डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

.

...आणि नाकारलेली इंजेक्शन्स मिळाली!

मधु दंडवतेजी आज आपल्यात नाहीत, त्यांचे कार्य व आठवणी फक्त मागे उरल्या आहेत. त्यांपैकी एक आठवण येथे देत आहे. एखाद्या सामान्य माणसाच्या व्यक्तिगत समस्येमध्येही नानासाहेब किती कळकळीने लक्ष घालीत, याचा हा नमुना आहे -

गोष्ट 1993 सालची. माझ्या मुलाच्या बुटकेपणाच्या समस्येवर एकमेव उपाय म्हणून 'ग्रोथ हार्मोन्स इंजेक्शन्स्' आम्हांला हवी होती. मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलने हा उपाय सुचवला होता. ही इंजेक्शन्स आपल्या देशात तयार होत नाहीत. फक्त पश्चिम युरोपातील बड्या औषध कंपन्या बनवितात. ती अत्यंत महागडी आहेत. साहजिकच खर्च काही लाखांच्या घरात पोहोचणारा होता. खेड्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला तो पेलवणारा नव्हता. म्हणून उपचार करण्याची तीव्र इच्छा असूनही आम्ही हतबल झालो होतो.

या समस्येला उजाळा देणारी अत्यंत मौल्यवान माहिती मला या काळात वाडियांमध्ये समजली. स्वीडनमधील 'सिरोनो लिमिटेड’ या कंपनीने आपली 'सेझन' या नावाची ग्रोथ हार्मोन्स इंजेक्शन्स भारतात किती परिणामकारक ठरतात याची चाचणी घेण्याची परवानगी भारत सरकारकडे मागितली होती. भारतातील दहा मुलांना एक वर्षासाठी ही इंजेक्शन्स मोफत देण्यास कंपनी तयार होती. मात्र आपल्या ड्रग कंट्रोल बोर्डाने हा प्रस्ताव नाकारला होता. आपल्या सरकारने कंपनीला तसे कळवले होते. ही नाकारलेली इंजेक्शन्स मिळाली तर आम्हांस मोठा दिलासा मिळणार होता.

शिबिराच्या निमित्ताने मुंबईला आलेल्या मधुजींना वासुदेवराव वर्तकांनी ही सर्व हकीकत सांगितली व याप्रकरणी प्रयत्न करण्याची विनंती केली. 'हे व्यापार मंत्रालयाच्या कक्षेतील प्रकरण आहे, दिल्लीत गेलो की डॉ. कुरियन यांच्याशी बोलेन', एवढेच नानासाहेब म्हणाले. केन्द्रात त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. पी. जी. कुरियन व्यापारमंत्री होते. या कामासाठी नानासाहेबांनी दिल्लीत फार परिश्रम घेतले. त्याबद्दल आम्हाला मात्र काहीच सांगितले नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून काही गोष्टी मुंबईत समजल्या. सतत सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर एकदा नाकारलेला हा प्रस्ताव मंजूर झाला व आम्हांला इंजेक्शन्स मिळाली. आमचे काम झाले. 

एकूण 40 लाख रुपयांची ही इंजेक्शन दहा मुलांना मोफत मिळाली. कोणत्याही अधिकारपदावर नसताना नानासाहेबांनी हे काम केले, कारण त्यांचा नैतिक प्रभाव मोठा होता. आमच्या व्यतिरिक्त इतर नऊ मुलांनाही त्याचा फायदा झाला. असे निरपेक्ष राजकीय पुढारी आज या देशात किती सापडतील? त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम.

राजाराम कृष्णाजी म्हात्रे : वेदी, ता. पालघर, जि. ठाणे - 401102. दूरध्वनी :02525233135.

----------

अवतरणांविषयी खुलासा

मुंबईतील एका वाचकाने पत्र पाठवून दोन मुद्दे उपस्थित केले आहेत....

1. 'साधना’च्या 24 डिसेंबरच्या मुखपृष्ठावर साने गुरुजींचा फोटो व त्याखाली त्यांचे म्हणून एक अवतरण दिले आहे. गुरुजी आणि त्यांचे वाङ्मय यांचा जवळून परिचय असलेल्या आमच्यासारख्यांना हे अवतरण गुरुजींचे असेल असे वाटत नाही. आपल्यावरील प्रतिकूल टीकेचा गुरुजींनी कधी प्रतिवाद केला नाही, असे आम्हाला निश्चितपणे वाटते. तरी त्या अवतरणाचा संदर्भ ‘साधना’तून जाहीर करावा. 

2. 'साधना’च्या 31 डिसेंबरच्या मुखपृष्ठावर आइन्स्टाईनचा फोटो व त्याचे वक्तव्य छापलेले आहे. फोटो जसा तरुणपणीचा आहे. तसेच अवतरणही तरुणपणीचे- अपरिपक्व अवस्थेतील आहे काय? परिपक्व अवस्थेत त्याच्यासारख्या विज्ञानधुरीणाने असे वक्तव्य करणे संभवत नाही. Scientific temper असणाऱ्या त्या माणसाने 'माणसाला आजवर विश्वाचे आकलन झाले नाही' असे निश्चितपणे म्हटले असेल: पण त्याने 'विश्वाचे संपूर्ण आकलन होऊच शकत नाही' असे म्हटले असल्याचे संभवत नाही. अशा प्रकारची अवतरणे वापरून गूढवादी, अज्ञेयवादी लोक वैज्ञानिकांच्या मुखाने कुऱ्हाड चालवू शकतात. तेव्हा हेही अवतरण कधी, कुठे आणि कोणत्या संदर्भातील आहे हे स्पष्ट करावे.

वरील दोन मुद्यांसह आणखी दोन मुद्द्यांचं स्पष्टीकरण थोडक्यात देत आहोत... 

1. साने गुरुजींनी 'कुमारांपुढील कार्ये' या विषयावर 24 डिसें. 1946 रोजी पुणे येथे झालेल्या कुमारांच्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण दिलं होतं. ते भाषण अनेक संग्रहात समाविष्ट केलेलं आहे. 24 डिसें. 2005च्या अंकातील अवतरण त्या भाषणातून घेतलं आहे. रा.ग.जाधव यांनी संपादित केलेल्या 'निवडक साने गुरुजी' (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ) या पुस्तकातही ते भाषण आहे. गुरुजी आपल्या लेखनाकडे कसे पाहत होते आणि त्या काळात त्यांच्या लेखनावर होत असलेल्या टीकेविषयी त्यांची काय भूमिका होती: हे 'साधना’च्या वाचकांना व आजच्या टीकाकारांना सांगावं म्हणून, जाणीवपूर्वक शोध घेऊन ते अवतरण निवडले होतं!

2. 'साधना'च्या 31 डिसेंबरच्या अंकातील अवतरण, हे आइन्स्टाईन ज्या सिद्धांतासाठी ओळखला जातो, त्या सापेक्षतावादाचा गाभा आहे. वय वर्षे 26 ते 76 (म्हणजे सापेक्षतावाद मांडल्यापासून मृत्यूपर्यंत) ही 50 वर्षे आइन्स्टाईनने ते अवतरण अनेक वेळा, अनेक व्यासपीठावरून वापरले आहे. 1944 साली आइन्स्टाईनने (वय 65 वर्षे) एका विद्यार्थ्याला पाठविलेल्या पत्रातील ते अवतरण ‘ओरिएन्ट लाँगमन'ने प्रसिद्ध केलेल्या 'यांनी जग घडविले' या चरित्रमालेतील 'आइन्स्टाईन’वरील पुस्तकात आहे. "विश्वाचं रहस्य आम्हाला कळलं आहे; अंतिम सत्य आम्हाला सापडलं आहे. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, असा दावा करणाऱ्या तथाकथित अध्यात्मवाद्यांचा प्रतिवाद करावा हा एक हेतू ते अवतरण निवडण्यामागे होता.

3. मधु दंडवते यांची जनमानसात ठसलेली ओळख 'उत्तम संसदपटू' अशी आहे. म्हणून 3 डिसें. 05 च्या अंकातील तीनही अवतरणं त्यांच्या 'साधना' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या, 'वेध अंतर्वेध' पुस्तकातील ‘माझा संसदीय संसार' या प्रकरणातून घेतली आहेत. 

4. विंदा करंदीकरांनी 25 वर्षापूर्वी लेखन थांबवलं, त्यासाठी कारण दिलं... 'माझ्याकडे आता सांगण्यासारखें काहीही राहिलेलं नाही.' मराठी साहित्याच्या प्रांगणात अतिशय दुर्मिळ असलेली ही भूमिका घेणाऱ्या विंदांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वार्थ ‘मूल्यमापन' कसं केलं आहे. हे 14 जाने, 06 च्या अंकातील अवतरण नेमकेपणाने सांगतंय. 'मौज प्रकाशना’ने प्रसिद्ध केलेल्या व विजया राजाध्यक्षांनी संपादित केलेल्या ‘बहुपेडी विंदा' या पुस्तकातून ते अवतरण घेतलं आहे. 

जी वक्तव्ये (अवतरणं) अनेक वेळा, अनेक व्यासपीठावरून केलेली असतात, त्यांचे संदर्भ देण्याची आवश्यकता असतेच असे नाही; पण यापुढे सर्व प्रकारच्या अवतरणांचे संदर्भ देण्याची काळजी घेतली जाईल!

अतिथी संपादक

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके