डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रिकेटने पण ज्याच्यावर प्रेम केले असा माणूस...

मुकुल केशवन, ज्याला भारतीय क्रिकेटचे इतिहासकार रामचंद्र गुहा भारतीय क्रिकेटवरील सर्वोत्तम लेखक असे गौरवतात, त्यांचा 2003 मधला पुनर्मुद्रित लेख सचिनच्या खेळात होत असलेल्या बदलांविषयी भाष्य करतो. (2003 ते 2007 या काळात सचिनच्या खेळात टेनिस एल्बो सारख्या दुखापती आणि टीममधील बदललेला रोल वगैरे इतर कारणांमुळे बदल होत होते) केशवन यांच्यामते सचिन आता ग्रेट फलंदाज आहे, पण त्याची गोलंदाजांना भीती वाटत नाही. त्याला बॉलच्या लाईन आणि लेंग्थचा फार लवकर अंदाज येतो हीच गोष्ट त्याच्या विरुद्ध काम करते आहे. सचिनला ख्रिश्चन रायन हा ऑस्ट्रेलियाचा पत्रकार ‘ऑस्ट्रेलियन प्रकारचा खेळाडू’ मानतो. त्यासाठी तो 2004 मधील सिडनीमधील शतकाचे उदाहरण देतो. सचिन त्या डावात 613 मिनिटे खेळपट्टीवर होता, त्याने त्या खेळीत एकही कव्हर ड्राईव मारला नाही (कारण त्या शॉटमुळे सचिन सिरीजमध्ये धावा करू शकला नव्हता.) आणि शेवटी 241 वर तो नाबाद राहिला. 

खरे तर सचिन हा आपल्यासाठी राष्ट्रीय महत्त्वाचा आणि प्रेमाचा विषय. जगातला सर्वोत्तम आणि सर्वात जास्त विश्लेषण केले गेलेला खेळाडू असा त्याचा लौकिक. पण त्याच्या क्रिकेट आणि काळाविषयी उत्तम असे पुस्तक सापडत नाही. त्यामुळे सचिनवर आणि त्याच्या क्रिकेटवर, काळावर दृष्टिक्षेप टाकू शकणारे पुस्तक ‘इएसपीएन-क्रीकइन्फो’ या वेबसाईट आणि पेंग्विन प्रकाशनाकडून डिसेंबर 2013 मध्ये आले होते, पण त्याची पहिली आवृत्ती लगेच संपली होती. आता दुसरी आवृत्ती नुकतीच बाजारात आली आहे. (क्रीकइन्फो ही वेबसाईट बलाढ्य अशा इएसपीएन समूहाचा घटक आहे.) या पुस्तकाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या पुस्तकात क्रिकेटशी संबंधित अशा रथी-महारथींनी लेख लिहिले आहेत. 

राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, युवराज सिंग, ॲलन डोनाल्ड, जॉन राईट, संजय मांजरेकर, ग्रेग चपेल, हर्षा भोगले, आकाश चोप्रा आणि इतर अनेकांचे लेख या पुस्तकात आहेत. 262 पानाच्या या पुस्तकात एकूण चाळीस लेख आहेत, त्यामध्ये सचिनचे तीन (1995, 2009, 2012) इंटरव्ह्यू आहेत. अयाझ मेनन आणि सिद्धार्थ मोंगा यांचे प्रत्येकी दोन लेख आहेत. पुस्तकातला कोणताही लेख चार पानांपेक्षा छोटा नाही आणि दहा पानांपेक्षा मोठा नाही. पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे लिहिणाऱ्यांची ओळख सचिनच्या संदर्भात दिली आहे. उदा. युवराज सिंगने एकूण 293 एकदिवसीय सामने खेळले आहेत, पण पुस्तकात युवराजची ओळख ‘सचिन बरोबर 198 एकदिवसीय सामने खेळलेला’ अशी आहे. पुस्तकातल्या लेखनाची इनसायडर लेखन आणि आउटसायडर लेखन अशी वर्गवारी करता येईल. इनसायडर लेखनामध्ये क्रिकेटर्स आणि कोचेसकडून आलेले लेख तर आउटसायडरमध्ये इतर सर्व घेता येतील. 

आउटसायडरमध्ये क्रिकेट-क्रीडा पत्रकारांचे आणि अन्य हौशी क्रिकेट प्रेमीचे अशी विभागणी करता येईल. पुस्तकातला कंटेंट समजून घ्यायला या विभागणीचा उपयोग होईल. पुस्तकात फोटोचे दोन सेट आहेत. एका सेटमधले फोटो हे सचिन आणि त्याचा बाहेरच्या जगावरचा प्रभाव याविषयीचे आहेत तर दुसऱ्यातले फोटो सचिन आणि त्याचे क्रिकेट याविषयीचे आहेत. पुस्तकातला पहिलाच प्रस्तावनावजा लेख संबित बाळ यांचा आहे. ते इएसपीएन क्रीकइन्फोचे मुख्य संपादक आहेत. या लेखाची थीमही खेळांना हिरोंची असणारी आवश्यकता अशी आहे. ते पुस्तकातल्या एकूण लेखनाला आवश्यक अशी पार्श्वभूमी तयार करतात आणि सचिन नावाचा ‘प्रभाव’ काय आहे याची झलक दाखवून देतात. 

इनसायडर लेखांपैकी सर्वात चांगला लेख राहुल द्रविडचा आहे. द्रविडच्या तर्कशुद्ध फलंदाजीची आठवण व्हावी असाच तो लेख आहे. त्याचे शीर्षकच बोलके आहे- The view from the other end. या लेखात जेवढा सचिन दिसतो तेवढेच राहुलचेही व्यक्तिमत्त्व समोर येते. दोघांचेही एकमेकांच्या batting विषयीचे निरीक्षण तीक्ष्ण होते. सचिन batting ला जाताना कोणीही ‘गुड लक’ म्हणलेले त्याला आवडायचे नाही. तसेच batting करताना त्याला फार बोलायला पण आवडायचे नाही. पाकिस्तानविरुद्ध खेळताना सचित व द्रविड मराठीत बोलायचे. लेग साइडला केलेला फ्लिक किंवा फ्रंट फूटवर बचाव करताना सचिन आत्मविश्वासाने पुढे येणे ही सचिन चांगल्या टचमध्ये असल्याची उदाहरणे होती. 

राहुल सांगतो की, सचिनबरोबर खेळताना सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे सचिन स्वत:च्या ‘फील’नुसार खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर batting चे गिअर्स बदलू शकायचा. तसेच सचिन मैदानावर उतरला की प्रतिस्पर्धी संघाचे सर्व लक्ष त्याच्याकडे असायचे, ज्यामुळे राहुलसारख्यांना आपल्या मनाप्रमाणे खेळता यायचे. सौरव गांगुलीच्यामते तोसुद्धा सचिनला नीट समजू शकायचा आणि त्याचे सचिनसोबत मैदानात एकत्र batting करताना बरेच बोलणे व्हायचे. सचिन सारखा स्पेशल खेळाडू टीममध्ये असताना कप्तान गांगुलीने त्याला पुरेसा आदर आणि त्याची स्पेस दिली होती. सौरवच्या मते सचिन हा कप्तान म्हणून जितका अयशस्वी गणला जातो तितका तो नव्हता. त्याला निवड समितीशी खेळाडूवरून वाटाघाटी करायला आवडायचे नाही. त्याने नेतृत्व (1996-97 आणि 1999- 2000) केले, तेव्हा टीम एका स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात होती. जुने खेळाडू बाजूला होत होते आणि नवे खेळाडू अजून तितके स्थिरावले नव्हते. तसेच टीम दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया अशा कठीण दौऱ्यांवर गेली होती. पण सचिनच्या काळात टीम कधीही सलग आठ सामने परदेशी हरली नाही! 

सचिनच्या कप्तानपदाविषयी असेच मत लक्ष्मणचे पण आहे. लक्ष्मण आणि सचिन या जोडीने अनेक गाजलेल्या भागीदाऱ्या केल्या आहेत. शारजातल्या सचिनच्या 143 धावा सर्वांना आठवतात, पण त्यावेळी समोर लक्ष्मण होता हे फार कमी जणांना माहीत असते. सचिनची वैशिष्ट्ये सांगताना लक्ष्मणने 1996-97 च्या केपटाऊन कसोटीचे उदाहरण दिले आहे. क्रिकेटपटू सहजी स्टान्स बदलत नाहीत आणि इथे सचिनने सामन्याच्या दिवशी सकाळी स्टान्स बदलला आणि 169 धावांची लाजवाब खेळी केली. ॲलन डोनाल्ड, वासिम अक्रम, वकार युनुस, कोर्टनी वॉल्श, ग्लेन मॅक्ग्रथ, साकलेन मुश्ताक, शेन वार्न, मुरलीधरन या बोलर्सच्या ऐन बहारच्या काळात (1990 च्या दशकात) सचिन जगावर वर्चस्व गाजवत होता. 

त्यामुळे डोनाल्ड जेव्हा असं सांगतो की, सचिनला आउट करण्यासाठी आठवडेच्या आठवडे आधी आम्ही नियोजन करीत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने सचिनचे महत्त्व लक्षात येते. डोनाल्ड असेही सांगतो की, सचिनशी सामना करताना तुमच्यातले सर्वोत्तम बाहेर येते. डोनाल्डला सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह आवडायचा आणि त्या शॉटमुळे कोणीही बॉलर चिडायचा. डोनाल्ड सांगतो की, सचिन लारापेक्षा खेळाचा आणि खेळाडूंचा आदर करण्याच्या बाबतीत उजवा आहे. हीच गोष्ट अधिक ठळकपणे एका मुलाखतीमध्ये समोर येते. 1995 मध्ये सचिन आणि लाराशी एकत्र ‘इंडिया टुडे’च्या प्रतिनिधीने संवाद साधला होता. त्यात 21 वर्षीय सचिन आणि 25 वर्षीय ब्रायन लारा यांच्या व्यक्तिमत्त्वातला आणि दृष्टिकोनातला फरक स्पष्टपणे दिसून येतो. 

सचिनबरोबर 1996 पर्यंत क्रिकेट खेळलेल्या संजय मांजरेकरच्या मते, सचिनला आव्हाने अंगावर घेणे आणि त्यावर मात करणे आवडायचे. संजय सांगतो की, त्यावेळी सिंगल विकेट- डबल विकेट- सिक्स अ साईड प्रकारचे बरेच क्रिकेट खेळले जायचे. सचिन अशा सामन्यांत बऱ्याचदा एकटाच टार्गेट चेस करून द्यायचा! हाच तरुण आणि आक्रमक सचिन नंतरच्या काळात जास्त सावधपणे आणि अधिक वजनाच्या bat घेऊन खेळू लागला आणि तेच एके काळचे भारताचे प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना खटकते. त्यांच्या मते, जर सचिनने आपला खेळ बदलला नसता तर तो ब्रॅडमनच्या खालोखाल ग्रेट म्हणून गणला गेला असता. चॅपेल यांचा एकट्याचा लेख सचिनवर टीका करणारा आहे. तर सचिनसमवेत काम केलेले दुसरे महत्त्वाचे प्रशिक्षक जॉन राईट यांना असे वाटते की, इतर अनेक ग्रेट खेळाडूंची जेवढी कारकीर्द असते, त्याच्या दुप्पट काळ सचिन खेळत आहे. सचिन हा स्वत:च स्वत:चा प्रशिक्षक आणि मेंटॉर आहे. त्याला गरज लागली तर तो त्याचा मोठा भाऊ अजितशी बोलतो. 

हर्षा भोगलेंना पूर्ण इनसायडर किंवा पूर्ण आउटसायडर म्हणणे योग्य नाही. ते परिघावरचे आहेत. त्यांनी सचिनच्या पर्थमधील 114 च्या खेळी विषयी लिहिले आहे. तर अयाझ मेनन यांनी एक लेख केवळ सचिनच्या पहिल्या कसोटी शतकाविषयी, मँचेस्टार (1990) येथील 119 विषयी लिहिला आहे. सिद्धार्थ मोंगाचा सचिनच्या केपटाऊन येथील 2011 च्या जानेवारीमधील 51 व्या शतकाविषयीचा (146) लेख तर अक्षरश: चित्तथरारक आहे. त्या सामन्यात तिसऱ्या दिवशी सकाळी डेल स्टेन आणि मॉर्केल यांच्या तोफखान्यासमोर अर्धशतकवीर सचिन आणि गंभीर ठामपणे उभे राहिले होते. सकाळचा एक तास आणि बारा षटके स्ट्राईक रोटेट झालाच नाही. धावा केवळ चौकार किंवा दोनच्या माध्यमातून येत होत्या. त्या सत्राला सचिननेच नंतर असे म्हटले की, त्याच्या आयुष्यातल्या सर्वात अविस्मरणीय सत्रापैकी ते एक सत्र होते. 

असेच एक सत्र 2001 च्या मुंबई कसोटीत सचिन आणि द्रविडने खेळून काढले होते. त्यावेळेस समोर ग्लेन मॅक्ग्रथ आणि जेसन गिलेस्पी होते. गंमत म्हणजे सचिनने तेव्हा मॅक्ग्रथचा तर 2011 मध्ये स्टेनचा सामना केला होता. दोघेही आपापल्या काळातले सर्वोत्तम गोलंदाज. सिद्धार्थ मोन्गाचा दुसरा लेख सचिनच्या बॉलिंगविषयीचा आहे. हिरो कप (1994) मधला उपांत्य फेरीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना माहीत असणाऱ्यांना हे माहीत नसते की, 1991 मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये पण असाच एक सामना टाय करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सिद्धार्थ मोंगा असे नोंदवतो की, सचिनने घेतलेल्या विकेट्‌स पाहिल्या तर ब्रायन लारा, स्टीव वॉ, इंझमाम उल हक, अँडी फ्लॉवर असे महत्त्वाचे फलंदाज आहेत. सचिनला सर्व प्रकारचे बॉल्स- सीम, स्विंग, कटर्स, स्पिन- टाकता यायचे. याविषयी पुढे एकदा बोलताना अनिल कुंबळे असे म्हणाला होता की, मी कधी सचिनच्या जागेला धोका पोहोचवला नाही, पण त्याने मात्र बॉलर म्हणून माझी जागा धोक्यात आणली होती! टीमच्या गरजेनुसार सचिन ठरवायचा की, कोणत्या प्रकारची बोलिंग करायची. 

आउटसायडर विभागात असलेल्या लेखांपैकी काही लेख अगदीच जनरल आहेत. काही लेख एखादी इंनिंग किंवा एखादी घटना स्पेसिफिक आहेत उदा. सुरेश मेननचा 1999 च्या चेन्नई कसोटीवरील लेख किंवा राहुल भट्टाचार्य यांचा लाहिली येथील रणजी सामन्याच्या निमित्ताने लिहिलेला लेख. Gideon Heigh यांचा लेख खेळाडूंच्या आणि सचिनच्या उंचीविषयीचा आहे. त्यांच्यामते, सचिनची उंची भारतीय माणसाच्या सर्वसामान्य उंचीएवढी आहे, पण सचिनच्या बुटक्या असण्याचे भांडवल केले गेले. त्याचा संबंध सचिन ज्या काळात खेळला त्याच्याशी आहे जेव्हा भारतीय स्वत:ला शोषित- उपेक्षित- पराभूत मानत होते. तर संतोष देसाईचा लेख सचिनची कारकीर्द आणि भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल यांची सांगड घालतो. सिद्धार्थ वैद्यनाथनचा लेख सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर जन्मलेल्या पिढीतल्या एका प्रातिनिधिक तरुणाचे आयुष्य आणि सचिनचे क्रिकेट यांचा समांतर प्रवास दाखवतो. जॉन होटनने सचिनच्या Bats विषयीचा लेख लिहिला आहे तर डेविड होप्सने सचिनच्या यॉर्कशायर कौंटीविषयक अनुभवावर लिहिले आहे. सचिन हा यॉर्कशायरचा पहिला बाहेरचा खेळाडू. त्यामुळे त्याला स्वीकारणे हा यॉर्कशायरसाठी पण एक अनुभव होता. 

मुकुल केशवन, ज्याला भारतीय क्रिकेटचे इतिहासकार रामचंद्र गुहा भारतीय क्रिकेटवरील सर्वोत्तम लेखक असे गौरवतात, त्यांचा 2003 मधला पुनर्मुद्रित लेख सचिनच्या खेळात होत असलेल्या बदलांविषयी भाष्य करतो. (2003 ते 2007 या काळात सचिनच्या खेळात टेनिस एल्बो सारख्या दुखापती आणि टीममधील बदललेला रोल वगैरे इतर कारणांमुळे बदल होत होते) केशवन यांच्यामते सचिन आता ग्रेट फलंदाज आहे, पण त्याची गोलंदाजांना भीती वाटत नाही. त्याला बॉलच्या लाईन आणि लेंग्थचा फार लवकर अंदाज येतो हीच गोष्ट त्याच्या विरुद्ध काम करते आहे. सचिनला ख्रिश्चन रायन हा ऑस्ट्रेलियाचा पत्रकार ‘ऑस्ट्रेलियन प्रकारचा खेळाडू’ मानतो. त्यासाठी तो 2004 मधील सिडनीमधील शतकाचे उदाहरण देतो. सचिन त्या डावात 613 मिनिटे खेळपट्टीवर होता, त्याने त्या खेळीत एकही कव्हर ड्राईव मारला नाही (कारण त्या शॉटमुळे सचिन सिरीजमध्ये धावा करू शकला नव्हता.) आणि शेवटी 241 वर तो नाबाद राहिला. 

ओस्मान सामीउद्दीन नावाचा पाकिस्तानी पत्रकार सचिनच्या निमित्ताने लेख लिहितो, पण त्याचा फोकस सचिन नसून पाकिस्तानातील हिरोज असा आहे. त्याच्यामते, समाज थोडा संशयी आणि थोडा सिनिकल असणे चांगलेच असते, पण पाकिस्तानी समाजात आज हिरोंची अनुपस्थिती इतकी आहे की मलाला युसूफझाई सारखी मुलगी त्यांना हिरो वाटते आहे. आणखी एका लेखात, जो 2003 मध्ये लिहिला गेला होता, सचिन तेंडुलकर, टायगर वूड्‌स आणि मायकेल जॉर्डन यांची तुलना केली गेली आहे. या सर्व लेखांमधून सचिनचे एक चित्र समोर येते. आपल्याला माहीत असलेलेच काही पैलू अधिक ठळकपणे येतात. 

या पुस्तकात असलेले जे फोटो आहेत त्यांची निवड नीट करायला हवी होती. आताचे आहेत त्यापेक्षा चांगले फोटो अगदी सहज मिळू शकले असते. पुस्तकाचे मुखपृष्ठही छान करता आले असते. लेखांच्या बाबत बोलायचे झाले तर, काही पत्रकार-लेखक यांचे लेख घेतले नसते तरी चालू शकले असते. त्याऐवजी कुमार संगकारा, अनिल कुंबळे, नासीर हुसेन, स्टीव वॉ अशा ‘थिंकिंग क्रिकेटर्स’चे लेख हवे होते. त्यामुळे जास्त मजा आली असती. सचिनच्या काळाचा अनुभव घेतलेल्यांसाठी तर हे पुस्तक महत्त्वाचे आहेच. त्यांना आपल्या अनेक आठवणी पुन्हा जगण्याची (यु ट्यूबच्या मदतीने) आणि आपले सचिनच्या क्रिकेटविषयीचे आकलन तपासण्याची संधी मिळेल. पण ज्यांनी ते अनुभवलेले नाही; त्यांच्यासाठी सचिन नावाचा फेनोमेनो काय होता हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक जास्तच महत्त्वाचे आहे! 

Tags: रामचंद्र गुहा अनिल कुंबळे आकाश चोप्रा हर्षा भोगले ग्रेग चपेल संजय मांजरेकर जॉन राईट ॲलन डोनाल्ड युवराज सिंग व्ही.व्ही.एस लक्ष्मण सौरव गांगुली राहुल द्रविड ईएसपीएन पुस्तक परिचय क्रिकेट सचिन तेंडूलकर Ramchandr Guha Anil Kumbale Akash Chhopra Harsha Bhogle Grag Chapppell Sanjay Manjrekar Jonh Wright Alan Donald Yuvraj Singh V.V.S.Lakshmn Sourav Ganguly Rahul Darvid ESPN Pustak Parichay Cricket Sachin Tendulkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके