डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण

विविध प्रकारच्या सांस्कृतिक,  राजकीय,  धार्मिक,  आर्थिक आक्रमणांचा वेढा या ‘हिरव्या सोन्या’ भोवती घट्ट होत जाताना दिसतो आहे.  अशा परिस्थितीत आपली संवेदनशीलता सतत  जागी व धारदार राहण्याची गरज निर्माण झाली  आहे. पणजीत जाऊन ‘मांडवी’  बनलेली  ‘महादई’ नदी सत्तरीच्या परिसरात उगम पावते  अन्‌ पिढ्यान्‌ पिढ्या आपल्या काठांवर हे  अनोखं संस्कृतिसंचित फुलवते आहे. आता तर  तिने फुलवलेली नि अनेक दुर्मिळ वन्य प्रजाती  सांभाळणारी घनदाट वनराई म्हादई अभयारण्य  म्हणून घोषित झाली आहे. आपल्या शब्दांच्या  नसानसांमधे तिचं हे हिरवं रक्त खेळायला हवं  आहे. आपल्या शब्दांचा पैस हे सगळं वैभव  कवेत घेण्याएवढा व्यापक व्हायला हवा आहे.  इथला साहित्यिक वारसा फार प्राचीन आहे.  खास सत्तरीचे म्हणून असणारे धालो,  फुगड्या,  रोमटामेळ,  रणमाले यांसारखे अनेक लोकगीतांचे  व लोककलांचे एक सो एक प्रकार आणि ते  रचणारे अनाम लेखक-कवी,  जुने-जाणते अज्ञात भूमिपुत्र हे खरे इथले आद्य साहित्यिक आहेत.

नैसर्गिक व सांस्कृतिक समृध्द असलेला गोमंतक प्रदेश  आणि या देखण्या राज्याच्या भाळावरचं कुंकवाचं बोट  म्हणता येईल तसा हा आपला सत्तरी तालुका. पर्यटकांच्या  दृष्टीने हा ‘अन्सीन गोवा’- महादई नदीच्या काठावर  फुललेल्या समृध्द वनराईचा,  डोंगरांचा,  जंगलांचा!  सर्वसाधारणपणे समुद्र, बिचेस्‌ म्हणजे गोवा;  हे चित्र इथे  नाही. खेड्यापाड्यांत शेती-कुळागरात वसलेला खरा गोवा  म्हणजे आपला सत्तरी तालुका आणि या तालुक्याचं हे  संमेलन.  मी आज प्रथम पुण्यस्मरण करेन ते माझ्या सासर- कुलातले मराठीतील आद्य कथाकार,  संस्कृतिकोशकार  पंडित महादेवशास्त्री जोशी यांचं. सुमारे सत्तर छोट्या- मोठ्या खेड्यांच्या या ‘सत्तरी’  तालुक्यातलं आंबेडे- नगरगाव हे त्यांचं जन्मगाव. मला आनंद या गोष्टीचा की- फक्त आडनावानेच नव्हे तर पंडितजींचं आंबेडे हे गाव,  आमचं खडकी तसंच वेळगे,  गवाणे,  मलपण, अडवई,  वान्ते,  हेदोडे,  नगरगाव,  धावे,  बांबर आणि कोदाळ अशा  गावांतील श्री वडनाथ व्याघ्रेश्वराच्या या संपूर्ण जोशी  कुलपरिवाराची सून म्हणून पंडित महादेवशास्त्री जोशींचा  साहित्यवारसा मला पुढे चालवता येतो आहे.  दुसरा महत्त्वाचा रक्तवारसा असा की,  माझे वडील शरद  काळे (खारेपाटण-सिंधुदुर्ग) हे कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक आणि कवी. बाबा त्यांच्या महाविद्यालयीन  काळात वि. स. खांडेकर यांचे छात्रलेखनिक आणि ज्येष्ठ  समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे विद्यार्थी. अर्थातच, भाऊसाहेब खांडेकर या ‘ज्ञानपीठा’कडून व डॉ. दभिसर या ‘शब्दपीठा’कडून बाबांना मिळालेलं हे ‘साहित्यपाथेय’ मला सत्तरीच्या पंडित महादेवशास्त्री जोशी या ‘संस्कृतिपीठा’शी जोडता आलं, हे माझं महद्‌भाग्य! 
       
हेच  पूर्वसंचित घेऊन ‘बिल्वदल’ आयोजित सातव्या सत्तरी साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून मी नम्रपणे आपणासमोर  माझे काही विचार मांडणार आहे.  मराठीचा अमृतवारसा आपण अनेक शतकांपासून चालवतो आहोत. रामायण-महाभारत यासारखी  महाकाव्ये, प्राचीन साहित्यकाळ,  ज्ञानेश्वर-तुकारामांची संतपरंपरा,  लोकसाहित्य,  ऐतिहासिक काळ,  स्वातंत्र्यपूर्व  काळ,  स्वातंत्र्योत्तर काळ,  आधुनिक म्हटला गेलेला व  लेखनजाणिवा बदललेला मर्ढेकर-केशवसुतांपासूनचा  साहित्यप्रवाह हा आपला प्रदीर्घ शब्देतिहास आहे.  अलीकडच्या काळात महाराष्ट्रातला मुख्य मराठी  साहित्यप्रवाह आणि गोवा,  कर्नाटक,  हैदराबाद, तेलंगणा,  छत्तीसगड,  मध्य प्रदेश,  गुजरात या प्रांतांतला बृहन्महाराष्ट्रीय  साहित्यप्रवाह अशी विभागणी झाली आहे. तसेच  मराठीच्या विविध बोली हे मराठीचं वैभव आहे. उदा.  सत्तरीत आजही टिकून असलेली चित्पावनी बोली. या  बोलीभाषांमधलं मराठी साहित्य व ग्रामीण भागात बोलली  जाणारी मराठी ही मराठीची बलस्थानं आहेत. ढोबळमानाने  मांडलेल्या या आकृतिबंधाबरोबरच विविध  साहित्यप्रकारांचे विविध रचनाबंध अभ्यासणेही खूप रोचक  आहे. विविध साहित्यप्रकार हाताळून नेहमी बघत असले तरी  ‘कविता’  हा नेहमीच अधिक जिव्हाळ्याचा विषय. काव्य  ही तर माणसाची आदिम प्रेरणा आहे. जखमी क्रौंच पक्ष्याच्या युगुलाला पाहिल्यानंतरचा ओठी आलेला पहिला  उद्‌गार हा ‘काव्य’ होता. अगदी एका काव्य या साहित्य- प्रकाराबाबतीतच सांगायचं तर महाकाव्यांपासून सुरू करून  निर्मितिप्रक्रिया,  प्रतिमा,  रूपक,  मिथक,  अलंकार,  वृत्त,  छंद,  लय,  ताल,  मुक्तछंद असं करत-करत ग्रामीण,  महानगरीय,  स्त्रीवादी, दलित,  विद्रोही,  उत्तर आधुनिक अशी  विविध जाणिवांची कविता- अशा अंगाने कवितेचा  अभ्यास करता येतो. चार-पाच वर्षांपूर्वी ‘शब्दांच्या  अल्याड-पल्याड’  नावाने एक सदर मी एका वृत्तपत्रात  वर्षभर चालवलं होतं. त्यानिमित्ताने मला हा अभ्यास करता  आला होता. 

साहित्यिक पर्यावरण - भान व दृष्टी 
     
‘अमृतातेही पैजा’  जिंकणाऱ्या अमृतवाणी मराठीच्या  पंढरीचे आपण वारकरी. तिच्या सौभाग्याच्या गोष्टी  असंख्य... आणि भाषावादासारख्या आपल्या दुर्भाग्याच्या  गोष्टीही असंख्य! गोवा, कर्नाटक अशा प्रांतांमध्ये  असणाऱ्या भाषिक वादामुळे दोन्ही भाषांच्या सृजनशील  प्रक्रियेचंच फार मोठं नुकसान झालं आहे. मात्र सत्तरीपुरतं  बोलायचं तर- इथे उगम पावलेल्या पुण्यवंती महादईच्या  गोड्या पाण्याने कोणत्याही वादाची प्रखरता इथे सौम्य केली  आहे. पण व्यापक विचार केला तर विविध आक्रमणांना,  दबावांना, गळचेपीला,  अन्यायांना मराठीलाच सामोरं जावं  लागत आहे,  ही वस्तुस्थिती आहे. संघर्षाच्या या पोर्शभूमीवर आपल्याला स्वतःला सिध्द करावं लागत आहे.  टक्केटोणपे खात, परिपक्व होत वैयक्तिक संघर्ष करावा  लागतो. नंतर इथल्या प्रादेशिक मराठी साहित्यक्षेत्रात उभं  राहावं लागतं. त्यानंतर मुख्य मराठी क्षेत्राची दारं यत्नाने  ठोठावावी लागतात. आपल्यासाठी उघडी करून घ्यावी  लागतात. आपल्याला या अशा दुहेरी-तिहेरी संघर्षाला तोंड द्यावं लागतं. 
      
आपलं नाणं आधी खणखणीत घडवणं आणि  मग ते खणखणीत आहे हे वाजवून दाखवणं- या दोन्ही गोष्टी  तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात,  हे आपल्याला ज्ञात आहेच. अशा परिस्थितीत आपण लिहितो आहोत ते निव्वळ  हौसेपायी की गंभीर विचार करून,  आपल्या लेखनजाणिवा  कोणत्या,  लेखनातील उणिवा कोणत्या,  आपली  लेखनक्षमता किती,  त्यात पुढे जाण्याच्या शक्यता किती  याची चाचपणी कठोरपणे सतत करत राहायला हवी.  यासाठी असलेली दृष्टी दोन प्रकारची असते,  असं मला वाटतं. भोवतीचा निसर्ग,  पर्यावरण,  विविध नैसर्गिक  प्रक्रिया,  प्रदूषणं,  समाज,  माणसं, प्रश्न,  समस्या हे सगळं  आपण दोन डोळ्यांच्या ‘बहिर्मुख दृष्टीने’  बघत असतो. पण  सृजनाच्या विकासासाठी आवश्यक असते ती ‘अंतर्मुख दृष्टी!’ बहिर्मुख दृष्टीने बघितलेलं चित्र,  घटना,  अनुभव  यांचा ठसा मनावर कसा उमटतोय,  तो पुन्हा कागदावर कसा उतरतोय- हे बारकाईने बघणाऱ्या मनःचक्षूंची ‘अंतर्मुख दृष्टी’ खूप महत्त्वाची. ही संमेलने हीच अंतर्मुख दृष्टी देत  असतात. या संमेलनातूनही तुम्ही ही दृष्टी,  हे सजग भान  घेऊन जावं,  असं मला वाटतं. 

वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस 
     
समकालीन गोमंतकीय मराठी साहित्य क्षेत्राबद्दल काही  गोष्टी मी गंभीरपणे बोलणार आहे. हा विचार करायला एका  लेखाने मला प्रवृत्त केले. 2009-2010 च्या डिसेंबरमध्ये  सरत्या वर्षाचा साहित्यिक आढावा घेणारा,  गोमंतकीय  ज्येष्ठ साहित्यिक मा. पुष्पाग्रज यांचा एक लेख माझ्या  वाचनात आला. ‘वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस’ असं बहुधा  त्या लेखाचं नाव होतं. नीट निरीक्षण केल्यानंतर आज 10- 12 वर्षांनंतरही ती वाङ्‌मयीन दुष्काळी स्थिती फारशी   बदललेली नसल्याचं दिसून येतं,  हे इथं खेदानं नोंदवावंसं  वाटतं. मीही गेली अनेक वर्षे इथे साहित्यिक कार्यक्रमांना  जाते. पण मोजके अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी  आयोजक व साहित्यिक दोघांमध्येही लेखनविषयक पुरेसे  वृत्तिगांभीर्य दिसून येत नाही. गोव्याबाहेरही मी  कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक नव्या-जुन्या जाणकार  समीक्षक मंडळींना भेटते, तेव्हाही गोमंतकीय लेखनाबद्दल  नाराजीचा सूर ऐकू येतो. एकूणच गोव्याच्या  लोकजीवनातला ‘सुशेगादपणा’ साहित्यक्षेत्रातही आहे,  असं गमतीने म्हटलंही जातं. या वस्तुस्थितीची कारणं शोधत  पार मुळापर्यंत जावं लागतं.  साधारण एका जिल्ह्याएवढं (शेजारच्या सिंधुदुर्ग  जिल्ह्याहूनही छोटं) आपलं एक ‘राज्य!’          
         
अर्थातच एका जिल्ह्याएवढ्या क्षेत्राला एका राज्याच्या सुविधांची उपलब्धी! त्यात पर्यटनामुळे जगभरात मिळालेली उंची- अशी सगळी पायाभूत अनुकूलता, संपन्नता आपल्याला इथे  मिळते. एक छोटंसं उदाहरण पाहा- आपले साधे-साधे  घरगुती सोहळे,  समारंभ,  पुस्तक प्रकाशने,  मेळावे,  वर्धापनदिन इथपासून ते मोठ्या संमेलनांपर्यंत कशालाही  पंचसदस्यापासून ते मुख्यमंत्री-राज्यपालांपर्यंत कुणीही  पाहुणा म्हणून इथे सहज उपलब्ध होऊ शकतो. इतके  एकटोकाच्या सहकार्याचे,  जल्लोष व उत्साहाचे वातावरण आपण इथे अनुभवतो. विविध सरकारी योजना,  आर्थिक  साह्य,  भरघोस अनुदानं,  देणग्या असं सगळं अगदी पुस्तक  प्रकाशनापासून नुकसानभरपाईपर्यंत सगळ्यासाठी भरपूर  मिळतं. फार मोठा संघर्ष न करता,  फार परिश्रम न घेता  राज्यस्तरीय,  केंद्रस्तरीय यश पदरात पडतं. फार स्पर्धा न  होता पुरस्कार-सन्मान मिळतात. भरपूर व्यासपीठं असतात.  साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. भरपूर पुस्तके छापली जातात. वृत्तपत्रांमध्ये पटकन प्रसिद्धी,  स्पर्धांमध्ये भरघोस बक्षिसं मिळतात. हे सगळं तुलनेने कमी  कष्टांमध्ये इथे मिळतं. इतर राज्यांच्या तुलनेने कमी बेकारी, कमी संघर्ष,  कमी धकाधकी-धावपळ व भरपूर  साधनसुविधा मिळाल्याचा ओल्या दुष्काळासारखा परिणाम  म्हणून कोणत्याही गोष्टीचा संख्यात्मक विकास जोमाने होतो  व गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते,  ही वस्तुस्थिती आहे.  साहित्यक्षेत्रात ही अनुकूलता सकस साहित्यनिर्मितीच्या  मार्गातला पहिला मोठा अडसर ठरते,  असं मला वाटतं. 
       
अशी कमालीची अनुकूलता प्रयत्न थांबवते. कठोर व्यासंग  व परिश्रमांची कास सोडायला लावते. नव्या लिहित्या  मंडळींनी हा धोका ओळखून राहायला हवं.  अर्थात हे झालं एका बाजूचं चित्र. नाण्याची दुसरी बाजूही  अशी आहे की,  या सर्वांतूनही स्वत:ला प्रयत्नपूर्वक निर्लेप  राखत काही होतकरू मंडळी चांगलं लिहिताहेत.  समकालाचं यथायोग्य भान बाळगून आहेत. आयोजकांच्या  पातळीवर विचार केला तर- गोवा मराठी अकादमी,  कला अकादमी,  गोमन्त विद्यानिकेतन,  शारदा ग्रंथप्रसारक संस्था,  कोकण मराठी परिषद इ.सारख्या विविध संस्था दर्जेदार  कार्यक्रमांचं आयोजन करताहेत. पण गोव्यात जिध्दीने फुलत असलेल्या या मराठी प्रतिभेला नि कार्याला मराठीच्या मुख्य  प्रवाहात कितपत सामावून घेतलं जातं? साहित्यासकट  विविध क्षेत्रांत इथे येणारे मान्यवर इथल्या प्रतिभावंतांना  बाहेर जोडून देण्याचा कितपत प्रयत्न करतात?  मराठीचं  अस्तित्व व संवर्धनाच्या भरीव कार्यासाठी मुख्य मराठी धारा  कितपत स्वागतशील व सहकार्यशील आहे?  ही सारी  प्रश्नचिन्हेच आहेत. गोव्यासकट बाकीच्या बृहन्महाराष्ट्रीय प्रदेशांचीही हीच तक्रार मुख्य मराठी साहित्यक्षेत्राबद्दल  नेहमी ऐकू येते.
       
मुख्य मराठी प्रवाहात तर अनेक वृत्तीप्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती आहेत. गटातटाची व कळपकंपूंची  भयानक ‘साहित्यकारणं’ (राजकारणासारखी!) आहेत.  प्रचंड संघर्ष,  स्पर्धा आहे. पण अर्थात पुन्हा त्यातही सन्माननीय अपवाद आहेत. चोख दर्जाला उचलून धरणारे  पाठराखते ओशासक हात तिथेही आहेत,  याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. एक सुजाण लेखक,  वाचक म्हणून  स्वतःच्या कोशात गुंतून न पडता हातातल्या परिस्थितीचा  गोल असा उलट-सुलट फिरवून तपासून पाहत राहायला  हवा!  एक लेखक म्हणून मी माझ्या लेखनाचा विचार करते  तेव्हा जुन्या-जाणत्या पिढीचं साहित्य वाचणं,  तो अभ्यास  मला सर्वांत आधी महत्त्वाचा वाटतो. नंतर माझे समकालीन  काय व कसं लिहिताहेत,  लेखनाबद्दल कसा विचार करताहेत,  त्यांच्या लेखनजाणिवा काय- हे जाणून घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. एका साहित्यिकाची ही अशा प्रकारची  गरज असू शकते; असावी!  या पोर्शभूमीवर आयोजक व वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर चांगले बदल घडायला हवेत. इथल्या व  बाहेरच्या साहित्यिकांच्या गाठीभेटी, चर्चा,  संवाद  सातत्याने घडायला हवेत. कार्यक्रमांमधला तोच-तोपणा  जाऊन नवे बदल व्हायला हवेत. वैयक्तिक विकासाकरता तर बरंच काही करता येण्यासारखं आहे. 

वाचन-व्यासंग-सर्जनशीलता-अभिव्यक्ती 
      
महाराष्ट्रातून आज विविध दर्जेदार नियतकालिकं  निघतात. त्यांचे वर्गणीदार होऊन त्यांचे नियमित वाचन हा  खूप महत्त्वाचा स्वाध्याय आहे. समकालाचं भान देणाऱ्या  मराठी लघुनियतकालिकांच्या या महत्त्वाच्या  चळवळीविषयी इथल्या अनेक साहित्यिकांना पुरेशी माहिती  नसल्याचं व ते महत्त्वाचं वाचन नसल्याचं निराशाजनक चित्र  इथे दिसतं. वाचनालये सोडल्यास अनेक मराठी  नियतकालिकांचे वर्गणीदार अगदी हाताच्या बोटांवर  मोजण्याइतकेच इथे आहेत. वरवर साध्या दिसणाऱ्या या  गोष्टींचा आज गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे.  होतकरूंनी,  नव्यानं लिहिणाऱ्यांनी,  महाविद्यालयीन  विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी,  प्राध्यापकांनी  सजगतेने या छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी आहे. एकेका लेखक-कवीच्या समग्र साहित्याचे  वाचन,  विविध प्रातिनिधिक संग्रह,  विविध भाषांमधील अनुवादित साहित्य,  विविध संपादित व समीक्षेचे ग्रंथ,  वृत्तपत्रे व त्यांच्या रविवार व विशेष पुरवण्या,  रोजचं  डायरीलेखन- असे विविध प्रयत्न वैयक्तिक विकास घडवत  नेतात. 
       
गोव्यातील समृध्द सेंट्रल लायब्ररी व ठिकठिकाणची  वाचनालये यांचा यासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो... ‘आरता ये,  पण आपडू नको’ (जवळ ये, पण शिवू नको) अशी एक म्हण आपल्याकडे आहे,  ती सोशल मीडियाच्या बाबतीत वापरणं हिताचं ठरतं. असा विचार करत  आपापल्या क्षेत्रातील सामाजिक,  राजकीय,  वैद्यकीय,  सांस्कृतिक,  शैक्षणिक अशा कोणत्याही- अगदी घरकाम,  शेतीकाम असेल तरीही त्याबद्दलच्या लेखनाचा विचार करू  लागलो किंवा प्रत्यक्ष न लिहिताही नव्या विचाराने तिथे- तिथे आपलं आयुष्य समृध्द करू लागलो;  तर त्या-त्या  क्षेत्रातले आपण साहित्यिकच झालो,  असं एक सोपं व नवं  समीकरण मला सुचतं आहे.  साहित्य हा एक स्वतंत्र कलाप्रांत असला तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राच्या मुळाशी शब्द/साहित्य यांचा खोल झरा  असतो. प्रत्येक जणच लेख,  कथा,  कविता,  पुस्तकं लिहून  साहित्यिक बनण्याची गरज नाही. तसे होत नाहीच. तर  ‘शब्द’ म्हणजे आपला आतला आवाज असतो,  आतली  हाक असते. जीवन समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने या  ‘आतल्या शब्दा’ची साधना करून साहित्यिक व्हावं,  असं  मला वाटतं. 

आपल्या ‘आतल्या शब्दा’विषयीची 
   
‘आतल्या आवाजा’विषयीची जागरूकता जेवढी  महत्त्वाची तेवढीच तो आवाज व्यक्त करण्याचीही! अभिव्यक्तीबद्दलचं भान ही खूप कठीण व कष्टसाध्य अशी  गोष्ट. आपली व माध्यमांची तोंडं आज इकडे तर वरवर  दिसताना पूर्ण खुली पण गळा मात्र आवळलेला- अशी  विचित्र परिस्थिती! विविध राजकीय, सामाजिक,  धार्मिक,  सांस्कृतिक,  नैतिक,  आर्थिक अशा मजबूत पंज्यांनी सगळेच  आवाज दाबून टाकलेले! हे दबलेलं एक टोक जेवढं  महत्त्वाचं,  तेवढंच दुसरं टोकही जाणून घेण्यासारखं. एक तर  पुरेशा चिंतनाच्या अभावी अभिव्यक्तीला उथळ खळखळाट  तरी येतो किंवा आज असंही बरेचदा दिसतं की, व्यक्त  होण्याच्या जल्लोषात चेहरे अभिनिवेशी होतात. स्वातंत्र्य  स्वैराचारी होतं व आतला आवाज ‘आवाजी’ बनत जातो. प्रचारकी,  दांभिक व खोटा बनत चाललेला दिसतो!  आपल्याला या सगळ्या गोष्टी मध्य सीमेवर राहून तारतम्याने  बघता आल्या पाहिजेत. हुंकाराचा उद्‌गार तर झालाच  पाहिजे,  उद्‌गारातून अंगारही फुलला पाहिजे;  पण अंगाराचं  गीत परिणामकारक व्हायचं तर ते संयत व सर्जक सुरात गाता  आलं पाहिजे. यंत्रयुगाच्या या रेट्यात एखाद्या सर्जनशील  साहित्यिकासाठी इतकी अवधानं सतत सांभाळत,  प्रामाणिक अभिव्यक्तीच्या वाटेने चालणं ही एक मोठी  कसोटीच असते. कस लावणारी असते. 

स्त्री-जाणिवांची दुखरी नस 
     
गेली 23-24 वर्षे मी वाळपईमध्ये स्वतंत्र वैद्यकीय  व्यवसाय करते. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून जगण्याचा,  शरीर-मन-बुध्दी अशा तिन्ही बाजूंनी विचार करते. शरीराचा  विचार करताना मी डॉक्टर असते. मन व बुध्दीचा विचार  करताना साहित्यिक असते. मी हे एवढ्यासाठीच सांगतेय  की- आपलं घरकाम, शिक्षण,  व्यवसाय,  उद्योगधंदा आणि  आपली कला,  छंद,  आवड व आपली जगण्याची पध्दत  यांची सांगड आयुष्य समृध्द बनवण्यासाठी आपण कशी  घालतो,  हा फार महत्त्वाचा विचार आहे. पेशंट म्हणून  माझ्याकडे बायका व मुलं जास्त येतात. मलाही खरं तर  साहित्यिक वगैरे काहीही न होता ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ व्हायचं  होतं. पण ते काही कारणांनी साधलं नाही. म्हणून ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ ना सही,  मी ‘स्त्री आरोग्यतज्ज्ञ’ होता येतं का हे  शोधू लागले. स्त्री-शरीराबरोबरच स्त्रीच्या मन व बुध्दीचं  जबरदस्त आकर्षण वाटू लागलं. मग ‘दोतोर,  कमर दुखता’ ही बाईची साधी तक्रार औषधोपचाराने दूर केल्यावर मी  अस्वस्थ होऊ लागले आणि ती अस्वस्थताच मला कवितेत  घेऊन गेली.  दिलेल्या औषधोपचारानंतर स्त्रीवेदनेची दुखरी नस कवितेतून सापडू लागली. पुढे परंपरांमध्ये जखडलेलं  बाईपण,  पुरुषी वर्चस्वाने आजवर बांधून ठेवलेलं बाईपण  कळलं. संघर्ष समजला. आत्मभानाचं महत्त्व समजलं. 
      
मला कळलेलं स्त्रीत्व, स्त्रीत्वाचा अर्थ,  बाईचं ‘माणूस’ असणं,  आधी औषधोपचारातून,  मग सुसंवादातून,  सल्ले- मार्गदर्शन-समुपदेशनातून आणि आता कवितेतून,  लेखनातून,  साहित्यातून बाईला सांगता-पटवता येऊ लागलं. सत्तरीसारख्या ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही  परंपरा-संस्कृतीची अवास्तव जोखडं मानेवर ठेवून  वावरताहेत. गर्भपात,  स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या निर्घृण पध्दती  स्वतःपासून बंद करण्याऐवजी स्वतःच्या हाताने पुढे  ढकलताहेत. नव्यानं लिहित्या मुला-मुलींवर हे डोळसपणे  बघण्याची जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष परस्परसंवादाचे  प्रयत्न आधी स्वतःकडून व मग आपल्या लेखनातून होणं गरजेचं ठरलं आहे. म्हणूनच निखळ माणूसपणाचा आपल्या आतला झरा प्रत्येक स्त्री-पुरुषाला सापडावा, अशी माझी  निरंतर प्रार्थना आहे.  इथल्या लोकसंस्कृतीने अशी अनेक वैशिष्ट्ये जपली  आहेत. गोव्यावरच्या पोर्तुगीजांच्या आक्रमणात त्यांना  सगळ्यात शेवटी काबीज करता आलेला सत्तरीचा हा बिकट डोंगराळ प्रदेश धनगर,  कुणबी,  गावडा अशा ‘खुटी मारून  मठी जोडलेल्या’ आदिम वस्त्यांनी, डोंगर उतारावरच्या ‘पुरण शेतीने’ व माड-सुपारी-काजू बागायतींनी समृध्द  होता. 
      
आज यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात ते निसर्ग वैभव  महत्प्रयासांनी जपावं लागत आहे. विविध प्रकारच्या  सांस्कृतिक,  राजकीय,  धार्मिक,  आर्थिक आक्रमणांचा वेढा  या ‘हिरव्या सोन्या’भोवती घट्ट होत जाताना दिसतो आहे.  अशा परिस्थितीत आपली संवेदनशीलता सतत जागी व  धारदार राहण्याची गरज निर्माण झाली आहे.  पणजीत जाऊन ‘मांडवी’ बनलेली ‘महादई’ नदी सत्तरीच्या परिसरात उगम पावते अन्‌ पिढ्यान्‌ पिढ्या  आपल्या काठांवर हे अनोखं संस्कृतिसंचित फुलवते आहे.  आता तर तिने फुलवलेली नि अनेक दुर्मिळ वन्य प्रजाती  सांभाळणारी घनदाट वनराई म्हादई अभयारण्य म्हणून  घोषित झाली आहे. आपल्या शब्दांच्या नसानसांमधे तिचं  हे हिरवं रक्त खेळायला हवं आहे. आपल्या शब्दांचा पैस हे  सगळं वैभव कवेत घेण्याएवढा व्यापक व्हायला हवा आहे.  इथला साहित्यिक वारसा फार प्राचीन आहे. खास सत्तरीचे  म्हणून असणारे धालो,  फुगड्या,  रोमटामेळ,  रणमाले  यांसारखे अनेक लोकगीतांचे व लोककलांचे एक सो एक  प्रकार आणि ते रचणारे अनाम लेखक-कवी,  जुने-जाणते  अज्ञात भूमिपुत्र हे खरे इथले आद्य साहित्यिक आहेत. 
       
राम राम म्हणू नये  बाई सीतेच्या तोलाचा  हिरकणी माझी सीता  राम हलक्या दिलाचा  असं जात्यावरच्या ओव्यांमध्ये म्हणणारी,  नात्यांचे  रेशमी धागे असोशीने जपत हा सतेज विद्रोह करणारी एखादी  कष्टकरी मालन ही इथली आद्य कवयित्री आहे. त्या  जाणत्यांनी दिलेलं हे संचित जपतच आपल्याला पुढे जायचं  आहे.  गोमंतकाच्या,  सत्तरीच्या निसर्गाने दिलेला हा ‘हिरवा वसा’ शब्दांच्या पसा-पायलीने आपल्याला भरभरून घेता  यावा आणि आपलं निसर्गदत्त जगणं त्याच्यासारखंच  हिरवंगार होऊन जावं,  जगणं-लिहिणं एकरूप व समृध्द  होऊन जावं- अशा खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद!

‘बिल्वदल’ आयोजित सातवे सत्तरी तालुका  (गोवा राज्य) साहित्य संमेलन दि. 3 डिसेंबर 2019 रोजी झाले, त्या संमेलनात  केलेले अध्यक्षीय भाषण, अंशत: संपादित करून प्रसिध्द करीत आहोत. - संपादक

Tags: सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलन गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा हैदराबाद कर्नाटक साहित्य संमेलन गोवा गोमंतक सांस्कृतिक नैसर्गिक gujrat Madhya Pradesh chhattigad telangana haidrabad karnatak sahity sanmelan gova gomantak parti sanskrutic Naisargik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अनुजा जोशी
dr.anupamj@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात