डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आता होतच नव्हतं काही तुझ्यानं 
नुसताच वाद्यांकडं पहात हळहळत 
नि मरून आपलं सोनं झालं, असं म्हटलं तरी 
आपल्याला निरोप देणारं वाजाप 
आता गावात नाही याच्यानंच 
तू असतो कळवळत 


‘भोली सुरत दिल के छोटे 
नाम बडे पर दर्शन खोटे’ 
तू गाऊ लागला रोडवर 
बँडच्या साथीवर की अख्खा गाव येडा व्हायचा 
लोक म्हणायचे तुला रोडवरचा - ‘रोडू’ 
पिपानं धोधानं, संबळ लयाला गेली 
नि नव्या जमान्यातला पहिला इंग्रजी बँड 
तू शिकून घेतलाता
तू वाजवायचा सॅक्सोफोन खुबीनं 
कोणतंही वाद्य यायचं तुला 
जोडीलाच तू गाण्याचा प्रयोग केल्ता 
स्वतःचंच बँड पथकदेखील तयार केल्तं 
तरी तू घरी सरावाला 
पेटी ओढून बसलेला असायचा पहाटे 
राजवाड्यातून तुझी एखादी तरी लकेर 
बाहेर ऐकू गेली नाही असा 
दिवस नव्हता जात कधी 
कलाट, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, ड्रमसेट, सॅक्सोफोन 
नि एक खुळखुळ्यावाला 
तुला कॉम्पिटीशनच नव्हती 
होता बाबूभाईचा तडमताशा 
पण तू म्हणायचा 
लगीन लावायचं बाबूभाई आपल्याला 
सैनिक नाही लढवायचे रणवाद्ये वाजवायला 
पण दोन सुपाऱ्या जोडून आल्या तर 
एक बाबूभाईकडं पाठवायचा होता तुझा रिवाज 
तुझा कॉम्पिटीशनमध्येदेखील 
सुरू होता माणूसकीचा रियाज 


तू बँड आणला नि बाकिच्यांची 
रोजी रोटी गेली 
असं नको व्हायला 
म्हणून तू सुपाऱ्या वाटून घ्यायचा 
पण पुढच्या बँजो पार्टीवाल्यांनी मोडला नेम 
तू म्हणायचा तळतळून 
बँडची मजा ती बँडलाच 
गाणारा जिवंत आवाजात गातो 
नि ही काय आली नवी ट्यांव ट्यांव... 
रोडू, तू सजवायचा पथक असे 
जसे तुझ्या पथकात होते  
अलेक्झांडर, नेपोलियनच्या वेशभूषेच्या 
थाटाचे शिस्तबद्ध सैन्य 
त्यांचे लाल, पिवळे, निळे पोशाख 
आणि मंदिल असलेली शिरस्त्राणं 
तुझं गाणं श्रवणीयच नाही तर 
प्रेक्षणीयदेखील करायची


तू भरात होतास नि तुला 
आल्यात्या ऑफर चाळीसगावच्या बँडच्या 
वैजापूरच्या चाऊसच्या-स्ट्रिट सिंगरसाठी 
पण गावाला बँड राहणार नाही 
म्हणून नाही गेला बहुधा 
गावातले लगीन, साखरपुडे, देऊक तूच वाजवायचा 
पण बँडवाल्यांना एकदम शेवटी 
कुठंतरी आडबाजूला जेवायला वाढतात 
म्हणून भांडला नाही कुणाशी 
शिकवलेते माझ्या वयाच्या पोरांना 
खुळखुळा वाजवायला 
कोणीपण पोऱ्या करू शकायचा 
तुझी साथसंगत 


तुझी साथसंगत होती गावाला 
कोणत्याही वेळंपर्यंत 
माणूस लयी उमर जगला नि पिकलं पान होऊन मेला 
तर आनंद झाला म्हणून 
तुझा बँड असायचा मयतीला 
तू वाजवायचा तिथं देवीदेवतांच्या 
गाण्याच्या धून, भजनाच्या चाली 
गायचा त्यावेळी खूप करूण स्वरात


तू म्हातारा होत गेलास तसा 
तुझा बँडदेखील 
पुढे आल्या बँजोपाटर्या 
तुझ्याकडं खुळखुळा वाजवणाऱ्यांच्या 
ज्याला ना होती लय ना ताल 
नुसताच धिंगाणा 
तू नव्हते खपून घेतले कधी 
सुपारी देणाऱ्यांचे चाळे 
तुझ्याच शिस्तीने बँड वाजणार 
तुला वाटणार तिथंच थांबणार वरात 
तू काही कोणाचे ऐकत नसायचा 
तुझा खुलासा अवाक करणारा असायचा 
एवढी सालं झाली त्याच त्या गल्ल्यातून 
वाजवत जातो 
कोण आजारी, कोणा घरी लहान बाळ, 
कोणाला आवाजाचा त्रास, तुला पाठ झाल्ता 
धांगडधिंग्यापल्याड तुला कळायचे तेव्हा 
नि आता धुडगूसच होतो वाजापाच्या नावाखाली 
फुकून-फुकून तुझ्यासगट साऱ्या 
बँड पथकाच्या तोंडाची दात पडून झाल्ती बोळकी


आता आल्या डिजेच्या भिंतीकडे पाहून 
तू घातल्या शिव्या म्हातारपणातही 
हे काय घरादाराच्या भिंती हादरवणारं, 
काचा तडकवणारं आणि संडासचे चेंबर 
लिक करणारं? 
माणसांच्या छातीतली धडधड वाढवणारं 
नि मुख्य म्हणजे बेसूर 
आणि कशाचं कशाला ताळतंत्र नसल्यालं वाजाप? 
तू सांगायचा, काही राम राहिला नाही यात 
त्यात भर म्हणजे गावच्या 
चिटपाखराला गाव सोडायला लावणारा 
गावाची शांती घालवणारा 
तुला नाही आवडला डिजेचा अवतार 


आता कलाकुसरीनं वाजवणारं 
गावात कोणीच नाही वाजाप 
तुझ्या कलाटला चढला गंज 
आता सारा झकडम मसाला 
आयत्या-मायत्या शिड्या लावून 
वाजणारा गोमकाला 
तुझ्या छातीच्या भात्यात हवा भरता येत होती 
तव्हर तू वाजवलं 
आता होतच नव्हतं काही तुझ्यानं 
नुसताच वाद्यांकडं पहात हळहळत 
नि मरून आपलं सोनं झालं, असं म्हटलं तरी 
आपल्याला निरोप देणारं वाजाप 
आता गावात नाही याच्यानंच 
तू असतो कळवळत 

Tags: नेपोलियन अलेक्झांडर बँड बँजो डीजे रोडू कविता संतोष पदमाकर पवार Nepoleon Alexander Band Banjo DJ Rodu Poem Kavita Santosh Padamakar Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष पद्माकर पवार
santoshpawar365@gmail.com

कवी
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके