डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिनी महासत्तेचा उदय : लेखमालेचे प्रास्ताविक

‘चिनी महासत्तेचा उदय: डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग’ या प्रस्तावित लेखमालेत चीनमध्ये 1978 पासून सुरू झालेल्या परिवर्तनाची, त्यांच्या अर्थकारणाची, आर्थिक सुधारणांची, चिनी महासत्तेच्या उदयाची आणि अलीकडे क्षी जिनपिंग यांनी घेतलेल्या यू टर्नची कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या परिवर्तनाच्या कथनात डेंग झिओपेंगपासून ते क्षी जिनपिंग यांच्यापर्यंतच्या चिनी नेत्यांची चरित्रे, त्यांचे राजकारण, आर्थिक धोरणे व आर्थिक सुधारणांची चर्चा होणार आहे. चिनी महासत्तेच्या उदयामुळे आशिया खंडात आणि जगात अनेक समीकरणे बदलत आहेत. ट्रम्प आल्यापासून अमेरिकेने जागतिक व्यासपीठावरून आपले लक्ष कमी करून स्वतःच्या देशाचा अधिक विचार करणे सुरू केले आहे. क्षी जिनपिंग यांचा चीन मात्र याच वेळी जगाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत आहे.
 

भारत व चीन हे दोन्ही देश 1978 पर्यंत आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून सारखेच मागासलेले होते. मात्र आज 40 वर्षांनंतर निर्यात व्यापार, औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा, कारखानदारी, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन व उद्यमशीलता या सर्व बाबतींत चीनने मोठी आघाडी घेतली आहे. चीनचे राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या पाचपट असून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेखालोखाल दोन नंबरची मोठी अर्थव्यवस्था म्हणून चीनचा लौकिक आहे. डोळे दिपवणारी ही प्रगती चीनला शक्य झाली ती प्रामुख्याने डेंग झिओपेंग यांच्या खंबीर, दूरदर्शी व कल्पक नेतृत्वामुळे आणि त्यांच्या व्यावहारिक व वास्तववादी धोरणांमुळे.

चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1921 मध्ये झाली आणि 25 वर्षांहून अधिक काळ लढा देऊन 1949 मध्ये माओंच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. माओ आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षामुळे एकसंध स्वतंत्र चीन निर्माण झाला, ही माओ यांची मोठी कामगिरी. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाची उभारणी करून, त्याला राजकारणाचे तत्त्वज्ञान देऊन त्यांनी पक्षाला चीनमधील सामान्य माणसाशी निगडित केले. मात्र पुढे असुरक्षित माओंनी राजकीय सत्तेचे केंद्रीकरण करून सर्व सत्ता स्वतःकडे घेतली. 1950 व 1960 च्या दशकात माओंच्या जीवघेण्या व अतार्किक राजकीय व आर्थिक प्रयोगांमध्ये लक्षावधी चिनी लोकांची आहुती गेली आणि त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीमुळे समाज होरपळून निघाला. अर्थव्यवस्था कुंठित झाली. राजकीय व आर्थिक संस्थात्मक जीवन कोलमडून पडले. माओंचे निधन 1976 मध्ये झाले, तेव्हा चीनमधील अर्थव्यवस्था आणि समाजजीवन ठप्प झाले होते. माओच्या मृत्यूनंतर, 1978 मध्ये डेंग झिओपेंग सत्तेवर आले, त्या वेळी चीनची सर्व आघाडीवर कोंडी झाली होती. मात्र नंतरच्या वीस वर्षांत डेंग यांनी या संस्थांची पुनर्बांधणी तर केलीच; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजवादी व्यवस्थेमध्ये राहून गतिशीलता गमावणाऱ्या व प्रामुख्याने शेतीप्रधान व ग्रामीण अर्थव्यवस्था असणाऱ्या समाजाचे परिवर्तन एका औद्योगिक, उद्यमशील व आधुनिक समाजात केले.

भांडवलशाही पद्धतीची, उद्यमशीलता जोपासणारी, कार्यक्षमतेला वाव देणारी व बरीच खुली अर्थव्यवस्था चीनने अंगीकारली, हे खरे! मात्र त्याचबरोबर डेंग झिओपेंग आणि त्यांच्यानंतर सत्तेत आलेल्या जियांग झेमिन व हु जिंताव यांनी वीस वर्षांत 40 कोटींहून अधिक लोकांना भीषण दारिद्य्रातून बाहेर काढले. हे विस्मयकारक परिवर्तन चीनने कसे घडवून आणले, याबद्दल जगभरातील अभ्यासकांना तसेच सर्वसामान्यांनाही मोठे कुतूहल वाटते. टोकाची समाजवादी विचारसरणी असणाऱ्या देशात राजकीय लोकशाही नसतानाही भांडवलशाही पद्धतीच्या सुधारणा घडवून आणणे, ही तारेवरची कसरतही चीनने कुशलतेने केली. डेंग आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या चिनी नेत्यांनी आर्थिक सुधारणांचा ध्यास सातत्याने घेतला; मात्र राजकीय सुधारणा सातत्याने नाकारल्या, लांबणीवर टाकल्या. त्यामुळे चीनमध्ये लोकशाही रुजू शकली नाही. आर्थिक दृष्ट्या प्रगत समाज प्रगल्भतेकडे वाटचाल करतो तेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्य ही दोन मूल्ये महत्त्वाची ठरतात. किंबहुना, स्वातंत्र्य व लोकशाही हेच मुळात बलवान व प्रगत समाजाचा आधार असतात, त्यामुळेच आधुनिक समाजातील गुंतागुंतीच्या प्रश्नांना समाज सामोरा जाऊ शकतो.

माओच्या मृत्यूनंतर डेंग झिओपेंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय सुधारणा केल्या नाहीत, मात्र एक गोष्ट आवर्जून केली; त्यांनी कोणाही एका नेत्याच्या हाती सर्व राजकीय सत्ता सोपवली नाही. सर्वसहमतीने राजकीय सत्ता राबविली. 1989 मध्ये बीजिंगमधील तिआनमेन चौकात विद्यार्थ्यांचे (राजकीय सुधारणा व लोकशाहीची मागणी करणारे) उत्स्फूर्त आंदोलन उभे राहिले. तेव्हा डेंग झिओपेंग यांनी ती मागणी धुडकावून लावीत हे आंदोलन लष्करी बळाच्या जोरावर अक्षरशः चिरडून टाकले. त्यानंतर चिनी राज्यकर्त्यांनी राजकीय सुधारणा हा विषयच पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवला आणि फक्त आर्थिक सुधारणा व आर्थिक वाढ याकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे चीनमध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असले तरी कोट्यवधी चिनी जनतेचे राहणीमान सुधारले व चीनचे परिवर्तन जागतिक महासत्तेत झाले. चीनची आर्थिक वाटचाल पाहता, केव्हा तरी भविष्यात राजकीय सुधारणा होतील आणि लोकशाही व स्वातंत्र्य यांच्यावर आधारित समाज तेथे निर्माण होईल, अशी जगातील सर्व देशांची अपेक्षा होती. चिनी लोकांना, बुद्धिमंतांना व विचारवंतांना केव्हा तरी लोकशाही येईल अशी आशा वाटते.

2013 मध्ये क्षी जिनपिंग सत्तेत आले. उच्च शिक्षित, बुद्धिमान असलेले क्षी जिनपिंग राजकीय सुधारणा करतील व चीनला लोकशाहीकडे घेऊन जातील,  असे सर्वांना वाटत असे. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन उलट होते. त्यांनी स्वतःकडे सर्व सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. सर्वसहमतीने निर्णय घेण्याची पद्धत बंद केली आहे. डेंग झिओपेंग यांच्यापासून चालत आलेल्या पद्धतीचा त्याग करून त्यांनी यु टर्न घेतला असून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली आहे. यामुळे चीनच्या राजकारणात व आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता समतोल ढळल्यासारखा वाटतो. क्षी जिनपिंग यांचे परराष्ट्र धोरणही आक्रमक झाले आहे. जगाचे नेतृत्व करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा उघड दिसते आहे. क्षी जिनपिंग यांच्या यु टर्नमुळे आशिया खंडात आणि जगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘चिनी महासत्तेचा उदय: डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग’ या प्रस्तावित लेखमालेत चीनमध्ये 1978 पासून सुरू झालेल्या परिवर्तनाची, त्यांच्या अर्थकारणाची, आर्थिक सुधारणांची, चिनी महासत्तेच्या उदयाची आणि अलीकडे क्षी जिनपिंग यांनी घेतलेल्या यू टर्नची कथा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या परिवर्तनाच्या कथनात डेंग झिओपेंगपासून ते क्षी जिनपिंग यांच्यापर्यंतच्या चिनी नेत्यांची चरित्रे, त्यांचे राजकारण, आर्थिक धोरणे व आर्थिक सुधारणांची चर्चा होणार आहे. चिनी महासत्तेच्या उदयामुळे आशिया खंडात आणि जगात अनेक समीकरणे बदलत आहेत. ट्रम्प आल्यापासून अमेरिकेने जागतिक व्यासपीठावरून आपले लक्ष कमी करून स्वतःच्या देशाचा अधिक विचार करणे सुरू केले आहे. क्षी जिनपिंग यांचा चीन मात्र याच वेळी जगाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच चिनी महासत्तेचे, समाजाचे व त्यांच्या राजकारणाचे स्वरूप समजावून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. चीन आणि भारत हे शेजारी देश असूनही या दोन देशांतील समाजांमध्ये फारसा संबंध नाही, तसेच परस्परांच्या इतिहासाबद्दल किंवा समकालीन घडामोडींबद्दल फारशी माहिती नाही. ती माहिती करून घेणे, हे या लेखमालेचे मोठे प्रयोजन आहे.

चीनच्या आर्थिक विकासाबद्दल व तेथील राजकारणाबद्दल कुतूहल असणारा मोठा वाचकवर्ग भारतात आहे. त्या वर्गाला ही लेखमाला आवडेल. भारतात आर्थिक सुधारणांकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणारा एक चिकित्सक वर्ग आहे, त्यालाही या लेखमालेतील आर्थिक सुधारणा व अर्थव्यवस्थेबाबतचे तपशील नव्याने उपलब्ध होतील; तसेच राजकारण व आर्थिक सुधारणा यातील परस्परसंबंधांचे आकलन होण्यासही मदत होईल. चीन-भारत संबंधांवरही चर्चा आहे. याशिवाय सामान्य वाचकाला चीनमधील समकालीन इतिहास, राजकारण, अर्थकारण, अर्थव्यवस्था व समाज याबद्दलचे तपशील उपयुक्त ठरतील.

Tags: ट्रम्प लोकशाही क्षी जिनपिंग हु जिंताव जियांग झेमिन माओ डेंग झिओपेंग अमेरिका चीन भारत सतीश बागल चिनी महासत्तेचा उदय democracy Trump xi jinping hu Jintao mao jiang Zemin deng Xiaoping America China India Satish Bagal Chini Mahasattecha Uday weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


Comments

  1. Datta- 02 Jul 2020

    We eagerly waiting for your articles...Nice.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके