतो. अगदी कॉर्पोरेट विश्वाच्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी होतो तेव्हाही नव्हतो. माझ्या मनाची जडणघडणच तशी नव्हती. म्हटलं तर अगदी सामान्य असूनही निराळाच होत गेलो मी, पण त्याचे कारण इतकेच नव्हे की माझ्या तळहातावर (सामान्यपणे आढळतात तशा) हृदय रेषा आणि मस्तिष्क रेषा निरनिराळ्या नसून एकत्रच आहेत. पट्टीने आखावी तशी एकच रेषा आहे. ते तर एक कारण आहेच म्हणा, कारण (गंमत म्हणजे) त्या क्षेत्रातले जाणकार आमचे द.भि. कुलकर्णी सर सांगतात, की अशी रेषा असलेला माणूस प्रखर बुद्धिमान तर असणारच, पण त्याची बुद्धी आणि भावना हातांत हात घालून चालणार.

प्रचंड थोर व्हायला उपयुक्त अशी महाभयानक गरिबी काही देऊ शकले नाहीत माझ्या बालपणात माझे आईवडील. पण त्याची थोडी भरपाई म्हणून त्यांनी पुस्तकांच्या राशी उभ्या केल्या लहानपणी आम्हा भावंडांसमोर. सर्वसाधारण सुखी असणाऱ्या त्या शिक्षकांच्या मध्यमवर्गीय घरात मोठेपणी सांगायला सोयीस्कर असे गरिबीचे चटके नव्हते; पण सोन्याचांदीचा नव्हे तर जेमतेम स्टीलचा चमचा होता तोंडात. आणि ‘यया बद्धा प्रधावन्ति। मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत।’ अशा आईने शिकवलेल्या सुभाषितातली चिरंतन ‘आशा’ होती उरात. ती मात्र उदंड होती. त्यावेळी आमच्या आजूबाजूला सगळेच असे खाऊनपिऊन सुखी सदरातले मध्यमवर्गीय लोक आणि काही मध्यमवर्गीयांच्याच जीवनशैलीत जगणारे श्रीमंत लोक होते.

कारण श्रीमंतीचे निर्लज्ज प्रदर्शन करायची फॅशनच नव्हती तेव्हा. वर जन्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घरात. हिंदी शिकवणाऱ्या आणि राष्ट्रभाषेचे पंडित असणाऱ्या शिक्षक वडिलांनी बालपणी काही अर्वाच्य शिवीगाळ, मारहाण सुद्धा केली नाही. त्यामुळे त्यातही काही आगळेवेगळे दुःख किंवा अन्याय, अत्याचार नव्हतेच. मात्र आईवडिलांची प्रेमविवाह करायची परंपरा जिवंत ठेवून त्यातल्या त्यात गाडीबंगलावाल्या गोऱ्या कोकणस्थ मुलीशी लग्न, करून केले तेवतेच म्हणावे असे धाडस त्या तरुणवयात. 

बरे मध्यमवर्गीय शिक्षकाच्या मुलाने अभ्यासात हुशार असणे हे काही कर्तृत्व नव्हे. दुसरे काहीच धाडसी जमले नाही की आपोआप हुशार वगैरे होतातच अशी मुले, तळहातावरची हृदय-मस्तिष्क रेषा अशी प्रखर तेजस्वी असल्यावर ! शिवाय मास्तर बापाच्या पोराने नाटके, नाट्यवाचन, वक्तृत्व, निबंधलेखन, कथाकथन वगैरे अशारीर आणि बिनधाडसी चळवळीत यश मिळवणे तर मुळीच आगळेवेगळे नव्हते. ते सारे उद्योग मी शाळा-कॉलेजात भरपूर केलेच. मेधा ओक बाईंनी वर्गात माझे निबंध वाचून दाखवणे हा सुखद उत्कटबिंदू. परीक्षांत तर यश मिळत होतेच, त्यात काही नवल नव्हे. त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये बी.कॉम., एम.कॉम. वगैरे करत एके दिवशी सरळ कॉस्ट अकाउंटिंगच्या परीक्षेत भारतात नववा आलो, तेव्हा मात्र अंमळ निराळे वाटले खरे. मात्र तिथे निराळाच फाटा फुटला आयुष्याला. अगदी निर्णायक, कारण तोपर्यंत मनात असलेले घराण्याची परंपरा चालवणारे विद्यादान करायचे स्वप्न मी क्षणात विसर्जित केले आणि कॉर्पोरेट क्षेत्रात पाऊल टाकले.

त्या फाट्यावरून चालताना मात्र जगण्याची सारी गणितेच बदलून गेली. सगळंच काही फाट्यावर नाही मारलं पण बऱ्याच गोष्टी बदलल्या. अगदी सिनेमॅटिकली ‘साला मै तो साहब बन गया’, वगैरे नाही झालं. पण... का नाकारा ? त्याच्या बरंचसं जवळपास झालं खरं आयुष्य. हळूहळू चढतचढत मी साहेबच झालो. कारण ज्या कॉर्पोरेट विश्वात मी शिरलो, त्या विश्वात सरतेशेवटी मालक आणि नोकर या दोनच जाती असतात. आणि मी नोकर होतो ! पण माझ्या तळहातावरच्या रेषांत लाखात एक असणारे सामर्थ्य होते आणि माझ्या पत्रिकेतले ग्रह उच्चीचे होते. त्यामुळे मी नोकर जमातीतला वरिष्ठ नोकर व्हायचे ठरवले... आणि झालो ! किती आवडतात नै असले स्तर आपल्या मनाला ?

ओह ! कुठून निघालो होतो ? जडणघडण नै का ? काय असतं आपल्या बालपणात जे आपल्याला घडवतं ? किंवा (बि)घडवतं ? ‘संस्कार’ हा अतिवापराने अर्थ गमावलेला शब्द आहे नै ? मला वाटते आपल्याला घडवणारा गोष्ट तीनच.

पुस्तके, परिस्थिती आणि संकटे. या तिन्हींची भेट घडवून देणारे माझे आईबाप, माझा आदर्श थोरला भाऊ सुहास, माझ्या तिसऱ्या कादंबरीत मदत करणारा धाकटा भाऊ अविनाश, माझे सगळे शिक्षक, अद्वितीय बायको अनघा आणि मुख्य म्हणजे माझी मुले नचिकेत आणि राधिका यांचे कसे आभार मानावे ? मी मुळात क्षणांवर प्रेम करणारा माणूस. क्षणांची स्मारके करत जगण्याचे उत्सव करणारा आनंदयात्री. प्रेमाच्या अफाट त्वरणात्मक शक्तीवर विश्वास असलेला चिरंतन प्रेमी.

मैत्रिणीवरच काय, पण चक्क बायकोवर सुद्धा अजूनही कविता करणारा, लता- आशा वादात लता, गावस्कर-विश्वनाथ वादात गावस्कर अशा सरधोपट मार्गाने आपली मते टाकणारा. 1963 साली माझा जन्म झाला, त्याच वर्षी ‘कोसला’ कादंबरी लिहिली गेली आणि त्या काळात हिंदी चित्रपटसंगीताचे भारुड तरुणाईवर राज्य करत होते. माझ्या स्वतःच्या तरुणाईपर्यंत ते गारुड टिकून होते आणि कॉलेज बुडवून 85 पैशांत ‘विजय’, ‘भानुविलास’ वगैरे थिएटरात पाहिलेल्या मॅटिनी सिनेमात लोक गाण्यागाण्याला पडद्यावर पैसे उधळताना पहात होतो. पड्यावर शम्मी आणि सायराने नजाकतीत ‘मेरे यार शब्बा खैर’ म्हटले की खिशातली नाणी पडल्यावर फेकायला जो खुळेपणा लागतो तो माझा स्थायीभाव. काही सुरेख सुंदर पाहिले, वाचले की डोळ्यांतून घळघळा आसवे येण्याइतका उत्कट आवेगी भाबडेपणा. डोळे गाळावे असे दुखःच आले नाही कधी पदरात, म्हणून अशी आनंदाने रडायची सवय लागली खरी.

ही उत्कटता, आवेगी भावुकता आणि त्याच्या जोडीला यशानुगामी कष्टाळूपणा, इतक्याच माथ्यावर आजवरचा प्रवास मजेमजेने झाला. विजय मिळवण्याचे व्यसन हा या मार्गावरचा ठळक भाग. आवडतेच मला यशस्वी व्हायला. जगण्यातल्या प्रत्येक पैलूवर या विजिगिषेने वर्चस्व गाजवले. किरकोळ आणि अपवादात्मक पराभवांनी मात्र कधीच विशेष खचवल्याचे स्मरत नाही. मध्यमवर्गीय बालपणाचे संस्कार अशावेळी फार कौशल्याने बचावात्मक पवित्रा घ्यायला मदत करतात. कोणत्याच प्रकारच्या क्रांतीचे मार्ग जमणारे नव्हते आणि विजयाचे, यशाचे तर व्यसन जडलेले. अशा वेळी बौद्धिक, कलात्म आणि चातुर्याचे मार्ग तेवढे उपलब्ध असतात. तेच वापरत जगत राहिलो.

ऑफिसात धडाधड प्रमोशन्स घेत राहिलो आणि लेखनात जमेल तसे अभिव्यक्त होत राहिलो. पण चाळिशीला आलो तेव्हा वाटले या दुभंग व्यक्तिमत्त्वाचे तुकडे होण्याआधी निर्णायक पाऊल उचलायला हवे. एकीकडे करोडो रुपये आणि सुखासीनतेच्या टोकाचे आमीष होते अन् दुसरीकडे आजवर न करता मिरवलेल्या व्यासंगाकडे जाण्याचा खराखुरा मार्ग होता. संस्कार म्हणा किंवा आत्म्याची हाक म्हणा, दुसरीकडे बेधडक उडी घेतलीय खरी. आता कोणत्याच यशाची वा विजयाची कांक्षा नसल्याने पराभवाचा धोका नाही. भीती तर किंचितही नाही. उदंड उत्साह आहे. कारण बाबा आमटे म्हणतात तसे. ज्याची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जिंकणारा कोण आहे ?

Tags: संस्कृती मराठी साहित्य कॉर्पोरेट बिग बॉस समकालीन प्रकाशन व्यासपीठ संजय जोशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके