डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

हा लिलावप्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यापूर्वी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान गटे यांनी 1797 मध्ये अयशस्वीरीत्या वापरला होता. ही कथा मुळातूनच रंजक आहे. गटेंनी लिहिलेली कविता त्यांनी प्रकाशकाकडे आपल्या हस्तकाकरवी पाठवली आणि संबंधित कवितेची रॉयल्टी काय असावी, यासंबंधी बंदिस्त लिफाफाही त्याला दिला. त्यांनी आपल्या हस्तक वकिलाला असे सांगितले की, या लिफाफ्यात मी माझी प्रस्तावित रॉयल्टी रक्कम लिहिली आहे. प्रकाशकाने जर या किमतीपेक्षा अधिकची रक्कम देऊ केल्यास हा लिफाफा त्याला काढून दाखवा आणि या लिफाफ्यातील दिलेली रक्कमच मी घेईन, असे सांगावे. जर प्रकाशकाने यापेक्षा कमी रक्कम देऊ केल्यास लिफाफा आणि कविता परत घेऊन यावे, त्याच्याशी वाटाघाटी करू नये, भविष्यकाळात आपल्या कवितांना काय रक्कम मिळू शकते याचा त्यांना अंदाज घ्यावयाचा होता.

लिलाव सिद्धांतातील सुधारणा व लिलावाचे नवे स्वरूप विकसित केल्याबद्दल पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना या वर्षीचा अर्थशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. तत्पूर्वी,  विल्यम विक्रे या कॅनेडियन अर्थतज्ज्ञांनाही 1996 मध्ये लिलाव अभ्यासाबद्दल नोबेल मिळाले होते. 

ज्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांकरता आयता (Readymade) बाजार उपलब्ध होत नाही, कोणत्या किमतीला अशा वस्तूंच्या नेमक्या किती नगसंख्येची मागणी येऊ शकते याविषयी अनिश्चितता असते; अशा वस्तू व सेवांच्या किमती पारदर्शक, कार्यक्षम व जलदरीत्या निर्धारित करणे हा लिलावप्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे लिलावप्रक्रियेचा लिखित इतिहास हा इसवी सन पूर्व 500 वर्षांपूर्वीचा आहे. बॅबिलोनमध्ये विवाहयोग्य मुलींचा विवाहाकरता लिलाव होत असल्याचे हिरोडोटसने आपल्या ग्रंथात नमूद केले आहे, तर भारतीय पुराणकथेत राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा गुलाम म्हणून लिलाव झाल्याचे नमूद आहे. इसवी सन 193 मध्ये तर चक्क रोमन साम्राज्याचाच लिलाव झाल्याची नोंद आहे. आजकाल अनेक सिनेकथांमधील लिलावदृश्ये त्या सिनेमाची रंजकता वाढवतात. अगदी निवडणुकासुद्धा एक प्रकारचा लिलाव आहे, याची जाणीव अनेकांना नसते. एकंदर, बाजारातील संबंधित वस्तूंची किंमतनिश्चितीची गरज लिलावप्रक्रियेतून भागवली जात असल्याने ही पद्धत आजही लोकप्रिय असून ती वर्धिष्णू होत आहे. मात्र लिलावप्रक्रियेतील दोषांमुळे शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी अनेकदा आंदोलन करतात. तसेच विशिष्ट सार्वजनिक संपत्तीचे योग्य प्रकारे लिलाव न केल्याने सरकारचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे देशाचे महालेखापरीक्षक सांगतात. त्यामुळे साधी-सोपी वाटणारी लिलावप्रक्रिया गुंतागुंतीची बनते आणि ती गुंतागुंत सोडविण्याकरता त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास अत्यावश्यक बनतो.

जेव्हा 1970 च्या दशकात OPEC या खनिज तेल विक्री करणाऱ्या देशांच्या संघटनेने संगनमत करून पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवल्या; तेव्हा खनिज तेलाबाबत आत्मनिर्भर होण्याकरता अमेरिकेने आपल्या देशातील सागरकिनारवर्ती भागातील संभाव्य तेलसाठ्याचे पट्टे लिलाव करून खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला. या तेलपट्‌ट्याचा लिलाव कशाप्रकारे करावा याविषयी अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शन अमेरिकन सरकारने मागवले. तेव्हापासून अर्थतज्ज्ञही लिलावप्रक्रियेकडे गांभीर्याने पाहू लागले, त्याचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास करू लागले. या संशोधनाचे फलित म्हणजे ‘लिलाव सिद्धांत आणि त्याचे उपयोजन’ ही अर्थशास्त्राची उपयोजित शाखा विकसित झाली. कोणत्याही लिलावाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. पहिले वैशिष्ट्य म्हणजे- लिलावाचे नियम काय आहेत, लिलाव खुला आहे की लखोटाबंद, किती वेळा लिलावात बोली लावता येते- लिलावातील विजेत्याला कोणती किंमत द्यावी लागते, या बाबी यात येतात. दुसरे म्हणजे लिलावात विक्रीकरता असलेल्या वस्तू अथवा सेवेचे मूल्य कशा प्रकारे ठरते, सर्व बोली बोलणाऱ्यांच्या  दृष्टीने त्याचे समान मूल्य आहे की नाही आणि शेवटी बोली लावणाऱ्या संभाव्य खरेदीदारांना संबंधित वस्तूंबद्दल, त्याच्या खऱ्या मूल्याबद्दल कितपत माहिती आहे व त्या माहितीची निश्चितता किती आहे- या तीन प्रमुख मुद्यांभोवती लिलाव सिद्धांत फिरतात. याविषयीच्या सैद्धांतिक अभ्यासाचा परिणाम म्हणून 1994 मध्ये अमेरिकन फेडरल कम्युनिकेशन कमिशनने ज्या प्रकारे रेडिओलहरींचा लिलाव केला, त्याचे वर्णन ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने आजपर्यंतचा जगातील सर्वोत्कृष्ट लिलाव असा केला आहे. आज टेलिकॉम स्पेक्ट्रम असो की आयपीएलमधील खेळाडूंची विक्री असो- असंख्य वस्तू व सेवांच्या कार्यक्षम किंमतनिश्चितीत लिलाव हा अविभाज्य घटक बनला आहे. 

विक्रेते आणि संभाव्य खरेदीदार यांचा कार्यक्षम किमतीला मिलाफ घडवून आणण्याचे कार्य लिलावातून साध्य होत असते. विक्रेत्याला महत्तम नफा मिळवण्याकरता लिलावाचे नियम (Auction Rule) आणि लिलावाचे नेपथ्य (Auction Environment) या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. 

लिलावात सहभागी असलेल्या संभाव्य खरेदीदारांनी काय करावे ते काय करू नये, ते कशा प्रकारे बोली देऊ शकतात? बोलीतील विजेतानिवडीची पद्धत काय आहे? विजेत्याने अंतिमतः कोणती किंमत द्यायची? लिलाव-प्रक्रियेदरम्यान विक्रेत्याने त्या वस्तूसंबंधीची कितपत माहिती सार्वजनिक करावी? यात लिलाव डावपेचविषयक अनेक बाबी येतात. याचा लिलावसंबंधित वस्तूंच्या मूल्यावर परिणाम होत असतो. लिलावाच्या प्रकारानुसार यात इंग्रजी लिलाव आणि डच लिलाव असे दोन प्रकार असतात.

इंग्रजी प्रकारच्या लिलावात अशा लिलावाची सुरुवात एखाद्या किमान आधार किमतीपासून सुरू होते आणि सर्वाधिक बोली लावणारा विजेता असतो. यात बोली बोलणाऱ्यांना लिलावकाळात आपल्या बोली रकमेत वारंवार वाढ करण्याची मुभा असेल, तर ती खुली बोली होते. यात इतर बोली लावणाऱ्या स्पर्धकांच्या वर्तणुकीवरून संभाव्य खरेदीदार आपले डावपेच आखत असतात. त्यामुळे काही वेळा यात अनेक लिलावफेऱ्याही होतात. आयपीएल सामन्यांकरता खेळाडूंचा लिलाव होत असताना अशा फेऱ्या झालेल्या अनेकांनी पाहिलेच असेल. आता जर अशी बोली बंदिस्त लखोट्यात एकदाच द्यावयाची असेल, तर संभाव्य खरेदीदारांना आपल्या स्पर्धकांच्या वर्तणुकीबद्दल अंदाज व्यक्त करणे अवघड  होते. त्यामुळे त्यांना लिलावासंबंधित वस्तूच्या त्यांच्या खऱ्या मूल्य आकलनानुसार बोलीची रक्कम  लिहावी लागते. या प्रक्रियेत ज्याची निविदा जास्त रकमेची असेल तो विजेता घोषित केला जातो आणि त्याला ही संबंधित रक्कम मोजावी लागते. आता येथेसुद्धा जर नियमात थोडासा बदल केला, तर लिलाव रकमेत फार मोठा बदल झालेला दिसून येऊ शकतो. याला दुसऱ्या क्रमांकाच्या किमतीचा लिलाव असेही म्हणतात. यात बंदिस्त लखोट्यात ज्याने सर्वाधिक बोली लावली आहे, तो विजेता घोषित होतो आणि किंमत मात्र स्पर्धक बोलीदाराने लावलेली दुसऱ्या क्रमांकाची देतो. 

आपण लावत असलेली बोलीची रक्कम आपल्याला द्यावयाची नसल्याने स्पर्धक थोड्याशा उदारपणे बोली लावतात. लिलावात वर्चस्व राखायचे असेल, तर बोली जास्त रकमेचीच लावावी लागेल. याला लिलावाची अर्थतज्ज्ञ विक्रीपद्धत असेही म्हटले जाते. हा लिलावप्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यापूर्वी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान गटे यांनी 1797 मध्ये अयशस्वीरीत्या वापरला होता. ही कथा मुळातूनच रंजक आहे. गटेंनी लिहिलेली कविता त्यांनी प्रकाशकाकडे आपल्या हस्तकाकरवी पाठवली आणि संबंधित कवितेची रॉयल्टी काय असावी, यासंबंधी बंदिस्त लिफाफाही त्याला दिला. त्यांनी आपल्या हस्तक वकिलाला असे सांगितले की, या लिफाफ्यात मी माझी प्रस्तावित रॉयल्टी रक्कम लिहिली आहे. प्रकाशकाने जर या किमतीपेक्षा अधिकची रक्कम देऊ केल्यास हा लिफाफा त्याला काढून दाखवा आणि या लिफाफ्यातील दिलेली रक्कमच मी घेईन, असे सांगावे. जर प्रकाशकाने यापेक्षा कमी रक्कम देऊ केल्यास लिफाफा आणि कविता परत घेऊन यावे, त्याच्याशी वाटाघाटी करू नये, भविष्यकाळात आपल्या कवितांना काय रक्कम मिळू शकते याचा त्यांना अंदाज घ्यावयाचा होता. एक प्रकारे दुसऱ्या क्रमांकाच्या किमतीचा लिलाव करण्याचा गटेंचा तो प्रयोग होता. मात्र इंटरनेटच्या उदयानंतर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या अनेक कंपन्या या प्रकारच्या लिलावपद्धतीचा वापर यशस्वीरीत्या करत आहेत.

लिलावाचा दुसरा प्रकार आहे, ज्याला डच लिलावपद्धत असे म्हटले जाते. नेदरलँडमधील ट्युलिपची फुले आणि इतर नाशवंत शेतमाल यांच्या लिलावाकरता ही पद्धत वापरली जाते. या प्रकारात लिलावाची सुरुवात ही अवास्तव अशा जास्त किमतीने होते आणि हळूहळू किमती तोपर्यंत कमी होत जातात की, जोपर्यंत त्या किमतीला एखादा खरेदीदार मिळत नाही. अर्थात कितपत किंमत कमी करावी, याचा निर्णय विक्रेत्याला घ्यायचा असतो. हा जलद लिलावप्रकार असतो, म्हणून काही ठिकाणी घड्याळाच्या काट्यांकडे पाहत हा लिलाव होतो. विक्रेता सांगत असलेल्या किमतीला जर कोणी ‘ही वस्तू माझी’ असं म्हणत असेल तर तिथेच तो लिलाव संपतो. लिलावात सांगत असलेल्या किमतीला आपला स्पर्धक ‘हो’ म्हणू शकतो, याची भीती बोलीतील प्रत्येक संभाव्य खरेदीदाराला असते, त्यामुळे त्याला योग्य किंमत आहे असे वाटल्यास तो लागलीच ‘हो’ म्हणतो. 

एकंदर इंग्रजी असो की डच असो; दोन्ही लिलाव प्रकारांत साधारणतः सारखीच किंमत मिळते; असे विक्रेत्यांचे मत होते, जे बिनचूक नाही. लिलावाच्या नियमाबरोबरच लिलावाचे पर्यावरण किंवा नेपथ्य (Auction Environment) लिलावाच्या परिणामांवर प्रभाव टाकत असते. लिलावात बोली लावणारे हे स्वहित आणि महत्तम लाभ मिळण्याच्या प्रेरणेने लिलावात सहभागी होत असतात. त्यामुळे लिलावातील बोली लावणे हा एक प्रकारचा खेळ आहे असे मानले, तर या खेळाचे डावपेच, व्यूहरचना कशी करता येईल की- ज्यायोगे संबंधित वस्तू आपल्यालाच मिळेल, याविषयी बोली लावणारे संभाव्य खरेदीदार जागरूक असतात. असे बोली लावणारे कशा प्रकारे संबंधित वस्तू व सेवेचे मूल्य निर्धारित करतात, यावर लिलावाचे नेपथ्य अवलंबून असते. वस्तू जर खासगी स्वरूपाची असेल आणि भविष्यात त्याची पुनर्विक्री करणे हा हेतू नसेल, तर प्रत्येक बोली लावणारा त्याच्या सापेक्ष मूल्यआकलनानुसार बोली लावतो, तो इतर स्पर्धकांच्या बोलीचा विचार करत नाही. दुर्मिळ वस्तू, पेंटिंग अथवा ज्या वस्तूंशी भावनिक नाते जोडलेले असते, हे अशा वस्तूंच्या बाबतीत खरेदीदाराच्या दृष्टीने त्या वस्तूचे खासगी मूल्य व्यक्तिसापेक्ष असते. उदाहरणार्थ- 2009 मध्ये न्यूयॉर्क येथे महात्मा गांधीजींच्या वापरातील काही वस्तूंचा लिलाव झाला होता. या लिलावात विजय माल्या यांनी 1.8 दशलक्ष ही सर्वाधिक बोली लावून त्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. ‘ही बोली मी देशाकरता लावली’, असे त्यांनी त्या वेळी सांगितले होते! याउलट, पुनर्विक्री करण्याकरता संभाव्य खरेदीदार त्या वस्तू लिलावात खरेदी करत असेल, तर त्याला निरपेक्षपणे लिलावाचे मूल्य निर्धारित करावे लागते. अशा परिस्थितीत लिलावाचे नेपथ्यच बदलते. याला समान मूल्य लिलाव असे म्हणतात. 

खनिज तेलाचे साठे असलेले पट्टे लिलावाने घेत असताना खनिज तेलाची बाजारातील किंमत सर्व बोली लावणाऱ्या सहभागी बोलीदारांना माहीत असते; मात्र संबंधित तेलपट्‌ट्यात नेमके किती खनिजतेल मिळू शकते, याबद्दलचे अंदाज वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक बोलीदार आपल्या अंदाजाप्रमाणे बोली लावत असतो. अशा वेळी अंदाजातील चूक ही आर्थिक दृष्ट्या खूप महाग पडू शकते. याला विजेत्यांचा शाप असेही म्हटले जाते. दिल्लीच्या संघाने 2015 च्या आयपीएल मोसमाकरता संभाव्य उपयुक्तता लक्षात घेऊन युवराजसिंगला रुपये सोळा कोटी इतकी बोली लावून संघात घेतले होते. मात्र त्या मोसमात युवराजसिंगला फॉर्म गवसला नाही. त्या मोसमात युवराजसिंगने एकंदर 248 धावा केल्या. म्हणजे त्याची एक धाव दिल्लीच्या संघाला साधारणपणे साडेसहा लाख रुपयांना पडली! आपले स्पेक्ट्रम लिलाव ही एक प्रकारे विजेत्याचा शाप ठरला असून अनेक टेलिकॉम कंपन्या त्यामुळे बंद पडल्या आणि आहे त्या कंपन्या प्रचंड कर्जबाजारी झालेल्या आहेत, ते या विजेत्याच्या शापामुळेच! म्हणून  विशेषतः सामान्य मूल्य असलेल्या वस्तूंच्या बाबतीत बोली लावत असताना फार काळजी घ्यावी लागते.

लिलावप्रक्रियेत संभाव्य खरेदीदारांचे संगनमत तसेच विक्रेता अथवा त्याच्या हस्तकाचे खरेदीदाराशी होणारे संगनमत लिलावप्रक्रियेचा फज्जा उडवू शकते. वरील एका उदाहरणात गटे यांच्या कवितेचा संदर्भ दिला आहे. गटेंच्या वकिलाने प्रकाशकाशी हातमिळवणी करून त्या पाकिटातील नेमकी रक्कम प्रकाशकाला सांगितली असल्याने प्रकाशकाने त्याचा गैरफायदा घेत त्यांची खरी किंमत सांगितली नाही आणि त्यापासून अडीचपट नफा कमावला. ज्या कारणासाठी गटेंनी विश्वासाने हा प्रयोग केला होता, त्या विश्वासाला तडा गेला. गटेंना त्यात काही तरी काळेबेरे झालेले लक्षात आले आणि त्यांनी पुढच्या कविता खुल्या बोलीच्या लिलावपद्धतीने विकल्या! येथे किंमत निर्धारणातील लाभ-नुकसान हे त्या दोन पक्षांपुरतेच मर्यादित आहेत. मात्र जर लिलावातील संबंधित वस्तू अथवा सेवा जनतेचा विश्वस्त या नात्याने सरकार विकत असेल अथवा भाडेपट्‌ट्याने देत असेल, तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित लिलावातून सरकारला रास्त व योग्य मोबदला तर मिळालाच पाहिजे तसेच जनहितही साध्य झाले पाहिजे. म्हणून सरकारच्या सार्वजनिक धोरणाची यशस्विता मोजमापनाचा एक महत्त्वाचा निकष हा लिलाव असतो. अशा वेळी सार्वजनिक संपत्ती लिलाव-संबंधित यंत्रणेचा आराखडा (Auction Mechanism Design ) कसा आहे, लिलावाचे नियम आणि लिलावाचे नेपथ्य कसे आहे, यावर सर्वसामान्य जनतेनेसुद्धा लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

वर्तमानात ज्या देशातील संस्था कमकुवत आहेत, सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे आणि देशात काही विशिष्ट उद्योगपतींचेच प्रस्थ आहे, अशा देशांमध्ये लिलावप्रक्रिया ही बहुतांशरीत्या एक फार्स असते. भारताचे उदाहरण द्यायचे झाले तर, 1991 नंतर भारतात खासगीकरणाची सुरुवात झाली आणि अनेक सार्वजनिक कंपन्या कवडीमोल भावाने विकल्या गेल्या. 2G स्पेक्ट्रम आणि कोळशाच्या खाणी खासगी कंपन्यांना देताना सरकार जनतेचा विश्वस्त या नात्याने काम करण्यात अपयशी ठरले, म्हणून तत्कालीन सरकारला निवडणुकीत पदच्युत व्हावे लागले. विद्यमान सरकारने तर विमानतळ, बंदरे, रेल्वे यांसारख्या मक्तेदारीयुक्त सार्वजनिक सुविधा विक्रीस काढलेल्या आहेत. विशेष म्हणजे, काही विशिष्ट उद्योगसमूहांनाच या क्षेत्रात शिरकाव करून दिला जात आहे. लिलाव-प्रक्रियेबद्दल जनतेने अधिक जागरूक राहिले पाहिजे ते यामुळेच!

Tags: टेलिकॉम कंपनी खनिज तेल संतोष मुळे लिलाव 2G स्पेक्ट्रम लिलाव-संबंधित यंत्रणेचा आराखडा Auction Mechanism Design santosh mule auction weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष मुळे,  उदगीर

प्राध्यापक, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके