डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राष्ट्रपित्याची सावली नव्हे, स्वतंत्र चेतनामूर्ती

‘हिंदू-मुस्लिम एकोपा’ हे गांधींचे प्रिय स्वप्न होते. कस्तुरबा खूप आग्रहीपणाने ह्या मुद्यावरदेखील सक्रिय झाल्या. स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नासाठी हिंदू-मुस्लिमांनी अजमेर-राजस्थान इथे कस्तुरबांसमोर विशाल मोर्चा काढला. अजमेर हे स्थान दोन्ही धर्मांसाठी महत्त्वाचे आहे. कस्तुरबांनी पुष्कर सरोवरात स्नान करून ब्रह्‌म्याचे दर्शन घेतले. मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांना कस्तुरबांचे म्हणणे ऐकायचे होते. त्यांनी आपले भाषण गुजरातीत लिहून दिले, ते रामदास गांधींनी वाचून दाखवले. तेथील ब्रह्मवृंदाने नेहमीचे मंत्र न म्हणता ‘गांधी मन्वंतरे, स्वराज्य प्रतिपाद्यर्थ-’ अशी समयोचित प्रार्थना केली. राजस्थानची कस्तुरबांची यात्रा खूप यशस्वी झाली, पण स्थानिक वृत्तपत्राखेरीज इतरांना कळली नाही. अशा अनेक अज्ञात पैलूंवर जोसेफ यांनी प्रकाश टाकला आहे.

डॉ. सिबी जोसेफ यांचं ‘कस्तुरबा गांधी : ॲन एम्बॉडिमेंट ऑफ एम्पॉवरमेंट’ हे पुस्तक कस्तुरबांबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर करू शकेल. ‘त्या बिचाऱ्या, साध्या-भोळ्या स्त्री होत्या, गांधीजी त्यांच्याशी वाईट वागले, त्यांनी निमूटपणे सारे सहन केले.’ असा उसना उमाळा आणून त्यांच्याविषयी बोलणे, हा अनेकांचा सात्त्विक(?) उद्देश असतो. पण त्या साध्या दिसणाऱ्या स्त्रीमध्ये किती तेज होतं, किती धडाडी नि मानवी मूल्यांवर निष्ठा होती याचा अंदाज हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच येईल. बारकाईने संशोधन करून पुराव्यांसह लिहिलेल्या पुस्तकात  आपल्याला चकित करतील अशा घटना नमूद केल्या आहेत. दि.11 एप्रिल 1869 रोजी जन्मलेल्या सधन घरातल्या कस्तुरचे लग्न तिच्याहून सहा महिन्यांनी लहान असलेल्या मोहनदासशी झाले. या दोघांच्या 150 व्या जन्मवर्षाच्या निमित्ताने अनेक अभ्यास नि संशोधन प्रकल्प आखले गेले होते. त्यादरम्यान हे पुस्तक आकारले. सन 2020 मध्ये ‘स्टडीज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ  गांधीयन स्टडीज’चे डीन असलेल्या डॉ.सिबी के. जोसेफ यांनी लिहिले आणि गांधी स्मारक निधी, मुंबई यांनी प्रकाशित केले.

पोरबंदरच्या प्रतिष्ठित, श्रीमंत कापडिया परिवारातील चार भावांची कस्तुर ही लाडकी लेक होती. गांधी परिवारही नामांकित होता. त्या वेळच्या रीतीने मुलांच्या सातव्या वर्षीच घरच्यांनी ही सोयरिक नक्की केली होती. असे असूनही लग्न मात्र दोघांच्या तेराव्या वर्षी झालं. कापडिया सुधारणावादी असूनही कस्तुरला शाळत घातलं नव्हतं. तिने लिहायला-वाचायला शिकावे, ही नवरा मोहनदासची  इच्छा. पण कस्तुरला शिक्षणाची मुळीच गोडी नव्हती. त्या काळात वर-वधूंनी लग्नाआधी एकमेकांना पाहिलेलं नसे, लग्नानंतरच परस्परांचे दर्शन होई. पण इथे तर ते दोघे बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर या बालकवराने आपल्या बालिका वधूवर नवरेगिरी दाखवायला सुरुवात केली. त्याच्या परवानगीखेरीज कुठे जायचं नाही, असा नियमच केला. बिचाऱ्या कस्तुरची तर कोंडीच झाली. पण ती कसली ऐकते! तिने बाहेर जाणे सुरूच ठेवले. त्यावरून त्या दोघांचे वाद होत, अबोला धरला जाई. कस्तुर ही फारच मोहक नि लाघवी मुलगी होती. मोहनदास तिच्या प्रेमात अखंड बुडालेला असे. शाळेत गेल्यावरही तिचेच विचार मनात असत. असं ते मंतरलेले पोरवय होते. कस्तुरही आपला हट्ट चतुराईने पुरा करी. ‘मला न विचारता का बाहेर गेली?’

‘बांची परवानगी घेऊनच देवळात गेले होते. त्या घरातल्या मोठ्या ना?’ स्वत:ला हवं ते त्या असहकाराने, सत्याग्रहाने पुरं करून घेत असत. तिच्याकडूनच आपण हे सत्याग्रह नि असहकाराचं हत्यार उचललं, असं गांधींनी नमूद केलंय.

कस्तुरबा गांधी अनेक अर्थाने अस्सल भारतीय स्त्रीचा अर्क होत्या. त्याग, कुटुंबासाठी पराकोटीच्या कष्टाची तयारी, गांधींच्या जगावेगळ्या प्रयोगात सुरुवातीला विरोध पण नंतर सर्वस्वाने स्वीकार. स्वातंत्र्यलढ्यात, सत्याग्रह नि असहकारात पुढाकार घेतलेली स्त्री. त्यांच्यामुळे इतर स्त्रियांनाही बळ आले. खास करून दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी सरकारच्या ख्रिश्चनपद्धतीखेरीज झालेले इतर धार्मिकांचे विवाह हे बेकायदा ठरवले गेल्याने तेथील हिंदू- मुस्लिम-पारसी समाजात, खास करून स्त्रियांत खळबळ नि अस्वस्थता निर्माण झाली होती. ‘आम्ही तर बायका, आम्ही काय करू शकतो?’ ही मानासिकता सर्वांची होती. पण आता आपण आपल्या पतीच्या रखेल, विवाहबाह्य स्त्री ठरू!! काय करायचे? गांधींनी सुचवले-‘तुमची लढाई तुम्हालाच लढायला लागणार.’ हे लक्षात आल्यावर त्या रस्त्यावर उतरल्या. कस्तुर गांधी त्यांची नेता ठरली आणि सरकारने तो कायदा मागे घेतला. हा राजकारणातला म्हणा वा समाजकारणातला म्हणा- सत्याग्रहाचा पहिला विजय ठरला.

त्या दिसत होत्या साध्या, पण निग्रह तर अगदी वज्रागत होता. गांधींच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यातील प्रत्येक क्षणाच्या त्या केवळ साक्षीदारच नव्हत्या, तर बरोबरीने भागीदार होत्या. आपल्या या जगद्‌विख्यात पतीच्या कामाचे महत्त्व त्यांनी जोखले होते. त्या एरवी शांत आहेत असे वाटे, पण जेव्हा गांधी तुरुंगात असत; तेव्हा साऱ्या कामाचे नियोजन, अनुयायांना धीर देणं, संघटनेचं मनोधैर्य कायम ठेवणं त्या कुशलतेने करत. गांधींना असहकारासाठी ब्रिटिश सरकारने सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली, तेव्हा कस्तुरबांनी आश्रमवासींचे मनोधैर्य निर्धाराने टिकवून ठेवले. त्यांनी एक निवेदन जारी करून वृत्तपत्रांतून अनुयायांपर्यंत पोहोचवले, ‘गांधीजींचे काम पुढे सुरू ठेवणे म्हणजेच त्यांची काळजी घेणे आहे. माझ्या पतीला झालेल्या शिक्षेचा माझ्यावर, तसेच सर्वांवर परिणाम झालाय. पण यांची शिक्षा कमी करवून घेणे आपल्याला अशक्य आहे. आपले देशवासी या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शांतपणे विधायक काम करीत राहतील याची मला खात्री आहे. माझ्या पतीच्या देश उभारणीच्या अनेक कामांतील एक प्रमुख मुद्दा आहे- खादीचा प्रचार नि प्रसार. त्यामुळे रिकाम्या हातांना काम मिळेल. विदेशी वस्तूंचा त्याग करून खादीचा वापर सर्व जण करतील. सर्व स्त्रिया चरखा चालवण्याचे काम धार्मिक निष्ठेने करतील. सर्व व्यापारी आपल्या दुकानांमधून विदेशी वस्त्रांचा व्यापार बंद करतील.’ हे निवेदन 23 मार्च 1922 च्या ‘यंग इंडिया’त प्रकाशित झाले.

‘हिंदू-मुस्लिम एकोपा’ हे गांधींचे प्रिय स्वप्न होते. कस्तुरबा खूप आग्रहीपणाने ह्या मुद्यावरदेखील सक्रिय झाल्या. स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नासाठी हिंदू-मुस्लिमांनी अजमेर-राजस्थान इथे कस्तुरबांसमोर विशाल मोर्चा काढला. अजमेर हे स्थान दोन्ही धर्मांसाठी महत्त्वाचे आहे. कस्तुरबांनी पुष्कर सरोवरात स्नान करून ब्रह्‌म्याचे दर्शन घेतले. मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांना कस्तुरबांचे म्हणणे ऐकायचे होते. त्यांनी आपले भाषण गुजरातीत लिहून दिले, ते रामदास गांधींनी वाचून दाखवले. तेथील ब्रह्मवृंदाने नेहमीचे मंत्र न म्हणता ‘गांधी मन्वंतरे, स्वराज्य प्रतिपाद्यर्थ-’ अशी समयोचित प्रार्थना केली. राजस्थानची कस्तुरबांची यात्रा खूप यशस्वी झाली, पण स्थानिक वृत्तपत्राखेरीज इतरांना कळली नाही. अशा अनेक अज्ञात पैलूंवर जोसेफ यांनी प्रकाश टाकला आहे.

गांधीजींच्या उपवास-निर्णयात कस्तुरबांची कुतरओढ होई. त्या पतीच्या काळजीने अगदी विझून जात. त्या काळात त्यांची सेवा करणे नि स्वत:ही फलाहाराखेरीज काहीही न खाणे, ही त्यांच्या बाजूनेही भागीदारी असे. पण त्याचा गाजावाजा त्या होऊ देत नसत. सरलाबेन प्रकरणी त्यांच्या जवळच्या लोकांत नुसते काहूर उठले होते. गांधी या स्त्रीच्या आहारी जातात की काय, अशी काळजी सर्वांना पडली होती. मुलांना आईच्या मनावर काय परिणाम होईल याची चिंता होती. कस्तुरबांच्या जवळच्या मैत्रिणीने त्या प्रकरणाबद्दल छेडले असता, ‘आपला आपल्या पतीवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे वागणे निर्मळ आहे. सारे जग ज्या नैतिकतेसाठी त्याच्याकडे पाहत आहे, त्याच्या वागण्यात मला खोट दिसत नाही. अनेक घरांत पुरुष असल्या गोष्टीमुळे भांडणं निर्माण करतात. माझा नवरा खुलेपणाने त्याबद्दल बोलतो. आमच्यात पूर्ण विश्वासाचे वातावरण आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. जसे पार्वतीने जन्मोजन्मी शिवाची साथ मागितली, तशीच मीही मागितलीय.’ असे गुजरातीत पत्र लिहून तिला कळवले होते. त्यांना हे पत्र लोकांपर्यंत जावे, लोकांच्या मनातले किल्मिष जावे असे वाटत होते; पण गांधींना असे स्पष्टीकरण द्यायची गरज वाटली नाही. महादेवभार्इंनी ते पत्र जपून ठेवले. त्यांची इतर पत्रे त्यांच्याविषयी, गांधीजी, सुभाषचंद्र बोस यांची वक्तव्येही ह्या पुस्तकात दिली आहेत.

अशा एक ना अनेक घटनांतून ही तडफदार स्त्री आपल्यासमोर उभी करतात. केवळ राष्ट्रपित्याची सावली नव्हे, तर एक स्वतंत्र चेतनामूर्ती म्हणून कस्तुरबा आपल्याला कळतात. हे पुस्तक मराठीत आले, तर आपल्या अनेक वाचकांपर्यंत ते जाईल.

कस्तुरबा गांधी : ॲन अम्बॉडिमेंट ऑफ एम्पॉवरमेंट

लेखक : डॉ. सिबी जोसेफ
प्रकाशक : गांधी स्मारक निधी, मुंबई
पृष्ठे : 152

या पुस्तकाची पीडीएफ प्रत गांधी स्मारक निधी,  मुंबई या संस्थेच्या संकेत स्थळावर मोफत उपलब्ध आहे. ती डाउनलोड करण्याकरता येथे क्लिक करा.  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके