डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पण का कोण जाणे,  ते नाते विवाहात  परिवर्तित झाले नाही. तिच्या आयुष्यात  पती, मुलं, संसार ही पोकळी कायम राहिली. गांधीजींशी जवळीक हवी होती;  पण ते उच्च नैतिकतेने वागत होते,  जे त्यांच्या दृष्टीने सहज होते. मीराबेन मात्र  त्यासाठी उत्कटतेने वाट पाहत असायची. गांधींच्या पायाशी राहावे,  त्यांची सेवा करावी हे तिला हवे होते;  पण हीसुद्धा एक  आसक्तीच होती. त्यांनी ही आसक्ती दूर  करायला सांगूनही तिला ते जमत नव्हते. तिचं आयुष्य एक चक्रव्यूह बनलं होतं. ती त्यात स्वेच्छेने शिरली. मीरेच्याच उत्कटतेने  तिने निवडलेल्या देवाच्या कल्पनेत रममाण  झाली. पण... तो वेगळ्याच दुनियेचा  रहिवासी होता. रोमाँ रोलाँने म्हटल्याप्रमाणे  ‘दुसरा ख्रिस्त’ होता. त्याच्या प्रत्येक  विचाराने ती भारावलेली होती. तिच्यासारखी दुसरी कुणी नव्हती आणि नाही. 

गांधींच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही देखणी,  अभिजनात  वावरणारी मॅडलिन स्लेड. समाजात दरारा असलेले तिचे  घराणे. वडील ब्रिटिश नौदलाचे ॲडमिरल- सर एडमंड स्लेड.  साहजिकच तिचा शब्द झेलायला कनिष्ठ,  वरिष्ठ अधिकारी  सतत सज्ज असत. राहणी साहजिकच संपन्नतेची,  वावर बड्या  राजकारण्यांत, समाजातील प्रतिष्ठितांत. जीवन तसे हौसे- मौजेत जाऊ शकले असते,  पण मॅडलिनचे चित्त कशातच रमत नव्हते. तिला आध्यात्मिक गोष्टींची ओढ होती. तिच्या  वडिलांची दोन वर्षांसाठी हिंदुस्तानात बदली झाली होती. सारे  जण मुंबईला राहत होते. वडिलांच्या नौदलातील इतमामाला  शोभेलसे त्यांचे जीवन होते. रोज नवनव्या अभिजन,  प्रतिष्ठित  लोकांच्या सहवासात संध्याकाळ जाई. मेजवान्या,  भटकणे,  लोकांशी संवाद, ऐटीत राहणे हे सारे सत्ताधारी सत्तेचे महत्त्व  ठसवणारे आयुष्य चालले होते.  मॅडलिनचे चित्त मात्र रमत नव्हते.

आपल्याला नक्की काय  हवेय ते उमगत नव्हते,  म्हणजे काय हे कळत नव्हते. घरच्यांना  सोडून ती युरोपात निघून गेली. तिचा जीव निसर्गात रमे. पानं,  वृक्ष,  प्राणी,  घोडे,  गाई यांच्या सहवासात तिला आनंद वाटे.  जणू ते तिच्याशी बोलत असत. निसर्ग तिचा खरा सखा होता.  तिच्या आजोळच्या वातावरणात तिचा जीव प्रसन्न असे.  कुठल्या तरी हाकेची ती वाट पाहत होती. संगीतात रुची होती  म्हणून बिथोविनचे संगीत शिकली. त्यात प्रगती केली,  रमली.  सूरांतून ती संगीताच्या पलीकडे जाऊन संगीतकाराला शोधत  होती. तो तिला जाणवला,  तेव्हा तिने गुडघे टेकून देवाचे  आभार मानले. आपण त्याच्या काळात जन्मलो असतो,  तर किती छान झाले असते!  तिने त्याच्या संगीताचे अनेक  कार्यक्रम आयोजित केले,  त्यासाठी खूप भटकली. बिथोविनच्या गावाला जाऊन राहिली. तरी अस्वस्थता कमी  होत नव्हती. बिथोविनचे प्रेम हे तिच्या आयुष्यातले एक  आनंददायी पर्व होते.
       
पहिले महायुद्ध पेटले होते. सर्वत्र व्देष,  तिरस्काराचे वातावरण होते. ज्या संगीतकारावर जीव  जडवला,  तो जर्मन-ऑस्ट्रियन होता.  असे स्वछंद परीचे आयुष्य जगणारी तरुणी! कुणी स्वप्नात तरी विचार केला असेल का,  की ही कधी कुडाच्या घरात  राहील?  चटईवर निजेल?  शाकाहारी अन्न खाईल नि भणंगासारखी रानी-वनी भटकत तेथील लोकांची सेवा  करील?  पण हे सारे घडलंय. ज्यांच्या सत्तेविरूध्द हिंदुस्थानात  सत्याग्रह सुरू झाला होता,  त्या नेत्याच्या बाजूला ती उभी  होती आणि त्या सत्तेच्या अत्युच्चपदी तिचा पिता काम करीत  होता. किती वदतोव्याघात वाटावे अशी स्थिती होती! 
     
पण हे सत्य होतं. तशीही ती घरच्यांच्या (तसं तर मनाला  पटल्याखेरीज कुणाच्याच बोलण्यातली) कह्यातली नव्हती.  आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल का,  याचा तिने  किंचितही विचार केला नाही;  त्यांनीही त्याचा बाऊ केलेला  ठाऊक नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात ती  एखाद्या अस्वस्थ आत्म्यासारखी हरवल्यागत वावरायची.  काही तरी वेगळं करण्यासाठी धडपड करायची. पण काय ते  सुचत नि सापडत नव्हतं. एका पुस्तकाने तिच्या आयुष्याची  दिशाच बदलली. त्या क्षणाबद्दल ती लिहिते,  ‘जसजसे मी ते पुस्तक वाचत गेले,  माझ्या मनात एका तेजस्वी सूर्याच्या  किरणांचा प्रकाश पसरू लागला. त्याने मी दिपून गेले.  सत्याचा सूर्य पूर्ण तेजाने तळपू लागला आणि जीवनात काय  करायचे, ते प्रेयस अचानक मिळाले. हे घडलं 1923 मध्ये  रोमाँ रोलाँ यांच्या गांधींवरील पुस्तकाने.’  तिने या अलौकिक माणसाला भेटायचा निर्णय घेतला. त्या  अगोदर तिने आश्रमजीवनाची माहिती करून घेतली आणि  तिच्या उतावळ्या स्वभावाप्रमाणे बोटीचे रिझर्व्हेशनही केले. पण आश्रमाची जीवनशैली वाचल्यावर तिला जाणवले की,  अचानक इतका बदल आपल्याला झेपणार नाही. भारतीय  आश्रमजीवनाचा सराव तिने आपल्या घरीच सुरू केला. 
       
मद्यपान बंद केले,  शाकाहार सुरू केला,  जमिनीवर मांडी  घालून बसायचा सराव सुरू केला, सूतकताईची प्राथमिक  माहिती करून घेतली. गांधींच्या ‘यंग इंडिया’  साप्ताहिकाची  वर्गणी भरून टाकली आणि 20 पौंड दान म्हणूनही पाठवले.  जितकं काही मी गांधी या माणसाबद्दल वाचतेय,  तितकं  त्याचं गूढ वाढतेय. ते काही उकलत नाहीय. त्याची तत्त्वं  आकर्षक होती म्हणून,  की त्याचं वागणं पारदर्शक होतं म्हणू्‌न  स्त्रियांना त्यांच्या वागण्याने विश्वास वाटे. या माणसापुढे त्या  इतक्या मोकळ्या कशा होत?  तो ‘त्या’  अर्थाने आकर्षक  नव्हता किंवा ‘तसं’  वाटावं असं सूचक वागतही नव्हता. तरी  तरुण,  सामाजिक प्रभावी वर्तुळातील घरातल्या तरुणी घरदार  सोडून झोपडीत राहायला का येत होत्या?  अशीच ही एका ब्रिटिश ॲडमिरलची देखणी,  मनस्वी कन्या... भारतासारख्या  मागासलेल्या देशात का येते?  एक पुस्तक तिचे जीवन पार  उलटसुलट कसे करू शकते?  बिथोविनच्या संगीतात आकंठ  बुडालेली ही तरुणी रोमाँ रोलाँने लिहिलेलं गांधींचं चरित्र  वाचते काय आणि प्राणांतिक ओढीने सर्वसंग परित्यागाच्या  भावनेने हिंदुस्थानात येते काय- सारेच एखाद्या परिकथेत वा  गूढकथेत शोभावे असे आहे. 
        
सुधीर कक्कर या मनोविश्लेषकाने मीराबहेन आणि गांधी  यांच्या परस्परसंबंधांबद्दल कादंबरी लिहिलीय. गांधींचा खून  झाल्यानंतर ती जेव्हा ऑस्ट्रियाला एकांतवासात राहत होती,  तेव्हा घेतलेल्या मुलाखती,  तर काही काल्पनिक जोड देऊन,  पण सत्यतेला धरून लिहिलेल्या ‘मीरा आणि महात्मा’ या पुस्तकात म्हटले आहे की, या दोन तीव्र,  उत्कट,  प्रतिभाशाली व्यक्तींमध्ये तितकीच तीव्र अशी ओढ निश्चितच  होती. कक्कर नोंदवतात, हे संबंध अनेक स्तरांवर गुंतागुंतीचे  होते. गांधींना स्त्रियांच्या सहवासात बरे वाटे,  आवडे. पण ते  पुरुषी अर्थाने आवडणे वा सहवास हवा असणे,  असं अजिबात  नव्हतं. तर,  ते एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल आस्था वाटावी,  सहजता असावी असं असे. त्यात त्यांना सखीभाव महत्त्वाचा  वाटे. ते अनेकदा म्हणत की,  मी स्त्री म्हणून जन्मायला हवं  होतं.  
       
मेडलिनने गांधींना दुसरे दैवत मानले असले तरी दोघांमध्ये जे प्लेटॉनिक आकर्षण होते,  ते शब्दांपलीकडचे होते. गांधींनाही तिच्याबद्दल आकर्षण वाटतच होते. पण ते  स्वत:वर संयम ठेवूनच वागत होते. ते तिला रागावत,  त्यांच्यापासून दूर पाठवत. त्यामुळे ती अतिशय व्याकूळ होत  असे. मानसिक रीत्या पार कोसळत असे. चक्क आजारी पडत  असे. तिला गांधींभोवती सतत राहायला आवडे. तासन्‌तास ती त्यांच्या अवतीभोवती राहायला उत्सुक असे. कस्तुरबांची  सगळी कामे, जसे की गांधींना जेवण देणं, हवं-नको पाहणं,  त्यांचे तळवे चोळून देणं ही कामं- करण्यात तिला समाधान  मिळे.  या दोन विलक्षण स्वभावाच्या नि उच्च नैतिकतेचा स्वीकार  केलेल्या व्यक्तींमधील संबंध हे शारीरिक स्तरावर कधीच जाऊ न देण्याचं श्रेय गांधींना दिलं पाहिजे.
      
तिच्या मते- गांधीजी हे  एक पवित्र आत्मा,  निखळ शुद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यासाठी ती काहीही करायला सज्ज असे. कुठलंही काम तिच्यासारख्या  स्त्रीला (जेव्हा ती आश्रमात रहायला आली तेव्हा ती काही  नवथर तरुणी नव्हती,  33 वर्षांची स्त्री होती) करणं अशक्य  नव्हतं. कल्पना करा- तिची ॲडमिरलच्या प्रासादातील  स्नानगृहं घ्या;  वा श्रीमंत आजोबा-आजीच्या बंगल्यातील  स्वच्छतागृहे घ्या,  ती आजच्या पंचतारांकित हॉटेलसारखी  होती. आणि इथं?  तट्ट्याचे संडास,  न्हाणीघर चार चटयांचा  आडोसा. त्यात पाण्याचा तुटवडा असेल तर तांब्याभर पाण्यात  भागवणे असे होते. अशात गांधींच्या आश्रमात सगळी सफाई  स्वत:ची स्वत:च करायची शिस्त होती. तिची सर्व काही करायची आनंदाने तयारी होती.
     
गांधींना तक्रारीला काही जागा राहू नये,  अशी तिची धडपड  असे. हे का?  तर,  त्यांनी तिच्यावर खूश राहावे म्हणून. हे गांधीजींच्या लक्षात येत नव्हते?  येत होते. तिच्यासारखी  कामाला पक्की कुणी कार्यकर्ती विदेशी स्त्री नाही,  असे ते म्हणत. तिनं आदर्श अनुयायी व्हावं- भक्त होऊ नये,  असा  त्यांचा तिला उपदेश असे. म्हणून ते तिच्यावर रागावर असत,  तिच्याशी कठोरपणे वागत,  तिला स्वत:पासून दूरच्या ठिकाणी  पाठवून देत. या दोन उत्कट भावाकुल व्यक्तींमधील  परस्परनातेसंबंध आकळणे अवघड होते. उलट गैरसमजाला  भरपूर वाव देणारे होते. त्यांचा राग ओढवून घेत ती त्यांच्या  समीप राहण्याची प्राणांतिक धडपड करायची,  निराश व्हायची,  हतबलता व्यक्त करायची,  आजारी पडायची,  तरीही गांधीजींचा शब्द मोडायची नाही. 
       
या विरहात तिला त्यांच्या  पत्रातील हळुवार अक्षरांचा आधार असे. ‘तू विचाराने नेहमीच  माझ्या मनात असतेस. देहाने माझ्याजवळ असण्यासाठी तू इथे  आलेली नाहीस. तुला जे काम करायचं आहे, ते चांगल्या  प्रकारे सिद्ध करण्यासाठी हा विरह गरजेचा आहे. देहाचे जवळ  असणे हे महत्त्वाचे नाही,  असा हा विरह पुढील प्रदीर्घ  विरहाची तयारी असते. नि:संगपणाची शिस्त बाळग. आज  आपण दूर झाल्याने तुला मी  दु:खात टाकले,  पण ते अटळ  होते. तू एक सामर्थ्यशाली स्त्री हो. मला चिकटून राहण्याचा मानसिक दुबळेपणा टाकून दे. या देहाखेरीज माझा आत्मा  तुझ्याबरोबर आहे. तू तुझी उदासीनता सोडून दे. शरीराखेरीज  आत्मा आपल्या अनेक मर्यादांवर मात करायला शिकवू  शकतो. तुझ्यात ती शक्ती आहे. माझा मोह टाळ. मी दोषरहित  मुळीच नाही. तू तुझं व्यक्तिमत्त्व झळाळून टाकेल असे सामर्थ्य  अंगीकार. तितकी तू हिम्मतवान आहेस.’ - गांधीजी. ‘स्पिरिटस पिलग्रिमेज’ या तिच्या आत्मकथनातून. 
     
तिने पूर्वायुष्य त्यागून हिंदुस्थानात येणं,  सर्वार्थाने इथलं  होण्यासाठी त्यागाची परीसीमा गाठणं- हे पाहून गांधीजींनी  तिला मीराचे नाव दिले होते. संत मीरेसारखी तिची निष्ठा होती,  प्रेमातील वेडेपण होतं, कामासाठी वाट्टेल ते करायची तयारी  होती.  ती फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये काम करीत असताना,  तिच्या आयुष्यात पृथ्वीसिंग नावाचा निधड्या छातीचा,  उंचापुरा  पंजाबी पुरुष खूप जवळ आला होता. अगोदर क्रांतिकारक  विचारांचा असलेला हा तडफदार तरुण. त्याच्या क्रांतिकारी  कामामुळे ब्रिटिशांनी त्याला तुरुंगात डांबले होते. तिथून तो  निसटला आणि 16 वर्षे भूमिगत होता. त्याच काळात तो  अहिंसेचे पालन करणाऱ्या गांधींच्या सान्निध्यात आला.  नंतरच्या काळात गांधींच्या विचारांनी काम करू लागला  होता. 
       
दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले होते. त्याचे बेधडक,  निर्भय वागणे तिला लोभावून गेले. तिला जी शारीरिक जवळिकीची ओढ होती,  ती विना अडथळा त्याच्या  सहवासात पुरी होऊ शकणार होती. संसार, मुलं या गोष्टींची  तिला ओढ वाटू लागली. गांधीजी तिला आपल्यापासून सतत दूरच ठेवत होते. पृथ्वीसिंगच्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादावरून हात फिरवण्यासाठी दोघे वारंवार भेटू लागले  होते. तिला वाटले की,  आता आपण या व्यक्तीबरोबर  मोकळेपणाने,  निर्भीडतेने,  स्वतंत्रपणे (जसे गांधीजींनी सांगितले होते) काम करू शकू. 
     
सेवाग्राममधील विविध  कामांकरिता ते एकत्र येत. त्याच्या सहवासासाठी ती व्याकूळ  होत होती.  तिने लिहून ठेवले आहे,  ‘त्या काळात माझी अवस्था  समुद्रातल्या एका छोट्याशा नौकेसारखी झाली होती. मनातले  तुफान सारखे उफाणत होते. गांधीजींनीही या नात्याला  स्वीकृती दिली होती. त्यामुळे तर मला खूपच उत्साहित  झाल्यासारखे वाटत होते... तिचा हात आणि जबाबदारी  पृथ्वीसिंगवर सोपवायला मला आनंद होतोय,  कारण ते दोघे  एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहेत. ’ पण का कोण जाणे, ते नाते विवाहात परिवर्तित झाले नाही. तिच्या आयुष्यात पती,  मुलं,  संसार ही पोकळी कायम  राहिली. गांधीजींशी जवळीक हवी होती;  पण ते उच्च  नैतिकतेने वागत होते,  जे त्यांच्या दृष्टीने सहज होते. मीराबेन  मात्र त्यासाठी उत्कटतेने वाट पाहत असायची. गांधींच्या  पायाशी राहावे,  त्यांची सेवा करावी हे तिला हवे होते, पण  हीसुद्धा एक आसक्तीच होती. त्यांनी ही आसक्ती दूर करायला  सांगूनही तिला ते जमत नव्हते. तिचं आयुष्य एक चक्रव्यूह  बनलं होतं. ती त्यात स्वेच्छेने शिरली. मीरेच्याच उत्कटतेने  तिने निवडलेल्या देवाच्या कल्पनेत रममाण झाली. पण... तो वेगळ्याच दुनियेचा रहिवासी होता. रोमाँ रोलाँने  म्हटल्याप्रमाणे ‘दुसरा ख्रिस्त’ होता. त्याच्या प्रत्येक विचाराने  ती भारावलेली होती. तिच्यासारखी दुसरी कुणी नव्हती आणि  नाही.  
   
तिने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची कामगिरी  बजावली होती. गांधींच्या पायाशी आपलं अस्तित्व समर्पित  करून ती स्वस्थ बसली नव्हती. गांधीजी तिची पत्रं  आश्रमातील इतर स्त्रियांना वाचायला देत असत. तिचं  मीरेसारखं सर्वस्व अर्पण करून भारतात येणं,  आपले अगोदरचे बंध तोडून इथल्या कामाशी नातं जोडणं- हा  सर्वस्वाचा त्याग त्यांना मोलाचा वाटत होता. अनेक देशव्यापी  कामं कार्यकर्त्यांची वाट पाहत होती. गांधींची प्रतिमा युरोपात  ठळक करायची,  हिंदुस्थानचा लढा कोणत्या मार्गाने चालला  आहे, मुद्दे काय हे सारे युरोपच्या जनतेला कळण्यासाठी तेथील  चर्चिल-जनरल स्मटसारख्या मोठ्या नेत्यांना भेटून  समजावणं,  वृत्तपत्रांशी संपर्क साधणं यासाठी ती  गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला गेली होती. इथल्या  अहिंसक चळवळी कशा दडपून लोकांवर ब्रिटिश सरकार  अत्याचार करतंय,  हे ती स्वदेशी कळवायची. त्यामुळे  तिच्यावर बारीक लक्ष होतं तिला मुंबईला यायला बंदी होती.  ती मोडून ती इथं कामं करायची, मग तिला अटक व्हायची. 
         
तिच्यासारख्या प्रतिष्ठित घरातील स्त्रीने वसाहतीतील एका  अर्धनग्न फकिरासाठी देश,  माणसं सोडून फाटक्यासारखे राहणे,  यावर युरोपातील वर्तमानपत्रांतून तिच्यावर तिरकस लिहिलं  जातं होतं. त्याला तिने सणसणीत उत्तर दिलं होतं ‘मी कुणाच्या सांगण्यावरून वा बोलावण्यावरून हिंदुस्थानात गेले नाहीये. तिथं माझं काही भव्य स्वागत झालेलं नाही. मी माझ्या  मर्जीनं,  पूर्ण विचारांती तिथे गेले आहे. माझा धर्म,  घरदार,  माणसं मी मुळीच सोडलेली नाहीत;  उलट तिथे गेल्यावरच  मला माझा धर्म जास्त नीट कळला आहे. मी धर्म बदललेला  नाही. जे काही करतेय,  पूर्ण समजून करतेय. इथे स्वैर वागावे म्हणून आलेले नाही. एका अत्यंत शिस्तबद्ध अशा आश्रमात  मी राहतेय.’  काँग्रेस कमिटीत ती महत्त्वाच्या पदांवर कामं करत होती.  इतर नेत्यांशी तिला चांगला संपर्क होता. अस्पृश्यता निवारण  असो, खादीविस्तार असो- तिने सगळ्यात जीव ओतून काम  केलं. त्यासाठी तिने स्थानिक भाषा शिकून लोकांशी नातं  जोडलं. सहकार चळवळीत तिचा सहभाग होता. चळवळीत  भाग घेतल्यामुळे तिला कैदेत राहावे लागले होते. सेवाग्राम आश्रम स्थापन करण्यात तिचा मोठा सहभाग होता.  ओरिसातील लोकांबरोबर तिने खूप काम केलं. तिला 1942  च्या सुमारास गांधीजी,  कस्तुरबा,  महादेवभाई यांच्यासह  पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले होते. 
      
तिथून  सुटल्यावर तिने किसान आश्रम स्थापन केला. त्यानंतर  रुडकीजवळच्या खेड्यात आश्रम सुरू केला. गांधीजींच्या  खुनानंतर तिने हृषीकेश आणि भिलंगनाला बापूग्राम व गोपाल  आश्रम सुरू केला. तिथे तिने गोपालन,  दुग्धव्यवसाय आणि  शेतीविषयक अनेक प्रयोग केले. कुमाऊ भागात राहताना,  हिंडतांना तिला जाणवले की,  हिमालयीन प्रदेशातील  बेफाम  जंगलतोडीमुळे तेथील पर्यावरणाची अपरिमित हानी होत  होती. नद्यांना पूर येऊ लागले होते. वन खात्याने केलेल्या  अक्षम्य दुर्लक्षाने गांधीजींच्या मार्गाने तिथे ‘वृक्ष बचाव’  याकरता 1980 मध्ये चिपको आंदोलन सुरू झाले!  गांधीजींसह ती युरोपात गेली असताना ते दोघे रोमाँ रोलाँना  भेटायला गेले होते. तेव्हा रोलाँनी लिहिलेले बिथोविनचे चरित्र  तिला भेट दिले होते. संपूर्ण जीवन भारतात घालवून,  तो देश  स्वतंत्र झालेला पाहून,  फाळणीचा रक्तपात नि गांधीहत्येचा धक्का पचवून तिने पुन्हा बिथोविनच्या देशात शांतपणे आयुष्य  घालवायचा निर्णय घेतला. 
      
ऑस्ट्रियातील एका खेड्यातील एकांतवासात तिने आपले उर्वरित आयुष्य घालवले. आपल्या  आत्मवृत्तात तिने गांधीजींबरोबरच्या आयुष्याबद्दल बरेच  लिहिले आहे. ती इथे होती,  तो काळ गांधींच्या जीवनातील अपरिमित घटनांचा नि संघर्षाचा होता. तिने हिंदुस्थानाच्या  स्वातंत्र्यलढ्याविषयीही लिहिले. पण तिच्या जीवनात  गांधीविचारच अखेरपर्यंत प्रबळ राहिला.  तिच्याबद्दल लिहिताना मनात एक असीम अस्वस्थता दाटली आहे. अलौकिक समर्पण वृत्तीने बापूंच्या पायाशी आलेल्या स्त्रीच्या वाट्याला उदासी का आली? तिला परमेश्वरी कृपेत आस्था होती. ‘तो’  काय मार्ग दाखवील  तो मी अनुसरेन,  असं गांधींच्या जाण्यानंतर ती सतत म्हणत  राहिली. पण तिचा जीव इथे लागेना! तिच्या ‘पशुलोक’  आश्रमामध्ये ती मुक्या जिवांची अलोट करुणेने उपचारासह  देखभाल करीत राहिली. एका सेवकाला म्हणाली,  ‘मी  प्राण्यांवर अधिक माया करते,  हे खरंय;  पण मी माणसांवर  काय कमी जीव पाखडला?’  बिथोविन,  गांधी,  पृथ्वीसिंग... कुणालाच दोष देऊन तिला न्याय मिळणार नाही! आपण तिला न्याय देणारे कोण?  ती मनस्वी स्त्री आपल्या अटींवर जगली. हवे ते, पटेल ते  सर्वस्व ओतून केलं. गांधीजींनी तिच्यावर ‘बा नि बापू’  बनून  अंत:करणापासून, तिचं हित डोळ्यांसमोर ठेवून माया केली.  तिच्या आत्मवृत्तातून,  पत्रांतून ती अत्यंत पारदर्शकतेने समोर येते. पण मनाला उगीचच चुटपूट लागते. तिच्या मीरापणाचे  हे भागधेय म्हणू?

Tags: संजीवनी खेर मार्गालेट स्लेड महात्मा गांधी margaret slade Sanjeevani Khare Maragaret Slede Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात