Diwali_4 सनईतील सूर आणि सुरातील सनई
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आपण बनविलेल्या सनईमधून खाँसाहेबांसारखा कलाकार स्वर फुंकतो, तेव्हा ऐकताना स्वर्गीय आनंदाचा लाभ दादांना अनेकदा मिळाला. सूर आणि सनई यांचं नातं घट्ट झालं, तसंच खाँसाहेबांशी दादांचं नातं जुळलं. परमेश्वरी कृपेशिवाय हे शक्य नाही, असा सश्रद्ध दादांचा अतूट विश्वास आहे. सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद हलीम जाफरखाँनी म्हटल्याप्रमाणे ‘न छिला रहा पत्थर, छिला तो बना भगवान’ अशी लाकडातून परमेश्वर साकारण्याची दादांची किमया!  

ऋणानुबंध! योगायोगाने होणाऱ्या भेटी. दुर्गादासजी ठाकूर, म्हणजेच दादांची भेट अशीच योगायोगाने झाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार अनुराधा ठाकूरच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. अनुराधाचे मामा असल्यामुळे दादाही उपस्थित होते. बिस्मिल्ला खाँसाहेबांची सनई बनविणारे दुर्गादासजी ठाकूर यांच्या सत्कारासंबंधी निवेदन करण्याचे मला सांगण्यात आले. सत्कार झाला, पण कार्यक्रमाच्या ओघात मी त्यांची व्यक्तिशः दखल घेऊ शकले नाही. हे माझ्या मनाला डाचत होतं.

अनुराधाच्या पुस्तकाचं परीक्षण मी ‘दिव्य मराठी’त लिहिलं होतं. ते दादाजींनी वाचलं. ते परीक्षण आणि माझं सूत्रसंचालन दादांना खूप आवडलं. अनुराधाकडे फोनवर त्यांनी तशी दिलखुलास दाद दिली. त्यानंतर योगायोगाने नाशिकला जाण्याचा योग आला. तेव्हा दादा स्वतः घरी घेऊन गेले. मनःपूर्वक स्वागत, आतिथ्य केलं. त्यांच्या कामाची, अनुभवांची माहिती दिली. कलाकार म्हणून एवढा मोठा असलेला माणूस- किती साधा, अगत्यशील आहे, हे मनात नोंदवलं गेलं. मी नतमस्तक झाले.

ठाकूरांचं घराणंच लाकडी कारागिरी करणारं. आजोबांपासून लाकडी खेळणी आणि सनई बनविण्याचे काम. वडील-अण्णाही तेच काम करत. नाशिकमध्ये मेन रोडवर त्यांचं दुकान आहे. खूप वर्षांपूर्वी एक दिवस सकाळी अण्णांच्या बरोबर दादा दुकानात काम करत होते. अचानक एक व्यक्ती दुकानात आली. ती व्यक्ती म्हणजे साक्षात बिस्मिल्ला खाँसाहेब होते. तो प्रसंग दादांच्या मनात कोरलेला आहे. त्यासंबंधी आजही दादा भावुक होऊन सांगतात.

कुठल्याही निरोपाशिवाय, फोनशिवाय खाँसाहेब प्रत्यक्ष समोर हजर होते. सूरांचा तो बादशहा असाच होता. त्यांच्या सूरासारखा सच्चा आणि थेट भिडणारा. दुकानात येऊन ते म्हणाले, ‘‘सुना है, आप शहनाई बडी अच्छी बनाते हो!, हमे भी दो साज बना के दो।’’

देवच प्रसन्न! तोंडाने कौतुक करत होता आणि सनई मागत होता... आयुष्यभर हा क्षण लक्षात न राहिला, तरच नवल!

बिस्मिल्ला खाँसाहेब आपलं नाव आणि सनईबद्दल जाणून एक दिवस नक्की आपल्याकडे येणार, असा विश्वास दादांना-अण्णांना होताच. ते प्रत्यक्ष आले, तेव्हा अक्षरशः आकाश ठेंगणं झालं.

अण्णांनी काळी एक स्वरांच्या दोन सनया बनवून वाराणसीला पाठवल्या. त्या मिळताच खाँसाहेबांनी पत्र पाठवलं- अतीव समाधान आणि कौतुकानं भरलेलं! त्यानंतर दादांची खाँसाहेबांबरोबर आनंदयात्रा सुरू झाली सूरांच्या साक्षीनं!

तसे दादा कलाकारच! कला आणि कलेचं प्रेम त्यांना गुणसूत्रातून मिळालं. शाळेत असताना दादांची चित्रं सूचनाफलकावर लागत. ती पाहून पेठेसरांनी त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ दादांकडून बनवून घेतलं. नावानिशी पुस्तकावर चित्र छापून आलं. कौतुकाची पावती मिळणारा तो खरा क्षण... दादांना अवचित्‌ नव्या आनंदाची ओळख देऊन गेला. हा असा सृजनशीलतेचा आनंद दादांना पुन:पुन्हा मिळत राहिला. इंटर सायन्सला असताना विज्ञानप्रदर्शनासाठी दादांनी लाकडी ट्राम बनवली होती- विद्युत घटावर धावणारी. तिचंही खूप कौतुक झालं. एका कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेजच्या शोकेसमध्ये ठेवण्यासाठी ती विकत मागितली होती. दादांनी ती तशीच देऊन टाकली. आनंदाचं मोल त्यांच्यासाठी अधिक होतं.

अण्णांबरोबर दादा दुकानात लाकडी खेळणी, सुपारीच्या वस्तू बनवत असत. त्या वस्तूंची चित्रफीत चित्रपटापूर्वी काही दिवस चित्रपटगृहात दाखविली जात होती. स्वतः बनवलेल्या कलाकृती पडद्यावर पाहताना दादांना नवीच सुखद अनुभूती आली. या आनंदाचं वेगळंच समाधान व अप्रूप होतं. कलात्मक सृजनशीलता हाच दादांचा स्थायीभाव होता. नोकरी-व्यवसायात या कलाकाराला कधीच रस वाटला नाही. भविष्याविषयी दादांनी अजून गंभीरपणे विचार केला नव्हता. तशातच ती घटना घडली.

काही वाईट अनुभवांमुळे तेव्हा अण्णांनी सनई बनविण्याचे काम थांबवले होते. अशातच दिंडोरीचे नाना पगारे नावाचे सद्‌गृहस्थ अण्णांकडे आले. त्यांना सनई बनवून हवी होती. अण्णांनी स्पष्ट सांगितले की, ‘मी आता सनई बनवत नाही.’ नाना काही ऐकेनात, ‘मी काही सनई घेतल्याशिवाय जाणार नाही’, असं म्हणून ते तब्बल दोन दिवस दुकानाच्या बाहेर बसून राहिले. अण्णांना निश्चय मोडावा लागला. अण्णांनी सर्व हत्यारे बाहेर काढली अन्‌ त्यांना सनया बनवून दिल्या. तेव्हापासून ठाकूरांचे सनई बनविण्याचे काम पुन्हा सुरू झाले. दादा म्हणतात- नाना पगाऱ्यांमुळे आमचे सनईचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाले, त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ आहे.

त्यानंतर काही दिवसांनी तो क्षण आला- ‘निर्णायक!’ बीएस्सी झालेले दादा सुटाबुटात दुकानात होते. त्यांच्यासमोर सनई घेण्यासाठी काही मंडळी आली होती. दादांकडे पाहून त्यातला एक जण म्हणाला, ‘‘एक- दोन सनया वाईच जास्त घिऊन ठिव, म्होरल्यावेळी मिळतील याचा काय भरुसा? हा बाबा थोडीच सनया बनविणार हाय?’’

दादांच्या संवेदनशील मनाला ही गोष्ट चांगलीच लागली. तीन बहिणींत एकुलता एक असल्यामुळे सनई   बनविण्याचा वारसा आपणच पुढे चालवला पाहिजे, असं दादांना मनोमन वाटलं. संपूर्ण तयारीनिशी दादा आता सनई बनवण्याच्या व्यवसायात उतरले. व्यवसाय म्हणजे कलासाधनाच! कौशल्याची, तेवढीच गणिती अचूकतेची, शारीरिक शक्तीची आणि मानसिक स्थिरतेचीही गरज त्यासाठी लागते.

शास्त्र शाखेचे पदवीधर असल्याने दादांनी सनईच्या थोर परंपरेला आधुनिक काळानुसार नवं रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला. सनई अधिक सुंदर दिसण्यासाठी, ती लेथवर फिरत असताना तिच्यावर लाखेचा मुलामा देण्याचं नवं तंत्र विकसित केलं. स्वर आणि संगीताचे ज्ञान असल्याशिवाय सनई सूरात बनत नाही. त्यासाठी दादांनी संगीताचा वर्ग सुरू केला. सनईसाठी शिसवीचे चांगल्या प्रतीचे लाकूड लागते. जिव्हाळी, पावी हे भाग धातूचे असतात, तर स्वरनलिका लाकडाची. स्वरनलिका बनवणे हे दादांचे काम.

स्वरनलिका बनवताना लाकूड आतून कोरून त्याची नळी बनवावी लागते- विशिष्ट आकाराची आणि मापाची. त्याला कोरणी म्हणतात. अतिशय जबाबदारीने, भरपूर ताकद लावून व तेवढ्याच स्थिर आणि शांत मनाने हे काम करावे लागते. मनाची एकाग्रता लागते. कोरणी जेवढी सफाईदार तेवढे सनईचे सूर शुद्ध लागतात. कोरणीपेक्षाही सप्तसूरांची छिद्रे पाडणे म्हणजे खरे कसबं! गणिती अचूकतेचे! हे सर्व कसब-कौशल्य, तयारी दादांकडे होती. तीन पिढ्यांचा कर्मयोग होता. पुण्याई होती. ती दादांमध्ये फळाला आली आहे.

दादांनी बनविलेली एक अन्‌ एक सनई म्हणजे देखणी स्वरसुंदरी होती. सनई म्हणजे स्वरांचे मंदिर! स्वरांची प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय सनई वाजणार कशी? आपल्या सनईमध्ये आपलं दैवत असलेल्या बिस्मिल्ला खाँसाहेबांनी स्वर भरावेत, अशी दादांची तीव्र इच्छा होती. ती पूर्ण झाली. खाँसाहेबांनी सनईबद्दल काढलेले प्रशंसोद्‌गार हा दादांसाठी सर्वोच्च मानाचा पुरस्कार होता. त्याबरोबर खाँसाहेबांचं अलोट आणि अकृत्रिम प्रेम ठाकूर पिता-पुत्रांना लाभलं. अण्णा गेल्यावर खाँसाहेबांनी दादांना मोठा आधार दिला. पिता-पुत्राचंच नातं असावं असं. अण्णांच्या माघारी त्या प्रेमाच्या बळावर दादांनी दुकानाची जबाबदारी सांभाळली.

खाँसाहेबांना तस्वीह म्हणजे जपमाळ बनवून देण्याचं भाग्यही दादांना लाभलं. पहिली माळ खाँसाहेबांच्या गुरूंना फार आवडली, त्यांनी ती ठेवून घेतली. दादांना त्याचा सार्थ अभिमान आणि आनंद वाटला. त्यांनी खाँसाहेबांना तशीच दुसरी जपमाळ बनवून दिली. खाँसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे ते जेव्हा त्या माळेचे जप करायचे, तेव्हा त्यांना लाभणाऱ्या ईश्वरी कृपेचा काही भाग दादांना (माळ बनविणाऱ्याला) मिळायचा. सश्रद्ध दादांचाही त्यावर विश्वास होता.

सन 1983 मध्ये फाय फाउंडेशनचा पुरस्कार दादांना मिळाला. संगीत रिसर्च अकादमीचा वाद्यशिल्प पुरस्कार, सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरसाधना रत्न’ ही पदवी, चांदीचे स्मृती चिन्ह, ज्ञातिगौरव पुरस्कार, नाशिक महापालिकेचा महागौरव पुरस्कार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते चांदीची सनई... अशा अनेक पुरस्कारांचे गालिचे त्यांच्यासाठी अंथरले गेले. अनेक ठिकाणी सत्कार, गौरव झाले. किती तरी मुलाखती झाल्या. दूरदर्शनच्या झी, ई वाहिनीवरही मुलाखती झाल्या.

www.mynasik.com वेबसाईटवर दादांची माहिती वाचून अमेरिकेतून मिच ग्रीनबर्ग या संगीतकाराकडून सनईची मागणी आली. बघता-बघता दादांची सनई अमेरिकेला पोहोचली.

आपण बनविलेल्या सनईमधून खाँसाहेबांसारखा कलाकार स्वर फुंकतो, तेव्हा ऐकताना स्वर्गीय आनंदाचा लाभ दादांना अनेकदा मिळाला. सूर आणि सनई यांचं नातं घट्ट झालं, तसंच खाँसाहेबांशी दादांचं नातं जुळलं. परमेश्वरी कृपेशिवाय हे शक्य नाही, असा सश्रद्ध दादांचा अतूट विश्वास आहे.

सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद हलीम जाफरखाँनी म्हटल्याप्रमाणे ‘न छिला रहा पत्थर, छिला तो बना भगवान’ अशी लाकडातून परमेश्वर साकारण्याची दादांची किमया! दि.21 ऑगस्ट 2006 रोजी बिस्मिल्ला खाँसाहेबांना देवाज्ञा झाली. दादांची सनई पोरकी झाली, असं त्यांना वाटतं. तरीही खाँसाहेबांच्या साक्षीनं दादांनी संगीताचं सोनेरी पर्व पाहिलं. त्यांचं सूर आणि सनईचं नातं अजरामर राहिलं.

Tags: शांभवी जोशी Shambhavi Joshi शास्त्रीय संगीत वाद्य शहनाई सनई बिस्मिल्ला खान दुर्गादास ठाकूर Shehnai Sanai Indian Classical Music Instrument Bismillah Khan Durgadas Thakur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात