शैला, उत्कृष्ट गाणारी आणि नाचणारी विद्यार्थिनी
कविताही करायची
शाळेचं स्नेहसंमेलन होतच नव्हतं
तिच्या सहभागाशिवाय
1
शैला, उत्कृष्ट गाणारी आणि नाचणारी विद्यार्थिनी
कविताही करायची
शाळेचं स्नेहसंमेलन होतच नव्हतं
तिच्या सहभागाशिवाय
सावळी, पण रेखीव अंगबांध्याची पोरगी
अख्ख्या हायस्कूलची नक्षत्राची खूण, शैला...
तिनं फुलं माळली की अख्खा वर्ग सुंगधून जायचा
आणि चित्रकलेचा शिक्षक
खूपच रसिक व्हायचा तासावर आल्यावर
तो नेहमीच सांगील म्हणायचा
विषकन्येची कहाणी
भारतीय कलेच्या इतिहासात डोकावत
आणि दाखविल म्हणायचा एक चित्राचा अल्बम
सगळ्यांना पण नाहीच दाखवायचा कधी
तू हटून बसायची ती चित्रं पाहण्यासाठी
आणि सर यायचा लाडात
2
तू उभी असायचीस शाळेत येत जात असता
मध्येच एखाद्या बोगणवेलीशी किंवा
बेशरमाच्या गर्दीत चोरून
तिथे असायचे कोणीतरी
शाळेबाहेरचे बोलत तू हसत-खिदळत राहायची...
हायस्कूलची पोरं वाटंला भेटली की
बोलायचीच नाही कधी कुणाशी
हळूहळू तुझ्या हाती सायकल आली
शाळेचा स्कर्ट तीनतिनदा सावरीत
सायकल चालवायची अदा
पोरं बरळायचे आपसात
तुझी हिंडण्याफिरण्याची कक्षा वाढली
सायकलनं गावाबाहेरच्या आमराया
गावाभोवतालची छोटी-मोठी देवस्थानं
तू असायचीस कसल्यातरी विचारात
नि तुझं आधीचं पाचवी-सहावीतलं हस्ताक्षर
नववीपर्यंत एकदमच गेलं गिचमीड होऊन
खायचीस बोलणी तू मॅडम लोकांची
पण तुला पुढाकार मिळायचा फक्त
चित्रकलेच्या तासात दंगा करायला
3
नववीच्या वर्गाचं गँदरींग झाल्तं
नि त्या दिसापासून तू कुणाला दिसली नाही
तुझ्या मायबापानं सारी जगदुनिया शोधलीती
पण तू सापडली नाही कधीच
तू जितीजागती शैला हरवली
जेव्हा केव्हा रेल्वे रूळावर काही
कटींग झाल्याच्या बातम्या येत
तेव्हा आम्ही पोरं जायचो हादरून
शैला तर नसंल असं वाटत राहायचं
तू नसूनसुद्धा जिथं तिथं दिसत राहिली अदृश्य
नंतर सुटीच्या दिवसात...
तुझ्या नावानं बातम्या आल्त्या...
तुझा फोटो ‘हरवला आहे’, या नावाखाली
बसस्टँड, रेल्वे स्टेशनावर चिकटवलाता
तू सोडून सगळेच वाचत असावेत,
‘घरी तुझे आई-वडील खूप आजारी आहेत
असशील तेथून, असशील तशी निघून ये’
शैला सापडलीच नाही
4
शैला तुझ्याकडं फार मोठा गुपिताचा साठा होता
म्हणतात वर्गातल्या पोरी
तू सांगायची, साऱ्या शाळेतल्या कोण कोण पोरी
कुठं कुठं चालूहेत, शाळेच्या रस्त्यावरचा कोणकोणता दुकानदार
कसा बघतो जाता-येता
आणि कोणकोणत्या व्यापाऱ्यांची पोरं
कशी धावत असतात पोरींच्यामागं
दुकानच्या सुटीच्या दिवशी मोटारसायकलवरनं
नि काय नंबर आहे त्या एकेका मोटारसायकलीचा
शैला तू कोण्या वाटेनं कुठं चालून गेल्ती माहीत नाही
पण जाताना आमच्या समोर एक मोठी भिंतच
उभारून गेल्ती
पुन्हा आम्हाला कधी पाहता आलं नाही
जिच्या पलीकडे
5
आणि अख्खी तीस वर्षे उलटून गेल्यावर भेटलीस
आळ्याच्या स्टँडवर
मी ओळखले पाहताच, ती तर होती
माझ्या देशाची हजारो वर्षांची नगरवधूची
परंपरा चालविणारी गणिका संप्रदायाची सदस्य
मी ओळखलेते तुला
पण तू नव्हते ओळखले शैला मला
असे कितीक माझ्यासारखे पाहिले असशील
आणि सारेच पुरूष सारखेच तर होते तुझ्यासाठी
तू तर्र ऽऽ होतीस
आणि तुझा मुक्तसंवाद चालू होता प्रवाशांसोबत
मला विचारले ‘कुठं जायचं?’
मी गाव सांगितलं...
तू म्हणाली, ‘‘आता गाडी रात्री बाराला
काय करणार तव्हर?
बसणार का साहेब’’
मी म्हणालो ‘मी साहेब-बिहेब काहीच नाही
तुला हवे तर मी शंभर रुपये देतो
ते घे आणि जा तुला जिकडे जायचे’
तर तू उसळून म्हणाली,
‘फुकटची भाड मी नाही खात महाशय
नि तसंच करायचं होतं तर
मी बाईल बनून नसते राहिले का
तुच्यासारख्या बाप्याची, एकाचीच.
6
मी अजिजीला आलो म्हणालो,
‘‘शैला, मला ओळखलं नाही तू
आपण जनता हायस्कुलात एक्याच वर्गात होतो’’
तू लगोलग म्हणाली, ‘‘शैला नाही महाशय
लैला म्हणा लैला
हजारांची छैला...’’
काही सांगू नका माझा भूतकाळ मला
तुमच्यापेक्षा जास्तच ठाऊकाय मला
तो चित्रकलेचा मास्तरं
चित्र दाखवायच्या निमित्तानं
मला रुमवर घेऊन गेल्ता
ती चित्र पाहून माझ्या मनाचा पार चिखल झाला
पुढं त्याला आकार द्यायला मास्तर होताच तयार
हे माहीत झालेल्या चुलतभावानं
माझ्या मुर्त्या करायचा कारखानाच काढलाता..
नि मग काय विचारता, कधी ह्यो कधी त्यो...
एकजण म्हण्ला लगीन करू, सुटशील यातून
आणि त्या भाड्यानं मला मुंबईचा बाजार दाखविला
आता उतारवयात येऊन अडकले या स्टँडवर
आणि तू देऊ करतोय ती शंभराची नोट
माझ्या कोणत्याच गरजा नाही भागवू शकत
माझ्या मेहनतान्याची
आजकाल खूपच मोठी किंमत आहे
7
माझी केली विचारपूस नि म्हणाली
‘कविता लिहितो व्हय, मला तर किती चांगले
यायचे गाता-नाचता
मी पण रचू शकत होते कविता,
अजूनही मनात रचून ठेवल्यात कितीक
ऐकतोस एक त्यातली?’
नि ती म्हणू लागली...
घरातल्या पोचाऱ्यालाही किंमत असेल
किंवा झाडूदेखील महाग आहे
माझ्या जीवितापेक्षा
लादीवर पडलेल्या डागांशी तुमची सोयरीक असेल
पण माझ्याशी नाते दाखवायला
लाजते तुची जीभ
टॉयलेटमधल्या भांड्यासारखे
मोकळे होता तुम्ही माझ्याजवळ
पुन्हा वरून थुंकून जाण्याची
तयारी ठेवता महाशय
माझी कुरकुरतात हाडे
तुमच्या ओझ्यांनी नि
तुमचा रसभंग होतो
त्यांच्या आवाजाने
तुमची झोपमोड टाळायला
मी झोपू शकले नाही कित्येक रात्र
तुम्ही असता दारूच्या तंद्रीत
नि तुमचे पाय पडतात अधांतरी
तेव्हा मी लागते तुम्हाला काठीसारखी सोबत
धडपडून तुम्ही जेव्हा विझवू जाता सिगारेट
टेबलाच्या लाकडी पायावर
तेव्हा बऱ्याचदा तिथं
माझेच पाय असतात महाशय.
Tags: कविता संतोष पद्माकर पवार शैला Mumbai Chitrkala Poem Kavita Santosh Padamakar Pawar Shaila weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या