डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हायटेक शेतीसाठी टिश्यू कल्चर उद्योजकतेकडे वळलो!

आपण भारताला कृषिप्रधान देश म्हणवतो, पण जागतिक बाजारपेठेत एकूण शेतीमाल निर्यातीत आपला दोन-तीन टक्केसुद्धा वाटा नाही. यासाठी सगळंच काही सरकारवर सोडून चालणार नाही. अन्य समाजघटकांनी देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप आलं पाहिजे. बाजारपेठेत काय विकतं हे लक्षात घेऊन शेती केली पाहिजे. नवनवीन प्रयोग करण्याची तयारी ठेवणं आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तरच आपण आधुनिक शेतीकडे प्रवास करू शकतो.

प्रश्न - प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीवर तिच्या सभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव असतो. तुमच्या बालपणाविषयी सविस्तर सांगाल का?

- बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात एक छोटंसं गाव आहे निमगाव. ते माझं मूळ गाव आहे. माझा जन्म सिंदखेड राजा या तालुक्याच्या गावी झाला. आईवडील, एक बहीण, एक भाऊ आणि मी- असं पाच जणांचं आमचं कुटुंब आहे. मी लहान असताना वडील सहकारी क्षेत्रात नोकरी करत होते. त्यामुळे आम्ही सिंदखेड राजा येथेच राहत होतो. पुढे सहकार क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे वडिलांची नोकरी गेली. नोकरी गेल्यामुळे आम्हांला मूळ गावी परतावं लागलं. दुसरा काही पर्याय हाती नसल्याने मूळ गावी जाऊन वडिलांनी शेती करायचं ठरवलं होतं. निमगाव हे बाराशे लोकसंख्येचं गाव आहे. त्या वेळी तिथे चौथीपर्यंतच शाळा होती. शाळेला इमारत नव्हती, वर्गात जमिनीवर बसायचो, कारण लाकडी बाकं वगैरे असा काही प्रकार नव्हता. एका झाडाखाली शाळा भरवली जायची. झाडाच्या सावलीत वर्ग भरत असत. पावसाळ्याच्या दिवसांत तर कधीकधी जनावरांच्या गोठ्यातही वर्ग भरत. अशा शाळेत मी प्राथमिक शिक्षण घेतलं. माझ्या मित्रांनी सातवीनंतर शाळा सोडून दिली. कारण सातवीनंतरचं शिक्षण गावात नव्हतंच.

प्रश्न - सातवीनंतरचं शिक्षण कुठं घेतलं?

- आईवडिलांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. शिक्षण घेतलं तर प्रगती होते, असं ते सांगत. म्हणून त्यांनी मला सातवीनंतरच्या शिक्षणासाठी आमच्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या किनगावच्या शाळेत पाठवलं. मी दहावीपर्यंतच शिक्षण तिथं पूर्ण केलं. सुरुवातीच्या दिवसात माझे चार-पाच मित्र आणि मी दररोज 12 किलोमीटर पायी चालत शाळेत जात असू आणि परत घरी येत असू. ग्रामीण भाग असल्याने दळणवळणाची सोय नव्हती. सायकल खरेदी करण्याइतपत पैसाही आमच्याकडे नव्हता. रोज 24 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत असल्यामुळे आम्ही भाकरीचं पालवं (भाकरीचं गाठोडं) सोबत घ्यायचो. या सर्व प्रवासात आम्ही खूप दमायचो. पण शाळा चुकवायचो नाही. अशा परिस्थितीत मी दहावीपर्यंतचं शिक्षण किनगावला पूर्ण केलं.

प्रश्न - बालपणी आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे बघून तुम्ही विमानात बसण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं मी वाचलंय. त्याचं काय?

- हो. खरं तर मी त्या वेळी सहाव्या वर्गात होतो. घरची तीन एकर शेती होती. शाळेला सुट्टी असली की, मी वडिलांना मदत करायला शेतात जायचो. शेताकडे चालत जात असताना आकाशातून उडणारं एक विमान पाहिलं आणि मनाशी ठरवलं की, आयुष्यात एक दिवस आपल्याला अशा विमानात बसायचं आहे. हनवते नावाचे माझे शिक्षक होते, त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. मी थेट त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘सर! मला एकदा विमानात बसायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘विमानात बसायचं असेल, तर तुला अमेरिकेला जावं लागेल. कारण ही सगळी विमानं अमेरिकेला जातात.’’ ते ऐकल्यापासून माझ्या मनाशी ठरवलं की, काहीही करून मला अमेरिकेला जायचंय. आणि माझा प्रवास तिथून सुरू झाला.

प्रश्न - तुम्ही शेतीचा उल्लेख केलात. घरची शेतीसुद्धा होती. तुम्ही लहानपणी शेतीतली कुठली कामं केली?

- आम्हांला दोन-तीन एकर शेती होती. पण ती काही फारशी पिकत नव्हती. लहानपणी जनावरांना चरायला घेऊन जाणं, त्यांचं शेण काढणं, दूध काढणं अशी काम करावी लागत. पुढे हळूहळू गवत कापून काढणं, फवारणी करणं, रास भरणं म्हणजे धान्य पोत्यात भरणं अशी कामं केली आहेत. पिकाची कापणी करण्यापासून ते सोंगणी करण्यापर्यंत सर्व प्रकारची शेतातील कामं मी केली आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी गावातल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायचो. मिळालेल्या पैशातून शाळेचं साहित्य खरेदी करायचो. मला आठवतं, त्या वेळी आम्हांला सात रुपयेप्रमाणे दिवसाला मजुरी मिळायची. त्यातून मी शिक्षणाचा खर्च पूर्ण करायचो. मी सातवीला अमरावती विभागातून पहिला क्रमांक मिळवला होता. तेव्हा मला 700 रुपये शिष्यवृत्ती मिळाली होती. शिष्यवृत्ती मिळाली म्हणून गावातील लोकांनी जंगी कार्यक्रम घेऊन माझा सत्कार केला. कार्यक्रमाला त्या वेळचे सभापती वाघोजी नाईक आणि सध्याचे राज्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोघांनी मला बक्षीस म्हणून दोनशे रुपये दिले. म्हणून एकूण 900 रुपये मला मिळाले होते. त्यातून 700 रुपयांची सायकल खरेदी केली आणि आईसाठी 30 रुपयांची चप्पल खरेदी केली. शाळेत जाण्यासाठी करावा लागणारा 24 किलोमीटरचा प्रवास सायकलमुळे थांबला. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं बक्षीस असल्याने माझा आत्मविश्वास वाढला.

प्रश्न - आजही मराठवाडा-विदर्भाच्या ग्रामीण भागातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी गाव सोडावं लागतं. तुम्हीसुद्धा  दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी गाव सोडलं होतं. पुढचं शिक्षण कुठं घेतलं?

- मी दहावीचं शिक्षण पूर्ण केलं, तेव्हा डीएड.ची खूप चर्चा होती. डीएड केलं, तर लगेच शिक्षक म्हणून नोकरी मिळायची आणि नोकरी मिळाल्यामुळे लग्नाचा प्रश्न सुटायचा. दहावीचं शिक्षण पूर्ण करून मी अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. बारावी सायन्सची फी भरू शकलो नाही. परिणामी कॉलेजने मला बारावीत प्रवेश नाकारला. मग एक वर्ष मी शेती केली. वडिलांनी थोडे पैसे जमवले. पण तोवर मी आटर्‌सला प्रवेश घ्यायचं ठरवलं. वडिलांना वाटायचं की, डी.एड. करावं आणि पटकन शिक्षकाची नोकरी करावी. पण मी ते नाकारलं. त्याचं कारण माझ्या डोक्यात अमेरिकेला जायचं तर काही तरी वेगळं शिक्षण घ्यावं लागेल, असा विचार सुरू होता.

प्रश्न - तुम्ही बी.ए. औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमधून पूर्ण केलं आणि एमबीए पुण्यात केलं. त्या काळात काय अडचणी तुमच्यासमोर होत्या?

- दहावी आणि बारावीला इंग्रजी विषयात फक्त 35 मार्क्स होते. बी.ए करायचं तर इंग्लिश साहित्यात करावं असं मी ठरवलं होतं, त्याचं कारण म्हणजे अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी बोलता-लिहिता येणं आवश्यक असतं असं मला कळालं होतं. पण मला बी.ए.ला प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा मी निलखसरांकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा केली, ते मला कॉलेजात घेऊन गेले. देवगिरी कॉलेजच्या शिक्षकाने त्यांनाही सांगितलं की, ‘याला इंग्रजी येत नाही, म्हणून प्रवेश मिळणार नाही.’ निलखसर म्हणाले, ‘‘परीक्षेच्या काळात तो आजारी होता. म्हणून परीक्षेत त्याला 35 च मार्क्स मिळालेत. तो हुशार आहे.’’ त्यावर देवगिरी कॉलेजच्या शिक्षकाने मला काही इंग्रजी शब्दाचं ‘स्पेलिंग’ विचारलं, मला तेही सांगता आलं नाही. पण निलख सरांच्या विनंतीमुळे मला बी.ए. इंग्रजी साहित्य या विषयाला प्रवेश मिळाला. मात्र मला वर्गात शिकवलेला एकही इंग्रजी शब्द कळत नव्हता. तरीही मी नियमित कॉलेजमध्ये जायचो. कारण अमेरिका मला खुणावत होती.

प्रश्न - औरंगाबादला पदवीचं शिक्षण घेऊन तुम्ही पुण्याला आलात. त्या वेळचे अनुभव कसे होते?

 - पुढे पुण्यात एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातही संघर्ष सुरू होताच. पुण्यात शिक्षणापेक्षा जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यासाठी पैसे जास्त द्यावे लागत होते. त्यामुळे आळंदीला राहायला गेलो. त्या वेळी पुण्यात व्यक्तीकडे ‘क्रेडिट काडर्‌स’ असणं म्हणजे व्यक्ती प्रतिष्ठित आहे असं मानलं जायचं. त्यामुळे मी ‘क्रेडिट काडर्‌स’साठीचे अर्ज विकण्याचं आणि त्यातली माहिती भरून देण्याचं कामंही केलं. त्यातून पैसाही मिळत गेला. एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी मिळाली. पण अचानक एक दिवस घरून वडिलांचा कॉल आला, ‘‘तुझ्या आईला कॅन्सर झाला आहे’’ मी लगेच नोकरी सोडली आणि आईच्या उपचारासाठी सहा महिने गावी गेलो. ती नोकरी सोडताना मला भूतकाळ आठवत होता. ज्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी प्रचंड त्याग केला, त्यांना आता माझी गरज आहे असं जाणवत होतं. आईच्या आजारादरम्यान मी पूर्ण वेळ आईसोबत हॉस्पिटलमध्ये होतो. योग्य उपचार मिळाल्याने आई कॅन्सरमधून पूर्णतः बरी झाली. पुन्हा मी बंगलोरला नोकरी करू लागलो.

प्रश्न - नोकरी मिळाल्यानंतर आर्थिक स्थिरता येते. नोकरी करत असताना अमेरिकेत जायची संधी कशी मिळाली?

- नोकरीच्या काळात एमबीए करूनसुद्धा अमेरिकेला जाता येणार नाही, हेही याच काळात कळालं. मग आयटी क्षेत्राशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस आमच्या बंगलोरच्या कंपनीत अचानक एक संधी आली. एसएपी म्हणजे ‘सॅप टेक्नॉलॉजी’साठीचा एक महिन्याचा कोर्स असतो. त्यासाठी दोनच वेळेस परीक्षा देता येते. पास झालात तर ठीक. अन्यथा पैसे वायाच जातात. त्या कोर्सची फीस होती, साडेतीन लाख रुपये! कंपनी कोर्ससाठीची फीस भरायला तयार होती. मात्र कंपनीची एक अट होती. ‘‘आम्ही तुम्हाला ‘स्पॉन्सर’ करू. पण पगार देणार नाही.’’ त्यासाठी लगेच होकार दिला. त्या वेळी परत पैशाची अडचण होतीच. पण संधी मिळतेय, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. मी कोर्स पूर्ण केला आणि मला एसएपीचं सर्टिफिकेट मिळालं. एका अर्थाने अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि माझं विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न सत्यात उतरलं. 

प्रश्न - नोकरीसाठी तुम्ही अमेरिकेत आणि जर्मनीत गेलात. तिथं काय शिकायला मिळालं?

- अमेरिकेत गेल्यानंतर मी भाषेवर कामं केलं. खऱ्या अर्थाने प्रोफेशनलिझम मी अमेरिकतेच शिकलो. वेळेचं नियोजन करणंसुद्धा तिथेच शिकलो. ज्ञान किती मूल्यवान असतं याचीही जाणीव मला अमेरिकेत झाली. जर्मनीत असताना मी व्यावसायिक दृष्टी आत्मसात केली. ‘इश्वेद बायोटेक’च्या स्थापनेत जर्मनीतल्या अनुभवाचा खूप उपयोग झाला. ‘टीमवर्क’ किंवा ‘टीम मॅनेजमेंट’ यांचे धडेही मला जर्मनीत मिळाले.   

प्रश्न - भारतात परत आलात तेव्हा इतर क्षेत्रांत नवीन प्रयोग करू शकला असतात, पण शेतीचा प्रश्न महत्त्वाचा का वाटला?

- मध्यमवर्गीय कुटुंबात जडणघडण झालेल्या मुलांच्या मनात स्वतःचं घर असावं, चारचाकी गाडी असावी आणि पैसा असावा- एवढ्याच अपेक्षा असतात. यातलं बऱ्यापैकी मिळवलं होतं. मी जर्मनीत असताना मला एक दिवस प्रश्न पडला की, आपण भौतिक सुखसुविधा मिळवल्यात, पण आपल्या आयुष्याचं एवढं सीमित उद्दिष्ट आहे का? दुसरीकडे मला या काळात दोन गोष्टी खूप अस्वस्थ करत होत्या, एक म्हणजे माझी बहीण शिक्षण घेऊ शकली नाही याची खंत मनात होती. कारण गावात मुलींसाठी शाळाच नव्हती, म्हणून घरच्यांनी तिला शाळेत पाठवलं नाही. त्यामुळे आपण महिला सक्षमीकरणासाठी काही तरी केलं पाहिजे, असा विचार अमेरिकेत गेल्यापासून माझ्या मनात येत होता. दुसरी गोष्ट, मी शेतकरी आणि शेतीचा प्रश्न खूप जवळून पाहिला होता. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सततचा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर काही तरी उपाय शोधून काढला पाहिजे असंही वाटत होतं. त्यासाठी शाश्वत शेतीचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. शेतीत आपण रोजगार निर्माण करू शकलो तर शाश्वत शेतीच्या दिशेनं आपला देश वाटचाल करू शकेल असं मला प्रकर्षाने जाणवत होतं.

मी जर्मनीत असताना हॉलंडला अनेकदा जायचो. हॉलंडची शेती बघायचो तेव्हा असं लक्षात आलं की, हॉलंडमध्ये हायटेक शेती केली जाते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या शेतीच्या समस्या हॉलंडमध्ये नाहीत. मग ‘हायटेक’ शेती करायची असेल तर ‘टिश्यू कल्चर’ शेतीशिवाय पर्याय नाही. त्यातून शेतकरी प्रगती करू शकतो. म्हणून मी ‘टिश्यू कल्चर’ कृषी उद्योजकतेकडे वळलो. आणि पुढे 2014 मध्ये ‘इश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे टिश्यू कल्चरवर काम करणारी कंपनी स्थापन केली.

प्रश्न - नोकरी सोडायची आणि भारतात परत जायचं असं जेव्हा तुम्ही घरी सांगितलं, त्यावर घरातील सदस्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या?

- कृषी उद्योजक होण्यासाठी कुटुंबाची साथ हवीच. मी जेव्हा भारतात येण्याचा विचार माझ्या पत्नीला सांगितला, तेव्हा ती माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली. माझी मुलगी तेव्हा म्हणाली की, पप्पा आपण भारतात जायला काही अडचण नाही. पण तिथं जाऊन तुम्ही शेती करू नका. त्यावर मी तिला असं का म्हणून विचारलं,  त्यावर ती म्हणाली, ‘‘मी माझ्या मित्रमैत्रिणींना कसं सांगू की, माझे पप्पा शेतकरी आहेत.’’ पण 2017 मध्ये मला एक पुरस्कार मिळाला तेव्हा, ती म्हणाली, पप्पा तुम्ही शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे. हे सांगण्याचं तात्पर्य असं की, कुटुंबातील प्रत्येकाची तुम्हांला साथ मिळाली पाहिजे. माझा भाऊसुद्धा आज ‘इश्वेद’चं काम करतो. कंपनी सुरू केली तेव्हा माझ्या भावाने मला सांगितलं की, जोवर कंपनी स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत मी एकही दिवस सुट्टी घेणार नाही. आणि त्याने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आजचं यश हे या सर्व लोकांचं आहे. म्हणून मी म्हणतो की, ‘टीमवर्क’ शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.

प्रश्न - ‘टिश्यू कल्चर’ कंपनी सुरू करावी असा विचार केव्हा मनात आला?

- मला ‘मोटार बाइकिंग’ची खूप आवड आहे. अर्ध जग ‘बाइक’वरून फिरलो आहे. जर्मनीत असताना 2013 मध्ये लेह-लडाखला ‘बाइक एक्सपिडेशन’साठी गेलो होतो. तिथे गेल्यावर मी समाजाचं काही तरी देणं लागतो याची पुन्हा जाणीव झाली. तिथे मला संदीप बोरा हे माझे मित्र भेटले. त्यांच्याशी चर्चा करताना असं ठरलं की, शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून काम करायचं. या काळात ‘ॲग्रोवन’ वर्तमानपत्र नियमित वाचायचो. त्यातल्या ‘सक्सेस स्टोरी’ वाचत होतो. ते वाचत असताना लक्षात आलं की, भारतातल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं ‘प्लांटिंग मटेरिअल’ उपलब्ध नाही.  म्हणून त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. आपले शेतकरी कष्ट करतात. पण त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना उत्तम गुणवत्तेचं रोप आणि बियाणं देणं गरजेचं आहे. याचा अभ्यास केला, तेव्हा ‘टिश्यू कल्चर’मध्येच काम करायचं ठरवलं.

प्रश्न - ‘टिश्यू कल्चर’ म्हणजे काय? टिश्यू कल्चरची प्रक्रिया कशी असते. एका रोपापासून लाखो रोपे कशी तयार केली जातात?

- ‘टिश्यू कल्चर’ (उती संवर्धन) पद्धती ही ‘टेस्ट ट्यूब बेबी’सारखी पद्धत आहे. सोप्या भाषेत ‘क्लोन’ निर्मितीची पद्धत आहे. आपल्याकडे पूर्वी बियाण्यांपासून झाडं उगवायची. त्यात झाडांचा आकार एकसमान नसायचा. एक झाड मोठं तर दुसरं झाड छोटं असं असायचं. पण ‘टिश्यू कल्चर’मुळे झाडांची वाढ एकसमान पद्धतीने होते. त्यामुळे झाडांपासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होते. सहा फूट उंचीच्या झाडातील एक ‘सेल’ घेऊन त्याला ‘मल्टिपल’ केलं, तर सर्व झाडं सहा फुटांची होतात. 18 व्या शतकात ‘टिश्यू कल्चर’वर संशोधकांनी खूप संशोधन केलं आहे. त्यातूनच ही पद्धत पुढे आली. उदा., केळीची हजार झाडांची बाग आहे. आणि त्यातील शंभर झाडं गुणवत्तापूर्ण आहेत. तर त्याच शंभर झाडांतून तशीच गुणवत्तापूर्ण झाडं तयार करायची असतील तर ‘टिश्यू कल्चर’ प्रक्रियेच्या मदतीने अशी झाडं तयार करता येतात. या प्रक्रियेचे पाच टप्पे असतात. 1. ‘इनिसेशन’- म्हणजे रोपांची फांदी, खोड किंवा कंद घेऊन त्याला एका बाटलीत ‘इनिशिएट’ केलं जातं. 2. ‘स्पॉटिंग’- बाटलीतल्या रोपांना फुटवे येतात. 3. ‘मल्टिप्लिकेशन’- फुटव्यांचे तुकडे केले जातात. 4. ‘रुटिंग’- रोपांना मूळं येतात. 5. ‘प्लॅन्ट’- रोपं तयार होतात. अशा प्रकारे ही प्रक्रिया असते. ‘टिश्यू कल्चर’ पद्धतीचा अवलंब न करता एका रोपाची लाखो रोपे निर्माण करण्यासाठी लाखो एकर जमीन लागवडीखाली आणावी लागेल. ते शक्य नाही. म्हणून ‘टिश्यू कल्चर’ पद्धतीचा वापर करून दहा हजार ‘स्क्वेअर फिट’च्या जागेमध्ये दहा कोटी रोपे तयार करता येतात. रोप प्रयोगशाळेत असल्यामुळे यावर कुठलाही रोग येत नाही. रोपांची ‘डीएनए टेस्टिंग’ करता येते. आणि झाडांची एकसारखी वाढ होते. एवढ्या सगळ्या प्रकियेनंतर रोप ‘व्हायरस इन्फेक्टड’ आहे की, नाही याची चाचणी केली जाते. आणि मगच शेतात त्याची लागवड केली जाते. तर ही सगळी ‘टिश्यू कल्चर’ची किमया आहे.

प्रश्न - ‘इश्वेद बायोटेक’ शेतीसंबंधात कोणत्या क्षेत्रात काम करते? शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो?

- ‘इश्वेद बायोटेक’ चार ‘सेगमेंट’मध्ये काम करते. फळझाडं, शोभेची झाडं, जंगली झाडं आणि फुलझाडं. यामुळे शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपं मिळतात. झाडांच्या उत्तम ‘व्हरायटी’ शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. कारण बियाणं उगवण्यासाठी वाट पाहण्याचा वेळ वाचतो. ‘टिश्यू प्लॅन्ट’ आयत्या स्वरूपात मिळतात. ‘इश्वेद क्रॉप सायन्स’मध्ये  आम्ही भाजीपाल्याचे संकरित बी-बियाणे तयार करतो. या बियाण्यांची विक्री देशभर केली जाते. त्याचबरोबर जैविक खते आणि औषधांची निर्मिती आमची कंपनी करते. ‘फूड प्रोसेसिंग’सुद्धा आमच्या कंपनीमार्फत केले जाते. ‘फार्म फ्रेश प्रोड्युस’मध्ये शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन त्याची निर्यात करण्याचं कामही आम्ही करतो. ‘इश्वेद क्रॉप सायन्स’च्या माध्यमातून बीजनिर्मितीच्या प्रक्रियेत पुढच्या वर्षी 10 हजार शेतकऱ्यांना सामावून घेणार आहोत.  

प्रश्न - ‘इश्वेद’ कंपनी आज किती देशांबरोबर व्यापार करते?

- सध्या आम्ही इस्रायल, अमेरिका, मध्य आशियातील दुबई, आफ्रिकन आणि साउथ ईस्ट एशिया या देशांबरोबर काम करत आहोत. या वर्षी आम्ही युरोपियन देशांत प्रवेश करणार आहोत. थोडक्यात सर्वच खंडांत आम्ही काम करतोय. ‘टिश्यू कल्चर’ क्षेत्रातील इतर कंपन्या पारंपरिक पिकांचं ‘टिश्यू कल्चर’ करतात. आम्ही मात्र त्याला फाटा देऊन संत्रा, मोसंबी आणि खजूर यांसारख्या ‘टिश्यू’ रोपांची निर्मिती पुढच्या वर्षी करणार आहोत. 

प्रश्न - ‘मिशन सात हजार एकर फळबाग लागवड’ ही काय संकल्पना आहे?

- आम्ही ‘फूड प्रोसेसिंग’च्या क्षेत्रात उतरलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की, कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे या क्षेत्रात समस्या निर्माण झालेली आहे. ‘फूड प्रोसेसिंग’ हा ‘सिझनेबल’ व्यवसाय आहे. प्रत्येक फळांचा ठरावीक कालावधी असतो. तो ठरावीक संपला की, संबंधित फळं झाडांना लागत नाहीत. मग या काळात ‘फूड प्रोसेसिंग’चा व्यवसाय ठप्प होतो. आम्हाला ‘फूड प्रोसेसिंग’चा जो प्रकल्प सुरू करायचा होता, त्यासाठी कमीत कमी सात हजार एकर जमीन फळबाग लागवडीखाली असणं आवश्यक होतं. तरच आम्ही ‘प्रोसेसिंग’ करू शकतो. आपल्याकडे अनेक ‘फूड प्रोसेसिंग’ सुरूही झाले आणि अल्प काळात बंदसुद्धा झाले. त्याचं कारण या कंपन्यांना कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे आम्ही ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं. त्यातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ निर्माण करून द्यायची, हे ध्येय ठेवून आमचं काम सुरू आहे. 

प्रश्न - इश्वेदने आजवर किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे? ‘बायोटेक’ क्षेत्रातलं शिक्षण न घेतलेले कर्मचारीसुद्धा प्रयोगशाळेत उत्तम पद्धतीने काम करतात असं मी वाचलं आहे. हे कसं घडवून आणलं?

- आमच्याकडे आज 500 हून अधिक कर्मचारी काम करतात. उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी ठरावीक शैक्षणिक अट असलीच पाहिजे असं मला वाटत नाही. मी स्वतः आटर्‌स शाखेत शिक्षण घेतलं. ‘आयटी’ क्षेत्रात नोकरी केली आणि ‘बायोटेक’ क्षेत्रात उद्योग करत आहे, त्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, याला माझ्या मते फार महत्त्व द्यायला नको. जर्मनीत आज केवळ डॉक्टर होण्यासाठी पदवी लागते. त्यामुळे जर्मनीत एकच व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात काम करू शकते. उदा., जर्मनीत तुम्ही आज पत्रकार असाल आणि काही दिवसांनी तुम्हाला ‘कोडिंग’ करता येत असेल तर तुम्ही आयटी इंजिनिअर म्हणून काम करू शकता. तिथं त्यासाठी पदवीची अट नाही. आम्ही ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनाच नोकरी देतो. माझ्या कंपनीतल्या 70 टक्के महिला कर्मचारी ह्या शेतात काम करणाऱ्या होत्या. आज त्या सर्व महिला कर्मचारी आयटी क्षेत्रातल्यासारखा ‘युनिफॉर्म’ वापरतात. आज त्या साडीऐवजी ‘युनिफॉर्म’ वापरतात.

प्रश्न - तुमच्या कंपनीतील महिला साडीऐवजी ‘युनिफॉर्म’ वापरायला लागल्या तेव्हा काही पुरुषांनी त्याला विरोध केला होता. कशामुळे?

- काही पुरुषांनी स्त्रियांच्या नोकरी करण्यावर प्रश्न निर्माण केले होते. परिणामी, आमची कंपनी सुरू झाली आणि चौथ्या दिवशीच बंद पडली. त्याचं कारण गावातून महिला कंपनीकडे जायला निघायच्या तेव्हा त्यांना बसमधून प्रवास करावा लागत असे. स्त्रियांच्या नोकरी करण्याला विरोध करणाऱ्या गावातील काही पुरुषांनी बस अडवली. महिलांवर ‘मॅडम’ म्हणत शेरेबाजीसुद्धा सुरू केली. ग्रामीण भागात ‘मॅडम’ या शब्दाला वेगळ्याच अर्थाने घेतलं जायचं. शेतात काम करणाऱ्या महिला पर्स घेऊन कंपनीत काम करायला जातायत हे पाहून महिलांना चिडवलं जायचं. परिणामी, महिलांनी कंपनीत येणं बंद केलं. चौकशी केली तेव्हा महिला म्हणाल्या, ‘‘आम्हाला पुरुष चिडवतात, आम्हांला त्याची लाज वाटते.’’ मग त्या महिलांना ‘मॅडम’ या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. प्रगत आणि सुशिक्षित महिलांना ‘मॅडम’ म्हटलं जातं असं सांगितलं. खूप प्रयत्न करून त्यांचे गैरसमज दूर केले. आणि मग त्या पुन्हा कंपनीत काम करायला तयार झाल्या. 

प्रश्न - तुमच्या कंपनीने महिला आरक्षणाचं धोरण राबवलं आहे, त्याबद्दल आम्हांला सांगाल का?  

- मी नोकरीनिमित्त बरीच वर्षे परदेशात होतो. त्यामुळे मला वाटलं की, भारतातील सामाजिक परिस्थिती बदलली असेल. पण इथं आल्यानंतर माझ्या पदरी निराशाच आली. आजही आपल्याकडे जात, धर्म आणि पंथ या गोष्टींना फार महत्त्व दिलं जातं. आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा अनेकांनी मला ‘‘ ‘आमच्या’ माणसाने कंपनी सुरू केली,’’ असं म्हटलं. ‘आमच्या’ या शब्दाशी लोकांनी जातीचा संबंध जोडला होता. मला त्याचं खूप वाईट वाटलं. कंपनीच्या ‘एम्प्लॉयमेंट’ अर्जावरील आडनावचा कॉलम आम्ही जाणीवपूर्वक काढून टाकला. आम्ही कधीही कुणाचं आडनाव विचारत नाही. कारण आडनाव विचारलं की, माणूस समोरच्या व्यक्तीच्या जातीला हात घालतोच. त्यामुळे ज्याला गरज आहे आणि पात्रता आहे अशा सर्व जाती-धर्माची माणसं आमच्याकडे काम करतात. ग्रामीण भागात एखाद्या महिलेच्या पतीचं निधन होतं तेव्हा तिला कुणाचाही आधार राहत नाही. म्हणून अशा महिलांना सक्षम करण्यासाठी 10 टक्के आरक्षण आम्ही ठेवलं आहे. आज आमच्या कंपनीत 200 विधवा महिलांना रोजगार दिला आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील सदस्यांना आधार देण्यासाठी आम्ही 10 टक्के आरक्षण ठेवलं आहे. अपंग व्यक्तींसाठी 5 टक्के आरक्षण आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध महिलांसाठीही आरक्षण आहे. कंपनीत एकूण 90 टक्के आरक्षण हे महिलांसाठी आहे. कारण स्त्री सक्षमीकरण करायचं असेल तर महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

प्रश्न - अशी सामाजिक बांधिलकी जोपासण्यामागे नेमकी काय प्रेरणा होती?

- मी तीन व्यक्तींबद्दल भरपूर वाचलं आहे. स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज. डॉ.बाबासाहेबांकडून मला ज्ञानाची भूक कशी असावी हे शिकता आलं. ते म्हणायचे, ‘समाजसुधारणेचा रथ मी इथपर्यंत आणला आहे. हा रथ तुम्हांला पुढे घेऊन जाता आला तर घेऊन जा. मात्र या रथाला मागे ओढू नका.’ स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘‘तुम्ही एक रुपया कमावला तर 20 पैसे समाजासाठी खर्च करा.’’ आणि ‘समोर कितीही आव्हानं असू द्या, त्यावर मात करता येते’ हे मला शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळालं. आपण समाजासाठी काम केलं पाहिजे, याची प्रेरणा मला ह्या तिघांकडून मिळाली.

प्रश्न - आज तुम्ही एक यशस्वी कृषी उद्योजक आहात. कामाचा व्याप असूनदेखील तुम्ही स्वतःचे छंद ते कसे जोपासता?

- मी अर्धं जग ‘बाइक’वरून फिरलो आहे. माझ्या पत्नीसोबत मी प्रवास करत असतो. मला वाटतं, कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. वारंवार एकच काम केल्याने, कामात रटाळपणा येतो, आपलंच काम कंटाळवाणं वाटायला लागतं, नवीन विचार करण्यासाठी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. म्हणूनच मी बाइकिंग करतो. वर्षातील 10 महिने काम आणि 2 महिने जगभर प्रवास करणं, असं मी ठरवलेलं आहे. मी ‘स्काय डायव्हिंग’सुद्धा करतो, ज्याला मराठीत विमानातून उडी मारणं म्हणतात. उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे धाडस असलं पाहिजे. धाडस असेल तर निर्णयक्षमता अधिक चांगल्या प्रकारे काम करते आणि निर्णयक्षमता चांगली असली, की तुम्ही करत असलेल्या कामाचे ‘रिझल्ट्‌स’ चांगले येतात. त्यामुळे मी माझे छंद आवडीने जोपासतो.

प्रश्न - शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेतीक्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणता येऊ शकतात. पण भारतात शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वेग कमी आहे, असं तुम्हांला वाटतं का?

- हो. भारतात मूल्य साखळीवर काम होणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान अजूनही कागदोपत्रीच आहे. ते शेतकऱ्यांकडे पोहोचत नाही. आपण भारताला कृषिप्रधान देश म्हणवतो, पण जागतिक बाजारपेठेत एकूण शेतीमाल निर्यातीत आपला दोन-तीन टक्केसुद्धा वाटा नाही. यासाठी सगळंच काही सरकारवर सोडून चालणार नाही. अन्य समाजघटकांनी देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप आलं पाहिजे. बाजारपेठेत काय विकतं हे लक्षात घेऊन शेती केली पाहिजे. नवनवीन प्रयोग करण्याची तयारी ठेवणं आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तरच आपण आधुनिक शेतीकडे प्रवास करू शकतो.

प्रश्न - आज तुम्ही जैवविविधता टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहात. त्यातून ‘टिश्यू कल्चर’ रोपांची लागवड डोंगराळ भागात केली जात आहे. त्याबद्दल आम्हांला सांगाल का?

- माझ्या लहानपणी आमच्या गावाकडे अनेक पक्षी आणि प्राणी दिसायचे. आज ग्रामीण भागातलं ते पूर्वीचं चित्र दिसत नाही. मी उत्तराखंडमध्ये एक झाडांचं वन तयार केलं आहे. उत्तराखंडचा प्रदेश डोंगराळ आहे. तिथे अर्धा किंवा एक एकर क्षेत्रात शेती केली जाते. ही शेती प्रामुख्याने तिथल्या महिला करतात. पुरुष मात्र बसून असतात. कारण त्यांच्याकडे रोजगाराचा पर्याय नव्हता. मी एका मंदिरात गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, तिथल्या मंदिरात देवाला प्रसाद म्हणून फळं ठेवली जातात. त्यावरून माझ्या मनात विचार आला की, आपण या डोंगराळ प्रदेशात फळझाडं लावली पाहिजे. जेणेकरून बेरोजगार बसलेल्या पुरुषांना रोजगार मिळेल. त्याच संकल्पनेतून आम्ही त्या भागात विविध फळझाडांची लागवड केली. नंतर बुलडाणा जिल्ह्यात ‘सालसबन’ म्हणून एक ठिकाण आहे. तिथे आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात राहतात. उदरनिर्वाहासाठी आदिवासी लोक बांबूपासून छोटी खेळणी किंवा शोभेच्या वस्तू बनवून विकत असतात. पण त्या भागातली बांबूची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने आदिवासी लोक बांबू विकत घेऊ लागले. हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा मी त्या आदिवासी लोकांना ‘टिश्यू कल्चर’ची रोपं देण्याचा निर्णय घेतला. 10 हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड केली. येणाऱ्या एक ते दीड वर्षात आदिवासींना त्या बांबूचा फायदा होईल. आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल आणि जैवविविधता टिकून राहील, या उद्देशाने आम्ही बांबू लागवड केली आहे.

प्रश्न - तुमच्या भविष्यातील वाटचालीबद्दल आम्हाला सांगाल का?

- येणाऱ्या काळात पाच कोटी लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बदल घडवण्याचं काम मला करायचं आहे. मला सिंदखेड राजा इथं एक इंटरनॅशनल शाळा सुरू करायची आहे, ज्यातून मी मोफत शिक्षण देऊ शकतो. ज्यांच्याकडे ‘टॅलेंट’ आहे अशा सर्व जाती-धर्माच्या माणसांसाठी मला ही शाळा सुरू करायची आहे. कारण लहानपणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती, म्हणून माझ्या शिक्षणासाठी वडिलांना खर्च करता आला नाही, त्याची खंत मनात आहे. आजच्या पिढीवर शिक्षणासाठी तशी वेळ येऊ नये याचसाठी मी हा संकल्प केला आहे. 

प्रश्न - शेवटचा प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल?

- या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना मला आवर्जून सांगावसं वाटतं की, जगभरातील सर्व उद्योग क्षेत्रात कृषी उद्योग क्षेत्र एकमेव असं आहे, जिथे ‘टॅक्स’ शून्य टक्के आहे. आयात-निर्यातीसाठी ‘टॅक्स’ लागत नाही. त्यामुळे इथे खूप संधी आहेत. दुसरीकडे कृषी उद्योगातून समाजाच्या शेवटच्या घटकांचं हित जोपासता येतं. त्यामुळे तुम्ही कृषी उद्योजक होणार असाल तर आपल्या कामाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. ‘कोविड-19’च्या काळात तुम्ही पाहिलंत की, सर्व क्षेत्रांतील व्यवहार ठप्प झाले होते, केवळ शेतीक्षेत्र सुरू होतं. जगभरात आज शेतीक्षेत्रात उद्योग करणाऱ्या लोकांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जातं. कारण सर्व जग या क्षेत्रावर अवलंबून आहे. शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं की, ज्यांचं आरोग्य उत्तम आहे, ज्यांच्यात नेतृत्व करण्याची धमक आहे, आणि जो छंद जोपासतो, अशा तरुणांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळतं.

मुलाखत व शब्दांकन : धनंजय सानप
Mob. 9850901073

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय वायाळ
sanjaywayal@yahoo.com

कृषी उद्योजक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके