डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

गांधींना तिचं कौतुक किती करू-किती नको, असं झालं होतं. त्यांच्या देहबोलीतूनही ते प्रकट होत होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक डौल होता, कामुकता होती नि विलक्षण आत्मविश्वास होता, जो सहचरी म्हणून गांधींना आवडत होता. सभांव्यतिरिक्तही दोघे तासन्‌तास बोलत बसत असत. तिचं अवतीभवती असणं त्यांच्यातील चैतन्याला पूरक होत होतं. तिचं काव्य, तिचं गाणं, तिचं सहज वावरणं- हा सामान्यांसाठी एक धडा होता. गांधीजींना आपली ही नवी अनुयायी स्वजनांना दाखवायची घाई झाली होती. सर्वांना तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या जादूने ती भारून टाकील याची त्यांना खात्री होती. पण झाले उलटेच! त्यालाही त्यांचाच उतावळा स्वभाव कारणीभूत ठरला. तिला आश्रमात नेऊन आपली जीवनशैली, तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयोग त्यांना दाखवायचा होता. पण तिथे गेल्यावर दोघे जण एकमेकांच्या प्रेमात पार बुडाले. सतत परस्परांच्या सहवासाखेरीज त्यांना काही सुचत नव्हते.

गांधींचे पाऊल घसरू शकते? ते कुणा स्त्रीच्या प्रेमात पागल होऊ शकतात? सारं-सारं विसरून तिच्यासाठी तळमळू शकतात? महात्मा गांधी आपली सारी तत्त्वं गुंडाळून टाकून आपलं सर्वस्व ‘तिच्या’पायी पणाला लावू शकतात? हो! अगदी खरं सांगायचं, लिहायचं तर- हो! मोहनदास करमचंद गांधी नामक 55 वर्षांचा माणूस, 48 वर्षीय सरलादेवी नामक देखण्या, बुद्धिमान, स्वतंत्र वृत्तीच्या, बंगाली भद्रलोकांतील स्त्रीच्या प्रेमात चक्क पागल होऊ शकतात? फार कडक वाक्यं वाटतात ना? त्रास देतात ना ही वाक्यं? मग घरच्यांना, स्वजनांना किती तगमग सोसावी लागली असेल- आपण कल्पना करू शकतो? त्यांच्या विरोधकांच्या हातात कोलित मिळाले असेल ना? तेव्हा नि आताही!! जे होतं ते स्पष्टपणे, खरं-खरं सांगायचं- हा त्याचा बाणा होता ना? मग ते सत्य कितीही कटू, पीडादायक असलं, त्याचे परिणाम दाहक असले; तरी हा माणूस ते जगजाहीर करून सोडणार!

हे सारं लक्षात घेऊनच हा माणूस समजून घेणं भाग आहे. जे घडलं ते खरंय, विरोधकांचं षडयंत्र नाही. हे घडलं, कारण गांधी माणूस होते. राग-द्वेष, विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दलची ओढ असणं स्वाभाविक होतं. काही काळ ते बहकले होते, असं म्हणायलाही जागा आहे. देहभान हरपून ते तिच्या सहवासात, गप्पांत रंगून जात असत. पण शारीरिक आसक्तीत त्यांनी त्याचं रूपांतर होऊ दिलं नाही. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ‘वेळेवर सावरलो नसतो, तर तो क्षणदेखील दूर नव्हता.’ असं खुल्लम्‌खुल्ला सांगणाऱ्या माणसाचं करायचं काय? जे घडलं ते समजून घ्यायचं, एवढंच आपल्या हाती राहतं नि तेच आपण करणार आहोत. वास्तविक संपूर्ण गांधीचरित्रात त्या घटनेला फूटनोट इतकंसुद्धा महत्त्व नाही. असं असेल, तर मग आपण तरी कशाला हे उकरून काढत आहोत? माझ्या दृष्टीने गांधी हा माणूस कणभर समजायला उपयोग होईलसं वाटतंय, म्हणून!

‘बंगाली वाघीण’ हा शब्द जिच्या दिसण्याला लागू पडेल, असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं. धनाढ्य नि अभिजन घराण्यात तिचा जन्म झाला होता. बंगालचे प्रथम घराणे म्हणावे इतके त्या घराण्याच्या नावाला ग्लॅमर नि त्याचा दबदबा होता, जोरासांकोचे ठाकूर घराणे हे साहित्य, कला, धनसंपत्ती, प्रसिद्धी सर्वच बाबतींत चर्चेत असलेले होते. त्यांच्या घराण्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कलागुणांनी, स्वतंत्र बाण्याने देश-विदेशात आपला ठसा उमटवला होता. रवींद्रनाथांच्या थोरल्या बहिणीची ही एकुलती एक कन्या. स्वर्णकुमारी आणि जानकीनाथ घोषाल हे माता-पिता सामाजिक, राजकीय व साहित्यिक जीवनात रमलेले, नाव केलेले दांपत्य. श्री.घोषाल हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या दोन अधिवेशनांचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. आई स्वर्णकुमारी ही साहित्यिक होती. वृत्तपत्रांतून नियमितपणे लेखन करीत असे.

सरलादेवीला क्रांतिकारक विचारांचे जबरदस्त आकर्षण होते. त्यामुळे बंकिमचंद्र, भगिनी निवेदिता, विवेकानंद ही तिची दैवतं होती. क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी तिने एक समितीही तयार केली होती. ती अत्यंत मनस्वी होती. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की, ती तडीला नेल्याखेरीज तिला चैन पडत नसे. गांधीजींशी भेट झाली ती ते दक्षिण आफ्रिकेहून परतल्यावर झालेल्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात. तिथे तिने गांधींना पाहिले, ऐकले. त्याच सुमारास तिची भेट एका धनाढ्य जमीनदार पंजाबी व्यक्तीशी झाली. तिचा स्वभाव पाहता ती संसारात पडेल, अशी शक्यताच नव्हती; पण रामभुज दत्त चौधरी ह्या व्यक्तीने तिला भारावून टाकले. त्याच्या पंजाबी संस्कृतीत ती पार बुडाली. पंजाब तेव्हा घटनांचे केंद्र झाले होते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर तर घडामोडी वेगाने होऊ लागल्या. रामभुज चौधरी हे यंग इंडियात नि नवजीवनमध्ये लेखन करू लागले. लाहोरमधील त्यांचे घर हे राजकीय कार्यकर्त्यांचे केंद्र बनले. त्याच वेळी तेथील स्थिती समजून घ्यायला गांधीजी पंजाबला आले. सारी जनता त्यांना ऐकायला, पाहायला जमू लागली. तो माहोलच संमोहित करणारा होता. लाहोर नि चौधरींचे घर म्हणजे राजकीय घटनांची काशी झाली होती. चौधरी जोडपे गांधींबरोबरच तिथला दौरा करणार होते, पण रामभुजना अटक झाली आणि सारं काम सरलादेवींवर पडलं. तिथेच दोघांना मदनबाधा झाली. तुम्ही म्हणाल, मी काय रोमँटिक कहाणी लिहितेय का? उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असं आहे.

सगळाच घोळ थोडाफार तसाच होता. काही काळानंतर सरलादेवी आपल्या पतीहून वेगळ्या झाल्या (त्याला गांधींबद्दल वाटणारं आकर्षण कारणीभूत नव्हतं), तोवर त्या जोडप्याला एक कन्या झालेली होती. लाहोर नि सारा पंजाब हे दोघे दौरे करून लोकांशी संवाद साधत होते. गांधींना ऐकायला नि चौधरानीला पाहायला नि ऐकायला लोक गर्दी करत होते. दोन्ही गोष्टी श्रवणीय नि प्रेक्षणीय नक्कीच होत्या. लोकांना देशप्रेमाचा, ब्रिटिशांच्या चालबाजीचा परिचय होत होता. स्वातंत्र्यप्राप्तीचा नवा नि त्यांच्या आवाक्यात येईल असा मार्ग दिसत होता. संपूर्ण पंजाब प्रांत हा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर संतापाने खदखदत होता. त्यावर मलम लावायचे काम गांधीजी करीत होते. पण सरलादेवीच्या आकर्षणात स्वत: अंतर्यामी आकंठ बुडालेले होते. त्यांचे हे काही मी ‘कही-सुनी’ लिहीत नाहीय. ‘आपल्याला  तिच्याशिवाय काही दुसरं सुचत नसल्याचे’ त्या प्रेमी जीवांनी, गांधींनीही नोंदवून ठेवलंय.

तिचे दिसणे, लिहिणे, गाणे, वागणे, तिचा पोशाख सगळ्यातच त्यांना एक दैवी प्रसाद असल्याचे जाणवत होते. ती विजेसारखी प्रकाशमान होत होती. त्यांना ऊर्जा देत होती. अशी सहकारी- जी सर्वच दृष्टीने त्यांना साथ द्यायला साजेशी- देखणी, कामसू, स्वतंत्र प्रतिभेची स्त्री त्यांना लोभावत होती. लोकांना काय वाटेल- इतर सहकाऱ्यांना, आपल्या साध्यासुध्या- भारतीय नारीची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या बायकोला, मुलांना काय वाटेल- याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नसेल? नवथर तरुण प्रेमाने कावरेबावरे झालेले आपल्याला ठाऊक आहेत... पण जागतिक कीर्तीचा, साऱ्या जगाचं लक्ष ज्यावर केंद्रित झालंय व जो एका बलाढ्य शक्तीशी अहिंसक मार्गाने लढा देतोय, नैतिकतेचे धड लोकांना देतोय, स्वत:ही तसेच जगतोय; तो इतका स्वत:ला हरवून बसेल? तारतम्य गमावून बसेल? हे अशक्य वाटेलसे होते, पण सत्य होते!

केवळ पंजाबच नव्हे, तर त्यानंतर तर त्यांनी साऱ्या देशाचाच दौरा तिच्यासह काढायची योजना कार्यान्वित केली. सरलादेवी चौधरानीने गांधींच्या आवडत्या प्रयोगाला मूर्त रूप दिले. त्यांच्या अनेकानेक कल्पनांमध्ये खादी हे एक महत्त्वाचे तत्त्व होते. ग्रामविकासातले, ग्रामीण स्त्री-पुरुषांना आत्मनिर्भर करण्याचे हे खरोखरीच एक असामान्य हत्यार होते. गांधीजींच्या प्रतिभेतून अशा अनेक क्रांतिकारी आणि व्यवहार्य संकल्पना लोकांसमोर येत. त्या काळच्या गरीब पण सत्त्वनिष्ठ समाजातील लोकांना हे आदर्श आपल्याला झेपतील असे आहेत असं वाटत होतं नि ते त्यांनी करून दाखवलं. घराबाहेर न पडावे लागताही सूत कातता येते, त्याचे वस्त्र विणून ते विकता येते- हे लोकांना माहिती नव्हते की काय? पण या कल्पनेला देशभक्ती, स्वातंत्र्याच्या लढ्याशी गांधींनी जोडलं. त्यातच विदेशी वस्त्रांनी आणि प्रामुख्याने युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीने वस्त्रोद्योगाची गती व व्यापाराची गरज वाढली होती. त्यातून वसाहतींमधील बाजार ब्रिटिशांना आकर्षित करत होता. सत्तेच्या पाशवी शक्तीचा वापर करून, त्यांच्या कापडाची विक्री त्यांनी हिंदुस्थानात सुरू केली. साहजिकच इथले पिढ्यान्‌पिढ्यांचे विणकर बेकार होऊ लागले. साऱ्या उद्योगालाच ग्रहण लागले. त्यामुळे स्वदेशी वस्तूंचा वापर हे भावनिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तनाचे साधन बनू लागले. गांधीजींनी त्याला तात्त्विक अधिष्ठान दिले.

नुसते खादीबद्दल बोलणे नि त्याचे प्रतीक बनणे, ह्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. खादी सिल्क हे अभिजनांना वापरायला उचित नि त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे वाटत होते. पण केवळ त्यांच्या वापराने सामाजिक बदल नि संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात जाणं शक्य नव्हतं. ती सर्वसाधारणांच्या वापराची गोष्ट होणे गरजेचं होतं. ही बाब गांधीजींनी सरलादेवीला समजावून सांगितली. नेहमी उच्चभ्रूंच्या स्टायलिश वेषात, निवडक दागिन्यांत वावरणाऱ्या सरलादेवीला जाडीभरडी, वजनदार खादीची साडी नि ब्लाऊज वापरणे अवघडच वाटत होते. तिने आपल्या रविमामालाही विचारले, ‘‘मी काय करू?’’ मामाचं उत्तर होतं, ‘‘नेसून बघ. त्या वजनात तुला सहज वावरता येईल असं वाटलं, तरच वापर. कुणाच्या दडपणाखाली नको वापरूस, तू काहीही वापरलंस तरी तू छानच दिसशील.’’ गांधींच्या ध्येयाला आपल्या खादी-वापराचा नक्कीच उपयोग होईल, शिवाय साऱ्या देशभर प्रसार होईल- या विचाराने तिने प्रचारसभांमध्ये खादीचाच वेष करून जायला सुरुवात केली. एक देखणी, गोड आवाजाची, तडफदार लिहिणारी-बोलणारी कलकत्त्याच्या अभिजनांतील स्त्री पाहून लोक भारावून गेले. ती खादी प्रचाराची प्रतीक बनली. वृत्तपत्रांत नि समाजमनात सर्वत्र तिचा बोलबाला होऊ लागला.

गांधींना तिचं कौतुक किती करू-किती नको, असं झालं होतं. त्यांच्या देहबोलीतूनही ते प्रकट होत होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक डौल होता, कामुकता होती नि विलक्षण आत्मविश्वास होता; जो सहचरी म्हणून गांधींना आवडत होता. सभांव्यतिरिक्तही दोघे तासन्‌तास बोलत बसत असत. तिचं अवतीभवती असणं त्यांच्यातील चैतन्याला पूरक होत होतं. अशी सहकारी मिळाल्याने ते मनोमन खूश होते. तिचं काव्य, तिचं गाणं, तिचं त्या जाडजूड खादीत सहज वावरणं- हा सामान्यांसाठी एक धडा होता. गांधीजींना आपली ही नवी अनुयायी स्वजनांना दाखवायची घाई झाली होती. सर्वांना तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या जादूने ती भारून टाकील, याची त्यांना खात्री होती. पण झाले उलटेच! त्यालाही त्यांचाच उतावळा स्वभाव कारणीभूत ठरला. तिला आश्रमात नेऊन आपली जीवनशैली, तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयोग त्यांना दाखवायचा होता. पण तिथे गेल्यावर दोघे जण एकमेकांच्या प्रेमात पार बुडाले. सतत परस्परांच्या सहवासाखेरीज त्यांना काही सुचत नव्हते.

आश्रमाच्या शिस्तीप्रमाणे भोजनवेळी सर्व जण एकत्र जेवायला बसत. या दोघांची व्यवस्था सर्वांबरोबरच होती. सर्व जण एकत्र बसले. प्रार्थना वगैरे झाल्या. दोघांना निरोपही गेला. पण दोघे एकमेकांशी बोलण्यात इतके गर्क होते की, त्यांनी त्याकडे सरळ दुर्लक्षच केले. मगनलाल, महादेवभाई वैतागले. त्यांना हे फारच खटकले, पुत्र देवदासही खट्टू झाला. बापूंनी शिस्त मोडावी? हे आजवर कधीच झाले नव्हते. आधीच तिथल्या लोकांना ही स्त्री आपल्यातली वाटत नव्हती आणि ती तशी नव्हतीच मुळी. अखेर गांधींच्या हे सारे लक्षात आले. हे प्रकरण हाताबाहेर जाणार नि आपल्या साऱ्या विचारविश्वावर, आपल्या निरिच्छेच्या बोलण्यावर कुणाचा काही विश्वासही बसणार नाही. आपण वासनेत बुडालेला एक प्राणी बनून राहू. आजवर कमावलेली राजकारण-समाजकारणाची पुंजी चुटकीसारशी मातीमोल होईल, हे त्यांना क्षणार्धात उमगले. या विजेसारख्या स्त्रीत्वाने साऱ्याची राखरांगोळी व्हायला वेळ लागणार नाही, हे आश्रमातील नाराजीच्या एका सुराने स्पष्ट केले. त्यांनी आपल्या वागण्याची सगळ्यांसमोर बिनशर्त माफी मागितली. आपण बोलण्याच्या नादात वाहवत गेलो, अशी कबुलीही दिली. शिस्त मोडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

सरलादेवी आणि गांधींमधले मानसिक अंतर हळूहळू वाढत गेले. एके काळी ती साऱ्या लक्ष्मणरेषा उल्लंघायला तयार होती, पण गांधींसाठी ते शक्य नव्हते. त्यांच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या होत्या. तिने आपले प्रेम स्वच्छ शब्दांत व्यक्त केले होते. ती शक्तीची उपासक होती, त्यामुळे एक शस्त्र म्हणून अहिंसा तिला मान्य होती; पण त्यालाच ती घट्ट धरून बसणारी नव्हती. सारी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी गांधींना सारे सावरायचे होते, परंतु तिला त्यांचे प्लेटॉनिक लव्ह वगैरे मान्य नव्हते. मुलाचा- देवदत्तचा विरोध गांधींना टोचत होता. ‘सरलादेवी माझी आध्यात्मिक पत्नी आहे’ हे वाक्य सर्वांनाच मानवणे शक्य नव्हते. संपूर्ण शरणागती दोघांपैकी एकाने वा दोघांनी स्वीकारण्याला पर्याय नव्हता. या साऱ्या घटनांत त्या दोघांनी शारीरिक मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. पूर्ण संयम पाळला होता. त्यांनी तिला पत्रांतून खूप समजावले. ‘शांतपणाने, समंजसपणाने  वाग. आपल्या प्रेमाच्या आणि मैत्रीच्या माणसात संत वा पापी असे विभाजन नसते. त्यामुळे तुझ्यासाठी माझ्या हृदयातलं स्थान कायम ठेवीन. पश्चात्तप आणि विनम्रतेसाठी सतत प्रार्थना करीन.’ पण तिच्या स्वभावाबद्दल काही टिपण्णी केली, ती तिच्या जिव्हारी लागली. तिला त्यांची असहकाराची कल्पना मुळीच मान्य नव्हती. त्यांनी तिला चौथीतली मुलगी समजून नेहमी उपदेश करणं तिला आवडत नव्हतं. या नात्याची मर्यादा तिच्याही लक्षात आली. त्यानंतर दूर व्हायचं ठरवून ती कलकत्त्याला गेली. मुलगा दीपक तिच्याबरोबर असे. इथून गेल्यावर काही काळ ती काम करीत राहिली, पण नंतर तिची प्रकृती ढासळत गेली. ती 1945 मध्ये वारली. गांधीजींच्या जीवनात ती विजेसारखी तळपून लखलखून मावळली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Prashant Arwey- 27 Jul 2020

    गांधींचे हे प्रेम प्रकरण संजीवनी खेर यांनी इतक्या हळुवार हाताळले की त्याला केवळ अप्रतिम असे म्हणता येईल पण गांधींच्या या वागण्याचे किंवा ब्राम्हचर्या चे प्रयोगाचे समर्थन कसे करावे कळत नाही.....

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात