डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

ऑलिम्पिक आणि एशियाड नंतरचा मोठा म्हणजे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा ‘स्पोर्टस्‌ इव्हेंट’ म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे पाहिले जाते. 54 देशांचा सहभाग असलेल्या 17 खेळ प्रकारातील या स्पर्धा आशिया खंडात केवळ दुसऱ्यांदा व भारतात पहिल्यांदाच होत आहेत. 3 ते 14 ऑक्टोबर 2010 या काळात दिल्ली येथे होणाऱ्या या स्पर्धांविषयी उत्तम वाचकांनाही अगदीच जुजबी माहिती असते. पुढील महिनाभर या स्पर्धाविषयी प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा होणारच आहेत, त्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन एकूणच क्रीडा स्पर्धांकडे अधिक लक्ष वेधता यावे यासाठी काही महत्त्वाचे तपशील देणारे हे टिपण प्रसिद्ध करणे आवश्यक वाटते. - संपादक  

पार्श्वभूमी  

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची संकल्पना सर्वांत पहिल्यांदा रेव्हरंड ॲस्टले कूपर यांनी 1891 मध्ये मांडली. त्यासंबंधी त्यांनी ‘द टाइम्स’मध्ये एक लेख लिहिला होता. त्यांच्या मते या स्पर्धांचे स्वरूप ‘पॅन- ब्रिटिश, पॅन- आँग्लिकन स्पर्धा’ असे असणार होते. ब्रिटिश साम्राज्यातील देशांध्ये परस्पर सौहार्दाची भावना निर्माण करणे आणि ब्रिटनविषयी असणारे(!) गुडविल वाढवणे असे त्यांच्या मते या स्पर्धांचे फायदे असणार होते. त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे 1911 मध्ये राजे पाचवे जॉर्ज यांच्या राज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने लंडन शहरामध्ये क्रीडास्पर्धा झाल्या. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा त्यात सहभाग होता. ‘बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण आणि ॲथलेटिक्स हे खेळ त्या वेळी खेळले गेले. त्यानंतर 1930 मध्ये पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धा कॅनडातील हॅमिल्टन शहरात झाल्या. या स्पर्धांच्या आयोजनात ‘मेलविल मार्क्स रॉबिन्सन’ यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या वेळेस या स्पर्धेचे नाव ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ असे होते. त्या स्पर्धेत स्त्रियांचा सहभाग केवळ जलतरण या खेळापुरताच होता. पुढे 1934 मध्ये त्यांनी ॲथलेटिक्समध्येही सहभाग घेतला.

या स्पर्धेसाठीचा ध्वज 1931 मध्ये ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स असोसिएशन ऑफ कॅनडा’ने तयार केला, तो 1950 पर्यंत वापरात राहिला. प्रत्येक स्पर्धेत त्या ध्वजावर यजमान शहर आणि वर्ष यांची नोंद केली जात असे, परंतु 1950 मध्ये स्पर्धेचे नावच बदलल्यामुळे ध्वजदेखील बदलला. दुसऱ्या महायुद्धामुळे 1942 आणि 1946 साली स्पर्धा घेतल्या गेल्याच नाहीत. स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा त्यांचे नाव ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ असे होते, 1930 ते 1950 अशी 20 वर्षे ते वापरात राहिले. 1954 मध्ये हे नाव ‘ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स’ असे बदलण्यात आले. पुढे 1970 साली ते ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स’ असे झाले, नावातून एम्पायर (साम्राज्य) हा शब्द काढून टाकण्यात आला. 1978 मध्ये सध्याचे प्रचलित नाव ‘कॉमनवेल्थ गेम्स’ अस्तित्वात आले, ‘ब्रिटिश’ शब्द काढण्यात आला. केवळ स्पर्धेच्या बदलत गेलेल्या नावांवर नजर टाकली तरी जगातील बदलती भू-राजकीय समीकरणे लक्षात येतात. ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’पासून ‘कॉमनवेल्थ गेम्स’पर्यंतचा नावाचा प्रवास मोठा उद्‌बोधक आहे.

ह्या स्पर्धा ‘कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन’ घेत असले तरी मूळ संघटना ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ ही आहे. पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्यातील आणि आता स्वतंत्र असणारे देश ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’चे सदस्य आहेत. ‘लोकशाही’ मूल्याला सर्वाधिक महत्त्व या संघटनेत आहे. परिणामी, हुकूमशाही असणाऱ्या किंवा लष्करी उठाव झालेल्या देशांना (काही वेळा) निलंबित करण्यात येते. त्यांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही. सध्या ‘फिजी’ हा देश असाच निलंबित आहे, 2010 च्या स्पर्धांत ‘फिजी’ नसेल. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे सहा संघ आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांत सहभागी झाले आहेत. इथे गंमत अशी की ‘युनायटेड किंग्डम’ या नावाने जरी ब्रिटन हा देश ओळखला जात असला तरी त्यातील इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड हे चार वेगळे संघ राष्ट्रकुल स्पर्धेत असतात. ब्रिटनवर अवलंबून  असणाऱ्या प्रदेशांचे पण असेच वेगळे संघ असतात. ‘ऑलिम्पिक’मध्ये मात्र हे सर्व संघ नसतात, तिथे ‘ग्रेट ब्रिटन’चा एकच संघ या सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’चे सदस्य जरी 54 देश असले तरी क्रिडास्पर्धांत 70 हून अधिक संघ खेळतात.

आयोजन

‘कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन’चे मुख्यालय ‘लंडन’ शहरात आहे. यजमान शहरांची निवड आणि एकूणच होणाऱ्या स्पर्धांच्या नियंत्रणाचे काम हे फेडरेशन करते. ‘माईक फेनेल’ हे ‘फेडरेशन’चे सध्याचे अध्यक्ष आहेत. आताचा प्रचलित लोगो 2001 मध्ये स्वीकारण्यात आला आहे. ऑलिम्पिक आणि एशियाड नंतर होणारी ही जगातील तिसरी मोठी क्रीडास्पर्धा आहे. या स्पर्धांच्या पदक प्रदान समारंभात तीन देशांचे ध्वज असतात. मागील यजमान, विद्यमान यजमान आणि पुढील यजमान. स्पर्धांच्या उद्‌घाटन समारंभामध्ये ब्रिटिश लष्कराच्या जुन्या परंपरांचा सन्मान करण्यासाठी लष्कराचा सहभाग विशेष लक्षणीय असतो. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांपैकी ब्रिटनमध्ये सर्वाधिक- पाच वेळा (1934, 58, 70, 86, 2002), कॅनडामध्ये चार वेळा (1930, 54, 78, 94) ऑस्ट्रेलियात चार वेळा (1933, 62, 82, 2006) आणि न्यूझीलंडमध्ये तीन वेळा (1950, 74, 90) आयोजित झाल्या आहेत. 1966 मध्ये कॅरिबियनमध्ये तर 1998 मध्ये मलेशियात स्पर्धा झाल्या होत्या. 1998 च्या क्वाललांपूर नंतर 2010 च्या दिल्ली स्पर्धा आशियात केवळ दुसऱ्यांदा होत आहेत. 2018 च्या स्पर्धा श्रीलंकेत होऊ शकतात, अद्याप निर्णय झालेला नाही, कारण श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला इतका खर्च परवडेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 2014 च्या स्पर्धा ‘स्कॉटलंड’मधील ‘ग्लासगो’ येथे होतील. आफ्रिका खंडात एकदाही राष्ट्रकुल स्पर्धा झालेल्या नाहीत. न्यूझीलंडमधील ऑकलंड (1950, 90) आणि ब्रिटनमधील एडिंबरो (70, 86) येथे दोन वेळा स्पर्धा झाल्या आहेत. स्पर्धेत मिळणाऱ्या एकूण पदकांचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया सर्वाधिक दहा वेळा, इंग्लंड सात वेळा आणि कॅनडा एकदा आघाडीवर राहिला आहे. भारत एकदाही नाही.

खेळ प्रकार

ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी, नेबाजी, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग, कुस्ती, टेबलटेनिस, नेटबॉल, लॉन बॉल्स, स्क्वॉश, वॉटर पोलो इत्यादी खेळ स्पर्धेत असतात. फेडरेशनने मान्यता दिलेले खेळ 31 आहेत. खेळांचे कोअर, रेकग्नाइज्ड आणि ऑप्शनल अशा तीन गटांत विभाजन केलेले आहे. कोअर गटातले खेळ स्पर्धेत असावेच लागतात. या वर्षी पहिल्यांदाच ‘टेनिस’चा समावेश करण्यात आला आहे. ‘राष्ट्रकुल’मध्ये ‘क्रिकेट’ समाविष्ट करावे का, हा एक कायम चर्चेचा विषय असतो. 1998 च्या स्पर्धेत क्रिकेट होते, नंतर मात्र नव्हते. भारताला नेमबाजी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, हॉकी, बॉक्सिंग या खेळांत कायम पदके मिळाली असून, क्रिकेट होते तेव्हा भारताचा त्यातला परर्फॉन्स अतिशय वाईट होता. ‘बार्बाडोस’सारख्या संघाकडून आपल्याला पराभूत व्हावे लागले होते. मागील म्हणजे 2006 च्या स्पर्धांध्ये मात्र आपली कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती.

बहिष्कार

खेळाशिवाय इतर अनेक घटकामुळे क्रीडास्पर्धा प्रभावित होतातच. बहिष्काराचे सावट ‘राष्ट्रकुल’वरसुद्धा पडले आहे. 1978 साली ‘न्यूझीलंड- द.आफ्रिका’ संबंधामुळे ‘नायजेरिया’ने बहिष्कार टाकला होता. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा द.आफ्रिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन द.आफ्रिकेस अनुकूल आहे, या कारणामुळे 1986 साली 32 देशांनी स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. 1974, 1982 आणि 1990 च्या स्पर्धांच्या वेळीसुद्धा बहिष्काराची टांगती तलवार होतीच. सर्व बहिष्कारांचे मुख्य कारण द.आफ्रिका हे होते. 1990 नंतरच्या स्पर्धा मात्र सुरळीत पार पडल्या आहेत. आफ्रिकेतील वंशभेद संपल्याची किनार याला आहेच.

विशेष नोंद

साधारणत: कोणत्याही क्रीडापटूचे करिअर फार प्रदीर्घ नसते. स्कॉटलंडधील लॉन बॉलर विली वूड याने 1974 ते 2002 च्या काळात, एकूण सात स्पर्धांध्ये सहभाग घेतला. न्यूझीलंडचा नेमबाज ‘ग्रेग येलविच’ याने सहा स्पर्धांत 11 पदके जिंकून विक्रम केलेला आहे. 2000 पासून राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धादेखील सुरू झाल्या आहेत. 2000 साली त्या ब्रिटनमधील ‘एडिंबरो’ येथे झाल्या.  2004 साली ऑस्ट्रेलियातील ‘बेंडिगो’ येथे तर 2008च्या स्पर्धा भारतातील पुणे शहरात झाल्या.

काही वैशिष्ट्ये

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ब्रिटिश साम्राज्य पाचही खंडांत पसरलेले होते, त्यामुळे पाचही खंडांतील देश स्पर्धांत असतात. ब्रिटिश साम्राज्याचे स्वरूप हे Ethnocentri होते. त्यामुळे या स्पर्धांकडे ‘इंग्रजी बोलू शकणाऱ्या देशांच्या कुटुंबाचा महोत्सव’ अशा अर्थानेही पाहिले गेले. या ‘स्पर्धा’ असल्या तरी त्यांचे स्वरूप ‘मैत्रीपूर्ण’च राहिले आहे. या बाबतीत त्या ऑलिम्पिकपेक्षा वेगळ्या आहेत. Humanity, Equality, Destiny (come and play) हे राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. ब्रिटिश साम्राज्यातील देशांचे स्वरूप लक्षात घेऊनच ही मूल्ये स्वीकारण्यात आली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धांच्या आणि राष्ट्रकुल संघटनेच्या एकूण व्यवहारात ब्रिटिश राजघराण्याचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. 1977 पासून मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दर वर्षी ‘कॉमनवेल्थ डे’ साजरा होतो. त्या वेळी होणारे राणीचे लंडनमधील भाषण अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

राष्ट्रकुल आणि भारत

दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीत ब्रिटिश साम्राज्यातील अनेक देश स्वतंत्र झाले. या नवस्वतंत्र देशांना ‘राष्ट्रकुलात’ सहभागी व्हायचे की नाही याविषयी संभ्रम होता. भारतही काहीशा अशाच परिस्थितीत होता. डावे पक्ष आणि काही कट्टर ब्रिटिश विरोधक यांचे मत, ‘भारताने राष्ट्रुकलात सहभागी होऊ नये’ असेच होते. नेहरूंसारख्या काहींचे मत असे होते की, आपण राष्ट्रकुलात सहभागी होणे आपल्या हिताचेच ठरणार आहे. त्यावरून 1948-49 मध्ये गरमागरम चर्चा झाल्या. परंतु अखेरीस ब्रिटिशांशी यशस्वी वाटाघाटी 1949 मध्ये झाल्या. त्यानुसार ‘राष्ट्रकुलाचे पूर्वीचे नाव आणि राणीचे स्थान’ याबाबत ब्रिटनने तडजोड केली, तर भारताने राष्ट्रकुलात राहण्याचे मान्य केले. 1956 मध्ये सुवेझ प्रश्नावर आणि 1965 मध्ये भारत-पाक युद्धातील ब्रिटिश भूमिकेवरून भारत राष्ट्रकुलात राहणार की नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला होता. पंतप्रधान शास्त्रीजींचे ‘"There is nothing common and there is no wealth" हे उद्‌गार प्रसिद्धच आहेत. परंतु तरीही भारत राष्ट्रकुलातून बाहेर पडला नाही आणि आता राष्ट्रकुल स्पर्धांचा यजमान देश बनला आहे.

‘राष्ट्रकुल’मधील भारताची उल्लेखनीय कामगिरी

1958 च्या ‘कार्डिफ’ स्पर्धांत ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खासिंगने सुवर्णपदक जिंकले, त्याआधी त्याने ‘एशियाड’मध्ये पण सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या पदकामुळे भारताचे राष्ट्रकुलमध्ये असणारे अस्तित्व जागतिक क्रीडाविश्वाला ठळकपणे जाणवले. त्याच्या या दोन सुवर्णपदकांच्या पार्श्वभूीवर भारत सरकारने त्याला पद्मश्री किताब दिला. ती बातमी मिल्खाला सांगण्यासाठी ‘लंडन’मधील भारतीय हायकमिशनर ‘विजयालक्ष्मी पंडित’ खास ‘कार्डिफ’ला गेल्या. परंतु या कशाचीच काहीच कल्पना नसल्याने इतकी प्रसिद्धी आणि एकूण झगमगाट पाहून मिल्खा बुचकळ्यात पडला होता! याच 1958 च्या स्पर्धांत ‘लीला राम’ याने ‘कुस्ती’मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. गल्लीतल्या मुलांकडून नेहमी मार खाणाऱ्या छोट्या ‘वेद’ला वडिलांनी कुस्तीच्या आखाड्यात पाठवले आणि मग त्याच ‘वेदप्रकाश’ने 1970 मध्ये ‘एडिंबरो’ला भारताचे नाव उज्ज्वल केले. त्या स्पर्धांत कुस्तीच्या सर्व वजनी गटांत भारताला किमान एक तरी पदक होतेच. 

नऊ वेळा राष्ट्रीय विजेता आणि असा पहिला भारतीय ज्याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली, त्या प्रकाश पदुकोणने 1978 ला, तर 1982 मध्ये सय्यद मोदीने भारतासाठी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. 2002 च्या मँचेस्टर स्पर्धा भारतासाठी खास होत्या. त्या स्पर्धांत भारताने एकूण 69 पदके जिंकली होती. नेमबाजी, हॉकी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग यांचा यात मोलाचा वाटा होता. 1982 च्या एशियाडनंतर प्रथमच महिला हॉकी संघाने इंग्लंडला हरवून सुवर्णपदक जिंकले. कोलकात्याच्या मोहम्मद कमरने याच स्पर्धांत ‘बॉक्सिंग’मध्ये सुवर्ण मिळवून इतिहास रचला. 2006 च्या मेलबर्न स्पर्धा भारतीय शूटिंगसाठी महत्त्वाच्या ठरल्या. एकट्या शूटिंगमध्ये भारताने 50 पदके जिंकली, ज्यांतील 22 सुवर्ण होती. ‘समरेश जंग’ने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ मिळवून या यशात मोलाचा वाटा उचलला. ‘मेलबर्न’ स्पर्धांच्या अंतिम पदक तालिकेत भारत पहिल्या पाचात होता. 2010 च्या स्पर्धा भारतातच होणार असल्याने या यशाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली. या वर्षीदेखील बॅडमिंटन, शूटिंग, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंगवर भारताची मुख्य मदार असणार आहे. पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर झेप घेईल का, हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

1951 आणि 1982 च्या एशियाड क्रीडा स्पर्धा दिल्लीत झाल्या होत्या. 2003 च्या पहिल्या पहिल्या आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा ‘हैद्राबाद’ला पार पडल्या होत्या. या स्पर्धांच्या शानदार आयोजनानंतर भारताकडे मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, वित्त, साधने आणि इच्छाशक्ती आहे हे जगाला जाणवले. दिल्लीच्याबरोबर स्पर्धेत हॅमिल्टन होते, पण भारताने बाजी मारली. याची कारणे पुढीलप्रमाणे..

1. प्रत्येक सहभागी संघाचा लॉजिंग- बोर्डिंगसह सर्व खर्च भारत करणार असे आश्वासन दिले गेले.

2. प्रत्येक सहभागी संघास एक लाख अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम देण्याची भारताची ऑफर.

3. ‘फेडरेशन’चे अध्यक्ष ‘लतीफ बट’ (पाकिस्तान) यांची मोलाची मदत.

या स्पर्धांसाठीचा अंदाजे खर्च 160 कोटी डॉलर्स होता. (2006 च्या ‘मेलबर्न’साठी तो 110 कोटी डॉलर्स झाला होता.) परंतु आता भ्रष्टाचार आणि विलंब यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. 160 कोटी डॉलर्स हे फक्त नव्या स्टेडियम्सची उभारणी, जुन्या स्टेडियम्सची डागडुजी आणि स्पर्धांशी संबंधित खर्च यासाठी होते. एकूण विविध प्रकारची 26 स्टेडियम्स स्पर्धांसाठी वापरली जाणार आहेत. त्यांपैकी ‘जवाहरलाल नेहरू स्टेडियम’ सर्वांत महत्त्वाचे असणार आहे. त्या व्यतिरिक्त ‘यमुना स्पोर्टस कॉम्प्लेक्स’, ‘तालकटोरा स्टेडियम’, ‘त्यागराज स्टेडियम’, ‘मेजर ध्यानचंद स्टेडियम’ अशी इतर महत्त्वाची स्टेडियम्स आहेत.

हरित स्पर्धा

या स्पर्धा ‘हरित स्पर्धा’ म्हणून घेण्याचे भारताने ठरवले आहे. पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी आणि त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न व्हावेत असा त्यामागे उद्देश आहे. ‘स्टेडियम्स’ची रचना, बांधणी, नवी दिल्ली शहराची पुनर्रचना करताना पर्यावरणाचा विचार होणे आवश्यक होते, पण ते तसे झालेले नाही. घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. फक्त ‘त्यागराज स्टेडियम’ इको-फ्रेंडली आहे. बाकीची नाहीत. स्टेडियमच्या रचनांचा पर्यावरणीय हानीच्या दृष्टीने विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया (पुणे शहरातील आगाखान पॅलेसमधील गांधी स्मारकाचा आराखडा त्यांनी केला आहे.) यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या अहवालात आयोजकांवर ताशेरे ओढले होते. आणि 2009 साली एका जनहित याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘पर्यावरणाचा नीट विचार होणे आवश्यक होते, परंतु आता खूपच उशीर झालेला आहे, त्यामुळे स्पर्धा होऊ द्याव्यात.’

खास कार्यक्रम

दिल्ली राज्य सरकारने सुरक्षा रक्षक, वेटर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स यांना इंग्रजी शिकविण्यासाठी खास कार्यक्रम आखला आहे. दर महिन्याला 1000 लोकांना प्रशिक्षित केले जात आहे. त्याशिवाय त्यांना इतर आवश्यक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बघायला जगभरातून लोक येतील. त्यांच्याशी वागताना- बोलताना आपल्या लोकांना अडचण येऊ नये हा हेतू त्यामागे आहे, तसेच इंग्रजी बोलणाऱ्या ड्रायव्हर्स, वेटर्स इत्यादींमुळे देशाचे घडणारे चित्र वेगळेच असेल. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळेस चीनने अशाच प्रकारचा कार्यक्रम राबवला होता.

बॅटन रिले आणि इतर गोष्टी

क्वीन्स बॅटन रिले’ हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 29 ऑक्टोबर 2009 रोजी ती बॅटन बकिंगहॅम राजवाड्यातून निघाली. (तिच्याबरोबर राणीचा खास संदेश असतो.)  25 जून 2010 रोजी वाघा बॉर्डरवरून ती भारतात आली. त्या आधी तिने 70 देशांतून प्रवास केला. ती भारतभर प्रवास करून 3 ऑक्टोबर 2010 च्या उद्‌घाटन समारंभात दिल्लीत दाखल होईल. ‘वाघा’वरून प्रेरणा घेऊन भारताने ‘शेरा’ हा मॅस्कॉट या वेळी डिझाईन केला आहे. भारतीय परंपरा आणि नवता यांचा संगम साधून भारताचे वेगळेपण अधोरेखित करणारे थीम साँग ए.आर.रेहमानने संगीतबद्ध केले आहे.

भ्रष्टाचार

28 जुलै 2010च्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले. या अहवालात तीन प्रमुख बाबींवर भर देण्यात आला.

1. जास्त किंमतीला कामे करून घेणे,

2. कामाचा निकृष्ट दर्जा,

3. काम करण्याची पात्रता नसणाऱ्या कंपन्यांना कामे देणे.

आतापर्यंत संयोजन समितीतील टी.एस.दरबारी, अनिल खन्ना यांनी राजीनामे दिले आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व या स्पर्धेच्या संयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, पण ‘आधी स्पर्धा होऊ द्याव्यात’ असा पवित्रा केंद्र सरकारने घेतला, त्यामुळे ती मागणी आता मागे पडली आहे. स्वत: पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. कामे पूर्ण झालेली नसल्याने ती वेळेत व्हावीत यासाठी अतिरिक्त आणि संयुक्त सचिव दर्जाच्या 10 आय.ए.एस. अधिकाऱ्यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची कामे आताच पूर्ण होत असल्याच्या बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूीवर भारताचे हे ‘खेळ’ नजरेत भरतात.

दिल्लीचे सुशोभीकरण

3 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या 12 दिवसांत दिल्ली चकाचक दिसावी यासाठी फार मेहनत घेतली जात आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची उभारणी, ‘मेट्रो’चे विस्तारलेले जाळे ही त्याचीच काही उदाहरणे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पॉश, नवा टर्मिनल देशाच्या प्रतिष्ठेत भर घालणारा आहे. झोपडपट्‌ट्यांना हटवणे, नव्या जागी स्थलांतर ही कामे जोरात सुरू आहेत. काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते एक लाख कुटुंबाना या स्पर्धांसाठी स्थलांतर करावे लागले आहे. तसेच दिल्ली शहरात No-beggar-Zone पण तयार करण्यात आले आहेत. शहराचा सर्व चेहरामोहराच बदलला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहनांसाठी खास व्यवस्था आणि नियमावली तयार केली आहे.

सुरक्षा व्यवस्था

स्पर्धेच्या काळात अतिरेक्यांच्या हल्ल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पोलीस दल त्यासाठी विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ब्रिटिश आणि कॅनेडियन गुप्तचर संघटनांनी स्पर्धेच्या दरम्यान दिल्लीतील व्यापारी आणि आर्थिक केंद्रांना विशेष सुरक्षा असावी असा सल्ला दिला आहे. नागरिकांनी बाहेर वावरताना सावधगिरी बाळगावी अशा आशयाच्या सूचना दिल्या जात आहेत. स्पर्धेच्या काळात दहशतवादी हल्ला झाला तर देशाच्या प्रतिष्ठेला आणि खेळाडू व नागरिकांच्या जिवाला धोका संभवू शकतो, असा Potential हल्ला रोखणे हे दिल्ली पोलिसांसमोरचे मोठे आव्हान असेल, त्यांना केंद्र सरकारचीही यासाठी मदत मिळेल.

राष्ट्रकुल स्पर्धा : भारत आणि चीन

सिडनी येथील ‘सेंटर फॉर इंडिपेंडंट स्टडीज’चे अभ्यासक जॉन ली यांच्या मते, ‘‘भारताची वेगवान आर्थिक घोडदौड, ‘ग्लोबल पॉवर’ म्हणून होत असलेला भारताचा उदय याला अंतर्गत गोंधळाची एक बाजू आहे. 2008 च्या स्पर्धा चीनने यशस्वी केल्या. परंतु त्या यशस्वी करताना त्यांनी दाखवलेला कठोरपणा व कार्यक्षमता इतर राष्ट्रांच्या मनात धडकी भरवणारा होता. बीजिंग स्पर्धा जरी सर्वोत्तम झाल्या तरी त्यामुळे चीनविषयीचा आदर वाढला नाही. चीनच्या स्पर्धांच्या पार्श्वभूीवर दिल्लीतील गोंधळ, विस्कळीतपणा, विलंब यामुळे भारताचे काही बाबतींत नुकसान होत असले तरी सर्व प्रक्रिया लोकशाही मार्गानेच होत असल्याने इतर लोकशाही देशांशी वागताना भारताला त्याचा फायदा होणार आहे. दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशिया (ज्या भागात काही अपवाद वगळता सतत लोकशाही आहे) यांना भारताकडून मोठ्या आशा आहेत.

भारतीय व्यवस्थेचा विचार केला तर भारताकडून कोणत्याही राष्ट्राला चीनसारखा धोका नाही. अशा कारणामुळे भारतावर जरा जास्तच लक्ष केंद्रित झाले आहे. भारतातील गोंधळ ही गोष्ट जगभर गृहीतच धरली जाते, पण जर ह्या स्पर्धा भारत यशस्वी करू शकला तर भारताविषयी जगाला वाटणाऱ्या आदरात आणि विश्वासात नक्कीच वाढ होईल.’’ त्यामुळे या स्पर्धा यशस्वी करण्याने एकाच दगडात अनेक पक्षी मारले जातील. (वरील सर्व तपशील इंटरनेटवरील विविध वेबसाईटस्‌वरून मिळवले आहेत.)

संकलन, संपादन व अनुवाद : संकल्प गुर्जर

Tags: suresh kalamadi सुरेश कलमाडी queens batan relley क्वीन्स बॅटन रिले’ mohammad kamar मोहम्मद कमरने sayyad modi सय्यद मोदीने praksha padukon प्रकाश पदुकोणने flying sikh milkhasing ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खासिंग bahishkar बहिष्कार commonwealth games federation ‘कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन फिजी’  देश Fiji common wealth games ‘कॉमनवेल्थ गेम्स’ british empire games ब्रिटिश एम्पायर गेम्स’ ‘melavil marks robinson मेलविल मार्क्स रॉबिन्सन’ Hamilton हॅमिल्टन atheletics ॲथलेटिक्स jalataran जलतरण kusti कुस्ती boxing बॉक्सिंग southe afrika दक्षिण आफ्रिका Canada कॅनडा austrelia ऑस्ट्रेलिया raje pachave gorge राजे पाचवे जॉर्ज pan british pan anglikan spardha पॅन- आँग्लिकन स्पर्धा’ पॅन- ब्रिटिश the times द टाइम्स revarand astal kupar रेव्हरंड ॲस्टले कूपर anuvad : sankalp gurjar sampadan sankalan संपादन व अनुवाद : संकल्प गुर्जर संकलन rashtrakul krida spardha राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके