डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मानवी दु:खसागरात उभी मूर्तिमंत सात्त्विकता- सुचेता

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय मतभेद, कृपलानींनी काँग्रेस सोडणे, सुचेताजींनीही सोडणे नि परत येणे- हे घडत गेले. त्यांनी नव्या सरकारात नि:स्पृहपणे भरीव योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचा पदभार सांभाळला होता. लोकांना आश्चर्य  वाटले की, त्या मुख्यमंत्र्यांच्या भव्य बंगल्याऐवजी तिथेच असलेल्या छोट्या बंगलीतून काम करायच्या. स्वत: लालबहादूर शास्त्री साधे राहायचे, त्यांनाही सुचेताजींच्या साधेपणाबद्दल कौतुक वाटे. जेबी लखनौला असत. त्यांना भेटायला जाणेही सुचेताजींना अवघड जात असे. कामाचे डोंगर असायचे, ते संपवल्याखेरीज त्यांना शांत वाटत नसे. रात्रंदिवस काम करून त्यांनी राज्याचा गाडा चालवला. लोकांना हे नवे होते. मुख्यमंत्री किती नि कशी लोकोपयोगी कामं करतात, हे नितळपणे समोर येत असे. त्यांचा लोकसभेतला काळ त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनांनी गाजवला.

सुचेता मुजुमदार आणि आचार्य कृपलानी हे जोडपं वय पाहता अनुरूप नव्हतं. गांधीजी ह्या लग्नाच्या विरोधात होते, कारण त्यांना त्यांचा उजवा हात गमवायचा नव्हता. कृपलानींच्या घरचा इतिहास असा होता की- पुरुष फार वर्षे जगत नसत. सुचेता आणि जे.बी. कृपलानींच्या वयात 20 वर्षांचे अंतर होते. सुचेताने गांधीजींना सांगितले की- ह्या लग्नाने तुमचा उजवा हात जाणार नाही तर, तुम्हाला आणखी एक हात कामाला मिळेल. घरच्यांना समजावले की, आमचे अनेक बाबतींत सहमती आहे. विचार एकसारखे आहेत. त्यामुळे बाकीच्या बाबत मनात शंका येऊ देऊ नका. लग्नावेळी त्या दोघांनी कुणाला सांगितलेच नाही. या जोडप्याने गांधीविचारांसाठी आजन्म काम केलं.   

मुजुमदार कुटुंब हे कट्टर ब्राह्मो समाजवादी. सुचेता अत्यंत शिस्तप्रिय, नैतिक, धार्मिक विचारांच्या घरात वाढलेली. माता-पिताही साध्या नि सात्त्विक जगण्याचे व्रत घेऊन काम करीत होते. सेंट स्टिफन कॉलेजात ती शिकली. त्यानंतर बनारस विद्यापीठात ती प्राध्यापक झाली. बौद्धिक कुशलतेचे धडे तिने घरी नि बनारसच्या वातावरणातच तासून घेतले. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली. ती तिने निष्ठेने पार पाडली. तिची भावंडे चांगल्या हुद्यांवर काम करू लागली. बनारसलाच तिची जे.बी. कृपलानींशी भेट झाली. या निडर, तडफदार तरुणीच्या प्रेमात जे.बी.पडले. बिहारमधील भूकंपाच्या वेळी दोघांनी बरोबर काम केले. दोघांनी आपणहून ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, पण तरीही परस्परांबद्दलची ओढ कधी कमी झाली नाही; उलट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दोघांमध्ये अधिक चांगले मित्रत्व निर्माण झाले.

बनारस विद्यापीठात त्या चांगल्या रुळल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांना मनापासून आवडत होते, पण जमनालाल बजाज यांनी अतीव आग्रहाने वर्ध्याला बोलावले. मुळात कॉलेजची प्राध्यापकी सोडून लहानशा गावात महिलांना शिकवण्याची कल्पना तिला फारशी रुचत नव्हती, त्यांच्या मनात फारसे नव्हते. पण बजाजांच्या आग्रहासाठी त्या  तिथे गेल्या. गांधीजींना भेटल्या. मग मागे वळून परतणे नव्हतेच. तिथेच रमल्या. ग्रामीण भागात खूप काम तिच्यासारख्या स्त्रीसाठी वाटच पाहत होते. गांधींशी त्यांची गट्टी जमली. त्या मोकळेपणाने बोलत असत. त्यांचे दडपण अजिबात वाटत नसे. त्यांचे बोलणे ऐकणाऱ्याचे मन भारून टाकत असे. कामात नि बोलण्यात पक्के असले की, मग त्यांच्याशी संवाद सहज शक्य असे. सुचेताजींना त्यांनी सांगितले की- तू जेबींशी लग्न नको करूस, दुसऱ्या कुणाशी तरी कर. त्यावर त्या ताडकन्‌ म्हणाल्या, ‘‘छे : ते कसे शक्य आहे? प्रेम एकावर अन्‌ लग्न दुसऱ्याशी? तीन माणसांचे जीवन दु:खी का करायचे?’’ त्यावर ‘‘करायचे ते करा!’’ असा शेरा मिळाला. सुचेतांनी त्यांना जे योग्य वाटलं तेच केलं- जेबींशी लग्न!      

नौखालीला 1946 मध्ये हिंदू-मस्लिम दंगे झाले होते. पण तेथील ब्रिटिश सरकार नि सुऱ्हावर्दी आदी लोक ‘इथं सारं अलबेल आहे, काही काळजी करायचं कारण नाही, लोक उगाचंच बाऊ करताहेत’ वगैरे सांगत होते. पण प्रत्यक्षात सत्य काय आहे, हे समजत नव्हते. सामान्य माणसांचे अपरिमित हाल होत होते. एखाद-दुसरी बातमी येई, ती अस्वस्थ करणारी असे. स्वत: तिथे जाऊन जाणणं गरजेचं होतं.

गांधींनी जेबींना नौखालीला पाठवायचे ठरवले. सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस तेथील नेते होते. जेबींसह जायला सुचेता सिद्ध झाल्या, पण गांधी सुचेताजींना जाऊ द्यायला राजी नव्हते. पण नंतर म्हणाले, ‘‘जा. तू बंगाली आहेस, लोकांशी चांगला संपर्क साधू शकशील.’’ सुचेताजींच्या हिमतीची दाद नौखालीतील त्यांच्या कामाकडे पाहून द्यायला हवी. त्यांनी पीडित हिंदू कुटुंबांना एकत्र करून एक कॅम्प तयार केला. जवळपास आठ हजार लोक तिथे होते. एका श्रीमंताने आपल्या हवेलीत त्यांना आश्रय दिला होता. त्यांनी वस्त्यावस्त्यांत जाऊन स्त्रिया नि मुलींना एकत्र केले होते. त्यांनी सविस्तर रिपोर्ट गांधीजींना पाठवले होते, ते तिथे बऱ्याच काळाने पोहोचले.

गांधीजींनी समजावले, ‘‘तुम्ही मुस्लिम वस्त्यांतही जायला हवं, नाही तर अशाने फूट अधिकच वाढेल. लोकांचे मतपरिवर्तन करायचे, तर हे गरजेचे आहे. हे काम कसे करायचे, हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. लोकांचे हृदयपरिवर्तन व्हायला हवे. जा आणि कामाला लागा. प्राण द्यायची वेळ आली, तर स्वत:चे अगोदर द्या.’’ खरं तर इथे कामं करायला त्यांच्याकडे तरुण माणसंच नव्हती; पण धैर्याने पुढे जातील अशी मूठभर माणसंही किती काम करू शकतात, हे त्यांना कळले. मुस्लिम वस्तीत गेल्यावर कळले की- तिथे कित्येक मुलं-बायका घाबरलेल्या आहेत, उपाशी आहेत. त्यांची स्थिती हिंदूंप्रमाणेच दयनीय होती. त्यांच्या नेत्यांनी त्यांना उचकवले होते. अनेकांनी दंगलीचा फायदा घेऊन लुटलूटदेखील केली होती. पण आता सारे एकाकी होते. त्यांना धीर द्यायचं काम या मंडळींनी केलं. गरीब मजूर पार उद्‌ध्वस्त झाले होते. कामं बंद होती. बाजार, हॉस्पिटल्स जळली होती. लोकांना हळूहळू धीर येऊ लागला. दोन्ही समाजांना चुका कळू लागल्या. गांधींनी बजावले, ‘‘सुरुवातीला ठीक आहे, पण आता फुकटात काही देऊ नका. काही तरी काम करायला द्या. कुणी बाई उपाशी पोरासाठी काही मागायला आली, तरी तिला काम देऊनच मदत द्या.’’ अगोदर गांधींचे म्हणणे बरोबर नाहीसे वाटले; पण सुचेताजींच्या ध्यानी आले की, अशाने फुकटाची सवय लागेल. गांधीजींच्या मते, ‘त्यांना भीक मागतोय असे वाटता कामा नये.’ मग काही ना काही काम करवून घेऊनच मदत द्यायला सुरुवात केली. हा व्यवहारीपणा गांधींनीच शिकवला.

त्या कोणालाही घाबरत नसत. ब्रिटिश अधिकारी उगीचच रुबाब दाखवत. वास्तव परिस्थितीची त्यांना कशी जाण नाही, ती सुचेताजी तडक जाणवून देत. असेच एका श्रीमंत घरात एक मुलगी विवाह करून राहत होती. पण त्याबद्दल जरा शंका होती. ब्रिटिश अधिकारी, न्यायाधीश आणि सुचेताजींना घेऊन सारी मंडळी त्या माणसाच्या घरी गेली. त्या मुलीला बाहेर बोलावले गेले. त्या गृहस्थाने सांगितले की, या मुलीने नि माझ्या मुलाने प्रेमविवाह केला आहे. त्या मुलीला प्रश्न विचरले गेले. ती किडकिडीत मुलगी नुसती मान हलवून हो वा नाही म्हणत होती. तोंडातून अवाक्षरही तिने काढले नाही. मॅजिस्ट्रेटनी ही घटना प्रेमविवाहाची आहे म्हणून सोडली; पण सुचेताजींनी म्हटले की, त्या मुलीला एकटीला विचारा, आतल्या खोलीत नेऊन तिच्याशी बोला. त्यांनी तिला आत नेले. तशी ती मुलगी त्यांच्या पायांवर पडून ‘मला इथून सोडावा’ असं म्हणू लागली. आता?

तिला कुठल्याशा सुरक्षित आश्रमात ठेवणं क्रमप्राप्त होतं. सुचेताजींनी रातोरात तिची व्यवस्था दूरवरच्या आश्रमात केली. पोलीस व इतरांवर तिला सुरक्षितपणे नेणं ही जबाबदारी टाकली. ही बातमी बाहेर पडली असती, तर शमायला लागलेले दंगे पुन्हा भडकले असते. अवघड प्रसंगी तातडीने निर्णय घेऊन ते अमलात आणायची ताकद नि हिंमत त्यांच्यात होती. सहकाऱ्यांच्या अडचणी समजून लगेच व्यवस्था करणं त्यांना जमत असे. अधिकाऱ्यांनी वा इतरांनी ‘नाही जमणार’ असं म्हटलं की, यांचा होकार तत्काळ येई आणि काम होई. त्यातून त्यांची कार्यतत्परता कळत असे.

तुरुंगातून 1945 मध्ये सुटल्यावर घरी जाऊन पतीबरोबर काही काळ घालवावा नि विश्रांती घ्यावी, असा मनोदय होता. पण तेव्हाच गांधींनी त्यांच्यावर कस्तुरबा ट्रस्टचे काम सोपवले. स्त्रियांकरता  रुग्णालये उभारणे, प्रशिक्षण केंद्रांचे जाळेच उभे करायचे काम होते. त्यांनी तातडीने त्या कामाकडे मोर्चा वळवला. गांधींबरोबर काम करायचं, ही एक मोठी पाठशाळा होती. गावातल्या लोकांसाठी सुचेताजींना काम करायचं होतं. हे तर खूप विस्तृत काम होतं. शिक्षण, आरोग्य हे तर प्राथमिक होतं. कस्तुरबांच्या मृत्यूनंतर कस्तुरबा ट्र्‌स्ट सुरू करायचं ठरलं. याअंतर्गत स्त्रियांसाठी असलेली हॉस्पिटल वा इतर संस्था स्त्रियांनीच सुरू करून चालवाव्यात, अशी बापूंची इच्छा होती. त्यांच्या मते- कस्तुरबा ही साधी, खेड्यातली अशिक्षित स्त्री होती. तिच्या नावाचे काम गावातील स्त्रियांनी चालवावे. फार शहरी, सुशिक्षित स्त्री-पुरुष नकोत. हे अवघडच होते. पैसे जमवणे, संस्था चालवणे त्यांना जमेल? पण सुचेता कृपलानींनी ग्रामीण महिलांना प्रशिक्षण दिले. थोडीफार तात्पुरती इतरांची मदत घेतली, पण हळूहळू स्त्रिया तयार झाल्या!! हे सारे बापूंच्या शब्दाने झाले.

गावातील महिलांना लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व कळले. त्यांच्यातील काहींनी आपल्या घरातच शाळा काढायला जागा दिली. असे करता-करता काम यशस्वी होऊ लागले. कस्तुरबा ट्रस्टने ट्रेनिंग सेंट्रर्स सुरू केली. गांधीजींनी तिला ठक्करबाप्पांबरोबर देशभर फिरून कस्तुरबा ट्रस्टचं काम विस्तृत कसं करता येईल, याचा अंदाज घ्यायला सांगितलं.

गावागावांत शाळा, उपचार केंद्रं, खादी विणायची कामं होऊ लागली. गांधीजींनी सारा देश पालथा घालून लोकांची स्थिती जाणून घेतली होती. तरुणांनी पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेण्याऐवजी गावातच काम मिळायला हवे, म्हणून ग्रामसुधाराच्या अनेक कल्पना राबवल्या जाऊ लागल्या. यात सुचेताजींचा खूप मोलाचा वाटा होता. शहरात जाऊन पांढरपेशा नोकरीसाठी रांगा लावण्याऐवजी गावात उद्योग सुरू करणे, इतर प्रशिक्षण घेऊन काम करणे अधिक श्रेयस्कर- असे बापूंचे म्हणणे होते. शिक्षितांनी शारीरिक श्रमाच्या कामाला कमी लेखू नये, म्हणून आश्रमात आपापली कामं करायचा नियम होता. सुचेता आणि जेबी यांचे एकत्र राहणे बऱ्याचदा कामामुळे अवघड होत असे. जेबी हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अनेक वर्षे होते. त्यानिमित्ताने त्यांचे राहणे वेगवेगळ्या ठिकाणी असे. सुचेताजींना तुरुंगात जायची जणू हौसच होती. तरुण वय नि धाडसाची ओढ. तुरुंगात जाणं ही अभिमानाची बाब होती. समाजात कौतुकही होई. युद्धविरोधात नि सरकारच्या विरोधात बोलल्याने आणि निदर्शने केल्याने त्यांना 14 महिन्यांची कैद झाली होती.

त्यांचे घर नि पत्ता अलाहाबादचा होता. काम मात्र त्या मुंबईतून करत होत्या. त्याचा फायदा घेत अनेक कार्यक्रम गांधीजींचा सल्ला न विचारता त्यांनी बेधडकपणे हाती घेतले. गांधीजी तेव्हा तुरुंगात होते. काम, ध्येय एकच- ब्रिटिशांना जेरीला आणायचे. अहिंसा ही त्यांच्या मनाने स्ट्रॅटेजी म्हणून अंगीकारली होती. शस्त्रास्त्र घ्यायला साधनं नव्हती, मग हाच मार्ग बरा होता. तरी सळसळत्या रक्ताला धडक कृतीचे आकर्षण होते. भूमिगत राहून रेडिओ स्टेशन चालवणे, रेल्वे उडवणे, घातपाती कारवाया करणे असे उद्योग सुरू होते. त्यांच्या घरी वॉरंट जात, पण तेथे त्यांचा ठावठिकाणा नसे. पण हे फार दिवस चालणे शक्य नव्हते.

सरकारी दमनशाहीने कळस गाठला होता. त्यातच स्वातंत्र्याची चाहूल लागली. सीमेवर हलकल्लोळ सुरू झाला. ब्रिटिश सरकार त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतेय, असे वाटू लागले. निर्वासितांचे तांडे दिल्ली व सभोवतालच्या गावांत  येऊ लागले. त्यांची हालत बघवत नव्हती. गांधीजी व्यथित होते. आपली अहिंसा थिटी पडली, असे त्यांच्या मनाने घेतले. माणसातला सैतान थैमान घालत होता. हिंदू-मुस्लिम जमातीत सामंजस्य नांदावे म्हणून त्यांनी उपोषण सुरू केले. सुचेताजींनी दिल्लीच्या आसपास आलेल्या, अर्धमेल्या अवस्थेतील निर्वासितांना मदत करायला सुरुवात केली. त्या उत्तम व्यवस्थापक होत्या. त्यांनी आपल्या आत्मिक शक्तीने अनेक बाबतींत गांधीजींशी सल्लामसलत न करता अनेक कामे तडीस नेली होती. इथे त्यांना वाटले की- आपल्या सरकारकडे साधनसामग्री आहे, माणसं आहेत तर ते निर्वासितांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करू शकतील. म्हणून त्यांनी ते काम सरकारातील अधिकाऱ्याकडे सोपवले. त्यावर गांधीजींनी तिला म्हटले, ‘‘माझ्याशी सल्लामसलत करायची गरज तुला वाटत नाही ना? या लोकांना काय कळतंय- कसे हाताळायचे असे प्रश्न?’’

आणि तसेच झाले. त्यांना ते जमेना. सुचेताजींनी काम परत हातात घेतले नि महिनाभर धडपडून त्यांना कामाची आखणी करून दिली, मगच त्या बाहेर पडल्या. राजकीय कामात एक ग्लॅमर असते, मान असतो. तसे सामाजिक रचनात्मक कामात नसते. खूप कष्टून, लोकांना पटवून शिक्षण, आरोग्य, खादी, ग्रामीण रोजगार यांसारख्या गांधीजींच्या संकल्पनांतून निर्माण झालेल्या संस्थांना आकार देणे अवघड असते. पण सुचेताजींनी दोन्ही आघाड्यांवर आपला ठसा यशस्वीपणे उमटवला. दोन्ही कामांत त्यांना असीम समाधान मिळत होतं. तीच त्यांची कमाई होती.

फाळणी आणि नंतर गांधीहत्येचा धक्का देशाला नि त्यांच्या अनुयायांना सोसावा लागला. त्यांच्या सहवासातील माणिक मोती म्हणजे- त्यांचे अमूल्य शब्द नि  त्याप्रमाणे वागणे- यांचा वारसा अनुयायांना चालवायचा होता. गांधी जसे बोलले, तसेच त्यांनी वर्तन केले. प्रत्येकाला आपण त्यांच्या सहवासात विकसित झालो; जगाकडे, समाजाकडे पाहायची वेगळी दृष्टी आपल्याला मिळाली, असे वाटे. ही मिळकत आपल्याला सदाचाराच्या मार्गावर नेत राहील याची खात्री होती.

जेबी कृपलानी आणि सुचेताजी हे असेच अभिन्न, प्रसन्न जोडपे होते. उदात्त विचारांनी भारावलेले, समाजासाठी निरपेक्षपणे सारे जीवन समर्पित करणारे क्रियाशील जोडपे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय मतभेद, कृपलानींनी काँग्रेस सोडणे, सुचेताजींनीही सोडणे नि परत येणे- हे घडत गेले. त्यांनी नव्या सरकारात नि:स्पृहपणे भरीव योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचा पदभार सांभाळला होता. लोकांना आश्चर्य  वाटले की, त्या मुख्यमंत्र्यांच्या भव्य बंगल्याऐवजी तिथेच असलेल्या छोट्या बंगलीतून काम करायच्या. स्वत: लालबहादूर शास्त्री साधे राहायचे, त्यांनाही सुचेताजींच्या साधेपणाबद्दल कौतुक वाटे. जेबी लखनौला असत. त्यांना भेटायला जाणेही सुचेताजींना अवघड जात असे. कामाचे डोंगर असायचे, ते संपवल्याखेरीज त्यांना शांत वाटत नसे. रात्रंदिवस काम करून त्यांनी राज्याचा गाडा चालवला. लोकांना हे नवे होते. मुख्यमंत्री किती नि कशी लोकोपयोगी कामं करतात, हे नितळपणे समोर येत असे. त्यांचा लोकसभेतला काळ त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनांनी गाजवला. युनोच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्य म्हणून त्यांनी अनेक देशांचा दौरा केला.

निवृत्तीनंतर जेबींनी एक छोटासा बंगला दिल्लीत बांधला. तेथे ते दोघं राहू लागले. तिथे त्या अगदी साध्या गृहिणीसारख्या घरगुती कामात, पतीच्या सेवेत, पाहुण्यांची उठबस करण्यात नि बागकामात रमून गेल्या. जे घर नि थोडीफार पुंजी जमवली होती, त्यातच त्या भागवत. आपल्यानंतर सारी मिळकत लोककल्याण समितीला गोरगरिबांच्या मदतीसाठी देऊन टाकली.  त्या काळात त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले होते, ‘ॲन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी’. त्यातील तीन भाग इलस्ट्रेटेड विकलीमध्ये छापून आले होते, पण ते काम अपूर्ण राहिले. अविश्रांत श्रमाने त्या थकल्या होत्या; परंतु जेबींना शुश्रूषेची गरज होती. त्या जेबींच्या सेवेत रात्रंदिवस गढून गेल्या. परिणामी, स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष झाले नि आजारी पतीला एकटं सोडून हृदयविकाराने त्या 29 नोव्हें. 1974 रोजी स्वर्गवासी झाल्या.

Tags: सुचेता मुजुमदार साधना सदर साधना गांधी गांधी महात्मा गांधी गांधींचे गारुड संजीवनी खेर sadhana series sadhana sadar sadar sadhana gandhi sucheta mujumdar gandhi mahatma gandhi gandhinche garud sanjivani kher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात