डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अवंतिकाबार्इंनी स्त्रियांना एकत्र करण्यासाठी  हिंद महिला संघाची स्थापना 1930 मध्ये  केली. चाळी-चाळीत जाऊन त्यांनी  राष्ट्रकार्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केले. ‘राष्ट्रकार्य आणि स्त्रिया’ या विषयावर त्यांना अनेक संस्था भाषणाला बोलावत. स्त्रियांचे  सबलीकरण,  देशकार्यात त्यांचा सहभाग यांवर बार्इंचा भर असे. काही काळ त्या हिंद महिला  संघाचे साप्ताहिक चालवत होत्या. त्या अध्यक्ष  म्हणून 31 वर्षे काम करीत होत्या. स्त्रियांनी  आत्मनिर्भर व्हावे म्हणून संस्थेत त्यांना  शिवणकाम, नर्सिंग, सूतकताई,  आरोग्याचे,  हिंदी भाषेचे प्रशिक्षण देऊन तयार केले. त्यामुळेच पुढे देशकार्यातील चळवळीत स्त्रिया धडाडीने उतरू लागल्या. हजारोंच्या सभेपुढे  अवंतिकाबाई मराठी व इंग्रजीत अस्खलितपणे निर्भयपणे जोरदार भाषणं करीत. अनेक पुढारी, गांधी, टिळक यांच्यासमोर त्या भाषणं करीत. ते ऐकून टिळक उत्फूर्तपणे म्हणाले,‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झालीय!’’  

गांधीजींच्या प्रभावाखाली आलेली आणि त्यांचे पहिले  चरित्र लिहिणारी अवंतिकाबाई गोखले ही मराठी स्त्री. ती  कमालीच्या धडाडीने काम करणारी,  हाडाची कार्यकर्ती होती. साधी राहणी,  स्पष्टवक्तेपणा,  काटेकोर नियोजन,  करारीपणा,  निर्भयता हे गुण तिच्या अंगी बालपणापासूनच बिंबलेले होते. पारंपरिक वातावरणात वाढलेली ही स्त्री. इंदूरचे गुड्‌स क्लार्क विष्णुपंत जोशींच्या सात मुलींमधली एक. पैसे कमावण्याची संधी असून चुकीच्या मार्गाने त्यांनी  कधी एक पैदेखील कमावली नाही. त्यांच्या नि:स्पृहपणाचा  दरारा गहू,  भांग,  अफूच्या व्यापाऱ्यांवर होता. रीतीनुसार  कृष्णाचे (माहेरचे नाव) वयाच्या नवव्या वर्षी मॅट्रिकमध्ये  शिकणारे बबनराव गोखलेंशी लग्न झाले. घरी मोठा  बारदाना. एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळायला  सासूने शिकवले. बबनराव हुशार होते,  पुरोगामी विचारांचे  होते. ते इंजिनिअर झाले नि त्यांना मँचेस्टरला मोठ्या पदाची  नोकरी मिळाली. जाताना बबनरावांनी दोन रुपयांची पाटी  आणून बायकोच्या हाती दिली नि बजावले,  ‘‘इंग्रजी लिहिता-बोलता आलं पाहिजे,  नाही तर मड्डम आणेन!’’  त्याचा अर्थ अवंतिकेला कळला नाही,  पण सासूला बरोबर  कळला. 

घरातल्या लोकांकडूनच त्या इंग्रजी शिकल्या.  इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित,  शिक्षित घरातील स्त्रिया मिडवाइफरीची,  गरिबांना मदत करत. असे आपल्या पत्नीने  करावे,  असे बबनरावांना वाटे. अवंतिकाबाई जेव्हा एका  हॉस्पिटलमध्ये गेल्या,  तेव्हा तेथील डॉक्टर म्हणाले,  ‘‘हे  काम हिंदू स्त्रिया करू शकणार नाहीत.’’  साहजिकच बार्इंनी  विरोध केला. त्याच वेळी देवीची साथ पसरली. तेव्हा  डॉक्टर खवटपणे म्हणाले,  ‘‘आता कराल काम?’’  ते  कामही 20 वर्षांच्या या तरुणीने जिद्दीने केले. बडोद्याला  यंत्रसामग्रीचा कारखाना पतीने सुरू केला होता. तिथे  अवंतिकाबार्इंनी कामगारांच्या मुलांकरिता आदर्शवत्‌ सोय  केली. पतीच्या अनुपस्थितीत कारखान्याचे काम त्या पाहत.  महाराजांनी ह्याचे कौतुक केले होते. तेथे असताना  डायनामाईटच्या स्फोटात पतीचा हात तुटला. ऑपरेशनच्या  वेळी स्वत: उभ्या राहून त्यांनी डॉक्टरांना मदत केली.  अगोदरच्या एका अपघातात दुसऱ्या हाताची बोटं गेली  होती,  पण त्यांनी धीराने त्यांची सेवा-शुश्रूषा जन्मभर केली.  

मुंबईला परत येऊन पतीने विदेशातून यंत्रसामग्री मिळवून  त्याच्या सुट्या भागाच्या विक्रीचा व्यवसाय केला,  तो  चांगला चालला.  यादरम्यान अवंतिकाबार्इंच्या जीवनात एक नवे वळण  आले. इचलकरंजीच्या राणीला सोबत म्हणून इंग्लंडला  जायचा योग आला. तो अनुभव त्यांना खूप काही देऊन  गेला. त्यांनी तेथील अनेक संस्थांना भेटी दिल्या. मँचेस्टर,  बर्मिंगहॅम, लंडन येथील जिथे जिथे बबनराव राहत होते,  त्या-त्या कुटुंबांच्या घरी गेल्या. त्यांच्याशी असलेली मैत्री  पक्की केली. तेथील स्त्रियांचा धीटपणा त्यांना भावला- जो  त्यांच्यातही भरपूर होताच,  त्याला दुजोरा मिळाला.  कुणाच्या सोबतीची वाट न पाहता त्या एकट्या फिरल्या.  समाजोपयोगी काम करणाऱ्या अभिजन स्त्रियांची धार्मिक  वृत्तीने काम करायची जिध्द पाहून अपल्या देशात अशा  प्रकारच्या नि:स्वार्थ बुध्दिने काम करायची प्रबळ इच्छा  त्यांना हिंदुस्थानला परत आल्यावर स्वस्थ बसू देईना.

‘भारत सेवक समाजा’चे देवधरसर यांच्या मार्गदर्शना- खाली त्यांनी काम सुरू केले. समाजसेवेत त्यांनी अनेक  नवनव्या कल्पना राबवणे सुरू केले. कामगारवस्तीत जाऊन  तेथील स्त्रियांना स्वच्छतेचे धडे देणे, साक्षर करणे,  बालसंगोपन या आज अगदी सामान्य वाटणाऱ्या पण  1913 मध्ये अगदीच अनोख्या कृती होत्या. याच काळात  दक्षिण आफ्रिकेतून गांधी परतले होते. तोवर ते महात्मा  झालेले नव्हते. लोकांशी फारशा ओळखी नव्हत्या. पण  त्यांच्या कामाचा डंका इथे वाजू लागला होता. नामदार  श्रीनिवास शास्त्रींनी साबरमतीला गेलेल्या गोखले  दांपत्याची ओळख गांधींशी करून दिली. या माणसात काही  वेगळेच तेज आहे,  अशी बार्इंची खात्री झाली. बार्इंमधील  धमक गांधींनी ओळखली.  ‘मला काम करायचे आहे’  एवढ्या एका वाक्याने त्यांचे  जीवन बदलले. काही दिवसांतच ‘गांधींनी तुम्हाला चंपारणमध्ये जाऊन काम करायला सांगितले आहे,’ असा  निरोप ठक्करबाप्पांनी दिला. कल्पना करा- तेव्हाची  परिस्थिती, ब्रिटिशांच्या जुलमाने पिचलेला मजूर शेतकरी,  कुणी त्यांना मदत करायला नाही... कमालीचे दारिद्य्र, अज्ञान, राहण्याची व्यवस्था शून्य... पाणी,  अन्न कशाची  धड शाश्वती नाही... कुणीही व्यवस्था तयार करून दिलेली  नाही. स्वत:चा मार्ग स्वत: तयार करायचा होता. कुणाच्या आधारावर त्या तिथे पोहोचल्या होत्या?  काय करायचे,  कसे करायचे?  आखणी आपणच करायची. नुकतीच तोंडओळख झालेल्या एका माणसाच्या शब्दावर त्या तिथे  पोहोचल्या होत्या. डगमगतील त्या अवंतिकाबाई कसल्या! 

 त्या कंबर कसून कामाला लागल्या.  मोतिहारी गावात काम करायचे ठरवले,  कारण हे काम  देशाचे होते. येताना बरोबर एरंडेल,  क्विनाईन,  मूठभर औषधं  घेऊन गेल्या होत्या. समोर समस्या आ वासून उभ्या होत्या.  जुजबी झोपडं बांधून अगोदर रोग्यांची सेवा सुरू केली.  चंपारणमध्ये नीळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांवर सरकारने  दडपण आणून त्यांचा छळ चालवला होता. आधीच  पिचलेले शेतकरी अधिकच मेटाकुटीला आले होते. दुसरे  कुठले पीक घेऊ दिले जात नव्हते. दलाल कमी भावात नीळ  विकत घेत. गांधींचे नाव ऐकून एक गरीब शेतकरी  काँग्रेसच्या संमेलनात त्यांना भेटला नि चंपारणला येऊन  मदत करायची विनंती केली. गांधींनी अगोदर सर्व समस्या  समजावून घेतली. दलालांशीदेखील सविस्तर बोलले. त्या  वेळी जगातील 80 टक्के नीळ तिथे पिकत होती. तिथून  जगभर निर्यात होत होती. त्याचा फायदा फक्त दलालांना होत  होता, शेतकरी मात्र उपाशी राहत होते. ‘तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न काय कळणार?  या लोकांच्या भानगडीत  तुम्ही पडू नका,  त्यांचं ते बघून घतील’- असे सल्ले मिळाले. त्यांनी वकिली सल्ला घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते साध्या  गरिबांना बरोबर नेत असत. कुठल्या जातीचे आहेत,  कोण  जाणे! म्हणून त्यांना बाहेरच बसवले जाई. हे सारे गांधींचे  मन टिपून घेत होते. आपण फक्त प्रश्न समजून घेतोय,  असं ते  म्हणत होते.

लोक एकत्र येऊ लागले. सरकार व दलालांनी  गांधी व शेतकऱ्यांच्या मुसक्या बांधायची तयारी चालवली. पण गांधींनी आपला मुद्दा सोडला नाही. प्रवेशबंदी लादली  गेली. आफ्रिकेत बदनाम(?) झालेला हा माणूस इथं डेंजरस  ठरेल,  म्हणून त्यांना अटक करून न्यायालयात उभं केलं.  आपली बाजू मांडून, लगेच ‘मला शिक्षा करा,’ असे गांधी  म्हणू लागले. लोकांनी असा आरोपी प्रथमच पाहिला होता. पण तेवढ्यात गव्हर्नरसाहेबांनी ‘गांधींना सोडून द्या’ असा आदेश पाठवला.  एका वेळी अनेक गोष्टी हाताळायची त्यांची हातोटी होती. राजेंद्रप्रसाद हे मोठ्या प्रासादतुल्य बंगल्यात राहत. तिथे या  कामासाठी येणाऱ्या बिहारी वकिलांनी आपापल्या जातीचे  स्वयंपाकी आणले होते. गांधींनी ‘सर्वांचा स्वयंपाक एकत्र   करावा’ असं सुचवलं नि तसं झालं. राजेंद्रप्रसादांनी लिहून  ठेवलंय की, आयुष्यात पहिल्यांदा ते इतरांनी शिजवलेले अन्न जेवले होते. हे सारे अवंतिकाबार्इंना समजले होते.  चंपारणच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या  सत्याग्रही तुकडीत आनंदी वैशंपायन व अवंतिकाबाई  गोखले या दोन महिला होत्या. बिहारमध्ये फिरून त्यांनी  महिलांना आरोग्याचे धडे दिले. मुलींच्या शिक्षणाकरिता  प्रचार केला. बडहरवा गावी मुलींची शाळा काढली.  मुलींच्या शाळेला पुरुषांबरोबर स्त्रियांचाही विरोध होता.  लिहिणे,  वाचणे व त्यांच्यामध्ये स्वदेशप्रेम निर्माण करण्याचे  अवघड काम अवंतिकाबार्इंनी केले. चंपारणमध्ये राहणे  म्हणजे यातील जे-जे शक्य आहे ते-ते करणे हे त्यांच्या  मनाने घेतले. त्यांनी गांधींचे मराठी भाषेतले पहिले चरित्र लिहायला (चंपारणमध्ये राहताना) सुरुवात केली. त्याला  टिळकांनी प्रस्तावना लिहिली आहे. अवंतिकाबार्इंनी सुरू केलेल्या कामाचे उद्‌घाटन गांधींनी  केले आणि पुढे चळवळीच्या कामाला लगेच निघून गेले. 

बार्इंच्या कामाला पाहता-पाहता वेग आला. तिथल्या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवले. त्यांना औषधं देऊन बरे  केले. त्यामुळे त्यांना या माताजींचा विश्वास वाटू लागला. पडद्याच्या कडक गोशात राहणाऱ्या लेकी-सुनांना खुल्या  हवेत श्वास घ्यायला परवानगी मिळू लागली. बाई सुंदर गात (आणि व्हायोलिन वाजवत) बायांना जमवून दोहे म्हणत, देशप्रेमाच्या कथा सांगत. त्यांच्या अंगात कीर्तनकला होती,  तिचा वापर त्यांनी व्यवहारातले शहाणपण शिकवण्यासाठी  सहजपणे करून यश मिळवले. घरातले पुरुष बिनदिक्कत, माताजींच्या हवाली बायकांना करू लागले. त्यांच्या  व्याख्यानांना गर्दी होऊ लागली. गर्दी पाहून पोलीस पाळत  ठेवू लागले. रामनवमीच्या सभेत त्या दमदार बोलल्या,  पण  पोलीस काय रिपोर्ट करणार? आपल्याला जे काम स्त्रियांकडून करवून घ्यायचं आहे  त्यासाठी ही कार्यकर्ती अगदी योग्य आहे,  असे गांधींचे  म्हणणे होते. कडक सोवळ्यात घरी वावरणारी ही ब्राह्मण  स्त्री- विचार पटला म्हणून गरीब, अस्पृश्यांच्या वस्तीत  काम करू लागली. त्या काळाचा नि समाजाचा विचार  करता,  हे मोठे धाडसाचे पाऊल होते. 

स्त्रियांमध्ये शिक्षण व  स्वातंत्र्याची आस निर्माण करणं,  आपणदेखील या महान  कार्यात सहभागी होऊ शकतो याचा विश्वास निर्माण करणं  गरजेचं होतं. अवंतिकाबार्इंनी ते यशस्वीपणे केलं. त्यांच्या  प्रेरणेने 1930-32 च्या मिठाच्या सत्याग्रहात महिलांचा  सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. तसेच फैजपूरच्या काँग्रेसच्या संमेलनात महाराष्ट्रातील स्त्रियांनी भाग घेऊन  आपले महत्त्व जाणवून दिले,  त्यामागे बार्इंचीच प्रेरणा होती.  तिथे बार्इंनी खादीच्या विक्रीचा उच्चांक केला.  बार्इंनी स्त्रियांना एकत्र करण्यासाठी हिंद महिला संघाची  स्थापना 1930 मध्ये केली. चाळी-चाळीत जाऊन त्यांनी  राष्ट्रकार्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केले. ‘राष्ट्रकार्य आणि स्त्रिया’ या विषयावर त्यांना अनेक संस्था भाषणाला बोलावत. स्त्रियांचे  सबलीकरण,  देशकार्यात त्यांचा सहभाग यांवर बार्इंचा भर  असे. काही काळ त्या हिंद महिला संघाचे साप्ताहिक चालवत  होत्या. त्या अध्यक्ष म्हणून 31 वर्षे काम करीत होत्या.

स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून त्यांना शिवणकाम,  नर्सिंग,  सूतकताई,  आरोग्याचे,  हिंदी भाषेचे प्रशिक्षण संस्थेत देऊन  तयार केले. त्यामुळेच पुढे देशकार्यातील चळवळीत स्त्रिया  धडाडीने उतरू लागल्या, अन्यायाविरुध्द आवाज उठवू  लागल्या. गिरगावकर प्रतिष्ठित स्त्रिया त्यांच्याबरोबर  आंदोलनात आपला ठसा उमटवू लागल्या. हजारोंच्या सभेपुढे  अवंतिकाबाई मराठी व इंग्रजीत अस्खलितपणे निर्भयपणे  जोरदार भाषणं करीत. अनेक पुढारी,  गांधी,  टिळक  यांच्यासमोर त्या भाषणं करीत. ते ऐकून टिळक उत्फूर्तपणे  म्हणाले,  ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झालीय.’’  हिंद महिला समाजात त्यांनी सूतकताईचे वर्ग सुरू केले.  पन्नासेक बायका शिकायला येत. त्यांच्या लक्षात आलं की,  सूत तयार करून पुन्हा दुसऱ्यांवरच कापडासाठी अवलंबून  राहावं लागत असे. मग त्यांनी दोन हातमाग चालवणाऱ्यांना मुंबईला बोलावून घतलं. गांधीजींच्या दर वाढदिवसाला त्या  धोतरजोडी पाठवत असत. गांधीजी गमतीने म्हणत,  ‘‘अविबेनने मला आता सवयच लावली आहे. त्यांनी जर  मला धोतरं पाठवली नाहीत,  तर मला लंगोटी लावूनच  राहावं लागेल!’’  ‘‘हे सारं चालू आहे,  पण तुमच्या अविबेन स्वत: कुठे  खादी वापरतात?’’ असं सरोजिनीने गांधींना म्हणताच ते  उत्तरले,  ‘‘माझी अविबेन विचारांची पक्की आहे. तिला खादी  पटली, तर ती नक्कीच वापरेल.’’ आणि तसेच झाले. कुणी  तरी अवंतिकाबार्इंना एक तलम सुती खादीची साडी दिली.  ती हाताळून त्या म्हणाल्या, ‘‘खादी इतकी मऊ नि तलम  असू शकते’’ बस्स! त्यानंतर त्यांनी जन्मभर खादीच  वापरली. 

स्वत: रोज तीन तास सूतकताई करीत.  त्यांचा मुंबई महापालिकेमध्ये 1923 मध्ये प्रवेश झाला. त्यांचा  स्वच्छ कारभार,  फक्त लोकहिताचा विचार करून काम करणं पाहून  तत्कालीन अध्यक्ष म्हणाले, ‘‘अहो, सर्व जण स्वत:ची कामं  करवून घ्यायला कधी ना कधी  माझ्याकडे येतात. तुम्हीच एक अशा  आहात की, ‘असे काम आणत  नाही.’’  बार्इंनी हसून विषय टाळला.  मुंबई महानगरपालिकेने स्त्रियांचा  मताधिकार व निवडणुका  लढविण्याचा अधिकार 1922 मध्ये  मान्य केला. त्या कायद्याप्रमाणे  झालेल्या निवडणुकीत सरोजिनी नायडू,  बच्चूबेन  लोटवाला,  हॅडगिव्हसन व अवंतिकाबाई अशा चार स्त्रिया  निवडून आल्या. त्यात अवंतिकाबार्इंना प्रचंड मते मिळाली, परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवड रध्द झाली.  बार्इंना असलेला प्रचंड पाठिंबा व त्यांचे सामाजिक कार्य  लक्षात घेऊन दि.1 एप्रिल 1923 रोजी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व मिळाले. त्या 1931 पर्यंत सातत्याने  त्यांना स्वीकृत सदस्य होत्या. 

आपल्या मतदारसंघातील प्रश्न  व ठराव मांडून त्यांनी महापालिका दणाणून सोडली.  आरोग्य व शिक्षण ही दोन खाती बार्इंच्या जिव्हाळ्याची.  शाळेच्या आसपास अनारोग्यकारक खाद्य-पेये विकली  जाऊ नयेत, चौपाटीवर बसून हवा खावी,  पदार्थ खाऊन  कागद-द्रोण वगैरे टाकून वाळू खराब करू नये- अशा  प्रकारचे ठराव त्यांनी मांडले. सभागृहात त्या मराठीतूनच  बोलत. त्यांची भाषणे व युक्तिवाद विचारप्रवृत्त करणारे असत,  म्हणून अध्यक्षांनी त्यांना इंग्रजीत भाषण करायची  विनंती केली. त्यांचे इंग्रजी फर्डे होते,  ऐकत राहावेसे वाटे,  असे अनेकांनी नोंदवले आहे. त्या कमिटीच्या मीटिंगला  त्यांना भत्ता मिळे. ‘तो घेणार नाही’ असे सांगताच वल्लभभाई पटेलांनी सांगितले की,  तसे करता येणार नाही. ते पैसे घेऊन  तुम्ही दुसऱ्या चांगल्या कामाला दान करा.  महापौरपदासाठी 1928 मध्ये त्यांचे नाव सुचविले गेले.  दुसरे नाव होते मुंबईतील प्रसिध्द डॉ. गोपाळराव देशमुख  यांचे. बार्इंच्या मते,  डॉक्टर सर्वतोपरी योग्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे  सांगितले. नाही तर 1928 मध्येच  मुंबईला पहिली महिला महापौर  मिळाली असती. 

महानगरपालिकेत  कर्मचारी व सदस्य यांना खादी  घालणे काही कारणाने शक्य नसेल  तर त्यांनी स्वदेशी कपडे वापरावेत,  हा ठराव त्यांनी पास करून घेतला.  हे त्यांचे महापालिकेचे शेवटचे  योगदान. दि.26 ऑक्टोबर 1930  रोजी पोलीस कमिशनरचा हुकूम  मोडून बार्इंनी मुंबईच्या आझाद  मैदानावर झेंडावंदन केले. या वेळी  चौपाटीवर निदर्शनं केली. मोठ्या  संख्येने लोक जमले होते. एका  लहान मुलीच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी  मुली व बायकांवर जोरदार लाठीमार सुरू केला,  घोडस्वार  अंगावर घातले. पोरींची डोकी फुटली,  पण हातातला झेंडा  कुणी खाली पडू दिला नाही. रात्रीच्या वेळी बायकांना  पकडून जंगलात सोडून दिलं. या साऱ्यांचा कार्यकर्त्यांना  खूप मनस्ताप झाला. अवंतिकाबार्इंना अटक झाली. ‘मी एका पवित्र कार्यासाठी कारागृहात जात आहे’, हीच त्यांची भावना होती. 

ही कामं चालू असतानाच बबनरावांना हृदयविकाराचा  झटका आला. तेव्हा गांधीजींनी त्यांना स्पष्ट सांगितले की- आता फक्त पतीकडेच लक्ष द्यायचे,  बाकी कामं इतरांवर  सोपवा. त्यांनी आपल्या सेवेने पतीला बरे केले. पण त्यांना  स्वत:ला कर्करोगाचे निदान झाले नि त्यांची प्रकृती  झपाट्याने ढासळू लागली. बार्इंच्या आजाराचे वृत्त  कळताच गांधीजींनी त्यांना धीर देणारे नि उल्हासित करणारे  पत्र लिहिले. पण त्यानंतर गांधींजीचीच हत्या झाली. याचा  धक्का त्यांना बसला. अवंतिकाबार्इंना भ्रम होऊ लागला की, गांधीजी आपल्याला बोलावत आहेत. पतीलाही त्या म्हणू  लागल्या- ‘चला,  आता दोघंही त्यांच्याकडे जाऊ या.’ गांधीजींच्या या पहिल्या भारतीय कार्यकर्तीचा 25 मार्च 1948 रोजी मृत्यू झाला. अखेरपर्यंत त्या विधायक कार्यात  मग्न राहिल्या. 

Tags: gandhinche garud lokmanya tilak mahatma gandhi awantika bai अवंतीकाबाई महात्मा गांधी khadi satyagrah mahapalika mahatma Gandhi hind mahila Avantika weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात