Diwali_4 टोळधाडीचे संकटही पसरत आहे?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

टोळधाडीचे संकटही पसरत आहे?

आफ्रिका खंडातील ही टोळधाड केवळ आफ्रिकेपुरतीच मर्यादित नसून ती मध्य-पूर्वेतील देशांतही पसरली आहे. आफ्रिका खंडाला लागुनच असलेल्या अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात- म्हणजे येमेन, सौदी अरेबिया व ओमान या देशांमध्ये ही टोळधाड पसरलेली आहे. तसेच या प्रदेशाच्या शेजारी देशांत म्हणजे इराक आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनाही याचा फटका बसलेला असून, या टोळधाडीचा मुकाबला कसा करावा या चिंतेत या साऱ्या देशांची सरकारे आहेत. मध्य-पूर्वेतील या देशांना जवळ असलेल्या व आपल्याही शेजारीच असलेल्या इराण व पाकिस्तान या देशांनाही या टोळधाडीचे तडाखे बसलेले असून, या देशांच्या माध्यमातून भारताच्या राजस्थानातही हे कीटक आलेले आहेत. राजस्थानातील सुमारे पावणेदोन लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. असा अंदाज आहे की- उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या टोळधाडीला वेळीच रोखले नाही, तर जून-जुलै महिन्यात याहून अधिक तीव्र अशी टोळधाड येऊ शकते आणि तिचा फटका भारतातील अनेक राज्यांना बसू शकतो.

कृषिक्षेत्रासमोर जी काही अस्मानी व सुलतानी संकटे (पूर, दुष्काळ, पिकांवर रोग पडणे, प्रतिकूल सरकारी धोरणे, भावातले चढ-उतार वगैरे) येतात, त्यामध्ये टोळधाड हेसुद्धा एक प्रमुख संकट मानले जाते. एखाद्या प्रदेशात टोळधाड येते, म्हणजे नेमके काय होते? तर, वातावरणीय घटकांमुळे (मुख्यतः पाऊस आणि उन्हामुळे) त्या प्रदेशातील वनस्पतींचा फडशा पाडणाऱ्या कीटकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते आणि कोट्यवधी कीटक त्या विशिष्ट प्रदेशात येतात. साधारणतः पंधरा-वीस वर्षांत एकदा मोठी टोळधाड येते आणि विशिष्ट विभागातील पिकांचे व हरित प्रदेशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून जाते. आज विज्ञान इतके प्रगत झाले असले, तरी आजही टोळधाडीला आटोक्यात आणणे कठीणच मानले जाते. उलट, वातावरण, बदलाच्या प्रक्रियेमुळे इथून पुढे हे आव्हान अधिकच तीव्र होत जाणार आहे, अशीच लक्षणे दिसत आहेत. सध्या अशाच एका मोठ्या टोळधाडीचे संकट आपल्यासमोर उभे ठाकलेले आहे.            

एका बाजूला सारे जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात गुंतलेले आहे. मात्र आफ्रिका खंडातील उत्तर-पूर्वेला असलेले काही देश कोरोनाच्या बरोबरीनेच टोळधाडीच्या संकटाला सामोरे जात आहेत. गेल्या अनेक वर्षांत आफ्रिका खंडातील इथिओपिया, केनिया आणि सोमालिया या देशांना इतक्या तडाखेबंद टोळधाडीचा सामना करावा लागला नव्हता. त्यामुळे या सध्याच्या टोळधाडीची तीव्रता आणि त्यामुळे होणारे नुकसान पाहता, त्याची दखल घेणे भाग आहे.

सध्याची ही टोळधाड Desert Locust Worms मुळे निर्माण झालेली असून गेल्या शंभर वर्षांत त्यांच्यामुळे सहा मोठ्या, खूप जास्त तीव्रतेच्या टोळधाडी निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी एक धाड तर तब्बल तेरा वर्षे टिकली होती. सध्या आलेल्या या टोळधाडीचे वैशिष्ट्य म्हणजे हे कीटककेवळ शेतातील अन्नधान्यच खाऊन फस्त करतात असे नव्हे, तर त्यांच्या मार्गात आलेल्या व खाण्यास योग्य असलेल्या अशा प्रत्येक गोष्टीचा ते फडशा पाडतात. त्यामुळे उभी शेते, झाडेझुडपे, चरण्यासाठी राखून ठेवलेली गवताळ जमीन, जंगले अशा सर्व ठिकाणी या धाडीचा परिणाम जाणवतो आहे. या टोळधाडीमुळे आफ्रिका खंडातील या देशांच्या कृषिक्षेत्रावर व पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच गंभीर संकट निर्माण झालेले आहे. 

अर्थात, आफ्रिका खंडातील ही टोळधाड केवळ आफ्रिकेपुरतीच मर्यादित नसून ती मध्य-पूर्वेतील देशांतही पसरली आहे. आफ्रिका खंडाला लागुनच असलेल्या अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात- म्हणजे येमेन, सौदी अरेबिया व ओमान या देशांमध्ये ही टोळधाड पसरलेली आहे. तसेच या प्रदेशाच्या शेजारी देशांत म्हणजे इराक आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनाही याचा फटका बसलेला असून, या टोळधाडीचा मुकाबला कसा करावा या चिंतेत या साऱ्या देशांची सरकारे आहेत. मध्य-पूर्वेतील या देशांना जवळ असलेल्या व आपल्याही शेजारीच असलेल्या इराण व पाकिस्तान या देशांनाही या टोळधाडीचे तडाखे बसलेले असून, या देशांच्या माध्यमातून भारताच्या राजस्थानातही हे कीटक आलेले आहेत. राजस्थानातील सुमारे पावणेदोन लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. असा अंदाज आहे की- उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या टोळधाडीला वेळीच रोखले नाही, तर जून-जुलै महिन्यात याहून अधिक तीव्र अशी टोळधाड येऊ शकते आणि तिचा फटका भारतातील अनेक राज्यांना बसू शकतो.

आफ्रिका खंडाच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या इथिओपिया, सोमालिया आणि सुदान या देशांच्या दुष्काळाच्या करुण कहाण्या आपल्याला ऐकून माहिती असतात. दुष्काळामुळे सातत्याने होरपळून निघालेल्या या प्रदेशाला अन्नाचा तुटवडा व मोठ्या संख्येने होणारे भूकबळी ही काही तशी नवी बाब नाही. भुकेने मरणासन्न अवस्थेला आलेले लहान मूल व त्याच्या जवळच वाट पाहत असलेले एक गिधाड हा फोटो अनेकांनी पाहिला असेल. (त्या फोटोला प्रतिष्ठेचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते आणि ज्या फोटोग्राफरने तो फोटो काढला, त्याने पारितोषिक जिंकल्यानंतर काहीच महिन्यांत आत्महत्या केली होती.)

अशा या शापित प्रदेशालाच सध्या टोळधाडीचा फटका बसलेला आहे. इथिओपिया, सोमालिया, इरिट्रिया, केनिया आणि जिबूती हे देश या टोळधाडीच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. तसेच या देशांच्या शेजारीच असलेल्या सुदान, दक्षिण सुदान, युगांडा आणि काँगो या देशांतही हे कीटक पसरत गेले आहेत. यापैकी केनियाला गेल्या सत्तर वर्षांत इतक्या भयानक टोळधाडीचा सामना करावा लागलेला नव्हता; तर सोमालिया, इथिओपिया आणि जिबूती या तीन देशांसाठी ही गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे. या धाडीमुळे या चार देशांतील सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

हे वाचून असा प्रश्न पडलेला असेल की- अचानक ही टोळधाड याच प्रदेशात, आताच कशी काय उद्भवली? सर्वसाधारण परिस्थितीत, सुमारे दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या प्रदेशात हे कीटक वावरत असतात. त्यामुळे मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश ते भारत इतक्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशातील वाळवंटी-अर्धवाळवंटी प्रदेशात हे  कीटक वास्तव्यास असतात. तसेच या प्रदेशाच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरातील पावसाचा आणि तापमानातील बदलांचा प्रभाव या कीटकांच्या वाढीवर पडतो.

उत्तर-पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये गेल्या पंधरापैकी दहा वर्षे दुष्काळ पडलेला होता. सन  2019 वर्षसुद्धा दुष्काळीच होते. मात्र 2019 च्या अखेरच्या तीन महिन्यांत या प्रदेशाला भीषण पावसाचा तडाखा बसला. दुष्काळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अकाली आलेला भरपूर पाऊस व त्यामुळे तयार झालेल्या पूरसदृश परिस्थितीमध्ये या कीटकांच्या वाढीसाठी अतिशय पोषक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 2019 च्या डिसेंबर महिन्यात पाऊस ओसरत गेला आणि या प्रदेशाला या वर्षीच्या जानेवारी महिन्यात टोळधाडीच्या पहिल्या लाटेचा फटका बसला. जानेवारी महिन्यात आलेल्या या टोळधाडीचा सामना करण्यासाठी किमान सात कोटी डॉलर्स लागतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन’ने वर्तवला होता. मात्र त्यांना केवळ एक कोटी डॉलर्सच उभे करता आले. एकूण गरजेपेक्षा ही रक्कम फारच अपुरी होती. ही लाट जर वेळीच रोखता आली नाही, तर मे-जून महिन्यात येणारी लाट यापेक्षा पाचशे पट अधिक तीव्रतेची असेल, असा अंदाजही या संघटनेने व्यक्त केला होता. आता तो खरा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.     

अर्थात या लाटा आणि त्यांची तीव्रता किती असते, हे समजून घेण्यासाठी या कीटकांच्या संख्येचा अंदाज घ्यायला हवा. साधारण बोटभर लांबीचे व पाच महिने आयुष्य असलेले हे कीटक हरित प्रदेशावर झुंडीने हल्ला करतात. या झुंडीचा आकार एका चौ. किमीपेक्षा कमी ते शेकडो चौ.किमी इतका मोठा असू शकतो. एक चौरस किमीच्या प्रदेशात साधारणतः आठ कोटी कीटक वावरत असतात. या टोळधाडीच्या लाटेत केनिया व इथिओपियातील काही प्रदेशांत तर आकाश अक्षरशः दिसेनासेच व्हावे व साऱ्या आकाशावर काजळी पसरावी, इतक्या मोठ्या संख्येने हे कीटक आले आहेत. तसेच हे कीटक एका जागी स्थिर राहतात असेही नाही. वारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेने त्यांचे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर चालूच असते. एकेका दिवसात ते पाच ते दोनशे किमी इतका मोठा पल्ला पार पाडू शकतात. तसेच एक चौ. किमी पसरलेली झुंड एका दिवसात किमान पस्तीस हजार लोकांना पुरेल इतक्या खाद्य पदार्थांचा फडशा पाडते. त्यामुळे या टोळधाडीचा धोका किती मोठा आहे, याचा यावरून अंदाज येऊ शकतो.

या कीटकांना रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी करणे. पण त्यातही खूपच अडचणी आहेत. अंडी घालणे ते नवा कीटक जन्माला येणे यासाठीचा कालावधी हा अवघा दोन आठवडे इतका लहान असल्याने या कीटकांची पैदास खूप कमी काळात खूप मोठ्या संख्येने होऊ शकते. तसेच काही प्रदेशात हे कीटक कीटकनाशकांशी स्वतःला जुळवून घेत आहेत, असेही दिसून आले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाश्यांसारखे उपयोगी कीटकही मारले जातात. त्यामुळे कीटकनाशके किती प्रमाणात फवारायची, यावरही बंधने आहेत.

केनिया सरकारने पाच विमाने कीटकनाशकांच्या फवारणीसाठी तैनात केली असून इथिओपियामध्ये चार विमाने या कामासाठी वापरली जातात. मात्र दुर्गम प्रदेशात, दऱ्या-खोऱ्यांत ही फवारणी करणे फारच अवघड असते. त्यामुळे त्या प्रदेशात हे कीटक जिवंत राहून पुन्हा एकदा टोळधाड येईल, अशी शक्यता नेहमीच राहते. सोमालिया या देशात ‘अल-शबाब’ या दहशतवादी गटाच्या ताब्यातील प्रदेशात ही कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य नाही. तसेच येमेनमध्येही गेली दहा वर्षे यादवी युद्ध चालू असून त्या देशात सरकारचे अस्तित्व नगण्यच आहे. मग या टोळधाडीचा सामना कोण आणि कसा करणार, हा प्रश्न आहेच. मात्र या कीटकांना राष्ट्रांच्या सीमारेषा, यादवी युद्ध, राजकीय मतभेद यापैकी कशाचीही काही अडचण येत नाही. ते त्यांना अनुकूल वातावरण मिळेल त्या प्रदेशात जातात व अन्नधान्य खाऊन टाकतात. त्यामुळे ही टोळधाड आटोक्यात येण्याची शक्यता सध्या तरी खूपच कमी दिसते.

या टोळधाडीला आवरण्यासाठी केनिया-इथिओ-पियातील शेतकऱ्यांनी त्यांना शक्य होते ते उपाय करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मोठ्याने थाळ्या व वाद्ये वाजवणे, आपापल्या वाहनावरून शक्य आहे त्या प्रमाणात कीटकनाशके फवारणे वगैरे उपाय होते. मात्र एकेकटा शेतकरी या टोळधाडीला आवर घालू शकत  नाही. त्यासाठी देशांची सरकारे, मोठ्या खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था व आंतरराष्ट्रीय संघटना यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या देशांना आवश्यक त्या प्रमाणात पर्यावरणपूरक कीटकनाशके मिळवण्यासाठी जपान, हॉलंड आणि मोरोक्को अशा देशांतून पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र लॉकडाऊन व वाहतुकीवर बंधने घातली गेल्यामुळे पुरवठ्याची साखळी 'disrupt' झाली आहे. तसेच वाहतुकीची विमानेही महाग झाल्यामुळे कीटकनाशक खरेदी करण्याचा खर्चही खूपच वाढलेला आहे. अर्थव्यवस्था खंगत गेल्याने आवश्यक त्या प्रमाणात पैसाही उपलब्ध नाहीये. त्यामुळे एकीकडे कीटकांची वाढती संख्या व दुसरीकडे कीटकनाशकांचा तुटवडा- असे हे दुहेरी संकट या देशांसमोर आहे.

यामुळे हे स्पष्ट आहे की, उत्तर-पूर्व आफ्रिकेतील देशांसमोर अन्नसुरक्षेचा मोठाच प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. या प्रदेशातील दक्षिण सुदान, येमेन आणि सोमालिया या देशांच्या जनतेला गेली अनेक वर्षे आधीच चालू असलेल्या यादवी युद्धामुळे (मानवनिर्मित व निसर्गनिर्मित; दोन्ही स्वरूपाच्या) दुष्काळाचे दाहक चटके बसत होतेच. आता या टोळधाडीच्या संकटामुळे या देशांतील जनतेचे काय हाल होतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तसेच उत्तर-पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया-केनियासारख्या देशांसाठी 2019 हे  वर्ष तसेही फारच भीषण होते. या प्रदेशाला त्या वर्षी आधी दुष्काळ आणि मग पूर-परिस्थिती अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागला होता. त्यातून हे देश थोडेफार सावरू पाहत होते, तोच हे टोळधाडीचे संकट आले. टोळधाड चालू असतानाच आता कोरोनाचे संकट उद्भवले. कोरोनाच्या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे या प्रदेशासमोरील अडचणी आणखीनच वाढणार आहेत. तसेच जून-जुलैमध्ये पावसाच्या आगमनाबरोबरच अधिक जास्त तीव्रतेची टोळधाड येणार आहे. थेट उत्तर-पूर्व आफ्रिकेतून हे किडे भारतात येतील, असे अनुमान व्यक्त केले जाते, परिणामी, या टोळधाडीचा मोठा फटका तेव्हा पेरणीच्या हंगामात असलेल्या भारतालाही बसेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. (तसेच हे कीटक आफ्रिका खंडातही पश्चिम दिशेला पसरतील आणि चाड, निजेर अशा देशांना याचा फटका बसेल.)

यापूर्वी 1950 व 1993 मध्ये अशा मोठ्या टोळधाडी भारतात आल्या होत्या. तसेच  1987-89 व 2003-2005 मधील टोळधाडींचा अनुभवही भारताला आहे. अगदी गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे (2018-19 या वर्षात) भारतात टोळधाड आली होती. अर्थात, सध्या आफ्रिकेत आली आहे इतकी ती तीव्र नव्हती. तरीही असा अंदाज आहे की, गेल्या वर्षी दुष्काळ आणि या टोळधाडीमुळे भारताचे कृषी उत्पादन पाच लाख टनांनी घटले होते. Fall Army Worm (FAW) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कीटकांमुळे मागच्या वर्षीची धाड आली होती. या टोळधाडीचा परिणाम देशातील दहा राज्यांवर झाला होता व जवळपास अर्धा देश या कीटकांनी पादाक्रंत केला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांना याचा फटका बसला होता.

सध्याच्या Desert Locust Worm प्रमाणेच मागच्या वर्षीचा Fall Army Worm एकेका दिवसात 100 किमीचे अंतर कापत असे. या वेळेस आफ्रिकेतून हे कीटक भारतात येणार आहेत, त्याचप्रमाणे उगमस्थान अमेरिका खंडात असलेल्या FAW नेदेखील आफ्रिकेच्या मार्गानेच भारतात प्रवेश केला होता. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अशी संकटे येत राहणार, हे स्पष्ट आहे. तसेच Desert Locust Worm हे इराण व पाकिस्तानातही आढळत असल्याने पोषक परिस्थिती निर्माण झाल्यास ते त्या देशांतूनही भारतात येऊ शकतात.  

आपल्या शेजारील पाकिस्तानात या Desert Locust Worm च्या टोळधाडीचा फटका जानेवारीतच बसला होता. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली होती आणि Desert Locust Worm च्या विरुद्ध आघाडी उघडली होती. त्यांनी लाखो हेक्टर जमिनीवर कीटक-नाशकांची फवारणी केली होती. तसेच सरकार, सामाजिक संघटना, हवाई वाहतूकक्षेत्र आणि लष्कर अशा सर्वांनी एकत्रितपणे येऊन पिके वाचवण्यासाठी मोहीम उघडली होती. यापूर्वी 1993 मध्येसुद्धा पाकिस्तानला अशा स्वरूपाच्या गंभीर टोळधाडीचा सामना करावा लागला होता. (तेव्हा आपल्या राजस्थान व गुजरातलाही याचे तडाखे बसले होते.) 

सध्याची एकूण परिस्थिती पाहता, जून-जुलै महिन्यात आपण कोरोनाचे काय करायचे आणि आपले आयुष्य कसे पुढे रेटायचे, याविषयी चिंताग्रस्त असू. मात्र त्याच वेळेस या कीटकांच्या माध्यमातून जी टोळधाड येऊ शकते, तिचा सामना कसा करायचा व आपले कृषी-उत्पादन कसे सुरक्षित ठेवायचे, याचीही तयारी करायला हवी. अर्थात अशा टोळधाडीमागे केवळ उत्तर-पूर्व आफ्रिकेतील दुष्काळ आणि पूर इतकीच कारणे नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. असे दुष्काळ आणि पुराचे अनियमित चक्र तयार होण्यामागे वातावरणातील बदलांचा मोठा वाटा आहे. तसेच आपण हेही लक्षात ठेवायला हवे की, माणसाने आखलेल्या राष्ट्रा-राष्ट्रांच्या सीमारेषा निसर्ग पाळत नसतो. त्यामुळे अशा टोळधाडीसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी केवळ आपल्याच देशात प्रयत्न करणे एवढेच पुरेसे नसून केनिया-इथिओपिया व त्या प्रदेशातील इतर देशांना मदत करणेही तितकेच आवश्यक आहे, हे समजून घ्यायला हवे. एकीकडे कोरोनाच्या संकटाच्या काळात ग्लोबलायझेशनचे काय होणार, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांना असे वाटते की, कोरोनामुळे ग्लोबलायझेशनचा अंत जवळ आलेला आहे. मात्र टोळधाडीसारखी ही अशी संकटे पाहिल्यास ग्लोबलायझेशनची प्रक्रिया आणखी पुढे नेणे आणि राष्ट्रा-राष्ट्रांनी एकमेकांशी अधिकाधिक सहकार्य करणे याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हेच लक्षात येईल. 

Tags: शेती टोळधाड संकल्प गुर्जर locusts farmers sankalp gurjar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात