डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नेल्सन मंडेलांची अटक आणि सत्तावीस वर्षांची काळरात्र

मंडेलांच्या बरोबरीने या खटल्यात अहमद कॅथराडा, वॉल्टर सिसुलू, गोवन एम्बेकी, डेनिस गोल्डबर्ग अशा सर्वांना शिक्षा झाल्या. या खटल्यामध्ये कृष्णवर्णीय, भारतीय, मिश्र व गौरवर्णीय अशा चारही वंशांचे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांचे आरोपी होते. त्यामुळे या खटल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. शिक्षा झालेल्या आरोपींना केप टाऊनच्या जवळ असलेल्या ‘रॉबेन’ नावाच्या बेटावरील तुरुंगात ठेवले जाणार होते. एक प्रकारे भारतात ब्रिटिश काळात जशी अंदमानची शिक्षा दिली जात असे, तसेच हे प्रकरण होते. मात्र इथे वर्णभेदी राजवटीकडून एक महत्त्वाची चूक घडली. त्यांनी सर्व राजकीय कैदी एकत्र, एकाच तुरुंगात ठेवले होते. त्याचे परिणाम आपण पुढे पाहणारच आहोत. 

पारतंत्र्यात असलेल्या कोणत्याही देशाला आपल्या स्वातंत्र्यासाठी कोणते मार्ग स्वीकारायला हवेत याचा निर्णय करावा लागतो. राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी चळवळ करणाऱ्या नेतृत्वावर या दृष्टीने विशेष जबाबदारी असते. भारतात स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य प्रवाह हा कायमच अहिंसावादी मार्गाने आणि जनतेचे प्रबोधन करतच पुढे जायला हवे, या मताचा होता. सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाची अव्यवहार्यता आणि त्यामुळे होणारे देशाचे नुकसान हे दोन्ही घटक लक्षात घेऊनच असे झाले होते. पारतंत्र्यातील देशांमध्ये आधीच विकासाला आवश्यक अशा रस्ते-रेल्वे-वीजनिर्मिती प्रकल्प यांचे प्रमाण कमी असते. सशस्त्र लढ्याच्या निमित्ताने याचेही नुकसान झाल्यास देशाचे होणारे नुकसान परवडणारे नसते. तसेच एकदा जनतेचा एक मोठा गट शस्त्रसज्ज झाला की, स्वातंत्र्यलढा संपला तरीही त्यानंतर ही शस्त्रे खाली ठेवली जातीलच याची काही खात्री नसते. उलट, अनेक देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर अशा शस्त्रसज्ज गटांमध्ये यादवी युद्ध सुरू झाले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणणे फारच कठीण गेले. त्यामुळे सशस्त्र लढ्याबाबत निर्णय घेताना नेतृत्वाला फारच सावधपणे विचार करावा लागतो.

दक्षिण आफ्रिकेबाबतही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ही संघटना अहिंसावादीच होती. मात्र या संघटनेच्या काही नेत्यांना सशस्त्र मार्गाचे आकर्षण वेळोवेळी वाटले होते. नेल्सन मंडेला 1960 मधील ‘शार्पव्हील’ हत्याकांडानंतर याच दिशेने विचार करू लागले होते. तसेच दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीकडून शांततामय लढ्याला आलेली प्रतिक्रिया पाहता, आंदोलने आणि कायदेभंग केल्याने ही राजवट संपणारी नाही, असेही अनेकांना वाटत होते. त्यामुळेच नेल्सन मंडेलांनी 1961 मध्ये जेव्हा सशस्त्र प्रतिकाराची कल्पना मांडली, तेव्हा त्यांना असे वाटत होते की; मर्यादित स्वरूपाच्या सशस्त्र प्रतिकारामुळे आणि हल्ल्यांमुळे देशात अस्वस्थता निर्माण करता येईल, परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात भीती उत्पन्न करता येईल आणि वर्णभेदी राजवटीला संदेश देता येईल. त्यातूनच वर्णभेदी राजवट संपवण्यासाठी पावले उचलली जातील.

दक्षिण आफ्रिकेतील कम्युनिस्ट पक्षाने सशस्त्र संघर्ष करायला हवा, असा निर्णय आधीच घेतलेला होता. त्यांच्या डोळ्यांसमोर तेव्हा क्युबातील क्रांती आणि फिडेल कॅस्ट्रो यांचे उदाहरण होते. कम्युनिस्ट पक्षाचे असे मत होते की, सशस्त्र प्रतिकाराच्या मार्गाने लढा सुरू केल्यास कृष्णवर्णीय जनतेत आपल्याला सहानुभूती मिळेल आणि आपल्या समर्थकांच्या संख्येतही वाढ होईल. त्यातूनच लढा अधिक तीव्र होऊन वर्णभेदी राजवट कोसळेल. तसेच आपल्या या कामात आपल्याला सोव्हिएत रशिया, चीन व पूर्व युरोपातील देश यांचा पाठिंबा मिळेल याची कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाला खात्री होती. मंडेलांनाही सशस्त्र लढ्याशिवाय आता पर्याय नाही, असेच वाटत होते. त्यामुळे एके काळी कम्युनिस्टांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करणारे मंडेला आता कम्युनिस्टांच्या मार्गानेच दक्षिण आफ्रिकेत सत्तापरिवर्तन करायला उत्सुक होते. आपली ही मते मंडेलांनी जेव्हा आफ्रिकन नॅशनल काँग्रेससमोर मांडली, तेव्हा संघटनेचे मत मंडेलांच्या विरोधातच होते. त्यामुळे मंडेलांच्या प्रस्तावावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. अखेरीस असे ठरले की, संघटना शांततामय मार्गानेच जाईल. मात्र ज्या नेत्यांना सशस्त्र लढा उभारायचा आहे, त्यांच्या मार्गात संघटना येणार नाही.

यानंतर मंडेलांनी umkhonto we sizwe (याचा शब्दशः अर्थ : राष्ट्राचा ‘भाला’) या संघटनेची स्थापना केली. या नव्या शस्त्रधारी संघटनेत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे निवडक कार्यकर्तेच सहभागी झाले होते. कम्युनिस्ट पक्षाचे भूमिगत लढ्यातील तंत्र, आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्वीकारार्हता, मनुष्यबळ यांचा इथे संगम होता. मात्र असे असले तरी घातपात करणे, सशस्त्र लढा उभारणे यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण यापैकी कोणाहीकडे नव्हते. जोहान्सबर्गमधील ‘रिव्होनिया’ नावाच्या परिसरात एक मोठे फार्महाऊस कम्युनिस्ट पक्षाने विकत घेतले होते. तिथे बसून आपली लक्ष्ये ठरवणे, लढ्याची बाकीची तयारी करणे, विश्रांती/आश्रय घेणे अशी कामे चालत असत. त्यामुळेच जेव्हा पुढे मंडेलांना अटक झाली तेव्हा जो खटला चालवला गेला, त्याला ‘रिव्होनिया ट्रायल’ असे म्हटले गेले.

एक

सशस्त्र लढ्यासाठी umkhonto we sizwe ही संघटना स्थापन केल्यानंतर 16 डिसेंबर 1961 रोजी प्रत्यक्ष लढ्याला सुरुवात झाली. तसे जाहीर करणारी पत्रके छापून ती वाटली गेली. एकोणिसाव्या शतकात, ‘द ग्रेट ट्रेक’च्या काळात 16 डिसेंबर 1838 रोजी आफ्रिकानेर समूहाने दक्षिण आफ्रिकेतील सामर्थ्यवान झुलू राजाचा दणदणीत पराभव केला होता. तेव्हापासून 16 डिसेंबर हा दिवस आफ्रिकानेर समूह विजयदिवसाप्रमाणे साजरा करत असे. आफ्रिकानेर समूहाला आणि वर्णभेदी राजवटीला स्पष्ट संदेश देण्यासाठी मुद्दामच सशस्त्र प्रतिकाराची सुरुवात 16 डिसेंबर 1961 रोजी केली गेली. जोहान्सबर्ग आणि इतर शहरांतील सरकारी कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवले गेले. तसेच त्यानंतरच्या दीड वर्षात रेल्वे स्टेशन्स, वीजनिर्मिती प्रकल्प, सरकारी कार्यालये अशा ठिकाणी हल्ले केले गेले. मात्र यापैकी फारच कमी हल्ले यशस्वी झाले. हे हल्ले निष्प्रभ झाल्यामुळे सशस्त्र लढ्याची सुरुवात होऊनही सरकारचे फारसे काही नुकसान झाले नाही.

सरकारने हा प्रतिकार कठोरपणे मोडून काढायचे ठरवले होते. त्यानुसार पोलिसांना अटकेचे आणि चौकशीचे अमर्याद अधिकार दिले गेले. पोलिसांनी अतिशय क्रूरपणे हा सशस्त्र प्रतिकार मोडून काढला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, ‘रिव्होनिया’ येथील फार्म हाऊसभोवतीचे पाश हळूहळू आवळत गेले. पोलिसांनी जेव्हा तिथे छाप टाकला; तेव्हा त्यांना शस्त्रनिर्मिती, प्रशिक्षण, चीन व सोव्हिएत रशिया यांच्याशी संपर्क साधणे यांच्याशी संबंधित कागदपत्रे सापडली. या साऱ्यातून मंडेला यांचा या सशस्त्र लढ्यातील सहभाग सिद्ध झाला होता. एकीकडे सरकार सशस्त्र प्रतिकार मोडून काढण्यासाठी पावले उचलत असताना ऑलिव्हर टाम्बो यांना देशाबाहेर पाठवले गेले होते. दक्षिण आफ्रिकेच्या शेजारील देशांमध्ये जाऊन तिथे कामाला उपयुक्त अशी केंद्रे उभारण्याचे, आवश्यक ती मदत पुरवण्याचे आणि देशाबाहेरील समर्थकांचे जाळे विणण्याचे काम त्यांच्याकडे होते.

1960 च्या दशकात सुरू झालेले हे काम पुढे बरेच वाढले. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला गरजेचे असेल त्या प्रमाणात साह्य उभे करणे, सहानुभूती असलेल्या भारतासारख्या सरकारांशी संबंध जोपासणे आणि परदेशी (मुख्यत: लंडनमध्ये) राहून दक्षिण आफ्रिकेतील सत्य परिस्थिती जगासमोर आणण्याचे काम त्यानंतरही चालूच राहिले. पाश्चात्त्य देशांतील लोकमत क्रमाने दक्षिण आफ्रिकेच्या सरकारच्या विरोधात गेले, त्यामागे या कामाचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे 1999 मध्ये मंडेलांच्या निवृत्तीनंतर अध्यक्ष झालेले थाबो  एम्बेकी हे अशा परदेशी राहून काम करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. सशस्त्र लढा चालू झाल्यानंतरच्या तीनच आठवड्यांतच मंडेला जानेवारी 1962 मध्ये गुप्तपणे देशाबाहेर गेले होते. त्यापुढील सहा महिने ते देशाबाहेरच होते. या काळात त्यांचे मुख्य काम नव्यानेच स्वतंत्र होत असलेल्या आफ्रिकी देशांकडून मदत मिळवणे हे होते.

याच काळात मंडेलांनी इथिओपियामध्ये राहून थोडेसे लष्करी प्रशिक्षण घेतले होते. सशस्त्र संघर्षासाठी ते आवश्यक आहे, असे त्यांना वाटत होते. जुलै 1962 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत परत आले. त्यानंतरच्या दोनच आठवड्यांत पोलिसांनी त्यांना अटक केली. अशा रीतीने मंडेलांचा सशस्त्र लढा आणि भूमिगत कार्य संपुष्टात आले. 1962 मध्ये अटक झालेले 44 वर्षीय मंडेला त्यानंतर सत्तावीस वर्षांनी वृद्ध आणि परिपक्व होऊन 1990 च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुरुंगातून बाहेर येणार होते. मंडेलांवर दोन खटले चालवले गेले. दोन्हींमध्ये ते दोषी ठरले. दोन्ही वेळेस स्वतःचा बचाव त्यांनी स्वत:च केला. या खटल्यांच्या काळात त्यांचे कोर्टातील वर्तन आणि धीरोदात्त वृत्ती ही अटक होऊनही ते मानसिकरीत्या अजिबात खचलेले नव्हते याचीच ग्वाही देत होती. ९८२२४७ 16 ४६

एकीकडे 1963 मध्ये हे खटले चालू असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध लादण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दक्षिण आफ्रिकेला सर्व प्रकारचा शस्त्रपुरवठा-दारूगोळा-लष्करी वाहने आणि पेट्रोल पुरवू नये, अशा आशयाचे ठराव 1963 मध्येच संयुक्त राष्ट्रसंघात पारित झाले होते. पुढे या निर्बंधांची व्याप्ती सातत्याने वाढतच गेली. यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची होती. मंडेलांच्या या खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे पत्रकार उपस्थित होते. हा दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा राजकीय खटला होता. मंडेलांचा गुन्हा आणि वर्णभेदी राजवटीचे धोरण पाहता, त्यांना मृत्युदंड दिला जाणार याचीच मानसिक तयारी मंडेलांसकट इतर सर्वांनी केली होती.

या खटल्याच्या वार्तांकनातून आपले म्हणणे जगासमोर पोहोचणार आहे याची खात्री मंडेलांना होती. त्यामुळे कोर्टात स्वतःच्या बचावाचे जे भाषण ते करणार होते, त्याची फार काळजीपूर्वक तयारी त्यांनी केली. त्यांचे कोर्टातील ते भाषण पाच तास चालले होते. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची भूमिका त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या भाषणात मांडली. ते भाषण चालू असताना गौरवर्णीय  न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर पूर्ण पाच तास निर्विकार भाव होते. मंडेला आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘माझ्या आयुष्यात मी जसा गौरवर्णीयांच्या वर्चस्वाविरुद्ध लढा दिला आहे, तसाच मी कृष्णवर्णीयांच्या वर्चस्वाविरुद्धही लढलो आहे. जिथे सर्वांना समान संधी असतील आणि सर्व जण एकोप्याने राहू शकतील, अशा स्वतंत्र व लोकशाहीवादी दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न मी पाहिले आहे. या उद्दिष्टासाठीच मी आतापर्यंत जगलो आहे. मात्र गरज असेल तर या उद्दिष्टांसाठी मी मरण स्वीकारायलाही तयार आहे.’’

मंडेलांच्या समर्थनार्थ लंडनमध्ये पन्नास ब्रिटिश खासदारांनी आणि जनतेने मोर्चा काढला होता. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अशा दोन्ही महासत्तांनी या राजकीय कैद्यांना सोडून द्यावे, अशा आशयाचे संदेश दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीला पाठवले होते. मात्र त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी राजवटीतील कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा न देता नेल्सन मंडेलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मंडेलांच्या बरोबरीने या खटल्यात अहमद कॅथराडा, वॉल्टर सिसुलू, गोवन एम्बेकी, डेनिस गोल्डबर्ग अशा सर्वांना शिक्षा झाल्या. या खटल्यामध्ये कृष्णवर्णीय, भारतीय, मिश्र व गौरवर्णीय अशा चारही वंशांचे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांचे आरोपी होते. त्यामुळे या खटल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.

शिक्षा झालेल्या आरोपींना केप टाऊनच्या जवळ असलेल्या ‘रॉबेन’ नावाच्या बेटावरील तुरुंगात ठेवले जाणार होते. एक प्रकारे भारतात ब्रिटिश काळात जशी अंदमानची शिक्षा दिली जात असे, तसेच हे प्रकरण होते. मात्र इथे वर्णभेदी राजवटीकडून एक महत्त्वाची चूक घडली. त्यांनी सर्व राजकीय कैदी एकत्र, एकाच तुरुंगात ठेवले होते. त्याचे परिणाम आपण पुढे पाहणारच आहोत.

यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटी- विरुद्धचा लढा थंडावला. चळवळीतील महत्त्वाचे नेते तुरुंगात गेले होते. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि दक्षिण आफ्रिकन कम्युनिस्ट पक्षाची संघटना खच्ची झालेली होती. सरकारी कायदे व त्याद्वारे केले जाणारे अत्याचार यांत खूपच वाढ झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचे धोरण 1960 च्या दशकात अधिकच तीव्र केले गेले. याच काळात गौरेतरांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वर्णभेदाचा वरवंटा पूर्ण शक्तिनिशी फिरायला सुरुवात झाली. कितीही विरोध झाला, तरीही दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट त्याला तोंड देऊन टिकू शकते आणि आंतरराष्ट्रीय दबावाला यशस्वीपणे हाताळू शकते, असा आत्मविश्वास सरकारच्या स्तरावर आला होता. एकूणच वातावरण निराशाजनक बनले होते. दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांच्या जीवनात न संपणारी एक भयाण रात्र सुरू झाली होती.

दोन

नेल्सन मंडेला तुरुंगात होते, त्या काळात दक्षिण आफ्रिका हा अभेद्य गौरवर्णीय सत्तेचे प्रतीक बनला होता. दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेची 1960 च्या दशकात वेगाने वाढ होत होती. तसेच त्या देशातील खाणींमधून सोने आणि इतर खनिजांचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यामुळे एकूण निर्यातीत आणि पर्यायाने व्यापारात वाढ झाली होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांतील गुंतवणूकदार दक्षिण आफ्रिकेकडे आकर्षित होत होते. दक्षिण आफ्रिकेतील राजकीय स्थैर्य आणि अमाप आर्थिक फायदा या कारणांमुळे याच काळात युरोपातून गौरवर्णीय लोकांचे स्थलांतरही पुन्हा सुरू झाले होते. 1960 च्या दशकात साधारणतः तीन लाख लोक युरोपातून दक्षिण आफ्रिकेत कायमचे स्थायिक झाले.

दक्षिण आफ्रिकेचे पाश्चात्त्य जगाला इतके आकर्षण होते की, संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादलेले असूनही 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण दोन हजारांहून अधिक परदेशी कंपन्या कार्यरत झाल्या होत्या. त्यांपैकी एक हजार कंपन्या ब्रिटिश, तर चारशे अमेरिकन होत्या. आर्थिक कारणांशिवाय दक्षिण आफ्रिकेचे राजकीय आणि लष्करी महत्त्वसुद्धा क्रमाने वाढतच गेले होते. जे स्थान अरब जगात इस्रायलचे होते, तेच स्थान आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेचे होते. दोन्ही देशांना पाश्चात्त्य देशांचा पूर्ण पाठिंबा होता. तसेच 1967 च्या अरब विरुद्ध इस्राईल या युद्धात सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद झाल्याने तेलवाहतुकीच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेचे आणि केप ऑफ गुड होपचे महत्त्व पुन्हा एकदा वाढले. याशिवाय दक्षिण आफ्रिकेची बंदरे पाश्चिमात्य देशांच्या नौदलांना वापरता येत होती. दक्षिण आफ्रिका सातत्याने कम्युनिझमविरोधी कडवी भूमिका घेत असल्याने  आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील प्रदेशात कम्युनिझमचा प्रसार रोखण्यात दक्षिण आफ्रिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पाश्चात्त्य जगाचे मत होते. तसेच दक्षिण आफ्रिकेतून हिंदी महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर या प्रदेशातील सोव्हिएत युनियन व त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या नाविक हालचालींवर लक्ष ठेवता येत होते.

दक्षिण आफ्रिकेतील युरेनियमच्या साठ्यांमुळे फ्रान्स व दक्षिण आफ्रिका यांचे लष्करी-आण्विक सहकार्य याच काळात बहरत होते. यातूनच पुढे दक्षिण आफ्रिकेने स्वतःसाठी अणुबॉम्ब तयार केला. तसेच फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्यानंतरही फ्रान्सच्या प्रभावाखालीच असल्याने या फ्रेंच-आफ्रिकन देशांचा वापर करून फ्रान्सला दक्षिण आफ्रिकेविरोधातील टीकेची धारही सौम्य करता येत असे. तसेच आफ्रिका खंडातच दक्षिण आफ्रिकेबाबत मतभेद आहेत, असे चित्र निर्माण करता येत असे. दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकानेर समूहाने नॅशनल पार्टीच्या सत्तेचा फायदा घेऊन आपले अर्थकारणातील महत्त्व वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे आफ्रिकानेर समूहातून नवे उद्योजक, प्रशासक उदयाला आले. आफ्रिकानेर समूह आर्थिक समृद्धीबाबत हळूहळू दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश समूहाच्या जवळ येत चालला होता.

असे म्हणतात की, अमेरिकेतील अतिश्रीमंत अशा बेव्हर्ली हिल्स (जिथे हॉलीवुडचे सिनेस्टार्स राहतात) या विभागापाठोपाठ सर्वाधिक स्विमिंग पूल्स हे जोहान्सबर्गच्या ब्रिटिश भागांत होते. मात्र एकीकडे गौरवर्णीय समूहाला आर्थिक समृद्धीचा अनुभव देतानाच दक्षिण आफ्रिकेचे सरकार देशातील वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही, साहित्य आणि गौरवर्णीय समाजातील वर्णभेदविरोधी मतांची माणसे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आटोकाट प्रयत्न करत असे. त्यामुळे बाहेरून पाहिल्यास वर्तमानपत्रे, न्यायालये, निवडणुका, मार्केट इकॉनॉमी आणि सिव्हिल सोसायटी अशी लोकशाहीची सर्व बाह्य लक्षणे वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेत दिसत होती; मात्र तरीही तिथे खरी लोकशाही अस्तित्वात नव्हती.

एकीकडे गौरवर्णीय समूह असे सुखवस्तू जीवन जगत असतानाच कृष्णवर्णीय समूहाची स्थिती याआधीच नोंदवल्यानुसार 1960 आणि 1970 च्या दशकात खालावतच गेली. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेतृत्व तुरुंगात असल्याने 1970 च्या दशकात कृष्णवर्णीय समूहामध्ये नव्या, तरुण नेतृत्वाचा उदय झाला. या तरुण नेतृत्वाला आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ‘बहुवांशिक’  आणि सर्वसमावेशक राष्ट्रवादापासून स्फूर्ती न मिळता, ती ‘आफ्रिकावादी’ गटांच्या आक्रमक भूमिकेमधून मिळत होती. यातूनच black consciousness या चळवळीचा उदय झाला आणि पाहता-पाहता ती वेगाने पसरली. या चळवळीचे नेतृत्व स्टीव्ह बिको नावाच्या तरुणाकडे होते. कृष्णवर्णीयांनी आपल्या हक्कांचे रक्षण स्वतःच करायला हवे, तसेच त्यांना आपल्या कृष्णवर्णीय असण्याचा अभिमान असायला हवा, त्यांनी स्वतःला गौरवर्णीयांपेक्षा निकृष्ट समजण्याचे काहीच कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी इतकी वर्षे लादलेली मानसिक गुलामगिरी झुगारून द्यायला हवी- असे या black consciousness चळवळीचे तत्त्वज्ञान होते.

ही चळवळ एकीकडे पसरत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडे असलेल्या अंगोला आणि मोझांबिक या दोन्ही देशांतल्या गौरवर्णीय पोर्तुगीज वसाहतवादी सत्तेचा अंत झाला. त्यामुळेही black consciousness चळवळीला व वर्णभेदविरोधी लढ्याला नव्याने बळ मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने याही वेळेस अतिशय क्रूरपणे ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. स्टीव्ह बिकोला आधी राजकीय काम करण्यावर बंदी घातली. मग तो ऐकत नाही हे पाहून त्याला अटक केली गेली. तुरुंगात अमानुष मारहाण केल्याने कोमात गेलेल्या स्टीव्हला अंगावर जड लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवूनच, कोमात असतानाच, सातशे मैल अंतरावरील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा घाट घातला गेला. या साऱ्या काळात त्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे तरुण स्टीव्हचा मृत्यू झाला.

सरकारला हेच हवे होते. तसेच त्याच्या मृत्यूचे खरे कारण सरकारने लपवून ठेवले. स्टीव्हच्या 1977 मधील अशा सरकारप्रणीत हत्येने देशभर संतापाची लाट उसळली. याच्या आधीच्याच वर्षी सोवेटोमध्ये जून 1976 मध्ये सरकारने ‘आफ्रिकान्स’ भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या कृष्णवर्णीय शाळकरी विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अमानुष प्रयोग केला होता. त्यात एका तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या बातमीमुळे सोवेटोपाठोपाठच ट्रान्सव्हाल राज्यातल्या शहरांमध्येही दंगलींचे लोण पसरले. सरकारने ‘आफ्रिकान्स’ भाषा लादण्याचा निर्णय रद्द करूनही दंगली थांबतच नव्हत्या. कोणतेही उद्दिष्ट, नेतृत्व आणि ठोस दिशा नसलेल्या अशा या दंगली होत्या. कृष्णवर्णीय समूहात गेल्या दहा-बारा वर्षांत साचत गेलेल्या असंतोषाचा तो उद्रेक होता. जेव्हा डिसेंबरपर्यंत हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत गेली, तोपर्यंत 600 जण मारले गेले होते आणि 4000 जण जखमी झाले होते.

या काळात ज्या तरुणांना सरकारने अटक करून रॉबेन बेटावरच्या तुरुंगात पाठवले, ते कैदी मंडेला आणि त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा पूर्णतः वेगळे होते. ते वागायला आक्रमक होते. तुरुंगातील कोणतेही नियम पाळायला ते तयार नव्हते. ते तुरुंगात घोषणा देत असत. यामुळे अशा कैद्यांवर नियंत्रण ठेवणे तुरुंगातल्या प्रशासनाला कठीण जात होते. या कैद्यांना हाताळण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नेल्सन मंडेलांची मदत मागितली गेली. त्या वेळेपर्यंत मंडेलांना तुरुंगात येऊन पंधरा वर्षे होत आली होती. साठीतले मंडेला आता कसे दिसतात, याविषयी काहीच माहिती कोणालाही नव्हती. त्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यावरदेखील बंदी घातली गेली होती. त्यामुळे एक प्रकारचे गूढ वलय मंडेलांभोवती तयार झाले होते. अर्थात असे असले, तरी मंडेला प्रत्यक्षात काय स्वरूपाचे आयुष्य रॉबेन बेटांवरच्या तुरुंगात जगत होते?

तीन

मंडेलांना तिथे पाठवले, तेव्हा रॉबेन बेटावरच्या तुरुंगात कोणतेही घड्याळ किंवा कॅलेंडर ठेवलेले नव्हते. तसेच या राजकीय कैद्यांना वाचायला वर्तमानपत्रे दिली जात नसत. प्रत्येक आठवडा त्याधीच्या आठवड्यासारखाच असे. काळ-वेळेचे भान संपवणे आणि प्रचलित घडामोडींपासून दूर ठेवणे या दोन्ही शिक्षा मंडेला यांच्यासारख्या राजकीय कैद्यांसाठी फारच क्लेशकारक होत्या. त्यामुळे मग मंडेलांनी आपल्या कोठडीतील भिंतीवरच कॅलेंडर आखून घेतले होते. या कैद्यांना राजकीय कारणांसाठी शिक्षा झालेली असूनही दिवसाचे दहा तास रोज रणरणत्या उन्हात चुनखडीचे खडक फोडावे लागत. त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात तुरुंगातील गार्ड्स लघवी करून ठेवत. या कैद्यांना सहा महिन्यांतून आपल्या कुटुंबाला एक पत्र पाठवणे आणि अर्ध्या तासाची एक भेट घेणे याचीच मुभा होती.

मंडेलांना अटक झाली, तेव्हा त्यांचे दुसरे लग्न होऊन सहा वर्षे झाली असली आणि दोन मुली पदरात असल्या, तरी आपल्या तरुण बायकोबरोबर त्यांना फारच कमी वेळ घालवता आलेला होता. लग्नानंतर ते भूमिगत कार्य आणि सशस्त्र लढा यांच्या चक्रातच  अडकले होते. त्यांना हे सहा महिन्यांचे बंधन फारच त्रासदायक होते. मंडेला तुरुंगात गेल्यानंतर त्यांना आपल्या बायकोचे- विनीचे पहिले पत्र सहा महिन्यांनी न देता नऊ महिन्यांनी दिले गेले. तसेच त्या पत्राला फारच सेन्सॉर केले गेले होते. असेच सत्र त्यापुढेही चालू राहिले. तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले होते की, मंडेलांना जर खऱ्या अर्थाने छळायचे असेल तर त्यांच्या पत्नीचा- विनीचा छळ करायला हवा. त्यामुळे मग विनीवर सतत पाळत ठेवणे, तिचे जगणे अशक्य करून टाकणे आणि पुढे तर अटक करून कोठडीत तिचा भयानक छळ करणे असे सर्व उपाय केले गेले. या काळात त्यांच्या दोन लहान मुली घरीच होत्या. त्यांचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. हे मंडेलांच्या कानांवर गेले, तेव्हा ते फार अस्वस्थ झाले होते. मात्र तुरुंगातच त्यांनी स्वतःच्या भावना चेहऱ्यावर दिसू नयेत याची काळजी घ्यायला सुरुवात केली.

तसेच विनीच्या विवाहबाह्य शारीरिक संबंधांच्या/प्रेमाच्या काही खऱ्या आणि बऱ्याचशा खोट्या अशा कहाण्या तुरुंगातील गार्ड्स मंडेलांच्या कानांवर जाणीवपूर्वक घालत असत. या साऱ्याचा मंडेलांवर मानसिक ताण पडायला लागला. त्यामुळे त्यांनी लढाईचे केंद्र बदलायचे ठरवले. सरकारने सर्व महत्त्वाचे राजकीय कैदी एकत्र करून रॉबेन बेटावरच ठेवलेले असल्याने मंडेलांनी ठरवले की, आपण या तुरुंगाचे विद्यापीठात रूपांतर करायचे. अनेक राजकीय कैद्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. त्यामुळे कडक उन्हात चुनखडीचे खडक फोडता-फोडता आफ्रिकेचा इतिहास व राजकारण यावर चर्चा करणे, आणि अशिक्षित कैद्यांना सुशिक्षित करणे असा कार्यक्रम चालू झाला. सत्तेची सूत्रे आपल्या हातात आली तर काय करायचे, धोरणांची दिशा काय असायला हवी वगैरे मुद्‌द्यांची चाचपणी आणि त्यावरील घमासान चर्चा करण्यास मंडेलांनी सुरुवात केली. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देण्याचे त्यांचे कसब यात पणाला लागत असे. तसेच आपल्याला आफ्रिकानेर समूहाशी सामना करायचा आहे. त्यामुळे त्यांची भाषा आपल्याला यायला हवी, म्हणून मंडेलांनी तुरुंगातच ‘आफ्रिकान्स’ ही भाषा शिकून घेतली.

मंडेला तुरुंगात असताना विनी मंडेलांनी बाहेर संघर्षाची ज्योत पेटती ठेवलीच होती. एकीकडे black consciousness चळवळीचा प्रभाव आणि दुसरीकडे विनी मंडेला व ऑलिव्हर टाम्बो यांच्यासारखे वर्णभेदाविरोधात देशात व देशाबाहेर राहून अथक संघर्ष करणारे नेते यामुळे सरकारी अत्याचारांमध्ये वाढ होऊनही कृष्णवर्णीय जनता हतप्रभ झाली नाही. 1970 च्या दशकातच दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेला असलेल्या झिम्बाब्वेमध्येसुद्धा गौरवर्णीय राजवटीविरोधात संघर्ष चालू होता. तो 1980 मध्ये संपला आणि रॉबर्ट मुगाबे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार सत्तेत आले. अंगोला, मोझांबिक आणि झिम्बाब्वे येथील गौरवर्णीय राजवटी एकापाठोपाठ एक अशा कोसळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतच आता वर्णभेदी राजवट

शिल्लक राहिली होती. आजूबाजूचे स्वतंत्र झालेले आफ्रिकी देश आता दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकू लागले. तिथे राहून आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे कार्यकर्ते दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीवर हल्ले करू लागले. अशा साऱ्या घटकांमुळे 1980 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय सत्ता किती काळ टिकेल, याबाबत शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली.

तसेच आपल्या विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि आपले प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी दक्षिण आफ्रिकी राजवट अंगोला, झिम्बाब्वे, मोझांबिक या देशांत हस्तक्षेप करू लागली. तेथील बंडखोरांना मदत पुरवू लागली. दक्षिण आफ्रिका हा आफ्रिकेतील सर्वांत श्रीमंत आणि लष्करी दृष्ट्या बलाढ्य देश होता. त्यामुळे अशी युद्धे चालू ठेवणे त्यांना कठीण नव्हते. मात्र या राजवटीविरोधात काळे ढग हळूहळू जमा व्हायला सुरुवात झाली होती. एकीकडे अंतर्गत स्तरावरचा संघर्ष आणि दुसरीकडे वाढता बाह्य दबाव यामुळे दक्षिण आफ्रिका कोंडीत सापडणार याची चिन्हे दिसू लागली. याच काळात मंडेलांना तुरुंगात जाऊन वीस वर्षे झाली होती. मंडेलांच्या सुटकेची मागणी जगभरातून होऊ लागली होती. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने रणनीतीचा भाग म्हणूनसुद्धा मंडेलांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्याचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती. मंडेलांना जगभरातून वेगवेगळे नागरी सन्मान दिले जाऊ लागले, अनेक देशांत त्यांचे नाव रस्त्यांना दिले गेले. याच सुमारास डेसमंड टुटू यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यामुळेही दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष जगासमोर यायला मदत झाली.

याच काळात दक्षिण आफ्रिकेवर आर्थिक निर्बंध अधिक तीव्र व्हायला सुरुवात झाली होती. अमेरिकी कंपन्यांनी आणि इतर परदेशी गुंतवणूकदारांनी दक्षिण आफ्रिकेतून 1985 पासून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. आर्थिक निर्बंध आणि अंतर्गत अस्थैर्य यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थिती अधिकाधिक चिंताजनक बनत चालली होती. तसेच वर्णभेदी राजवटीने आपली धोरणे बदलावीत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाढता दबाव यायला सुरुवात झाली. याच काळात बर्लिनची भिंत कोसळली आणि अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यातील शीत युद्धाचा शेवट होणार याची चिन्हे दिसू लागली होती. अशा बदलत्या जगात वर्णभेदी राजवट टिकणे शक्यच नव्हते.

दरम्यानच्या काळात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष बोथा यांनी राजीनामा दिला. बोथा हे वर्णभेदाचे कट्टर समर्थक होते. एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क हे त्यांच्यानंतर अध्यक्ष झाले. ते प्रागतिक विचारांचे होते. त्यांनी काळाची पावले ओळखून मंडेलांशी बोलणी सुरू केली. मंडेलांना 1982 नंतर रॉबेन बेटावरून हलवून दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य भूमीवर आणले गेले होते. सरकारने त्यांना थोड्याफार सुविधा पुरवण्यास सुरुवात केली होती. त्यांना आणि इतर काही राजकीय कैद्यांना 1985 मध्ये प्रथमच तुरुंगातून बाहेर काढून एका बंगल्यात पण कैदेतच ठेवले गेले. तसेच त्यांच्याशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे, अशीही चर्चा अधून-मधून त्यांच्या कानांवर येऊ लागली होती. सरकारातले वरिष्ठ अधिकारी मंडेलांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भूमिकांचा अंदाज घेऊ लागले होते.

या सरकारकडून चर्चेसाठी प्रस्ताव आला तर काय करायचे, याबाबत मंडेला ठाम होते. वर्णभेदी राजवट शिल्लक ठेवून कोणतीही चर्चा होऊच शकत नव्हती. त्यामुळे वर्णभेदाचा शेवट आणि सर्वांना समान हक्क देणारी लोकशाही या देशात आणणे, हे स्वप्न मंडेलांनी 1940 च्या दशकापासून जोपासले होते. त्याची पूर्तता होण्याची शक्यता आता दिसू लागली. वयाच्या 72 व्या वर्षी, 27 वर्षे तुरुंगवास भोगून मंडेला 11 फेब्रुवारी 1990 रोजी तुरुंगातून बाहेर आले. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड संपण्याची आणि पहाट होण्याची चिन्हे दिसू लागली होती.

पहिला भाग इथे वाचा.

दुसरा भाग इथे वाचा.

Tags: मंडेला जन्मशताब्दी विनी मंडेला नेल्सन मंडेला संकल्प गुर्जर vini mandela nelson madela sankalp gurjar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके