डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

ऑक्टोबर 1975 मध्ये चिंगहुआ  विद्यापीठातील एका प्रकरणात डेंग पूर्णत: अडकले व माओंच्या मर्जीतूनच उतरले. डेंग यांनी सांस्कृतिक क्रांतीत देशोधडीस  लागलेल्या बुध्दिमंतांचे, विचारवंतांचे व नेत्यांचे नुसतेच पुनर्वसन केले असते, तर माओंनी फारसा विरोध केला नसता. मात्र त्या  पलीकडे जाऊन डेंग यांनी पक्षातील माओंच्या  कट्टर व जहाल कार्यकर्त्यांवर टीका सुरू केली  होती. पक्षातील व साम्यवादी विचाराच्या चौकटीबाहेर जाऊन केवळ अधिक  कार्यक्षमता वा अधिक विकास या प्रयोजनासाठी बुध्दिमंतांना व विचारवंतांना  जवळ करणे हा माओंना सुधारणावाद वाटत होता, त्यामुळे या साऱ्याच नेत्यांबद्दल माओ सतत संशय घेत असत. चिंगहुआ विद्यापीठ  हे जहाल व कट्टर माओवादी कम्युनिस्टांचे माहेरघर होते. तेथील कडव्या डाव्यांबरोबर  माओंचे विशेष सख्य होते. 

मार्क्सच्या सिद्धांतानुसार तंत्रज्ञानाला सोशल रिलेशन्स (सामाजिक नातेसंबंध) निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महत्त्व असल्याने तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे भांडवलशाहीमध्ये कष्टकरी समाजाचे शोषणच होते, असे मानले जाते. त्यावर उपाय म्हणजे कामगारांचे व कष्टकऱ्यांचे राज्य असावे, असे मार्क्स म्हणतो. तंत्रज्ञान व विज्ञान याच्या प्रगतीमुळे उत्पादकता वाढून कामगारांचे शोषण कमी होण्यास मदत होते, हा विचार पांरपरिक कम्युनिस्ट विचारसरणीत सहजासहजी मान्य होत नाही. यामुळेच वैज्ञानिक व तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञांना ते करीत असलेल्या सर्जनशील व नावीन्यपूर्ण कामासाठी काही विशेष सोई-सवलती देणे, हे कम्युनिस्ट विचारात निषिध्द मानले जाते. किंबहुना, असे  केल्यास हा वेगळा वर्ग म्हणून गणला जाईल आणि वर्गकलहाच्या सिध्दांताला त्याने बाधा येईल, असे त्यांना  वाटते. या पार्श्वभूमीवर विज्ञानविषयक भूमिका व धोरण जेव्हा माओंकडे गेले,  तेव्हा त्यांना चायनीज ॲकॅडेमी ऑफ सायन्सच्या पुनर्रचनेच्या संदर्भात वैज्ञानिकांना देऊ केलेल्या  खास सवलती व दिलेले अधिक महत्त्व खटकले.

डेंग यांनी विज्ञान व तंत्रज्ञान याप्रमाणेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रे यांनाही सांस्कृतिक क्रांतीनंतरच्या चीनमध्ये विशेष महत्त्व देण्याचे ठरविले. त्यासाठी  ‘चायनीज ॲकॅडेमी ऑफ सोशल सायन्सेस’ या शिखर संस्थेची स्थापना करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलिटिकल  रिसर्च ऑफिसचे प्रमुख हु किओमो यांनी याबाबत डेंग  यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या स्थापनेसाठीचा  प्रस्तावही तयार केला. हा प्रस्ताव माओंनी मान्य केला.  सांस्कृतिक क्रांतीनंतर सामाजिक शास्त्रे, कला,  साहित्य  याबाबत थोडे अधिक उदार धोरण असावे,  असे माओंनाही  वाटत होते, कारण सांस्कृतिक क्रांतीदरम्यान साहित्य व  कला यांच्यावरीत बंधनांमुळे या क्षेत्रात फारशी कामगिरी  झाली नव्हती. सांस्कृतिक क्रांतीपूर्वी झाऊ यांग ही चीनमधील  कलाक्षेत्रातील मोठी असामी व कलाकार!

सांस्कृतिक  क्रांतीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. जुलै 1975 मध्ये त्यांची व इतर काही कलाकारांची कैदेतून  मुक्तता करण्यात आली. माओंनी जियांग शिंगला कलाकार  व साहित्यिक यांच्याशी थोडे नरमाईचे धोरण ठेवण्याविषयी  सूचना दिल्या. मात्र डेंग या बाबतीत काही करायला गेले  की, जियांग शिंग त्यांना विरोध करीत असे किंवा डेंगवर  अत्मविश्वास दाखवीत असे. झाऊ यांग यांच्याबाबतीत कैदेतून  सुटका झाल्यानंतरही तिने त्यांच्याबाबत अडवणुकीचे  धोरण सुरू ठेवले. खरे तर जियांगचा रोख डेंग यांच्याकडे  होता. माओ यांनी या काळात काही माहितीपट व सिनेमे  प्रदर्शित करण्याचीही परवानगी दिली. डाकिन तेलक्षेत्रात  उल्लेखनीय काम केल्याबद्दल यु किली यांच्यावर द  पायोनियर्स हा माहितीपट प्रदर्शित झाला. द आयलँड  मिलिटीयमन या कादंबरीवर आधारित द ग्ले अबोव्ह दर सी हा सिनेमा प्रदर्शित झाला. जियांगचा विरोध असतानाही  विसाव्या शतकातील प्रसिध्द चिनी साहित्यिक लू कझन  यांचे साहित्य तसेच त्यांच्या पत्रव्यवहाराचे खंड प्रकाशित करण्यात आले.

‘पीपल्स लिटरेचर’ हे 1966 मध्ये बंद पडलेले मासिकही सुरू होण्याच्या मार्गावर आले. पक्षाची प्रचार यंत्रणा व माध्यमे यावर जियांग व तिच्या  चौकडीचा मोठा प्रभाव असूनही साहित्य व कलाक्षेत्रातील बंद पडलेली महत्त्वाची मासिके व नियतकालिके परत  प्रकाशित होऊ लागली. डेंग व त्यांचे सहकारी साहित्यिक, कलाकार, वैज्ञानिक व बुध्दिमंत यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करून सांस्कृतिक क्रांतीची अखेर झाली, असा संदेश देत होते. डेंग व त्यांचे शिक्षणमंत्री झाऊ  राँगझिन यांनी 1975 मध्ये बंद पडायला आलेल्या उच्च शिक्षण संस्था परत पूर्वीच्या जोमाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान विद्यापीठे व  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सक्तीने  कामाला पाठविण्यात आले होते,  तर ग्रामीण भागातील  शेतकरी व शहरातील कामगारांना विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी पाठविले गेले. अनेक विद्यार्थी सरळ फॅक्टरीमध्ये काम करण्यास गेले. उच्च शिक्षण संस्था व  विद्यापीठातील प्रवेशासाठी असणारी परीक्षापती रद्द  करण्यात आली. केवळ सरकारी शिफारशीवरून प्रवेश मिळू लागले.

स्वत:च्या मुलाला वा नातेवाइकांना प्रवेश देणे  योग्य दिसणार नाही, म्हणून परस्परांच्या सहमतीने शिफारसपत्रे मिळू लागली. तू माझ्या मुलाला प्रवेशासाठी  शिफारस कर, मी तुझ्या मुलीची शिफारस करतो- असे मोठे  रॅकेट मध्यमवर्गीय व उच्च अधिकारी वर्गात सुरू झाले होते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये  कामगार संघटना,  कष्टकरी शेतकरी संघटना यांचे नेते व  पक्षाचे प्रचारक ठाण मांडून बसले होते. त्यामुळे वर्ग ओस  पडले होते. शिक्षक शिकवत नव्हते, विद्यार्थी अभ्यास करत नव्हते. डेंग यांनी पक्षाच्या या सर्व नेत्यांना व प्रचारकांना  विद्यापीठांतून व शैक्षणिक संस्थांतून बाहेर काढले आणि  गुणवत्ता जोपासणारी धोरणे अंगीकारली;  प्रवेशपरीक्षा पध्दती सुरू केली.  

चीन व अमेरिका यांच्यातील संबंध 1975 नंतर सुधारत होते. त्यामुळे विद्यापीठांना भेटी देणाऱ्या अनेक अमेरिकन बुध्दिमंतांनी चीनच्या विद्यापीठांतील व उच्च शैक्षणिक संस्थांमधील नेमक्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यावर  आधारित हा कार्यक्रम तयार करण्यात आला होता. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दोन वर्षे ग्रामीण  भागातील सेवा व प्रशिक्षण सक्तीचे केले होते. डेंग व झाऊ  राँगझिन यांनी हे सारे काढून टाकले आणि विद्यापीठांनी फक्त  शिक्षणच द्यावे, शिक्षणाचा दर्जा उंचावावा व त्यासाठी चांगले पगार व सुविधा देऊन उत्तम शिक्षक तयार करावेत,  अशी भूमिका घेतली. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी  शिक्षकांसाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या आणि शैक्षणिक कार्यक्रमाचा/अभ्यासक्रमाचा आवाकाही  वाढविण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले.

विद्यापीठे व  उच्च शिक्षणात हितकारक बदल घडवून आणण्यासाठी व  शिक्षणाचा दर्जा उंचावावा यासाठी महत्त्वाकांक्षी धोरण  तयार केले होते. मात्र दरम्यानच्या काळात नोव्हेंबरमध्ये डेंग  यांच्यावर पॉलिट ब्युरोमध्ये व पक्षात तीव्र टीका सुरू झाली  होती. अशा वातावरणात उच्च शिक्षणाच्या धोरणाला  पाठिंबा तर मिळाला नाहीच;  उलट पक्षात व पॉलिट  ब्युरोमध्ये त्यांच्यावरही टीका सुरू झाली. डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा रीतीने जानेवारी ते  डिसेंबर 1975 पर्यंतच्या एका वर्षाच्या कालावधीत रेल्वे, पायाभूत क्षेत्र, स्टील, कोळसा, खते, वीजनिर्मिती, उच्च शिक्षण, साहित्य व संस्कृती, विज्ञान-संशोधन, तंत्रज्ञान  अशा अनेक क्षेत्रांत विशेष उपक्रम सुरू करून सरकारी क्षेत्रातील मरगळ झटकून टाकून उत्तम प्रशासन व उत्पादकता या दिशेने पावले उचलली. मात्र हे सारे करीत  असताना माओंची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती आणि जियांग शिंग व तिचे सहकारी पध्दतशीरपणे डेंग यांना  विविध मार्गानी विरोध करीत, अडवणूक करीत आणि   माओंकडे तक्रार करीत असत.

मुळातच संशयी असलेल्या  व असुरक्षिततेने ग्रासलेल्या माओंच्या मनात या काळात  अधिकच असुरक्षितता निर्माण झाली. डेंग यांचे सारे काम  पक्षविरोधी असून डेंग आपल्या विरोधात कारस्थाने करीत  आहेत, असाही गैरसमज माओंनी करून घेतला.  माओंनी वँग हाँगवेनला झिजियांग प्रांतात पाठविल्यामुळे  त्याच्या अनुपस्थितीत पक्षाचे काम डेंग यांच्याकडे आले.  तूर्तास तरी जे काही करायचे,  ज्या सुधारणा करावयाच्या; त्या सर्व माओ यांच्या प्रमुख त्रिसूत्रीशी संबंधित आहेत,  हे  ते सातत्याने सांगत. माओंची ही त्रिसूत्री म्हणजे साम् यवादी विचारसरणीशी सातत्याने एकनिष्ठ राहून  सुधारणावादाचा विरोध करणे,  देशाचे स्थैर्य आणि एकता  वाढविणे व आर्थिक विकास साधणे. यामुळे माओंशी  चांगले संबंध ठेवून डेंग आपले काम करू शकत. असे  करूनच त्यांनी सुधारणांचे काम सुरू ठेवले. महत्त्वाचे  म्हणजे,  त्यांनी पक्षाच्या सैध्दांतिक अभ्यास मंडळाला  पक्षाच्या संघटनेत औपचारिक स्थान दिले व त्याला The Political Research Office असे नाव दिले.

साम्यवादाचे  मूळ तत्त्वज्ञान, चीनमधील कम्युनिस्ट क्रांती, माओंचे महत्त्वाचे विचार, या वैचारिक/तात्त्विक बैठकीतून साकार झालेली सरकारची धोरणे व भूमिका याविषयीच्या  अभ्यासाचे व प्रशिक्षणाचे काम या संस्थेकडे देण्यात आले. विशेषतः आधुनिकीकरण, विज्ञान संशोधन, नवे प्रगत  तंत्रज्ञान साकार करणे ही कामेही या संस्थेकडे देण्यात  आली. माओंचे विचार आणि डेंग यांच्या प्रशासकीय  सुधारणा व भूमिका यात कोणत्याही विसंगती माओंना  आवडणार नाहीत, हे डेंग ओळखून होते. म्हणूनच या सैध्दांतिक बाबींवर ते बराच वेळ खर्च करीत. सैध्दांतिक मार्क्सवाद, चीनमधील विविध विषयांसंबंधीची धोरणे/ भूमिका व आंतरराष्ट्रीय संबंध या बाबीही या संस्थेकडे  असत.  सांस्कृतिक क्रांतीच्या पडझडीनंतर समाजातील, शासन-व्यवस्थांतील सर्व संस्था परत नव्या जोमाने सुरू करण्यासाठी बुध्दिमंत, विचारवंत, संशोधन प्राध्यापक, उच्चशिक्षित व्यावसायिक या साऱ्यांचे सहकार्य आवश्यक होते. मात्र जहालांच्या लेखी त्यांचे सहकार्य घेणे म्हणजे  क्रांतीविरोधी शक्तींचा अनुनय करणे किंवा सुधारणावादाला  (Revisionism) प्रोत्साहन देण्यासारखे होते.

बीजिंग  विद्यापीठ व बीजिंगमधील पक्ष संघटना यात जियांग शिंगचा  प्रभाव फार मोठा होता. त्यामुळे डेंग यांचे सुधारणांचे काम  जसजसे गती घेऊ लागले तसतसे अस्वस्थ झालेल्या  जियांग शिंग व तिच्या चौकडीचे हल्ले अधिक तीव्र होत  चालले. डेंग व जहाल जियांग शिंग यांच्यात वादाची खरी ठिणगी पडली ती माओ विचारांच्या पाचव्या व शेवटच्या  खंडाच्या लिखाणाच्या निमित्ताने. माओंच्या विचारांच्या  पाचव्या खंडाचे संपादन डेंग यांच्या पोलिटिकल रिसर्च  ऑफिसमार्फत सुरू होते. दि. 25 एप्रिल 1956 रोजी माओ यांची दिलेल्या टेन ग्रेट रिलेशनशिप्स किंवा ‘दहा महास्नेहबंध’ या भाषणासंबंधाने मोठा वादंग निर्माण झाला. या भाषणात माओंनी असे म्हटले होते की, शांतताकाळात  सैन्यदलाचा आकार कमी करण्यात हरकत नाही; असे करून मिळालेली साधनसामग्री आर्थिक विकासासाठी  वापरावी, तसेच अशा रीतीने आर्थिक विकास करीत  असताना इतर देशांची मदत घेण्यास हरकत नाही. हे भाषण  पाचव्या खंडात अंतर्भूत करावे व तो खंड तत्काळ प्रकाशित  करावा,  असा डेंग यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांनी हाती  घेतलेल्या सुधारणांना बळ मिळणार होते. माओंनी हे भाषण  व खंड प्रकाशित करण्याचे प्रकरण पॉलिट ब्युरोकडे  पाठविले. याचा फायदा घेऊन जियांग शिंगने या  प्रकाशनाला व डेंग यांना विरोध करायला सुरुवात केली.

पुढे डिसेंबर 1975 मध्ये संशयी माओंनी परत एकदा डेंग  यांच्या विरोधकांच्या प्रचाराला व कारवायांना बळी पडून  डेंग यांना पदच्युत केले. मात्र,  या दुर्दैवी प्रकाराला डेंग हेही  तितकेच जबाबदार होते. दि.23 जुलै 1975 रोजी माओ यांच्या डोळ्यांवर  शस्त्रक्रिया झाली व त्यानंतर माओ चांगल्यापैकी वाचू  लागले होते. त्या काळात बीजिंग विद्यापीठातील एक हुशार विदुषी प्राध्यापक हु डी माओंना या चिनी क्लासिक्स वाचून  दाखविण्यासाठी येत. वॉटर मार्जिन कथा वाचून दाखवीत  असताना जेव्हा त्यातील बंडखोरांचा उल्लेख आला, तेव्हा  माओंनी असे बंडखोर सध्या आपल्यातही आहेत,  असे  म्हणून अप्रत्यक्षरीत्या झाऊ आणि डेंग यांच्याकडे  अंगुलीनिर्देश केला. ही बाब बाहेर जियांग शिंगच्या  कानांवर जाताच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये ग्वांगमिंग डेली,  पीपल्स डेली व रेड फ्लॅग या दैनिकांमध्ये वॉटर  मार्जिनमधील साँग जियांगसारख्या बंडखोर व वाईट  पात्रांच्या उल्लेखासह झाऊ व डेंग यांच्याकडे निर्देश केला  जाऊ लागला.

ऑगस्ट-सप्टेंबर 1975 मधील या घटना  डेंगवर येणाऱ्या पुढील संकटांची नुसती एक झलक होती.  पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर 1975 मध्ये चिंगहुआ  विद्यापीठातील एका प्रकरणात डेंग पूर्णत: अडकले व माओंच्या मर्जीतूनच उतरले. डेंग यांनी सांस्कृतिक क्रांतीत  देशोधडीस लागलेल्या बुध्दिमंतांचे, विचारवंतांचे व नेत्यांचे  नुसतेच पुनर्वसन केले असते, तर माओंनी फारसा विरोध  केला नसता. मात्र त्या पलीकडे जाऊन डेंग यांनी पक्षातील  माओंच्या कट्टर व जहाल कार्यकर्त्यांवर टीका सुरू केली होती. पक्षातील व साम्यवादी विचाराच्या चौकटीबाहेर  जाऊन केवळ अधिक कार्यक्षमता वा अधिक विकास या  प्रयोजनासाठी बुध्दिमंतांना व विचारवंतांना जवळ करणे हा  माओंना सुधारणावाद वाटत होता,  त्यामुळे या साऱ्याच नेत्यांबद्दल माओ सतत संशय घेत असत.

चिंगहुआ  विद्यापीठ हे जहाल व कट्टर माओवादी कम्युनिस्टांचे  माहेरघर होते. तेथील कडव्या डाव्यांबरोबर माओंचे विशेष  सख्य होते. विद्यापीठातील पार्टी सेक्रेटरी चीन कुनची आणि  त्याची विश्वासू सहकारी व डेप्युटी सेक्रेटरी झी जिंगयी ) हे  दोन्ही माओंच्या विश्वासातील होते. त्यापैकी क्षी जिंगयी ही तर माओंची पूर्वी सेक्रेटरीसुध्दा होती. पूर्वी सैन्यदलात  असणाऱ्या व हुकूमशहा वृत्तीच्या चीन कून याच्याबाबत  विद्यापीठात बऱ्याच तक्रारी होत्या. विद्यापीठातील पक्षाचे  एक थोडे मवाळ डेप्युटी सेक्रेटरी लिऊ बिंग (हे पूर्वी हू  याओबांग यांचे सहायक होते) यांनी चीन कून यांच्या  गैरवर्तनाबाबत माओंकडे तक्रार केली. मात्र हु याओबांग  यांच्या सल्लानुसार हे पत्र त्यांनी डेंग यांच्यामार्फत माओंकडे  पाठविले. डेंग यांनी या तक्रारीला दुजोरा देत ही तक्रार  माओंकडे पाठविली. माओंनी त्यावर काहीही केले नाही,  मात्र चीन कून याला मात्र अशी तक्रार झाली आहे,  हे कळले. चिंगहुआ Tsinghua विद्यापीठ व तेथील साम्यवादी  विचारवंत याबाबत माओ फारच संवेदनशील होते. त्यांनी  पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक तत्काळ बोलवून  विद्यापीठातील सुधारणावाद्यांच्या वाढत्या प्रभावाबाबत  चिंता व्यक्त केली.

हे सारे चालू असतानाच अतिउत्साही  लिऊ बिंग यांनी चीन कून व त्यांची सहकारी क्षी जिंगयी  यांच्या राजकीय विचारांबाबत तक्रार करणारे दुसरे पत्र डेंग  यांच्याकडे पाठविले. त्यात हे दोघेही डेंग व झाऊ राँगझिन यांच्या शैक्षणिक धोरणावर टीका करीत आहेत, असा मुद्दा  होता. हे पत्र व तक्रार माओंकडे पुढे पाठवू नये, असा सल्ला काही वरिष्ठांनी डेंग यांना दिला. तो झुगारून डेंग यांनी हे पत्र  माओंकडे पाठविले. माओंनी हे सारेच आता फारच  गंभीरपणे घेतले. चीन कुन आणि क्षी जिंगची हे दोघेही चिंगहुआ विद्यापीठातील पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यांना  तिेथून हलविण्यासाठी सुधारणावादी कंपूने व Liu Bing ने  हा उपद्‌व्याप केला आहे. मात्र डेंग यांनी या सुधारणावाद्यांच्या सापळ्यात अडकण्याचे कारण नव्हते. ही  पत्रे सरळ माझ्याकडेच यायला हवी होती’ अशी भूमिका  माओंनी घेतली. ‘चायनीज ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे पुनरुज्जीवन करताना विज्ञान व तंत्रज्ञान यांना वर्गकलहापेक्षा अधिक महत्त्व देऊन तो विचार माओंच्या भाषणांच्या  पाचव्या खंडातील एका भाषणात समाविष्ट केला होता,  हे सारे प्रकरण माओंनी आता उकरून काढले.

मूळ भाषणाचे  टेक्स्ट तपासण्यात आले. विज्ञान-तंत्रज्ञानाला वर्ग- कलहाइतके महत्त्व नसते,  हा माओंचा मूलभूत विचार डेंग  यांनी बदलला होता. हे सारेच गंभीर होते. हु किओमो यांनी  मुळात जाऊन माओंची भाषणे पाहिली आणि असे लक्षात  आले की,  माओ म्हणतात ते बरोबरच आहे. आपल्या  हयातीतही जर डेंग आपल्या महत्त्वाच्या व मूलभूत विचाराबाबत ‘ध’चा ‘मा’ करू शकतात, तर आपल्या  मृत्यूनंतर तर डेंग आपल्या विचारापासून फारच दूर जातील, हे माओंच्या लक्षात आले. डेंग आता माओंच्या मर्जीतून उतरले. यातूनच डेंग यांच्यावर पक्षातून आणि कडव्या व  जहालांकडून सातत्याने हल्ले होऊ लागले. आजारी असलेले माओ आपले सारे कामकाज नॅन्सी टँग व त्यांची दूरची नातेवाईक वँग हायराँग या त्यांच्या दोन महिला सचिवांमार्फत करीत असत. या दोन्ही डेंग यांच्या फारच जवळ गेल्या आहेत,  हे माओ यांनी ओळखले होते. त्यांनी दोघींना तत्काळ डच्चू दिला. आणि त्यांच्या जागी  आपला पुतण्या व अनुभवी अधिकारी माओ युनाक्सीन  याला नेमले. त्यातही माओ युनाक्सीन आणि चीन कुन  यांनी पूर्वी एकत्र काम केले होते आणि युनिव्हर्सिटी व  कॉलेजांमधून विद्यार्थ्यांना साम्यवादी विचारांचे शिक्षण  देण्याचा प्रकल्पही दोघांनी चिंगहुआ विद्यापीठात राबविला  होता. त्यामुळे डेंग अखेर एकाकी पडत गेले.

युनाक्सीन तेथे नसते,  तर विद्यापीठातील प्रकरणानंतर  डेंगवर फक्त टीका करून माओ थांबले असते. किंबहुना,  या  काळातील डेंग यांच्या बऱ्याच धोरणांना व सुधारणांना माओ यांनी पाठिंबाच दिला होता. मात्र माओ युनाक्सीन  यांनी डेंग यांच्याविरोधात सातत्याने तक्रारी केल्या आणि  माओ यांचे कान भरले. त्यात डेंग सांस्कृतिक क्रांतीचे फायदे त्यांच्या भाषणातून लोकांना सांगत नाहीत, लिन  बिआओ व त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करीत नाहीत, चिनी परंपरेतील कन्फ्युशियस व त्यांच्या विचारांवर टीकेची झोड उठवीत नाहीत, वर्गकलह या विषयाचे महत्त्व  अधोरेखित करीत नाहीत इत्यादींचा समावेश होता. डेंग हे  एकंदरीतच माओंच्या विचारांच्या बरेच पलीकडे निघून गेले आहेत,  असे तो माओ यांच्या नजरेस सातत्याने आणीत असे. या काळात डेंग यांनी माओ यांना भेटण्याचा बराच  प्रयत्न केला, परंतु माओ त्यांना भेटलेच नाहीत.

माओंना  असे हवे होते की- डेंग यांनी जाहीररीत्या सांस्कृतिक  क्रांतीचे फायदे लोकांना सांगावेत. डेंग हे मात्र सार्वजनिकरीत्या सांगण्यास तयार नव्हते. उलट डेंग यांनी आपण निभर्त्सनेस सामोरे जाण्यास तयार असल्याचेही सांगितले.  त्यामुळे डेंग यांच्यावर पक्षाचे दडपण वाढले व यांच्यावरील  टीका अधिक तीव्र होऊ लागली.  डेंग यांनी माओंबरोबर चार दशके काढली आणि  त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चीनमधील उच्च पदे भूषविली!  सांस्कृतिक क्रांती हा मात्र डेंग यांच्याबाबतीत एक अतिशय  संवेदनशील मुद्दा होता. ते स्वत: त्यात होरपळून निघाले,  अपमानित झाले होते,  त्यांचा मुलगा कायमचा पंगू झाला  होता. सांस्कृतिक क्रांतीचा सार्वजनिकरीत्या गौरव करणे  म्हणजे या साऱ्यांकडे दुर्लक्ष करणे होते. शिवाय अशी भूमिका घेणे म्हणजे आपणच सुरू केलेल्या सुधारणा व  धोरणे मागे घेऊन सांस्कृतिक क्रांती आणि झुंडशाहीतून पुढे  आलेल्या असंस्कृत व अकार्यक्षमता जोपासणाऱ्या  नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासारखे होते. त्यात भविष्यकाळात  चीनचे प्रचंड नुकसान होणार होते. शिवाय अशी भूमिका  घेतल्याने चीनची पुनर्बांधणी करण्यासाठी सांस्कृतिक  क्रांतीत होरपळून निघालेला,  मध्यमवर्ग पुढे येत होता,  त्याला ते नाउमेद करण्यासारखे होते. त्याचा चीनच्या  पुनर्बांधणीच्या कामावर विपरीत परिणाम झाला असता.

अशा परिस्थितीत माओंच्या नंतर तर डेंग यांना काम करणे  जमले नसते,  हे ते जाणून होते. डेंग यांच्या तोडीचा कुशल  प्रशासक व परराष्ट्र  धोरणातील तज्ज्ञ पक्षात नव्हता, ही जाणीव माओंनाही होती. तैवानच्या मुद्यावर व रशिया- विरोधात अमेरिकेशी उत्तम संबंध ठेवणे आवश्यक होते.  त्यासाठी डेंग यांची आवश्यकता होती. तरीही सांस्कृतिक क्रांतीच्या मुद्यावर माओ व डेंग यांच्यातील दरी फार मोठी  झाली होती. डिसेंबर 1975 ते जानेवारी 1976 हा काळ महत्त्वाचा  होता. डेंग यांच्याबरोबरच त्यांचे सहकारी झाओ झियांग  आणि झाऊ राँगझिन यांच्यावरही रेड फ्लॅग व पीपल्स  डेलीमधून प्रखर टीका सुरू झाली. दरम्यानच्या काळात ऑक्टोबरमध्ये हेन्री किसिंजर चीनच्या दौऱ्यावर होते. डेंग  आणि त्यांची भेट होऊनही किसिंजर यांना डेंग यांच्या गंभीर  अडचणीचा सुगावाही लागला नाही. त्यानंतर डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांनी  चीनला भेट दिली. तेव्हाही काय होते आहे,  याचा सुगावाही  डेंग यांनी बाहेर लागू दिला नाही. फोर्ड भेटीच्या वेळी माओ  यांनी डेंग यांना बोलविले होते. माओ व डेंग यांची ही  शेवटची प्रत्यक्ष भेट. फोर्ड अमेरिकेला परतताच डेंग  यांच्यावरील हल्ले परत तीव्र झाले. शेवटी तीन महिन्यांनंतर  8 एप्रिल 1976 रोजी डेंग यांना त्यांच्या सरकारमधील सर्व  पदांवरून हटविण्यात आले.

1976 हे वर्ष चीनमधील प्रचंड उलथापालथीचे ठरले. डिसेंबर 1975 ते सप्टेंबर 1976 पर्यंतच्या 9 महिन्यांत चार महत्त्वाचे वरिष्ठ चिनी नेते मृत्यू पावले व चीनची पावले  नव्या राजवटीकडे पडू लागली. डिसेंबर 1975 मध्ये  माओंचे जवळचे विेशासू सहकारी व हेर  प्रमुख कांग शेंग  मृत्यू पावले. दि. 8 जानेवारी 1976 ला माओंचे जवळचे  सहकारी व पंतप्रधान झाऊ एन लाय यांचा मृत्यू झाला. रेड  आर्मीचे संस्थापक जनरल झु डे जुलैत, तर चीनचे सर्वेसर्वा  माओ झेडुंग हे सप्टेंबर 1976 मध्ये मृत्यू पावले. चीनमध्ये बदलाची व नव्या राजवटीची चाहूल अशा रीतीने 1975  पासून लागायला सुरुवात झाली. डेंग यांच्याविरूध्द 1976 मध्ये रान उठविले जात  असतानाच झाऊ एन लाय यांचा मृत्यू जानेवारी 1976  मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूमुळे राजवटबदलाच्या नाट्याला  अधिकच रंग चढला.

Tags: चीनी महासत्तेचा उदय सतीश बागल china revolution satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात