डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आधुनिक तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचे असले, तरी त्यामुळे नवनवीन बाजारपेठा विकसित झालेल्या आहेत. सर्वाधिक मागणी असलेल्या काळात वीजविक्रीकरता वीज कंपन्यांनी लिलावाचे कोणते प्रारूप वापरावे, मासेमारीकरता प्रत्येक जहाजांना लिलावाद्वारे कोटा कसा निर्धारित करावा, इंटरनेटवर जाहिरातीसाठीचे दर कसे निर्धारित करावेत, दूरसंचार लहरी कशा विकाव्यात- या व अशा प्रकारच्या अनेक समस्यांच्या निराकरणात आणि किंमतनिश्चितीत  पारंपरिक ज्ञान अपुरे असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने विकता येत नाहीत, अशा वस्तू व सेवांच्या विक्रीकरता नवे लिलाव प्रारूप विकसित करणे अत्यावश्यक असते. या व यांसारख्या अनेक व्यावहारिक प्रश्नांवर विल्सन व मिलग्रोम यांचे मूलभूत असे संशोधन आहे. असे असले, तरी यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती 1993 मधील अमेरिकेतील स्पेक्ट्रम लिलावाकरता त्यांनी विकसित केलेल्या नवे लिलाव आराखड्यामुळे.

लिलाव सिद्धांतातील सुधारणा आणि नवे लिलाव स्वरूप विकसित केल्याबद्दल रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम या अमेरिकन (USA)  गुरू-शिष्यांना अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीदिनी दि. 10 डिसेंबर 2020 रोजी जगातील अत्युच्च सन्मानदर्शक अशा नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रूढ अर्थाने या पुरस्काराला अर्थशास्त्रातील नोबेल असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात यास अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे सेवेरिजस रिक्स बँक (स्विडनची मध्यवर्ती बँक) पारितोषिक असे अधिकृत नाव आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात मानवजातीच्या कल्याणाकरता सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या पाच क्षेत्रांकरता हे पारितोषिक ठेवले होते, त्यात अर्थशास्त्राचा समावेश नव्हता. बँकेच्या 300 व्या वर्धापनदिनानिमित्त 1968 मध्ये सेवेरिजस रिक्स बँककडून नोबेल फाउंडेशनला मिळालेल्या देणगीवर हे नोबेल पारितोषिक आधारित आहे. मात्र या पुरस्काराचे विजेते इतर नोबेल विजेत्यांप्रमाणेच पारितोषिक वितरण समारंभात उपस्थित राहतात; इतरांप्रमाणेच यांनाही स्विडिश राजाकडून मानपत्र, सुवर्णपदक व पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाते. नोबेल पारितोषिकाच्या अधिकृत वेबसाईटवरही या पुरस्कार-विजेत्यांची नोंद असते. त्यामुळे रूढ अर्थाने या पारितोषिकालाही अर्थशास्त्रातील नोबेल असे म्हटले जाते. राजकीय अथवा सामाजिक दृष्टिकोनापेक्षा शास्त्रीय आणि विशेषतः गणितीय व सांख्यिकीय माध्यमातून अर्थशास्त्रीय सिद्धांत व त्यांचे उपयोजन विकसित करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना  हे पारितोषिक दिले जाते. या अनुषंगाने 1969 ते 2020 या कालावधीत 52 वेळा (86 जणांना) हे पारितोषिक दिले गेले आहे.

अर्थशास्त्रीय सिद्धांत हे अनेक बाबी गृहीत धरून मांडलेले असतात, त्यामुळे बहुतांश वेळा ते वास्तवतेच्या जवळ जाणारे असतातच असे नाही. मात्र विल्सन आणि मिलग्रोम यांचे लिलाव सिद्धांत हे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने, वास्तव जगतातील वस्तूंच्या आणि सेवांच्या किंमतनिश्चितीचे प्रश्न सोडविण्याकरिता उपयुक्त आहेत, असे या पारितोषिक निवड समितीला वाटते.

कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात केवळ 40 मीटर अंतरावर राहणाऱ्या या दोन्ही गुरु-शिष्यांचा एकाच वेळी सन्मान होणे, हाही एक दुग्धशर्करायोग आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात सेवानिवृत्तोत्तर मानद प्राध्यापक असणारे 83 वर्षीय रॉबर्ट विल्सन यांच्या एकूण तीन शिष्यांना हे पारितोषिक आतापर्यंत मिळाले आहे, हे विशेष! नोबेल समितीकडून जेव्हा विल्सन यांना अमेरिकन वेळेच्या मध्यरात्री फोन केला गेला, तेव्हा ‘एवढ्या मध्यरात्री कुणी फोन केला असेल’ असे म्हणून त्यांनी तो डिस्कनेक्ट केला होता. निवड समितीने त्यानंतर त्यांची पत्नी मेरी यांच्याशी संपर्क करून विल्सन आणि मिलग्रोम  यांना हे पारितोषिक मिळाल्याचे सांगितले. निवड समितीचा 72 वर्षीय पॉल यांच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा त्या मध्यरात्री स्वतः रॉबर्ट विल्सन यांनी पॉल मिलग्रोम यांच्या घरी सपत्नीक जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली!

लिलावाची वेगवेगळ्या प्रकारे आखणी करून त्या माध्यमातून विभिन्न परिणाम साध्य करता येतात, हा या दोन्ही अर्थतज्ज्ञांच्या अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. आर्थिक समस्यांचे आकलन करणे आणि त्यातील गुंतागुंत सोडवणे, यात त्यांना रस आहे. त्यामुळे साहजिकच ते मूलभूत संशोधनास उपयोजनेची जोड देतात. आपल्याकडे संशोधनाकरता आलेल्या पॉलला रॉबर्ट यांनी त्यांच्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच दिलेला सल्ला असा की, ‘अव्यवहार्य आणि बिनमहत्त्वाच्या केवळ सैद्धांतिक बाबींवर वेळ घालवून नकोस. अशा समस्यांच्या निराकरणाची कुणालाही फिकीर नसते.’ पॉलनी तो सल्ला शिरोधार्य मानला आणि पुढे या दोघांनी इतिहास घडवला!

वरकरणी अतिशय सोपा वाटणारा लिलाव प्रत्यक्षात गुंतागुंतीचा असतो. विशेषतः लिलावात बोली लावणाऱ्या संभाव्य खरेदीदारांकडील लिलावातील वस्तूंविषयी असलेली माहितीची उपलब्धता किंवा अनुपलब्धता, त्याच्या बोली लावण्याच्या व्यूहरचनेवर प्रभाव टाकते, यावर या दोघांचे संशोधन आहे. या अनुषंगाने सांगायचे झाले तर, खनिज तेल उत्खनन पट्‌ट्यांच्या लिलावात विक्रीकरता किती संभाव्य तेल उपलब्ध होईल; त्याबद्दल सर्व बोली लावणाऱ्या संभाव्य खरेदीदारांमध्ये निश्चितता असते. मात्र भविष्यात ते तेल बाजारात नेमक्या कोणत्या किमतीला विकले जाईल, याबाबत अनिश्चितता असते. म्हणून येथे लिलावाचा प्रश्न कठीण बनतो. भविष्यकालीन किंमतविषयक माहितीबद्दल सर्व बोलीदारांचे आकलन एकसारखेच नसल्याने प्रत्येक जण आपापल्या माहितीच्या आकलनानुसार बोली लावतो. ज्याचे किंमतआकलन जास्त असते, तो अधिक किमतीची बोली लावतो आणि लिलाव जिंकतो. आता जर या प्रक्रियेत लिलावविजेत्याने प्रत्यक्षातील खऱ्या मूल्यापेक्षा अधिक किंमत देऊ केली असेल, तर त्याला नुकसान होते. अर्थशास्त्रात याला विजेत्याचा शाप (Winners Curse) असे म्हणतात.

लिलावातील बोलीदारांना लिलावातील वस्तूबद्दल आपल्या स्पर्धकांचे मूल्य-आकलन काय आहे याची माहिती लिलावातील विविध टप्प्यांत उपलब्ध करून देऊन संभाव्य विजेत्याला विजेत्याच्या शापापासून कसे वाचवता येईल, हा यांच्या संशोधनाचा मूलभूत गाभा आहे. त्यात लिलावाचा आराखडा आणि लिलावाचे नियम तयार करण्यात पॉल मिलग्रोम यांचा हातखंडा आहे. उच्च मूल्य असलेल्या आणि भरपूर काही पणाला लागणाऱ्या लिलावात कशा पद्धतीने लिलावाचे नियम असावेत, संभाव्य खरेदीदाराने बोली कशी लावावी- याकरता सल्ला देणारी एक कंपनीच पॉल चालवतात. एकंदर, लिलावात विक्री करणारा आणि खरेदी करणारा या दोन्ही पक्षांना तर्कशुद्ध पद्धतीने लिलाव किंमतनिश्चिती करण्यात ते मदत करतात. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अंतरंगात त्यांना डोकावून पाहता येते. 

आधुनिक तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचे असले, तरी त्यामुळे नवनवीन बाजारपेठा विकसित झालेल्या आहेत. सर्वाधिक मागणी असलेल्या काळात वीजविक्रीकरता वीज कंपन्यांनी लिलावाचे कोणते प्रारूप वापरावे, मासेमारीकरता प्रत्येक जहाजांना लिलावाद्वारे कोटा कसा निर्धारित करावा, इंटरनेटवर जाहिरातीसाठीचे दर कसे निर्धारित करावेत, दूरसंचार लहरी कशा विकाव्यात- या व अशा प्रकारच्या अनेक समस्यांच्या निराकरणात आणि किंमतनिश्चितीत  पारंपरिक ज्ञान अपुरे असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने विकता येत नाहीत, अशा वस्तू व सेवांच्या विक्रीकरता नवे लिलाव प्रारूप विकसित करणे अत्यावश्यक असते. या व यांसारख्या अनेक व्यावहारिक प्रश्नांवर विल्सन व मिलग्रोम यांचे मूलभूत असे संशोधन आहे. असे असले, तरी यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती 1993 मधील अमेरिकेतील स्पेक्ट्रम लिलावाकरता त्यांनी विकसित केलेल्या नवे लिलाव आराखड्यामुळे.

जेव्हा जनतेचा विश्वस्त या नात्याने सरकारला टेलिकॉम स्पेक्ट्रमसारखी दुर्मिळ साधनसामग्री खासगी कंपन्यांना द्यावयाची असते, तेव्हा जनहित आणि महसुलाचे महत्तमीकरण कसे करावे, हा प्रश्न सरकारला भेडसावत असतो. अमेरिकेला रेडिओ लहरींचा लिलाव 1993 मध्ये करावयाचा होता. याकरता त्यांनी अर्थतज्ज्ञांना हा लिलाव कसा करावा, याविषयी सल्ला मागितला. या लिलावात गुंतागुंत अशी होती की, रेडिओ लहरी या इतर वस्तूंसारख्या नसतात. हे परवाने विविध सर्कलमध्ये विभागलेले असतात, ते विविध रेडिओ फ्रिक्वेन्सीचेही असतात. त्यामुळे एकानंतर एक सर्कल लिलावाकरता घेतले गेल्यास लिलावात बोली जिंकणाऱ्या कंपन्यांना विजेत्याच्या शापाला सामोरे जावे लागते.

या अनुषंगाने भारताबद्दल सांगायचे झाले तर, महाराष्ट्रात मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया आणि उर्वरित महाराष्ट्र व गोवा असे दोन टेलिकॉम सर्कल आहेत. आता जर एखाद्या मोबाईल कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा द्यायची असेल, तर तिला या दोन्ही टेलिकॉम सर्कलमधील परवाने लिलावात घ्यावे लागतील. समजा- जर सुरुवातीला मुंबईच्या सर्कलमध्ये ही सेवा देण्याकरता कंपनीने लिलावात अधिक रकमेची बोली लावली, तर पुढच्या फेरीतील उर्वरित महाराष्ट्र व गोव्याकरता त्यांच्याकडे रक्कम कमी राहील. येथे एकेका सर्कलकरता असलेले मूल्य आणि दोन्ही सर्कलचे असलेले एकत्रित मूल्य यात एकत्रित परवाने अधिक मूल्याचे ठरतात. अशा परिस्थितीत एका प्रदेशापुरता मिळालेला परवाना आणि एकापेक्षा अधिक प्रदेशांकरता मिळालेला परवाना यातील मूल्यतफावत जास्त असते.

अमेरिकेत सुरुवातीला जो सर्वाधिक बोली बोलेल, त्याला त्या सर्कलचा परवाना फेडरल कमिशन ऑफ टेलिकम्युनिकेशन देणार होते. मात्र यात पुढील सर्कलच्या लिलावावेळी नेमक्या किती रकमेची बोली बोलावी, याविषयी कंपन्यांमध्ये अनिश्चितता निर्माण होणार होती. या ठिकाणी ही समस्या सोडविण्याकरता रॉबर्ट विल्सन आणि पॉल मिलग्रोम यांनी विकसित केलेली Simultaneous Multiple Round Auction (SMRA) पद्धत वापरली गेली. या लिलाव आराखड्यात विजेत्याचा शाप कमी करण्यासाठी सुरुवातीला कमी किमतीला लिलाव सुरू करून हळूहळू किंमत वाढणारी इंग्रजी लिलावाची पद्धत वापरली गेली. ही पद्धत सुरुवातीला अत्याधिक किंमत सांगून हळूहळू किंमत कमी करणाऱ्या डच लिलाव पद्धतीपेक्षा सरस आहे. कारण या पद्धतीत लिलावातील बोलीदार इतर बोलीदारांच्या बोली किमतीवरून लिलाव वस्तूबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.

अधिक माहिती म्हणजे अधिक योग्य बोली, अधिक उत्पन्न आणि आणि विजेत्याच्या शापाची शक्यता कमी. SMRA पद्धतीत सर्व फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव एकाच वेळी सुरू होतो. सहभागी कंपन्या त्यांना योग्य वाटणाऱ्या विविध सर्कलकरता एकाच वेळी बोली लावू शकतात. यात लिलावाच्या विविध फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीत सहभागी कंपन्या आपल्याला हव्या असलेल्या सर्कलकरता बंदिस्त लखोट्यात आपली बोलीरक्कम देतात. प्रत्येक फेरीच्या शेवटी या सर्व बोली रकमा जाहीर केल्या जातात. त्यामुळे सर्व बोली बोलणाऱ्या कंपन्यांना आपले स्पर्धक त्या परवान्याचे काय मूल्य ठरवत आहेत, हे कळते. ज्या कंपन्यांनी या फेरीत बोली लावली आहे, केवळ त्याच कंपन्यांना पुढील लिलाव फेरीकरता पात्र ठरवले जाते. मागील फेरीतील सर्वाधिक बोलीची रक्कमही पुढील फेरीकरता आधारभूत रक्कम मानली जाते. म्हणजे, या फेरीतील शिल्लक कंपन्यांना त्यापेक्षा अधिक रकमेची बोली लावावी लागते. अशा प्रकारे जोपर्यंत सर्वाधिक बोली लावणारा विजेता निश्चित होत नाही, तोपर्यंत या फेऱ्या होत राहतात. मागील फेरीच्या अनुभवावरून, स्पर्धकांच्या मूल्य-आकलनाच्या माहितीवरून प्रत्येक कंपनीला आपली बोलीविषयक व्यूहरचना बदलता येऊ शकते, बोलीरक्कम वाढवता येऊ शकते.

या लिलावप्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक फेरीत सहभागी बोलीदारांना बोली लावावीच लागते. या फेरीत मी फक्त इतरांची बोललेली रक्कम पाहतो आणि नंतर पुढच्या फेरीत बोली लावतो, असे कोणालाही म्हणता येत नसते. याला ॲक्टिव्हिटी रूल असे म्हणतात. ज्याप्रमाणे गवतातील हिरव्या रंगाचे साप अचानकपणे बेसावध भक्ष्यावर हल्ला करून त्याला गिळंकृत करतात, त्या प्रकारे ऐन वेळी शेवटी एखादा बोलीदार इतरांच्या बोली आकलनानुसार महत्तम बोली बोलून लिलाव जिंकू शकतो. याला अर्थशास्त्रात ‘स्नेक इन द ग्रास प्रॉब्लेम’ असे म्हणतात. मात्र ॲक्टिव्हिटी रूलमुळे या प्रक्रियेला खीळ बसते! असे नियम केल्याने बोलीची प्रक्रिया सोपी व न्याय्य बनते. यात सहभागी बोलीदारांना आपले खरे मूल्यआकलन जाहीर करावे लागते. अमेरिकन एफसीसीने विल्सन व मिलग्रोम यांचे प्रारूप जसेच्या तसे स्वीकारले आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी लिलाव या पद्धतीने करून दाखवला. या पद्धतीने स्पेक्ट्रम लिलाव करून अमेरिकन सरकारने आजपर्यंत 126 अब्ज डॉलर्स मिळवले आहेत. 

अमेरिकेनंतर जगातील बहुतांश देशांनी थोड्याफार फरकाने हेच प्रारूप वापरून स्पेक्ट्रमचा लिलाव केला. भारतही याला अपवाद नाही. मार्च 2015 मध्ये भारतात 2G  व 3G स्पेक्ट्रमचा पुढील वीस वर्षांकरता लिलाव झाला. हा लिलाव 19 दिवस चालला. यात बोलीच्या 115 फेऱ्या झाल्या. सरकारला या लिलावात एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या महसुलाची प्राप्ती झाली. तत्पूर्वी, युपीए सरकारच्या काळात लिलाव न करता दिल्या गेलेल्या 2G  स्पेक्ट्रम परवान्याच्या बाबतीत (झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे) असंतोषाचा हिवाळा निर्माण झाला नसता, असे मत अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया यानी नोंदवले आहे ते यामुळेच.

नोबेल समितीच्या पत्रकार परिषदेत रॉबर्ट विल्सन यांना विचारण्यात आले की- आपले लिलावाविषयी एवढे मोठे योगदान आहे, तर लिलावात एखादी वस्तू आपण घेतली आहे का? यावर रॉबर्ट यांना काही सुचेनासे झाले. त्यांना वाटले की, आपण आजपर्यंत लिलावात काहीच खरेदी केले नाही. मात्र त्यांच्या पत्नीने असे सांगितले की, आपण ebay वर घेतलेले मोबाईल, बर्फात घालण्याचे बूट हे एक प्रकारे लिलावात विकत घेतले आहेत!

नोबेल पारितोषिकविजेते अल्विन रॉथ (हे पण रॉबर्ट विल्सन यांचेच विद्यार्थी) यांच्या मते, अर्थजगतातील रॉबर्ट आणि पॉल हे दोन महान जिवंत अर्थतज्ज्ञ असून लिलाव कसा करावा आणि लिलावाबद्दल आपले आकलन कसे असावे, याविषयी त्यांचे भरीव योगदान आहे. या पारितोषक समितीचे चेअरमन फिटर फेड्रिकसन यांच्या मते, या दोघांचे शोध मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

असे असले तरी या दोघांना आपल्या संशोधनाच्या मर्यादा माहीत आहेत आणि सविनयाने ते कबूलही करतात. लिलाव सिद्धांत आणि आराखडे म्हणजे एखाद्या नदीवरील सुंदर असा पूल आहे. नदीवर पूल बांधता येतो, मात्र कोणत्याही नदीवर, कोणत्याही ठिकाणी सुंदर असा पूल बांधता येत नाही. तसे प्रत्येक ठिकाणी लिलाव कार्यक्षमपणे किंमतनिर्धारण करत असतोच असे नाही. जर सर्वांनी एकाच वेळी त्या वस्तूची मागणी केलेली नसेल, त्या वस्तू टिकाऊ स्वरूपाच्या असतील आणि त्यात वैयक्तिक सौदेबाजी शक्य असेल, तर लिलावपद्धत कार्यक्षमपणे किंमतनिर्धारण करत नाही, असे खुद्द पॉल सांगतात. 

दक्षिण आफ्रिकेमध्ये 2010 ते 2017 या काळात स्पेक्ट्रमचा लिलाव अयशस्वी ठरला. भारतामध्येही स्पेक्ट्रमचा लिलाव हा मर्यादित अर्थाने यशस्वी ठरला, तरी त्यातील विजेत्या कंपन्यांना कर्जाचे मोठे ओझे आज वाहावे लागत आहे. सरकारच्या धरसोड धोरणामुळे, प्रतिगामी करव्यवस्थेमुळे आणि विशिष्ट औद्योगिक घराण्यांना अधिक झुकते माप देण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. आज टेलिकॉम क्षेत्र हे प्रामुख्याने दोन ते तीन कंपन्यांच्या परिघापुरते मर्यादित झाले आहे, ते यामुळेच. लिलावातील विजेत्यांना सर्व लाभ मिळू शकतात आणि बोलीत मागे पडणाऱ्या कंपन्यांना आपला व्यवसायसुद्धा बंद करावा लागू शकतो. युनिसेफसारख्या संस्था लिलावाच्या माध्यमातून सर्वांत कमी किमतीला लस उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना आपले कंत्राट देतात. त्यामुळे स्पर्धक कंपन्या कमी होतात आणि भविष्यकाळात लशींच्या किमती वाढतात. म्हणून युरोपियन युनियनमधील अनेक देश एकापेक्षा अधिक कंपन्यांना लस थोडीशी महाग पडली तरी कंत्राटे विभागून देतात.

अशा प्रकारे लिलावाच्या मर्यादा असल्या तरी जसे विमानाच्या सर्व घडामोडींची माहिती असलेली काळी पेटी विमानात असते आणि अपघात झाल्यास तो का घडला याची माहिती त्यातून उपलब्ध होते; तसे मागणी-पुरवठ्यावर आधारित किंमतनिश्चितीची प्रक्रिया कशी कोलमडते, का कोलमडते, वस्तूंच्या किमती मागणी-पुरवठ्याने जरी ठरत असल्या तरी त्या नेमक्या कशा ठरतात- याविषयीची काळी पेटीच (Black Box) उघडून तपासली आहे. ही यंत्रणा  लिलावाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कार्य करते, ती गुंतागुंत सहजपणे उघडून दाखवली आहे. त्यांनाही आपल्या संशोधनाच्या मर्यादा माहीत आहेत. म्हणून विविध प्रकारे आपल्या सिद्धांतांना आणि प्रत्यक्षातील व्यवहारांना कसे निरामय करता येईल, यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न पुढेही चालू राहणार आहेतच. शेवटी विज्ञानात अंतिम असे काहीही नसते असे मानले तरी त्यांचे योगदान मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. 

Tags: अल्विन रॉथ स्नेक इन द ग्रास प्रॉब्लेम पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन अल्फ्रेड नोबेल नोबेल पुरस्कार अर्थशास्त्र लिलाव सिद्धांत संतोष मुळे santosh mule auction theory weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष मुळे,  उदगीर

प्राध्यापक, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके