डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सार्क युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसाठी खास ‘सार्क व्हिसा’ सुरू करण्यात आला. सार्क युनिव्हर्सिटीतील कोर्सेसमध्ये दक्षिण आशियाविषयक जागृती वाढवी असा फोकस ठेवणे अपेक्षित असते. तसेच कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये भारतीय मुलांची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असून चालत नाही. सध्या सार्क युनिव्हर्सिटी अकबर भवनमध्ये आहे, हा तात्पुरता कॅम्पस आहे. दक्षिण दिल्लीतील ‘मैदान गढी’ परिसरात नवीन कॅम्पस (१०० एकर जागेत) तयार होत आहे.

‘प्रादेशिक सहकार्यातून विकास’ या कल्पनेची अंमलबजावणी आधुनिक काळात पहिल्यांदा युरोपात केली गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर उद्‌ध्वस्त पश्चिम युरोपमध्ये पहिल्यांदा ‘युरोपियन कोळसा आणि पोलाद महासंघ’ आणि नंतर १९५७ मध्ये ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’ची स्थापना झाली. त्याचेच रूपांतर पुढे सध्याच्या ‘युरोपियन युनियन’मध्ये झाले. युरोपियन प्रयोग इतका यशस्वी झाला की, त्याच प्रकारचे मॉडेल इतर प्रदेशांत राबवावे, असा विचार मूळ धरत गेला. दक्षिण आशियामध्ये प्रादेशिक सहकार्य संघटनेची स्थापना करावी, अशी मागणी १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाली होती. या मागणीमागे बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांचा पुढाकार होता. 

बांगलादेशी लष्करशहा झिया उर रेहमान हे सार्कच्या निर्मितीबाबत फारच आग्रही होते. भारत आणि पाकिस्तान याबाबत सुरुवातीस फारसे उत्सुक नव्हते. भारताला अशी भीती होती की, इतर सर्व सार्क सदस्य एकत्र येऊन भारताला ‘कॉर्नर’ करतील. आणि पाकिस्तानला असे वाटत होते की, सार्क हा भारताचा पाकिस्तानविरोधी गट बनवण्याचा डाव आहे. पण पुढे दोन्ही देशांनी आपापल्या भूमिका थोड्या लवचिक केल्या आणि सार्कच्या निर्मितीत सहभागी व्हायचे ठरवले. सार्क संघटनेची पहिली शिखर परिषद ८ डिसेंबर १९८५ रोजी बांगलादेशाची राजधानी ढाका येथे पार पडली. त्या परिषदेला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव हे सात देश हजर होते. 

संघटनेमध्ये २००७ मध्ये अफगाणिस्तानचा समावेश झाला आणि सदस्यसंख्या आठवर गेली. सार्कच्या परिषदा सुरुवातीला दर वर्षी व्हायच्या. पण १९९१ पासून दर दोन वर्षांनी परिषदा भरतात. आतापर्यंत एकूण अठरा परिषदा झाल्या आहेत. त्यांपैकी भारताने तीन वेळा तर पाकिस्तानाने दोन वेळा यजमानपद भूषवले आहे. 

२००४ ची इस्लामाबाद परिषद भारत-पाक संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. त्या परिषदेपासून भारत-पाक संबंधांत लक्षणीय सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती. २००८ मध्ये मुंबईवरील हल्ल्याने त्या चार वर्षांच्या प्रगतीवर पाणी फिरवले. अठरावी सार्क परिषद गेल्या महिन्यात नेपाळची राजधानी काठमांडू इथे पार पडली. सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू इथे आहे. कदाचित नेपाळचे मध्यवर्ती स्थान आणि इतर कोणाशीही वाद नसणे या विचारातून काठमांडूची निवड केली गेली असावी. 

सार्कची इतर अकरा सेंटर्स विविध सदस्य देशांत विखुरलेली आहेत. त्यांपैकी सार्कचे डॉक्युमेंटेशन आणि आपत्ती व्यवस्थापन ही दोन सेंटर्स दिल्लीत आहेत. क्षयरोग आणि एचआयव्ही संशोधन केंद्र काठमांडूमध्ये, सांस्कृतिक केंद्र कोलंबोमध्ये, फॉरेस्ट्री सेंटर भूतानमध्ये आणि एनर्जी सेंटर पाकिस्तानमध्ये आहे. सार्कच्या देशांतले आपापसांतील वाद लक्षात घेता, सार्कच्या व्यासपीठावर कोणतेही द्विपक्षीय मुद्दे आणले जात नाहीत. १९९० च्या दशकात प्रत्येकच देश अंतर्गत प्रश्नांनी ग्रस्त होता. त्यामुळे शेजाऱ्यांमधले संबंध तणावाचे असायचे. त्याचा परिणाम सार्कच्या प्रगतीवर पडला. भारत-पाकिस्तान संबंधांचा सार्कवर नेहमीच परिणाम होत आला आहे. त्यामुळे इतर देशांना वाटत राहते की, जोपर्यंत भारत-पाक संबंध सुरळीत होत नाहीत तोपर्यंत सार्क संघटनेची रिझल्ट्‌स देण्याची क्षमता मर्यादितच राहणार. शिवाय, भारताचा आकार आणि क्षमता याची भीती सार्कमधील छोट्या-छोट्या शेजाऱ्यांना वाटते. 

सार्कमध्ये राजकीय प्रश्न बाजूला ठेवून आर्थिक प्रश्नांवर लक्ष द्यावे, असा विचार करून गेल्या दहा-पंधरा वर्षांत सार्क देशांतील व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न चालू आहेत. २००५ ते २०१० या काळात सर्व सार्क देशांतील अर्थव्यवस्थांच्या वाढीचा दर सरासरी साडेसहा टक्के होता. जर व्यापाराला दरवाजे पूर्ण खुले केले तर भारतीय उद्योगांपुढे देशांतर्गत उद्योग टिकाव धरू शकणार नाहीत, या भीतीने सार्क देश प्रादेशिक व्यापाराबाबत फार प्रगती करू शकले नाहीत. सार्क देशांमध्ये क्रीडास्पर्धा होतात. व्हिसाबाबतची नियंत्रणे शिथिल करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ‘सार्क युनिव्हर्सिटी’ची कल्पना एप्रिल २००५ मध्ये पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडली. त्याविषयीचा करार २००७ मध्ये करण्यात आला. 

युनिव्हर्सिटीचे कामकाज २०१० पासून सुरू झाले. पहिल्या वर्षी इकॉनॉमिक्स आणि कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट सुरू करण्यात आले. २०११ मध्ये लॉ, बायोटेक्नॉलॉजी, अप्लाईड मॅथ्स, सोशिऑलोजी, International Relations हे विभाग चालू झाले. सार्क युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसाठी खास ‘सार्क व्हिसा’ सुरू करण्यात आला. सार्क युनिव्हर्सिटीतील कोर्सेसमध्ये दक्षिण आशियाविषयक जागृती वाढवी असा फोकस ठेवणे अपेक्षित असते. तसेच कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये भारतीय मुलांची संख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असून चालत नाही. सध्या सार्क युनिव्हर्सिटी अकबर भवनमध्ये आहे, हा तात्पुरता कॅम्पस आहे. दक्षिण दिल्लीतील ‘मैदान गढी’ परिसरात नवीन कॅम्पस (१०० एकर जागेत) तयार होत आहे.

Tags: संकल्प गुर्जर सार्क विद्यापीठ sankalp gurjar saarc university saarc weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके