डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मार्गारेट- अमला ही मनाने नि उद्दिष्टाने प्रामाणिक होती. पण गांधींजवळच राहायला मिळावं, हा तिचा अट्टहास पुरा होणं अशक्य होतं. तिचे वागणे सुधारणे हा गांधींच्या जीवनातला प्रमुख उद्देश होऊ शकत नव्हता. गांधींसाठी आपण प्राण देऊ, वगैरे सारखी भाषा ती करीत असे. गांधींनी एकदा काही कारणाने उपोषण केले तर ती अडून बसली की, त्यांनी तसे करू नये. गांधी अर्थातच निश्चयाचे पक्के होते. तर, हिने त्यांच्या विरोधात उपोषण आरंभले. गांधी म्हणाले, ‘‘करू दे तिला उपास, जरा वजन कमी होईल.’’ अर्थातच दोन दिवसात तिने ते मागे घेतले. ती त्यांना पत्र लिहिताना ‘तुमची अनुयायी’ अशी सही करीत असे. त्यावर त्यांनी तिला चिडून लिहिले, ‘प्रिय अमला बेटी, तुझे वागणे दिवसेंदिवस वेडेपणाचे होत चालले आहे. कधी तर मूर्खपणाही करतेस. तू एवढी ताळतंत्र सोडून वागशील, असे वाटले नव्हते. तू अत्यंत संशयी नि अतिउतावळी बनत चालली आहेस.

गांधींच्या स्त्री सहकाऱ्यांबद्दल लिहिताना आपण काही शब्दांची, वाक्यांची पुनरावृत्ती करतोय की काय, असे वाटू लागते. कारण ज्या परदेशी स्त्रिया सर्वस्व त्यागून इथं येत होत्या, त्या गांधींच्या व्यक्तित्वाने भारलेल्या होत्या. प्रसिद्ध (स्त्री) पुरुषांबाबत ह्या घटना आजही होत असतातच; पण गांधींसारख्या फारच थोड्या व्यक्ती हे सारे जाणून त्या स्त्रियांना हिंदुस्थानातील सामाजिक कार्यात जोडून घेऊन कामाला लावत. अनेक जणींशी लेकीचे, मैत्रीचे नाते जोडत. आपल्याकडे आपण नात्याने जोडले गेलो की, ते निभावण्याची वृत्ती जागी होते. गांधींनी तर साऱ्या जगाशीच जिव्हाळ्याचे नाते जोडले. विदेशी स्त्रियांनी कदाचित ह्या माणसाला त्यांच्या संस्कृतीतील महात्म्यांच्या तुलनेत जोखले असेल. त्यातील बहुतेक जणींना गांधी ही व्यक्ती जीझस ख्राइस्ट वा सॉक्रेटिससारखी वाटली होती. ह्यात गांधींचा नैतिक अधिकार, शुचितापूर्ण जीवन, सत्यनिष्ठा, त्यांचे स्खलनशील वागणे, स्त्रियांबद्दल वाटणारे शारीरिक आणि त्या पलीकडे जाणारे वर्तन सारेच एक गूढ रहस्यमय वाटले, त्यात आश्चर्य नव्हते. त्यांचा माणसांचा संग्रह पाहिला की, ह्या माणसाने एकच आयुष्य जगले की अनेक, असे वाटून जाते.

आपल्याला आपले चार नातेवाईक नि बोटांवर मोजण्याइतके मित्रगण यांच्याशी संपर्क ठेवताना कटकट होते. त्यांचे प्रश्न नि आस्था ह्यापासून दूरच राहणे आपण पसंत करतो. कोण नसत्या झंझटीत पडणार, अशी आपली सर्वसाधारण मनोवृत्ती असते. आपण भले नि आपले कामकाज भले- याहून डोक्याला ताप नको असतो. अडी-अडचणीला मात्र आपल्याला साऱ्यांची आठवण येते. पण मग अशा नात्यातून किती प्रेम, मदत मिळणार? इथे तर कुठलीच अपेक्षा न करता केलेलं प्रेम नि लोकांना सन्मार्गावर नेण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून कुणीही थक्क होईल. देशव्यापी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व, अनेक सामाजिक सुधारणांसाठी अथक प्रयत्न, त्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे. वाचायला लागलं की, अचंबित होण्याला पर्याय नसतो. आपली माणसं ही संज्ञा त्यांच्या दृष्टीने सर्व विश्वातील माणसं अशी होती. आणि आज एकविसाव्या शतकात आपण जाती, धर्म, संस्कृतीच्या विळख्यात अधिकच गुरफटत आहोत. पण हिंदुस्थानात सत्तेव्यतिरिक्त असलेल्या अनेक बेड्या तोडायला देशी-विदेशी जे कुणी पुढे येतील, त्यांची मदत घ्यायला त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. कारण राजकीय कामातला विदेशींचा सहभाग ब्रिटिश सत्तेने खपवून घेतला नसता नि त्या विदेशींना विनाकारण त्रास झाला असता. गांधींकडे येणाऱ्या महिला ह्या नैतिकतेच्या निष्ठेच्या तत्त्वांच्या आकर्षणामध्ये येत, याचा अर्थ त्या स्वत: मोठ्या आदर्श जीवन जगणाऱ्या स्त्रिया होत्या असं नाही. त्याही राग, लोभ, मद, मत्सर, स्वार्थ यांच्या आहारी जाऊन वागणाऱ्या होत्या. त्यांना अधिक वाहवत न जाऊ देता त्यांना कार्यावर लक्ष केंद्रित ठेवायला लावणं यासाठी हे एखाद्या मानसतज्ज्ञाची मदत आवश्यक होती. पण गांधींनी त्या स्त्रियांकडून नि सरकारकडून योग्य ते चातुर्याने करवून घेतले.

जर्मनीची मार्गारेट स्पीगल ही एक मनस्वी, विचार करणारी, कष्टाला तयार असलेली ज्यू तरुणी होती. वास्तविक तिच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. गांधींची नि तिची पत्रे आहेत. जर्मन वृत्तपत्रांतूनही तिच्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. स्वभावाने ती हट्टी, तापट, आकसाने वागणारी होती. एका धनाढ्य व्यापारी घराण्यात ती जन्मली (1897). बालपणापासूनच तिला वाचनाची खूप आवड होती. त्या काळात तिच्या हाती पडले हिंदुस्थानातील तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आणि रोमाँ रोलाँचे गांधींचे चरित्र. स्टेट लायब्ररीतून ती हिंदुस्थानाविषयी जे-जे मिळेल ते झपाटल्यासारखी वाचत सुटली. हिंदुस्थानात यायचा ध्यास तिला लागला. ह्याच काळात तिने बॉन विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. तिला युरोपियन भाषांचे चांगले ज्ञान होते. शिक्षणक्षेत्रात काम करायची तिची मनीषा होती. त्याच काळात जर्मनीतील वातावरण बिघडत चालले होते. ठरलेला अभ्यासक्रम नसल्याने ती कॉलेजात इंग्रजीच्या वर्गात गांधींच्या लिखाणाविषयी शिकवू लागली, परंतु गांधींना भेटायची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने रजा घेतली आणि तिथून भारताकडे प्रयाण केले.

तिने गांधींना पाहिले ते येरवडा जेलच्या प्रांगणात. एका विशाल आंब्याच्या पारावर ते बसलेले होते. कैदी त्यांना नमस्कार करत होते. जेलर हात जोडून अदबीने त्यांच्याशी बोलत होता. जणू एखादा प्रेषित उपदेश करीत असावा, असा भक्तिभाव साऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. जीझस वा सॉक्रेटिसचे दर्शन घडलेय, असे तिला वाटत होते. जणू एक तेजोवलय त्या माणसाभोवती होते. तिचे मन भरून आले होते. ‘आपली सेवा करायची आहे’ असे तिने सांगितले; तेव्हा तिला त्यांनी ‘शाकाहार कर, इथली काचेची भांडी आज तू धुऊन ठेव’ असे सांगितले. त्यानंतर ‘पत्रं लिहीत राहा’ असे तिला सुचवले. ती थोड्या काळासाठीच इथे आली होती त्यामुळे परतणे भाग होते. तेवढ्यात तिने आश्रम-जीवन पाहून घेतले. तेथील शिस्त, पवित्र वातावरण तिला आवडले होते. काही काळ तिने हरिजनसेवेचे कामही केले. ती शांतिनिकेतनलाही जाऊन आली. तिथे रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्त्व आणि तेथील शिकवण्याचे वातावरण पाहून ती प्रभावित झाली. आपला अनुभव तिने गांधींना बोटीवरून कळवला. त्यावर गांधींनी लिहिले की, यदाकदा जर आपण परत भेटलो, तर तू अशी माझ्यामुळे भारवून जाऊ नकोस. तू मला लेकीसारखी आहेस. जेव्हा मनात येईल, तेव्हा तू लिहीत जा.

तिनेही इथला अनुभव त्यांना कळवला होता. आपण रवींद्रनाथांच्या दिसण्या-वागण्याने कसे प्रभावित झालोत आणि तुमच्यात नि त्यांच्यात निवड करणे कसे अवघड आहे, हेही कळवले होते. गांधींच्या मते, अशी निवड करणे योग्य नाही. दोघांचीही तत्त्वे पाळणे हा त्यावर उपाय आहे. सारखी-सारखी युरोप ते हिंदुस्थान अशी ये-जा करणे व्यवहार्य नाही. थोड्या काळासाठी इथे येऊन काहीच साध्य होणार नाही. तुला आईची जबाबदारी पार पाडायची आहे, तर तिथे राहून नोकरी करणे श्रेयस्कर आहे. तिथे इथून दूर राहूनदेखील तू इथे येऊन जे काम करशील, ते करता येईल. मनात फक्त इथल्या कामाचे स्मरण ठेव. त्याबद्दल विद्यार्थ्यांशी बोल. तिथे मिळवलेले पैसे तुला वाटले तर इथल्या हरिजनसेवेच्या कामासाठी पाठव.

दरम्यान, तिने इकडे यायचा निश्चय पक्का केला होता. तिच्या विद्यार्थ्यांना अहिंसा वगैरे फारसे पटत नव्हते. जर्मनीत ज्यूविरोध वाढत होता. प्रवासावर बंदी येण्याअगोदर तिथून बाहेर पडायचा निर्णय तिने घेतला. गांधींनी तिला तिथेच आपल्या देशावासीयांबरोबर राहून त्यांची साथ देण्यास सुचवले होते. ‘इथे येऊन नोकरी करून आश्रम-जीवन जगता येणार नाही. इथे सर्वस्वाने झोकून सेवाभावाने काम करणे अपेक्षित आहे. आईजवळ राहून तिची सेवा महत्त्वाची आहे. इथे जसं जीवन जगली असतीस, तसेच तिथे साधे शाकाहारी जीवन जगत राहा. इथं येऊन पैसे कमावून आश्रम-जीवन शक्य नाही. तू तुझ्या आजवरच्या पत्रांत फक्त माझ्याबद्दल काय वाटते ते लिहिले आहेस. तसं लिहू नकोस. तुझे विद्यार्थी, विद्यापीठातले अनुभव, तुझे सहकारी यांविषयी लिही. यायची घाई नको. फार उतावळेपणाने निर्णय घेऊ नको. गीता वाचतेस ना?’ परंतु हे पत्र मिळायच्या अगोदरच तिने बोटीत पाय ठेवलेला होता. जर्मनीत ज्यूंवर बंधनं यायला सुरुवात झाली होती. तिला तिचे इतर सहकारी ‘अर्धी आशियाई’ म्हणून हिणवू लागले होते. तिला गांधींबद्दल अनिवार आकर्षण वाटत होते. ते त्यांच्या लक्षात आलेच होते, त्यामुळे त्यांनी तिला वर्धा येथे न पाठवता साबरमतीलाच हरिजनसेवेत समाविष्ट करून घेण्यास नारायणदासांना कळवले.

ती हुशार आहे, पण उतावळी आहे. तिचे भाषाज्ञान उत्तम आहे. त्याचा वापर मुलांना इंग्रजी शिकवायला करता येईल, असेही सुचवले. इथे येताच ती थेट पुण्याला जाऊन येरवड्याला गांधीजींकडे जाऊन पुन्हा पारावर बसायची विनंती केली. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन तिने आश्रम निवासाच्या शपथा घेतल्या. गांधीजींनी तिला ‘अमला’ हे नाव दिले. तिची सहकारी म्हणा, टीकाकार म्हणा- निल्ला नगिनी (जिच्याविषयी ह्या सदरात लिहिलेय) तिच्याबद्दल ‘जिचे अजून कुणी चुंबनही घेतलेले नाही अशी स्त्री’ असे वक्तव्य केले होते. अमलाला- मार्गारेटला- गांधीजी म्हणाले होते, ‘‘निल्ला नागिनी ही पतिता होती, आता संत झालीय. तिचा आदर्श तू ठेव.’’

त्या दोघी जणी गांधींना भेटायला बरोबरच जात असत. एकदा त्या दोघी आणि निल्लाचा छोटा मुलगा गांधींकडे गेले, तेव्हा छोटा सिरिओस महादेवभार्इंच्या अंगावर चढत होता. मार्गारेटने धसमुसळेपणाने त्याला खाली ओढले. ते पाहून गांधींना राग आला. त्यावर ती म्हणाली, ‘‘मी माझ्या कुत्र्याला असेच वागवते. ती निल्ला ही ढोंगी आहे. तिची पुरुषांना फूस लावून, नादी लावण्याची सवय गेलेली नाही. ती माझी मैत्रीण होऊ शकत नाही.’’ ते ऐकून तर त्यांना खूप अस्वस्थ वाटले. मार्गारेटला साडी नीट नेसता यायची नाही. त्यामुळे बहुधा ती पाश्चात्त्य वेषात असे. साडी नेसली तरी साडीचा बोंगा जमिनीवर लोळत असे. मातीत मळत असे. ती कधी स्वच्छ कपड्यांत दिसली नाही. सदा चिडचीड करायची. आश्रमातील कामासाठी वेळवर यायची नाही. आली की, मग जीव ओतून काम करायची. तिने जाहीर केलं की, मी आपलं जीवन गांधीजींसाठी खर्च करणार आहे. माझ्या साऱ्या वस्तू आश्रमाला देऊन टाकेन. त्यांना ज्या नको असतील त्या फेकून न देता, ज्यांना त्याची गरज आहे त्यांना देऊन टाकाव्यात. माझ्या अंतिम क्रियेसाठी खर्च नको म्हणून मी माझा देह ससून हॉस्पिटलला देऊन टाकलाय. ते करावे.

मार्गारेट- अमला ही मनाने नि उद्दिष्टाने प्रामाणिक होती. पण गांधींजवळच राहायला मिळावं, हा तिचा अट्टहास पुरा होणं अशक्य होतं. तिचे वागणे सुधारणे हा गांधींच्या जीवनातला प्रमुख उद्देश होऊ शकत नव्हता. गांधींसाठी आपण प्राण देऊ, वगैरेेंसारखी भाषा ती करीत असे. गांधींनी एकदा काही कारणाने उपोषण केले तर ती अडून बसली की, त्यांनी तसे करू नये. गांधी अर्थातच निश्चयाचे पक्के होते. तर, हिने त्यांच्या विरोधात उपोषण आरंभले. गांधी म्हणाले, ‘‘करू दे तिला उपास, जरा वजन कमी होईल.’’ अर्थातच दोन दिवसात तिने ते मागे घेतले. ती त्यांना पत्र लिहिताना ‘तुमची अनुयायी’ अशी सही करीत असे. त्यावर त्यांनी तिला चिडून लिहिले, ‘प्रिय अमला बेटी, तुझे वागणे दिवसेंदिवस वेडेपणाचे होत चालले आहे. कधी तर मूर्खपणाही करतेस. तू एवढी ताळतंत्र सोडून वागशील, असे वाटले नव्हते. तू अत्यंत संशयी नि अतिउतावळी बनत चालली आहेस. तुला कुणी सांगितलं की, तुला मी परक्यासारखी वागवतो? तू स्वत:ला माझी अनुयायी म्हणवतेस, पण माझं अनुयायीपण कुणीच करू नये. मी स्वत:च स्वत:ला अनुसरतो. त्याहून अधिक ओझं मला नकोय. मला अनेक पुत्र-पुत्री, भगिनी, बंधू आहेत नि हव्या आहेत. अनुयायी नकोत. ही कसली अनुयायी, जी आपल्या गुरुवरच शंका घेते! तुला जर युरोपियन पद्धतीने जगायचे असेल तर ते निश्चयाने कर, अन्यथा इथल्यासारखे स्वीकार. एकदाचे जे काय हवे ते ठरव. सारखी दोलायमान मन:स्थिती ठेवू नकोस. माझ्या सहवासाची अपेक्षा करीत असशील, तर लक्षात ठेव- ते अशक्य आहे. कल्पना कर- तुरुंगात माझ्यासमवेत त्याच वऱ्हांड्यात अनेक कैदी असतात, म्हणजे ते माझ्याबरोबर असतात का? शरीराने बरोबर असणे म्हणजे ‘सह’ असणे नाही. तू जिथे असशील तिथे माझे काम करीत असशील तर माझ्या ‘सह’च आहेस, हे ध्यानी ठेव. माझ्यासाठी मरायची भाषा भित्रेपणाची आहे. तुझ्यावर कुणीही दडपण आणत नाहीये. जो निर्णय घ्यायचाय तो शूरपणाने व हिमतीने घे नि ठामपणे त्याप्रमाणे वाग.’

याचदरम्यान मार्गारेट-अमलाने एका जर्मन नियतकालिकासाठी गांधी आणि त्यांची स्त्रीविषयक धारणा यावर लेख लिहिला. त्यात तिने लिहिले की, गांधींना स्त्रीचा आत्मा कळला आहे. त्यांची स्त्रियांच्या आत्मिक शक्तीवर भिस्त आहे. त्याग, निष्ठा, भक्ती या सर्वच बाबतींत स्त्रिया पुरुषांहून अधिक श्रेष्ठ आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्या मानवजातीच्या सशक्त अर्धांगिनी आहेत, अबला नाहीत- असे त्यांचे मत असल्याचे नोंदवले आहे.

गांधीबद्दलचे तीव्र आकर्षण नि आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचंय ह्याबाबत अनिश्चितता, या वादळात अमला हिंदोळत होती. तिला विवाह करून स्थिरावण्याची मनीषा होती. मुलंबाळं-संसार ह्याकडे तिचा कल वाढत होता. ह्याच वेळी गांधीजींचा थोरला मुलगा हरिलाल ह्याने आपल्या धाकट्या वहिनीकडे, पत्नीच्या निधनानंतर एकाकीपण असह्य होत असल्याने पुनर्विवाह करायची इच्छा व्यक्त केली होती. वडिलांशी संबंध थोडे ठीक होऊ लागले होते. त्यांच्या कानी हे गेल्यावर हरिलालने एखाद्या विधवेशी विवाह करायचा विचार करावा, असे सुचवले. इकडे अमलालाही लग्नाची इच्छा होती. अमलाशी महादेवभार्इंनी बोलावे, असे हरिलालने सुचवले; पण गांधी म्हणाले, ‘‘त्याने स्वत:च लिहावे. किंवा महादेवभार्इंना स्वत:हून वाटले तर त्यांनी तिच्याकडे चौकशी करावी. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. माझे नाव घेऊ नये.’’ हरिलाल व अमलाची भट कधी तरी झालेली असावी, पण ठोस पुरावा नाही. हरिलालची पणती आणि त्याची चरित्रकार हिने लिहिलेय की- त्या दोघांचा पत्रव्यवहार झाला होता, पण तिच्या पत्रातील काही मजकुरावर दोघांचे पटले नाही, हरिलालला तिचे लिहिणे आवडले नाही. हरिलालला वडिलांनी लिहिले, ‘तिच्या पत्रावरून घाईने निर्णय घेऊ नकोस. तू हा विचार सोडून द्यावास. तू तिला स्पष्टपणे लिहावेस की, पुढे मुलंबाळं झाल्यावर ती साधेपणाने वाढतील. जे काही देवाच्या दयेने कमवाल, त्यात राहा. तू पुन्हा पिऊ लागलास वा माडीवर जाऊ लागलास, तर तिने तुला तत्काळ सोडावे. तिला जोवर तुझ्याखेरीज राहता येणार नाही असे वाटून ती तुला तसे लिहीत नाही, तोवर वाट पाहा.’

त्यानंतर त्या दोघांत काय झाले, हे कळत नाही. कारण ती अचानक शांतिनिकेतनमध्ये फ्रेंच शिकवायची नोकरी घेऊन निघून गेली. तिथले वेगळे प्रसन्न वातावरण, सौंदर्यासक्त कवीच्या सहवासात शिकवण्यात ती चांगलीच रमली. छान साड्या नेसू लागली. बरं दिसायचा प्रयत्न करू लागली. गांधींचे विचार, जीवनशैली तिने टाकून दिली. जणू त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेर पडून तिने आपल्या स्वभावानुसार मोकळा श्वास घेतला. पण तिथेही ती फार काळ राहिली नाही. तिथून ती मुंबईला चांगल्या पगाराच्या नोकरीवर रुजू झाली. परत जर्मनीला जाण्याची, आईला भेटायची व इथे आणायची स्वप्नं रंगवू लागली. स्वत:ला अमलावजा मार्गारेट म्हणवून घेऊ लागली. गांधीजी आणि तिच्यातील पत्रव्यवहार आता ताणरहित होत गेला. आईची व तिच्या पाळीव कुत्र्याची चौकशी, तिच्या कॉलेजातील सहकारी, तिची प्रकृती अशा साध्या गोष्टी ती लिहीत असे. त्यांचं तिला लिहिलेलं अखेरचं पोस्टकार्ड- त्यावर ते लिहितात, ‘अखेर तू स्थिरस्थावर झालीस म्हणायचं.’ अखेर तिने बडोद्याच्या महाराणी विद्यालयात नोकरी धरली. तिथेच मुख्याध्यापिका झाली, 1968 मध्ये 13 जूनला गांधींच्या आठवणी लिहायच्या अपुऱ्या ठेवून मुंबईतच वारली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात