जगासाठी मी स्वतःहून कसं मरावं?
अशानं असं होतं तर
त्याला मी काय करावं?
तुम्हीच डॉक्टर मला आज
माझा जीव घेणारं इंजेक्शन द्यावं’
1
तू होतीस वय वर्षे पाच
तेव्हाच तुझ्यावर शेजारी
राहणाऱ्या कुणी बंड्या-बाळ्यानं
केल्ता अत्याचार-
तुझा बाप वारलाता जन्म देऊन
तसं एकाकीच होतं तुझं घर गावात
तुझ्या मायनं पकडलंतं त्याला रंगेहाथ
तुझी माय निकराची
तिनं लावलीती तडीला पोलिसकेस
नि तिच्याच भाषेत सां
गायचं तर- ‘त्यो भाड्या
सात वर्षासाठी जाऊन बसलाता आत’
मोठी होतानाच तुझी वाढ होत राहिली
आतून अळीनं पोखरून निघणाऱ्या
फळासारखी, किडकी
2
तू हायस्कूलात जाऊ लागली
नि गुंडाळी फळे काढून आणायच्या
कामासाठी धाडलीती सरानं
सहावीत असताना
तर एका आडबाजूच्या खोलीत
शिपायानं नेऊन केल्ता अत्याचार
तू रडली, भेकली आतल्याआत
तू केलास सहन ह्यो वार
नि तुला तसे कामच लागले बार-बार
3
आठवीच्या वर्गात वरच्या वर्गातल्या
पोरांनी गँदरिंगच्या दिवसांत
उचलून नेल्ती शेजारच्या शेतात
आणि तोंडात बोळा कोंबून
सहाजणांनी केल्ता अत्याचार
तू झेलला ह्यो बी वार
तुला वाटू लागलेते
ह्येच असते पुरुषाचे काम
नि प्रत्येकजण हेच करीत असतो
संधी मिळेल तेव्हा
तू सोनी अशी अत्याचारित
कायमची बळी पडलेली शिकार
असल्या अत्याचाराला तू
आंघोळ करून आल्या कामासारखं
इसरायला लागली व्हती
तुझ्यात एक नागीण निजलेली होती
4
तुझ्या अनुभवी आईनं
हेरलंतं तुझ्यातलं बदलणं
तिनं नववीच्या वर्गातच
तुझं उरकलं लगीन तुझ्यापेक्षा
थोराड माणसासोबत...
तो दिसरात पिणारा दारुड्या होता
साऱ्या जगातून अपमान झालेला काढायचा रात्री राग तुझ्यावर
पिळायचा तुला महामूर
तुला वाटायचं किंवा तुझा समजच झाल्ता
पुरुष ह्यो असंच वागणार
त्यानं रागाला येऊन एकदा विचारलं,
‘तुला याचा काही अनुभव?’
तू सांगितलं सारं
लहानपणासून जे जे घडलतं
तो म्हणाला ‘थुः तुझ्या रांडंचे!’
नि टाकून घातलेते त्यांनी तुला
कायमचे
5
परत मायच्या घरी आली
तर तुझा परत
गावबाजार सुरू केला टग्यांनी
कुठं गवताचा भारा आणायला गेली
धरली
कुठं सांजची यायला उशीर झाला
धरली
कधी शेजारी, कधी नातेवाईक, कधी कोणी
तर कधी कोणी
तुझ्या मनाच्या भिंतीवर एकेका ड्रीलच
एकेक छिद्र बनून राहिलं
नि तू पुरती पोखरून गेल्ती
पण तुला काहीच होत नाही
असं जगाचं म्हणणं होतं
तुला कधी या सगळ्यातून
काहीच राहिलं नाही याचं
गणित लोकांना समजायचं नाही
तुला वयाचा, नात्याचा कशाचाच
घरबंध ठेवलेला नव्हता पुरुषांनी
तुझ्या लेखी सारे एकजात तेच करणारे
नि बाईचं कामच आहे जणू
त्यांना लागेल ते करू देणे
6
सोने, तू असं जगत होती
पण जसं काहीच घडत नव्हतं...
नि कोणाला त्याच काहीच वाटत नव्हतं
जगाचं रहाटगाडगं तुझ्याशी
असं वागून अगदी सुरळीत चालुतं
पण जे होत होतं तुझ्याशी
ते समाजानं चालवलेलं
पाण्यात हागण्याचं पाप
कुठेतरी ते वरती येणारच होतं आपाप
तुझ्याशी संबंध आलेले एकेक
आजारू लागले, अंथरूणाला
खिळू लागले, खिदबून-खिदबून मरू लागले
हळूहळू तुझ्याशी तसं केल्याचं
नि त्याचमुळं असं घडू लागल्याचं
लोक बरळू लागलेते
नि सरकारी डॉक्टरला पण कोणीतरी
हा निरोप पोच केल्ता
नि तुझी मेडिकल करावी असा
गावातल्या थोरामोठ्यांचा आतून रेटा होता
तुला थंडी-तापीच्या निमित्तानं
दवाखान्यात नेल्तं
तुझं रक्त त्यानं तपासणीसाठी
काढलतं...
मग आठापंधरा दिवसात
तुझ्या मायला बोलावण धाडलं
नि कानावर घातलं...
तुला ‘एचआयव्ही’ची बाधा झालीय
नि तुझ्यापासून कोणालाच आता
यापुढे होऊ नये
काळजी घ्यावी लागंल
तर तुझी माय म्हणली,
‘मला का काय कळत नाही?
हे काय चालूहे किती दिसापास्नं
जसं नवं काय तुम्ही सांगताहे मला
माझी पोर खटनाकच मशिन बनलीये
असं झालं नस्तं तर माझ्या लेकीवर
झाल्या अन्यायाचं उट्टं कुठून निघायचं होतं
जवढे मरतील तवढे मरू द्या
‘त्या भाड्यानं नानगी पोर..
वापरली त्याचा मुडदा बशिवला नाय कोणी
आज घडून राहिलं त्याला
जबाबदार हे का कोणी?’
7
डॉक्टरचं म्हणणं होतं...
सोने, तू कॅरियर होती एड्सची
नि तुला प्रत्यक्ष आजार होऊन मरायला
असू शकतात आणखी कोण जाणे कितीक वर्षे
तोवर कितीक लोक जातील बळी
‘संभाळ पोरी, संभाळ’
तव्हा सोने तू ढसाढसा रडलीस
नि म्हणाली,
‘मी का कोणाकडं गेल्ते आजार मागायला?
नि अजून कुठे गेली स्वतःहून
आयुष्यात कोणाकडं संग मागायला
तरी मीच दोषी कशी असंल डॉक्टर?
आवड-निवड, सवड मला कोणी ठेवलीच नाही
त्या बाईच्या हाती काय आहे?
लोक आवडीनं बिमारी जवळ करू राह्यले
मी काय धंद्यावाली थोडीच आहे?
आजवर झाले ते सारे अत्याचार
अत्याचार नि बलात्कार आहे...
हौसेनं काही केलं असंल तर
माझा जीव आज इथल्या इथंच जाईल
जगासाठी मी स्वतःहून कसं मरावं?
अशानं असं होतं तर
त्याला मी काय करावं?
तुम्हीच डॉक्टर मला आज
माझा जीव घेणारं इंजेक्शन द्यावं’
Tags: एचआयव्ही कविता सोनी संतोष पद्माकर पवार HIV Kavita Soni Santosh Padamkar Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या