डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्या संस्कृतीत ती लहानाची मोठी झाली, त्यात मोठ्या आवाजात बोलणंदेखील असभ्यता मानली जाई; तिथं स्त्रीने मोठमोठ्या सभांमध्ये तावातावाने मुद्दा पटवून देणं, ही कल्पना करणंसुद्धा अवघड होतं. खुर्शिदबेनने आपल्या मोठ्या बहिणींबरोबर आरएसेस संस्था सुरू केली. तिच्यावर बंदी आली म्हणून देशसेविका संघ सुरू केला त्यावरही बंदी आली. त्यानंतर गांधीसेवा सेना सुरू केली. स्त्रियांत साक्षरता-प्रसार, विदेशी मालावर बहिष्कार, दारूच्या दुकानासमोर निदर्शनं करण्यात ती पुढाकार घेत असे. ब्रिटिशांची धोरणं अन्यायकारक असत. तुरुंगात उच्च वर्गातील राजकीय कैद्यांसमवेत गुन्हेगारी वृत्तीच्या, वेश्या, कुष्ठरोगी स्त्रियांना ठेवत असत. लहान-सहान गोष्टींवरून कैद होई. लाहोर खटल्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली. या खटल्यानंतर मुंबईत स्त्रियांनी एक भव्य मोर्चा काढला होता. 

झपाटल्यासारखे काम करणारी, पाश्चात्त्य संगीताचे रीतसर शिक्षण घेऊन त्यात प्रावीण्य मिळवलेली गर्भश्रीमंत घराण्यातील खुर्शिद नौरोजी. गांधींजींच्या अनेक सेक्रेटरींपैकी एक बनली. सरहद गांधी अब्दुलगफार खान यांच्यासमवेत काम केलेल्या ह्या तरुणीबद्दल कुठेच फारशी माहिती उपलब्ध नाही. साऊथ कॅरोलिना विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ विद्वान डॉ. दिनियार पटेल यांनी त्या काळची वृत्तपत्रं चाळली, अनेकांना भेटले, परंतु त्यांनाही फारशी माहिती कळली नाही. या धाडसी कर्तबगार तरुणीच्या कामाबद्दल त्यांनी गांधी भवनमध्ये एक भाषण दिले होते. त्यावरून मी त्यांना मेल लिहिली होती. त्या उत्तरादाखल त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वृत्तपत्रांची कात्रणे मला मेल केली. मुंबईत प्रतिष्ठित पारशी विद्वानांकडेदेखील मी विचारणा केली. सर्वांनी तिचे नाव ऐकले होते, पण तिचा फोटो वा अधिक माहिती मिळाली नाही. पण खुर्शिद नौरोजी मला चकवत, खुणावत राहिली.

मुळात ती आणि तिच्या तिघी बहिणी क्रांतिकारकांच्या विचारांच्या होत्या. तिच्या मोठ्या तिघी बहिणींनी वकिलीत असलेल्या तीन सख्ख्या कॅप्टन बंधूंशी विवाह केला होता. तिघी कायदा मोडायचं, तर नवरे कायदेशीर खटल्यांचे काम करीत असत. गोशी, पेरिन आणि नर्गिस या तिघींचा गांधीजी, जवाहरलाल आणि वल्लभभाई यांच्याशी निकटचा संबंध होता. त्यांच्या हिवाळी बंगल्यांवर- पाचगणी, हिमाचल येथील बंगल्यांवर सभा होत. ही मंडळी विश्रांतीसाठी तिथे मुक्काम करीत. नौरोजींचा मुलगा अर्देसर हा अचानक वारला, तेव्हा त्यांच्या सुनेला सात मुलं होती नि ती आठव्यांदा गरोदर होती. नौरोजी घराणे केवळ धनाढ्यच नव्हते, तर अत्यंत आधुनिक विचारांचे होते. ह्या सुनेला त्यांनी गुजरातच्या राजघराण्यातील स्त्रिया आणि मुलं-मुली यांच्या शिक्षणासाठी काम पाहायला सांगितले. नौरोजींचा आणि राजघराण्यातील लोकांचा चांगलाच घरोबा होता. त्या वेळी राजघराण्यातील स्त्रिया बाहेर जाताना पडदा पाळत असत. त्यामुळे या पारशी घरातील स्त्रीच्या सहवासातल्या स्त्रिया जगाची माहिती घेत ते जाणत असत.

गोशी, पेरिन आणि नर्गिस यांना आरंभीच्या क्रांतिकारकांच्या कामाचे खूप आकर्षण होते. कायदा मोडल्याच्या कारणाने तुरुंगाच्या वाऱ्या करणाऱ्या या अभिजन स्त्रियांचा वीर सावरकर, मा.कामा यांच्याशी परिचय झाला होता. पण नंतर त्यांनी गांधीजींच्या कामात स्वत:ला झोकून दिले. खुर्शिद ही तर इतर बहिणींसारखी चांगलीच तापट होती. पण सार्वजनिक कामात गेल्यावर ती बरीच शांतपणे काम करू लागली. गांधींचे म्हणणे होते की, ‘एव्हरिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार’ हे योग्य नाही; कारण प्रेमात नि युद्धात जर वाटेल त्या मार्गाने ध्येय साध्य केले, तर त्यानंतर आपण कुठल्या नैतिकतेने पुढे जायचे? मूळ पायाच चुकीचा असेल. तेव्हा साधनंही स्वच्छ असायला हवीत.

खुर्शिदबेन ही अत्यंत सृजनशील कामात मग्न असे- मग ते खादीचे असो, पिकेटिंगचे असो वा तुरुंगवासात गुलाबाची बाग फुलवायची असो. त्या काळात उषाबेन मेहता या गांधी स्मारक निधीच्या प्रमुख होत्या. त्यांनी खुर्शिदच्या आठवणी सांगताना म्हटले आहे की, तिला बागकामाची आवड होती. आजोबांचे तेज तिच्या वागण्या-बोलण्यात होते.  प्रा. अलु दस्तुर म्हणाल्या होत्या की, खुर्शिदबेनची राहणी ब्रिटिश पद्धतीची होती, पण वागण्यातून स्वदेशप्रेम उतू जात असे. तुरुंगात ब्रिटिश अधिकारी जाणून-बुजून अनेक स्तरांतील स्त्रियांना एका ठिकाणी ठेवत असत. ही अत्यंत आधुनिक घरातली मुलगी, विलायतेत शिकलेली. तिचा पोषाख, वागणे अत्यंत अभिरुचीपूर्ण आणि बोलणेही मार्दवयुक्त होते. बराकीतील इतर स्त्रियांचे बोलणे, वागणे, बसणे, उठणे सारेच तिला अनोखे वाटे. त्यांच्याशी संवाद करणे तिला अवघड होते, पण तिने त्यावर विजय मिळवला. सामान्यांत कसे मिसळायचे याचे धडे तिला अशा सक्तीच्या सहवासातूनच मिळाले असणार.

तिच्या या अभिजन संस्कृतीतलाच एक महत्त्वाचा हिस्सा होता, तिचे पाश्चात्त्य संगीतातले प्रावीण्य. मला वाटतं, स्वातंत्र्यलढ्यातील कुठलीही स्त्रीसेनानी खुर्शिदबेनसारखी पाश्चात्त्य संगीतात प्रवीण नसेल. सरोजिनीजी भारतीय रवींद्र संगीतात बुडलेल्या असत. पण तरुण खुर्शीदचा आवाज, त्याची तीव्रता ही पाश्चात्त्य संगीताचे कार्यक्रम करायला योग्य होती. तिने मुंबईच्या  कावजी जहांगीर (1925) सभागृहातील कार्यक्रमात वाहवा मिळवली होती. तिचे पियानोवादनही तिच्या वर्तुळात नावाजले जात होते. लेखन-वाचनाची तिला आवड होती, त्यात ती रमत असे. अशा या तरुणीने आपले आयुष्य ऐषोरामात, कलासंगीताचा आनंद घेत घालवले असते तर ती साहजिक गोष्ट ठरली असती. परंतु खादीसाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी, दारूच्या दुकानासमोर निदर्शनं करण्यासाठी ते वाचावं, हे अकल्पनीय आहे.

ज्या संस्कृतीत ती लहानाची मोठी झाली, त्यात मोठ्या आवाजात बोलणंदेखील असभ्यता मानली जाई; तिथं स्त्रीने मोठमोठ्या सभांमध्ये तावातावाने मुद्दा पटवून देणं, ही कल्पना करणंसुद्धा अवघड होतं. खुर्शिदबेनने आपल्या मोठ्या बहिणींबरोबर आरएसेस संस्था सुरू केली. तिच्यावर बंदी आली म्हणून देशसेविका संघ सुरू केला त्यावरही बंदी आली. मग त्यांनी गांधीसेवा सेना सुरू केली. स्त्रियांत साक्षरता-प्रसार, विदेशी मालावर बहिष्कार, दारूच्या दुकानासमोर निदर्शनं करण्यात ती पुढाकार घेत असे. 

ब्रिटिशांची धोरणं अन्यायकारक असत. तुरुंगात उच्च वर्गातील राजकीय कैद्यांसमवेत गुन्हेगारी वृत्तीच्या, वेश्या, कुष्ठरोगी स्त्रियांना ठेवत असत. लहान-सहान गोष्टींवरून कैद होई. लाहोर खटल्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली होती. या कुप्रसिद्ध लाहोर खटल्यानंतर मुंबईत स्त्रियांनी एक भव्य मोर्चा काढला होता. काळे झेंडे हाती घेऊ या स्त्रिया भगतसिंगांच्या देशभक्तीचे गुणगान करीत त्यांच्या हौतात्म्याला मानवंदना देण्यासाठी सीपी टँक मैदानावर जमल्या होत्या. त्यात खुर्शिद नौरोजीचे भाषण खूपच प्रभावी झाले. भगतसिंगांच्या धैर्याचे, देशभक्तीचे आणि बलिदानाचे गुणगान करून त्यांची प्रखर देशभक्ती न विसरण्याचे आवाहन तिथे जमलेल्या स्त्रियांना केले. गांधीजींच्या अहिंसामाहात्म्यानेच आज इतक्या संख्येने स्त्रिया घराबाहेर पडून देशाला स्वतंत्र करायच्या विधायक चळवळीत आल्या आहेत. आपले सामर्थ्य आणि भगतसिंगांचे हौतात्म्य कधीही विसरू नका. साहजिकच चिथावणीखोर वक्तव्यासाठी त्या स्त्रियांना अटक झाली. तिने तुरुंगाच्या वाऱ्या अनेकदा केल्या होत्या.

तिची अटक गांधीजींना मुळीच पटली नव्हती. त्यांनी लोकांना कळवले होते की, ब्रिटिशांचे वागणे अन्यायकारक आहे. तिला ते फ्रंटियर प्रॉव्हिन्सेसमध्ये जाण्यापासून रोखू शकत नाहीत. तेथील पठाणांना युद्धप्रयत्नांपासून परावृत्त करणे हा खुर्शिदबेनचा उद्देशच नव्हता. लोकांना हे कळलेच पाहिजे की, तिच्याप्रमाणेच अनेकांना विनाआरोपपत्र ठेवता अटक केले गेले आहे. खुर्शिदबेनवरही आरोपपत्र ठेवलेले नाही. तेथे जाऊन लोकांना भेटणे, हा काही गुन्हा होऊ शकत नाही. युद्धाला विरोध हा ना काँग्रेस पक्षाचा, ना खुर्शिदबेनचा इरादा आहे. ब्रिटिश सत्ता एका तरुण निरपराध स्त्रीवर अन्याय करीत असताना आपण त्याचा विरोध केलाच पाहिजे.

खुर्शिदबेनने  पठाणांच्या राज्यात जाताना सरकारला रीतसर कळवले होते की, ती बादशाहखानना भेटायला जात आहे. त्यांच्या बिरादरीला सुधारायचे त्यांचे जे प्रयत्न चालले आहेत, त्यात ती त्यांना मदत करू इच्छित होती.  अनेक पठाण त्या भागात सामान्य जनतेत दहशत माजवत होते. लूटमार, लोकांना पळवून नेऊन खंडणी मागणे, श्रीमंतांना बळजोरीने लुटणे हा त्यांच्या चरितार्थाचा उद्योग होता. हे सारे थांबवण्यात सरकारला अपयश येत होते. गांधीजींच्या मार्गाने त्यांना सामोपचाराने सरळ-साध्या जीवनात आणायचा प्रयत्न ती करीत होती. खुद्द अब्दुलगफार खानसारखा सच्चा गांधीवादी नेता तिच्या कामाचं कौतुक करत होता. ते स्वत: अत्यंत साधेपणाने राहत. अत्यंत आक्रमक अशा पठाणांचे नेतृत्व करणे सोपे नव्हते. ते स्वत:ची कामं स्वत: करीत. स्वत:चा स्वयंपाक करणे, कपडे धुणे, हे त्यांचे नित्याचेच काम होते. ते तिला मार्गदर्शन करीत.

तेथील आदिवासी लोकांतही तिने गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तीन महिने मुक्काम केला होता. तेथील सरकारी अधिकाऱ्यांना तिच्या सच्च्या हेतूंची खात्री होती. तिच्या सुरक्षेची ते काळजी घेत असत. पण सरकारने तिला फ्रंटियर प्रांतात काम करू देण्यासाठी जाऊ द्यायला नकार दिला. नव्हे, तिला कैद केले. तिच्यावर खटला चालवून तीन महिने तुरुंगवास किंवा 100 रुपये दंडाची शिक्षा दिली. तिने दंडाला नकार देऊन तुरुंगवासाची शिक्षा पत्करली.
तिने  डेप्यु.सेक्रेटरी रिचर्ड टोटेनहॅमना दिल्लीला एक पत्र लिहिलं. 

4 जाने 1940

माननीय सर,

माझी सुटका होण्यापूर्वी मला एक पत्र मिळालं. त्याची भाषा माझ्यावर अन्याय करणारी नि अनुचित आहे. मी अटकेपूर्वी नॉर्थ-वेस्टर्न फ्रंटियरच्या बन्नू जिल्ह्यात लोकांना भेटत होते. मी पीर, मलिक, खान अशा वेगवेगळ्या स्तरांतल्या लोकांशी संवाद साधत होते. त्यांना अहिंसेचा, सामंजस्याने एकत्र राहण्याचा संदेश देत होते. ते लोकदेखील शांतपणे माझं भाषणं ऐकत असत. प्रश्न विचारत असत. तेथील दरोडेखोरांनाही मी सांगत होते की- चोऱ्या, दरोडे, अपहरण या मार्गांचा अवलंब सोडावा, हे भ्याडपणाचे लक्षण आहे. नि:शस्त्र स्त्रिया, मुले, माणसे यांना धमकावून, त्रास देऊन पैसा गोळा करण्याचा मार्ग सोडून त्यांनी सन्मार्गावर यावं. आपल्याच लोकांना छळणं, अमानवी रीतीने वागणं त्यांच्या पठाणी दिलदारीच्या परंपरेला शोभत नाही. मी तेथील हिंदूंना आवाहन केलं की, त्यांनीही आपल्या शेजाऱ्यांशी स्नेह जोडायचा, नातं जोडायचा प्रयत्न धाडसाने करावा. जवळीक साधावी. वास्तविक पठाणांची परंपरा दुबळ्यांना आधार-मदत देण्याची आहे. दरोडेखोरांपासून इतरांना वाचवण्यात सहभाग घ्यावा. स्त्रिया, मुले, दुबळी माणसे यांवर अत्याचार करण्यात काय पुरुषार्थ आहे? मी जे लिहितेय, त्यात काही असत्य आहे का याची खात्री तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांकडून करून घ्या. कारण माझ्या सर्व भाषाणांवेळी सीआयडीचे लोक हजर असतातच.

मी तिथून वालो तांग भागात निघाले, तेव्हा मी सरकारी आधिकाऱ्यांना रीतसर माहिती दिली होती. तेथे मी आदिवासींशी बोलायला 4 डिसेंबर 40 रोजी जात होते. तेथील पळवून नेलेल्या हिंदू स्त्रियांना, पुरुषांना सोडवायला जाताना मला अटक झाली. तुमच्या सीआयडीच्या लोकांना विचारून त्याची शहानिशा करून घ्या. माझ्या बोलण्या-वागण्यात ब्रिटिश सरकारविरोधात काही होते का? युद्धात भाग घेऊ नका, असं मी काही सांगितलं होतं का? मी तर माणुसकीच्या नात्यानेच लोकांनी वागावं यासाठी धडपडत होते. मला तेथे जाण्यापासून रोखू नये. मी जे लिहिलंय याहून तुमची माहिती काही विपरीत असेल तर सांगा. मी लिहिलंय त्यात काही खोटं असेल, तर मी शिक्षेला तयार आहे. तुमच्या उत्तराच्या अपेक्षेत-

- के.अ.द. नौरोजी.

पण सरकारने त्या पत्राला उत्तर दिले नाही. उलट, तिला तिथून थेट मुंबईला आणले गेलं नि तिथेही तिला मुंबई सोडून कुठेही जाता येणार नव्हते. तिने सरकारला पुन्हा आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्र लिहिले.

‘मला माझ्या अपराधाची काही कल्पना न देता अटक करणे, माझ्या पत्राला उत्तर न देणे हे सरकारला शोभत नाही. मला हे कळतंय की- सध्याच्या युद्धजन्य स्थितीत ब्रिटिश सत्तेला मी पूर्वोत्तर प्रदेशात जाऊ नये, असं वाटत असेल ते तर गैरसोईचे झालंय म्हणून माझं तिथे जाणं रोखणं मी समजू शकते. पण मला मुंबईला स्थानबद्ध करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? यात माझ्या स्वातंत्र्याचा संकोच आहे. मला जर जुलैपर्यंत मोकळं केलं नाही तर मी हा बंदी हुकूम मोडणार आहे.

- के.ए.डी. नौरोजी’

त्यानंतर तिला मुंबई प्रेसिडेन्सी सोडून कुठे जाता येणार नाही, असे कळवले गेले. आता ती वर्ध्याला जाऊ शकत नव्हती. आजारी कमला नेहरूंना भेटायला अलाहाबादच्या हॉस्पिटलला जाऊ शकत नव्हती. ती 31 जुलैपर्यंत वाट पाहत होती. तिने 1 ऑगस्ट 1941 रोजी बंदी तोडायच्या आधीच तिला येरवडा जेलमध्ये नेण्यात आलं. या साऱ्या घटना गांधीजींनी वर्तमानपत्रांना दिल्या आणि नौरोजींच्या नातीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. सरकार बधत तर नव्हतेच, पण अनेकांना विनाचौकशी-विनाआरोपत्रं अटकेत टाकलं जात होतं. सामान्यांचा रोष वाढत गेला. गांधीजींचे असहकार-अहिंसा यांना आव्हान मिळत राहिलं, पण निष्ठावानांनी अनाम राहूनही या कार्यात आपलं ठोस योगदान दिलंच.

खुर्शिदबेनबद्दल  एवढीच माहिती  मिळाली, ती मनाला छळत राहिली. तिच्याविषयीचा आदर गांधींनी व्यक्त केला, त्याहून अधिक काय व्यक्त करणार!! 

(लेखमाला समाप्त)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके