Diwali_4 जे वेड मजला लागले : म्युरल लेस्टर
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

ती तिच्या तरुण भाच्यासह साबरमतीला 1926 मध्ये दाखल झाली. ते गांधीजींच्या 57 व्या वाढदिवसाच्या दिवशीच आश्रमात पोहोचले. तेथील वास्तव्याचे सविस्तर वर्णन तिने ‘माय होस्ट- द हिंदू’ या पुस्तकात केले आहे. कल्पना करा- लंडनमध्ये (मुळातल्या गर्भश्रीमंत) साध्या राहणीमानातल्या स्त्रीलाही सांस्कृतिक धक्के बसावेत, अशी हिंदुस्थानातली परिस्थिती होती. साबरमतीची शिस्त नि दिनक्रम जड जाणारा होता. खाण्या-पिण्याच्या सवयी (शाकाहारी असली तरी), खाण्याची पद्धत इथपासून ते दिनक्रमातील खाण्याच्या वेळा, त्यातील पदार्थ, कपडे धुणे (नदीच्या पाण्यात), न्हाणीघर, अंघोळीचं पाणी वापरायची पद्धत, शौचालय इत्यादी सारेच कधी कल्पनाही केली नव्हती असे होते. उन्हाळा, झोपायची व्यवस्था- सारेच अवघड जाणारे होते.

सुखात लोळायचे सोडून काही व्यक्तींना- सामान्यांच्या शब्दांत-‘भिकेचे डोहाळे’ का लागतात, कोण जाणे? मस्त प्रासादतुल्य निवास, भोवताली लोभस निसर्ग, घरातली माणसं प्रेम वर्षावणारी, सदाचारी... कशाला कमी नाही. शिक्षण मनासारखे चाललेले, तरुण वयाचा अमाप उत्साह. हेच तर मिळवण्यासाठी, उपभोगण्यासाठी माणसं जिवाचे रान करतात. सर्वांनाच ते साध्य होतं, असंही नाही. काही जन्मत:च सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येतात. दु:खाचा वारादेखील नाही असे वातावरण असून, आपणहून कोण  दारिद्र्य स्वीकारेल? पण तसंच झालं म्युरल लेस्टर या ब्रिटिश तरुणीबाबत. प्रेमभंग वगैरे झाला होता? काही ताणतणाव होते आयुष्यात? छे: हो!

खरे तर तिला चक्क भिकेचे डोहाळे लागले म्हणावं लागेल, कारण ती प्रासाद सोडून कामगारवस्तीत जाऊन राहू लागली! तिच्याबरोबर तिची धाकटी बहीण डोरिस होती. अगोदर नुसती जाऊन परत यायची, राहायची नाही. सामान्यांची आर्थिक स्थिती, मुलांची होणारी आबाळ, नोकरीची शाश्वती नसणं, त्यांची राहण्याची ठिकाणं, स्त्रियांची अवस्था- हे सारे पाहून त्यांचे मन द्रवत असे. त्यात महायुद्ध पेटले. मग तर हाल-अपेष्टांना पारावारच राहिला नाही. संपूर्ण युरोपच या महायुद्धाने होरपळू लागला. वस्तूंची टंचाई, तरुणांचे लष्करात भरती होणं यामुळे सामान्य जीवन असह्य होत होते.

हा काळ 1913-14 चा होता. स्वत:च्या श्रीमंती राहण्याचा तिला उबग येऊ लागला. सुटीसाठी बांधलेल्या आपल्या खासगी विशाल बंगल्याकडे जाताना तिला लंडनच्या सीमेवरील खेड्यातील लोकांचे जे दारिद्र्य दिसत असे, ते पाहून तिच्या मनात येई- ‘नाही, हे मुळीच न्याय्य नाही. काहींनी विलासात राहायचे आणि बाकीच्यांनी अन्नाला, निवाऱ्याला मोताद जगायचे- हा न्याय नाही.’ त्यातच तिच्या वाचनात रोमाँ रोलाँनी लिहिलेले गांधींचे चरित्र आले. टॉलस्टॉयचे वाङ्‌मय आले. त्यातून तिला नवा मार्ग सुचू लागला. ‘गॉड्‌स किंगडम इज विदिन युवर हार्ट’ हे तिला पटू लागले.

लेस्टर कुटुंब तसे धार्मिक वृत्तीचे होते. बाप्तिस्ट चर्चचे सदस्य होते. ख्रिस्ताची करुणा त्यांना आकर्षित करत होती. त्यातूनच गरिबांसाठी काही काम करावे, ही वृत्ती डोकं वर वाढू लागली. डाव्या विचारसरणीचे नेते काम करत होते. पण ते प्रत्यक्षात यायला एक पिढी गेली असती. म्युरलचा भाऊ याच विचारांचा होता, तो अकाली वारला. त्याने आपल्या संपत्तीचा काही भाग सामाजिक कार्यासाठी बाजूला ठेवला होता, त्यातून बहिणींनी एक ओस पडलेले चॅपल घेतले. लोकांनी ख्रिस्ताच्या विचारानिमित्ताने एकत्र यावे, असा विचार केला. लोकांना एकत्र करायचा हा त्यातल्या त्यात सोपा उपाय होता. त्या चॅपलमध्ये एक छोटेसे, साधेसे खाद्य पदार्थांचे एक दुकान नि गप्पा मारत निवांत बसता येईल अशी जागा तयार केली. तिथे येणाऱ्यांशी या दोघी बोलत, चर्चा करीत. सामान्य अवस्थेतील लोकांसाठी ही जागा म्हणजे मन मोकळे करायची आणि प्रश्नांचे निराकरण करायची हक्काची जागा झाली.

म्युरलचा सगळा रोख समन्वयाने समस्या सोडवण्याकडे होता. शांततामय मार्गाने लोकांनी एकत्र येऊन आपले म्हणणे मांडावे, समस्येची उकल करायचा प्रयत्न  करावा, असे उद्दिष्ट होते. त्यासाठी ती रात्रंदिवस प्रयत्न करीत असे. व्याख्यानं देत असे. अधिकारातील लोकांशी बोलत असे. भाऊ किंजले ह्याच्या स्मरणार्थ तिने मजूर वस्तीनजीक एक स्मारक हॉल बांधला. अगदी साधी, स्वस्तात राहण्याची सोय तिथे होती. संपकाळात आणि वस्त्यांचं नूतनीकरण करताना बेघर झालेले लोक काही काळ तिथे विसावू शकत होते. डिनम उपनगरात लेस्टर भगिनींनी दुसरा किंजले हॉल सुरू केला. संपकाळात श्रमिक संघटनेचे कार्यकर्ते तिथे राहत होते. देशी-विदेशी मोठमोठे व्याख्याते तिथे येऊन भाषणे देत होते. 

म्युरल 1914 मध्ये शांततेसाठी अधिक प्रयत्न करू लागली. ‘ख्रिश्चन पॅसिफिस्ट ऑर्गनायझेशन, द फेलोशिप ऑफ रिकन्सीलिएशन’ अशा संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. त्यांचे किंग्जले हॉलभोवतीचे काम इंग्लंडमध्ये महत्त्वाचे समजले जात होते. शांततेसाठी काम करणाऱ्या लोकांचा एक गट तिथे कार्यरत होता. ते सारे अत्यंत शिस्तबद्धतेने काम करत होते. गरिबीविरुद्ध काम करणारे हे लोक प्रार्थनेला  महत्त्व देत होते. स्वत:ही कमीत कमी गरजापूर्तीत राहत होते. पूर्व लंडनमधील मोठ्या इंडस्ट्रियल भागात हे किंग्जले हॉलचे काम सुरू होते. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा सर्वच प्रश्नांवर सभोवताली राहणारे नागरिकच मार्ग काढण्याकरिता झगडत होते. दहा सेवाव्रती कार्यकर्ते संपूर्णपणे हॉलमधील स्वयंपाक, स्वच्छता यांत मग्न असत. कुठलाही धर्म, वंश, वय, लिंग याचा विचार न करता विनाअडथळा, सुरळीतपणे व निरलसपणे काम करीत होते. आपण परमेश्वराच्या सान्निध्यात काम करीत आहोत, ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. 

म्युरलने गांधींना भेटावे, तेथील काम पाहावे, असे तेथे व्याख्यानासाठी आलेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या जावयाने सुचवले. ती साबरमतीला जाणार असली, तर ते (प्रा.गांगुली) सारी व्यवस्था करून देणार होते. ती तिच्या तरुण भाच्यासह साबरमतीला 1926 मध्ये दाखल झाली. ते गांधीजींच्या 57 व्या वाढदिवसाच्या दिवशीच आश्रमात पोहोचले. तेथील वास्तव्याचे सविस्तर वर्णन तिने ‘माय होस्ट- द हिंदू’ या पुस्तकात केले आहे. कल्पना करा- लंडनमध्ये (मुळातल्या गर्भश्रीमंत) साध्या राहणीमानातल्या स्त्रीलाही सांस्कृतिक धक्के बसावेत, अशी हिंदुस्थानातली परिस्थिती होती. साबरमतीची शिस्त नि दिनक्रम जड जाणारा होता. खाण्या-पिण्याच्या सवयी (शाकाहारी असली तरी), खाण्याची पद्धत इथपासून ते दिनक्रमातील खाण्याच्या वेळा, त्यातील पदार्थ, कपडे धुणे (नदीच्या पाण्यात), न्हाणीघर, अंघोळीचं पाणी वापरायची पद्धत, शौचालय इत्यादी सारेच कधी कल्पनाही केली नव्हती असे होते. उन्हाळा, झोपायची व्यवस्था- सारेच अवघड जाणारे होते. 

वास्तविक तिचे जीवनाविषयीचे विचार, प्रार्थनेचं बळ, गरिबांतील गरिबांशी असलेलं नातं, अहिंसेनं शांततेचा मार्ग शोधणं, जागतिक महासत्तांना आव्हान देणं हे गांधींच्या विचारांशी जुळतं होतं. तिला सकाळच्या म्हणण्यापेक्षा पहाटेच्या प्रार्थनेची सवय होती. ख्रिश्चन विचाराने जगणारे युरोपियन आणि अमेरिकन तरुण हे गांधी भारतात करीत असलेल्या राजकीय व सामाजिक कार्याने भारलेले होते. ते इथे येत होते. साबरमती हे त्यांच्यासाठी एक तीर्थक्षेत्र बनलं होतं. पण येथील अनेक गोष्टींशी जुळवून घेणं अवघड होतं. इथली हवा, ब्रेडशिवाय इतर- पोळी, भाकरी- खाणं इत्यादींशी जुळवून घ्यायला काही काळ नक्कीच लागला. मग असं काय होतं, जे त्या मंडळींना इथे बांधून ठेवत होतं? हे काही वैभवशाली समृद्ध संस्कृतीचा देश पाहण्यास आलेल्यांचं पर्यटनसुख नव्हतं. इथलं जीवन, माणसं, त्यांचे प्रश्न समजून घेणं त्यांना का गरजेचं वाटत होतं?

गांधींचं गारूड त्यांना इथे आणत होतं. त्यांचं दिलखुलास हसणं, स्वच्छ नजरेने जगाकडं-लोकांकडं पाहणं, तत्त्वनिष्ठा, जे बोलायचं तेच स्वत: करायचं, असीम करुणेने वागणं हे समोरच्याला अगदी स्पष्टपणे जाणवत असे. राजकारणी माणसांत असणारे छक्के-पंजे त्यांच्या वर्तनात अजिबात नव्हते. अप्रिय गोष्टी ते थेटपणे सांगत. निर्भयता हे त्यांचं शस्त्र होतं, जे दुर्बळाला बळ देत असे. युरोपियनांना गांधींचे वागणे समजून घ्यायची आवश्यकता नव्हती. स्वत:च्याच राज्यकर्त्यांविरुद्ध काम करणाऱ्या, उठाव करायला लोकांना प्रवृत्त करणाऱ्या या फाटक्या दिसणाऱ्या माणसाच्या बाजूने उभं राहणं, हा देशद्रोह नव्हता का? देशापेक्षाही सत्य मोठं समजणाऱ्यांनी असत्याविरुद्ध दंड थोपटले होते.

म्युरल आणि तिचा भाचा साबरमतीमध्ये तीन महिने राहिले. तिथल्या जीवनाशी- खास करून कस्तुरबांशी-त्यांचे चांगले सूत जमले. पाहुण्यांसाठी त्याच स्वयंपाक करायच्या. गांधीजींनी म्युरलला पहिल्या भेटीतच आपलेसे केले. तिने गेल्या-गेल्या पाहिलं की, सगळे जण पादत्राणं काढूनच अंगणात येत होते. लंडनवासीयांना या पद्धतीची माहिती असणं शक्य नव्हतं. तिची द्विधा मन:स्थिती पाहून बर्थडे बॉयने खुणेनेच ‘राहू दे’ असं सुचवलं. तिच्याजवळ येऊन आस्थेने तिच्या प्रवासाबद्दल विचारलं. या पहिल्या आस्थेवाईकपणातच तिला गांधींजींची आपुलकी उमगली होती. पण तिनेच इथली पद्धत पाळायचं ठरवलं. त्यांचा कामाचा झपाटा पाहून सगळेच चकित होत. लोकांशी भेटीगाठी घेण्यातून त्यांना तिच्याशी बोलायला वेळच मिळत नव्हता. पहाटेपासून त्यांचे फिरणे, प्रार्थना, लोकांना संबोधित करणे, चरखा चालवणे सुरू होई.

म्युरलला बेधडक जाऊन त्यांच्याशी बोलायचा धीर होत नव्हता. करता-करता तिच्या जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला. आता बोललंच पाहिजे, म्हणून गांधीजी आपल्या खोलीत चरख्यावर सूत कातत होते तेव्हा तिथे गेली. काही क्षण शांततेत गेले, मग धीर करून तीच म्हणाली, ‘‘तुम्ही आता इंग्लंडला आलेच पाहिजे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या अहिंसेने अजून ती उंची व यश मिळवलेले नाही की, मी त्याबद्दल तिथे येऊन फेलोशिप ऑफ रिकन्सीलिएशनच्या लोकांना काही सांगू शकेन.’’

त्यावर ती उत्तरली, ‘‘माझं म्हणणं हे नव्हतं की, तुम्ही आम्हाला काही शिकवावं; पण आमच्याकडून तुम्ही काही शिकावं!’’ त्यावर ते खळखळून हसले. असं कुणी शब्दांत पकडलं की, त्यांना मजा वाटत असे. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली. ते म्हणाले, ‘‘मी इंग्लंडला नक्की येईन, पण काही अटींवर.’’ त्या अटी तिच्याऐवजी तिच्या देशवासीय सत्ताधाऱ्यांनी पाळायच्या होत्या. तलवारीच्या धारेवर चालण्यासारख्या होत्या त्या अटी. ती आपल्याच लोकांना हे कसं सांगणार होती? ‘‘अट ही- तू सत्ताधाऱ्यांना सांग की, तुम्ही हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्या! इथला कापडाचा व्यवसाय मरू नये म्हणून तुम्ही लँकेशायरच्या उद्योगपतींना सांग की, तिथून तयार कापड पाठवू नका. इथला विणकर मरतोय!!’’ पण हे करायला असं बोलायला हवं, हे तिला पटत होतं; पण कसं? त्याचा मार्ग दिसत नव्हता. ‘‘याहून सोपी अट नाही का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘सरकारने अफू आणि दारूची पॉलिसी बदलायला हवी.’’ पॉलिसी बदलण्यासाठी अफूपेक्षाही दारूचे व्यसन घरादाराला बरबाद करत होते. गांधीजी म्युरलला म्हणाले, ‘‘दारूचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो, असे सरकार म्हणतं. हा पैसा वापरणं पापच नव्हे? समजा, असं म्हटलं की, तुमच्याकडे वेश्यावृत्ती कायद्याने मान्य करून त्यातील पैसा समाजकल्याणासाठी वापरणं अयोग्य आहे; तर चालेल? तुमच्या देशात जाऊन त्यासाठी लोकमत तयार कर.’’

बस्स! हा म्हटलं तर आदेश वा म्हटलं तर उद्दिष्ट मिळाल्यावर तिने आपले इथल्या वास्तव्याचे उरलेले दोन महिने देशभर हिंडून परिस्थितीचे गांभीर्य काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अस्पृश्य, कामगारांत,शेतकऱ्यांत अफू घेण्याचे प्रमाण खूप वाढले होते. बायका कामावर जाताना  लहान बाळाच्या जिभेवर अफूचे बोंड फिरवूनच बाहेर पडत. दिल्लीत ती जेन कॅम्पबेल या धडाडीच्या कार्यकर्तीला भेटली. तिला इथल्या लोकांविषयी प्रेम होतं. तिने अफूने वेड लागलेले लोक पाहिले. अफूसाठी तळमळणारे, ती घेतल्यावर वा न मिळाल्यावर अस्वस्थ झालेले स्त्री-पुरुष पाहिले होते. ती त्यांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा यत्न करीत होती. त्या वेळी म्युरलला जाणवले की, समस्या किती भीषण आहे! जोवर हे सारे कायदेशीर आहे, तोवर काही करता येत नव्हते. इंग्लंडला गेल्यावर काय करायचे- कसे करायचे, ते तिने निश्चित केले.

मग तर तिने तिथे लोकांसमोर हिंदुस्थानातील ही स्थिती जेव्हा संधी मिळेल तेव्हा सांगायला सुरुवात केली. कारखान्यांसमोर, रस्त्यांवरच्या चौकात, बागेत- जिथे कुठं लोक जमत तिथे तिने अफू नि दारू यांबद्दल सांगायला सुरुवात केली. लोकांची मते, भावना त्यामुळे बदलू लागल्या. ह्या प्रश्नाचे परिणाम किती भयंकर आहेत, माणुसकीला काळिमा फासणारे आहेत, हे ब्रिटिश सरकारातील सदस्यांच्या लक्षात येऊ लागले. आपले लोक तेथे न्यायाने राज्य करीत आहेत, असा त्यांचा समज होता. तेथील वर्तमानपत्रांत या प्रकाराबद्दल चर्चा होऊ लागल्या. मुळात म्युरलबद्दल, तिच्या शांततावादी-मानवतावादी कामाबद्दल लोकांना आदर होता. त्यामुळे तिने प्रत्यक्षदर्शी केलेले वर्णन लोकांवर परिणाम करू लागले.

त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जगभरातील नेते इंग्लंडला येणार होते. गांधीदेखील येणार होते. म्युरलच्या साध्या वसतिस्थानी- किंग्जले हॉलला ते येऊन राहणार, हे कळल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांचे बुकिंग तेथील सर्वांत महागड्या हॉटेलात केले होते, पण गांधींनी म्युरलच्या त्या कामगारवस्तीतील निवासस्थानी राहायचे ठरवले होते. साहजिकच जगभरचे नेते नि प्रतिनिधी यांची रीघ किंग्जले हॉलकडे वळू लागली. चार्ली चॅप्लिन त्यांना इथे येऊन भेटला. 

म्युरल आणि मीराबेनबरोबर गांधी सकाळी फिरायला बाहेर पडत. त्या गरीब वस्तीतील सामान्य कामगारांशी ते बोलत, त्यांचे बरे-वाईट समजून घेत. कधी त्यांच्या घरात जात, मुलांशी थट्टा-मस्करी करीत. त्या भागात फिरताना लंडनमधील गरिबी, त्या लोकांचे साधे राहणे, हॉलचा मनोरंजन, खेळ, व्याख्यानं, धार्मिक प्रवचनं यासाठी जो-जो वापर होत होता, त्याचे गांधींना खूप समाधान वाटले. लोकांनी एकत्र येऊन परस्परांना जाणून घ्यायची, विचारविनिमय करायची, स्त्रियांना कामाव्यतिरिक्त वा घरकामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यात सहभाग घ्यायची संधी मिळत होती. तेथील स्त्रिया ज्या प्रकारे आपले प्रश्न धीटपणे मांडत, लढ्याला सज्ज असत; ते पाहून आपल्याकडील स्त्रियांनीही चुलीपुढून उठून राष्ट्रकार्यात हिरीरीने यायला हवे, ही गांधींची जाणीव तीव्र झाली.

म्युरलने गांधीजींच्या कामाची माहिती स्वदेशवासीयांना लेखनातून आणि व्याख्यानांतून द्यायचा धडाकाच लावला होता. पुन्हा हिंदुस्थानात आल्यावर ती ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटत होती. त्या काळात तिने जालियनवाला बाग येथील हत्याकांडाच्या स्थळाला भेट दिली, तेव्हा शांतपणे विरोध करणारे शीख स्त्री-पुरुष नि मुलं पाहून तिचं मन भरून आलं. सत्तेने केलेला अत्याचार तिला विद्ध करून गेला होता. गांधींनी तिला सांगितले होते, ‘‘तू ब्रिटिश लोकांना त्यांच्या चुका दाखव, आमच्या अपेक्षा सांग, गरिबांची हालत सांग. जे प्रत्यक्ष दिसेल, आकळेल ते सत्यच लिही वा बोल. त्यांची बाजूदेखील त्यांना मांडू दे, मगच आपले मत ठरव. अन्याय्य गोष्टी त्यांना दिसू देत. ब्रिटिशांवर आमचा राग नाही तर तो ब्रिटिश सत्तेवर आहे, हे त्यांना समजावून सांग.’’

यादरम्यान तिने गांधींबरोबर देशभर फिरून अस्पृश्यतेचा प्रश्न, अहमदाबादचा संप, बिहारमधील भूकंप त्यांनी कसा हाताळला ते पाहिलं नि थक्क झाली होती. त्यानंतर नौखालीला झालेल्या हत्याकांडाच्या वेळी त्यांचा हिंदू-मुस्लिमांना समजावण्याचा एकाकी प्रयास खिन्नपणे नोंदवला आहे. ती आपल्या शांततेच्या कामात जगभर फिरत होती. जपान, चीन, व्हिएतनाम अशा अनेक देशांत युद्धोत्तर कामाचा तिचा झपाटा आश्चर्यकारक होता. शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी तिचे नामांकन दोनदा झाले होते. तिने भारतीय स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी जे प्रयत्न केले, या स्वत:च्याच सत्तेशी दोन हात केले; ते नक्कीच गांधीजींच्या सत्य, अहिंसा, समता, साधेपणा या गुणांनी मंडित होते. 

तिने आपले सारे जीवन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले. जगात शांतता नांदावी, लोकांनी सुखाने एकत्र राहावे यासाठी तिने जगभर दौरे केले. युद्धाने देशांवर केलेल्या जखमा, लहान मुलं व स्त्रियांचे हाल, तरुण पिढीची कत्तल  करून मिळालेला विजय कुठल्याच देशाला भूषणावह नाही याची विषण्ण जाणीव तिचं मन पोखरत होती. दि.11 फेब्रुवारी 1968 रोजी 85 व्या वर्षी ती चिरनिद्रेच्या स्वाधीन झाली. तिने ‘इट ऑकर्ड टू मी’, ‘माय होस्ट- द हिंदू’, ‘एन्टरटेनिंग गांधी’ अशी तीन पुस्तके लिहिली आहेत.  वयाच्या 80 व्या वर्षी ‘फ्रीमन ऑफ बरो ऑफ पॉपलर’ हा मानाचा सन्मान तिला दिला गेला. 

Tags: सदर म्युरल लेस्टर गांधींचे गारुड साधना गांधी महात्मा गांधी संजीवनी खेर muriel lester gandhinche garud mahatma gandhi sanjivani kher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात