डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली, त्या घटनेला आता 50 वर्षे झाली आहेत. या निमित्ताने मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा, साधनाच्या मागील पाच अंकांतून क्रमश: प्रसिद्ध केला आहे.

या अंकात मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दलवाईंच्या विचाराने अर्धशतकभर कार्यरत असलेले सय्यदभाई यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत. डिसेंबर महिन्यात सय्यदभाईंना चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला आणि 26 मार्चला त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे या मुलाखतीचे औचित्य विशेष आहे.

प्रश्न - सय्यदभाई, नमस्ते. तुम्ही आता वयाच्या 84 च्या टप्प्यावर आहात. आणि पुण्याच्या एका टोकापासून साधनाच्या कार्यालयात स्वतः कार चालवत (रस्त्यावरची गर्दी बाजूला सारत) आलेला आहात. तुमच्या या ऊर्जेचं रहस्य काय? आणि ही ऊर्जा सामाजिक कामासाठी खर्च करण्याची तुमची  इच्छादेखील इतका दीर्घ काळ टिकून राहिली आहे, त्याचंही रहस्य काय?

ती माझी भूक आहे! पोटाच्या भुकेसाठी मनुष्य जसा धडपडत असतो, तसं ‘समाज बदलला पाहिजे (म्हणजे केवळ मुस्लिम समाजच असं नाही), माणसांतलं माणूसपण उभं केलं पाहिजे’ ही भूक मला स्वस्थ बसू देत नाही. समाजाचे आपण देणेकरी लागतो, असं मला नेहमी वाटतं. काही तरी ऊर्मी असेल, ध्यास असेल तर मनुष्य आकाशातदेखील जाऊ शकतो. समाज किती पारदर्शक असायचा तेवढा असो; मला माझ्यात जास्तीत जास्त पारदर्शकता कशी आणता येईल, असा विचार करतो. स्वतः न केलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही, असंच मी मानतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात मी स्वतःपासून करतो.

कार चालवणं वगैरे किरकोळ गोष्टी आहेत. मी घरून माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी जायला निघतो; तेव्हा एखादा मनुष्य घाईघाईने जाताना दिसला, तर त्याच्याजवळ कार थांबवतो आणि त्याला विचारतो की- ‘मी अमुक ठिकाणी चाललोय, तुम्हाला वाटेत सोडलं तर चालेल का?’ सुरुवातीला तो मनुष्य दचकतो. पण मग पुरुष असला तर शेजारी बसतो, बाईमाणूस असेल तर मागे. मग त्यांना मी वाटेत सोडतो. कधीकधी ड्रायव्हर सोबत असला तरी, त्याला मागे बसवून मी कार चालवतो. पुष्कळ लोकांना कौतुक वाटतं त्याचं! पण या गोष्टी किरकोळ आहेत.

प्रश्न - आता बोलताना तीन गोष्टी तुम्ही सांगितल्या- ऊर्मी, अस्वस्थता आणि ध्यास! ध्यास हा काही तरी उदात्त हेतूंसाठी असतो. अस्वस्थता ही सभोवतालच्या परिस्थितीविषयीच्या असमाधानातून आलेली असते आणि ऊर्मी ही ती अस्वस्थता घालवण्याठीची आंतरिक ऊर्जा असते. या पद्धतीने तुम्ही गेली पन्नास वर्षं काम करत आहात आणि या पन्नास वर्षांच्या टप्प्यानंतर ‘शिरपेचात मानाचे तुरे’ म्हणावेत असे दोन सन्मान तुम्हाला मिळालेत. डिसेंबरमध्ये मुंबईतल्या चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’, हा तीन लाख रुपयांच्या रकमेचा पुरस्कार (रकमेचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे, अजूनही आपल्याकडे रक्कम मोठी असेल तरच तो पुरस्कार मोठा आहे, हे लोकांना पटतं. ‘मानाचा’ वगैरे शब्द वापरून गुळगुळीत झालेेत!) तुम्हाला प्रदान केला गेला. आणि त्यापाठोपाठ केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा किताब तुम्हाला जाहीर झालेला आहे, जो या महिन्याच्या अखेरीस राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाईल. अर्धशतकभर काम केल्यानंतर असा सन्मान होतोय, तर आता तुमच्या मनातली नेमकी भावना काय आहे?

हे सन्मान आणि पुरस्कार ही माझ्या कामाची पोचपावती आहे, असं मी मानतो. संघटनेची भूमिका, तिची उद्दिष्टं यांच्या दिशेने जाण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. आणि असे जे-जे काम करत पुढे जातील, त्यांना लोक नक्की सलाम करतील. असं काम करणारी आमच्या संघटनेत अनेक माणसं होती, त्यांतलाच मी एक आहे. मोकळेपणाने सांगतो- मला दुःख या गोष्टीचं आहे की, वजीर पटेलसारखा मनुष्य आमच्या संघटनेतून निघून गेला; सतत पुरोगामी विचार करणारा, तसं लिखाण करणारा बेन्नूरसारखा विचारवंत निघून गेला. का? तर त्यांना दलवाईची मांडणी मान्य नव्हती. माझं म्हणणं असं की, जी काही मतभिन्नता असेल त्यावर आपण बसून बोलू या ना! तुम्हाला दलवार्इंचं काय मान्य नाही?

माझ्याबाबतीत सांगायचं तर, दलवाईंसारखा मनुष्य मी आयुष्यात पहिला नाही. उद्दिष्टांशी तडजोड दलवाईंनी कधीच केली नाही. गांधीवादी होते ते. आडवळणाचा, अधिक लांबचा रस्ता असला तरी आपल्याला जिथे पोचायचं आहे, तिथे आपण पोचलंच पाहिजे आणि एकटा उरलो तरी शेवटपर्यंत हे काम करीन- हा जो दलवार्इंच्या व्यक्तिमत्त्वामधला भाग होता, तोच माझ्यात खोल रुतलाय. समोरचा माणूस काय करतो याच्याशी मला देणं-घेणं नाही. जे करणं योग्य आहे ते मी केलं पाहिजे, असं मला वाटतं.

त्यामुळे स्वतःचा एक छोटा कारखाना चालवून मी संघटनेचं काम करत आलो. माझं घर काही मी कुणाच्या भरवशावर सोडलेलं नाही. असं स्वतःचं घर स्वतः सांभाळून काम केलंत की, त्याचं एक वेगळं समाधान असतं. मी काही चुकीचं करत नाही, याची कल्पना असल्यामुळे माझ्या घरचंही कुणी काही म्हणत नाही. माझ्या कारखान्याचं ऑफिस मोठं आहे. तिथे अनेक जण आपापले प्रश्न घेऊन चर्चेसाठी येतात. एका बाजूला कारखान्याचं काम आणि दुसरीकडे येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी- असं माझं सध्या चाललेलं असतं.

प्रश्न - तुम्हाला पद्मश्री जाहीर झाली, तेव्हा घरातले लोक, नातेवाईक, मित्रमंडळी यांना आनंद होणं स्वाभाविकच. पण सभोवतालच्या अनेकांना ‘अशा प्रकारचा एक माणूस आपल्यात आहे, तो अजूनही काम करतोय आणि त्याला आता पद्मश्री मिळाली,’ असं नव्यानेच माहीत झालं. तर पुरस्कार मिळाल्यानंतर मुस्लिम समाजातून, वैचारिक विरोधकांकडून तुम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या काय स्वरूपाच्या होत्या?

लोकांना बरं वाटलं की, हा इतकी वर्षं अजूनही काम करतोय... मला स्वतःला काय वाटलं, ते सांगतो. मी नेहमी स्वतःशी बोलून स्वतःला तपासून घेत असतो. शासन भाजपचं आहे, आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचं सरकार येणारच. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाचं सरकार असतं आणि माझ्या कामासाठी त्यांनी पुरस्कार दिला असता, तर तो मी घेतलाच असता ना? आताचा हा पुरस्कार काही त्यांनी माझ्याकडून मतं मागण्यासाठी दिलेला नाही.

काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा आम्ही राजीव गांधींना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी दीड तास चर्चा झाली; पण एका शब्दानेही ते म्हणाले नाहीत की, मुस्लिमांना न्याय मिळाला पाहिजे. तलाकपीडित महिलांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरांत मला गुर्मी दिसत होती. एका मुलीने त्यांना विचारलं की, ‘तुम्ही आम्हाला किलोमीटरचे दगड समजता का? कधीही वापरावं फेकून द्यावं..?’ पण सगळ्यावर त्यांचं उत्तर हेच होतं की, ‘नहीं, हम इससे अच्छा कानून लायेंगे.’

आता भाजपचं सरकार आलेलं आहे. या सरकारच्या काही कामांबद्दल, उद्दिष्टांबद्दल माझे मतभेद आहेत. पण महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या आमच्या संघटनेला त्यांचा पाठिंबा आहे, असं मला जाणवतं. तीन तलाक बंद होण्यासाठी कायदा व्हावा, म्हणून 2017 या  वर्षी पार्लमेंटमध्ये आम्ही पंतप्रधानांना भेटलो (माझ्यासोबत चार सहकारीही होते.) आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांना म्हटलं की, ‘समतेवर आधारित समान नागरी कायदा करा.’ ते म्हणाले, ‘टप्प्याटप्प्याने करू.’ भेटीची वेळ पाच मिनिटांची होती. पण ते आमच्याशी पंधरा मिनिटं बोलले. आमच्याबरोबर फोटो काढला. आमचे काही लोक म्हणतात की, ‘पंतप्रधान आपल्या विचारांच्या विरोधी पक्षाचे आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही.’ मग काय करणार तुम्ही? सध्या सत्ता त्यांची आहे. आपली सत्ता आहे का? असती तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो ना? 1978 मध्ये जनता पक्षाची सत्ता असताना तुमच्याकडे आलोच होतो आम्ही. ‘तुमचं करू हो, काय घाई आहे...? आत्ता तर आम्ही आलो आहोत-’ अशी भाषा होती तेव्हा. आम्हाला वाटलं होतं की, आता मंडळाच्या मागण्या आधी मार्गी लागतील, पण तेव्हा मंडळ शेवटच्या नंबरवर गेलं.

प्रश्न - 1970 ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. जनता पक्षाचं सरकार 1977 ला आलं. त्या वेळी हमीदभाई त्यांच्या शेवटच्या आजारपणात होते. मात्र मंडळाने तोपर्यंतच्या पाच-सहा वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही खूप कार्यक्रम-उपक्रम केलेले होते. त्यामुळे तुमच्या मनात त्या वेळी असं होतं का, की जनता पक्षाचं सरकार आल्यामुळे मंडळाचं काम राष्ट्रीय स्तरावर जाईल, आपलं काम पोहोचेल? पण त्या वेळी तुमचा भ्रमनिरास झाला किंवा तुमच्या आशा फलद्रूप झाल्या नाहीत, असं म्हणायचं का?

मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला. फेकले गेलो आम्ही. हमीदभाई आजारी असतानाही उद्दिष्टं गाठण्यासाठी मंडळाची जी धडपड चालू होती, तिला असा प्रतिसाद मिळाल्यामुळे धक्का बसला. अजूनही ते माझ्या डोक्यात आहे खरं! म्हणजे विरोधी पक्षात असताना ‘जोरात चालू द्या, सय्यदभाई, आम्ही पाठीशी आहोत!’ अशी भाषा आणि सत्तेत आल्यानंतर ‘करू या की! काय घाई आहे?’ अशी भाषा. इथे नाशिकला जनता पक्षाचा फार मोठा मेळावा झाला होता. खूप आलिशान तक्के, गालिचे असा सरंजाम होता. नेहमी साध्या खुर्चीवर बसणारी आपली माणसं! तिथे कुणी तरी मला म्हणाले, ‘तुमचं एकतारी भजन आहे. तेच ते बोलता तुम्ही.’ मी म्हटलं, एवढंच तर आहे आमच्याकडे. आणि मला काही कुठली सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा नको आहे. पुरुष बदलला पाहिजे. मुस्लिम महिलांना माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे. तलाक देण्यापूर्वी तिची मर्जी विचारली गेली पाहिजे. दोघांच्या वादात निकाल देणारा तिसरा असला पाहिजे. हे सगळं कायद्यात नाही. त्यासाठीच आलो आहोत आम्ही इथे. आता आपली सत्ता आलेली आहे. तुम्ही करू शकता हे. ते म्हणाले, ‘पण हे सगळं आमच्या एकट्याच्या हातात नाही.’ दलवाई समाजवादी विचारसरणीचे होते, मीही आहे. पण तेव्हा मात्र अशी उत्तरं देऊन त्यांनी आम्हाला नामोहरम केलं.

प्रश्न - म्हणजे 1977 मध्ये पहिल्यांदा तुम्हाला नामोहरम झाल्याची भावना आली. 1985-86 मध्ये राजीव गांधींच्या काळात, शहाबानो प्रकरण घडलं तेव्हाही तुमचा भ्रमनिरास झाला. याचा अर्थ ‘आपले’ म्हणणारा जनता पक्ष आणि मुख्य प्रवाहातील प्रचंड बलशाली असा ‘काँग्रेस’ यांच्याकडून झालेला भ्रमनिरास, यामुळे तुमची मनःस्थिती दु:खी होती. आणि आता मुस्लिम समाजाविषयी अशा प्रकारची सुधारणावादी भावना भाजप नेतृत्वाच्या मनात आहे, असा तुमचा अंदाज आहे का?

असा अनुभव आहे! नाही तर आम्हाला भेटीसाठी पंधरा मिनिटं देण्याचा काय संबंध होता? काय बोलत होतो आम्ही असं? आमचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यात काही दिखावा होता, असंही मला वाटलं नाही. मोदींच्या राजकारणात अनेक दोष असतील आणि त्यांना राजकीय विरोधही असू शकेल, पण आम्ही त्यासाठी तिथे गेलोच नव्हतो. ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्हाला कायदा करता येणं शक्य आहे, तुम्ही तो करावा-’ या मागणीसाठी आम्ही गेलो होतो. त्यांच्याशी आम्ही समान नागरी कायद्याविषयी बोललो, तलाकच्या प्रश्नाबद्दल बोललो. आमच्या आणखीही काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. पण असं म्हटल्यावर आमच्या काही लोकांना राग येतो. ते म्हणतात, ‘त्यांच्याकडून अपेक्षा कसल्या करता?’ पण आता आपण सत्तेत नाही, आणि होतो तेव्हा काय झालं ते मी पाहिलं आहे. त्याही वेळेला प्रत्येकाने मला हेच सांगितलं की, ‘तुम्ही घाई फार करता!’

अर्थात, या सगळ्याने मी कधीही निराश झालो नाही. माझं म्हणणं साधं आहे- लग्न करताना मुलीला विचारून केलं जातं आणि सोडताना मात्र विचारावं लागत नाही. (तसा कायदाच नसल्यामुळे) अशाने बाई निराधार होते, रस्त्यावर येते, तिचा निकाह पुन्हा होत नाही. हा काय प्रकार आहे? आपल्याकडे लोकशाही आहे ना? शरियतमधला गुन्हेगारी कायदा आज पाळला जातो का? नाही! त्याऐवजी ब्रिटिशांनी लागू केलेला क्रिमिनल कोड लागू होतो. चोरी केल्याबद्दल कुणाचे हात-पाय नाही कापले जात. मग तलाकसाठीच तेवढा जुना कायदा का? मला आणि मंडळाला विरोध करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं.

आणि हो, या कारणासाठी मी धर्मांतर करणार नाही. कारण धर्मापेक्षा मी माणुसकी मोठी मानतो. आम्ही जन्माने मुसलमान असलो, तरी आम्हाला या देशात माणूस म्हणूनच राहायचं आहे. आता या सरकारचे अनेक दोष असतील, त्यांच्याशी आमचे अनेक बाबतीत मतभेद असतील; मुस्लिम राज्यकर्ते, मुस्लिम आयडिऑलॉजी यांवर त्यांचाही राग असेल; पण माझ्या समाजाचं जे हे सगळं दुखणं मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आहे, ते बरं होतंय की नाही, हे पाहणं चुकीचं आहे का?

प्रश्न - आता बोलताना दोन सरकारांचा अनुभव तुम्ही पहिल्यांदा सांगितलात. आणि मग विद्यमान सरकारबद्दल बोललात. तुम्ही करत असलेल्या धडपडीला या सरकारचा पाठिंबा आहे, असं तुमच्या बोलण्यातून दिसतं. मात्र सुरुवातीला तुम्ही असंही म्हणालात की, पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष यांच्याशी माझे काही वैचारिक मतभेदही आहेत; मात्र त्यांचं जे चांगलं काम आहे, तिथे मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचा सन्मान स्वीकारतो. तर गेले अडीच महिने देशभर चर्चेत आहे, नागरिकत्व सुधारणा कायदा. त्याविषयी सरकार असं म्हणतं आहे की, ‘आम्ही केलेला कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, काढून घेण्यासाठी नाही.’ पण ही वास्तवाची एकच बाजू आहे. त्याची खरी दुसरी बाजू ही आहे की, हा कायदा नागरिकत्व नाकारणाराही आहे आणि ते नागरिकत्व धर्माच्या आधारावर नाकारणारा आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं आहे. हे भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेला छेद देणारं आहे, असं रॅशनल म्हटले जाणारे माझ्यासारखे अनेक लोक मानतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

भारतातील मुस्लिम समाज हा बाहेरून आलेला नाही. तो काही अरबांची, मुघलांची किंवा अफगाणांची अवलाद नाही. त्यांचे पूर्वज हिंदूच होते. ते दलित होते. गावामध्ये त्यांच्या झोपड्या होत्या. पण त्यांनीच बांधलेल्या विहिरींतील पाणी इथल्या उच्चवर्णीयांनी त्यांना पिऊ दिलं नाही; त्यांनीच बांधलेल्या रस्त्यावरून त्यांना जाऊ दिलं नाही. याला कंटाळून त्यांनी धर्मांतरं केली. मी अनेकांशी या विषयावर चर्चा केलेली आहे. त्यामुळे दलित समाजातच मला माझे पूर्वज दिसतात. आमची सगळी वंशावळ आम्ही कुठून आणणार आता? त्यामुळे या सरकारला माझं म्हणणं आहे की, तुम्ही पुन्हा नका काही उकरून काढू; तरच हा भिन्नधर्मीयांचा देश अधिक मजबूत राहील.

‘इथे आम्हाला आमच्या पद्धतीने राहता येत नाही,’ असं म्हणणारी माणसं पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केव्हाच पलीकडे गेली. आता जे राहिलेले आहेत, ते कट्टर भारतीय असून राज्यघटना मानणारे आहेत. त्यांनी अन्यत्र कुठे जायचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने उपासना करण्याचा अधिकार घटनेने दिलेलाच आहे आणि कुणाची उपासना कुणाला डोईजड होण्याचं कारणच नाही. बाहेरच्या कुणाला घ्यायलाही आमची काही हरकत नाही. पण त्यांच्यासाठी आम्हाला परत इथून घालवणार?

प्रश्न - ‘पद्मश्री’ मिळाल्यामुळे यापुढे तुम्हाला सरकारी पातळीवर विशेष मानसन्मान असणार आहे. तर, अशा प्रकारची काही विनंती तुम्ही सरकारकडे करणार आहात का? की- मी ज्या समाजात राहतो आहे त्या समाजात या कायद्याविषयी भीती आहे, त्यामुळे सरकारने योग्य तो बदल करावा...

आमच्या मनात भीती नाही. पण अशी काही तरी सक्ती करू नये, ही आमची भूमिका आहे. ही आमची मातृभूमी आहे. आम्ही कुठेही जाणार नाही. तसंच असतं तर फाळणीच्याच वेळी पाकिस्तानात गेलो असतो ना! उलट 1970 मध्ये मी पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा तिथे मी हे सांगितलं की, ‘तुम्ही देश तोडलात आणि आता तुमच्या पापाची फळं आम्ही भोगतोय... पाकिस्तानी म्हणवून घेऊन.’

प्रश्न - ‘या कायद्यामुळे आपण हद्दपार होण्याची शक्यता आहे किंवा आपलं नागरिकत्व ग्राह्य धरलं जाणार नाही’ अशी भावना सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या मनात तुम्हाला दिसते का?

अशी काही भीती मला दिसत नाही. लोकांचे कागदपत्रं जमवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण चार पिढ्यांच्या मागची कागदपत्रं कुठून देणार? ते रेकॉर्ड कुणाकडे आहे?

प्रश्न - ‘बाहेरून येणाऱ्या सर्वांना नागरिकत्व द्या’, अशी मागणी या कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी कुणाचीही नाही. नागरिकत्व देण्यासाठी काय निकष लावायचे ते तुम्ही लावा. पण त्यासाठी धर्म हा निकष लावू नका, अशी ती भूमिका आहे. आपलंही म्हणणं असंच आहे का?

हो, अगदी बरोबर. या देशातला इस्लाम भारतीय आहे. अरबस्तानातील नाही. त्यामुळे धर्माच्या आधारावर सरकारने असा फरक करू नये.

प्रश्न - यातही सूक्ष्म फरक असा आहे की, बाहेरून येणाऱ्या सर्वांना नागरिकत्व द्या- बाहेरच्या मुस्लिमांनाही द्या- असं म्हणणारा एक वर्ग असू शकेल, जो खरं तर दृश्य रूपात फारसा नाही. पण माझ्यासारख्या अनेकांचं म्हणणं असं की, बाहेरून येणाऱ्या बेकायदेशीर निर्वासितांपैकी कुणालाच नागरिकत्व नाही दिलं तरी चालेल; पण द्यायचेच असेल तर त्यासाठी धर्म, जात, भाषा, लिंग हे निकष लावता कामा नये. संविधानाच्या चौकटीत राहून इतर जे काही निकष लावायचे असतील, ते तुम्ही लावा.

 हा सगळाच विषय आसाममधल्या स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे आलेला आहे. बांगलादेश कंगाल आहे. त्यामुळे तिकडून येणाऱ्या घुसघोरांचा प्रश्न जुना आहे. पण त्यांच्यासाठी हे घटनाबाह्य निकष लावून इथले- जे माझ्यासारखे जन्माने व धर्माने मुसलमान आहेत, पण स्वतःला भारतीय मानणारे आहेत, त्यांना तुम्ही बाहेर काढू नये.

प्रश्न - तुमच्या या उत्तरांतून मला असं दिसतंय की, बाहेरून येणाऱ्या निर्वासित अल्पसंख्य वा मुस्लिम लोकांचं काय होईल, यापेक्षा तुम्हाला जास्त चिंता आहे ती इथल्या मुस्लिमांची, त्यांच्या नागरिकत्वाबाबत शंका घेतली जाण्याची.

हो! बाहेरच्यांचं काय करायचं, ते तुम्ही ठरवा. पण आम्ही जे भारतीय मुसलमान आहोत, त्यांना असे काही तरी निकष लावून बाहेर काढू नका.

प्रश्न - कदाचित या प्रश्नाचा व्यावहारिक बाबीपेक्षा तात्त्विक बाजूने अधिक विचार आम्ही करतो. पण तुमच्या बोलण्यातून असं दिसतं की, ही भीती व्यावहारिक स्तरावर जास्त गंभीर आहे आणि या सगळ्याला तुमचा विरोध अधिक कडवा आहे.

- खरं तर ही भीती नाही. फाळणीनंतर इथे जे मुसलमान राहिले त्यांतूनच अब्दुल हमीद निर्माण झाला, हमीद दलवाई निर्माण झाले, आणखी अनेक रथी-महारथी निर्माण झाले. त्यांनी कुठे देशाशी गद्दारी केली आहे का? त्यांचेच निकष मी लावणार ना? आमच्यात काय असे दोष यांना वाटले की, आम्हाला बाहेर काढण्याशिवाय यांना पर्याय नाही? सय्यदभाई हा रस्त्यावरचा मामुली कार्यकर्ता आहे, पण तो कडवा राष्ट्रवादी आहे. ‘वंदे मातरम्‌’ एकदा नाही, हजारदा बोलू आम्ही. जावेद अख्तर तर राज्यसभेमध्ये म्हणाले. वंदे मातरमचा उर्दू अर्थ आहे मादर ए वतन तुझे सलाम. हे म्हणायला मुस्लिमांचा विरोध नाहीच. हा वाद त्यांच्या माथी मारण्यात आला आहे. आम्ही नमाजात सजदा करतो तो जमिनीवर माथा टेकवूनच. माँ तुझे सलाम हे लोकप्रिय गाणं ए आर रहमानचेच आहे.त्याबद्दल इकडे आम्हाला ठोकायचं काय कारण आहे? राष्ट्रवादाबद्दल आमचं काही वेडंवाकडं म्हणणं नाही.

प्रश्न - हेच तुमचं म्हणणं सत्ताधारी पक्ष आणि विद्यमान सरकार यांना अधिक ठासून सांगणं गरजेचं आहे असं तुमचे मित्र, सहकारी, साथी यांना वाटतं. तुमच्याकडून ते अलीकडच्या काळात- दोन सन्मान मिळाल्यानंतर- मांडलं गेलंय का?

माझ्या ज्या अनेक मुलाखती झाल्या तिथे मी हेच मांडलंय. धर्माचे काही तरी निकष लावून मुस्लिमांना बाहेर काढणे, हा कशावरचाच उपाय असू शकत नाही. फाळणीच्या वेळचं काही तरी आता उकरून काढण्याची अजिबात गरज नाही. आजचा मुसलमान कुठे कमी पडतो, ते तुम्ही दाखवा ना. सत्यशोधक चळवळ ही 100 टक्के राष्ट्रीय चळवळ आहे. मुस्लिम समाजात काम करायचे म्हणून मुस्लिम सत्यशोधक.

प्रश्न - तुमच्या भूमिका इतक्या ठाम आहेत आणि गेली पन्नास वर्षे तुम्ही एका ध्यासाने व ध्येयनिष्ठेने काम करत आहात. पण दोन महिन्यांपूर्वी जीवनगौरव पुरस्कार तर तुम्हाला काहीसे विरोधी विचार असणाऱ्या ट्रस्टकडून- संस्थेकडून दिला गेलेला आहे...

तो पुरस्कार घेतलेल्यांची यादी पाहिली तर असं दिसेल की, बऱ्याच नामांकित समाजवाद्यांनाही तो दिलेला आहे. आणि मला पुढे जायचं आहे, माझी संघटना पुढे न्यायची आहे. पन्नास वर्षं मी इथे काढली आहेत. नाही तर वजीर गेले, बेन्नूर गेले तसा मीही गेलो असतो ना?

प्रश्न - तुम्हाला ‘जीवनगौरव’ आणि ‘पद्मश्री’ यांचं स्वागत अनेक लोकांकडून झालं; मात्र ‘तुमचे’ चळवळीतील मित्र, सहकारी, साथी यांच्याकडून ते पुरेसं झालं नाही किंवा हातचं राखून झालं. कुजबुज स्वरूपाची टीकाही तुमच्यावर झाली. त्याची काही खंत तुमच्या मनात आहे?

अजिबात नाही! प्रत्येकाची आपापली मतं असतात. पंतप्रधान मोदींना आम्ही भेटायला गेलो, तेव्हाही अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मी सगळ्यांचं ऐकून वागणारा माणूस आहे. शत्रूकडूनही एखादा चांगला गुण घ्यायचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला अशी फूटपट्टी लावून काहीच निष्पन्न होणार नाही.

प्रश्न - पण तुमच्या मनात असा विचार आला नाही का की- पन्नास वर्षं माझं काम, माझा विचार, इतकं सगळं उघड-उघड समोर आहे; तरीही आपली माणसं शंका घेत आहेत. त्याची खंत तुम्हाला खरंच वाटली नाही?

नाही! हे यापूर्वीही अनेकदा घडलेलं आहे. फार रथी-महारथींनी मला संघटनेतून काढून टाकण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पण जोपर्यंत मी माझ्याशी प्रामाणिक आहे तोपर्यंत हा प्रश्नच येत नाही. आणि मी अशा लोकांना शत्रू वगैरे मानत नाही, तेही संघटनेतलेच आहेत. आपली काही राजकीय संघटना नाही, परिवर्तनवादी संघटना आहे. तिथे कुठले डावपेच असता कामा नयेत. काही वेगळे मुद्दे असतील, वाद असतील तर त्यांवर बसून चर्चा करता येईल. डावपेचांमुळे संघटना वाढत नाही, उलट कमकुवत होते.

लोक मला माझी पदवी विचारतात. तेव्हा मी सांगतो, बी.पी. आणि एम.एस.एम.! लोक म्हणतात, ही कोणती पदवी? तर बी.पी. म्हणजे भारत पेन्सिल कारखाना, तिथे मी तात्या मराठेंकडे बरीच वर्षं काम केलं. आणि एम.एस.एम. म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, दलवार्इंना भेटलेला पहिला माणूस मीच. अर्थात, ही काही फार अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या बहिणीचा प्रश्न मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो.

भाई वैद्यांकडे 1968 मध्ये आमची भेट झाली. भाई म्हणाले, ‘माझ्याकडे हमीद येणार आहे. तू त्याच्याशी बोल.’ दलवार्इंना मी सांगितलं, ‘माझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याने सोडून दिलेलं आहे, त्याची माझ्या मनाला मोठी जखम झालेली आहे. तोंडी तलाकने पुरुषांना जे अधिकचे अधिकार दिले आहेत, ते कमी करायला पाहिजेत. नवरा आणि बायको या दोघांच्या वादात निर्णय करणारा तिसरा असला पाहिजे. असं हे सगळं कायद्यात यावं, म्हणून मी धडपडतो आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा.’

हमीदभाईंच्या आधीही मी पाच-पन्नास लोकांना भेटलेलो होतो. सगळे मला म्हणत की, ‘हा प्रश्न धार्मिक आहे. कशाला त्याला हात घालता तुम्ही?’ मुल्ला-मौलवींकडे गेलो तर ते म्हणायचे, ये अल्लाह की मर्जी है,  पण हमीदभाई मला म्हणाले, ‘तुमची तळमळ मी समजू शकतो. आणि मार्गदर्शन वगैरे नाही, आपण बरोबरच काम करू.’

प्रश्न - तुमची आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची जी भूमिका आहे ती पाहून मला असं वाटतं की, हे सर्व मुस्लिम सत्यशोधक एक प्रकारच्या कोंडीमध्ये अडकलेत की काय? ती कोंडी चार बाजूंनी होत असावी, असं मला दिसतंय. एक- ज्या समाजासाठी तुम्ही काम करता त्या समाजातलेच लोक म्हणतात की, ‘हे धर्मद्रोही आहेत.’ (ही तक्रार अगदी पहिल्यापासून आहे.) दुसरी अशी की- कितीही सुधारणावादी विचार तुम्ही मांडले तरी हिंदुत्ववादी तुमच्याकडे अखेर मुस्लिम म्हणूनच बघतात. तिसऱ्या बाजूला- तुमचे पुरोगामी मित्र (तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर जाता का, त्यांच्याशी तुम्ही किती संबंध ठेवता यावरून) तुमच्या पुरोगामित्वाची चाचपणी सतत करताना दिसतात. आणि चौथी बाजू म्हणजे, कोणत्याही सरकारकडे तुम्ही गेलात- मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं- तर ते असं म्हणतात की, समाजातून तुम्हाला पाठिंबा असेल आणि समाजातूनच मागणी आली असेल, तर आम्ही कायदा करू...’

चौथा मुद्दा काँग्रेस असेपर्यंत होता, आता तसं नाही! काँग्रेसच्या काळात दिल्लीला राहून अनेक खासदारांकडे मी गेलो आहे. नजमा हेपतुल्लांकडेही आम्ही गेलो होतो. त्यांनी तर सगळ्या पुरुषांना बाहेरच हाकललं होतं.

प्रश्न - विद्यमान पंतप्रधानांना तीन वर्षांपूर्वी तुम्ही भेटलात. तीन तलाक संबंधात मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यासाठी. तुमचं पाच जणांचं शिष्टमंडळ होतं. तेव्हा तेही तुम्हाला म्हणाले होते की, ‘तुमच्या सगळ्या मागण्या मला मान्य आहेत; पण तुमच्या समाजातून त्याला अजून पाठिंबा नाही, थोडं थांबायला पाहिजे.’

ते म्हणाले की, तुमचं निवेदन मी पाहतो.. आणि पुढे म्हणाले, एक-एक करके बदलेंगे हम. समाजाच्या पाठिंब्याचा विषय त्यांनी काढला नव्हता. ‘तुम्ही जे मागताय ते योग्य की अयोग्य, याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ’ असंच त्यांना म्हणायचं होतं, असं मला वाटतं.

प्रश्न - म्हणजे कोंडी करणाऱ्या ज्या चार बाजूंचा उल्लेख मी केला- त्यातल्या तीन बाजूंनी म्हणजे मुस्लिम धर्मीयांच्या बाजूने, हिंदूंच्या बाजूने आणि पुरोगाम्यांच्या बाजूने कोंडी आहे; पण विद्यमान केंद्र सरकारच्या बाजूने मात्र तितकी कोंडी आता नाही, असं तुम्हाला वाटतं?

माझा अनुभव तरी तसा आहे.

प्रश्न - यावरून असा निष्कर्ष काढायचा का की, बदलांसाठी किंवा सुधारणांसाठी अनुकूल मुस्लिम मानस तयार केलं; तर आताचं सरकार त्याला पाठबळ देईल, नवीन कायदे करील, सुधारणांना पूरक भूमिका घेईल?

कायदे करण्यासाठी तो प्रश्न न्याय्य आहे की नाही, एवढंच सरकारने बघितलं पाहिजे. त्यासाठी लोक जमा व्हायला पाहिजेत, असंच काही नाही. आणि मतांसाठी राजकीय लोक कोणत्याही स्तराला जातात. वास्तविक राजीव गांधींच्या वेळेला शहाबानो प्रकरणात आमच्या लोकांनी हेही केलेलं आहे. त्या वेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संपूर्ण देशभरात दोन-दोन लाखांचे मोर्चे काढले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही एन.जी.ओ. आहे.

दि.22 मार्च 1970 ला ‘सत्यशोधक’ची स्थापना झाली. दि.25 व 26 डिसेंबर 1971 ला पुण्यात पहिली महिला परिषद दलवार्इंनी घेतली. सामाजिक न्याय मिळावा म्हणून मुस्लिम महिलांची ती जगातली पहिलीच परिषद असावी. दोनशे लोक त्यांत होते. त्यातल्या निम्म्या महिला होत्या. तिथे महिलांच्या प्रश्नांवर आम्ही पहिल्यांदा बोललो. त्याची बातमी जगभर गेली. आणि त्याचा राग येऊनच काहींनी मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटी पुण्याला बनवली. ती नंतर राष्ट्रीय पातळीवरची झाली. ती कशासाठी होती? तर, ‘मुस्लिम सत्यशोधक’ला विरोध करण्यासाठी. पुढे-पुढे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे महिलांचे प्रश्न घेत नाही म्हणून त्यातल्या महिला निघून गेल्या आणि त्यांनी मुस्लिम महिला बोर्ड काढलं. त्यानंतर शिया निघून गेले, त्यांनी शिया मुस्लिम लॉ बोर्ड काढलं. आता मूळ मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात फक्त सुन्नी आहेत आणि सगळ्यांचा अड्डा लखनौला आहे.

मुस्लिम समाजात एकतर्फी तलाक देणाऱ्याला कायद्याने शिक्षा नव्हती. एवढंच नाही तर कुणाकडून नुसत्या चिठ्ठीवर लिहून किंवा तोंडी निरोप पाठवला तरी तलाक होत असे. या सगळ्यालाच विरोध केल्यामुळे आमच्यावर मुस्लिम समाजातील पुरुषांचा प्रचंड राग होता.

प्रश्न - तुमच्या बहिणीच्या तलाकची तुमच्या मनावर खूप खोलवर जखम राहिली आणि ती अद्यापपर्यंतही आहे; 1985च्या दरम्यान शहाबानो प्रकरणात जे काही घडलं, ती जखमसुद्धा तुमच्या मनात खोलवर आहे, असं दिसतं. तर मुस्लिम समाजातील ज्या प्रतिगामी शक्ती 1985च्या दरम्यान होत्या- ज्यांचा उल्लेख तुम्ही आता केलात- त्यांची धार कितपत बोथट झाली आहे, असं तुम्हाला वाटतं?

ते फार गडबडले आहेत. विद्यमान केंद्र सरकार जे नवे राजकीय कायदे आणत आहे, सी.ए.ए. वगैरे... त्यामुळे त्यांची झोप उडालेली आहे. सामाजिक बदलांची आत्ता वेळ नाही, असं ते एका बाजूला म्हणतात आणि मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या बाबतीत ‘कुराणातला कायदाच तुम्ही मानला पाहिजे,’ असंही म्हणतात. इस्लामी कायद्यातले पुरुषांचे सगळे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, अशीच त्यांची भूमिका आहे.

प्रश्न - मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती अस्वस्थ होणं, त्यांच्या विरोधाची धार कमी होणं- हेही आता घडलेलं दिसतं. पण अशा परिस्थितीमध्ये तुमचा विचार, सत्यशोधक मंडळाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अनुकूलता आहे, असं तुम्हाला वाटतं का? जुनी पिढी थकली, पण नवी पिढी आता फ्रेश पद्धतीने विचार करते आहे, असं काही वातावरण तयार होताना दिसतंय?

नवी पिढी काय विषय घेऊन पुढे येते, यावर ते अवलंबून आहे. नुसतीच मीटिंग घेतली, चर्चा झाली, भाषण ठेवलं, वक्ता चांगला बोलला, प्रश्न जबरदस्त विचारले, नंतर चहा घेतला, वडापाव खाल्ला- यातून काही होणार नाही. नवे विषय निवडून घ्यावे लागतील. त्यांच्यासाठी गाडून घ्यावं लागेल. आणि मुळात स्वतःपासून सुरुवात करावी लागेल.

मी एकतर्फी तलाकच्या प्रश्नासाठी हेच केलं होतं. त्यामुळे माझ्यावर फार टीकाही झाली की, मी तलाकशिवाय अन्य काही बोलत नाही. पण हमीदभार्इंकडे मी तेवढ्यासाठीच गेलो होतो. माझ्या बहिणीच्या वाट्याला जे आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी काम करायचं ठरवलं होतं. बहिणीने पुढे शिवणकाम करून एकटीने तिचं घर चालवलं. तिची दोन मुलं शिकली-सवरली, मोठी झाली. चार वर्षांपूर्वी बहीणही वारली. पण माझी ती जखम अजूनही भरलेली नाही. मी हे तलाकचं काम थांबवावं म्हणून मला अनेकांनी आमिषंही दाखवली. म्हणाले, ‘तुम ये सब छोड दो सय्यदभाई, हम तुमको लीडर बनाएंगे!’ पण त्यांना मी म्हटलं की, ‘याने एकतर्फी तलाक थांबणार आहे का?’ आणि लीडर व्हायचा विचार तर मी स्वप्नातसुद्धा केलेला नव्हता.

प्रश्न - यापुढच्या टप्प्यावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं?

मंडळाचं नेतृत्व चांगलं आहे. शमसुद्दीन तांबोळी अध्यक्ष म्हणून फार चांगलं काम करत आहेत. मंडळाने काहीएक दिशा ठरवावी, तरुणांना सोबत घ्यावं. यापेक्षा वेगळं काय सांगणार? सगळे सुशिक्षित आहेत. दहा-वीस वर्षं प्रत्येकानेच संघटनेत काढलेली आहेत. त्यांचं त्यांना ठरवू देत. राष्ट्रवादाला बाधा येणार नाही, असे समाजहिताचे निर्णय त्यांनी घ्यावेत आणि त्यानुसार काम करावं. एखाद्या राजकीय संघटनेत दहा शिपाई हाताखाली असतात, पण आमच्यासारख्या सामाजिक संघटनेत खुर्च्या मांडण्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळीच कामं कार्यकर्त्यांना करावी लागतात. सगळ्या परिवर्तनवादी संघटनांचं स्वरूप असंच असतं. ते बदलण्याच्या भानगडीत न पडता, जमेल तेवढं काम करायचं असतं.

तलाकचा प्रश्न आज देशभर गेलेला आहे. तलाकविरोधी महिला परिषद आम्ही देशपातळीवर घेतली होती. रोज अर्धा तास बसायचं, तलाकविषयी महिलांना मार्गदर्शन करायचं- असं करत-करत देशभरात 25 ठिकाणी महिला मदतकेंद्रे सुरू केली. आमच्या केेंद्रांना मिळणारा प्रतिसाद पाहून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही महिला कौन्सिलिंग सेंटर सुरू केले.

मी काय काय करू शकतो याचा विचार स्वतःच्या मनाशी करून प्रत्येकाने आपापलं काम ठरवावं. परवाच मी कुणाला तरी म्हटलं की, माझ्यानंतर तलाकचं काम करू शकेल असा वजीर एक होता, आणखीही एक-दोन लोक होते.

तात्या मराठेंकडे मी कामाला होतो. ते समाजवादी होते. त्यांच्याकडे मला पगार कमी होता. पण नोकरी करतच संघटनेच्या कामांसाठी बाहेर फिरायला परवानगी होती. तात्या स्वातंत्र्यसैनिक होते, पण ते पेन्शन घेत नव्हते. त्यांचाच आदर्श अजूनही माझ्यासमोर आहे.

तर मंडळाने यापुढे मुस्लिम समाजाविषयी असलेले (किंवा जाणीवपूर्वक पसरवले जात असलेले) गैरसमज दूर करण्यासाठी काम करावे. मुस्लिम समाजात परिवर्तनवादी विचार कसे वाढतील यासाठी प्रयत्न करावेत.

प्रश्न - पन्नास वर्षांपूर्वी साधनाच्या याच सभागृहात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली (इमारत जुनी होती, पण जागा हीच होती.) त्या वेळी कायद्यात रूपांतर व्हावं अशा ज्या काही चार-पाच मागण्या मंडळाने सरकारकडे केल्या होत्या, त्यामध्ये एक होती- एकतर्फी तलाकला बंदी असावी. दुसरी- बहुपत्नीत्वबंदी कायदा. तिसरी- मूल दत्तक घेण्याची परवानगी देणारा कायदा. आणि चौथी- सगळ्यात महत्त्वाचा किंवा अखेरचा म्हणता येईल असा समान नागरी कायदा. तर आता तुम्हाला या तीन-चार कायद्यांच्या बाबतीत पुढचं काय चित्र दिसतं?

संघटनांनी पुढे येऊन काम केलं, तर हेही होईल. तुम्ही काहीही म्हणा, पण आताच्या पंतप्रधानांनी दहा लोकांना विचारलं नाही. जे योग्य वाटलं, ते काम करून टाकलं. ‘सरकारने न्याय देणारे कायदे केले पाहिजेत’ अशी नुसतीच अपेक्षा तुम्ही कशी काय ठेवता? त्यासाठी कुठलं सरकार आहे याकडे न पाहता, त्यांना भेटा ना तुम्ही. तांबोळी अतिशय धडपडणारा कार्यकर्ता आहे. त्याला सोबत घेऊन फिरलोय मी. त्याच्या आधीच्यांसोबतही फिरलोय. सहवासातून जेवढं शिकता येतं, तेवढं पुस्तकातून शिकता येत नाही. त्यामुळे मीही सगळं सोडून दलवार्इंच्या मागे फिरायचो. तसं आज ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, त्यांनी निवडक दहा-बारा कार्यकर्ते घेऊन, एखादा विषय घेऊन काम करावं.

तलाकचाच विषय सगळ्यांनी घ्यावा, असं नाही; इतरही अनेक विषय आहेत. तलाकसारख्या विषयात काम करायला पोटतिडीक लागते. आजही एखादी तलाकपीडित बाई माझ्यासमोर आली तर, तिच्यात मला माझी बहीण दिसते. माझी सून शाहीन परवा एके ठिकाणी कार्यक्रमात म्हणाली, ‘मी लग्न करून या घरात आले त्या क्षणी या घरची मुलगी झाले आणि माझा नवरा इथला जावई!’ ती कर्तृत्ववान आहे. मी राहतो त्या सोसायटीतले सगळे तिला झाशीची राणीच म्हणतात. तिला स्कूटर चालवताना पाहून काही लोक मला सांगत आले- ‘अरे, तुम्हारी बिटिया स्कूटर पे जा राही थी... तुमने छोडा कैसे उसे?’ मी म्हटलं, ‘तुमच्या पोटात का दुखतं? तुमच्या मुलीला, सुनेला जाऊन विचारा.. तुला स्कूटर शिकायला आवडेल का? सून म्हणजे पायाची चप्पल वाटते का तुम्हाला! मोलकरीण म्हणूनच आणता तिला तुम्ही घरात...’ पुढे शाहीन कार चालवायला लागली, तेव्हाही हाच सगळा प्रकार!

प्रत्येक बाईला काही शिकायचं असतं, तिच्यात क्षमता असते; सहनशीलता तर जबरदस्तच असते. ती पुरुषापेक्षा दहापट जास्त काम करू शकते. पण तिला संधीच द्यायची नाही, हे बरोबर नाही. मुलांचं रक्षण तिने करायचं, स्वतःच्या शीलाचं रक्षण करायचं, धर्माचंही रक्षण करायचं; सगळं बाईने करायचं आणि पुरुष उधळत राहणार फक्त! आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ही पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे. घरातल्या कामांना पुरुषांनीही हातभार लावला पाहिजे. आणि समान नागरी कायद्याविषयी बोलाचं झालं तर, समान गुन्हेगारी कायद्याने जर धर्म बुडत नाही, तर तो समतावादी समान नागरी कायद्याने कसा काय बुडेल?

प्रश्न - वरील प्रश्नाला एक छोटा उपप्रश्न असा की, तिहेरी तलाकबंदीचा जो कायदा गेल्या वर्षी झाला आहे, त्याचं समर्थन करणाऱ्या काही लोकांचं असं मत आहे की- ‘त्यातली शिक्षेची तरतूद, फौजदारी गुन्हा हे इतकं कठोर नसायला पाहिजे होतं. त्याचा दुरुपयोग होईल.’ याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

त्यांचं म्हणणं खरं असू शकेल. मी काही सगळा कायदा जाणणारा वकील नाही. पण गुन्हेगाराला वचक बसावा म्हणून तीन वर्षांची शिक्षा सांगितली असणार. याबाबत माझं काही पंतप्रधान मोदींशी बोलणं झालेलं नाही. पण ज्यांना असं वाटत असेल, त्यांनी ते सरकारकडे घेऊन जावं. (मी स्वतः कारखाना चालवलेला आहे आणि माझ्या हाताखाली 50 कामगार होते. त्यामुळे पुस्तकापेक्षा मी माणूस चांगला वाचू शकतो.) तुम्ही इथून लाख म्हणाल की, ‘ती शिक्षा काढून टाका.’ पण तलाक देणाऱ्या माणसाला वचक काय मग? तरीही ज्यांना-ज्यांना असं वाटतं की, मुस्लिम कायद्यात आणखी बदल व्हावेत किंवा ही तीन वर्षांची शिक्षा जास्त आहे; त्यांनी पंतप्रधानांशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. ते भाजपचे आहेत वगैरे सबबी उपयोगाच्या नाहीत. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत. तेव्हा त्यांच्याशी स्वतः बोलायचं नाही आणि उलट मीही बोलू नये असं सांगायचं, हे बरोबर नाही. संवाद ही सुधारणेची पहिली पायरी आहे. त्यासाठी त्यांची वेळ मिळवावी. मलाही हे धडपडूनच करावं लागलं आहे.

इथला सामान्य मुस्लिम कडवा भारतीय आहे. तो स्वतःला हिंदुस्थानीच मानतो आणि आम हिंदूसारखाच तोही आपल्या कामाशी इमान ठेवून जगणारा आहे. हिंदू-मुस्लिम सगळे एकमेकांच्या उत्सवांत एकत्र असतात. त्यामुळे सामान्य मुस्लिम समाजावर माझा भरवसा आहे. पण त्याला फूस लावणाऱ्या पुढाऱ्यांवर मात्र नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून पंतप्रधान मोदींशी बोलण्याचा प्रयत्न आतापर्यंत का झालेला नाही? हे सरकारदेखील लोकशाही मार्गानेच निवडून आलेलं आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांवर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढच्या वेळी तुम्हाला निवडून कसं येता येईल, यासाठी प्रयत्न करा. अजूनही आपल्याकडे लोकशाही आहे.

जमाते इस्लामीची स्थापना 1920 ला झाली आणि रा.स्व.संघाची 1925 ला झाली. उद्या समजा, जमाते इस्लामीची सत्ता इथे आली- ज्यांना मुस्लिम राष्ट्र उभं करायचं आहे- तर ते काय करतील? सेक्युलर कायदे मान्य करतील का? त्यांच्या पद्धतीनेच ते कायद्यांना वळण द्यायचा प्रयत्न करणार ना? पण तसं चालणार नाही, अशीच तर आमची भूमिका आहे. त्यामुळे संघाची भूमिका काहीही असली तरी व्यवहारात त्यांना अनेक तडजोडी कराव्याच लागतील! धर्मात सगळी उत्तरं नाहीत. विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यातच सगळं काही आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. हमीदभाई याबाबत फार छान म्हणायचे की- ‘माणसांनी निर्माण केलेला धर्म मला मान्य नाही, कारण तो तुम्ही तुमच्या सोयीने तयार केलेला आहे.’ आता नवीन हमीद दलवाई निर्माण होणार नाहीत, मात्र त्यांचे विचार दगडावरची रेघ बनून राहतील.

प्रश्न - ‘दगडावरची पेरणी’ हे तुमचं पुस्तक मराठीतलं माईलस्टोन म्हणावं असं आहे. मराठीतली जी काही एकमेवाद्वितीय पुस्तकं आहेत, त्यांमध्ये त्याचा निश्चितच समावेश होईल. आणि जसजसा काळ पुढे जाईल, तसतसं वाचकांच्या मनावर ते विलक्षण गारूड करून राहील. मराठीत असे काही लोक होऊन गेले की, ज्यांच्या आयुष्यावर एकच पुस्तक आलं पण ते माईलस्टोन ठरलं- उदा.लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानड्याचं ‘आमच्या आठवणी’. आत्मकथनात  आणखी किती तरी नावं घेता येतील. तुमचं पुस्तक त्यांपैकीच एक आहे. ते आता पाच-सहा भाषांमध्ये गेलं आहे. काळ पुढे जाईल तसं ते भारतातल्या अन्य भाषांमध्येही जाईल.

‘दगडावरची पेरणी’ हे माझं पुस्तक मी अभ्यास करून लिहिलेलं नाही. ते कार्यकथन आहे. धक्के खात-खातच मी शिकत गेलेलो आहे. जो क्लीनरचा मेकॅनिक आणि मेकॅनिकचा इंजिनिअर होतो, त्याला इंजिनाची रेघन्‌ रेघ माहीत असते. तसं ते माझ्या अनुभवातून आलेलं लिखाण आहे. त्याचं उर्दू भाषांतर मीच केलं आहे. इंग्रजी, कन्नड, आसामी, बंगाली, मल्याळी भाषांत त्याचे अनुवाद झालेले आहेत.

प्रश्न - हमीद दलवाईंचीही सर्व पुस्तकं आता मराठीत नव्याने उपलब्ध झाली आहेत. इंग्रजी, हिंदीमध्ये ती अनुवादित होत आहेत. पुढच्या काही काळात अन्य भारतीय भाषांमध्ये ती जातील. त्यामुळे आपण अशी अपेक्षा बाळगू की, आणखी 12 वर्षांनंतर दलवाईंची जन्मशताब्दी येईल, त्या वेळी तुम्ही 96 वर्षांचे असाल, कार्यरत असाल आणि मीही साधनेचा संपादक म्हणून इथे असेन. त्या वेळी आपण पुन्हा दीर्घ मुलाखत करू आणि या तपामध्ये काय काय घडलं याचा आढावा घेऊ. असो. पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा!

एकूणच मी फार मोठं काम केलं, असं काही नाही. पण माझी कामाची भूक अजून संपतच नाही. मरेपर्यंत हेच काम करणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी झालो ते संघटना चालवायला काही तरी पद लागतं म्हणून. पण मी जीव तोडून इथे काम केलेलं आहे आणि जे कोणी काम करतील, त्यांच्या पाठीशी एक हजार टक्के उभा राहीन. गोंधळ घालण्याचं काम मात्र अजिबात करणार नाही. संघटनेला धक्का लागू नये म्हणून, मी जीवाची बाजी लावून लढेन.

(मुलाखत : विनोद शिरसाठ, शब्दांकन : सुहास पाटील)

Tags: मुलाखत सुहास पाटील विनोद शिरसाठ हमीद दलवाई मुस्लीम सत्यशोधक मंडळ सय्यद भाई suhas patil vinod shirsath sayyad bhai interview hameed dalwai muslim satyashodhak mandal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सय्यदभाई

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दलवाईंच्या विचाराने अर्धशतकभर कार्यरत असलेले कार्यकर्ता 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात