डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विज्ञान ही रचित आणलेली गोष्ट आहे!

त्या मनुष्यजातीचा सामाईक वैज्ञानिक  वारसा संगनमतानं हडप करताहेत.  आणि आम्ही? दोघांना फशी पडतोय, कोविड-19 साठी त्यांची निरुपयोगी जादूची पुडकी आपलं एकेकट्याचं संरक्षण करायला बाजारातून विकत आणतोय आणि विज्ञान आम्हाला जे सामुदायिक, सगळ्यांनी मिळून करायचे उपाय सांगतं- शारीरिक अंतर राखण्याचे, तिकडे मात्र काणाडोळा करतोय. या दोन्ही अंधश्रद्धांविरुद्ध डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील त्यांची निडर सहकारी मंडळी गेली तीसेक वर्षे इतर पुरोगामी चळवळींच्या खांद्याला खांदा भिडवून झगडत आलीयत- विज्ञान लोकांनी केलेलं असावं, लोकांसाठी असावं आणि लोकांचं असावं म्हणून.

 

एक-दोन पंचायती सुरुवातीलाच नोंदवाव्यात, उफराट्या तळटीपा म्हणून. पहिली अशी की- ‘विज्ञान’ हे माझ्याबाहेरचं वेगळं काही तरी आहे असं मला वाटत नाही; मग ते ‘देणार’ काय मला? मर्ढेकरांची माफी मागून म्हणायचं तर- ‘मीच देणारा जिथे अन्‌ मीच घेणारा स्वभावें’ अशी गत. विज्ञान ही माझ्यालेखी आपण सगळ्यांनी मिळून आपल्यासाठी रचित आणलेली गोष्ट आहे. बरं, मला असंही वाटत नाही की, विज्ञानाचा अर्थ माझ्यासाठी काही एकमेवाद्वितीय आणि इतरांपेक्षा- सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. खरं तर मला असं वाटतं की- तो अर्थ जर असा वेगवेगळा असता, तर ‘विज्ञान’ अशी काही कल्पनाच नसती.

या दोन्ही सबबी खऱ्या आहेत आणि पळवाटादेखील आहेत. माझ्या स्वत:च्या अशा अनुभव-इतिहासाबद्दल लिहिणं मला भावत नाही. ही भावना फक्त खासगीपणातून आलेली नाही. मला वाटतं की, आपल्या चष्म्यातून दाखवलेलं आपलं चित्र इतर कुणाचं फारसं प्रबोधन करीत नाही. हे प्रास्ताविक अशासाठी की, मी इथं ‘माझ्या वैज्ञानिक आठवणी’ असं रटाळ पुराण लावणार नाहीये; त्याऐवजी ‘विज्ञान’ या संकल्पनेचा आपल्या सगळ्यांसाठीचा काय अर्थ असतो-असावा, याबद्दल थोडं काही (तेही रटाळ पुराणवजाच, पण) म्हणणार आहे. जशी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात केलेली धडपड ‘विज्ञान म्हंजे काय रे भाऊ?’ या प्रश्नाचं मला मोठं मनस्वी उत्तर देत आली, तशीच विंदांची मार्मिक टिप्पणीदेखील- ‘धन्य धन्य सारे, धन्य धन्य मीही। सामान्यांना काही अर्थ आहे। सद्‌गुरुंपाशी हेचि एक मागणे। भक्तिभाव नेणे ऐसे होवो। सद्‌गुरुंवाचोनी सापडेल सोय। तेव्हा जीव होय धन्य धन्य।’ या आदरणीय पूर्वसुरींच्या उत्तरांची प्रतिबिंब माझ्या म्हणण्यात दिसतील, अशी मला आशा आहे. तर शेवटापासून सुरुवात करावी. ‘माणूसपणाचा आमच्यालेखी (बरं-बरं, माझ्यालेखी) अर्थ काय?’ या प्रश्नाची उत्तरं सध्या पसरलेल्या कोविड-19च्या जगड्‌व्याळ साथीला होणाऱ्या आपल्या प्रतिक्रियांची अनेक प्रकारे सुसंगती लावतात, तेव्हा ते उल्लेख येत राहतील. बोलून-चालून कोविड-19 हा काही त्याच्या भाऊबंदांसारखा- 2002 च्या सार्ससारखा किंवा 2012 च्या सार्ससारखा अतोनात खुन्या रोग नाही. कोविड -19 ची लागण झालेल्यांत शंभरात एक माणूस मरतो- जास्तीत जास्त. तरीही मी-आम्ही घाबरतोय. का? इथून सुरुवात करू.

माणसांना काळाची जाणीव असते, त्याबरोबर येणारं भविष्याचं भान असतं आणि त्यातून मग ‘मृत्यू समोर सयंत्र’ उभा- अशी भीती. पण ‘भविष्य’ किंवा ‘मृत्यू’ यापेक्षा आम्हाला खरी भेडसावते ती अनिश्चितता- ‘काय होईल कोण जाणे’ या भीतीला आम्ही कसं सामोरं जातो? आम्ही स्वतःला आणि एकमेकांना या भीतिदायक अनिश्चिततांबद्दल कल्पनाशक्ती वापरून गोष्टी सांगतो. आमची आशा अशी की- या गोष्टी अनिश्चिततांची सुसंगती लावतील, भविष्य थोडंफार सुसह्य करतील, आयुष्याला थोडी निश्चितता देतील. ही गोष्टीवेल्हाळ कल्पकता आमच्या कलेच्या, संस्कृतीच्या, ‘माणूसपणाच्या’ मुळाशी आहे, हे खरं. पण ‘विज्ञान’ या कल्पनेला एवढंच पुरत नाही, कारण नुसत्या गोष्टीतून भविष्य घडत नाही. तोंड फाटेस्तोवर रामायणाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून कोविड-19 ची भीतीदायक अनिश्चितता तसूभरदेखील कमी होत नाही.

मग ती कशानं कमी होईल? या गोष्टींनी भविष्यात काय होईल याचे अंदाज सांगितले आणि ते खरे निघाले, तर हे कसं करायचं? तर, कालानुवर्ती कार्यकारणभावाची संकल्पना बांधून. म्हणजे आधी हे झालं, त्यामुळे त्यानंतर ते झालं आणि मग साहजिकच त्यापाठोपाठ अमुक झालं- अशा कार्यकारणभावाच्या गोष्टी आम्ही सांगतो. मग या आधारावर धीर गोळा करून म्हणतो, म्हणजे भविष्यात तमुक होईल. आता, हे असं झालं तर वाहवा; पण नाही झालं तर? आणि पुष्कळदा, बहुतेकदा नाहीच होत. मग?

इथं एक विचित्र संकल्पना आम्हाला सामोरी येते- एखादी कार्यकारणभावाची गोष्ट ‘खरी’ आहे का, हे तपासावं. आता ‘खरी’ म्हणजे काय म्हटलं की, आपण सत्याच्या प्रयोगांत आणि तत्त्वज्ञानात शिरणार. पण इथं मामला असल्या सत्यमीमांसेचा नव्हे, व्यावहारिक आहे; एखाद्या गोष्टीतल्या कार्यकारणभावानं भविष्याचं अचूक भाकीत होतंय का हे पाहावं, एवढाच. या-त्या धर्मभ्रष्ट वर्तनामुळं (अर्थात प्रत्येक देशात हे वेगवेगळं, पण ते असो) कोविड-19 ची साथ आलीये, अशी गोष्ट सांगितली; तर ती पडताळून घेताना धर्मचिकित्सेचं प्रयोजन नाही, तर तथाकिथत धर्मभ्रष्ट वर्तनाची आणि कोविड-19 ची काही सुसंगती लागते का, एवढंच तपासण्याचं आहे. आणखी एक गोंधळ उपटतो. आम्हाला ‘आधी ठरविले मग केले’ अशी सवय आहे, तेव्हा आम्ही कार्यकारणभावाच्या बऱ्याच गोष्टींना असले ‘आधी ठरविलेले’ हेतू चिकटवतो. खरं म्हणजे आपला अनुभव असा की- आधी ठरवूनसुद्धा तसं क्वचितच घडून येतं, तेव्हा पूर्वहेतूंचा कार्यकारणभावाला काही उपयोग दिसत नाही याचं आश्चर्य वाटायला नको. एकंदर, विज्ञानाच्या संदर्भात आपण ‘हे का घडलं?’ असं विचारतो, तेव्हासुद्धा आपला खरा प्रश्न ‘हे कसं घडलं?’ असाच असतो. असो.

कार्यकारणभाव ‘खरा’ आहे की नाही यापेक्षा, त्यावर बेतलेली भाकितं प्रत्यक्षात येतात की नाही हे जेव्हा आपण पडताळून पाहतो; तेव्हा ‘पुरावा’ ही कल्पना पुढे येते. गोष्टी ‘सांगण्यात’ एक सामूहिकतेची भावना असते, सगळ्यांनी मिळून करण्याची. अगदी तसंच पुरावा ही गोष्टसुद्धा आपण बघून, अनुभवून इतरांना सांगायची. ‘साक्ष’ आणि ‘पुरावा’ हे शब्द उगीच नाही एकत्र वापरत आपण! आणि हे पुरावे शोधायला माणूसपणाच्या स्वाभाविक उत्सुकतेची, कुतूहलाची फारच मदत होते. आता पुढचा मोठा प्रश्न- ‘चांगला’ ‘भक्कम’ पुरावा कुठला? आपली पुराव्याची कल्पना कालसापेक्ष आहे. आपण म्हणतो ना- अमुक घडलं आणि मग त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून तमुक घडलं, अगदी गोष्टीत सांगितल्यासारखं. पण असं जर एकदाच घडलं फक्त (अगदी एखाद्या चमत्कारासारखं!), तर? इथल्या लोकांनी यज्ञ केला आणि खरंच की हो कोविड -19 गेला! कावळा बसायला अन्‌ फांदी तुटायला एकाच गाठ पडली आणि कावळ्यानं मिशीला ताव दिला की, मी फांदी तोडली- अशी गत. पण तिथल्या लोकांनीसुद्धा यज्ञ केला, तरी नाही गेला बुवा कोविड-19! आता? तर भाकितं तपासायला या क्वचितच्या चमत्कारांची काहीएक मदत होत नाही, असं म्हणणं भाग पडतं. एखादा घटनाक्रम पुन:पुन्हा घडला, पुष्कळांनी पाहिला-अनुभवला; तरच तो ‘चांगला’ पुरावा, असं मग आपण म्हणतो.

पुरावे शोधायची आपली दुसरी एक वाटदेखील आहे. ती अशी की- अमुक घटनाक्रम झाला की नाही, हे फक्त बघण्या-अनुभवण्यापेक्षा आपण त्यात लुडबूड-ढवळाढवळ करतो. आम्ही अमुक घडू दिलं नाही, आता त्यानंतर नेहमीसारखं तमुक होतंय की नाही ते बघू- असं म्हणतो. पण हा मार्ग चोखाळायला नेमकी आणि अचूक ढवळाढवळ करण्याचं कसब लागतं. म्हणजे ते जोपासणं आलं, शिकणं आलं, शिकवणं आलं. एकमेकांना गोष्टी सांगत, त्या ऐकत, त्यांच्यावरून भाकितांचा कयास बांधत, त्यासाठी पुरावे शोधत, त्यात कसबी ढवळाढवळ करून पाहत, त्यासाठी शिकत-शिकवत, दर वेळी आपल्याला काय अनुभवाला आलं ते सारं गोष्टीवेल्हाळपणानं आपल्या साऱ्या मांदियाळीला येऊन सांगत, एकमेकांवर विश्वास ठेवीत, चुकत-माकत, भविष्याच्या अंधारात आपल्या इवल्या पणत्यांचा उजेड घेऊन आम्ही विज्ञानाची वाटचाल करीत आलो आहोत. या उपद्‌व्यापासाठी आम्ही एकत्र काम करायला हवं, एकमेकांना शिकवायला हवं, एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा, एकमेकांना खरं सांगायला हवं, आपल्या गोष्टी पुराव्याच्या सहाणेवर घासून घेत राहायला हवं- ही विज्ञानाच्या वाटेवरची पथ्यं. या वाटेनं गेल्यानं काय मिळतं? कार्यकारणभावाची दिव्यदृष्टी मिळते. ‘उत्तरं’ मिळत नाहीत, स्पष्टीकरणं मिळतात. सुसंगत, भरोसा ठेवण्याजोगं आकलन मिळतं, समज येते.

आम्हाला जे समजत नाही जगातलं-एकमेकांतलं, त्या गोष्टींना आम्ही घाबरतो आणि त्यांचा- अगदी एकमेकांचा द्वेषदेखील करतो. सुसंगत, भविष्यानुवर्ती वैज्ञानिक विवेक आम्हाला प्रगल्भ करतो. भीतीविना-द्वेषाविना जगायचं बळ देतो. आमचं हे अपौरुषेय, अनादि-अनंत, अव्याहत वैज्ञानिक महाख्यान आमच्या माणुसकीचं, तिच्या नैतिकतेचं मूलभूत व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यानं आणखी काय द्यायचंय मला? पण यात गोची आहे. काय, तर विज्ञानाच्या कहाण्या फक्त ऐकायला रसभरीत आहेत किंवा त्या आम्हाला सक्षम, निर्भय, सुजाण, प्रगल्भ नागरिक बनवितात. एवढंच नाही, त्यापलीकडेही होणारे त्यांचे उपयोग... त्यांच्यामार्फत आपण निसर्गातल्या घडामोडी समजून घेणाऱ्या सुसंगत स्पष्टीकरणांच्या चौकटी बनवतो, काय होईल याची भाकितं करतो आणि ती जैववैविध्याच्या संवधर्नासाठी म्हणा, हवामानबदलाबद्दल म्हणा, पाऊसपाण्याचे अंदाज वा शेतीबद्दल म्हणा, आरोग्य-रोगराईच्या प्रश्नांबद्दल, कोविड-19 बद्दल म्हणा- सामाजिक हिताच्या दृष्टीनं काय करायचं यासाठी सार्वजनिक व्यवहारी धोरणं ठरवायला वापरतो. हे सारं वैज्ञानिक, कार्यकारणभावाच्या विवेकानं ठरवणं शहाणपणाचं- हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. तसंच, विज्ञानाच्या या गोष्टींमार्फत तयार होणाऱ्या चौरस कार्यकारणभावी आकलनातूनच आमची नवी तंत्रज्ञानं उदयाला येतात आणि आम्हा सगळ्यांच्या जगण्याचा दर्जा उंचावायला हातभार लावतात.

विज्ञानातून समृद्धी येते आणि त्याचं हे ‘उत्पादक मूल्य’ उत्पादनाच्या आणि समृद्धीच्या इतर साधनांसारखंच हस्तगत करण्याकडे आपल्यातल्या अनेकांचा स्वाभाविकच कल असतो. विज्ञानाचा हा जो ‘प्रदेश साकल्याचा’ आहे, तो आखडण्यासाठी या सामाईक वारश्यावर मूठभरांचा ‘बौद्धिक मालमत्ता’ हक्क शाबित करण्याच्या निर्दय स्पर्धेत शोषक मंडळी अहमहमिकेनं उतरतात. मग ही लुबाडलेली ‘मालमत्ता’ गरजू लोकांना भाड्यानं देऊन वा विकून नफ्यावर गबर होतात.

हे आमच्या पचनी पडावं म्हणून ‘मुक्त बाजारपेठ’ आणि ‘स्वातंत्र्य’ या कल्पनांची भ्रामक सांगड घालणाऱ्या भूलथापा आमच्यासमोर नाचवल्या जातात. वैज्ञानिकतेच्या झुली पांघरून, माध्यमांच्या गदारोळात आम्ही या अंधश्रद्धांवर त्या ‘वैज्ञानिक’ आहेत असा विश्वास ठेवतो. कोविड-19 च्या साथीचा सामना करायला आवश्यक असलेली औषधं आणि लशी यांच्यावर कुणाची ‘मालकी’ आहे, कुणाचे ‘हक्क’ आहेत, त्यावर त्यांनी किती नफा मिळवणं ‘वाजवी’ आहे आणि त्यांची बाजारात किती किंमत ‘परवडण्याजोगी’ आहे- असल्या प्रश्नांच्या संकुचित भूलभुलैयात आम्ही हे विसरून बसतो की, हे सारं ज्यामुळे शक्य झालंय ते विज्ञान हा आमचा सामाईक वारसा आहे, सामाईक धडपड आहे.

‘सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में!’ आणि ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’, असे आणखीदेखील शोषक उपटतात. ते आम्हाला वरवर वैज्ञानिक वाटणाऱ्या गोष्टी सांगतात. त्या वैज्ञानिक नाहीत, कारण त्यांची नाळ साक्षी-पुराव्याच्या जिवंतपणाशी जोडलेली नाही, याकडं आमचं दुर्लक्ष व्हावं म्हणून त्या गोष्टी आमच्या परंपरागत पूर्वग्रहांच्या देव्हाऱ्यात नेऊन बसवतात. एकदा शेंदूर लागला की, तो दगड आहे याचा आम्हाला विसर पडतो. मग काय, पाडगावकर म्हणत तसं- त्या दगडाला, बुवाला, बडेबुवाला, ‘भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम’ अशी आमची गत होते. हे ठेकेदार-कंत्राटदार आमच्या भीतीसाठी बनावट मलमं गळी उतरवतात आमच्या. म्हणतात, पारंपरिक उपचारांतून, पंचगव्यातून, मंत्रपाठातून किंवा अर्थातच दुर्बल अल्पसंख्याकांना मारहाण करून आणि वाळीत टाकून ही कोविड-19 ची अभद्र साथ विरून जाईल. ते शंख फुंकून विकतात आणि आपला वारसा गहाण टाकून आम्ही विकत घेतो. कोण गबर होणार आणि कोण कफल्लक, हा हिशोब मग सरळच आहे. या दोन्ही अंधश्रद्धा आहेत- बनावट उपचारांवर बेतलेल्या तथाकिथत देशीवादाच्या अंधश्रद्धा आणि ‘बौद्धिक संपत्ती’च्या बाजारावर बेतलेल्या भांडवलवादाच्या अंधश्रद्धा. त्या मनुष्यजातीचा सामाईक वैज्ञानिक वारसा संगनमतानं हडप करताहेत. आणि आम्ही? दोघांना फशी पडतोय, कोविड-19 साठी त्यांची निरुपयोगी जादूची पुडकी आपलं एकेकट्याचं संरक्षण करायला बाजारातून विकत आणतोय आणि विज्ञान आम्हाला जे सामुदायिक, सगळ्यांनी मिळून करायचे उपाय सांगतं- शारीरिक अंतर राखण्याचे, तिकडे मात्र काणाडोळा करतोय. या दोन्ही अंधश्रद्धांविरुद्ध डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील त्यांची निडर सहकारी मंडळी गेली तीसेक वर्षे इतर पुरोगामी चळवळींच्या खांद्याला खांदा भिडवून झगडत आलीयत- विज्ञान लोकांनी केलेलं असावं, लोकांसाठी असावं आणि लोकांचं असावं म्हणून. या साऱ्या चळवळींचं माझ्यावरचं ऋण फार मोठं आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात