डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

डेंग यांनी आर्थिक नियोजन, औद्योगिक  उत्पादन, चीनमधील विज्ञान व संशोधन  क्षेत्राचे पुनरुज्जीवन, उच्च शिक्षण व विद्यापीठे  यातील सुधारणा सुरूच ठेवल्या. सांस्कृतिक  क्रांतीदरम्यान वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक व विचारवंतांचा जास्त छळ झाला. अनेकांना  ग्रामीण भागात कष्टाचे काम करण्यासाठी  पाठवून देण्यात आले. काहींच्या नशिबी  तुरुंगवास आला. या छळवादाला कंटाळून  काहींनी आत्महत्या केली, तर अनेकांनी  संशोधकाचा पेशा सोडला. चायनीज ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेसच्या आधिपत्याखाली 1965 मध्ये 100 हून अधिक विज्ञानसंशोधन संस्था  व केंद्रे होती आणि एकूण 25 हजारांवर  वैज्ञानिक होते. दहा वर्षांत फक्त 15  संशोधनसंस्था कार्यरत राहिल्या आणि त्यात 5 ते 6 हजार संशोधक शिल्लक राहिले. डेंग  यांनी ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे या शिखर  संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यास प्रारंभ केला व  उदारमतवादी हु या ओबांग यांना या  कामासाठी नियुक्त केले. 

माओ यांनी 1971 ते 1974 या कालावधीत  सुरुवातीला स्वतःच आणि 1973 नंतर डेंग यांच्या मदतीने सैन्यदलावर व सुरक्षायंत्रणेवर आपले पूर्ण नियंत्रण स्थापित  केले. लिन बिआओ यांच्या मृत्यूनंतर 1971 मध्ये सावध  होऊन माओंनी स्वतःच मध्य व दक्षिण चीनमधील सैन्यदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या तळांना भेटी दिल्या. बिआओ व त्यांच्या साथीदारांना निष्प्रभ करण्यासाठी  त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी पाठविले वा त्यांना  महत्त्वाच्या पदांवरून हटवून इतरत्र नेमले. सर्व नेत्यांना व  अधिकाऱ्यांना अशा रीतीने कह्यात ठेवण्यात यश  आल्यानंतर माओ यांनी सैन्यदलातील अधिकाऱ्यांवरील  टीकेची धार बोथट केली. झाऊ यांच्यावर झालेल्या  टीकेसंदर्भात हात झटकून माओंनी जियांग शिंग व आपल्या  दोन महिला स्वीय सहायकांना जबाबदार धरले. टीका  करण्यात जियांग शिंगने व तिच्या चौकडीने (गँग ऑफ फोर) मर्यादाभंग केला,  असाही आरोप माओंनी केला.  आपल्याला हवे तेव्हा एखाद्याला हाताशी धरून कुणाला  तरी टार्गेट करावे आणि तो सरळ झाल्यावर यासाठी  भलत्यालाच जबाबदार धरून आपण नामानिराळे राहावे, ही माओंची पध्दत होती. झाऊंवरील राजकीय टीका बोथट  झाली असली,  तरी त्यांच्या असाध्य कर्करोगाने त्यांच्यावर  मात करण्यास सुरुवात केली.

दि. 1 जून 1974 ला झाओ  हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिेयेसाठी दाखल झाले आणि नंतर  त्यांच्या मृत्यूपर्यंत बहुतांश काळ या इस्पितळात होते. तत्पूर्वी 1974 च्या सुरुवातीला डेंग व झाऊ परत एकत्र  काम करू लागले. झाऊ यांना माहिती होते की, डेंग यांनी  त्यांच्यावर जी टीका केली ती माओ यांच्या दबावाखाली  होती. माओंच्या इच्छेप्रमाणे डेंग हे जियांग शिंगबरोबरही  काम करू लागले;  परंतु जसजसे झाऊ खंगत चालले  तसतसे डेंग यांच्या अधिकारात वाढ होत गेली आणि त्यामुळे जियांग शिंग यांची अस्वस्थता वाढत गेली. माओ  यांनी आपले स्वतःचे भाषण 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात  सादर करण्यासाठी डेंग यांची निवड केल्यानंतर डेंग यांचा  पुढील रस्ता खऱ्या अर्थाने मोकळा झाला. मात्र त्यामुळे  जियांग शिंगची अस्वस्थता आणखी वाढली.  तैवानऐवजी चीनला संयुक्त राष्ट्रसंघाने 1971 मध्ये मान्यता देऊन चीनचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केला. मात्र असे असले तरीही चीनला फारशी प्रतिष्ठा अद्यापही प्राप्त झालेली नव्हती. कोणत्याही चिनी नेत्याने 1971 पासून ते 1974 पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघापुढे भाषण दिलेले नव्हते.

एप्रिल 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघापुढे आंतरराष्ट्रीय भूमिका मांडण्याची संधी चीनला  प्राप्त झाली. हे भाषण राष्ट्रसंघापुढे- जगातील सर्व देशांच्या वरिष्ठ प्रतिनिधींपुढे करण्याची संधी डेंग यांना मिळाली. या भाषणात प्रामुख्याने माओंचेच विचार होते. त्यात आर्थिक विकासावर भर होता. झाऊ यांची पाश्चात्त्य देशांबद्दलची व  एकंदरीतच परराष्ट्र व्यवहाराची सौम्य भूमिका लक्षात घेऊन  माओ यांनी हे काम डेंग यांच्याकडे सोपविले. या भाषणाचे  वैशिष्ट्य असे की,  1970 च्या दशकापासून सुरू झालेले  फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड हे शब्दप्रयोग प्रथमच या भाषणात झाले.आर्थिक विकासानुसार देशांचे वर्गीकरण दर्शविणारा भाषेचा वापर या भाषणापासून सुरू झाला. अमेरिका व रशियासह प्रगत देशांना फर्स्ट वर्ल्ड व मागासलेल्या देशांना थर्ड वर्ल्ड हा वापर माओ यांनी या  भाषणात प्रथम केला. त्यामुळे देशांचे वर्गीकरण त्यांच्या साम्यवादी क्रांतीच्या बांधिलकीवरून करण्यापेक्षा त्यांच्या  आर्थिक प्रगतीवरून करणे अधिक श्रेयस्कर,  ही माओ यांची  भूमिका महत्त्वाची. या भाषणाचा अर्थ असा होता की, पारंपरिक साम्यवादी विचारांमध्ये काहीही असले तरी  प्रत्यक्षात रशिया व अमेरिका हे दोघेही साम्राज्यवादी असून  सर्व देशांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला,  तर अन्याय व आर्थिक शोषण थांबविण्यासाठी दुसऱ्या व  तिसऱ्या जगातील विकसनशील देशांनी एकत्र येऊन  साम्राज्यवादी शक्तींना रोखले पाहिजे. युनोला गेलेल्या शिष्टमंडळाचे औपचारिक नेतृत्व परराष्ट्रमंत्री गुनहुआ यांच्याकडे असले तरी प्रत्यक्ष सत्तेच्या उतरंडीत वरिष्ठ  असणाऱ्यांत व युनोच्या आमसभेत भाषण करणारे डेंग यांच्याकडेच शिष्टमंडळाचे नेतृत्व होते. डेंग यांच्या युनोच्या आमसभेतील भाषणाला उत्तम  प्रतिसाद लाभला. तिसऱ्या जगातील विकसनशील देशांचे नेतृत्व चीन करू शकेल असे वाटावे,  इतके ते ओशासक  भाषण होते. शिवाय हे भाषण देत असतांना डेंग यांनी  चीनच्या जबाबदारीचा जो उल्लेख केला,  तो सर्वांना  भावणारा होता. जगातील अन्यायित व शोषित अशा  तिसऱ्या जगतातील देशांशी संबंध ठेवताना चीन कोणावरही   अन्याय होऊ देणार नाही आणि जर चीनने असे केले तर तो  समाजवादी असूनही साम्राज्यवादी म्हणून गणला जाईल व  तो निभर्त्सनेस पात्र असेल. अशा देशाला भले तो चीन  असला तरी,  अस्तित्वात असण्याचा अधिकार राहणार  नाही,  या भावपूर्ण उल्लेखाने चीनने सर्वांची मने जिंकली.

हेन्री  किसिंजर यांनी डेंग यांची या दौऱ्यादरम्यान भेट घेतली.  त्याचबरोबर जॉर्ज बुश (सिनिअर) व इतर अनेक अमेरिकन  नेत्यांनीही डेंग यांची भेट घेतली.  किसिंजर यांनी एक मार्मिक निरीक्षण नोंदवून ठेवले आहे. त्यांच्या मते,  माओ व झाऊ या दोघांच्या परराष्ट्र  धोरणाचे उद्दिष्ट प्रामुख्याने चीनची सुरक्षितता होते. डेंग यांना  मात्र परराष्ट्रधोरणाचे उद्दिष्ट चीनला अधिक स्थैर्य, आर्थिक  प्रगती आणि आधुनिकीकरण करण्यास मदत व्हावी हे होते.  हेन्री किसिंजर जेव्हा पुढे चीनला येत, तेव्हा ते डेंग यांना भेटत. त्यांचे संबंध शेवटपर्यंत उत्तम राहिले. मात्र या  युनोच्या भेटीत डेंग यांचा स्पष्टवक्तेपणा किसिंजर यांना  गोंधळात पडणारा होता. रशियाशी तह करण्यात व समझोता करार करण्यात अमेरिकेचा खूप फायदा चीनमुळे झाला  आहे. चीनचा वापर करून रशियाशी अमेरिका चांगले संबंध  ठेवू इच्छिते,  हे चीनवर अन्यायकारक आहे,  असे डेंग यांनी  किसिंजर यांना ठणकावून सांगितले. रशिया मुळात अमेरिकाविरोधी आहे हे अमेरिकेने समजून घ्यावे,  असा  सल्लाही डेंग यांनी त्यांना दिला. आपण अमेरिकेबरोबर किती कणखरपणे बोलतो हे माओंना कळणार,  हे माहीत  असल्याने डेंग या भेटीत फारच कडक व आग्रही दिसले.  स्वतःकडे 1978 नंतर सत्ता आल्यानंतर मात्र डेंग याबाबतीत खूप लवचिक राहिले. झाऊ यांचा विषय काढला  की,  डेंग गप्प होत,  ही बाबही किसिंजर यांना खटकली.  कन्फ्युशियसबद्दल बोलताना डेंग यांनी ‘कन्फ्युशियस  प्रतिगामी व क्रांतीविरोधी तत्त्वाचा ऐतिहासिक प्रतिनिधी  आहे’ असे उद्‌गार काढले. किसिंजर यांनी जेव्हा अशा  ऐतिहासिक व्यक्तींचा संबंध प्रत्यक्षात कसा येतो,  हे विचारले,  तेव्हा डेंग यांनी कन्फ्युशियस हा प्रतिगामी शक्तींचे  एक प्रतीक आहे आणि आजच्या अनेक नेत्यांना ते लागू  पडते, असे उत्तर दिले. कन्फ्युशियसबद्दलचा संदर्भ हा  अर्थातच माओ यांच्या प्रभावामुळे होता.

पुढे तियानमेन प्रकरणानंतर चिनी राज्यकर्त्यांना चीनमध्ये सामाजिक  स्वास्थ्याचे व सौहार्दाचे वातावरण हवे होते. त्यामुळे 1992 नंतर याच प्रतिगामी कन्फ्युशियसचे पुनर्वसन करण्यात आले आणि आज कन्फ्युशियस चीनचा राष्ट्रीय  तत्त्वज्ञ/विचारवंत आहे,  तर त्याचा पुतळा तियानमेन  चौकात दिमाखाने उभा आहे. (हा पुतळा 2010 मध्ये जवळच्याच राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात आला आहे.)  न्यूयॉर्क सोडण्यापूर्वी डेंग यांनी वॉल स्ट्रीटला भेट दिली. विशेषत: अमेरिकन भांडवलशाहीच्या मूळ प्रेरणा काय आहेत,  तिची संस्थात्मक चौकट कशी असते याची त्यांनी  माहिती घेतली.  डेंग चीनला परतले, तेव्हा झाऊ यांची तब्येत  आणखीनच खालावली होती. दि.4 ऑक्टोबर 1974 रोजी, माओंनी डेंगना प्रशासनात झाऊनंतरचे सर्वांत  महत्त्वाचे पद- वरिष्ठ उपपंतप्रधानपद दिले. जियांग शिंग व  वँग हाँगवेन यांनी या नेमणुकीला आडमार्गाने बराच विरोध केला. मात्र माओ बधले नाहीत. जियांग शिंग ही खूपच  महत्त्वाकांक्षी आहे आणि आपल्यानंतर ती सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करील,  हे माओ यांना माहीत होते. डेंग यांचे नवे प्रमोशनही तिला सहन होत नव्हते. तिने 15  दिवसांत काही तरी कारण काढून डेंगबाबत माओचे मत कलुषित करण्याचा प्रयत्न केला. फेंगकिनलून हे 10,000  टनी जहाज चीनने स्वत: बांधल्यानंतरही डेंग व झाऊ हे  त्याहीपेक्षा जास्त क्षमतेचे जहाज पाश्चात्त्य देशांकडून विकत  घेत आहेत आणि त्यावरून ते दोघे भांडवलशाही धार्जिणे आहेत,  असा प्रचार तिने सुरू केला. खवळलेल्या डेंगने  पॉलिट ब्युरोच्या बैठकीत सभात्याग करीत ‘मी वयाच्या  16 व्या वर्षी 50 वर्षांपूर्वी फ्रान्सला गेलो होतो,  तेव्हा  साध्या जहाजांचे वजनही 40,000 टन असे’, असा टोला  त्यांनी जियांग शिंगला मारला. या बाबतीत चीन  मागासलेला आहे, असेच त्यांनी ध्वनित केले. प्रकरण  तापले आणि जियांग शिंग व वँग हाँगवेन यांनी डेंग यांच्या  विरोधात आघाडी उघडली. मात्र माओ हे सारे ऐकून  घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी उलट डेंग यांना सांस्कृतिक क्रांतीमध्ये झालेल्या पडझडीतून बाहेर  पडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

जानेवारी 1975 मध्ये झालेल्या नॅशनल पीपल्स  काँग्रेसमध्ये डेंग यांच्या सत्ता-परतीवर शिक्कामोर्तब झाले. उपपंतप्रधान, सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष, पक्षाचे तिसरे उपाध्यक्ष व पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य  इत्यादी पदे डेंग यांना देण्यात आली. माओ यांनी डेंग यांना  अनेक वरिष्ठ पदे देऊन त्यांना कामाची मोठी संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र तरुण अननुभवी 39 वर्षांच्या वँग हाँगवेन या जहाल पंथीयाला पक्षाचे उपाध्यक्ष करून  त्यामार्फत डेंग यांच्यावर राजकीय अंकुशही ठेवला. इतर जहाल व कडव्या सदस्यांनाही सत्तेत वाटा दिला. शिवाय  कम्युनिस्ट पक्षाची प्रचारयंत्रणा जियांग शिंग आणि तिच्या  तीन सहकाऱ्यांकडे दिली. पक्षाचे वर्तमानपत्र पीपल्स डेली, पक्षाचे जर्नल रेड फ्लॅग इत्यादींवर जियांग शिंग हिचे नियंत्रण  होते. सत्तावर्तुळात वरिष्ठ नेते जियांग शिंग आणि तिचे  सहकारी यांना चौकडी असे संबोधित असत. प्रसारमाध्यमे  व पक्षाच्या प्रचारयंत्रणेवर त्यांचे नियंत्रण असल्याने ज्याला  त्रस्त करावयाचे असेल त्याच्याविरुध्द माध्यमातून व  प्रचारयंत्रणेतून हल्ला चढविण्यात येई. त्यामुळे सारेच या चौकडीला घाबरत असत. 1965 नंतर 10 वर्षांनी प्रथमच  भरणाऱ्या महत्त्वाच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये कर्करोगाशी सामना करणाऱ्या झाऊ एन लाय यांचे भाषण  झाले. ही त्यांची शेवटचीच काँग्रेस, शेवटचेच भाषण आणि  त्यांचे सार्वजनिक जीवनातले शेवटचेच दर्शन! 5000  शब्दांचे छोटे भाषण वाचून दाखवितानाच झाऊ यांची  दमछाक झाली. विकलांग झाऊ यांना या अवस्थेत पाहून  अनेकांचे डोळे पाणावले.  डेंग यांच्यापुढे सांस्कृतिक क्रांतीत रुतलेल्या प्रशासनाचा  गाडा पुढे घेऊन जाण्याचे आव्हान होते. माओंच्या  विचारांचा उद्‌घोष करीत-करीत प्रशासकीय सुधारणा करणे  व सांस्कृतिक क्रांतीच्या पडझडीतून नवा चीन उभारणे,  हा डेंग यांचा कार्यक्रम होता. चिनी अर्थव्यवस्था कुंठित झाली  होती, नियोजन पूर्णत: असफल झाले होते,  शेती उत्पादन  कमालीचे घटले होते,  कारखाने बंद तरी पडले होते किंवा उत्पादकता खूप घसरली होती,  वाहतूक व्यवस्था  मोडकळीस आली होती. विद्यापीठे ओस पडली होती.  विशेषत: विचारवंत,  बुध्दिमंत,  प्राध्यापक,  संशोधक,  लेखक या साऱ्यांना माओंच्या छळवादाचा फटका बसला  होता. त्यामुळे प्रशासनाची घडी नीट बसवीत असताना या  बुध्दिमंतांचेही पुनर्वसन करणे व त्यांना दिलासा देणे  आवश्यक होते.

डेंग यांनी प्रशासनाच्या,  संस्थांच्या व  व्यवस्थापनाच्या प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे सामूहिक  नेतृत्व निर्माण करण्यावर भर दिला. सरकारातील अनेक  विभाग,  संस्था, विद्यापीठे इत्यादींमध्ये अशा प्रकारे डेंग  यांनी प्रशासनाची व संस्थांची घडी परत बसविली.   सैन्यदलाचा वापर सांस्कृतिक क्रांतीच्या दरम्यान  सातत्याने नागरी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि  तेथील गोंधळ दडपून टाकण्यासाठी केल्याने लष्करात अनेक  अनिष्ट प्रथा व पायंडे सुरू झाले होते. लष्कराला आवश्यक  असणारे प्रशिक्षण, शस्त्रसज्जतेसाठी व कार्यक्षमतेसाठी  करावयाचे कार्यक्रम, सराव ठप्प झाले होते. मिलिटरी ड्रील्स  बंद झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अरेरावी,  उद्धटपणा तर वाढला होताच; शिवाय नागरी प्रशासन व पक्षाचे राजकारण यांच्याशी सातत्याने संबंध आल्याने सैन्यदलाचे राजकीयीकरण होत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पडलेले तट व संघर्ष यामुळे सैन्यदलाच्या नीतिधैर्यावर परिणाम झाला होता. सैन्यदलाची बेसुमार वाढ झाली होती व  आधुनिकीकरणाला खीळ बसली होती. सीएमसीचे सदस्य व पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य मार्शल ये  जियानयिंग यांच्या मदतीने डेंग यांनी सैन्यदलाच्या  आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. त्यात आधुनिक  शस्त्रास्त्रे,  सुसज्जीकरण, सुरक्षिततेविषयीचे धोरण व  स्ट्रॅटेजीज तसेच सैन्यदलाच्या पुनर्रचनेचाही समावेश केला. लिन बिआओ यांनी 25000 अधिकाऱ्यांविरुध्द सूडबुध्दिने  व राजकीय हेतूने कारवाई सुरू केली होती. डेंग यांनी त्याची  चौकशी करवून त्यातील अनेकांना सैन्यदलात परतीचा मार्ग उपलब्ध करून दिला. सैन्यदलातील सैनिकांची संख्या  विनाकारण वाढलेली होती. ती कमी करण्यासाठी वस्तुनिष्ठ  मानके,  शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण,  सुधारित तंत्रज्ञान व  सुरक्षाविषयीचे धोरण यांची पुनर्बांधणी सुरू झाली. या Downsizing मुळे काही वर्षांतच लष्कराची कार्यक्षमता  वाढू लागली, आधुनिकीकरण सुरू झाले व खर्च कमी  झाला. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना व जवानांना पक्ष, सरकारी विभाग, ग्रामीण भागातील कम्युन्समध्ये वा उद्योग  इत्यादींमध्ये समावून घेण्यात आले. गुणवत्तावाढीसाठी प्रगत तंत्रज्ञान,  युध्दतंत्रे व व्यापक प्रशिक्षणाचा वापर करण्यात आला. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद झालेली लष्कराची 101 प्रशिक्षण केंद्रे पुनरुज्जीवित करण्यात  आली. सीएमसी व पॉलिट ब्युरोमध्ये डेंग व मार्शल ये यांनी जहालांना काळजीपूर्वक लांब ठेवले. आण्विक कार्यक्रम व  क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणाऱ्या दोन केंद्रांचे कामकाज  अंतर्गत भांडणामुळे थंडावले होते. आयसीबीएम चाचण्यासुध्दा 1974 मध्ये अयशस्वी झाल्या होत्या. या  दोन्ही केंद्रांचे काम डेंग यांनी सुरळीत केले.  सांस्कृतिक क्रांतीच्या गोंधळात जी संस्थात्मक पडझड  झाली,  त्यात पायाभूत क्षेत्राचे खूप नुकसान झाले. पोलाद, कोळसा, वाहतूक इत्यादी क्षेत्रांतील वाढ थांबली होती.  

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डेंग यांनी ज्या  प्रशासकीय सुधारणा हाती घेतल्या,  त्यात रेल्वे प्रशासन  महत्त्वाचे होते. मात्र सांस्कृतिक क्रांतीच्या कालखंडात  वाहतूक व रेल्वेव्यवस्था जवळजवळ कोसळली होती. रेल्वे  सुधारणांना सुरुवात करण्यासाठी डेंग यांनी वायव्य जीआंग्सू  प्रांतात झुनहौ या महत्त्वाच्या जंक्शनची निवड केली. या केंद्रातून पूर्व-पश्चिम जाणारी लाँग हाय व उत्तर-दक्षिण  वाहतूक करणारी जिन पू असे दोन रेल्वेमार्ग जात असत. या  जंक्शनमधून 1975 पूर्वी रेल्वे कधीही वेळेवर जात नसत,  तेथील माल कधीही वॅगन्समध्ये वेळेत भरला जात नसे, मालाची चोरी होत असे. अनास्था व गोंधळ यामुळे  वाहतुकीचा वेगही कमी असे. स्थानिक रेल्वे बोर्डाचा कारभार अतिशय ढिसाळ व अकार्यक्षम होता आणि  बोर्डाच्या प्रमुखाचे पद राजकीय होते. स्थानिक राजकीय  संघर्षामुळे कामगारांमध्ये व व्यवस्थापनात दोन तट पडले होते. कामगार व कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र गुंडही असत.  त्यांचे नियंत्रण तेथील गोडाऊन्सवरही असे. मालाच्या चोऱ्या ही एक नित्याची डोकेदुखी होती. तेथील गुंड कामगारांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच  स्थानिक गुंडांनी अडकवून स्थानबध्द करून ठेवले. शेवटी  सेनेची कुमक पाठवून स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्यात  आला. अशा प्राथमिक साफसफाईनंतर डेंग यांनी या  क्षेत्रातील अनुभवी प्रशासक वान ली यांना रेल्वे मंत्री नेमले.  त्यानंतर नानजिंग व जिआंग्सूमधील इतर रेल्वे केंद्रांमध्ये  अशाच पध्दतीने सुधारणा करण्यात आल्या. तंत्रज्ञान व  व्यवस्थापनशास्त्राचा योग्य वापर, गुंडगिरीचा बीमोड, कार्यक्षम पध्दतींचा अंगीकार इत्यादींचा वापर करून  रेल्वेमध्ये उत्तम सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वेचे  कोचेस,  इंजिने व इतर रेल्वेला लागणाऱ्या साधनांचे  उत्पादन करणाऱ्या कारखान्यांकडे व फॅक्टरींकडे ते वळले.  तिथेही कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी अशाच  उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे फॅक्टरी व  कारखानेही सुरळीत उत्पादन देऊ लागले.  डेंग यांचे प्रशासकीय सुधारणांचे झुनहौ मॉडेल चीनमध्ये  प्रसिध्द झाले. आधी तेथील प्रशासनाला वेठीला धरणाऱ्या  स्थानिक गुंडांचा व त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय  नेतृत्वाचा बंदोबस्त करायचा- या निर्णयासाठी प्रथम केंद्र  सरकार व पक्षात योग्य ती सहमती निर्माण करायची. केंद्र  सरकारकडून तज्ज्ञ मंडळी प्रश्न सोडविण्यासाठी पाठवायची आणि यथावकाश तंत्रज्ञान व व्यवस्थापन तंत्रे वापरून  सुधारणा करावयाच्या. या अनुभवावरून त्यांनी कोळसा  उत्पादन,  पोलाद,  वीजनिर्मिती,  खते,  हलक्या औद्योगिक मशिनरी उत्पादन इत्यादी अनेक क्षेत्रांत सुधारणांची सुरुवात  केली. डेंग यांनी आर्थिक उत्पादन वा उत्पादकतेत जी वाढ  घडवून आणली,  ती बरीचशी प्रशासकीय सुधारणांच्या  माध्यमातून. सर्वच उद्योग सरकारच्या मालकीचे होते. त्यांच्यात व स्थानिक पक्ष संघटनांमध्ये नेहमीच अंतर्गत  संघर्ष सुरू असत. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान रेड गार्ड्‌सनी उच्छाद मांडला होता. या राजकीय घडामोडींचा उद्योगांवर  व तेथील कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम झाला होता. डेंग  यांनी त्याची दखल घेऊन पक्ष व सरकार यांच्यातील अंतर  नाहीसे करून, राजकीय संघर्ष टाळून उत्पादन व उत्पादकता  वाढविण्याचा प्रयत्न केला.

डेंग यांनी 1975 मध्ये आर्थिक विकासाचा ध्यास  घेतलेला असतानाच वँग हाँगवेन यांच्यावरील माओंचा विेशास डळमळीत होऊ लागला. झिजियांग प्रांतात  गटबाजी व अंतर्गत संघर्ष याचा परिणाम होऊन राजकीय  बंडाळी आणि अस्थिरता निर्माण झाली होती. माओ यांनी  वँग हाँगवेन यांना झिजियांगचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे  पाठविले. ते त्यांना जमले नाही. वँग हाँगवेन हे स्वत:च  अतिशय जहाल असल्याने त्यांना समन्वयवादी भूमिका घेणे  जमत नव्हते. झिजियांगमधील राजकीय बंड व सुंदोपसुंदीवर उपाय म्हणून डेंग यांनी राजकीय सहमती निर्माण करून व  केंद्रातून दबाव आणून राजकीय स्थैर्य निर्माण केले आणि  अंतर्गत संघर्ष संपविला. रेल्वेच्या बाबतीत झुनहौमध्ये जे काम वान ली यांनी केले,  तसेच काम झिजियांगमध्ये जी  डेंगकुई यांनी केले. या ठिकाणीसुध्दा कम्युनिस्ट पक्ष व  माओ दोघेही डेंग यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. दरम्यानच्या काळात डेंग यांनी आर्थिक नियोजन,  औद्योगिक उत्पादन,  चीनमधील विज्ञान व संशोधन क्षेत्राचे  पुनरुज्जीवन,  उच्च शिक्षण व विद्यापीठे यातील सुधारणा सुरूच ठेवल्या. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान वैज्ञानिक,  संशोधक,  प्राध्यापक व विचारवंतांचा जास्त छळ झाला.  अनेकांना ग्रामीण भागात कष्टाचे काम करण्यासाठी पाठवून देण्यात आले. काहींच्या नशिबी तुरुंगवास आला. या छळवादाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली,  तर  अनेकांनी संशोधकाचा पेशा सोडला. चायनीज ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या आधिपत्याखाली 1965 मध्ये 100  हून अधिक विज्ञानसंशोधन संस्था व केंद्रे होती आणि एकूण 25 हजारांवर वैज्ञानिक होते. दहा वर्षांत फक्त 15 संशोधनसंस्था कार्यरत राहिल्या आणि त्यात 5 ते 6 हजार  संशोधक शिल्लक राहिले. डेंग यांनी ॲकॅडेमी ऑफ  सायन्सेसचे या शिखर संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यास प्रारंभ केला,  उदारमतवादी हु याओ बांग यांना या कामासाठी  नियुक्त केले. प्रथम ॲकॅडेमीमधून कम्युनिस्ट पक्षाच्या  अधिकाऱ्यांना व प्रचार यंत्रणेला बाहेरचा रस्ता दाखविला गेला. त्यानंतर ग्रामीण भागात व इतरत्र श्रमदानासाठी  पाठविलेल्या संशोधकांना व वैज्ञानिकांना त्यांच्या  संस्थामध्ये परत पाठविण्याचे काम सुरू झाले.

सांस्कृतिक  क्रांतीत होरपळून निघालेल्या वैज्ञानिक/संशोधकांच्या  कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी खास योजना तयार  केल्या,  त्यांच्या निवासाची व्यवस्था केली,  त्यांना खास  सुविधा दिल्या. वैज्ञानिकांसाठी खास वातावरण तयार  करण्यावर भर देण्यात आला. विशेषज्ञ व तज्ज्ञ निर्माण  करण्यासाठी बुध्दिमान व होतकरू संशोधकांना अधिक सोई-सवलती देण्याचे धोरण तयार केले गेले. ॲकॅडेमीने  विविध प्रकारच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमांना व  धोरणांना पूरक ठरणारे संशोधन कार्यक्रम हाती घेतले. संगणक, लेसर्स, रिमोट सेन्सिंग,  बायो-सायन्सेस,  अणुशक्ती,  पार्टिकल फिजिक्स यासाठी विशेष अग्रक्रम  देण्यात आला. परंतु हे सारे माओ यांच्या राजकीय  विचारांच्या चौकटीत बसविणे तसे अवघडच होते.  विशेषतः विज्ञान व तंत्रज्ञान यांना समाजात एक स्वतंत्र व  उच्च दर्जा देणे हे पारंपरिक कम्युनिस्ट विचारसरणीत बसत नव्हते. एखाद्या वर्गाला अशा खास सवलती देणे  कम्युनिस्टांच्या वर्गसंघर्षाच्या संकल्पनेच्या विरुध्द होते. या सुधारणा- विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा,  संशोधन क्षेत्रातील सुधारणा व साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील काही घडामोडींमुळे जियांग शिंग व तिच्या  चौकडीच्या हातात मोठे कोलीत मिळाल्यासारखे झाले आणि पुढे डेंग यांना फार मोठ्या विरोधाला तोंड द्यावे  लागले.

Tags: china satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात