डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

हिंदुस्थानात आल्यावर मिलीने पाहिले की,  गांधी अधिकाधिक लोकांत मिसळून कामं  करताहेत. साधे कपडे,  साधी राहणी. ही पूर्वीही  होती,  पण आता तिला ती फारच वेगळेपणाने  जाणवू लागली. एखाद्या संतासारखे ते दिसू  लागले होते. धर्म, पुनर्जन्म यांसारखे वादग्रस्त  विषय असोत किंवा ब्रिटिशांना युध्दात मदत  करायचे विषय असोत- दोघांचे दोन टोकांचे  विचार होते. तिने गांधींना लिहिले होते,  ‘असहकार असो वा इतर विषय असोत आपले  विचार एकाच वाटेने जात नाहीत; पण  ज्या ध्येयाच्या असोशीने आपण एकत्र आलो  ती मात्र दोघांच्या हृदयात सारखीच तेवत  राहील.’ राजकारण आणि समाजकारणातील गांधींची प्रतिष्ठा गगनाला भिडली,  तरी ते तिला ‘भाई’ या स्वाक्षरीनेच लिहीत राहिले.  गांधींच्या अंतापर्यंत दोघांत पत्रसंवाद सुरू  राहिला. गांधींशी तिचे नाते हळुवार होते.  ब्रिटिशांच्या अन्याय्य वागणुकीचे, शेतकऱ्यांवरील जुलमाचे वर्णन ते पत्रातून  मिलीला कळवत होते.

गांधींशी अगदी बरोबरीच्या नात्याने वागणारी,  प्रत्येक  गोष्टीत स्वत:चे मत असणारी ही ब्रिटिश-स्कॉट स्त्री. मिली  ग्रॅहम डाऊन्स- विवाहानंतरची पोलॉक- ही दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी  निडर स्त्री होती. लंडनमध्ये ती ख्रिश्चन सोशॅलिस्ट  असोसिएशनसाठी काम करीत होती. तिच्या आणि हेन्री पोलॉकच्या लग्नाला त्याच्या वडिलांची मिलीच्या नाजूक  प्रकृतीमुळे परवानगी नव्हती. हेन्री पोलॉक तेव्हा  द. आफ्रिकेत कार्यरत होता. वृत्तपत्रात काम करायचा. राजकारणात त्याला रस होता. गांधींच्या कामाशी सहमत  होता. त्यांच्या कामात तो मदत करायचा. त्याला मिलीशी  लग्न करायचे होते, पण त्यांना तिच्या प्रकृतीची काळजी  वाटत होती. त्या दोघांना या लग्नापासून परावृत्त करायची गळ  त्यांनी गांधींना घातली. तेव्हा हेन्रीच्या वडिलांना गांधींनी  एक पत्र लिहिले,  ‘हे दोघं एकेमकांवर प्रेम करतात. मिलीची तब्येत लंडनमध्ये ठीक नसली तरी इथे द. आफ्रिकेच्या  स्वच्छ-मोकळ्या हवेत तिची तब्येत लवकर चांगली होईल.  इथे तिच्यावर माया करणाऱ्यांच्या सहवासात ती ठणठणीत होईल.’ लंडनमध्ये मिलीने दादाभाई नौरोजींसारख्या निष्ठावान  देशभक्ताला भेटून घ्यावं,  शाकाहारी सोसायटीत जाऊन  यावं,  तेथील टॉलस्टॉय कॉलनीचे कामकाज तसेच विविध  धर्मादाय संस्थांत कामं कशी चालतात याचा अभ्यास  करावा, असा सल्ला गांधींनी तिला दिला.

मिली 1905 मध्ये  जोहान्सबर्गला पोहोचली,  तेव्हा हेन्रीला घ्यायला गांधी  स्टेशनवर आले होते. गांधींबद्दल तिने ‘मि. गांधी- द मॅन’ या  तिच्या पुस्तकात लिहिलंय,  ‘एक मध्यम उंचीचा,  कृश पण  बालसदृश हसू असलेला,  डोळ्यांत विलक्षण चमक  असलेला माणूस हेन्रीसोबत आला होता.’ या माणसाच्या  एकत्र कुटुंबात हे इंग्लिश जोडपं लग्नाच्या साध्या विधीनंतर  (हेन्री पोलॉक ज्यू होता) राहू लागलं.  त्याच सुमारास गांधींचा एक अनुयायी आपल्या अगदी  अल्पवयीन बायकोसह तिथे आला. मिलीला ते पाहून धक्का बसला. ‘‘हे कसे चालते ?  ही कसली पध्दत ?’’ तिने विचारलं. ‘‘याच चुकीच्या रूढींविरुध्द लढायचे आहे. ते  पाळणारेही नकळत त्याचा बळी ठरलेले असतात.’’  मिलीला भारतीय मानसिकता कळायला सुरुवात झाली. गांधींनी आक्रमक विरोधीवजा सत्याग्रहाचा मार्ग  स्वीकारला. त्यावरून ते तिला समजावत, ‘‘हे मी  कस्तुरकडून शिकलो. मी तिच्या मनाविरुध्द तिच्याकडून  काही करून घेऊ शकत नाही. ती निग्रहाने, तिच्या शांत पध्दतीने विरोध करते. त्यातून मला या सत्याग्रहाची कल्पना  सुचली.’’  असहकार नि सत्याग्रहामुळे गांधी आणि इतर अनुयायी  तुरुंगात असले की,  बाहेरची कामं करायला तिने ‘ट्रान्सवाल  इंडियन वुमेन्स असोसिएशन’ स्थापन केली होती. लोकांना बरोबर ठेवायचे ते साधन होते. गांधींच्या घरी राहताना तिच्या लक्षात आलं की,  त्यांची मुलं शाळेत न गेल्याने  शिक्षणाची आबाळच होत होती. तिने त्यांना लिहायला वाचायला, गणिताचे व गद्य-पद्याचे शिक्षण द्यायला सुरुवात  केली. काही दिवसांनी ती आणि हेन्री पोलाक दोघे फिनिक्स  येथील गांधींच्या कम्युनिटी लिव्हिंगच्या प्रयोगशील  वसाहतीत जाऊन राहू लागले. तेथील अवस्था पाहून  मिलीला आश्चर्य वाटले. किती ओकंबोकं ते वसतिस्थान !  ना पडदे, ना गालिचे, ना काही फर्निचर ! खाणंही जिवंत  राहायला अत्यावश्यक असं नि तेवढंच !

हा प्रयोग हळूहळू  तिच्या लक्षात येऊ लागला. आरंभी तिने त्याबद्दल गांधींशी  वाद घातला होता. हे घर वाटावे,  म्हणून पडद्यांची मागणी  केली होती. तिथे राहणारे लोक सतत कामात असत. स्वत:ची कामं स्वत:च करत. जगातील वेगवेगळ्या भागांतले,  भिन्न  धर्मांतले, अनेक वयांचे लोक कामं करत एकत्र जेवण करत.  हाच तर कम्युनिटी लिव्हिंगचा प्रयोग होता. तिने या  वसाहतीचे भीतिदायक चित्र पोलागांधी आणि इतर अनुयायी  कच्या घरी कळवले होते. त्यानुसार इथे राहणे म्हणजे- आजूबाजूला कीटकांचे राज्य, दुधातदेखील मुंग्या  सापडतात,  कोळी इकडून तिकडे फिरत असतात,  पाणी  स्वच्छ म्हणावं का असं गढूळ असतं,  अंघोळ नि इतर  कामासाठी तट्ट्या लागलेला आडोसा,  पाण्याचे एक टमरेल  टांगलेले तेच अंघोळीला शॉवर म्हणून वापरले जाते... असे  हे आंतरराष्ट्रीय वसतिस्थान आहे. तेथील लोकांनीच ते स्वच्छ ठेवणे अपेक्षित होते. ते नंतर तसे झालेदेखील. पण  जेव्हा हे गांधींनी वाचले,  तेव्हा ते म्हणाले, ‘‘होय, मिलीने  जे लिहिले आहे त्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.’’  तिला  साधी राहणी पटली होती, पण इतक्या असुविधांमध्ये राहणे  अवघड होते.  तिला त्यांचे नैतिकतेने राहण्याचे विचार पूर्णपणे पटले  होते. गांधींसारखा मायाळू दुसरा माणूस नाही. त्यांच्या प्रत्येक कृत्यात कमालीची पारदर्शकता असते. त्यांच्या वागण्यात पराकोटीची तत्त्वनिष्ठा असे,  त्यामुळे इतर छटा ते  लक्षात घेत नसत.

त्या दोघांत गांधींच्या अनेक तत्त्वांबद्दल  चर्चा-वाद होत असत;  मग आहार असेल,  नैसर्गिक उपचार असेल,  मुलांना शिस्त लावणे असेल. कधी तर कुणाचा जीव  वाचत असेल तर खोटं बोलणं रास्त आहे, काही गोष्टी  कुठवर ताणायच्या- अशा प्रकारचेही विषय असत. गांधी  तिला आपली धाकटी बहीणच मानत नि ती त्यांना थोरला  भाऊ समजत असे, ज्याच्याशी समपातळीवर ती बोलू शकत  होती. त्यांच्या मते, ‘हिंदुस्तानात स्त्रियांना खूप मान असतो.  वरवर ती पुरुषाहून दुय्यम असली तरी तिला देवी मानतात.’ यावर ती ताड्‌कन म्हणे- ‘‘एक तत्त्व म्हणून असेल,  पण  प्रत्यक्षात तिला फार कमी लेखतात. तिला युरोपियन  स्त्रीसारखी मोकळीक कुठे असते?’’  ब्रह्मचर्य,  मुलं याविषयींची त्यांची मतं तिला मुळीच  मान्य नव्हती,  तसे ती निक्षून सांगत असे. तिने आपल्या  पुस्तकात नमूद केलंय की- ‘वाद घालायला गांधींना आवडायचे,  कारण त्यामुळे त्यांना विरोधी मतं समजत.  मिली ज्या पोटतिडिकीने मुद्दे मांडत असे, ते गांधींना आवडत  असे आणि त्यातील तीव्रता नि सत्यांश जाणवत असे.  मुलं होऊ देण्याबद्दल त्यांची मते विचित्र होती. मिलीच्या  मते, विवाहानंतरची ती स्वाभाविक गोष्ट होती. पण  फिनिक्समध्ये जेव्हा एखादं बाळ जन्माला येई,  तेव्हा त्याला  पाहायला आणि मातेला भेटायला गांधी जात असत तेव्हा  त्यांच्या डोळ्यांतून नवजाता विषयीची माया-प्रेम-कुतूहल  ओतप्रोत भरलेले जाणवत असे.

आई या पदाविषयी ते उदात्त  शब्दांत बोलत असत. एकूण स्त्री ज्या वेदनेतून जाते,  त्याबद्दल त्यांच्या मनात आदर होता. स्त्रीविषयी,  तिच्या  कर्तृत्वाविषयी खूप अपेक्षा त्यांच्या हृदयात असत. त्या  प्रत्यक्षात असतातच असे नाही,  असे मिलीला वाटे. ते  स्पष्टपणे अमूर्त,  आदर्श आणि मानवी भावना यांत फरक करू  शकत असत.  त्यांच्यात मतभेद खूप होते,  परंतु त्यातील अंतर्प्रवाह  सारखाच असे. त्यामुळेच ही बहीण त्यांना आवडत असे. ते  म्हणत,  ‘‘तू अनेक नात्याने बांधलेली आहेस,  पण  माझ्यासाठी एक सच्ची बहीण आहेस;  जिच्यावर मी ‘संपूर्ण विश्वास’ टाकू शकतो. तुझा आत्मविश्वास मला जाणवतो  की,  मतभेद असूनही तू दबत नाहीस. तुला काय हवंय ते  सांग. आता तर आपण एकमेकांपासून दूर आहोत, आपण केव्हा भेटू, कोण जाणे ! मग माझी तक्रार काय आहे ?  इथं  अनेक सहप्रवासींसोबत असून,  तू एका खोलीत असल्यागत  माझ्या अगदी जवळ आहेस.’’  तर मिली पोलॉकला वाटे,  गांधींच्या कल्पना व्यवहारात आणणं अशक्य कोटीतलं आहे. बऱ्याचदा त्यांच्या  बोलण्यात सलगता नसते. पण आपल्या विचारांवर ते ठाम  असत,  बदलत नसत. मी फारच अडून बसले,  तर हसून खांदे  उडवून गप्प बसत. कामाच्या निमित्ताने ते हिंदुस्थानात परतले (1915).  त्यानंतर दोघांचा पत्रव्यवहार सुरूच होता. तिनं विचारलं, ‘सगळे म्हणतात तसं तुम्हाला बापू म्हणू का ?’  त्यावर गांधी  म्हणाले,  ‘नको. बापू म्हटलं की, ती व्यक्ती स्वत:ची  जबाबदारी वडिलांवर टाकून मोकळी होते. भाऊ वा भाई हे  समानतेच्या पातळीवरचे आहेत. तेव्हा तू माझी लाडकी  बहीण नि मी भाईच राहू दे. माझ्या विधवा बहिणीहून (वास्तविक ती माझं दैवत आहे) तू मला प्रिय आहेस. कारण वैचारिक दृष्टीने आम्हा दोघांत खूप अंतर आहे,  जे तुझ्या- माझ्यात नाही.’

गांधी अधिक मोठ्या कामासाठी हिंदुस्थानला चालले  होते. मिलीचे डोळ भरून येत होते. तिच्या पोटात खड्डा पडत  होता. काही तरी हरवल्याची जाणीव जीव कुरतडत होती.  वागणे-राहणे यात मिलीने फारसा बदल केला नव्हता,  तशी  ती हिंदुस्थानी झाली नव्हती. आपली ओळख कायम ठेवतच  ती गांधीमय झाली होती. हिंदुस्थानातून येणाऱ्या मजुरांच्या  हितासाठी हेन्री पोलॉक द. आफ्रिकेतच राहिला. गांधींना मदत करायला तो जेव्हा हिंदुस्थानात आला, तेव्हा मिली आणि त्यांची दोन मुलंही त्याच्यासोबत इथे  आली. गांधींना भेटून दोन-तीन वर्षे झाली होती. यादरम्यान  बरंच काही घडलं होतं. अहमदाबादला जाताना तिच्या मनात वादळ होतं की, ‘आता गांधी आपल्याशी कसे वागतील?’  हिंदुस्थानभर हिंडून त्यांनी देश जाणून घ्यायचा  प्रयत्न केला होता,  ते आंतरराष्ट्रीयपेक्षा जास्त देशी वाटत  होते. ती म्हणते,  ‘मला वाटले होते की,  आफ्रिकेत ते जसे  माझे भाई होते तसे राहिले नसावेत. पण आश्चर्य म्हणजे,  ते  होते तसेच होते- प्रेमळ,  करुणामय डोळ्यांचे.

माझ्या  आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टींची त्यांना काळजी होती.  त्यांची फकिरी मात्र अधिक ठळक झाली होती.’  एवढ्यात महायुध्द सुरू झालं आणि ती इथेच अडकली. गांधी चंपारणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नात गुरफटले. ती  दक्षिणेतील कोन्नूर हिलस्टेशनवर राहत होती. मुलं बरोबर होती. पण ब्रिटिश लोक त्यांच्याशी (गांधींशी असलेल्या जवळिकीमुळे) फटकूनच वागत होते. तिला लोकांच्या  दु:खावर फुंकर घालायचे काम आवडायचे,  पण आता तसे  करता येणे शक्य नव्हते. तिने नि तिच्या नवऱ्याने गांधींची तरुण वयातील तडफ पाहिली होती. त्यांच्या दक्षिण  आफ्रिकेतील कामाला आकार येताना, वृतपत्र चालवताना हेनरी पोलॉक हाडाचा पत्रकार होता- गांधींना या दोघांची मोलाची साथ मिळत होती. हिंदुस्थानात आल्यावर मिलीने पाहिले की,  गांधी  अधिकाधिक लोकांत मिसळून कामं करताहेत. साधे कपडे,  साधी राहणी. ही पूर्वीही होती, पण आता तिला ती फारच  वेगळेपणाने जाणवू लागली. एखाद्या संतासारखे ते दिसू  लागले होते. धर्म,  पुनर्जन्म यांसारखे वादग्रस्त विषय असोत  किंवा ब्रिटिशांना युध्दात मदत करायचे विषय असोत दोघांचे दोन टोकांचे विचार होते. तिने गांधींना लिहिले होते, ‘असहकार असो वा इतर विषय असोत- आपले विचार  एकाच वाटेने जात नाहीत; पण ज्या ध्येयाच्या असोशीने  आपण एकत्र आलो ती मात्र दोघांच्या हृदयात सारखीच  तेवत राहील.’ राजकारण आणि समाजकारणातील गांधींची  प्रतिष्ठा गगनाला भिडली, तरी ते तिला ‘भाई’ या स्वाक्षरीनेच लिहीत राहिले.

गांधींच्या अंतापर्यंत दोघांत पत्रसंवाद सुरू  राहिला. गांधींशी तिचे नाते हळुवार होते. ब्रिटिशांच्या अन्याय्य वागणुकीचे,  शेतकऱ्यांवरील जुलमाचे वर्णन ते  पत्रातून मिलीला कळवत होते. चंपारणमध्ये त्यांच्या दोन अनुयायी स्त्रिया तेथील लोकांना आरोग्य व साक्षरतेत मदत  करीत आहेत,  हे पत्रातून सांगत होते. ‘तुला या कामात  आनंद मिळतो, तोपण सध्या तुला शक्य नाहीये. इंग्लंडला  परतल्यावर मुलांतून मोकळी झालीस की तुझे आवडते काम  नक्की कर.’ गांधींशी तिचे नाते कायम मैत्रीचे राहिले. दोघांमधील प्रेम  आणि ओढीने त्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवले होते.  गांधींच्या आयुष्याला दिशा देणारी अशी ही विदेशी स्त्री  त्यांच्या जीवनात महत्त्वाची व्यक्ती होती. तसेच गांधींमुळे  आपले भावविश्व-कार्यविश्व कसे बदलून गेले,  याविषयीच्या  तिच्या भावना तिने 1960 मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून जतन केल्या आहेत. तसेच ‘मि.गांधी- द मॅन’ या  पुस्तकातही तिने आपल्या आठवणी नोंदवल्या आहेत.


एक कोवळी तमिळ सत्याग्रही 
ट्रान्सवालमध्ये हजारोंनी तमिळ कामगार स्त्री-पुरुष अनेक वर्षांपासून राहत, कष्ट करत होते. येथे या गरीब कामगारांवर तीन  पौडांचा कर लावला गेला होता. सतत ओळखपत्र जवळ बाळगावे लागत होते. लहान-सहान चुकांकरता कठोर शिक्षा होत  होत्या. कर तर अन्याय्य होता. गांधीजींनी त्याविरुध्द जनमत तयार केले. हजार तमिळ खाणकामगार, हॉटेलातील कामगार,  लहान-सहान वस्तूंचे विक्रेते,  छोटे दुकानदार सत्याग्रहात सामील करून घेतले. अनेक तमिळ कुटुंबातील लहान-थोर सारेच  या सत्याग्रहासाठी कायदा मोडायला तयार झाले. आई-वडील, आजी, मावश्या, जावई, काका-काकू प्रत्येकजण या  कामासाठी झपाटल्यासारखे झाले होते. त्यांतील काही तरुण स्त्रिया जोहान्सबर्गला गेल्या. कडेवर मुलं होती, पण मनात,  वाणीत धाडस होतं. त्यांनी रेल्वे,  खाणी येथील लोकांना या कायद्याविररूध्द आवाज उठवायचे आवाहन केले. भाषणे करून  लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 1910 चा काळ होता. तेव्हापासूनच सरकारने हा लढा समूळ नष्ट करायचा चंग  बांधला. धरपकड व मारहाण करून तुरुंगात टाकून कठोर श्रमाची कामे करायला लावायला सुरुवात केली.  

कायद्याच्या विरोधात मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ लागले,  त्यात कस्तुरबाही होत्या. या आंदोलनादरम्यान अनेक  तमिळ तरुण गंभीर जखमी झाले,  काही मरण पावले. त्यात एक पंधरा-सोळा वर्षांची थिलायदी वलीय्यमा मुदलीयार होती. तिचे आई-वडील व्यापारासाठी तमिळनाडूतील नागपट्टणमच्या थिलयादीहून आफ्रिकेत आले होते. स्वकीयांवरील  अन्यायाने वलीय्यमा पेटून उठली,  त्यासाठी जिवाची बाजी लावायला सिध्द झाली. ट्रान्सवाल येथील हाडे गोठवणाऱ्या थंडीत  तरुणांना,  वयस्कांना घरातून खेचून बाहेर काढून कामावर धाडले जाई. अंगावर धड कपडे नाहीत, डोक्यावर टोपी नाही, पायात  बूटही नाहीत अशा अवस्थेत लोक थंडीने गारठूनच जात होते. काम करणं शक्य नव्हतं,  त्यामुळे मारही बसत होता. पण लोक  अद्‌भुत मनोधैर्याने कायद्याच्या विरोधात एकत्र झाले.

वलीयम्मा आपली आई मंगलमबरोबर ट्रान्सवालहून नेताल येथे विनापरवाना सत्याग्रहासाठी गेली. ऑक्टो 1913 मध्ये  तिला अटक होऊन, तीन महिन्यांची कठोर परिश्रमाची शिक्षा झाली. त्यात तो कोवळा जीव आजारी पडला. लवकर  सुटकेकरता दयेचा अर्ज करायला तिने नकार दिला. सुटकेनंतर तिच्या आजारपणात तिला भेटायला गांधीजी गेले. तिच्याकडे  पाहून त्यांना गहिवरून आले. तिच्या कपाळावर हात ठेवून ते म्हणाले,  ‘काय दशा करून घेतली आहेस ?  तुला हे केल्याबद्दल  खेद नाही वाटत ?’ ती ठामपणे म्हणाली, ‘छे, मुळीच नाही. परत वेळ आली तर असेच वागेन,  त्यात प्राण गेले तर देशासाठी  ती माझी आहुती ठरेल.’  त्यानंतर चार-सहा दिवसांनी तिचे निधन झाले.

‘तुमच्या देशाला ध्वज कुठंय ?’ असं कुणी तिला म्हणालं,  त्यावर तिने आपल्या साडीचा पदर फाडून तो अभिमानाने  फडकवला. त्यातील केशरी, हिरवा,  पांढरा रंग तिची आठवण म्हणून आज शिल्लक राहिले आहेत.  गांधी म्हणाले, ‘मी हिला प्रेरित केलं म्हणणं ठीक नाही, तिनेच मला प्रेरित केलंय.’
 

Tags: वलीयम्मा महात्मा गांधी मिली पोलॉक संजीवनी खेर mili polac gandhi mahatma gandhi sanjivani kher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात