डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वर्णभेदी राजवटीचा शेवट आणि नव्या दक्षिण आफ्रिकेची पायाभरणी

मंडेला हे दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यांच्या शपथविधीसाठी जगातील 170 देशांचे प्रतिनिधी (राजदूत, मंत्री, पंतप्रधान, राजे वगैरे) उपस्थित होते. मंडेलांचे सत्तेत येणे आणि दक्षिण आफ्रिकेत खऱ्या अर्थाने लोकशाही येणे याचे साऱ्या जगाने स्वागतच केले होते. याच सुमारास मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेबाबत ‘रेन्बो नेशन’ अशी संज्ञा वापरण्यास प्रारंभ केला होता. इंद्रधनुष्यात जसे सात वेगवेगळे रंग असतात आणि त्यामुळे त्याच्या सौंदर्याला बाधा न येता ते कसे अधिकच खुलून दिसते, तसेच विविध वर्णांच्या लोकांमुळे दक्षिण आफ्रिका हा देश अधिकच सुंदर होतो, असा याचा अर्थ होता. नव्यानेच सत्तासूत्रे हाती घेतलेल्या मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला ‘रेन्बो नेशन’ असे संबोधून आपल्या सरकारची दिशा काय असणार आहे याचीही चुणूक दाखवून दिली होती.

ज्या राजवटींनी आपल्या नागरिकांविरुद्धच युद्ध पुकारले होते, देशातील जनतेला मूलभूत अधिकार आणि सुविधा यापासून वंचित ठेवले होते अशा राजवटींचा शेवट होणे अपरिहार्य आहे, असाच आतापर्यंतच्या एकूण इतिहासाचा दाखला दिसतो. त्यामुळेच जगाच्या इतिहासात जुन्या अत्याचारी राजवटी कोसळणे आणि नव्या राजवटी सत्तेत येणे, हा क्रम अव्याहतपणे सुरूच राहिलेला आहे. काही वेळा बाहेरून हस्तक्षेप करून राजवटी बदलल्या जातात. उदा. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा दोस्त राष्ट्रांनी पराभव केला आणि हिटलरची राजवट संपवली. किंवा काही वेळा अंतर्गत दबाव, बदलती धोरणे आणि बदलती आंतरराष्ट्रीय परिस्थिती यामुळे राजवटी कोसळतात. इराण आणि सोव्हिएत युनियनमध्ये जे बदल झाले, ते या स्वरूपाच्या कारणांमुळे होते. राजवटी बदलताना केवळ अर्थकारण आणि राजकारणच बदलते असे नव्हे, तर त्या-त्या देशाचा भूगोलही बदलू शकतो. सोव्हिएत युनियन आणि नाझी जर्मनी अशा दोघांच्याही बाबतीत राजवट बदलण्याच्या प्रक्रियेत त्यांचा भूगोलही बदलला, हे आपल्यासमोर आहेच.

दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस यापैकी नेमके काय स्वरूपाचे बदल होणार आणि हा देश त्याला कसा सामोरा जाईल, याविषयी जगभरात कुतूहल-उत्सुकता-उत्कंठा आणि भीती अशा संमिश्र स्वरूपाच्या भावना होत्या. मंडेला आणि इतर महत्त्वाचे राजकीय कैदी 1990 मध्ये तुरुंगातून बाहेर आले होते आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरील बंदी उठवलेली होती. वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष एफ.डब्ल्यू.डी.क्लर्क हे मंडेलांशी चर्चा करण्यास तयार होते. देशातील वर्णभेदी राजवट संपवून सर्व नागरिकांना समान राजकीय हक्क देणारी अशी लोकशाही शासनप्रणाली देशात आणायची, हे उद्दिष्ट तर स्पष्ट होते. दोन्ही बाजूंमधील ही चर्चा तीन वर्षे चालू होती. या काळात या वाटाघाटी अपयशी ठरतील असे अनेकदा वाटले होते. तसेच राजवट बदलताना हा देश यादवी युद्धाच्या आणि भौगोलिक फुटीरतेच्या दिशेने जाईल, अशीही भीती व्यक्त होत होती. मात्र असे काहीही झाले नाही.

सत्ताबदलाच्या वाटाघाटी निर्वेधपणे पार पडल्या आणि मंडेला 1994 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. ही प्रक्रिया आणि त्यानंतरचा काळ याकडे आपण शेवटच्या लेखातून दृष्टिक्षेप टाकणार आहोत.  

एक

मंडेला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मे 1990 मध्ये गौरवर्णीय राजवटीचे प्रतिनिधी आणि मंडेला, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते यांच्यात एक तीन दिवसांची परिषद झाली. मुख्य वाटाघाटी सुरू होण्यापूर्वीची अशी ही परिषद होती आणि तिचा मुख्य उद्देश हा वाटाघाटींमध्ये कोणत्या विषयांची चर्चा व्हावी हे ठरवणे, असा होता. दोन्ही बाजूंमध्ये मतभेदाचे अनेक मुद्दे होते. उदा.- वर्णभेदी राजवटीचा अधिकृत शेवट करणे, देशांतर्गत आणीबाणी उठवणे, राजकीय कैद्यांची मुक्तता, गौरेतर वसाहतींमधून सुरक्षा दलांना हटवणे, वर्णभेदी राजवटीला होणाऱ्या सशस्त्र प्रतिकाराचा शेवट करणे, आंतरराष्ट्रीय समूहाने लादलेले निर्बंध उठवणे, हिंसाचाराचा शेवट घडवून आणणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत नव्या राजकीय व्यवस्थेची पायाभरणी करणे इत्यादी.

एकीकडे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क यांच्यात चर्चा सुरू झाली असली, तरी दुसरीकडे त्याच सुमारास देशातील अनिष्ट प्रवृत्ती आता उफाळून यायला सुरुवात झाली. मंडेलांबरोबर सरकारच्या चाललेल्या वाटाघाटींना गौरवर्णीय समूहातल्या अतिउजव्या गटांचा विरोध होता. त्यांनी शस्त्रांची जमवाजमव चालू केली होती. तसेच कृष्णवर्णीय समूहातील झुलू जमातीचा नेता चीफ बुथेलेझी याचाही या वाटाघाटींना विरोध होता. झुलू जमातीकडे त्यांची पारंपरिक शस्त्रे होतीच. त्याशिवाय मंडेलांवर दबाव टाकण्यासाठीसुद्धा झुलू जमातीच्या नेत्यांचा उपयोग करून घेता येईल, असेही गणित डी.क्लर्क यांच्या सरकारने मांडले होते.

आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची शक्ती खच्ची करण्यासाठी सरकारने 1980 च्या दशकापासूनच गुप्तपणे झुलू जमातीच्या नेत्यांना उत्तेजन दिले होते. हे नेते वर्णभेदाला उघडपणे विरोध करत असत; मात्र आपण आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या हिंसाचाराच्याही विरोधात आहोत, असे म्हणत. त्यामुळे यांची नेमकी भूमिका काय याविषयी पुरेसा संभ्रम होता. त्याचाच फायदा घेऊन सरकार कृष्णवर्णीय समूहात बुद्धिभेद करत असे. हेच धोरण एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क यांच्या सरकारने पुढे चालू ठेवले होते. त्यामुळे जशा सरकारने मंडेलांशी वाटाघाटी चालू केल्या, तशा झुलू जमातीच्या लोकांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या समर्थकांवर भीषण हल्ले चालू केले. हे हल्ले रोखण्यासाठी गौरवर्णीय पोलिसांनी काहीही केले नाही. त्यामुळे 1990 ते 1993 या काळात झुलू विरुद्ध आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे समर्थक यांच्यात प्रचंड हिंसाचार झाला. त्यात दहा हजारांहून अधिक लोक मारले गेले. हा हिंसाचार थांबवावा, असे मंडेलांनी आवाहन करूनही तो काही थांबला नाही.

या हिंसाचाराची जबाबदारी कोणाची, यावरून मंडेला आणि एफ.डब्ल्यू.डी. क्लर्क यांनी या काळात अनेकदा एकमेकांवर दोषारोप केले. चर्चेदरम्यान मंडेलांच्या असे लक्षात आले होते की, गौरवर्णीय समूहाला आपले हित जपण्यासाठी नव्या दक्षिण आफ्रिकेच्या सर्व ध्येय- धोरणांवर नकाराधिकार हवा होता, तर मंडेलांना ब्रिटिश पद्धतीची संसदीय लोकशाही व्यवस्था हवी होती. तसेच डी.क्लर्क यांच्या सरकारला आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या समर्थकांवर एका बाजूला झुलू, तर दुसऱ्या बाजूला अतिउजव्या गौरवर्णीय समूहाकडून होणारे हल्ले थांबवण्यात कोणताही रस नव्हता. गौरवर्णीय कडव्या गटांनी मंडेलांचे मित्र आणि नव्या दक्षिण आफ्रिकेचे तरुण नेते ख्रिस हानी यांची हत्या करून आपण कोणत्या स्तराला जाऊ शकतो, याची चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे मंडेलांनी तर एकदा ‘आपण वाटाघाटी थांबवत आहोत’ असेही जाहीर केले होते.

मात्र असे असले, तरीही वाटाघाटी चालूच राहिल्या. वाटाघाटी चालू राहाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय दबावही खूपच होता. उदा.- मंडेला आणि एफ.डब्ल्यू.डी.क्लर्क यांना 1993 मध्ये संयुक्तपणे शांतेतेचे नोबेल पारितोषक दिले गेले. हे पारितोषिक जितके त्यांच्या योगदानासाठी होते तितकेच ते अधिक जबाबदारी टाकणारेही होते. मंडेलांच्या हे लक्षात आले होते की, डी.क्लर्क हे कितीही संकुचित मनोवृत्तीचे राजकीय नेते असले तरी वर्णभेदी राजवट संपवायची असेल, तर आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते अनेकदा त्या काळात असे म्हणत असत की, मला डी.क्लर्क आवडतात की नाही हा प्रश्नच नाही; मला वर्णभेदी राजवट संपवण्यासाठी त्यांची गरज आहे. डी.क्लर्क यांच्याही हे लक्षात आले होते की, गौरवर्णीय समूहाच्या व्यापक हिताला धक्का न लावता बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेला असलेल्या झिम्बाब्वेच्या गौरवर्णीय राजवटीने 1970 च्या दशकात त्यांना अनुकूल परिस्थिती असतानाही वाटाघाटी केल्या  नाहीत. यापासून धडा घेऊन डी.क्लर्क यांनी ती चूक दक्षिण आफ्रिकेत होऊ नये याची दक्षता घेतली. त्यांनी 1992 मध्ये गौरवर्णीय समूहात वर्णभेदी राजवट संपवावी की संपवू नये, याबाबत सार्वमत घेतले होते. तिथेही राजवट संपवायला हवी, या बाजूनेच कौल लागला होता. वाटाघाटीच्या काळात कसोटीचे अनेक क्षण आले होते. एकीकडे दक्षिण आफ्रिकेत वाटाघाटी चालू असताना युरोपातील युगोस्लाव्हिया या देशाचे विघटन होऊन तिथे वंश आणि धर्म या कारणांमुळे यादवी युद्ध चालू होते.

आफ्रिका खंडातच रवांडा नावाच्या देशात 1993 मध्ये एका जमातीने केवळ 100 दिवसांत दुसऱ्या जमातीच्या आठ लाखांहून अधिक लोकांची हत्या केली होती. दक्षिण आफ्रिकेत विविध जमातींमध्ये व वर्णांवर आधारित असे यादवी युद्ध होणे आणि देशाचे विघटन होऊन अनेक तुकड्यांत देश विभागला जाणे हे दोन्ही स्वरूपाचे धोके कायमच होते. ते टाळून वाटाघाटी यशस्वी झाल्या, हे मंडेला आणि त्यांचे सहकारी व डी.क्लर्क आणि त्यांचे सहकारी यांचे यश होते.

वाटाघाटी पूर्ण होऊन दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये असे ठरले की, एप्रिल 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या. त्यासाठी देशभरात तीन कोटी मतदारपत्रिका पोचवणे आणि दहा हजार मतदान केंद्रे उभी करणे, ही आव्हाने होती. वर्णभेदी राजवटीचे रक्षण करण्यासाठी उभारलेल्या दोन लाख सुरक्षारक्षकांचा वापर करून ही निवडणूक पार पडली जाणार होती. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील ही पहिली सार्वत्रिक निवडणूक असणार होती. (याआधी गौरेतरांना मतदानाचा हक्कच नसल्याने स्वतःला लोकशाही म्हणवूनही दक्षिण आफ्रिका खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी देश नव्हता.)

मंडेला 76 वर्षांच्या आयुष्यात अशा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच प्रचार करणार होते. दक्षिण आफ्रिकेत सर्वांना चांगल्या जीवनमानाची हमी देणारा असा निवडणूक अजेंडा त्यांनी तयार केला होता. असे असले, तरीही आपली सत्ता आल्यास लोकांच्या जगण्यात लगेचच फार मोठे बदल होतील अशी अपेक्षा बाळगू नका, असे ते सांगत असत. मतदानाच्या दिवशी पहाटेपासूनच दक्षिण आफ्रिकेत सर्वत्र मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. लोक सणासुदीला जसे नटून जातात, तसे मतदानाला गेले होते. प्रचंड मोठ्या रांगांमध्ये एकत्र उभे राहून गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय समूहाने त्या दिवशी मतदान केले. 1948 ते 1994 या सेहेचाळीस वर्षांचा काळा इतिहास मागे टाकून दक्षिण आफ्रिका नव्या युगात प्रवेश करायला सज्ज होत होती. वर्णभेदी राजवट संपून देशात लोकशाही राजवट आल्याने जशी कृष्णवर्णीय समूहाची अन्यायी राजवटीच्या जोखडातून मुक्तता झाली होती, तशाच स्वरूपाचा अनुभव गौरवर्णीय समूहाला पण येत होता. अन्याय करणारे आणि तो सहन करणारे अशा दोघांच्याही स्वातंत्र्याचा हा क्षण होता.

निवडणुकांमध्ये मंडेलांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला 62 टक्के मते आणि 400 पैकी 252 जागा मिळाल्या. डी.क्लर्क यांच्या पक्षाला वीस टक्के मते आणि 82 जागा मिळाल्या, तर झुलू नेत्यांच्या पक्षाला 43 जागा मिळाल्या  होत्या. नव्या दक्षिण आफ्रिकेचे हे सरकार राष्ट्रीय असणार होते. त्यामुळे या सरकारमध्ये मंडेला अध्यक्ष झाले असले, तरीही डी.क्लर्क हे थाबो एम्बेकी यांच्याबरोबरीने उपाध्यक्ष झाले. एके काळी अध्यक्ष राहिलेल्या डी.क्लर्क यांच्यासारख्या नेत्याने नव्या सरकारात उपाध्यक्ष होणे याला फार मोठा मानसिक आणि राजकीय अर्थ होता. देशातील गौरवर्णीय समूहाला एकाच वेळी त्यांचे सत्तेतले महत्त्व कमी झाले आहे आणि तरीही हा देश तुमचा आहे हा स्पष्ट संदेश देणारा असा तो प्रसंग होता.

मंडेला हे दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यांच्या शपथविधीसाठी जगातील 170 देशांचे प्रतिनिधी (राजदूत, मंत्री, पंतप्रधान, राजे वगैरे) उपस्थित होते. मंडेलांचे सत्तेत येणे आणि दक्षिण आफ्रिकेत खऱ्या अर्थाने लोकशाही येणे याचे साऱ्या जगाने स्वागतच केले होते. याच सुमारास मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेबाबत ‘रेन्बो नेशन’ अशी संज्ञा वापरण्यास प्रारंभ केला होता. इंद्रधनुष्यात जसे सात वेगवेगळे रंग असतात आणि त्यामुळे त्याच्या सौंदर्याला बाधा न येता ते कसे अधिकच खुलून दिसते, तसेच विविध वर्णांच्या लोकांमुळे दक्षिण आफ्रिका हा देश अधिकच सुंदर होतो, असा याचा अर्थ होता. नव्यानेच सत्तासूत्रे हाती घेतलेल्या मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला ‘रेन्बो नेशन’ असे संबोधून आपल्या सरकारची दिशा काय असणार आहे याचीही चुणूक दाखवून दिली होती.

दोन

नेल्सन मंडेला सत्तेत आल्यानंतर त्यांच्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर उभा होता. वर्णभेदी राजवटीच्या सेहेचाळीस वर्षांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या नागरी जीवनात आफ्रिकानेर समूहाचे पूर्ण वर्चस्व सर्वत्र निर्माण झाले होते. लष्कर, उद्योग, व्यापार, प्रशासन, शिक्षण असा सर्वत्र आफ्रिकानेर समूह सत्तेत होता. जर गौरवर्णीय आफ्रिका हा स्वतंत्र देश मानला असता तर तो जगातील एक फार समृद्ध देश आहे, असेच म्हणावे लागले असते. आता त्याच दक्षिण आफ्रिकेतील राजकीय सत्ता ही गौरेतर समूहाकडे गेली होती, तरीही राष्ट्रीय जीवनाची इतर सर्व क्षेत्रे गौरवर्णीयांनी व्यापलेली होती. अशा या गौरवर्णीय प्रस्थापित नेतृत्वाला सांभाळून कृष्णवर्णीय समूहाची प्रगती घडवून आणणे, हे एक प्रचंड काम होते. दोन्ही समूहांतील साडेतीनशे वर्षे जाणीवपूर्वक जोपासलेली दरी इतकी अफाट होती की, त्यासाठी आता पिढ्यान्‌पिढ्या काम करावे लागणार होते.

दक्षिण आफ्रिकेच्या चार कोटी नागरिकांपैकी फक्त तेरा टक्के म्हणजे साधारतः पन्नास लाख नागरिक हे गौरवर्णीय होते. मात्र देशातील उत्पन्नात साठ टक्के वाटा या समूहाचा होता. एकीकडे गौरवर्णीय समूह असा संपन्न असतानाच दुसरीकडे देशातील एकूण सव्वा कोटी लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नव्हता, सव्वादोन कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नव्हती, तर वीस लाख मुले शाळेत जात नव्हती. सव्वा कोटी जनता ही पूर्णतः निरक्षर होती. वर्णभेदी राजवटीच्या शेवटच्या काळात दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध तीव्र केले गेले होते. तसेच देशांतर्गत स्तरावरसुद्धा अस्वस्थता असल्याने देशाची आर्थिक स्थिती फारच घसरलेली होती. त्यामुळे मंडेलांनी निवडणुकीत दिलेले नोकऱ्यांचे, घरांचे आश्वासन काही पूर्ण होणार नाही, अशीच चिन्हे दिसत होती. याच्याच बरोबरीने आणखी महत्त्वाचा धोका असा होता की- आता गौरेतर समूहाकडे राजकीय सत्ता आल्यामुळे गौरवर्णीय तंत्रज्ञ, प्रशासक, उद्योजक आणि इतर कुशल मनुष्यबळ देश सोडून जाईल, अशी भीती होती.

तसे झाले असते तर दक्षिण आफ्रिकेचा आर्थिक गाडा रुळावरून पूर्णतः घसरला असता. तसे होऊ नये म्हणून मंडेलांनी जातीने लक्ष घालून गौरवर्णीय समूहातील आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांच्या खास भेटी घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचे काम केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी लढ्याच्या काळात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्रितपणे काम करत होते. तसेच 1955 मध्ये जो स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला होता, तेव्हापासून आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या आर्थिक धोरणाची भाषा ही डावीकडे झुकलेलीच होती. या घटकाचा मंडेलांवर दुहेरी दबाव असणार होता. एकीकडे देशांतर्गत पातळीवर कम्युनिस्ट पक्ष व कामगार संघटना डावीकडे झुकलेली धोरणे राबवण्याची मागणी करणार आणि दुसरीकडे नेमके त्यामुळेच परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणे कठीण जाणार, असा तो पेच होता.

यातून मार्ग काढत आर्थिक वाढीला उत्तेजन देणे आणि देशाला वेगाने पुढे घेऊन जाणे आवश्यक होते. या साऱ्याची दखल घेत मंडेलांनी डाव्या धोरणाचा आग्रह सोडला. आर्थिक शिस्त आणणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे यावर आधारित मुक्त  व्यापाराला उत्तेजन देणारी धोरणे राबवली गेली. मंडेलांचे उपाध्यक्ष थाबो एम्बेकी यांचा यात महत्त्वाचा सहभाग होता. दक्षिण आफ्रिकेच्या राजकीय-सामाजिक आघाडीवर पाहिल्यास देशातील विषमता कमी करणे, पायाभूत सुविधा उभ्या करून कृष्णवर्णीय समूहाची प्रगती साधणे, देशांतर्गत राज्यांची व प्रशासकीय विभागांची पुनर्रचना करणे, लष्करात आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सशस्त्र कार्यकर्त्यांना सामावून घेणे, विविध वर्णीय लोकांचे परस्परांमधील संबंध सुधारणे आणि आपण एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना निर्माण करणे आवश्यक होते.

कृष्णवर्णीय समूह इतके दिवस वर्णभेदी राजवटीविरुद्ध लढत असल्याने कर, वीजबिले न भरणे, कामावर गैरहजर राहणे, सातत्याने आंदोलने करणे, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येणे अशा सवयी त्याला लागल्या होत्या. त्या बदलून याच नागरिकांना देशाचे जबाबदार नागरिक करणे आणि देशाच्या प्रगतीत त्यांना योगदान द्यायला लावणे हे मोठे आव्हान मंडेलांसमोर होते. तसेच दक्षिण आफ्रिकेत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. वर्णभेदी राजवटीने खऱ्या गुन्हेगारांवर लक्ष न देता वर्णभेदाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर लक्ष दिल्याने गुन्हेगार मोकळेच होते. तसेच दक्षिण आफ्रिका हे अमली पदार्थांच्या व्यापाराचे केंद्र बनले होते. या साऱ्या प्रश्नांकडे लक्ष देताना मंडेलांच्या हे लक्षात आले होते की, विविध वर्णांचे आपापसात संबंध कसे आहेत यावर दक्षिण आफ्रिकेचे भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे गौरवर्णीय आणि गौरेतर यांच्यात चांगले संबंध निर्माण व्हावेत यामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले. नव्या दक्षिण आफ्रिकेला जर पुढे जायचे असेल तर वर्णद्वेषाला, वर्णधारित गुन्ह्यांना आळा घालावा लागणार होता.

तसाही मंडेलांच्या मनात गौरवर्णीय समाजाविषयी कधीच राग नव्हता. त्यांना वर्णभेदी राजवटीचा तिरस्कार होता. तसे त्यांनी जाहीररीत्या बोलूनही दाखवले होते. त्यासाठीचा आदर्श स्वतःच्या वर्तनातून आपणच घालून द्यावा, असे मंडेलांनी ठरवले आणि त्या दृष्टीने आवश्यक ती पावले टाकायला सुरुवात केली. मंडेलांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या अध्यक्षीय घराला ‘आफ्रिकान्स’ भाषेतील नाव दिले. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना ते नेहमी ‘आफ्रिकान्स’ भाषा वापरत असत. त्यांनी डी.क्लर्क यांना आपल्या मंत्रिमंडळात घेताना त्यांचा पुरेसा सन्मान राखला जाईल याची दक्षता घेतली होती. तसेच उजव्या विचारांच्या इतर गौरवर्णीय राजकीय नेत्यांशीही त्यांनी जाणीवपूर्वक संबंध जोपासले होते. वर्णभेदी राजवटीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या Hendrick Verwoerd यांच्या पत्नीची खास भेट घेतली होती. यावरून मंडेलांवर कृष्णवर्णीय समूहाकडून टीकाही झाली.

मात्र तिला न घाबरता ते या आघाडीवर पुढे जात राहिले. पुढे 1995 मध्ये रग्बी या खेळाचा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होणार होता. रग्बी हा खेळ हा आफ्रिकानेर समूहाचा मानबिंदू मानला जात असे. मंडेलांनी ही संधी साधून रग्बी विश्वचषकाला देशभरातून पाठिंबा मिळेल या दृष्टीने जाणीवपूर्वक पावले टाकली. त्यांनी रग्बी या खेळाला गौरवर्णीय आणि गौरेतर यांच्यात पूल बांधण्याचे साधन म्हणूनच वापरले. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मंडेला स्वतः दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या कप्तानाची जर्सी घालून उतरले होते. त्यांच्या त्या कृतीने सारा देश भारावून गेला होता. ‘इन्व्हिक्टस’ नावाचा एक अप्रतिम सिनेमाही या विश्वचषकावर आला होता. एकीकडे स्वतः क्षमाशीलतेचा संदेश देत असतानाच मंडेलांना हेही माहिती होते की, वर्णभेदी राजवटीच्या काळातील अत्याचारांची-गुन्ह्यांची कुठे तरी दखल घेतली जायला हवी. या काळावर पडदा टाकण्यासाठीच त्या काळातील सत्य समोर आणणे, गुन्ह्यांची चौकशी होणे गरजेचे होते; त्याशिवाय वर्णभेदी राजवटीचा शेवट होणे आणि नव्या दिशेने जाणे ही प्रक्रिया अपुरी राहिली असती.

दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी जर्मनीच्या सत्ताधीशांना न्युरेनबर्ग येथे युद्धन्यायालयात खटले चालवून शिक्षा दिल्या गेल्या होत्या. तसे दक्षिण आफ्रिकेत करणे शक्य नव्हते. त्यामुळे मग मंडेलांनी आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्याशी सल्लामसलत करून एक नवा मार्ग काढला. त्यांनी Truth and Reconciliation Commission (TRC) या नावाचा एक आयोग स्थापन केला. या आयोगाला न्यायालयीन चौकशीचे अधिकार नव्हते. मात्र वर्णभेदी राजवटीच्या काळातील सत्य समोर यावे यासाठी या आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. वर्णभेदी राजवटीच्या 1960 ते 1994 या चौतीस वर्षांच्या काळात ज्या-ज्या व्यक्तींनी राजकीय कारणांसाठी मानवी हक्कांचे उल्लंघन केले, त्यांनी जर आयोगासमोर आपल्या गुन्ह्यांची  कबुली दिली तर त्यांना माफी दिली जाईल, अशी TRC मागील भूमिका होती. या आयोगाला आजही दक्षिण आफ्रिकेच्या आणि जगाच्या इतिहासात फार वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

आयोगाचे काम आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले. सुरुवातीला हा प्रयोग यशस्वी ठरेल असे कुणालाच वाटत नव्हते. मात्र एकापाठोपाठ एक अशा रीतीने वर्णभेदी राजवटीचे पोलीस अधिकारी, गुप्तहेर संघटनेतील माणसे समोर येऊन आपले गुन्हे कबूल करू लागली. नॅशनल पार्टीचे सरकार सत्तेत राहावे म्हणून, कम्युनिझमचा प्रसार रोखावा म्हणून आणि स्वातंत्र्यवादी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा प्रभाव वाढू नये म्हणून केलेल्या हत्या, अत्याचार, छळ यांची कहाणी जगासमोर येऊ लागली. सरकारच्या छळाची कहाणी समोर येतानाच दुसरीकडे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले अत्याचारही आयोगासमोर हळूहळू येत होते. आयोगाचे काम पुढे सरकू लागले तसतसे नॅशनल पार्टीचे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अस्वस्थ होऊ लागले होते, कारण त्या काळातील अत्याचारांबाबत आयोग त्यांच्यावर ठपका ठेवणार होता, हे उघड होते.

या आयोगाचे काम सरकारी टीव्ही, रेडिओ वाहिन्या यावरून नियमितपणे प्रसारित केले जाई. जगभर त्याची दखल घेतली जात असे. आजही त्या आयोगाच्या कामकाजाचे, माणसांच्या साक्षींचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आपल्या गुन्ह्यांची कबुली देताना, आपल्या जवळच्या माणसांचा कसा छळ करून त्यांना मारले गेले हे ऐकवताना/ऐकताना माणसे अक्षरशः कोलमडून पडत असत. अतिशय हृदयद्रावक अशा त्या कहाण्या पाहताना आजही मन हेलावून जाते. या साऱ्या काळात घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्ये असे दिसत राहिले की, गौरवर्णीय समूहातील बहुमताला TRCवर विश्वास नव्हता. त्यांना असे वाटत होते की, या आयोगामुळे कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांचे संबंध अधिकच खालावत गेले आहेत. कृष्णवर्णीय समूहात याबाबत अतिशय उलटी प्रतिक्रिया येत असे. तिथे बहुसंख्य समूहाला असे वाटत होते की, आयोगाने सर्व बाजूंना पुरेसा न्याय दिलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील गौरवर्णीय समूहाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे मानणारे गट कृष्णवर्णीय समूहात होते, तर आता हे कृष्णवर्णीय समूहाचे लोक आपल्यावर सूडच घ्यायला निघाले आहेत असे मानणारे गट गौरवर्णीय समूहात होते.

दोन्हीकडचे हे असे अतिरेकी लोकं सोडले तर TRCच्या कामाची जगभर प्रशंसा झाली. आजही जगभरात कोणत्याही संघर्षमय प्रदेशात (उदा. काश्मीर) TRC सारखा प्रयोग करायला हवा, असे सुचवले जाते. समूहमनाच्या जखमा भरून काढणे, मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे सत्य समोर आणणे आणि व्यक्तिगत पातळीवर द्वेष कमी करणे यासाठी आयोगाने केलेले काम प्रशंसनीय असेच होते. मंडेलांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा TRC हा सर्वांत महत्त्वाचा वारसा होता. देशाला यादवी युद्धाचा धोका, अस्वस्थ समाजमन, ठसठसत्या जखमा आणि वर्णद्वेषाचे विष यांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी याचा फारच उपयोग झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, कामामुळे आणि TRC सारख्या उपक्रमांमुळे मंडेला हे संपूर्ण देशाचे नेते झाले होते.

सत्तेवर आल्यापासून आपण एका टर्महून अधिक काळ अध्यक्षपदी राहणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले होते. स्वतःचे महत्त्व त्यांना पूर्ण माहीत असूनही देशाने आपल्याव्यतिरिक्त इतर नेत्यांकडे लक्ष द्यायला हवे, देशात लोकशाही परंपरा रुजायला हव्यात, दोन्ही समूहांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना रुजायला हवी- असा त्यांचा आग्रह होता. इतर आफ्रिकन नेत्यांप्रमाणे आयुष्यभर सत्तेला चिकटून न राहता ते 1999 मध्ये, वयाच्या 81 व्या वर्षी अध्यक्षपदावरून आणि राजकारणातून निवृत्त झाले.

तीन

मंडेलांच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे काय चालले आहे, असा प्रश्न इथे मनात येऊ शकतो. भारतात नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे जे झाले, तसेच दक्षिण आफ्रिकेत होत आहे. मंडेला होते तोपर्यंत त्या पक्षात काहीएक नीतिमूल्ये पाळणारे नेते होते. त्यानंतरच्या अठरा वर्षांत तर क्रमाने पक्षाचा आणि देशाचा ऱ्हासच होत गेला आहे. भ्रष्टाचारी नेत्यांचे प्रमाण सत्तेत वाढत गेले. जेकब झुमा यांच्यासारख्या अध्यक्षांवर तर थेट बलात्कार, आर्थिक घोटाळे आणि सत्तेच्या गैरवापराचे आरोप होते. पक्षातील लोकशाही परंपरा बाजूला सारल्या गेल्या आहेत. पक्षात निष्ठा हे मूल्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरले होते. थाबो एम्बेकींच्या काळात एड्‌सच्या अनियंत्रित प्रसाराला आळा घालण्यात अपयश आल्याने दक्षिण आफ्रिकेतील तरुण पिढीचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले. तसेच आफ्रिका खंडातील रॉबर्ट मुगाबे यांच्यासारख्या  हुकूमशहांना सत्तेतून बाजूला करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने सातत्याने त्यांना पूरक अशीच भूमिका घेतली.

एकीकडे कृष्णवर्णीय समूहात मध्यमवर्ग आणि उद्योग-व्यापार करणारा वर्ग उदयाला आला असला, तरी याच काळात दक्षिण आफ्रिकेतील गौरवर्णीय समूहात ब्रेन ड्रेनचे- देश सोडून जाण्याचे प्रमाण वेगाने वाढत गेले. दक्षिण आफ्रिका ब्रिक्स देशांच्या गटाचा सदस्य झाला असला, तरीही तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास, आंतरराष्ट्रीय राजकारणात या देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढूनही नैतिक वजन मात्र गेल्या अठरा वर्षांत क्रमाने कमीच होत गेले. नेल्सन मंडेला राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर पुढे 14 वर्षे जिवंत होते. त्यांनी निवृत्तीनंतर पक्ष आणि देश कसा चालवावा, काय धोरणे असावीत यासंबंधात अगदीच अपवादात्मक प्रसंग सोडल्यास जाहीर भूमिका कधीही घेतल्या नाहीत.

दक्षिण आफ्रिकेचे ‘सायलेंट कॉन्शन्स कीपर’ अशा भूमिकेत ते राहिले. मात्र त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर कमी-कमी होत गेला. या काळात आपल्या नावाचा एक ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत काम करण्याच्या दिशेने ते वळले होते. ग्रेका माचेल या आपल्या तिसऱ्या पत्नीबरोबर मंडेलांनी आपल्या निवृत्तीचा काळ तसा सुखात घालवला. त्यांच्या प्रकृतीच्या थोड्या कुरबुरी ते अध्यक्ष असतानाच सुरू झाल्या होत्या. अठरा वर्षे रोजचे दहा तास उन्हात चुनखडीचे खडक फोडल्यानंतर आणि वयाच्या पंच्याहत्तरीनंतर अध्यक्षपदाची कठीण जबाबदारी पाच वर्षे सांभाळल्यानंतर त्यांचे शरीर आता पूर्ण थकले होते. डिसेंबर 2013 मध्ये वयाच्या 95 व्या वर्षी मंडेला हे जग सोडून गेले.

नेल्सन मंडेला साऱ्या जगासाठी आणि दक्षिण आफ्रिकेसाठी लोकशाही, शांतता, क्षमाशीलता आणि संयम यांचे आयकॉन होते. त्यांनी वर्णद्वेषाच्या पलीकडे जाऊन आपल्या वर्तनातून व विचारांतून नव्या दक्षिण आफ्रिकेची पायाभरणी केली. देशाला वर्णभेदी राजवटीच्या जोखडातून मुक्त केल्यामुळे त्यांना ‘दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता’ असेही म्हणता येईल. मात्र तेवढेच त्यांचे काम नव्हते. त्यांनी नव्या दक्षिण आफ्रिकेत लोकशाही परंपरा रुजाव्यात, नव्या राष्ट्रीय परंपरा तयार व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्या अर्थाने ते स्वातंत्र्योत्तर दक्षिण आफ्रिकेचे शिल्पकारसुद्धा आहेत. तसेच त्यांनी शतकानुशतके मागासलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कोट्यवधी कृष्णवर्णीय जनतेला प्रगती करण्याची प्रेरणा दिली.

त्यामुळे या साऱ्या निकषांवर पाहिल्यास; भारतात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम केले त्या तिघांच्याही कामाचा संगम मंडेलांच्या कर्तबगारीत दिसतो. याच मंडेलांना तरुणपणी गांधीजी आणि नेहरू यांच्यापासून प्रेरणा मिळाली होती, हा अर्थपूर्ण योगायोगही इथे खास नोंदवावा असाच आहे. मंडेलांवर गेल्या पंचवीस वर्षांत डॉक्युमेंटरी, पुस्तके, सिनेमे, गाणी या स्वरूपाचे काही ना काही मटेरियल सतत येत असते. त्यांचे स्वत:चे आठशे पानी आत्मचरित्र आवडीने वाचले जाते. त्यामुळे मंडेला हे तसे अजूनही चर्चेत असणारे व्यक्तिमत्त्व आहे. मंडेलांना जाऊन आता पाच वर्षे झाली. त्यांच्या नावाने जो ट्रस्ट सुरू केला आहे, त्यांच्यामार्फत दर वर्षी मंडेला स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते. मंडेलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या वर्षीच्या व्याख्यानाला वेगळे महत्त्व आहे.

ते व्याख्यान देण्यासाठी अमेरिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित केले गेले आहे. मंडेलांच्या मृत्यूनंतरही 2013 मध्ये ओबामा यांनी मंडेलांच्या मेमोरियल सर्व्हिसमध्ये अतिशय औचित्यपूर्ण असे भाषण केले होते. एकविसावे शतक सुरू झाले तेव्हा जगात नेल्सन मंडेला, दलाई लामा व आँग सान स्यू की या तिघांकडे लोकशाही आणि शांतता यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयकॉन म्हणून पाहिले जाई. त्यापैकी स्यू की अडीच वर्षांपूर्वी सत्तापदी बसल्यापासून त्यांचे वर्तन काही तितकेसे स्पृहणीय राहिलेले नाही. दलाई लामा अजूनही हयात आहेत, मात्र वयोमानापरत्वे तेही आता थकत चालले आहेत. या तीनपैकी सर्वांत महत्त्वाचे असे, आपल्या नेतृत्वाच्या आधारे प्रत्यक्ष राजकीय बदल करून दाखवलेले आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला-देशाला पुढे नेणारे नेल्सन मंडेला आज आपल्यात नाहीत. आपल्या काळाच्या मर्यादांना ओलांडून जाणारे व भविष्यातील पिढ्यांना लोकशाही-स्वातंत्र्य-समता अशा चिरकालीन मूल्यांसाठी लढण्याची स्फूर्ती देणारे नेतृत्व कोणत्याही काळात दुर्मिळच असते. त्यामुळे मंडेलांसारख्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व अधिकच लक्षात येते. आज ते आपल्यात नाहीत म्हणूनच या चार लेखांद्वारे त्यांची स्मृती जागवण्याचा प्रयत्न केला. (समाप्त)

पहिला भाग इथे  वाचा.

दुसरा भाग  इथे  वाचा.

तिसरा भाग  इथे  वाचा 

Tags: दक्षिण आफ्रिका मंडेला जन्मशताब्दी नेल्सन मंडेला संकल्प गुर्जर sankalp gurjar nelson madela weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके